जी.ए. - पत्रांतले आणि प्रत्यक्षातले : सन्जोप राव

डिस्क्लेमर :
हा लेख मी (विसुनाना) प्रसिद्ध करत असलो तरी तो मी लिहीलेला नाही. तो येथील सन्मान्य सदस्य श्री. सन्जोप राव यांनी लिहिलेला असून अंतर्नाद मासिकाच्या फेब्रुवारी २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. मी त्याची स्कॅन केलेली प्रत एकेका पानाची एकेक प्रतिमा करून येथे चढवत आहे.
श्री. सन्जोप राव यांच्या 'अरभाट आणि चिल्लर' या ललित संवादाची पार्श्वभूमी वाचकांना कळावी म्हणून हा लेख येथे यावा अशी इच्छा मी तेथील प्रतिसादात व्यक्त केलेली होती. मूळ लेखकाच्या संमतीने हा लेख मी जशाच्या तसा (लेखकाची खासगी माहिती वगळून) येथे देत आहे.

***

लेखात चर्चिले गेलेले दोन वादग्रस्त लेखक -

(दोन्ही रेखाचित्रे श्री. व्ही. एन. ओके (ओक?) यांनी काढलेली आहेत.त्यांचे शतशः आभार. अंतर्नाद मासिकात हे नाव 'ओके' असे छापलेले असले तरी ते ओक असावे असा कयास आहे. त्यांच्याशी संपर्क साधता आला नसल्याने त्यांची पूर्वपरवानगी घेतली नसली तरीही ही चित्रे येथे आवश्यक वाटली ; 'फेअर यूज' म्हणून त्यांनी परवानगी द्यावी अशी विनंती.)

मूळ लेख-

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

या लेखासंदर्भात रावांशी एकदा छोट्याशा गप्पा झाल्या होत्या. मनापासून ते काही गोष्टी सांगत होते. माहितीपूर्ण, आणि मानलंत तर, ज्ञानही... Smile
लेखाचा आस्वाद पुन्हा घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! माझ्यासारख्याला या वादाबाबत ऐकून-कुठेसे वाचुन- माहित होते. पण या सांगोपांग खंडनातून बरेच नवे गवसले.
लेख छान आहेच. तो इथे दिल्याबद्दल विसुनानांचेही आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरेच सुरेख लेख आहे. तो इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल विसूनानांचे अनेकानेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुरेख लेख आहे. दळवी आणि जीए या दोघांचंही लेखक म्हणून श्रेष्ठत्व मान्य करून दळवींची चूक तेवढ्यापुरती त्यांच्या पदरात घातलेली आहे. हे करताना कुठचाही आक्रस्ताळेपणा न करता, अशा थोर लेखकाकडून अचानक दिसलेल्या कोत्या मनोवृत्तीबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. 'जीए आमचं दैवत, त्यांच्याविषयी असं बोलताच कसं? आमच्या भावना दुखावल्या, तेव्हा भोगा आपल्या कर्माची फळं' असा अभिनिवेश न बाळगता 'अहो, तुमच्याविषयीही आदर आहे आम्हाला, मग का असं भलतंसलतं करून बसलात?' असा सामंजस्यपूर्ण प्रश्न आहे.

गर्दीत, धुळवडीत सगळीकडे हा सामाजिकतेचा गुलाल प्रत्येकाने अंगाला माखून घेतलाच पाहिजे असे काहीतरी समाजाचे मागणे असते

हे वाक्य आवडलं.

जाता जाता ... रावांच्या आधीच्या लेखातले काही संदर्भ हा लेख वाचून स्पष्ट झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यासरख्या 'ढ'ना मूळ दळवींचा लेख दिल्याशिवाय काहीच कळायचं नाही.जी.ए.ंबाद्द्ल वाचून थोडं का होईना माहित आहे..पण दळवींबद्द्ल काहीच ठाऊक नाही. जाऊ दे, हे एक नाही कळलं तरी काही बिघडत नाही, असं म्हणून गप बसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अंतर्नाद'ने दळवींचा लेख पुनर्मुद्रित करण्याचं काय प्रयोजन होतं - असा एक प्रश्न पडला.

पण लेखकाचं फक्त लेखन वाचावं, माणूस म्हणून तो/ती कसा/कशी आहे याचा शोध घेण्याच्या फंदात पडू नये हे पुन्हा या निमित्ताने मला स्वत:ला सांगता आलं हे नक्की. त्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृतज्ञ आहे. इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

धन्यवाद विसुनाना....
धन्यवाद संजोपराव...

