अठरा लक्ष पावलं - सामाजिक इतिहासाचा एक वेधक दस्तावेज असलेले प्रवासवर्णन

प्रवासवर्णने हा काही नवीन साहित्यप्रकार नाही. किंबहुना गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास'ने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे उत्कट चित्रण करून अर्वाचीन साहित्याला एक वेगळे परिमाण दिले. मात्र त्यानंतर बराच काळ प्रवासवर्णनांमध्ये ललित, विनोदी आणि आत्मनिष्ठ या तीन गोष्टींवर (एकत्रित वा वेगवेगळा) भर देण्यात आला. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' हा एक अपवाद (पण एकच नव्हे; जगदीश गोडबोले, आणि त्यांच्यासारखे इतर कार्यकर्त्यांनी वेळोवेळी सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणारे वृत्तांत लिहिले), पण एकंदर प्रवासवर्णन म्हटले की याप्रकारचे लेखन झाकोळले जाते हे खरे.

आता थोडेसे या पुस्तकाच्या पार्श्वभूमीबद्दल. स्वातंत्र्य मिळून वीस वर्षे लोटली होती. पण देश अन्नधान्याबद्दल स्वयंपूर्ण नव्हता.

५४-५५ साली अमेरिकेतून धान्याची पहिली आयात झाली. हे धान्य फुकटात मिळाले, पण त्यासाठी वाहतूकखर्च धान्याच्या किंमतीइतकाच आला! हे धान्य पाच वर्षांपर्यंत घेण्याचा करार करण्यात आला, आणि त्या जोरावर स्वस्त धान्याची दुकाने सरकारने उघडली. मात्र पाच वर्षे पुरवायला हवे होते असे हे धान्य एका वर्षातच संपले! त्यानंतर अमेरिकेबरोबर धान्य विकत घेण्याचा करार करण्यात आला, आणि त्या आयातीचे प्रमाण वाढतच गेले. त्यासाठी खर्चलेले पैसे हा आतबट्ट्याचा व्यवहार होऊन बसला. अमेरिकेने ते पैसे भारतीय रुपयांत घेतले आणि भारतातच ठेवले. ते इतके साठले, की भारत सरकार त्यातून कर्ज घेऊ लागले आणि व्याजासहित फेडू लागले. दोन तीन मोठी धरणे होतील एवढे पैसे त्या व्याजापोटी भरले गेले! पण नंतर ६२-६३ सालापासून अमेरिकन गहू येत असूनही धान्यकिंमती वाढू लागल्या आणि त्यामुळे ६३-६४ साली रेशनिंग सुरू झाले. लेव्ही हा शब्द शेतकर्‍यांच्या शब्दकोशात आला. या धान्यशक्तीचा उपयोग १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिकेने केला. युद्ध थांबवा नाहीतर धान्यमदत बंद करू असा इशारा अमेरिकेकडून आला. तिथपासून त्यांचा आपल्या राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू झाला.
(हे सर्व विवेचन डॉ. वि. म. दांडेकरांचे आहे. किमान त्यांच्या दृष्टिकोनातून चित्र स्पष्ट व्हावे, एक बाजू तरी कळावी, म्हणून इथे दिले आहे. त्यांचेच म्हणणे संपूर्णतया बरोबर असेल असे अजिबात गृहीत धरलेले नाही. पण रेशनिंग, लेव्ही, अन्न-आयात हे मुद्दे तरी खरोखरचे होते हे सर्वांना मान्य व्हावे.)

'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर हे एक विचारी व्यक्तिमत्त्व. त्यांचे वैयक्तिक विचार जरी हिंदुत्ववादाकडे झुकणारे (अधिक स्पष्ट म्हणायचे झाले तर सावरकरवादाकडे झुकणारे) असले तरी मासिकाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून दक्ष असणारे.

माजगावकरांना हे सगळे खटकले, आणि "परदेशी अन्न-धान्य आयात बंद करा" हा मुख्य मुद्दा घेऊन एक पदयात्रा काढावी असे त्यांच्या मनात आले. त्या पदयात्रेत सामील होता का, असे त्यांनी दि बा मोकाशींना विचारले. 'माणूस' पुरस्कृत लेखक म्हणून नव्हे, तर मोकाशींनी आपली खर्चाची सोय करून यावे हेही माजगावकरांनी स्पष्ट केले.

ही पदयात्रा म्हणजे वेरूळ ते मुंबई असा साधारण साडेतीनशे मैलाचा टप्पा होता. त्या पदयात्रेचे मोकाशींनी त्यांच्या स्वतंत्र दृष्टिकोनातून केलेले वर्णन म्हणजे हे पुस्तक. स्वतंत्र दृष्टिकोनातून केलेले हे मुद्दाम नमूद केले, कारण जर माजगावकरांशी मतभेद झाले, वा माजगावकरांचे काही विचार/वागणे त्यांना वावगे वाटले तर त्यांनी तसे सरळ लिहिलेले आहे. मुळात माजगावकरांनी या पदयात्रेचा हेतू सांगण्यासाठी जे पत्रक काढले होते त्याची भाषा आणि सूर दोन्ही मोकाशींना आवडले नाहीत. तसे माजगावकरांना स्वच्छ सांगून आणि "तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे" असे त्यांच्याकडून स्पष्ट करून घेऊनच मोकाशी पदयात्रेत सामील झाले. आणि त्यांना 'केसरी'ने पुरस्कृत केले होते, त्यामुळे 'माणूस'च्या भूमिकेला झुकते माप देण्याचा प्रश्न उरला नाही.

