Skip to main content

डिझायनर्स बेबी’चे (दुः)स्वप्न

xxx

जियांक्वीची जनुकीय बदलाची किमया
त्या चिनी वैज्ञानिकाचे नाव हे जियांक्वी. वय सुमारे 35 वर्षे. 2 महिन्यापूर्वी वैज्ञानिक जगाला त्यानी फार मोठा धक्का दिला. एका गर्भिणीच्या भ्रूणमधील जनुक बदलून त्यानी केलेल्या प्रयोगामुळे चक्क जुळी मुलं जन्माला आल्या. या जनुक बदलाच्या यशस्वी प्रयोगाची घोषणा त्यानी केल्यानंतर वैज्ञानिक अवाक झाले. त्यानी घोषित केलेली किमया कदाचित फार मोठी नसेलही. परंतु मानवी पेशीतील जनुक बदल न करण्याचा आंतरराष्ट्रीय करार त्यानी धुडकावली म्हणून वैज्ञानिक जग कावरे बावरे झाले. ‘डिझायनर्स बेबी’ची ही प्रत्यक्षातली चाहूल असे वैज्ञानिकांना वाटल्यामुळे या संकटातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करू लागले.
चीनच्या सदर्न सायन्स विद्यापीठाच्या हे जियांक्वीने ह़ाँगकाँग येथील एका वैज्ञानिक परिषदेत स्वतः केलेल्या प्रयोगाबद्दलची सविस्तर माहिती दिली. माहिती कळल्या कळल्या विद्यापीठाचे कुलगुरू तातडीने विमानाने परिषदेच्या स्थळी पोचलेसुद्धा! हे जियांक्वीला अटक करून एका अज्ञात स्थळी रवानगी करण्यात आली. चीनचे आरोग्य खाते, विज्ञान खाते इ.इ. सकट सर्वांनी हे जियांक्वीचे हे कृत्य अक्षम्य आहे असे जाहीर केले. त्याच्या भोवती पोलीस पहारा वाढवण्यात आला. कदाचित त्याला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैज्ञानिकाच्या प्रयोगाबद्धल एवढी तीव्र तिखट प्रतिक्रिया अलीकडच्या काळात कधीच उमटली नसेल. हे जियांक्वीने नेमके काय केले म्हणून जगभर त्याबद्दल एवढे उलट-सुलट बोलले जात आहे? एड्सग्रस्त पुरुषापासून एक महिला गर्भवती झाल्यामुळे जन्माला येणारे मूल निरोगी रहावे म्हणून हे जियांक्वीने भ्रूणमधील जनुकामध्ये काही बदल करून गर्भांकुराला वाढू दिले. अगदी अनपेक्षितरित्या त्या महिलेला जुळी मुलं झाली व रक्त तपासणीत त्या मुलीमध्ये एड्सचे कुठलेही जीवाणू नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याचा जनुक बदलाचा प्रयोग यशस्वी झाला होता. या मुली एड्समुक्त जीवन जगू शकतात याची खात्री झाल्यानंतर डिझायनर्स बेबीचे स्वप्न प्रत्यक्षात आले म्हणून त्यानी आपण एका नवीन जीवसृष्टीला जन्म दिलेल्या आपल्या प्रयोगाची जाहीर वाच्यता केली.
मानवी जनुकीय बदलाचा धसका
खरे पाहता एका जिवाला आनुवंशिक रोगापासून मुक्त करणे हा अपराध होऊ शकतो का? इतर वैज्ञानिकांनी एवढे आकाश पातळ करण्याची खरोखरच गरज होती का? पिकामधील जनुक बदलातून नवीन तळीला जन्म देणाऱ्यांचे कौतुक करत असताना मानवी जनुक बदलाची एवढी धास्ती का घेतली जात आहे? मांसाहारासाठी पाळलेल्या प्राण्यांच्या जनुकात बदल करून पैदास करण्यात काहीही गैर नाही असे असताना जनुक बदलातून जन्माला येणाऱ्या अपत्याची मानवी प्राण्याने अपेक्षा केल्यास त्यात काय चूक आहे? असे अनेक प्रश्न यासंबंधी विचारता येतील.
