कांदासंस्थानाचे चिलखती उत्तर

कांदा संस्थान, दि. १८ जुलै. - संस्थानात खास भरवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थानाच्याच संशोधन संस्थेत बनवलेल्या चिलखताची चाचणी दाखवण्यात आली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीतल्या सर्व स्तरातल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पात सहभाग घेतल्याचे आवर्जून सांगण्यात आले. काय आहे हे चिलखत? ऐकू या संस्थानाच्या संशोधन संस्थेच्या प्रभारी श्रीमती ज्योतीकिरण छेदी यांच्याच शब्दांत.

""असभ्य पुरूषांचा उपद्रव न झालेली स्त्री दाखवा, १०० कांदे मिळवा" या आमच्या योजनेला अतिशय गेल्या वर्षी अतिशय थंडा प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही पारितोषिकाचे मूल्य दुपटीने वाढवले. तरीही कोणीही मुलगी, स्त्री समोर आली नाही. सर्व कांदे सडून गेले तेव्हा संस्थानाच्या संस्कृतीरक्षण समितीच्या अहवालात यावर कडक ताशेरे ओढण्यात आले. आणि सूचनांमधे आमच्या संशोधन संस्थेने या प्रकरणात लक्ष घालण्याचाही एक मुद्दा होता. आमच्या संस्थेने हा मुद्दा मनावर घेऊन एक नवीन चिलखत तयार केलेलं आहे.

"संस्कृतीरक्षण हा या चिलखताचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही बघतच आहात त्याप्रमाणे हे चिलखत खांद्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मुली आणि स्त्रियांचे शरीर झाकते. पबमधे मुली एकेकट्या जातात, तोकडे कपडे घालून अचकट विचकट अंगविक्षेप करतात. या मुलींकडून अनेक पातळ्यांवर संस्कृतीभंजन होते. एकतर या मुली पबमधे जातात, दुसरं म्हणजे दारू पितात. आपल्या संस्कृतीत चौदा विद्या, चौसष्ट कलांमधे पुरुषांना मोहून घेणारे नृत्य करणे याचाही समावेश असेल तरीही पाश्चिमात्यांच्या पबमधे असे कृत्य करणे हा आपल्या महान संस्कृतीवर आघात आहे. हे चिलखत घातल्यामुळे त्यांच्याकडूनही संपूर्ण संस्कृतीरक्षण होईल. एकतर या चिलखतामुळे या मुलींचे सर्व शरीर झाकले जाईल. शिवाय चिलखताची रचनाही अशा प्रकारे केली गेली आहे की एकदा ते चढवल्यावर मुलींना अचकट विचकट अंगविक्षेपही करता येणार नाहीत. कोणी केलीच तर इतर कोणाला ते समजणारही नाही.

"शिवाय कोणा पुरूषांनी त्यांचा विनयभंग अथवा त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यास तो असफल होईल. या चिलखताला एक पासकोड आहे. तो आकडा फक्त चिलखत घालणार्‍या मुलीलाच माहित असेल. हा आकडा टाकल्याशिवाय हे चिलखत अनलॉक होणार नाही. अगदी सुर्‍याच्या वारांनीसुद्धा या चिलखतावर फारतर ओरखडे उठतात याचे प्रात्यक्षिक आपण पाहूच. अफजलखानाच्या वारांनी जसा शिवाजीवर काहीही परिणाम झाला नाही तशा प्रकारची सुरक्षितता या चिलखतामधून सर्व चवचाल, उठवळ आणि बाजारबसव्या मुलींनाही मिळेल. आपोआपच आपली महान संस्कृती जपली जाईल."

