Skip to main content

Bodies revealed: मृतदेहाकडे बघण्याचा आणखी एक दृष्टीकोन

इथेही काही लोकांना भीतीदायक, किळसवाणे, ओंगळ वाटू शकतात असे फोटो आहेत. पहाण्याची इच्छा नसल्यास स्क्रोल करू नये.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चीनी लोकांनी पुरी, अलाहाबादची गंगा वगैरे भागांचे काढलेले फोटो सध्या आंतरजालावर गाजत आहेत. त्यावरून काही महिन्यांपूर्वी (अगदी दमडा मोजून) पाहिलेल्या एका प्रदर्शनाची आठवण झाली. प्रदर्शनाचं नाव Bodies revealed.

या प्रदर्शनात मानवी शरीरातले वेगवेगळे अवयव, स्नायू, हाडं, शरीराचे उभे-आडवे काप प्रक्रिया करून ठेवलेले आहेत. चालताना, धावताना, बॅटने बॉल मारताना, सायकल चालवताना शरीरातले कोणकोणते स्नायू काम करतात हे मृतदेहांच्या स्नायूंवर रंग लावून दाखवलेलं आहे. उदा हा फोटो पहा:

शिरल्या-शिरल्या पहिल्याच दालनात अशी तीन-चार शरीरं होती. त्यांची माहितीही बाजूला लिहीलेली होती. फार गर्दी नसूनही रांग पुढे सरकायला वेळही लागत होता कारण अनेक लोक हे सर्व लिखाण काळजीपूर्वक वाचत होते. सायकल चालवण्याची माहिती वाचत असताना माझ्या शेजारी एक सात-आठ वर्षांची मुलगा आला आणि अचानक किंचाळला. त्याला भुताची भीती वाटली. त्याच्या बरोबरच्या दोन स्त्रियांनी (आई आणि आजी असाव्यात) त्याला रंगवलेला एकेक स्नायू दाखवत सायकल चालवताना तुझा इथे व्यायाम होतो असं सांगितलं. मग तो मुलगाही रस घेऊन बघायला लागला.

शरीरातले महत्त्वाचे अनेक अवयव, मेंदू, हृदय, यकृत, फुप्फुसं, प्रजोत्पत्तीचे स्त्री आणि पुरूषांचे अवयव असे सगळेच या प्रदर्शनात आहेत. त्याशिवाय अल्झायमर झालेल्या व्यक्तीचा मेंदू, हा आकाराने अर्ध्यापेक्षाही कमी राहिला होता, अंतर्गत रक्तस्राव झालेला मेंदू, धूम्रपान करणार्‍याची काळी पडलेली फुफ्फुसं, सिर्‍हॉसिस झालेलं यकृत असे सवयी, विकार आणि रोगांचे परिणामही तिथे आहेत. शरीरात अवयव किती व्य्वस्थित बसलेले असतात, उपलब्ध जागेत अधिकाधिक अवयव मावतात हे दाखवण्यासाठी ठराविक अंतरावर घेतलेले शरीराचे उभे आणि आडवे काप आहेत. हे पहा:

शरीरातल्या रक्तवाहिन्यांचं जाळंही या प्रदर्शनात बघता येतं:

डावीकडे फुप्फुसं, उजवीकडे हातातल्या रक्तवाहिन्या आहेत.

मृतदेहावर ठराविक रसायनांच्या प्रक्रिया करून मृतदेह सडू नये याची मुख्य काळजी घेतली जाते. मग हव्या त्या पेशी ठेवणे आणि नको त्या काढून टाकणे यासाठी पुन्हा रसायनांचा वापर होतो. हे सर्व करायला काही महिने ते काही वर्ष लागतात. हा कालावधी कोणत्या पेशी ठेवायच्या, काढायच्या यावर अवलंबून असतो. या शरीरांचा स्पर्श प्लास्टीकी-रबरी असा वाटला. हे पहाताना ही खरी माणसं होती, हे खरे मृतदेह आहेत असं अजिबात वाटलं नाही. प्लास्टीक, रबराचे मॉडेल्स पहावेत तसंच हे प्रकरणही दिसत होतं.