दळवींचा लेख शोधून वाचायलाच हवा असे वाटत होते आधी, पण आता वाटते, न वाचलेलाच बरा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या सदस्य-वाचकांनी फक्त श्री.सन्जोप राव यांचा "जी.ए." संदर्भातील 'बाबुआण्णा" लेख आणि आता विसुनाना यानी स्कॅन करून दिलेला "अंतर्नाद" मधील लेख वाचला असेल, त्यानी त्या दोन लेखांच्या आधारे जीए स्वभाव बदनामीबाबत कै.जयवंत दळवीना धारेवर धरण्याअगोदर फेब्रुवारी १९८८ मध्ये 'ललित' च्या 'जी.ए.विशेषांक' मधील त्यांचा "जीए ! - एक विलक्षण माणूस' हा लेख पूर्णपणे वाचणे संयुक्तिक ठरेल. बहुतांशी सदस्य जर जयवंत दळवी यांच्या मूळ लेखापासून दूर असतील तर मग 'अंतर्नाद' मधील रावांच्या लेखाच्या आधारे दळवीना खलनायक ठरविणे अन्यायाचे होईल.

पुढे लिहिण्याआधी अगोदर मी संभ्रमात आहे की मूळात 'अंतर्नाद' ने कोणत्या कारणासाठी वा निमित्ताने १९८८ तो लेख आपल्या अंकाच्या ऑगस्ट २०११ आवृत्तीमध्ये पुनर्मुद्रीत केला असावा ! त्या महिन्याचे असे काय खास वैशिष्ठ्य की अंतर्नादच्या संपादकीय टीमला वीस-बावीस वर्षापूर्वीची ती कबर खोदून एका प्रथितयश लेखकाचे दुसर्‍या तितक्याच प्रथितयश लेखकाने सादर केलेले स्वभावाचे मूल्यमापन आपल्या वाचकापुढे ठेवावे ? आज इथल्या वाचकांसमोर अंतर्नादमधील 'तो' लेख नाही, त्यामुळे संपादकांनी 'ललित' मधील जशाच्यातसा उचलून मुद्रित केला आहे की त्यावर संपादनाची कात्री चालविली आहे हे कळण्यास मार्ग नाही. माझ्यासमोर या क्षणी 'ललित फेब्रुवारी १९८८ चा अंक आहे आणि जयवंत दळवीचा त्या प्रदीर्घ म्हटल्या जाऊ शकणार्‍या लेखातील जितका भाग जी.ए. यांच्या (दळवी समजत असलेल्या) विचित्र स्वभावाच्या उदाहरणानी भरला आहे तितकाच भाग हा 'जी.ए.स्तुतीनेही' भरलेला वा भारलेला आहे. त्यामुळे सन्जोप राव यानी मूळ लेखातील फक्त फटकून राहणार्‍या जी.ए. स्वभाववैशिष्ट्यसंदर्भातील वाक्ये तोडून ती आपल्या फेब्रुवारी २०१२ च्या लेखासाठी वापरल्याचे दिसत आहे....आणि दुर्दैवाने इथले सदस्य वाचक तेच अंतिम समजून जयवंत दळवी यानी जी.ए.कुलकर्णी या आपल्या आवडत्या लेखकाच्या चित्रावर अकारण जे ओरखडे काढले आहेत त्याबद्दल दळवी याना गुन्हेगार ठरवित आहेत, किंबहुना ठरवून मोकळेही झाले असतील.

ललित १९८८ विशेषांकात दळवीनी जरूर लिहिले आहे की "जी.ए. म्हणजे आपली प्रतिमा निर्माण करणाराच नव्हे तर आपणच निर्माण केलेल्या प्रतिमेशी खेळणारा आणि ते खेळणेही अनेक वेळा कसे जुळवावे हे न समजल्याने गोंधळून जाणारा, काही वेळा खोटेपणा करणाराही असा दुसरा कोणीही माणूस माझ्या ओळखीचा नाही. फक्त एकमेव जीए !" चला, तसेही असेल पण म्हणून दळवी त्यामुळे जी.ए.कुलकर्णी यांची मराठी वाचकात लेखक म्हणून असणारी प्रतिमा कशी काय भंग करू शकतात ? त्या दोघांची मैत्री जवळपास ३५ वर्षाची आणि पत्रव्यवहार तर अगदी थेट, भाषेचा कसलाही आडपडदा ठेवायचा नाही अशी ताकीद देणारा. दळवीनी "नोटीसीचे तुकडे सोबत पाठवीत आहे. त्याच्या सुरळ्या करा आणि *** घाला...तुमच्या आणि उरल्या तर माझ्या !". त्यावर जी.ए. नी लिहिले होते, "साले ते पत्र आहे एकपात्री झोपडपट्टी प्रयोग आहे ? दळवीसाहेब एक जरा स्पष्ट सांगा - आपल्या असल्या पत्रात त्या लाडिक लाजर्‍या फुल्यांचा संकोच आहे, तो कशासाठी ? तुम्हाला संकोच वाटला, म्हणजे गोमटेश्वर आपल्या नागडेपणाने संकोचल्यासारखा आहे ! यापुढे, गडे, असा बुरसट संकोच नको बरं !" ~ अशा बिनधास्त पातळीवर जर त्या दोघांची मैत्री होती तर मग कोठावळे आणि त्या अंकाचे अतिथी संपादक प्रिं.म.द.हातकणंगलेकर यानी दळवींचे लिखाण जसेच्या तसे स्वीकारले यात आश्चर्य काही नाही, कारण सारे गाव 'जी.ए.भजनात' गुंतले असेल तर त्या झाडाला सर्वतोपरी ओळखणार्‍या गव्याने दोनचार ढुशा आपल्या लेखात लगावल्या तर त्याने वाचकाला जखमा होण्याचे काही कारण नसावे.

