माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही, तरीही देशातील सर्वात मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनेबाबत अंतरजालावर उपलब्ध माहिती या लेखात सादर करत आहे.
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.
१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.
देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.
२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
>>>२०२५ मध्ये, देशभरातील…
>>>२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
महाराष्ट्रात कुठेच पुरस्थिती नसल्याने शिबिरे उभारण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे १ लाख शिबिरांचे स्वप्न धुळीस मिळाले.
लवकरच प्रचंड पूर येवो आणि पाच लाखाचे उद्दीष्ट पूर्ण होवो यासाठी पटाईतांनी देव पाण्यात ठेवले असतीलच.
मोदी हय तो मुमकीन हय !!
!
वर ‘अहिरावण’ या सदस्याने दिलेले चारही प्रतिसाद — त्या प्रतिसादांबद्दल काहीच म्हणणे नाही (आक्षेप तर नाहीच नाही), परंतु… हे प्रतिसाद ‘अहिरावण’ या आयडीकडून यावेत, याचे महदाश्चर्य वाटले.
इतःपर,
१. ‘३_१४ विक्षिप्त अदिती’ या आयडीकडून स्त्रीद्वेष्टे (तथा मार्जारद्वेष्टे — Same difference!) प्रतिसाद,
२. ‘चिंतातुर जंतू’ या आयडीकडून ‘फ्रेंच आणि इराणी सिनेमे कसे महाभिकार असतात’ अशा आशयाचे प्रतिसाद,
३. ‘विवेक पटाईत’ या आयडीकडून ‘हिंदुत्व हे बिनबुडाचे दळभद्री तत्त्वज्ञान देशाला रसातळाला नेईल’ किंवा ‘आयुर्वेदात काही दम नाही’ अशा आशयाचे, अस्खलित सदाशिवपेठीत लिहिलेले प्रतिसाद,
४. ‘Rajesh188’ या आयडीकडून सुसंबद्ध, वाचनीय, सलग एकाच लिपीत टंकलेले प्रतिसाद,
५. ‘प्रभाकर नानावटी’ या आयडीकडून प्रतिसाद,
६. फार कशाला, ‘'न'वी बाजू’ या आयडीकडून संक्षिप्त, तळटीपविरहित, मुद्द्यास धरून, कोणावरही दुगाण्या न झाडणारे, विधायक प्रतिसाद…
…हेही पाहायची तयारी ठेवलेली आहे.
(मोदी आल्यापासून) या जगात काय वाटेल ते होऊ शकते!
असो चालायचेच.
हत्ती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव ऐकले तरी मनात नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. हत्ती हा प्राणी शक्तिशाली, स्थिर व संयमी म्हणून जगभरात ओळखला जातो. त्याचप्रमाणे आर.एस.एस. ही संस्था आपल्या कार्यपद्धतीत संयम, स्थैर्य आणि शक्ती यांचा समन्वय साधणारी आहे.
हत्ती दिसायला शांत असला तरी त्याच्यात प्रचंड ताकद असते. त्याचा एक पाऊल पुढे टाकला की संपूर्ण जमिन हलते. तसेच आर.एस.एस.ची कार्यपद्धती बाहेरून साधी, शांत वाटते; पण तिच्या प्रत्येक कृतीत सामाजिक जीवनात मोठा परिणाम घडवण्याची ताकद दडलेली असते.
हत्ती आपल्या कळपाचे रक्षण करतो, शत्रूंच्या आक्रमणापासून सावध राहतो. त्याचप्रमाणे आर.एस.एस. समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करण्यासाठी व राष्ट्रीय ऐक्य बळकट करण्यासाठी सदैव सज्ज असते. हत्तीप्रमाणेच आर.एस.एस.ही संस्था बाह्य आडंबर न माजवता कार्य करत राहते.
हत्ती दीर्घायुषी असतो, त्याची वाटचाल संथ पण अढळ असते. आर.एस.एस.ही संस्था कालचक्रानुसार संथ पण सातत्यपूर्णपणे समाजसेवा करत आलेली आहे. तिच्या विचारांचा व कार्याचा ठसा समाजमनावर कायम राहतो. त्यामुळे हत्ती व आर.एस.एस. यांच्यातील साम्य स्पष्ट जाणवते.
गजराज नमस्कार समजा rss च्या 100 वर्षाच्या
समजा rss या संस्थेचा वस्तूनिष्ठपणे 100 वर्ष कार्याचा आढावा घ्यायचे ठरविले तर तुम्ही समजा विधायक कार्य हे एका तराजूत ठेवले ज्यात त्यांनी केलेले सर्व प्रकारचे सामाजिक कार्य येईल
तर याच बरोबर या संस्थेने काही विघातक कार्य देखील केलेले आहे असे तुम्हास वाटते काय ?
म्हणजे अगदी ढोबळ मानाने जरी तराजू तुलना केली तर तुमच्या मते rss कडून झालेली विघातक कार्य कुठली तुम्ही सांगू शकता काय ? अर्थात विधायक कार्ये सुद्धा सांगा.
म्हणजे rss चे विधायक आणि विघातक असा तुलनात्मक आढावा घेता येऊ शकतो का?
की तुमच्या मते.असे नसून RSS ने आजवर केवळ विधायक च कार्य केलेले आहे असे आपले मत आहे ?
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का?
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का?
पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा.
उपप्रश्नः
१. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का?
२. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का?
नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.
सुदर्शन शोधणे आले आता..
बरं झालं! आरएसएसची शंभरी भरली एकदाची !! सुटलो आता !!