मोकाशी एक लेखक म्हणून फार प्रकाशझोतात वावरले नाहीत आणि आणलेही गेले नाहीत. पण त्याची फारशी खंत न बाळगता ते लेखनकामाठी करीत राहिले. धुवट सदरा, पायजमा (सायकल चालवताना त्याला लावायच्या क्लिपा), चपला असा मोकाशींचा सर्वमान्य आणि सर्वसामान्य वेष. तंबाखू-सुपारी हे त्यांचे स्वस्तातले आणि चित्तवृत्ती अती-उल्हसित न होऊ देणारे व्यसन. तसेच त्यांची शब्दकळाही. ती भरजरी फेटा, काळा जोधपुरी कोट, पांढरी सुरवार, हातात चांदीच्या मुठीची काठी अशी अजिबात सामोरी येत नाही. किंवा बुशकोट, पँट, बूट अशीही. त्यांच्या वेष-व्यसनासारखीच ती नेमस्त, साधी. आणि म्हणूनच भावणारी.

पदयात्रेत भेटणारी माणसे, पाहिलेली स्थळे, गावागावांतले होणारे (किंवा न होणारे) स्वागत, राजकारणातील ताणेबाणे, पदयात्रेतील कायम सोबत्यांचे कंगोरे, हे सगळे मोकाशींची लेखणी सजगपणे टिपत जाते. पण त्यात कुठेही आत्मभान सुटत नाही. मग शहरी माणसाला खेड्यांत (विशेषतः त्या काळी) येणारी स्वच्छतागृहांची अडचण असो वा पदयात्रेतील स्वतःला न पटलेला एखादा कार्यक्रम सोडून आपण मधूनच दुसरे काहीतरी करून आल्याचे वृत्त असो. मोकाशी काहीही संपादून न घेता 'हे असे घडले' इतक्या स्वच्छपणे सगळे लिहितात.

मात्र त्यांचे लेखन हे एखाद्या केवळ वार्तांकन करणार्‍या हिशेबी वार्ताहरासारखे अजिबात नाही. त्यांची सूक्ष्म बारकावे टिपण्याची हातोटी, आणि अतिसूक्ष्म विनोद हे जितेंद्र अभिषेकींच्या विलंबित ख्यालासारखे.... संथ आणि कणाकणाने विस्तार होत जाणारे. मात्र त्यासाठी एक वेगळीच संथपणाची आवड जरूर असावी लागते. नाहीतर 'कंटाळवाणे', 'रटाळ' असे शेरे मारायची चढाओढ सुरू होते. थोडक्यात, घटना आणि भाषा या दोन्ही गोष्टी 'लक्षवेधक' असाव्यात अशी ज्या लोकांची वाचनासाठी पूर्व-अट असेल त्यांनी या पुस्तकापासून बाजूला राहिलेले बरे.

मात्र ज्यांना गवताच्या एका रसरशीत पात्याकडे पाहण्यासाठी दोन मिनिटांची बेगमी जड वाटत नाही, त्यांना हे पुस्तक निश्चितच निखळ आनंद देईल.

त्यातील काही मासले:

"तिथून तिसर्‍या नंबरच्या लेण्याकडे जात असता माझ्या सोबत्याने मोर पाहिला. मोर गेलेले झुडूप तो मला दाखवू लागला. तेवढ्यात आणखी एक मोर पिसार्‍याचे ओझे घेऊन जड उडत त्याच उंचवट्यावर उतरला. मान तुकवीत तो आमच्याकडे पाहत असता, आधी झुडुपात येऊन प्रतीक्षा करीत असलेली त्याची सखी बाहेर डोकावली. आम्ही सभ्यपणे हळूच पुढे गेलो."

"त्या व्याख्यानांनी माझ्या लहानपणच्या राष्ट्रीय चळवळीतील व्याख्यानांचे स्मरण मला आणून दिले. त्या वेळचे पुढारी आवेशामुळे जमिनीवर उभे राहणे अशक्य झाल्याने टेबलावर उभे राहून बोलू लागत. त्यांची प्रत्येक आवळलेली मूठ व आपटलेला पाय आम्हा मुलांना घायाळ करून जाई. त्या भावनांच्या वादळांनी आमच्यातील कित्येकांचे आयुष्य निकामी केले."

"...देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी एकाने यज्ञ केलेला आठवतोय. प्रत्येक भारतीयाने एक चूळ टाकली तर इंग्रज बुडून जातील असे आम्ही म्हणत असू व तशी चूळ लोक का टाकत नाहीत याबद्दल हळहळत असू. म्हणूनच आता स्वातंत्र्य मिळून वीस वर्षे झाल्यावरही तसलीच भावनाविवश व्याख्याने ऐकू यावीत हा मला धक्का होता." (हे त्यांच्याच पदयात्रेतल्या एका व्याख्यानाबद्दल!)