या प्रदर्शनावर अर्थातच काही लोकांचे आक्षेपही आहेत. या कंपनीचं म्हणणं आहे की हे सर्व मृतदेह चीनी नागरिकांचे आहेत. हे नागरिक मारले गेलेले नसून नैसर्गिकरित्या मृत्यु पावले. चिनी इस्पितळांकडून त्यांना तशी प्रमाणपत्रं मिळालेली आहेत आणि या लोकांनीही मरणाआधी असं लिहून ठेवलं आहे. पण या गोष्टींची उलटतपासणी करण्यासाठी काहीही स्रोत नाही. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अगदी प्रदर्शनातल्या माहिती देणार्‍यानेही "You never know ... it's China" असा उल्लेख केला. अनेकांना हे प्रदर्शन म्हणजे मृतदेहांची विटंबनाही वाटते. पण दोन लहान मुलंही (सज्ञान नसणारी, ७-१० वयोगट असावा) तिथे प्रदर्शन पहायला आलेली दिसली. हृदयाची माहिती तर मला तिथे एका अन्य कुटुंबाकडून मराठीत ऐकू आली. बहुदा डॉक्टर दांपत्य आपल्या मुलांना थोडं अधिक शिकवत होतं; (ही मुलं सज्ञान असावीत असा अंदाज). मी शेजारीच उभी होते त्यामुळे थोडं फुकट शिक्षणही झालं.

मध्यंतरी घरातली, सख्ख्या नात्यातली एक व्यक्ती जवळजवळ वर्षभर आजारी होती. एक दुखणं सुरू झालं, ते निपटतंय तर दुसरं ... तिची तिशी नाही आली तर तिच्याकडून या सगळ्या दुखण्यांचा गप्पा ऐकून आपल्याला आपल्या शरीराबद्दल काहीही माहित नाही असा विचार करून फारच औदासीन्य आलं होतं. या प्रदर्शनातून निदान शरीर हे किती किचकट यंत्र आहे याचा आवाका पुन्हा एकदा लक्षात आला.

या प्रदर्शनात फोटो काढण्यास मनाई आहे. सर्व फोटो आंतरजालावरून घेतलेले आहेत. अधिक फोटोंसाठी bodies revealed असं गूगलला विचारून इमेज-सर्च केला तरीही बरेच फोटो जालावर सापडतात.

ऋषिकेश Fri, 27/07/2012 - 10:50

या प्रदर्शना बद्दल बरच ऐकलं -वाचलं आहे. प्रत्यक्षात कधी बघेन (का) कोण जाणे.
छोटेखानी परिचय आवडला. शरीरशास्त्र समजायला रसायनशास्त्र, इन्स्टुमेंटेशन (फ्लो, वॉल्वस वगैरे), इलेक्ट्रॉनिक्स, भौतीकीतले नियम (फोर्स - बल वगैरे पासून टेन्शन, विस्कॉसिटी, रेसिस्टन्स इत्यादी बरेच काही) अश्या सार्‍याची व्यवस्थित माहिती हवी असे अनेकदा वाटते. तेव्हा एका अर्थाने डॉक्टर हा या सार्‍या अभियांत्रिकी शाखांचाही अभ्यासक असावाच लागतो नाही?

बाकी शेवटचा डावीकडला फोटो फुफ्फुसांचा वाटतोय - तो हृदयाचा नक्की आहे का?

नगरीनिरंजन Fri, 27/07/2012 - 11:25

रोचक आहे.
प्रदर्शन सर्वसामान्य लोकांसाठी दिसतंय. डॉक्टर लोकांना कॉलेजमध्ये ताजी प्रेतं मिळत असतील फाडून बघायला.
पण एकूणच अमेरिकन लोकांची ज्ञानलालसा पाहून थक्क झालो आहे. नववीत असताना एक फाडलेला मृतदेह पाहिला होता आणि छोटे आतडे कसे असते, २२ फूट (की मीटर?) लांब असते वगैरे माहितीसकट चिमट्याने उचकापाचक केलेली पाहिली होती, पण मला करंट्याला ज्ञानलालसा नसल्याने त्याचा पुढे आरोग्य सांभाळायला *ट उपयोग झाला नाही ही गोष्ट वेगळी.

रमाबाई कुरसुंदीकर Fri, 27/07/2012 - 11:28

मी विज्ञानवादी मी विज्ञानवादी.
(विज्ञानवादी) रमाबाई

सोकाजीरावत्रिलोकेकर Fri, 27/07/2012 - 12:27

मस्त माहिती, आवडली!

पण लेखाला चीनी लोकांनी काढलेल्या फोटोंच्या उल्लेखाने गालबोट लागले, तो उल्लेख नसता तर.. असो!

- (शरिराचा शेवटी मृतदेह होणार आहे ही जाण असलेला) सोकाजी

मन Fri, 27/07/2012 - 13:07

प्रकार नवीनच दिसतोय. पण पब्लिकमधले सगळेच असं काही लागलिच पचवू शकतील असं वाटत नाही. डिस्क्लेमर दिलत ते बरं केलत.

सहज Fri, 27/07/2012 - 14:49

जर्मन अ‍ॅनाटोमिस्ट गुंथर वॉन हॅजेन्सचे बॉडी वर्ल्डस असेच काहीसे प्रदर्शन काही वर्षांपूर्वी जगभर गाजत होते ना.

