Skip to main content

गेले राहून काही

तुझ्या डोळ्यात स्वतःला पहाणार होते,
तुला श्वासात भरून घेणार होते.
तुझ्या केसांचा करकरीत स्पर्श जपणार होते,
तुझ्या ओठांची किनार रेखणार होते.

तुझ्या प्रेमाचं काय करावं कळत नाही,
हे गाऱ्हाणं तुलाच सांगणार होते.
मानापमानाच्या गोष्टी टाळणार होते,
दुरावा रुसव्यात गुंडाळून टाकणार होते.

तुझी पाठ वळल्यावर तुला हाक मारणार होते,
शब्दांमुळे उमटलेले ओरखाडे हळुवार पुसणार होते.
घाई होती की हे सगळं सावकाश करणार होते?
पण तुला जाऊ दिल्याविना मी मला कशी समजणार होते?