श्रीमती छेदी यांच्या या भाषणानंतर चिलखताचा चाचणी प्रयोग करण्यात आला. ज्योतीकिरणताईंनी स्वतःच हे चिलखत अंगावर चढवून चिलखत सर्वांग झाकते, कोणत्याही प्रकारचे अंगविक्षेप केल्यास फक्त समोरच्या पुरूषाला झुकून आदर दाखवल्यासारखेच दिसते आणि चिलखतावर मटनाचा सुरा वापरल्यास फक्त मामुली ओरखडे उठतात याचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. त्यापुढच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठीही ताईंनी उत्सुकता दाखवली. हा त्याचा अहवालः

प्रश्न १. चिलखत तयार करण्यापेक्षा निदान संस्थानाततरी पब्जवर बंदी का आणत नाही?

या प्रश्नाचं उत्तर संस्कृतीरक्षण समितीचे अध्यक्ष आणि संस्थानाचे तहसीलदार इमरान काटकर यांनी दिले. "पब्जवर बंदी आणणं सध्याच्या कायद्याप्रमाणे शक्य नाही. कांदा संस्थानाच्या घटनेप्रमाणे अस्तित्त्वात असणारा कायदा बदलण्यासाठी लोकांच्या दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल आणि बहुसंख्य मतदारांना पब्ज हवे आहेत. दुर्दैवाने कांदा संस्थानातली निम्मी लोकसंख्या तरूणांची आहे आणि या पिढीचा पब्जना संपूर्ण पाठींबा आहे. याचा दोष सर्वथा शिक्षण मंडळावर येतो. त्यांनी योग्य अभ्यासक्रमाची रचना केली नाही. त्याशिवाय इंटरनेट, जगभरातले चित्रपट तरूण पिढीला उपलब्ध होणे, बाहेरच्या देशात लिहीलं जाणारं साहित्य आमच्या तरूण पिढीला उपलब्ध होणे यांसारखे दुर्दैवी प्रकार आज घडत आहेत. या सगळ्यामुळे जग कुठे जात आहे याचं भान तरूण पिढीला आलं तरी आपल्या संस्कृतीचं महत्त्व ही पिढी समजून घेत नाही. आमच्यासारख्यांची 'ओल्ड फॅशन्ड' म्हणून टिंगल होते आणि बहुसंख्येच्या जोरावर हे तरूण आम्हाला बाजूला सारत आहेत."

प्रश्न २. संस्कृतीचा र्‍हास तुम्हाला थांबवायचा आहे आणि यामागची तुमची तळमळ, प्रामाणिकपणा स्पृहणीय आहे. परंतु तरूण पिढीला तुमची संस्कृती मान्य नसल्यामुळे तोकड्या कपड्यांतल्या तरूण मुली हे चिलखत वापरतीलच यासाठी तुम्ही काही उपाययोजना केली आहे का? काही पब-कायदे वगैरे??

ज्योतिकिरण ताईंनी याचे उत्तर दिले, "पब्जमध्ये जाताना हे चिलखत अनिवार्य करण्याचा आमचा विचार आहे. त्या कायद्याने मूळ धरलं की त्याचा विस्तार करून बसमध्ये, ट्रेनमध्ये, अथवा गर्दीच्या कुठच्याही ठिकाणी जाताना हे चिलखत घालावं लागेल अशा तरतुदी करणार आहोत. अनेक स्त्रियांनी अशा ठिकाणी छेड काढली जाण्याची तक्रार केलेली आहेच. त्यांच्या संरक्षणासाठीच हा कायदा असेल. मोटरसायकलवर किंवा स्कूटरवर बसताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसते का? तसंच. तरूण वर्गात, विशेषकरून मुलींमधे आमची ही योजना अप्रिय असेल याची आम्हाला कल्पना आहे. पण गोड बोलून, बोलण्यात गुंगवून तरूण मुलींना हे चिलखत घालण्यास प्रवृत्त करण्याकडे आमचा सध्या कल आहे. कायद्याची मदत घेणं किती किचकट काम आहे हे मगाशी श्री. काटकर यांनी सांगितलंच आहे. त्यापेक्षा आम्ही सध्या लोकप्रियतेसाठी प्रयत्न करत आहोत. या तरूण मुली कितीही तोकडे कपडे घालून आल्या तरीही त्यांच्यावर टीका करायची नाही ही आमची पहिली पायरी आहे. त्याशिवाय या चिलखताबरोबर आम्ही नेकलेस फुकट देणार आहोत. हा साधासुधा नेकलेस नाही. याच्या पेंडंटमधे वाघनखं आहेत. ही वाघनखं मुलींना वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठीही वापरता येतील. ही वाघनखं खास पॅरीसहून शिक्षण घेऊन आलेल्या आमच्या खास फॅशन डिझायनरने बनवलेली आहे. आज बाजारात या फॅशन डिझायनरची चलती असल्यामुळे त्यांच्या ब्रँडनेममुळेही अनेक मुली हे चिलखत आणि वाघनखं घेऊन वापरण्यास उद्युक्त होतील. शिवाय या उत्पादनाची जाहिरात प्रसिद्ध अभिनेत्री सखी सामंत करत आहेत. त्यांच्या प्रसिद्धी आणि प्रतिमेचाही या उत्पादनास फायदा होईल."