मी Fri, 27/07/2012 - 18:21

मस्त!! गुंथरचं प्रदर्शन पहाण्याचा योग चुकला, तेंव्हा हायसं वाटलं होतं आता चुकचुकल्यासारखं वाटतयं. बघायला हवं कधी,

'माईंड रिव्हिल्ड' प्रदर्शन ह्यापेक्षा रोचक/किळसवाणे असेल काय, असा एक विचार माईंड मधे आला.

आतिवास Fri, 27/07/2012 - 19:20

शरीराची अधिक चांगली जाण निर्माण व्हायला अशा गोष्टींची नक्कीच मदत होते. अन्यथा बाहेरच्या जगाइतकेच आपले आपणही स्वतःला अज्ञात असतो, राहतो असं जाणवत!

प्रकाश घाटपांडे Fri, 27/07/2012 - 19:28

सुरवतीला सुचना दिली ते चांगले केले.
प्रत्येकाचा देह एक दिवस मृतदेह होणार आहे. असो. वैकुंठातील फलक आठवला
Vaikuntha

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 28/07/2012 - 08:13

गुंथरच्या प्रदर्शनाबद्दल माहित नव्हतं. घराबाहेर फिरायला बाहेर पडल्यावर हे प्रदर्शन अचानक समोर आलं, रोचक असेल असं वाटलं म्हणून पाह्यलं. विकीपीडीयावर पाहिलं तर या क्षेत्रातही बरीच स्पर्धा असल्याचं समजलं.

प्रदर्शन सर्वसामान्य लोकांसाठी दिसतंय.

होय.
आमच्या बारावीच्या अभ्यासक्रमात मानवी शरीराचा अभ्यास होता. त्यामुळे या प्रदर्शनात सांगितलेली बरीच माहिती आधीपासून होती. पण प्रत्यक्षात अशा प्रकारच्या डेमोजमुळे हे सर्व अवयव पहाता आले. प्रत्यक्षात आपली हाडं किती मोठी असतात, एकाला एक लागणारे आकार कसे असतात हे आत्तापर्यंत असं प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं.

प्रत्येकाचा देह एक दिवस मृतदेह होणार आहे.

जवळच्या नात्यात, ओळखीत मृत्यु झाल्यावर आपलाही एक दिवस नंबर येणार हे लक्षात येतं. पण हे प्रदर्शन मृत्युपेक्षाही आयुष्याचं महत्त्व सांगणारं वाटलं. हे एवढं वैचित्र्यपूर्ण शरीर काहीही माहिती नसताना सांभाळलं जातं हे फार विस्मयकारक वाटतं. अगदी आपल्या देशासारखं ... सगळे लोकं, विशेषतः सरकारी कर्मचारी आणि राजकारणी जर लाचखोर, हरामखोर आहेत(!) तर मग देश चालतो कसा असा प्रश्न पडावा तसंच काहीसं!

सातारकर Sat, 28/07/2012 - 08:37

ओंगळ किंवा तस काही वाटत नाही खरं. (अर्थात मी बोन्स चा पंखा असल्यान असेल कदाचित)

हाडं नसल्यामुळ हाताचा पंजा पहिल्यांदा लक्षातच आला नाही.

या कंपनीचं म्हणणं आहे की हे सर्व मृतदेह चीनी नागरिकांचे आहेत.
त्यांच्या देशात लोकांचे मृत्यू होत नाहीत काय? का तिकड काही बंदी वगैरे आहे स्वतःच्या देशातल्या नागरिकांचे मृतदेह प्रदर्शनात ठेवायला. (You never know, it's America ;)).

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 28/07/2012 - 10:33

In reply to by सातारकर

दोन मितींमधे या शिरा पाहून थोडी फसगत होत असावी. प्रत्यक्षात या रक्तवाहिन्या पाहून मला रेशमाचा कोष आठवला. विशेषत: बोटांची टोकं.

ओंगळ वगैरे काही मलाही वाटलं नाही. उलट, संपूर्ण मनुष्यदेह होता ते अनेक एक्झिबिट्स काचेच्या बाहेर होते त्यांना हात लावून रसायनं लावलेल्या कलेवरांचा स्पर्श कसा आहे हे पण मी पाहिलं. पण अनेकांना असं वाटू शकतं. आधीच आजूबाजूला असले प्रकार असताना अधिक त्रास का द्या ... आधीच माहिती देणं ठीक वाटलं.

अमेरिकन नागरिकांचे मृतदेह का वापरले नाहीत ... कल्पना नाही. चीनमधून अगदी न्याय्य पद्धतीने देह मिळवूनही तिथेच काम केलं तर कदाचित स्वस्त पडत असेल म्हणूनही असेल. अमेरिकेत कोणती गोष्ट अमेरिकेत बनलेली असते? आपल्याकडे एकेकाळी "इंपोर्टेड आहे" यावर कूल पॉईंट्स मिळायचे. अमेरिकेत "स्थानिक आहे" यावर कूल पॉईंट्स मिळतात. तिथे त्या माणसाने "You never know ..." म्हणणं शहाजोग वाटलं खरं.

