Skip to main content

महेश लंच होम..

महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या.

एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं.

आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे.

एकदम हाय-फाय. किंमतीच्या बाबतीत कोणत्याही प्रीमियम फाईन डाईन जागेशी स्पर्धा करणारं.

त्यांच्या वेबसाईटवर "जगातील सर्वोत्कृष्ट सी फूड"पैकी एक.. असं वर्णन आहे. "महेश सीफूड इज ग्रेट" असं लिहिलेलं "बर्प" सर्टिफिकेशनही तिथे फ्रेम करुन लावलेलं आहे.

तेव्हा बघूया तरी काय चीज आहे असं म्हणत आम्ही सातजण तिथे पोचलो. "लंच होम" असं नाव आहे आणि आम्ही पोचलोही अगदी लंचच्या वेळीच.

दारातच एका काचेरी शीतकपाटात वेगवेगळे मासे आणि खाली काही कप्प्यांमधे जिवंत चिंबोर्‍या, शेवंडे वगैरे ठेवली होती. म्हणजे आत जाताजाताच तुमच्या भक्ष्यस्थानी काय पडणार आहे ते पाहून जाता येत होतं.

आतला अँबियन्स छानच होता. सी-फूडचा काहींना हवासा आणि काहींना अगदी नकोसा वाटणारा दरवळ सगळीकडे होता. संध्याकाळी जेवणार्‍यांसाठी इथे पूलसाईड एरियाही आहे.

अंतर्भागः

बार सुटसुटीत पण नीटनेटका होता.

अनेक वेटर्स जिवंत लॉबस्टर्स, खेकडे आणि जिवंत नसलेले पण ताजे मासे हे सर्व ट्रेजमधे घेऊन फिरत होते.. गिर्‍हाईकाला चॉईस दाखवायला.. मग पसंत केलेला साईझ आणि प्राणी ताजा शिजवायला आत घेऊन जायचे.

उदा.

आधी:

नंतर:

नेहमी नॉनव्हेजवरच भर असतो म्हणून यंदा काहीतरी व्हेजही मागवू असा विचार केला. चौकशीअंती कळलं की आलेल्या सातांतले पाच व्हेज होते.

घ्या.. म्हणजे आता नॉनव्हेजच नमुन्यापुरते मागवायची वेळ आली.

मग मेन्यूकार्डाकडे नजर टाकली. डोळ्यात भरणारी पहिली बाजू म्हणजे उजवीकडचे आकडे. बर्‍यापैकी भूक मारणारे आकडे. सुमारे पंचतारांकित हॉटेल्सचा रेट भासावा असे दर सगळीकडे दिसत होते. पण आता आलोच आहोत तर करुया मजा, म्हणत मेन्यूतले पदार्थ चापसू लागलो.

काही उल्लेखनीयः

स्टार्टर्सः

-तंदूरी पापलेट
-पापलेट ग्रीन मसाला
-रावस, सुरमई किंवा हव्या त्या माश्याचे तंदूरी काप
-फिश टिक्का
-फिश फिंगर
-महेश स्पेशल प्रॉन्स

सीफूडमधे:

-जिंगरी मसाला
-बटर पेपर चिली गार्लिक अशा कॉम्बिनेशनमधे तुम्हाला हवे ते सीफूड बनवून देण्याचा चॉईस. म्हणजे बोनलेस क्रॅब, शेलसहित क्रॅब, लॉबस्टर, जम्बो प्रॉन्स, म्हाकुळ ऊर्फ स्क्विड वगैरे..

-महेश स्पेशल चिकन आणि मटण: लाल ग्रेवी आणि क्रीम यांमधे बनवलेले शेफ स्पेशल आयटेम्स.

याखेरीज

-नेहमीचे फिश फ्राय (रवा, बिनरवा तवा फ्राय, डीप फ्राय, तंदुरी.. जसे हवे तसे)
-मेंगलोरियन मसाल्यात फ्राय केलेले पापलेट आणि अन्य फिश
-शिंपले सुके फ्राय
-कारवारी प्रॉन्स
-चेट्टिनाड क्रॅब, चेट्टिनाड चिकन, क्रॅब करी
-सुके मटण, सुके चिकन, सुकी चिंबोरी, सुके प्रॉन्स.
-बांगडा, सुरमई, रावस कोलई. (मेंगलोरियन प्रकार असावा.)
-गाबोळीचे आयटेम्स (माशांची अंडी)

त्यासोबत खायला भाकरी, रोटी, भात वगैरे होतेच पण खास लक्ष वेधून घेणारे प्रकार म्हणजे नीर डोसे आणि आप्पम.

