आरोळी
rk_sunil
आरोळी
काळीज चिरतच हवेत विरते
रोज नवी आरोळी
फुलण्याआधीच खुडते कळी
हतबल होई माळी
धावा करुनही देव ना तारी
दुर्दैव घोर कपाळी
पुन्हा चिरडली नराधमांनी
निरागस पाकोळी
मोर्चे निघतील घोषणा देतील
झडतील अनेक चर्चा
उठतील बसतील कितीक बैठका
फुकाच्या वरवरच्या
लबाड लांडगे भाजून घेतील
आपली आपली पोळी
पुन्हा चिरडली नराधमांनी
निरागस पाकोळी
दुसऱ्या दिवशी जमतील सारे
देह निष्प्राण बघाया
चुरगाळलेली ओरबाडलेली
विटाळलेली काया
कँडल मार्च काढेल आपली
भेकडांची टोळी
पुन्हा चिरडली नराधमांनी
निरागस पाकोळी
निषेध करुनी करु बहिष्कार
बलात्कार्यांचा करु तिरस्कार
उरकून टाकु मग
सारे सोपस्कार
अन् जाऊ झोपी समाधानाने
खाऊ अफूची गोळी
ऐकुन पुन्हा उठण्यासाठी
केविलवाणी लाचार आरोळी..