ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-५ (T)

ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार: A-B C-E F-H I-S T U-Z

===
या भागात आपण इंग्रजी आद्याक्षर T ने सुरू होणाऱ्या क्रीडाप्रकारांची माहिती करून घेणार आहोत. अर्थात यात अर्थात यात टेबल टेनिस(Table Tennis), तायक्वान्दो(Taekwondo), टेनिस(Tennis), ट्रॅम्पोलाईन(Trampoline), ट्रायथ्लॉन(Triathlon) अश्या ५ खेळांची माहिती करून घेणार आहोत. चला तर सुरू करूयात
-------

टेबल टेनिस(Table Tennis)

भारतासह आशियाई देशांमध्ये बर्‍यापैकी खेळल्या जाणार्‍या या खेळात एकूण चार सुवर्णपदके पणाला लागलेली असतात

भारतातही सर्वत्र खेळल्या जाणार्‍या या खेळाविषयी, त्याच्या नियमांविषयी अधिक माहिती देत नाही. थोडक्यात सांगायचं तर २.७ ग्रॅम इतक्या हलक्या वजनाच्या चेंडूने एका १८मी X ९मी टेबलवर खेळले जाणारे हे टेनिस आहे.

या स्पर्धा 'नॉक-आऊट' पद्धतीने खेळवल्या जातील. स्पर्धा सुरू होण्याआधी ड्रॉ होईल आणि अंतिम फेरीतील विजेता सुवर्ण तर उपांत्य फेरीतील पराभूत कांस्य पदक जिंकतील. महिला व पुरूष एकेरी व दुहेरी अश्या चार प्रकारात स्पर्धा होतील

स्पर्धा कुठे होणार?: एक्सेल या खास निर्माण केलेल्या ठिकाणी या स्पर्धा होतील. सदर स्थान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील. व शेवटचे पदक ८ ऑगस्टला प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः मुळात आशियाई वर्चस्व असणार्‍या या खेळात अपेक्षेप्रमाणे चीनने चारही सुवर्ण पदकांसह ८ पदके पटकावून आपले या प्रकारातील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते.

यावेळी भारताकडून कोण?
पुरूष एकेरी: सौम्यजीत घोष (भारतीय चमूतील सर्वात तरुण खेळाडू)
महिला एकेरी: अंकिता दास

यावेळी भारताला पदकाची आशा?
अजून तरी फारसा न चमकलेला सौम्यजीत आणि भारतातही अव्वल नसलेली अंकिता यांच्याकडून पदकाची अपेक्षा करता येऊ नये.
भारताच्या टेबल टेनिस च्या इतिहासाचा धावता आढावा या बातमीत चांगला घेतला आहे. (सदर बातमीचा दुवा ऐसीच्या मुखपृष्ठावरही आहे, त्यामुळे तो आधीच वाचलेला असू शकतो)

===========

तायक्वान्दो(Taekwondo)

अक्षरशः लाथा आणि बुक्के यांनी रंगत भरणारा हा 'कोरियन मार्शल आर्ट'चा प्रकार अल्पावधीत लोकप्रिय ठरला - ठरतो आहे.

यात तुम्ही लाथा-बुक्के स्कोरिंग झोनमध्ये- म्हणजे कमरेवर- कुठे मारताय यावर गुण दिले जातात. जर समोरच्याच्या कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागात हल्ला केला (साधी लाथ किंवा बुक्क्याने) तर एक गुण दिला जातो. जर याच भागात फिरती लाथ (Turning Kick) दिल्यास दोन गुण दिले जातात. गळ्याच्या वर - डोक्यावर- जर योग्य लाथ बसली तर तीन गुण आणि डोक्याला फिरती लाथ बसल्यास चार गुण दिले जातात.

प्रत्येक स्पर्धा दोन मिनिटांच्या तीन फेर्‍यांनी बनलेली असते. निळ्या रंगातील स्पर्धकाला चंग तर लाल रंगातील स्पर्धकाला हाँग म्हणतात. ही चंग-हाँगची ६ मिनिटांची लढाई जोषाचा पुरेपूर अनुभव देते हे नक्की.

सदर स्पर्धा बाद फेर्‍याण्मधे खेळवली जाईल. पुरुषांचे चार व महिलांचे चार वजनी गट मिळून एकूण ८ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील

स्पर्धा कुठे होणार?: एक्सेल या खास निर्माण केलेल्या ठिकाणी या स्पर्धा होतील. सदर स्थान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान होतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः अपेक्षेप्रमाणे कोरियाने ४ सुवर्ण पटकावून बीजिंग ऑलिंपिकमध्ये वर्चस्व राखले होते.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

===========

टेनिस(Tennis)

पाच सुवर्णपदके देऊ शकणार्‍या या खेळाविषयी भारतात बर्‍यापैकी जागृती आहे तेव्हा त्याच्या नियमांबद्द्ल अधिक सांगत नाही.
ऑलिंपिक स्पर्धा मात्र इतरांपेक्षा वेगळी यासाठी असते की इथे देशाच्या खेळाडूंची संख्या ठराविक असते. प्रत्येक देशाला जास्तीत जास्त १२ जणांचा चमू पाठवता येतो. ज्यात ६ महिला व ६ पुरूष असू शकतात. यापैकी जास्तीत जास्त ४ खेळाडू एकेरी आणि जास्तीत जास्त २ दुहेरीचे संघ पाठवता येतात. मिश्र दुहेरीसाठी जास्तीत जास्त २ संघ पाठवता येतात.

