Skip to main content

अवचित गवसावे काही जे

प्रश्न पडावा असा की ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला डिवचून निराळे उत्तर शोधत जावा

वाट दिसावी अशी की अद्भुत प्रदेशी जाताना
मुळापासूनी पुसल्या जाव्या जुनाट वाटखुणा

सूत्र स्फुरावे असे की ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे अधिक गुंफण्यास

अवचित गवसावे काही जे ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या स्थळकाळा वाकुल्या