चेट्टिनाड किंवा मेंगलोरियन प्रकारचे भरपूर खोबरेयुक्त चिकन आणि नीर डोसा अशी एक "नीर डोसा चिकन" नावाची डिशही होती.

परतलेल्या माशांचे तुकडे हवे तर किंवा अखंड मासा हवा असल्यास तशीही सोय होती:

नॉनव्हेजचे, विशेषतः सीफूडचे सर्व दर हे चारशे-पाचशेच्या वरच होते. माश्यांच्या किंवा शेवंडांच्या वगैरे बाबतीत "अ‍ॅज पर साईझ" म्हणजे ९००, १५००, २००० असे काहीही.

सुरुवातीला परतलेले मासे घ्यायचे ठरवले तेव्हा वेटर खालीलप्रमाणे मासे घेऊन दाखवायला आला.

सर्व पापलेट ९०० रुपयांच्या वर होते. मोठा तर २०००च्या घरात. तेव्हा आम्ही सध्या रावसावर भागवायचं ठरवलं. (तोच तो.. सर्व पापलेटभाईंच्या खाली दबलेला..) हा ७००चा होता. रुपये बरं.. ग्रॅम्स नव्हेत.

मग आम्ही काळजीपूर्वक मेनू ठरवला.

-जंबो रावस तवा फ्राय.. (रवा नको.. उगीच कटलेट बनून जातं..)
-सुरमई गस्सी (मेंगलोरियन स्टाईल मसाला आणि नारळाचा सढळ वापर असलेली रेसिपी)
-त्यासोबत आप्पम आणि नीर डोसे

महेश लंच होममधे व्हेज लोकांसाठी नेहमीचेच पदार्थ होते. वेटर तर म्हणालाही, तुम्हाला व्हेजमधे भरपूर चॉईस हवा असेल तर खालीच असलेल्या "शिवसागर प्युअर व्हेजमधे जावा".

....तेव्हा.. मागवलेले पदार्थ असे. :

-व्हेज क्रिस्पी
-कोबी लॉलीपॉप
-पनीर टिक्का
-व्हेज कोल्हापुरी
-व्हेज गस्सी (मेंगलोरियन.. हाच एक वेगळा पदार्थ)
-पुन्हा नीरडोसे आणि आप्पम.. रोट्या वगैरे

मग एकेक पदार्थ यायला सुरुवात झाली आणि आता "टेस्ट" ऊर्फ चवीचा क्षण आला. मोमेंट ऑफ ट्रुथ.

क्रिस्पी व्हेजः

हे चवीला छान होतं. पण नेहमीपेक्षा अफलातून खास काही नव्हे.

त्यामागून रावस फ्राय होऊन आला:

याचीही टेस्ट समाधानकारक होती. रावसपेक्षा पापलेट कदाचित अजून थोडा चांगला असेल. पण "समाधानकारक" हा मचूळ शब्दच वापरायला लागतोय. "बेस्ट सीफूड इन द वर्ल्ड" या "महेश"च्या स्ववर्णनाला साजेसे "अफलातून, अप्रतिम, झक्कास" असे वर्णनात्मक शब्द काही तोंडी येईनात.

मग ती प्रसिद्ध स्पेशल मेंगलोरी सुरमई गस्सी (उच्चारी चूभूदेघे) आली.

त्याचा लुक मला तरी अजिबात आवडला नाही. रबडा नुसता. तरीही असेल चवीला बरी म्हणून टेस्टायला गेलो. सोबत आप्पम आणि नीरडोसा घेतला होता.

नीरडोसा आणि सुरमई गस्सी:

आप्पम आणि सुरमई गस्सी:

नीर डोसे लुसलुशीत मऊशार होते आणि आप्पम चांगलेच गुबगुबीत. मटणचिकनच्या किंवा झणझणीत माश्यांच्या कोणत्याही डिशला परफेक्ट अकंपनीमेंट असावेत असे.

