ट्रेन ड्रीम्स: एक शांत, पण अस्वस्थ करणारी अनुभूती

काही चित्रपट हे केवळ पाहण्यासाठी नसतात, तर अनुभवण्यासाठी असतात. नेटफ्लिक्सवर नुकताच आलेला आणि सध्या ऑस्करच्या शर्यतीत असलेला 'ट्रेन ड्रीम्स' हा असाच एक चित्रपट आहे. हा चित्रपट आपल्याला विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या अमेरिकेत घेऊन जातो. निसर्ग, एकाकीपणा आणि मानवी दुःखाचा एक आगळावेगळा प्रवास त्यात पाहायला मिळतो.
२०११ मध्ये प्रकाशित झालेल्या डेनिस जॉनसनच्या याच नावाच्या गाजलेल्या लघुकादंबरीवर चित्रपट आधारित आहे. या कादंबरीला आता एक आधुनिक क्लासिक मानलं जातं. एका सामान्य माणसाच्या सर्वसाधारण आयुष्यातली असामान्य शोकांतिका आणि त्याचा निसर्गाशी असलेला संबंध/संघर्ष या पुस्तकातून मांडला होता. शब्दांतून मांडलेली शांतता पडद्यावर उतरवण्याचं धाडस दिग्दर्शक क्लिंट बेंटलीनं केलं आहे आणि त्यात तो यशस्वी झाला आहे.
चित्रपटाची कथा रॉबर्ट ग्रेनिअर या एका रेल्वे मजूर आणि जंगलतोड्याभोवती (लॉगर) फिरते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, अमेरिका वेगाने बदलत होती तेव्हा रॉबर्ट आपलं छोटंसं विश्व उभारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची पत्नी ग्लॅडिस आणि लहान मुलगी हेच त्याचं जग असतं. (स्पॉयलर न देता थोडक्यात सांगायचं तर) त्याचं हे जग उद्ध्वस्त होतं. त्यानंतर उरतो तो फक्त रॉबर्ट आणि त्याचं एकाकीपण. तो वेडापिसा होत नाही, तर त्या दुःखाला सोबत घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात, जुन्या आठवणींच्या आधारे आपलं आयुष्य व्यतीत करतो. ही कथा एका माणसाच्या अस्तित्वाची आणि काळाच्या ओघात हरवलेल्या जगाची आहे. त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याला इतर माणसं भेटतात. त्यांच्याबरोबरचे प्रसंग सुटेसुटे वाटू शकतात, पण त्यांचाही रॉबर्टच्या मनावर खोल परिणाम होतो. पीटीएसडी ही संकल्पनाच जेव्हा रॉबर्टला माहीत असायचं कारण नव्हतं तेव्हाचा पीटीएसडीनं ग्रासलेला रॉबर्ट आताचे प्रेक्षक पाहतात तेव्हा ते खोलवर जाणवतं.
'ट्रेन ड्रीम्स' हा नेहमीच्या हॉलिवूडपटांसारखा वेगवान नाही. त्याची शैली अत्यंत संथ (Slow Burn) वाटू शकते. यात फार काही घडत नाही. संवादांपेक्षा शांतता अधिक बोलते. स्मृती, काळाचा ओघ, आणि निसर्गाचं रुद्र रूप हे या चित्रपटात प्रामुख्यानं आहेत. प्रेक्षकांना रॉबर्टच्या नजरेतून जग दिसतं. इथे निसर्ग हा केवळ एक पार्श्वभूमी नसून एक मुख्य पात्र आहे. बदलत जाणारं, आधुनिकतेकडे जाता जाता निसर्गाचा आणि पर्यावरणाचा नाश करणारं जग हा त्यातला एक महत्त्वाचा धागा आहे.
या चित्रपटाचा सर्वात भक्कम पैलू म्हणजे जोएल एजर्टनचा (Joel Edgerton) अभिनय. रॉबर्ट ग्रेनिअरच्या भूमिकेत त्यानं जीव ओतला आहे. ही भूमिका आव्हानात्मक आहे कारण व्यक्तिरेखेला संवाद खूप कमी आहेत. डोळ्यांतले भाव, देहबोली आणि चेहऱ्यावरच्या सूक्ष्म हालचालींतून त्यानं रॉबर्टचं दुःख, प्रेम, आणि त्याचं साधेपण ताकदीनं साकारलं आहे. दुःखाचा अतिरेक न करता, आतल्या आत घुसमटणारा माणूस त्यानं उत्तमरीत्या साकारला आहे.
चित्रपटाचं छायांकन ही त्याची आणखी एक जमेची बाजू. जंगल, धुकं, बर्फ डोळ्यांचं पारणं फेडतात. निसर्गाचं सौंदर्य आणि क्रौर्य कॅमेऱ्यानं अप्रतिम टिपलं आहे. पण ते नुसतं सुंदर न दाखवता त्याचा व्यक्तिरेखेच्या मनःस्थितीशी संबंध जोडला आहे.
अर्थात, तुम्हाला धडाकेबाज ॲक्शन किंवा वेगवान हॉलिवूडी कथा आवडत असतील, तर हा तुमच्यासाठी नाही. पण जर तुम्हाला शांत, विचारप्रवण करणारे आणि दृश्यसमृद्ध चित्रपट आवडत असतील, तर 'ट्रेन ड्रीम्स' नक्कीच पाहा, आणि शक्य तितक्या मोठ्या पडद्यावर, चांगल्या साऊंड सिस्टिमसह पाहा. तो संपल्यानंतरही त्याची शांतता तुमच्या मनात बराच काळ रेंगाळत राहील.