मानवी गर्भाच्या जनुकांवर संशोधन करून त्यात सुधारणा केल्यास गर्भाची वाढ आणि गर्भाची रचना यातील अनेक दोष टाळता येऊ शकतात. अपंगत्व, मूकबधीरपणा, रक्तदोष इत्यादी जन्मजात समस्यांवर सध्या उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक वैद्यक शास्त्रातही खात्रीचे उपाय नाहीत. पण जनुकीय अभ्यासातून हे उपाय शोधण्याच्या दृष्टीने दिशा मिळू शकते, असे संशोधकांचा दावा आहे. काही वर्षापूर्वी शोधलेल्या क्रिस्पर तंत्रज्ञानामुळे मानवी जनुकात हवे तसे बदल करणे सहजपणे शक्य होत आहे. त्यामुळे गेल्या 4-5 वर्षामध्ये या तंत्रज्ञानाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.
खरे पाहता उत्क्रांतीच्या प्रदीर्घ वाटचालीतून झालेले सजीव सृष्टीतील बदल नैसर्गिक असून त्याबद्दल मानवी प्राणी निसर्गाचा अत्यंत ऋणी आहे. परंतु एका अर्थी जनुकीय परिवर्तनाचे तंत्रज्ञान म्हणजे प्रति ब्रह्मसृष्टी असेच या क्षेत्रातील कित्येक वैज्ञानिकांना वाटत आहे. जगाच्या प्रारंभापासूनच्या आतापर्यंतच्या विज्ञान इतिहासात मुद्दामहून केलेल्या जनुक बदलातून सजीव निर्मितीचे एकही उदाहरण सापडत नाही. सजीव प्राण्यांच्या प्रत्येक पेशीत ए, सी, जी, टी या अक्षराने ओळखल्या जाणाऱ्या प्रथिनांच्या क्रमवारी व संयोजनातून करोडो जनुक निर्माण होत असतात. मानवी प्राण्याच्या पेशीतील जनुकांच्या संघटित संरचनेत बदल केल्यास आनुवंशिक आजारांना रोखण्यापासून मानवी चेहरापट्टी व अंगभूत गुणापर्यंत आपण ठरवलेल्या आराखड्यानुसार अपत्याला जन्माला घालता येते, असा दावा केला जात आहे. यालाच जिनोम एडिटिंग असे म्हटले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी सृष्टीत क्रांतीकारी बदल करता येईल असा दावा केला जातो. पीक वाढीसाठी जनुकीय बदलाचे (जीएम) तंत्रज्ञान वापरून गेली कित्येक वर्षे मोठमोठे कार्पोरेट्स आर्थिक फायदा करून घेत असलेली उदाहरणं आपल्या समोर आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापरातून टोमॅटोची चव बदलली जात आहे. पपईचा ओबडधोबड गोलाकार बदलून पॅकेजिंगला सुलभ व्हावे म्हणून त्याला चौकोनाचा आकार देण्याचे प्रयत्न चालू आहेत. डुक्कर, शेळी, कोंबडी यांच्या शरीरात जनुकीय बदल करून जास्तीत जास्त पैदास करणे शक्य होत आहे. एवढेच नव्हे तर या प्राण्यांचे अवयवांचे मानवी शरीरात अवयवारोपण करणारे प्रयोग केले जात आहेत. मलेरियाचे विषाणू मानवी शरीरात वाढू नये यासाठी जनुकीय बदलाची शक्यता चाचपडली जात आहे. अशा प्रकारे डीएनएमध्ये प्रभावशाली पद्धतीने काही बदल करून एका नव्या सृष्टीच्या निर्मितीचे स्वप्न मानवी प्राणी पहात आहे.