तिरशिंगराव Sat, 28/07/2012 - 19:23

मलाही अशा प्रदर्शनात, मेल्यानंतर 'मिरवायला' आवडेल.

अमुक Sat, 28/07/2012 - 22:28

शरीराची रचना, यन्त्रणा, घडामोडी हे एक निराळेच जग आहे, अगदी रोज ते आपल्या कपड्यांसोबत असतानादेखील पत्ताच नसतो काय काय उलाढाली होत असतील याचा. गृहीत धरतो कितीतरी आणि मग आजारी पडल्यावर 'शरीराने दिलेली धोक्याची सूचना' हेदेखील बरेचदा नीट न स्वीकारता दणाद्दण औषधे, थेरेप्या, इ. चा मारा करतो.
मला नेहमी प्रश्न पडतो - एक हाडाचा वास्तुविशारद एखाद्या इमारतीकडे बघताना त्याला काय काय दिसत असेल ? किंवा एखाद्या वैद्याला समोर बसलेला रुग्ण बघताना काय काय दिसत असेल ? किंवा फाईनमन म्हणतो, तसे एक फूल बघताना त्याला त्यातल्या शिरा, रस वाहून नेणे, परागसिञ्चनाने पुनरुत्पादन होणे या गोष्टी दिसत. तेच फूल एखादा चित्रकार बघतो तेंव्हा त्याचा डौल, आकार, छायाप्रकाशात बदलणारे रङ्ग पकडण्याचा प्रयत्न करतो. वस्तू तीच. पण ज्या शिक्षणातून नजर घडते त्यातून एकाच गोष्टीचे वेगवेगळे अवतार, प्रकृती अनुभवायला मिळतात. असो.

तेंव्हा एका थेट नावाच्या थेट माध्यमातून शरीराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
(अवान्तर - 'पत्र' या माधव आचवलाञ्च्या पुस्तकातील 'य इदं मम न शरीरम्' आणि 'आम्ही दोडके' या दोन लेखाञ्ची आठवण झाली.)

ॲमी Sat, 28/07/2012 - 21:27

सुरुवातीला किँचीत ओँगळ वाटलं पण नंतर ठिक...
पण एक शंका... मृतदेहांची विटंबना किँवा भूताची भीती म्हणुन नाही... पण खरे मृतदेह वापरण्यामागे काय उद्देश?
१२वी त खरी हाडं, वेगवेगळ्या महिन्यात गर्भपात झालेली बाळं पाहिलेली. पण खर्या माणसाचे स्नायु, मांस, रक्तवाहीन्या, वेगवेगळे अवयव साठी प्लास्टिक मॉडेल्स असायची...
आणि मृत्युनंतर काही तासातच स्नायु immovable होतात ना मग ते सायकल चालवणं वगैरे कसं केलं असेल?

ऋता Sat, 26/04/2014 - 19:50

गुंथरचे 'बॉडी वर्ल्डस' हे प्रदर्शन बोलोन्यात गेल्या तीनएक महिन्यापासून आहे. आज उद्या जाऊ म्हणत म्हणत शेवटी आता या शहरातले प्रदर्शनाचे शेवटचे काही दिवस राहिलेत अशा पाट्या दिसल्यावर ते पाहून आले. किळस वाटेल वगैरे आधी वाटले होते पण काहीच तसे झाले नाही. तीन तास लागले सगळे प्रदर्शन बघायला. मानवी शरिराचे वेगवेगळ्या प्रकारे केलेले डायसेक्शन कलेचे नमुने म्हणूनही पहायला रोचक आहेत. सुटे अवयव, सांगाडे तर होतेच, शिवाय फुट्बॉल खेळताना, बॅडमिंटन खेळताना एखादा क्षण थांबवून त्या शरिरांचे स्नायू कशाप्रकारे ताणलेले होते ते दाखवणारे काही पुतळे(स्नायूंसहित सांगाडे) होते. बरेचसे पुतळे पुरुषांचे होते. वेगवेगळ्या वयाचा गर्भही दाखवला होता- वाटाण्या एवढ्या आकारापासून पूर्ण वाढ झालेल्या बाळा पर्यंत. एक गर्भवती महिलेचा पुतळाही होता. बाळ पोटात असतानाची शरिरातील इतर अवयवांची रचाना दाखवली होती. एका माकडाचे आणि जिराफचेही डायसेक्शन केलेले नमुने ठेवले होते.
एकूण रोचक प्रदर्शन. ज्यांना मरणोत्तर या प्रकल्पात सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी देहदानाचे फॉर्म ठेवलेले होते.