कवितेनंतर
anant_yaatree
कवितेनंतर बाकी उरल्या
शब्दांचे विभ्रम मी बघतो
ऐकून आहे ठिणगीचाही
बघता बघता वणवा होतो
वळीव कोसळता वणव्यावर
राखेची रांगोळी होते
अगणित थेंबांतिल थोड्याश्या
थेंबांची पागोळी होते
सोसून पागोळ्यांचा मारा,
तरारून अंकुर जो फुटतो
वृक्ष होऊनी त्याचा, अनघड
शब्दांनी तो डवरून जातो
पाठशिवणीचा नाद लावुनी
शब्द बीज वळचणीत रुजते
कधीतरी त्यातून अचानक
ओळ नवी कवितेची फुलते
- का ओळीच्या पैलतिरावर
अनाघ्रातसे काही उरते?