पण ती गस्सी काही मला फारशी रुचली नाही. नारळ भरपूर होता. पण आंबटसर मसाला आणि सर्वकाही एकत्र मिसळून जणू रगड्यातून काढावे तशी (मेदूवड्याच्या बॅटरसारखी) गुळगुळीत ग्रेव्ही. त्यात कांदा, टॉमॅटो किंवा कोणताच घटकपदार्थ फील होत नव्हता.

सुरमईचे तुकडे उकडून घेऊन नंतर वरुन टाकल्यासारखे वाटत होते. मुरणे हा प्रकारच नव्हता.

व्हेज आघाडीवर काही आशादायक असेल अशा बेताने व्हेज गस्सी आणि आप्पम चाखून पाहिलं.

व्हेज गस्सी प्रकार म्हणजे सुरमईच्या गस्सीतलाच रस्सा सान्स सुरमई होता. त्यामुळे चवीत फरक नाहीच.

व्हेज कोल्हापुरी ठीकठाक.

यानंतर डेझर्ट्स आजमावून बघण्याची वेळ होती. कॅरामेल कस्टर्ड मागवलं.

चवीला ठीक होतं. पण त्याचा रस बशीभर पसरलेला आणि एकसंध दिसण्याऐवजी ते मोडतोड झाल्यासारखं वाटत होतं. निदान डेझर्टच्या बाबतीत प्रेझेंटेशनला महत्व आहे. त्यामुळे इंप्रेशन पडलं नाहीच.

वर उल्लेखलेल्या पदार्थांचं मिळून बिल पावणेचार हजाराच्या आसपास झालं. एकूण प्रकार ओव्हर हाईप्ड आणि महागडा वाटला.

महेश लंच होमला रेकमेंड करण्याविषयी:

तिथे सर्वकाही अगदी बेचव आहे असं मुळीच नव्हे. तिथले इतर प्रकार पूर्वी खाल्लेले चांगले असल्याचं आठवतंय. पण जेवढं वर्णन केलं गेलंय तेवढं अफलातून नक्कीच नाही. व्हॅल्यू फॉर मनी तर निश्चित नाही.

.........

आवड/नावड

प्रियाली Fri, 28/10/2011 - 15:40

फोर्टमध्ये ९३-९४ साली कधीतरी गेले होते. पट्टीच्या माशाहार्‍यांना बाहेरची कुठलीच रेस्टॉरंटे सहसा आवडत नाहीत त्यापैकीच एक.

तरीही, हे लक्षात आहे ते तिथल्या खाण्यामुळे नाही तर बाजूच्या टेबलावर अलीक पदमसी, शेरॉन प्रभाकर आणि त्यांच्या मुली (तेव्हा लहान) बसून जेवत होते म्हणून. ;-)

धनंजय Sat, 29/10/2011 - 00:17

In reply to by प्रियाली

मीसुद्धा दहा-बारा वर्षांपूर्वी फोर्टातल्या महेश लंच होममध्ये गेलो होतो.

बरे होते, असे आठवते. अती हायफाय नव्हते.

... Fri, 28/10/2011 - 18:18

प्रियालीतैशी सहमत
बाहेरची मत्साहारी हाँटेले फारशी पचनी पडत नाहीत
तरी त्यातल्या त्यात गोरेगावयेथील सत्कार आणि चर्चगेटमधल समुद्र भरत ही ठीक आहेत
हे हाँटेल महागच दिसतय
गविनी म्हटल्याप्रमाणे चवीचीसुद्दा बोंब दिसते

शहराजाद Fri, 28/10/2011 - 19:40

मला मत्स्याहार हॉटेलमधल्यापेक्षा घरचाच रुचतो.
पण मलंहो मधले नीर डोसे मात्र मला फार आवडतात.मी एकदा घरी करून बघितले होते, पण अगदी तसे झाले नव्हते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/10/2011 - 19:51

हा ७००चा होता. रुपये बरं.. ग्रॅम्स नव्हेत.

ही ही ही ..
गवि झिंदाबाद.

'महेश लंच होम'चं नाव ऐकून तुम्ही म्हणता तसाच प्रकार डोळ्यासमोर आला होता. पण हा बिनदाढीचा साधू निघाला. ;-)
त्यातून मी नेहेमी गवत खाणार्‍यांतली असल्यामुळे मासे वगैरे कधीतरी अगदीच 'लिबरल' वाटलं तर कोणाच्यातरी ताटातला एखादा तुकडा खाऊन पहाणार्‍यांतली! पण लेख वाचायला मजा आली. खाद्य सफरींची वर्णनं येत राहूदेत. इतरांनाही त्याचा फायदा होतोच.

