निशानची (हिंदी सिनेमा)
मन

- ‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या, पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत. ह्या मधली महिला पात्रेही दणकट आहेत. पहिल्या भागात नेमबाजी शिकवणारी पदकविजेती मम्मी, दारुच्या गुत्त्यात मवाली मंडळींना भिडणारी करणारी तिची ‘सून’ इत्यादी पात्रे मस्त रंगवलीत. ह्यात कधी कधी साधंसरळ असणारं पुरुष पात्र अवघड परिस्थितीत बिचकतं. गांगरतं. महिला मात्र त्या प्रसंगाला भिडते. असे प्रसंग मजेशीर आहेतच. विचार करायला लावणारेही आहेत. अर्थात एकदम अवास्तव वाटावे असे काही रोहित शेट्टीच्या सिनेमासारखे महिला करत नाही (‘वेलकम’मध्ये अक्षय कुमारला उचलून कतरिना आगीतून शांतपणे बाहेर येते खांद्यावर टाकून). महिला म्हणून जी बलस्थाने असू शकतात ती ह्या सिनेमातली नायकाची प्रेमिका वापरते. नायकाची मम्मी कथेनुसार तिची जी कौशल्ये आली आहेत तितकी वापरते. मुलांना घडवते. हे घडवणे म्हणजे उत्तर भारतात रामलीला पद्धतीतून आलेले गडद, वल्गना करणारे, “मेरे करण अर्जुन आयेगे” म्हणणारे असे नाही. धीरोदात्त आहे. gangs of wasseypur ची पुष्कळच छाप आहे. पण तरीही ते कंटाळवाणे होत नाही ही कमाल आहे. सर्वात मोठा खलनायक स्वतः हात काळे न करता शांतपणे इतरांना त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे मुडदे पडायला प्रेरित करतो. त्यांचे मृत्यू घडवून आणतो. वगैरे शैली.
- समोर दाखवली जाणारी कुठलीही बाब जराही अनावश्यक वाटली नाही. ‘माझ्याकडे कात्री असती तर हे कापून टाकलं असतं’ असं मला पुष्कळ सिनेमाबाबत वाटतं. (उदा : धर्मेंद्र जितेंद्र विनोद खन्ना ह्यांच्या the burning train ह्या सिनेमात मध्यंतरापूर्वीचा साराच भाग काढून टाकला तरी चालेल अशी परिस्थिती आहे.)
- सिनेमा चांगला म्हटला जात असला तरी आपल्याला समजला, झेपला पाहिजे. विशाल भारद्वाजचे (शाहीद कपूर, काश्मीरवाला) हैदर , (विद्या बालन नसीरुद्दीन शाह, अर्शद वारसीवाला) इश्किया, अनुराग कश्यपचा ‘गुलाल’ हे फार म्हणजे फारच भारी आहेत असे ऐकले म्हणून शांतपणे, सावकाश बघायचा प्रयत्न केला. दरवेळी भीषण कंटाळा आला. (ह्यातले दोन तर थिएटर मध्येही पाहिले आहेत)
मुद्दा असाय की सिनेमे थोर भारी असले तरी ते आपल्या फ्रीक्वेन्सीत बसले पाहिजेत ना. Ultraviolet किंवा infrared दोन्ही किरणे ‘प्रकाश’ म्हणून आपल्याला निरुपयोगी आहेत. कारण आपले डोळे त्यात नीट ‘पाहू’ शकत नाहीत. शून्य decibels पेक्षा कमी किंवा 140 पेक्षा मोठा आवाज मनुष्याचा कान ‘ऐकू’ शकत नाही. सिनेमांचे काहीसे तसेच आहे. हा मला तरी झेपला. आवडला. काम करणाऱ्या नटांकडून मख्ख चेहरेही नकोत पण अगदीच गडद हावभाव नकोत, असे काम करवून घेणे अवघड. तेही जमले आहे.
- आवडायचे मुख्य कारण म्हणजे माझ्या डोक्यात तुलना होते ती मागच्या दहा वीस वर्षातल्या 'नॉर्मल', थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमा सोबत. ह्या मागच्या दहा वीस वर्षातल्या सिनेमात महिला पात्रे सबल दाखवायची तर 'सांड की आँख', 'तुम्हारी सुलु', 'मिशन मंगल'सारखे सिनेमे केले जातात. ते काही मिनिटांच्या वर मला तरी सहन होत नाहीत. आता ह्या महिलांना सबळ दाखतोच. असा आवेश घेऊन केल्यासारखे दिसते. त्यात सहजता नसते. इथं ती सहजता आहे. अमिताभच्या 'डॉन'मध्येही झीनत अमानचे पात्र तगडे होते. पण somehow.... मला शाळकरी दिवसात ते बरे वाटले. आता तितके थोर नाही वाटत.
- आवडायचे अजून एक कारण कधी कधी असते ते म्हणजे आपल्याला त्याच्याशी चटकन जोडून घेता येणे, आपल्या बघण्यात खरोखर असे नमुने असणे, आपल्याला चटकन relate होणे. तिथं जशी वागणारी पात्रे आहेत त्यातली काही अगदी जवळून पाहिली आहेत. काही दृश्यांना थांबवून मी आणि दोस्त हसत सुटलो होतो. तर कधी आधीच पुढची घटना आणि संवाद सहज सांगायचो. ह्याचा अर्थ पटकथा, संवाद लिहिणाऱ्यांनी निव्वळ कल्पनेनं लिखाण केलेलं नाही. त्यांनी खरोखरच ह्यातले पुष्कळ भाग इकडं तिकडं त्यांच्या आसपास पुष्कळ काळ बघितले असावेत. आणि चांगलेच बारकाईने निरीक्षणही केले आहे.