प्रश्न ३. स्त्रियांचे शीलरक्षण वगळता या उत्पादनाचा इतर काही हेतू आहे का?

"अर्थातच!" श्री. काटकर आणि श्रीमती छेदी एकमुखाने उत्तरले. "स्त्रियांच्या खांद्यावर संस्कृतीरक्षणाची आणि पुढची आरोग्यवंत पिढी जन्माला घालण्याची मोठी जबाबदारी आहे. यातली पहिली जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही हे चिलखत बनवले आहेच. पण दुसर्‍या जबाबदारीसाठी, पुढच्या पिढीचा विचार करता स्त्रियांनी दारू न पिणे, तोकडे कपडे न घालणे आणि अचकट विचकट अंगविक्षेप न करणे हे फार महत्त्वाचे आहे. चिलखत घातल्यामुळे स्त्रियांचे शरीर पूर्ण झाकले जाईल. स्त्रियांनी दारू न प्यायल्यामुळे स्त्रियांच्या अंगावर असणार्‍या या दोन महान जबाबदार्‍या पार पडतील याबद्दल आम्हाला शंका नाही."

प्रश्न ४. पण या जबाबदार्‍या जेवढ्या स्त्रियांच्या आहेत त्या पुरूषांच्याही नाहीत का? आणि नक्की कोणती संस्कृती जपण्याबद्दल तुम्ही बोलत आहात? आपली मराठमोळ्या नऊवारीची संस्कृती पाचवारीने मोडून काढली, त्याबद्दल तुम्हाला आक्षेप नाही का?

"तुमच्यासारख्या तर्कटी शंकेखोरांमुळेच आपली संस्कृती नाश पावते आहे. स्त्रिया दारू पितात, पबमधे जातात म्हणूनच पुरूषांना त्यांच्यावर हात टाकण्याची मुभा मिळते. आणि पुरुषांनी लाजलज्जा सोडली म्हणून स्त्रियांनी सोडावी असं तुम्हाला सुचवायचं आहे का? पुरूष आदीम काळापासून दारू पितात म्हणून स्त्रियांनीही दारू प्यावी असं तुम्ही सुचवता आहात का? त्यातून पुरूष दारू प्यायले किंवा पुरूषांनी अचकट विचकट अंगविक्षेप केले तरीही स्त्रिया त्यांचं काहीही बिघडवू शकत नाहीत. स्त्रियांची अब्रू मात्र काचेच्या भांड्याप्रमाणे असते. एकदा फुटली की परत जोडता येत नाही. पुरूषांवर कधी बलात्कार होतो काय? पुरूषांना संस्कृतीरक्षण आणि चिलखताची काहीही गरज नाही." -- श्री. काटकर आणि आमदार श्री. रामशास्त्री फुटाणे

प्रश्न ५. तुमच्या या चिलखताचा साडीधारी स्त्रियांना काहीही उपयोग नाही. साडी नेसणार्‍या स्त्रियांच्या शीलरक्षणाचं काय?