Nile Fri, 28/10/2011 - 19:58

सर्व पापलेट ९०० रुपयांच्या वर होते. मोठा तर २०००च्या घरात. तेव्हा आम्ही सध्या रावसावर भागवायचं ठरवलं. (तोच तो.. सर्व पापलेटभाईंच्या खाली दबलेला..) हा ७००चा होता. रुपये बरं.. ग्रॅम्स नव्हेत.

अहो गवि, आमच्या तर्फे आमच्या वहिंनीना एक प्रश्न विचाराल का प्लीज? तुमचे मिस्टर नक्की काय करतात हे विचारायचं आहे. ;-)

घंटासूर Fri, 28/10/2011 - 20:05

इतकं महाग काही परवडायचं नाही आपल्याला. पण वर्णन छानच.

चिंतातुर जंतू Fri, 28/10/2011 - 21:12

फोर्टातलं महेश लंच होम फार पूर्वी खरंच खाणावळीसारखं घरगुती दिसणारं होतं आणि मंगलोरी चव बर्‍यापैकी अस्सल होती असं स्मरतंय. पण वर उल्लेख केलेल्या आणि इतर अनेक सेलेब्रिटींचे पाय तिथे वळू लागले आणि मग तिथली सजावट ही कोणत्याही नवश्रीमंत लोकांमध्ये प्रिय असणार्‍या उडप्यासारखीच झाली, पदार्थांचे भाव खूप वर गेले आणि पदार्थ अधिक तिखट चवीचे झाले. त्यानंतर तिथं जाणं बंद झालं. त्यामुळे तुम्हाला आलेल्या अनुभवाचं आश्चर्य वाटलं नाही.

पालवी Fri, 28/10/2011 - 21:18

पुन्हा एकदा शाकाहारी लोकांकडे दुर्लक्ष केल्या बद्दल तीव्र निषेध !!!!! तुमच्या धाग्याच नाव वाचून कसली खुश झाले होते. पण कसचं काय :(
जाऊ दे, आता तुम्हाला आम्हा गवत खाणार्यांसाठी खास एखाद्या हॉटेल चा review द्यावाच लागेल!!

प्रियाली Fri, 28/10/2011 - 21:29

मंगलोरी माशांच्या पदार्थांचा मला कंटाळा येतो तो त्याला दिलेल्या कढीपत्त्याच्या फोडणीमुळे. कुठल्याही मांसाहार किंवा मत्स्याहाराला कढिपत्त्याची फोडणी दिली की डाळ खातो आहोत (किंवा डाळीत घातलेला मासा खातो आहोत) अशी विचित्र भावना निर्माण होते.

बरं कढीपत्ता म्हणावा तर केवढा? आख्खं कढीपत्त्याचं झाड ओरबाडून पानं टाकावी इतका टाकलेला असतो. तो कोथिंबीरीसारखा खाववत नाही त्यामुळे बाजूला काढत बसणे ही आणखी एक कंटाळवाणी गोष्ट.

अवलिया Tue, 01/11/2011 - 00:46

मिपा कट्ट्याचे वर्णन ऐसीअक्षरेवर. वा गवि! उपस्थित मिपाकरांचा उल्लेख मात्र खुबीने टाळलेला दिसतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/11/2011 - 01:58

In reply to by अवलिया

अहो मिपा कट्टा तर सोडाच. "ऐसी अक्षरे"चे प्रवर्तक, मॉडरेटर्स, या सगळ्यांचे वेळप्रसंगी कान धरू शकतील असे लोकं मिपावर आणि मिपामुळेच एकमेकांना भेटले आहेत. आता बोला!

अमर टिके Thu, 26/07/2012 - 13:13

आताशा महेश एवढ छआन राहिले नाही... कोलबा मधे राहतो म्हनुन होतेल मधे हे सर्व खात नाहि जास्त. पन महेश पूर्वि खुप चवदार असे...

मन Thu, 13/02/2014 - 12:38

In reply to by गब्बर सिंग

गबबरच्या मधूनच गायब होण्यालाही हरॅसमेंट म्हणतात.
कैकदा "ह्यावर गब्बर काय म्हणेल" अशी उत्सुकता असते आणि गब्बर तिकडे फिरकतही नाही, गाय्ब होउन जातो.