सुपर ह्युमनचे स्वप्न
परंतु मानवी क्लोनिंग किंवा जनुकीय फेरबदल यावर नैतिकतेच्या कारणामुळे जगभरातून विरोध होत आलेला आहे. अमेरिकेत मानवी जनुकांमध्ये असे परिवर्तन करण्यास मनाई आहे. डीएनएमधील बदल भावी पिढ्यांपर्यंत प्रभाव सोडत असतात व अन्य जनुकांचे नुकसान होण्याचाही धोका असतो. अशा प्रकारचे प्रयोग करणे हे अत्यंत असुरक्षित असून त्यामुळेच अनेकांनी चीनमधून आलेल्या या वृत्ताची निंदा केली आहे. त्यामुळे हे जियांक्वीच्या दाव्यावरही टीका करण्यात येत आहे. प्रगत देशांनी स्वतःवर घालून घेतलेले कायदे –नियम तितकेसे कडक नसते तर कार्पोरेट्स व संशोधक संस्था संगनमताने एव्हाना मानवी जनुक प्रक्रियेत हस्तक्षेप करून निसर्गाचा समतोल बिघडवून टाकले असते. गंमत म्हणजे नियम – कायदे करून त्याची अंमलबजावणी करेपर्यंतच्या कालावधीतच जास्त वेगाने नवीन जीव जन्माला घालण्याचे प्रयोग केले जात आहेत. मानवी जेनोमच्या बाबतीत प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. कारण सुपर ह्युमन बीइंगला आता अत्यंत प्रचंड प्रमाणात मागणी आहे. काहींना ऑलिंपिकमध्ये जिंकणारे अपत्य हवे असते. काहींना हॉलिवुडच्या हीरो/हिरॉइनला लाजविणारे मूल हवे असते. काहींना आइन्स्टाइनपेक्षा जास्त बुद्धीमान होणारे अपत्य हवे असते. काहींना सैन्यात शौर्य गाजवणारे मूल हवे असते. काही कार्पोरेट्सना तर बिनडोक रोबो टाइप, कधीही संपावर न जाणारे कुशल कामगारांची पिढी हवे असते. अशा प्रकारे अख्ख्या मानव जातीलाच मागणी तसा पुरवठाच्या चक्रात अडकवू पाहणाऱ्या या तंत्रज्ञानाकडे साशंक नजरेने पाहिले जात आहे.
लगाम नसलेल्या व चहूफेर उधळलेल्या घोड्या प्रमाणे हे जैविक तंत्रज्ञान भविष्यकाळात काय काय जन्माला घालेल याचा अंदाज येईनासे झाले आहे. आतापर्यंत कुठले जनुक बदलल्यास काय होईल याचा सैद्धांतिकरित्या अंदाज करण्यात यश मिळाले आहे. परंतु प्रत्यक्ष प्रयोग केल्यास काय दुष्परिणाम होणार आहेत याबद्दल कुणीही बोलायला तयार नाहीत. जर जनुकीय तंत्रज्ञानाचा सर्रासपणे वापर केल्यास भोवतालच्या निसर्गावर काय परिणाम होतील याची किंचितशी कल्पना या क्षेत्रात अभ्यास केलेल्या तज्ञांनासुद्धा नाही. मानवाचे गुणसूत्र व त्याची विवेकबुद्धी यांच्यातील परस्पर संबंध व त्यातून झालेले मानवी विकास याबद्दलचा अभ्यास अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. प्राण्याच्या गुणसूत्रात बदल करत असताना भलतेच काही झाल्यास त्या प्राणीला नष्ट करता येईल. परंतु मानवावरील प्रयोग हाताबाहेर गेल्यास त्याला मारून टाकणे अनैतिक ठरू शकेल. त्यामुळेच मानवी जनुकांना धक्का देणारे क्रिस्परसारखे तंत्रज्ञान वापरून जनुकीय प्रयोग करू नये असे वैज्ञानिक समूहाने आपणहून ठरवले आहे. परंतु हा निर्धार मोडीत काढणारे महत्वाकांक्षी वैज्ञानिक व त्याना साथ देणाऱ्या संस्था (व राष्ट्रे!) असल्यामुळे वैज्ञानिकांचे जग अस्वस्थ होत आहे.
चीनच्या वैज्ञानिकाच्या कृतीचा जगभरातील सर्व वैज्ञानिकानी धिक्कार केला आहे. एक निंदनीय कृती म्हणून त्याचे खंडन केले जात आहे. तरीसुद्धा काही जण After all he did it असे समर्थन करत, सृष्टीकर्त्याचे काम त्यानी केले म्हणून कौतुकही करत आहेत. तरीसुद्धा एखाद्या हीरोसारखे त्याचा मानसन्मान न करता त्याला कैदेत ठेवले हेही नसे थोडके! जपान, अमेरिका, युरोपसारखे देश चीनवर राजकीय वा आर्थिक निर्बंध घालतील या भीतीने कदाचित चीनने हे जियांक्वीला जेलमध्ये रवाना केली असेल. आतापर्यंत थोडे फार नियंत्रण आहे म्हणून उघडपणे या डिझायनर्स बेबीला जन्म घालणाऱ्या तंत्रज्ञानाचे समर्थन केले जात नाही. परंतु गुप्तपणे कुठे काय चालले आहे हे कळण्यास काही मार्ग नाही.