- गाण्यांची संख्या पुष्कळ आहे. पण कथेच्या ओघात ती वेगळी अशी जाणवत देखील नाहीत. ओघ सुरु राहतो. Dev D मध्येही काहीसे असेच होते. सारी गाणी फार आवडली. संगीत, lyrics हे प्रत्येक गाण्याचे वेगळे लोक आहेत. अशा केसमध्ये एकसंधता साधणे अवघड असते. नीट जमले नाही तर विचित्र ठिगळ जोडल्यासारखे वाटते. इथं ते अवघड कामही जमून आलं आहे. (ह्याचा पुरावा म्हणजे हे वेगवेगळ्या लोकांनी केलं आहे हे आपल्या लक्षातही न येणं)
Kanpuriya Kantaap - Nishaanchi | Monika Panwar | Dhruv Ghanekar | Alaaya & Amaala | Varun Grover
- "हिंसेचा मार्ग वाईट असतो", "अविचाराने वागू नये" इत्यादी शिकवण (प्रत्यक्ष शब्दबंबाळ उपदेश न करता) शिकवणारे सिनेमे एकूणात फार कमी. हा त्यातला एक. हाणामारीला लै भारी हिरोगिरी समजणे हा कसा सुतीयाप आहे, एकदा त्या लायनीत शिरलात की कसे अजून अजून रुतत जाता, हे छान आले आहे.
- खटकलेली बाब. अंजना (erika jason) मध्येच येणे विचित्र वाटलं. म्हणजे काहीही आहे.
- Sniper होणे म्हणजे निव्वळ हाताला पिस्तूल लागलं म्हणून ट्रिगर दाबणे इतकंच नाही. त्यासाठी हात स्थिर ठेवायला खास व्यायाम लागतो. नजर ठेवायची तर टार्गेटवर डोळे खिळवतानाच त्याच्या किंचित वरती किंवा बाजूला, ज्या त्या पिस्तूल किंवा गिलोल किंवा शस्त्राची तंत्र, मर्यादा माहीत करून त्याचा हिशेब करता यायला हवा. अशा गोष्टी असतात. काही प्रमाणात ह्याला spotting म्हणता यावं. sniperचे हे तंत्र बरेच चांगले जमले आहे.
- इतरही काही कच्चे दुवे आहेत. पण ते सोडून देता येण्यासारखे आहेत.
- हा इतका छान सिनेमा आहे तर त्या मानाने कौतुक फारसे कसे काय होत नाही, हे समजत नाही.
- कथेत बहुतांश वेळा नवीन फार काही नसतं. कथेची ट्रीटमेंट काय आहे ह्यातच काय ती मजा असते. लिखाणाची कर्तबगारी असते. बारकावे काय आहेत, पटकथा काय आहे, संवाद काय आहे, काय ‘दाखवले’ आहे, काय सुचवले आहे, हे महत्त्वाचे असे आदुबाळ कित्येकदा म्हणतो. तेही इथं जाणवतं. कारण ह्यातही नवीन विशेष काही नाही. सारं सारं नाट्य वजा केलं तर सामान्य सूड कथा आहे असं त्यातल्या कुटुंबीयांच्या नजरेनं म्हणता येईल. पण पण पण.... मला आवडलं जे काही आहे ते.
- पैलवानकी आणि त्याभोवतीचं गुन्हेगारीतला संभाव्य प्रवेश, पैलवानकीचे अर्थकारण ह्याचीही एक झलक दिसते. दारासिंग ह्यांच्या बाबत ऐकले होते की कित्येक पैलवान मंडळींना मुख्य करिअर झाल्यानंतर चांगले पर्यायी मार्ग उरलेल्या आयुष्यात फार उरत नाहीत, ह्याबद्दल वाईट वाटे. त्यांनी ह्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला आणि काही उपाययोजनांच्या दृष्टीनेही प्रयत्न केले. त्याचे महत्त्व पटते. पैलवानकीप्रमाणे हे नेमबाजीलाही लागू होत असावे. अगदीच दूरची लिंक लावायची तर काही जणांचा अग्निवीरबाबतचा आक्षेप ह्याच लायनीवर असतो. गुन्हेगारी जगताला उपयुक्त असे कौशल्य असणारे पुष्कळ माणूसबळ त्यातून उपलब्ध होईल, आणि त्यांच्या हाताला इतर रोजगार नसला तर एकूण व्यवस्थेला डोकेदुखी वाढेल, अशी शंका टीकाकार व्यक्त करतात. (मला त्यातले कळत नाही. भलीबुरी टिप्पणी करण्याची माझी पात्रता नाही)
- ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार ह्याच्यावर सागर धनकड/धनकर ह्याच्या खुनाचा सुरु असलेला खटला अन् त्यादरम्यानच्या माध्यमातल्या चर्चाही आठवल्या.
“निशानची” तुम्ही कुणी पाहिलात का? कसा वाटला? खराब गोष्टी कुठल्या वाटल्या? इतर काही चांगल्या गोष्टी जाणवल्या का? कुठल्या?
काय अब्यास!
वाह, काय अभ्यास आहे. मी हा सिनेमा पाहायची सुतराम शक्यता नाही, पण वाचायला आवडलं हे टिपण.