अजून एक अट अशी की स्पर्धक २००९ ते २०१२ पैकी किमान दोन स्पर्धांत (ज्यापैकी किमान एक २०११/१२ असणे बंधनकारक) देशासाठी डेव्हिस किंवा फेड कपमध्ये खेळलेला असणे बंधनकारक आहे. आणि ही अट अशी आहे ज्यामुळे अनेकदा काही मातब्बर खेळाडू वजा होतात.

पुरुष एकेरीची अंतिम फेरी पाच सेट्सची असते. अन्यथा सर्व स्पर्धा तीन सेट्सच्या खेळवल्या जातात.

स्पर्धा कुठे होणार?: अर्थातच विम्बल्डन ला :).

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील व ५ ऑगस्टपर्यंत चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी या स्पर्धांवर एकाच अशा देशाचे फारसे वर्चस्व नव्हते. कोणत्याही देशाला एकापेक्षा अधिक सुवर्णपदके नव्हती. एकूण पदकांत रशियाने ३ पदके मिळवून वर्चस्व राखले होते असे म्हणता येईल

यावेळी भारताकडून कोण?
पुरुष एकेरी: सोमदेव देववर्मन (वाईल्ड कार्ड)
पुरूष दुहेरी: महेश भूपती -रोहन बोपन्ना (एकत्रित १२), लिएंडर पेस(७वा)-विष्णू वर्धन (एकत्रित रँकिंग नाही)
महिला दुहेरी: रश्मी चक्रवर्ती - सानिया मिर्झा (वाईल्ड कार्ड)
मिश्र दुहेरी: सानिया मिर्झा - लिएंडर पेस

यावेळी भारताला पदकाची आशा?
माझ्यामते पदक मिळणे अतिशय कठीण आहे. पुरूष दुहेरी - मिश्र दुहेरी यापैकी एखाद्यात ब्रॉन्झ मिळाले तरी पुरे.

===========

ट्रॅम्पोलाईन(Trampoline)

उड्या मारणे हा पळण्यापाठोपाठ माणसाचा बहुदा दुसरी नैसर्गिक ऊर्मी असावी. लहानपणी मुले पळण्याइतकेच आपण उड्या मारताना पाहतो. तर या उड्या मारण्याच्या प्राथमिक खेळाचे तंत्रशुद्ध व कलात्मक उड्या मारण्यातले रुपंतर म्हणजे ट्रॅम्पोलाईन!

यात उड्या मारण्याची चटई असते ज्याला ट्रॅम्पोलाईन म्हणतात. असे दोन ट्रॅम्पोलाईन्स एकमेकांशेजारी २मी अंतरावर (आणि परीक्षकांपासून केवळ १० मी अंतरावर) ठेवलेले असतात. प्रत्येक ट्रॅम्पोलाईन ५.०५मी लांब, २.९१मी रुंद आणि १.१५५ मी उंचीवर असतो. ही चटई ६मीमी पेक्षा कमी जाडीच्या पट्ट्यांनी बनलेली असते आणि बाजूच्या चौकटीला १००पेक्षा अधिक स्प्रिंग्जच्या माध्यमातून जोडलेली असते.

स्पर्धक एकूण १० वेळा विविध गुणांचे प्रदर्शन करतात ज्यात एकेरी उडी, एकेरी, दुहेरी, तिहेरी कोलांटी उडी (somersaults), उभ्या अक्षा भोवती फिरणार्‍या कोलांट्या उड्या वगैरेचे प्रदर्शन होते. मुख्य उद्देश जास्तीत जास्त वेळ हवेत राहणे हा असतो ज्यात उत्तम तंत्र, शरीरावर पूर्ण नियंत्रण असणे अर्थातच अत्यावश्यक असते. परीक्षक काठिण्यपातळी, प्रत्येक सादरीकरण, हवेतील वेळ वजा पेनल्टी या निकषांवर गुण देतात

या प्रकारात १-२ पदक महिला व पुरूष स्पर्धकांना पटकावता येतील.

स्पर्धा कुठे होणार?: नॉर्थ ग्रिनिच अरेना इथे या स्पर्धा होतील.

स्पर्धा कधी होणारः या स्पर्धा ३ आणि ४ ऑगस्ट रोजी चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी दोन्ही पदके चीन ने जिंकली होती.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

=====================

ट्रायथ्लॉन(Triathlon)

गेल्या भागात आपण आधुनिक पंचकर्म पाहिले होते. तसेच या 'ट्रायथ्लॉन' स्पर्धेत तीन खेळांचा समावेश असतो. स्पर्धकांना पोहणे, धावणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात प्रावीण्य असणे गरजेचे असते.

या स्पर्धा वेगवेगळ्या अंतरांसाठी खेळवल्या जातात, मात्र यंदाच्या ऑलिंपिकमध्ये महिला व पुरूष संघ १५०० मी पोहणे, ४३ किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट आहे. स्पर्धेचा फ़ॉर्मॅट 'शर्यत' असले. म्हणजे सुरुवातीच्या रेषेवरून शेवटापर्यंत स्पर्धक खेळायला सुरवात करतील आणि कोणत्याही ब्रेकशिवाय स्पर्धा धावून संपवतील.

स्पर्धा कुठे होणार?: हाईड पार्कात होणारी ही स्पर्धा ऐन शहरात होणार असल्याने भरपूर प्रेक्षकांसह होईल हे नक्की!

स्पर्धा कधी होणारः ४ ऑगस्टला महिलांची तर ७ ऑगस्टला पुरुषांची ट्रायथ्लॉन स्पर्धा होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः कोणत्याही एका देशाचे वर्चस्व न राहता गेल्यावेळी सुद्धा १ ऑस्ट्रेलिया व १ सुवर्णपदक जर्मनीने जिंकले. एकूण सहा पदके पाच देशांत विभागली गेली यावरून स्पर्धेची कल्पना यावी

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

field_vote: 
0
No votes yet