मानवी शरीरातील जनुकीय बदल

बीबीसी या वृत्त संस्थेने या विषयी काही गोष्टींची नोंद केली आहे. मानवी डीएनएमध्ये बदल करण्याच्या मुद्यावर वैज्ञानिकांमध्ये वाद आहेत. त्याला क्रिस्पर असं म्हंटलं जातं. कर्करोगासारख्या आजारावर मात करण्यासाठी लोकांच्या डीएनएमध्ये बदल करणे असा त्याचा अर्थ आहे. अद्भुत कल्पना वाटत आहे ना? पण, या तंत्रज्ञानाचा गैरवापर झाला तर? अत्युच्च बौद्धिक क्षमता किंवा विशिष्ट प्रकारचे शारीरिक गुणधर्म असणाऱ्या बाळांना जन्म देण्याची प्रवृत्ती बळावली तर काय होईल याचा आपण विचार केला आहे का?
yyy
या बाबीकडे सध्या आव्हान म्हणून पाहिलं जात नाही. पण, भविष्यात हा प्रश्न आपल्याला भेडसावू शकतो. त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागलं. यासाठीच वेगवेगळ्या प्रयोगशाळा, विद्यापीठ आणि संशोधन संस्थांवर नीतीशास्त्राच्या अभ्यासकांची नियुक्ती करणं अनिवार्य राहील. जर संशोधक नीतीमत्तेच्या कक्षेबाहेर जाऊन काही निर्णय घेत असतील तर हे नीतीशास्त्र तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करू शकतील. जेव्हा नवीन तंत्रज्ञान आपलं दार ठोठावत असतं. तेव्हा आपण नीतीमत्तेच्या प्रश्नांना बगल देऊन चालणार नाही. या प्रश्नांवर विचार करण्याची सर्वाधिक गरज याच काळात आहे.
एक माणूस म्हणून आपलं अस्तित्व काय आहे याचा सर्वांगानं विचार करण्याची ही वेळ आहे. आपल्या कोणत्या गुणांचं संवर्धन करणं आपल्याला आवश्यक वाटतं याचं आपण चिंतन करणे गरजेचं आहे असं व्हिक्टोरिया विद्यापीठातील नीतीशास्त्राचे प्राध्यापक निकोलस अगार म्हणतात.
महासंकटाची चाहूल
नरसंहार करणारे युद्ध व भीषण दुष्काळासारखे नैसर्गिक संकट यावर मात करून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेणाऱ्या या मानव जातीला पुढील काळात हवामानातील बदल, जैविक तंत्रज्ञान व रोबोटिक तंत्रज्ञान अशा तीन महासंकटाना सामोरे जावे लागणार आहे. या संकटातून मानवजातीला सुटका करून घ्यायचे आहे. या महासंकटाना कुठल्याही राष्ट्रांच्या सीमा रोखू शकत नाहीत. वायू प्रदूषण, जल प्रदूषण रोखण्यासाठीचे उपाय तोकडे पडत आहेत. निसर्गाला ओरबडून आपली चैन करून घेणाऱ्या मानवी समाजाला हवामानातील बदल रोखण्यास अजूनही यश आलेले नाही. जैविक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक टेक्नॉलाजी, कृत्रिम बुद्धिमत्ता या मानव वंशाला कुठे नेऊन ठेवतील याचा नेम नाही. हे तंत्रज्ञान विकसित होत असताना कुठलाही देश त्याचे नियंत्रण करू शकणार नाही. बायोटेक्, माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्या नफेखोरीसाठी काहीही करायला तयार आहेत. या सर्व कंपन्या एकमेकाशी स्पर्धा करत असून आपण मागे राहू नये म्हणून जीवघेण्या तंत्रज्ञानाच्या शोधात त्या आहेत. याच बरोबर काही अती उत्साही राजकीय नेते या येणाऱ्या संकटांकडे डोळेझाक करत कंपन्यांना काहीही करण्यास पूर्ण मुभा देत आहेत. क्रिस्परसारखे तंत्रज्ञान डिझायनर्स बेबीसाठी कंपन्या वापरत असल्यास पुढचे पुढे, आता कशाला काळजी म्हणत निष्क्रीय राहणे पसंत करतील. आणि वैज्ञानिक मागचे पुढचे विचार न करता प्रयोगावर प्रयोग करत राहतील. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पृथ्वीच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवणारे समाज आता आपल्याला हवा आहे..

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स