त्यांच्या स्वभावाच्या चांगल्या बाजूही दळवीनी दाखविल्या आहेत त्याचा कसलाही उल्लेख "अंतर्नादा" च्या लेखात दिसत नाही. स्वभाववैशिष्ट्याबद्दल जितके लिहायचे तितके लिहून झाल्यावर पुढे दळवी लिहितात, "सत्यकथेचे रौप्यमहोत्सवी वर्ष चालू असताना त्या वर्षी 'सत्यकथे'त प्रसिद्ध झालेल्या दोन-तीन उत्कृष्ट कथांसाठी संपादकांनी पारितोषिके ठेवली होती. त्या वर्षी जी.एं.ची 'कांकणे' ही अतिशय सुंदर कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली होती. तिलाच पहिले बक्षीस निश्चित मिळाले असते. पण नवीनांचा विचार करा, माझी कथा विचारात घेऊन नका असे त्याना आगाऊच कळवून ठेवले होते. पुढे तर त्यानी सत्यकथेत कथा लिहिणेही बंद केले. मी जीएंच्याकडे त्याबाबत विचारणा केली. त्याला उत्तर मिळाले नवीन नवीन लेखक पुढे आणणे हे 'सत्यकथे'चे कार्य आहे व ते अधिक महत्त्वाचे असल्यामुळे आपण तिथे जागा न अडवता ती नवीन लेखकाला द्यावी या विचाराने ! असला समंजसपणा खरोखर्च दुर्मिळ..." दळवीनी केलेली ही जी.ए.स्तुती आहे की निंदानालस्ती ? अन् असा त्यांचा समंजसपणा जर दळवी वर्णन करीत असतील तर त्याला टीकालेखात स्थान मिळायला हवे. अन्यथा परत तेच, नवख्या सदस्यांना ह्या बाबी माहीत नसल्याने दळवी यानी आगाऊपणा कसा केला आहे हेच जाणवत राहाण्याचा धोका.

साहित्य अकादमीच्या पाच हजार रुपयाबाबत सन्जोप राव यानी दळवीना त्यानी लेखात प्रयोजन केलेल्या 'उडवून' शब्दाबाबत दोष दिला आहे. त्याबद्दल पुढे बोलू. पण त्या अगोदर हेच दळवी त्याच लेखात लिहितात, "साहित्य अकादमीच्या पारितोषिकाबाबत जो घोळ झाला तो मात्र दुर्दैवी होता. शां.शं.रेगे यानी कोकणी आगाऊपणा केला आणि जीएंचा कथासंग्रह ज्या काळासाठी पारितोषिक होते त्या काळात प्रसिद्ध झालेले नाही असा दावा केला. ही चूक तांत्रिक असली तरी अक्षम्य नव्हती. पण 'मटा' ने ते छापले ते पॉप्युलरच्या रामदास भटकळांवर बाण मारण्यासाठी. बाण त्याना न लागता ते लागले जी.ए.ना. आरपार घुसले. त्या पारितोषिकामुळे जीए अतिशय सुखात होते. बहिणींना घेऊन दिल्लीला गेले. एकूण चार-पाच हजार खर्च करून त्यानी उत्तरेतील स्थळे पाहिली. त्या वेळेची त्यांची मनःस्थिती अत्यंत आनंदी होती. पण 'मटा' वादामुळे ते भयंकर चिडले, खुलासे पाठविले, दुरुस्त्या करण्यासाठी मला तारा केल्या. त्याप्रमाणे मी धावपळ केली. त्याना सांत्वनासाठी धारवाडला येतो असे पत्रही पाठविले. पण मला चिडून त्यानी इकडे येऊ नका असे पत्र लिहिले. माझ्यावर ते 'मटा' चा राग काढत होते. आज ती सर्व पत्रे पुन्हा चाळताना त्यामागचा एक विलक्षण माणूस मला जाणवतो."