"आता माकडे अधिक धीट होऊ लागली. आम्ही नुसतेच निरुपद्रवी नाही तर आमच्या टोप्या उडवल्या तरी चालतील ही त्यांची खात्री झाली असावी. एक टोळके मुद्दाम आमच्यापासून दोन हातांवर रस्ता ओलांडू लागले. त्यांच्यात फट मिळताच मी मधून जाऊ लागलो. तोच एक मोठे माकड मागच्या पायांवर उंच होत, दात विचकीत, नखे काढीत, चित्कारत माझ्या अंगावर आले. मी झटकन मागे सरताच ते पुढे पळाले. पण त्या एका क्रुद्ध क्षणात माकडसेनेने रावणाचा पराभव केला असेल हे पटले!"

".... धुक्याने मजा आणली आहे. शुद्ध धुके चाखावे ते रानावरचेच. ते पाहत असता ज्वारीची ताटे होऊन शेतात उगवावेसे वाटत आहे. धुक्याचा निळसर रंग काचेतून चालावे तसा भास उत्पन्न करीत आहे. पांडवांची मयसभा अशीच काहीतरी असावी....."

असो. फार मोह टाळतो.

जाता जाता एकच थोडा विसंवादी स्वर - मोकाशी हे खूप प्रसिद्ध नसले तरी साफ अप्रसिद्ध निश्चितच नव्हेत. आणि या पुस्तकाची पार्श्वभूमी ही (किमान त्या काळातील) सगळ्यांच्या जीवनाशी निकटचा संबंध असलेली. तरीही हे पुस्तक निघाले पदयात्रेनंतर चार वर्षांनी (डिसेंबर १९७१). आणि पुढची आवृत्ती थेट जून २००४!. त्यानंतर काही नाही! एक वाचनाची आवड असलेली व्यक्ती म्हणून मला ही मान खाली घालावीशी गोष्ट वाटली एवढे (आणि एवढेच! अशी इतरही बरीच पुस्तके आहेत हे मान्य. पण या पुस्तकाबद्दल लिहिताना हे टिपावेसे वाटले) प्रामाणिकपणे नोंदवू इच्छितो.

पुस्तकाचे नाव चमत्कृतीपूर्ण वाटते, पण त्यामागची कारणमीमांसा सोपी आहे. आपली सर्वसाधारण चाल ही दीड ते दोन फुटी पावलाची असते. पण पदयात्रेला जरा दम राखून वाटचाल करायची असल्याने पाऊल छोटे होते, साधारण एक फुटी. किमान मोकाशींनी तरी असा हिशेब मांडला, आणि एक मैल म्हणजे १७६० यार्ड म्हणजे ५२८० फूट म्हणजे ५२८० पावले या गणिताने ३५० मैलांची सुमारे अठरा लक्ष पावले होतील हे उत्तर काढले आणि ते नाव दिले. ही माहिती मात्र या पुस्तकात नाही; मी ती एका 'माणूस'च्या जुन्या अंकात साधारणपणे तीस वर्षांपूर्वी वाचली होती. दुर्दैवाने अधिक तपशील (साल, अंक आदि) आठवत नाहीत.

रविमुकुल यांचे मुखपृष्ठ एका शब्दात सांगायचे तर 'फर्मास' आहे!

प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती: जून २००४
किंमत: शंभर रुपये

पूर्वप्रसिद्धी: 'मनोगत'

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! परिचय अत्यंत आवडला
अशाच एका प्रवासाचे (वारीचे) वर्णन करणारे, मोकाशी यांचे 'पालखी' हे पुस्तकही आवडले होते. स्वगतः त्याचा (बहुदा आजानुकर्णाने) छान परिचय करून दिला होता. शोधायला हवा

पुस्तक या महिन्यातच विकत घ्यावेसे वाटु लागले आहे. बुकगंगावर उपलब्धही आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>एक वाचनाची आवड असलेली व्यक्ती म्हणून मला ही मान खाली घालावीशी गोष्ट वाटली एवढे प्रामाणिकपणे नोंदवू इच्छितो.

दि. बा. मोकाशींवर काहीसा अन्याय झाला आहे असं एकंदरीत वाटतं. तुकारामावरची त्यांची कादंबरी 'आनंदओवरी'सुद्धा अनेक वर्षं अनुपलब्ध होती. साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित झालेला त्यांच्या निवडक कथांचा संग्रह बहुधा सरकारी प्रदर्शनांत पूर्वी पाहिला होता, पण आता कुठे दिसत नाही. 'देव चालले', 'वात्स्यायन' अशी त्यांची काही चांगली पुस्तकं गेली कित्येक वर्षं अनुपलब्ध आहेत. विजय तेंडुलकरांनी आपले आवडते लेखक म्हणून त्यांना मान दिला होता, पण त्यांचं साहित्य मात्र पुनर्प्रकाशित होत नाही ही खरंच खेदाची गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||