"साडी नेसणार्‍या स्त्रिया या मुळातच शालीन आणि सुस्वरूप असतात. त्यांच्या मागे गावगुंड लागत नाहीत. उत्तान वागणार्‍या स्त्रियांनाच याचा त्रास होतो. मुळात साडी नेसून स्त्रिया संस्कृतीरक्षण करत आहेत, त्यांना या चिलखताची मुळी गरजच नाही. साडी नेसणार्‍या स्त्रिया पबमधे जात नाहीत, वा दारू पीत नाहीत. त्यांच्यामुळे बलात्कारी आणि विनयभंग करणार्‍यांना प्रेरणा मिळत नाही. या लोकांना असं वागण्याची प्रेरणा पाश्चात्य पेहेराव करणार्‍या मुलींमुळेच मिळते. तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्‍या मुलींनीच समाज आणि संस्कृतीचं नुकसान केलेलं आहे." -- आ. रामशास्त्री फुटाणे

प्रश्न ६. गावगुंडांना अटकाव करण्याऐवजी तुम्ही मुलींचं व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आणत आहात असं तुम्हाला वाटत नाही का? संस्थानाची वाटचाल सौदी अरेबियासारख्या देशांकडे होते असं तुम्हाला वाटत नाही का?

श्रीमती छेदी यांनी थोडं विचारमग्न होऊन याचं उत्तर दिलं, "हे पहा, पब्जमुळे हे गावगुंड फैलावतात. मुळात पब्ज बंद केले तर गुंडगिरी कमी होईल. पण ही आजची तरूण पिढी ऐकत नाही. इथे सौदी अरेबियाचा संबंध आलाच कुठे? स्त्रियांनी त्यांचा चेहेरा उघडा ठेवण्याला आमचा काहीही विरोध नाही." त्याला श्री. काटकर आणि श्री. फुटाणे यांनी पुरवणी जोडली, "व्यक्तीस्वातंत्र्य? अहो महान संस्कृतीसमोर कसलं आलंय व्यक्तीस्वातंत्र्य? आधी संस्कृती जपा मग सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला सर्वांना आपोआप मिळेलच. आपल्या महान सांस्कृतिक ठेव्यांमधला हा श्लोक तुम्ही ऐकला असेलचः

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।
यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥

अर्थात, जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता नांदतात. जिथे स्त्रियांचा अपमान होतो तिथे सर्व क्रिया, योजना असफल होतात. कांदा संस्थानात नेहेमीच स्त्रियांचा सन्मान होतो. आमच्या ज्योतीकिरणताई पहा किती मोठ्या अधिकारपदावर आहेत! आमच्या संस्थानात स्त्रियांच्या रक्षणासाठी संशोधकही कामाला लागले आहेत. आम्हाला या योजनेत निश्चित सफलता मिळेल. आमेन"

पत्रकार परिषदेच्या शेवटी आ. रामशास्त्री फुटाणे यांच्या आमदारनिधीचा वापर करून सदर चिलखते गटारी अमावस्येच्या मुहूर्तावर सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याचे सर्वांना सांगण्यात आले. शिवाय सर्व महिला पत्रकारांना एकेक चिलखत आणि वाघनखांच्या नेकलेसची जोडी देऊन सन्मानित करण्यात आले.

(पत्रकारभवनाबाहेर आल्यावर सर्व महिला पत्रकारांनी एकमुखाने या चिलखतांचा निषेध केला, आपापली चिलखतं समोरच्या कचरापेटीत भिरकावून दिली आणि नेकलेसची फॅशन आवडल्याचे सांगत ते आपल्या झोळ्यांमधे टाकले.)