"काजळमाया" चे स्थान मराठी साहित्यात काय आहे आणि जी.ए.ना प्रदान करण्यात आलेले अकादमीचे पारितोषिक किती सार्थ आहे, हेच लेखातील वरील भागात दिसत आहे. आता त्या 'उडवणे' प्रयोजनाबाबत. कशासाठी दळवीनी त्याचा प्रयोग आपल्या लेखातील पुढील भागात केला आहे ? जी.ए. आपल्या पत्रांतून लेखनासाठी खुणावणार्‍या अनुभवाचे वर्णन ते जखमेच्या रूपानेच करत. तुम्ही अशी भाषा का वापरता ? याला त्यांचे उत्तर - लचके तोडलेली जखम ताजी, लसलसती दिसली पाहिजे. रक्तमांसाचा वास आला पाहिजे - एवढेच नव्हे, तर जखमेतले हाडसुद्धा दिसले पाहिजे, असे ते या एकाच भाषेत परत परत सांगत....आणि याचा कुणीतरी अभ्यास केला पाहिजे. याच अनुषंगाने त्याना अकादमीचे पारितोषिक परत करताना जे अतोनात दु:ख झाले, त्याचे कारण मुक्तपणे दिली, हृषिकेश, हरद्वार, वाराणसी येथे प्रवास करताना ते पाच हजार रुपये उडविले होते. इथे 'उडविले' याचा अर्थ कोणत्य गैरकारणासाठी नसून केवळ प्रवास आणि त्यानिमित्ताने येणार्‍या खर्चासाठी. रुपये ४००-७०० +६३ टक्के महागाई भत्ता, या तुटपुंज्या स्केलमध्ये नोकरी करणार्‍या एका प्राध्यापकाकडे एक रकमी पाच हजार रुपये आले आणि त्यातील एकही रुपया परत आणायचा नाही....सारा प्रवास प्रथमच फर्स्ट क्लासने करायचा असा विचार....अशारितीने ती त्या काळी तशी मोठी वाटणारी रक्कम जर जी.ए.नी खर्च करून टाकली तर त्या खर्चाला दळवीनी 'उडविले' असे म्हटले तर त्या दोघांतील मित्रत्वाच्या नात्याने ते ग्राह्यच मानले जावे. "मला पाच हजार मिळाले म्हणून मलिक बिल्डिंगमध्ये कोणी कुल्ले आपटण्याची गरज नाही...." असे जी.ए. यानी दळवींना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. मलिक बिल्डिंगमध्ये दळवी राहत असत. आता अशा मैत्रीच्या नात्यातून एकाने कुल्ले आपटू नयेत असे जर म्हटले असेल तर मग दुसर्‍याने पाच हजार उडविले असे म्हटले तर त्यात त्रयस्थ म्हणून आपण कसे काय एकाचीच बाजू उचलून धरू शकतो ?

"....मी पुन्हा कधीतरी हृषिकेशला जाईन. त्या ठिकाणी आठ दिवस राहीनही. नुस्ते अंडरवेअर बनियन घालून, मराठी वाङ्मय तेजस्वी करण्याची, जग सुधारण्याची महत्वाकांक्षा बाळगून शिखरावर चढण्याची सतत धडपड करणार्‍या तुमच्यासारख्या माणसांना आठवून नाक खाजवत मी मुक्त, निर्लज्ज रिकामपणाने त्या ठिकाणी भटकेन....."

हे आणखीन् एक जी.एं.चे दळवी पत्रातील वाक्य. समजा जर जी.ए. तसे हृषिकेशला जावून राहिले असते आणि दळवीनी पुढे एखाद्या लेखात 'जी.ए. आता गंगायमुनेच्या किनार्‍यावर निर्लज्ज रिकामपणाने भटकत असतात...' असे लिहिले असते तर मग दोष तसे मी भटकणार आहे हे लिहिणार्‍याचा की त्याबाबत वृत्त देणार्‍याचा ?

