Skip to main content

(सौंदर्याचे प्रौक्षण करुनि)

प्राजुच्या दिवाळीच्या कवितेचं मागल्या वर्षी विडंबन केलं होतं. यंदाही प्रयत्न करतो आहे! म्हटलं तर विडंबन म्हटलं तर निराळी कविता. कसंही.

केंद्रि रिकामा तांब्या घेऊन 'रंभा' अवतरली
"देताय ना दुध?", खिडकीवरती येऊन ती म्हटली
जागी झाली दृष्टी माझी ऐकून ती हाळी
ब्लॅक्कॅण्डव्हाईट दुनिया सारी झाली रंगोळी!

सोपानावरी तिज पाहुनिया बाबू गडगडला
सायकल आडवी होऊनि परश्या भूवरी आपटला
लगबग झाली दाहिदिशांतुन बया पाहण्याला
"राईसप्लेटीं मुर्गमसाला कुठुनि बरें आला?"

हसली पाहुनि, सिंचन झाले रोमी हर्षाचें
मनी माझिया फूल उमलले प्रेमिक आशांचे
तांब्या सोडूनि हात धरावा इच्छा मनी होती
खिळली तिजवर दृष्टि, पेटल्या मनी लाख ज्योती

पण स्वप्नांची विझून गेली सुंदर फुलबाजी
"ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी!
नवीन आकांक्षांवर गरगर फिरली भुईनळी
सौंदर्याचे प्रौक्षण करुनि फसवी दिवाळी!

-- आमच्या लाडक्या साळूस समर्पित.

राजेश घासकडवी Fri, 28/10/2011 - 21:03

कविता वाचून मर्ढेकरांचा स्वप्नं पहाणारा इराणी आठवला. पण त्याची स्वप्नं मर्यादितच असतात... इथे स्वप्न पडलेलं नाही, दाण्णकन आपटलेलं आहे.

"राईसप्लेटीं मुर्गमसाला कुठुनि बरें आला?"

"ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी!

या ओळी तर जबरीच. लगे रहो.

शहराजाद Sat, 29/10/2011 - 00:31

"ए भुसनळिच्या, दे की दुध"-

हे मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 29/10/2011 - 03:17

मला तर ही निराळीच कविता वाटली, विडंबन नव्हे.

"राईसप्लेटीं मुर्गमसाला कुठुनि बरें आला?"
"ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी!
या दोन ओळी मलाही आवडल्या.

प्रियाली Sat, 29/10/2011 - 00:54

"ए भुसनळिच्या, दे की दुध"

मस्त. कविता कळली आणि आवडली.

नंदन Sat, 29/10/2011 - 22:37

मस्त विडंबन रे, मेव्या. स्वतंत्र कविताच आहे खरं तर.

"राईसप्लेटीं मुर्गमसाला कुठुनि बरें आला?"
"ए भुसनळिच्या, दे की दुध"- ऐकुन आतिषबाजी!

झकास! :)

चिंजंश्रामो Sat, 29/10/2011 - 23:09

मराठी विडंबने
कुठल्यातरी डेंजर
जगात घडतात.
पोरीचा बाप
बायको
टॉयलेट
गटार
दारू
आता दुधाचे केंद्र.
कुणाला
मर्ढेकर आठवतात