प्रेरणेसाठी अनिकेत सुळे यांचे हे ब्लॉगपोस्ट, ममता शर्मा आणि इतर अनेकांचे आभार.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त, विडंबन वाचून मजा आली.
"व्यक्तीस्वातंत्र्य? अहो महान संस्कृतीसमोर कसलं आलंय व्यक्तीस्वातंत्र्य?" हे वाक्य मस्तच. नाहीतरी गुवाहाटी आणि बागपत या चर्चेत एका महानुभावांनी (ह्या संस्थळावर नव्हे) सुचविलेले उपाय पाहून हसावे की रडावे हेच कळेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे चिलखत असूनही आत बघणार्‍या हापापलेल्या नजरा आहेत असं बायकांना 'वाटल्यास' त्याचं काय करावं?
बायकांनी 'वाटणं' थांबायला हवं का? हा लेख कांदा संस्थानातल्या बायकांकडून वाचला गेलाय की नाई कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरोखरच हपापलेल्या नजरांनी बघणार्‍यांकडेही दुर्लक्ष करणं योग्य. पण दुर्दैवाने 'उपद्रव' तिथपर्यंतच थांबत नाही, हे एक. त्यातून (माझ्यासारखी) गेंड्याची कातडी असेल तर लांबून बघून खरंच काही होत नाही. काही मुली-स्त्रियांची कातडी अगदी पातळ असते, त्यांना अशा नजरांचा होणारा त्रासही प्रामाणिकच असतो.

कांदा संस्थानातल्या पत्रकार बायकांनी आणि तरूण पिढीने चिलखतच नाकारलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"असभ्य पुरूषांचा उपद्रव न झालेली स्त्री दाखवा, १०० कांदे मिळवा"
हे तर फारच आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कांदा संस्थानात काही काही भारी गोष्टी होत असतात. चांगले चांगले कायदे होतात, कल्पना निघतात. पण कधी कधी लो एम चा क्राइम करतात हे लोक असंही वाटून जातं.

आता इथेच बघा ना, चिलखत दिलं, वाघनखं दिली - छानच. पण या कार्यक्रमात नुसतं तोंडी जाहीर करून काय फायदा? स्त्रियांच्या मनात चिलखताची महती पटायची असेल तर एक मस्त ऑडियोव्हिज्युअल टाकायला हवं ना. म्हणजे अफझलखान शिवाजीचा सीन मेट्रिक्स स्टाइलने, लाइव्ह ऍक्शन रोटेटिंग कॅमेराने दाखवायचा. मग एकदम फास्ट फॉरवर्ड - मुंबईतली बस - तिच्यात चढणारी मुलगी, आणि तिला नको तिथे अंगचटीला जायला बघणारा मागचा पुरुष. त्याच्या हात तिच्या ड्रेसमधल्या चिलखतापलिकडे जात नाही. मग ती मुलगी मागे वळून आपल्या वाघनखांनी त्याचा कोथळाच बाहेर काढते... काय बिशाद आहे त्या पत्रकार स्त्रियांची (का पत्रकारिणींची?) चिलखतं फेकून देण्याची!

किंवा ट्रेनमध्ये स्लोगन्स लावायच्या

ताई माई अक्का
विचार करा पक्का
जर कोणी देईल धक्का
चिलखत हुकमी एक्का!

तरुणींच्या मनात हे चिलखत हळूहळू रुजेल - अशी आशा बाळगायची ही अमोल पालेकर टाइप कॉमन मॅन, शामळू प्रवृत्ती झाली. त्याऐवजी दांडगट, ऍग्रेसिव्ह प्रवृत्तीचा वैचारिक धसमुसळेपणा करूनच तरुणींच्या डोक्यात हे विचार घुसवायला हवेत. कांदा संस्थानाची तिथवर प्रगती होवो ही सदीच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाला इथे ५ (अक्षरी पाच फक्त!) प्रतिक्रिया मिळालेल्या पाहून केवळ भूतदयेपोटी हा प्रतिसाद देत आहे....
Smile
घरकी मुर्गी दाल बराबर म्हणतात ते काही खोटं नाही!!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हालाच हो माझी दया! Wink
-- (भूताखेतांमधली) अदिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.