सन्जोप रावांचा दळवी यांच्यावर आणखीन् एक आरोप म्हणजे, त्यानी (दळवी) त्याच लेखात लिहिले होते की "जीएंच्या सर्व कथांची भाषा जवळपास एकसुरी, काहीशी कृत्रिम आणि अवजड अलंकारांनी ठासून भरलेली असते...." इथपर्यंत ठीक. पण इथून पुढील वाक्य काय आहे दळवींचे ? पुढे दळवी म्हणतात, "जगभर भाषेवरचे बोजड अलंकार उतरवून ती साधी, सोपी तरीही अधिक अर्थवाही करण्याचे प्रयत्न चालू असतात (ठळक उदाहरण : हेमिंग्वे) आणि जीएंची आलंकारिक भाषा आम्हाला मोहित करते. जीएंच्या पत्रांचा अभ्यासकांनी अभ्यास केला तर जीए कथांमध्ये जी भाषा वापरत होते ती कथानुभवाला आवश्यक होती म्हणून येत होती की ती जीएंची व्यक्तिगत जडलेली खोड म्हणून येत होती यावर प्रकाश पडू शकेल.".....या विवेचनामध्ये दळवी जीएंची भाषा 'आम्हाला मोहित करते" असे जर म्हणत असतील तर मग त्या अनुषंगाने ते दुसरीकडे त्यांचा गौरवच करीत असल्याचे स्पष्ट होते ना ? त्यानी स्पष्टपणे अभ्यासकांना एक आवाहन केले आहे की एखाद्याला जर ती भाषा अवजड अलंकारांनी भरली आहे तर ती तशी आहे का ? असल्यास त्याबाबत मत. अंतर्नादच्या आपल्या लेखात सन्जोप राव यानी काही कथांची उदाहरणे देऊन जी.एं.ची तशी अवजड अलंकारांची भाषा नाही असे जे म्हटले आहे, नेमके तेच दळवीना अभ्यासकांकडून अभिप्रेत आहे ना !

जयवंत दळवी यांचा साहित्यिक दर्जा सर्वमान्य असल्याने त्यांची एखाद्या लेखकाच्या शैलीविषयीची मते ही अभ्यासकाच्या दृष्टीने चिंतनीयच वाटली पाहिजे. भले जी.ए. एक व्यक्ती म्हणून कसे होते याबद्दल त्यानी सांगणे....[किंवा ते कशारितीने सांगणे] याबद्दल मतभेद होऊ शकेल, पण त्याना तसा अधिकार होता हे प्रांजलपणे कबूल करणेही इष्ट. कुणी काहीही लिहो वा म्हणो, जर माझे जी.ए.प्रेम तसूभरही कमी होणार नसेल तर मग मी ज्याने जे काही कथीत उलटेसुलट लिहिले आहे ते दुसर्‍या दिवशी विसरून जाईन.

कुणी काहीही म्हणो पण खुद्द जी.ए. पांडुरंग कुमठा, रामदास भटकळ आणि जयवंत दळवी या तिघांना 'इनर सर्कल' मधील मानत होते. माधव आचवल आणि हातकणंगलेकरसर हे त्यांचे बौद्धिक खाद्य गटातील तर ग्रेस हळवेपणासाठी. मी स्वतः जी.ए. कुलकर्णी यांचा 'डाय हार्ड" प्रशंसक असून माझे भाग्य थोर की मला जी.एं.च्या माळमड्डी "कडेमणी कम्पाऊंड" येथील घरी जाऊन त्याना आणि प्रभाताईना (एकदा नव्हे, सहा वेळा...पैकी दोन वेळा भोजनासाठीही) भेटता आले आहे, दिवसभर नसल्या तरी तासनतास विविध विषयांवर गप्पा मारता आल्या आहेत. पत्रव्यवहारही ज्याला 'सायझेबल' म्हणता येईल तितका त्यांच्याशी झाला आहे [फार जपून ठेवली आहेत मी ती पत्रे].....मी काहीसा भटक्या वृत्तीचा असल्याचे त्याना माहीत असल्याने कित्येक दुर्मिळ इंग्रजी पुस्तके त्यानी मला उत्तर भारतातील अशा जुन्या पुस्तकाच्या बाजारातून शोधून आणण्यास सांगितले होते. माझ्यावरील प्रेमापोटी म्हणा वा विश्वासामुळे म्हणा आपला पुतण्या 'शंतनू' [सावत्र बंधू सदाशिवचा थोरला मुलगा, जो चिकोडी तालुक्याती एक्संबा गावी राहात होता] याला कोल्हापूरात एम.बी.ए. साठी पाठविताना हॉस्टेलवर सोय होईतोपर्यंत माझ्या घरी राहाण्याचा सल्ला दिला होता. शंतनूसमवेत मराठी विषयावर चर्चा करू नका, अन्यथा तुम्हाला त्याबाबतचे त्याचे अगाध ज्ञान पाहून चक्कर येईल असा "धोक्याचा' इशाराही पत्रातून दिला होता.

तर असे जी.ए. ज्यांनी माझ्यासमोर चीड व्यक्त केली होती ती फक्त एकाच व्यक्तीच्याबाबतीत, ते म्हणजे कर्नाटक कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख डॉ.पंडित आवळीकर यांच्यावर. आपल्या एकांतप्रियतेबाबत आवळीकर यानी धारवाडमधील एका दैनिकात ज्यारितीने लिहिले होते ते गैरसमजाला अधिकच पाणी घालणारे होते म्हणून. अन्यथा 'ठणठणपाळ' असो वा अगदी गंगाधर गाडगीळ, द.भि.कुलकर्णी असोत....कुणीही काहीही लिहिले तर ते सारे खेळकरपणे घेत.

त्यामुळे श्री.सन्जोप राव यांचे जी.ए. प्रेम आणि त्यांच्या लिखाणाविषयी त्याना वाटत असलेला आदर लक्षात घेऊनही मी असेच म्हणेन की त्या आदरापोटी त्यानी जयवंत दळवी यांच्यावर जे शरसंधान केले आहे, ते क्लेशदायक आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिसाद. रावांचा लेख आणि तुमचा प्रतिसाद, दोन्ही लेखनात लेखकांची वैयक्तिक निंदा न करता झाल्या घटनेच्या एकेक बाजू मांडलेल्या आहेत. आत्तापर्यंत वाचकांनी 'दळवी हलकट होते' असा निष्कर्ष काढला नसावा. फारतर 'दळवींनी असं का केलं असावं बुवा?' असा प्रश्न पडला असेल. तुमच्या या प्रतिसादावरून त्यातल्या बऱ्याच बाबींची उत्तरं मिळतात. कडवटपणा नाहीसा होतो. मग रहाते एक दुर्दैवी घटना. काजळमाया सारख्या उत्कृष्ट पुस्तकाला पारितोषिक मिळालं, पण ते रद्द करावं लागलं. ज्या लेखकाला गौरवाचं स्थान मिळावं त्याला ते पैसे हाती आहेत समजून खर्च केल्यानंतर पैसे परत करावे लागले. आणि खोटारडेपणाचा आरोप टाळण्यासाठी डोक्याला त्रास करून घ्यावा लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद अतिशय आवडला. प्रतिसादांतील बहुतेक मुद्द्यांशी असहमत आहे.
यावर पुन्हा युक्तिवाद, त्यावर प्रतिवाद हे चिकट गुर्‍हाळ नको वाटत असल्याने 'वी अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री' हा आंतरजालावरील एका मित्राने दिलेला सल्ला प्रमाण मानून थांबतो.
श्री. पाटील यांच्यासारख्या अभ्यासू, मर्मज्ञ व्यक्तीला जी.ए.कुलकर्णींसारख्या दुर्मिळ लेखकाला भेटता आले, त्यांच्याबरोबर चर्चा करता आली याचा अतिशय आनंद वाटला. जीएंची त्यांच्याजवळ असलेली पत्रे (खाजगी मजकूर वगळून, अर्थातच!) या लेखाप्रमाणेच स्कॅन करुन येथे चढवता आली तर फार बरे वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

फार छान प्रतिसाद. लेखही सुरेखच आहे. लेख वाचून दोघांही लेखकांबद्दल काही खेदजनक मनात आलेले नव्हतेच.

कितीही मोठा लेखक झाला तरी त्याला मर्त्य शरीराच्या आणि मनाच्या निसर्गनियमांना ओलांडता आले असेल असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे "दोघांमध्ये (इतरांनी त्यावर तुटून पडावे असा) प्रॉब्लेम नव्हता", आणि "दोघांमध्ये काही प्रॉब्लेम होता खरा" यामध्ये कुठेतरी सत्य असावे. मला लेख आणि प्रतिसाद वाचून पाटीलसाहेबांचे म्हणणे पटते. दळवींनी जीएंची निंदा केली नसावी. त्यांच्या हक्काच्या भावनेतून त्यांनी तसे लिहिले असावे, आणि त्यातून त्यांच्या आणि जीएंच्या मधील जवळीकीचेच दर्शन होते. (यावरुन आहे मनोहर तरी ची आठवण झाली. जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील.)

श्रामो म्हणतात तसे लेख आणि पाटीलसाहेबांचा हा प्रतिसाद यांतून(ही) बरीच माहिती मिळते (आणि म्हणले तर ज्ञानही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही मोठा लेखक झाला तरी त्याला मर्त्य शरीराच्या आणि मनाच्या निसर्गनियमांना ओलांडता आले असेल असे समजण्याचे कारण नाही.

अगदी सहमत. लेख व प्रतिसाद वाचल्यानंतर असेच वाटते. दळवींची बाजू वाचताना पुलंच्या प्रो येळकुंठवारांची आठवण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

दोन चित्रविचित्र प्राण्यांची मैत्री बघून डोके भंजाळते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सर्वप्रथम - १. मी मराठी साहित्याचा वाचक होतो त्या काळात जीए आणि दळवी दोघेही महान लेखक आहेत याचे पुरावे त्यांच्या लेखनातून सापडले होते.
२. जीए आणि दळवी या दोघांबद्दलही माझा 'अभ्यास' नाही. तसेच त्यांच्याशी कोणताही व्यक्तिगत संबंध नाही.
३. जीएंच्या कथा मराठी भाषेच्या कक्षा ओलांडून पार सातासमुद्रापलिकडे जातात असा माझा आजही समज आहे.

शिवाय- आज इथल्या वाचकांसमोर ललितमधील 'तो' लेख नाही, त्यामुळे अंतर्नादच्या संपादकांनी 'ललित' मधील जशाच्यातसा उचलून मुद्रित केला आहे की त्यावर संपादनाची कात्री चालविली आहे हे कळण्यास मार्ग नाही. माझ्यासमोर या क्षणी 'अंतर्नाद' ऑगस्ट २०११ चा लेख आहे. परंतु श्री. अशोक पाटील यांनी उद्धृत केलेल्या उदाहरणांवरून असे वाटते की संपादनाची कात्री चाललेली नाही. हाच लेख जयवंत दळवी यांच्या 'परममित्र' या लेखसंग्रहात समाविष्ट असल्याने शहानिशा करता येईल.

श्री. अशोक पाटील यांचा या चर्चेतील प्रतिसाद अत्यंत अभ्यासपूर्ण आहे आणि त्याला जीएंच्या सहवासाच्या अनुभवाची झालर आहे. त्यामुळे त्यांचा या विषयावरील अधिकार मी मान्य करतो.

परंतु दळवींच्या मूळ लेखाबाबत माझी मते अशी -

१. दळवींचा मूळ लेखाला तर त्याचे शीर्षक "जीए - एक विचित्र/विक्षिप्त माणूस" असे शोभून दिसले असते.
२. स्टारडस्ट, मायापुरी किंवा फिल्मफेअर मासिकात गॉसिप करावे तसा हा लेख वाटतो.
३. या लेखातील प्रत्येक परिच्छेदात जीएंचे मोठेपण सांगणारा एखादा मुद्दा मांडायचा आणि मग तो स्वतःच खोडायचा असे दळवींनी केले आहे. दळवींना जीएंच्या प्रत्येक बाबतीत काहीना काही खोड दिसतेच आहे. त्यांनी एकाही गोष्टीचे निर्भेळ कौतुक केलेले नाही.
४. जिव्हाळ्याच्या मित्राला आपण खासगीत "*डेच्या","*डगीच्या" वगैरे शिव्या देऊन मोठ्या प्रेमाने हाक मारतो. किट्टाप्पा हरिहरांप्रमाणे "आलं बघा हुंगून" वगैरे म्हणू शकतो.
पण एका प्रसिद्ध लेखकाच्या मॄत्यूनंतर त्याच्या आठवणी सांगणारा - "होता बरा, पण लै बाराबोडयाचा होता" अशा पद्धतीचा हा लेख निदान दळवींनी तरी लिहायला नको होता.
लोक वाईट तेवढेच लक्षात ठेवतात. उदा. आमच्या गावी गरीब लोकांचा इलाज विनामोबदला करणारे एक मोठे चांगले डॉक्टर वारले तेव्हा लोकांनी काय म्हणावे?-"लै दारू प्याचा!"
किंवा इंदिरा गांधींबद्दल 'रणरागिणी','चंडिका' वरून सुरू झालेली चर्चा मथाई/ब्रह्मचारीवर येते इ.
५. 'जीएंचे सुटलेले पोट' यावर दळवींनी तीन वाक्ये लिहिली आहेत. पोट पुढे काढून, पोट डुलवित असे लिहीण्याचे प्रयोजन आणि औचित्य काय?
६. दळवींनी जीएंच्या काहीशा गूढ आणि वलयांकित व्यक्तीमत्त्वाची 'भांडेफोड' करण्यासाठी हा लेख लिहीला असावा की काय?- अशी शंका येते.

असा लेख दळवींनी जीएंच्या हयातीत लिहीला असता, दोन दिले आणि दोन घेतले असते तर त्यात दळवींचा दिलखुलासपणा दिसला असता.हे दोघेही लेखक ज्या साहित्यिक पातळीवर होते ती पातळी, जीएंबद्दलचे आपले वैयक्तिक (प्रामुख्याने कटू) अनुभव त्यांच्या मृत्यूच्या पश्चात असे चव्हाट्यावर मांडून, दळवींनी सोडलेली आहे आणि ते स्टारडस्ट/फिल्मफेअर/मायापुरीच्या पातळीवर उतरले आहेत असे मनोमन वाटत राहते.

शेवटी-
त्याकाळी जीएंना साहित्य अकादेमीचे 'पाच हज्ज्जार' रुपयांचे बक्षीस मिळाले आणि ते 'उडवून' नंतर टेक्निकॅलिटीमुळे परत करताना त्यांना 'अतोनात दु:ख' झाले वगैरे वर्णन दळवींनी पॅचवर्कसारखे केले आहे हे जाणवते. दु:ख याचे की जीएंनी ते बक्षीस (रकमेसह)त्यावेळीच परत केले हे आता (२०१२ साली) काही लोक नाकारत आहेत. बक्षीस परत केल्याची मूळ पावती पुराव्यादाखल अस्तित्वात असताना इतक्या काळानंतरही या विषयामुळे दळवींच्या खांद्यावर बंदूक ठेवून - जीए 'अप्रामाणिक' होते अशी निशाणबाजी काही (मिशावाले नेमबाज) करतात. दळवींचा हा लेख वाचून लोक जीएंना 'विचित्रवल्ली' समजोत, न-समजोत पण जीए 'अप्रामाणिक' होते असे कोणी समजू लागले तर ते मात्र दुर्दैवी ठरेल. ((((माझ्यासारख्या जीएभक्ताला अक्षम्य आहे Wink )))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद विसुनानांना उद्देशून नाही. त्यांच्याही प्रतिसादात (वर इतरांसह) आलेल्या मुद्याबाबतचा आहे. तो अज्ञानातूनच आला आहे.
साहित्य अकादमीचे पाच हजार रुपये परत करताना जीएंना दुःख झाल्याचे दळवी यांनी लिहिले असल्याचे दिसते. हे दुःख नेमके कोणते आहे हे काही मला कळले नाही. मला दुःख होण्याच्या दोन शक्यता दिसतात. पाच हजार रुपये गेले याचे एक दुःख आहे. येथे ते पाच हजार रुपये आपलेच आहेत, आपल्याला उगाच परत करावे लागताहेत, यातून ती दुःखाची भावना निर्माण होते. दुसरी शक्यता म्हणजे आज माझ्याकडे पाच हजार रुपये देण्याची क्षमता नसताना ओढाताण करून ते द्यावे लागताहेत याचे दुःख. हे दुःख त्या-त्या माणसाच्या तत्वांपोटी निर्माण झालेले असते आणि तो ते स्वतःच भोगत असतो. तो तसं भोगत नसेल तर त्याच्या तत्वांशी तो प्रामाणिक नसतो इतका निष्कर्ष सुरक्षीतपणे काढता येतो.
जीएंच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या सांपत्तिक स्थितीची सन्जोप राव यांनी केलेले वर्णन पाहता त्यांचे दुःख दुसऱ्या जातकुळीतले वाटते. ते दुःख त्या पाच हजार या आकड्याच्या मूल्याशी संबंधित नसावे. तसे असेल तर दळवींना ते कसे समजले. अशोक पाटील म्हणतात त्याप्रमाणे दळवी हे जीएंच्या अंतस्थ वर्तुळातील असतील तर ते दुःख जीएंनी त्यांच्याशी शेअर केले असावे. दळवींनी ते वेगळ्या परिप्रेक्ष्यात लोकांसमोर मांडले असेल ही शक्यता एकूण दळवींच्या स्वभावाची मूस पाहता दाट आहे. तसे असेल या एका मुद्यापुरते दळवी निश्चित चुकताहेत असे ठामपणे म्हणता येईल. तसे चुकले तरीही दळवी यांचे महत्त्व कमी होत नाही. आणि, तरीही दळवींच्या स्वभावाची मूस ध्यानी घेता त्यांच्या त्या दुःखविषयक लेखनातून जीएंची प्रतिमा भंग पावत नाही.
कुणाच्या प्रमाणपत्राने कुणाचे महात्म्य घडावे (किंवा कुणाच्या टीकेने कुणाची प्रतिमा भंगावी) याचे काही नियम नसावेत, पण माणसांना मोजमाप करता येत असतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या दु:खाचे कारण दळवींच्या शब्दांत -
"साहित्य अकादमीचे पारितोषिक परत करताना त्यांना जे अतोनात दु:ख झाले, त्याचे कारण पारितोषिकाचे ते पाच हजार रुपये उडवून त्यांनी दिल्ली, हृषिकेश, हरद्वार, वाराणसी वगैरे ठिकाणी बहिणींना घेऊन मुक्तपणे प्रवास केला होता, त्या आनंदावर विरजण पडले होते."

हे कारण सांगितल्यावर त्याचा पुरावा/खुलासा म्हणून दळवी जीएंच्या पत्रातील एक मोठा भाग उद्धृत करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सारा शब्दांचा खेळ वाटेल, पण एकूण ही चलाखी दिसते. पाच हजार रुपये परत करण्याचे दुःख आणि पाच हजार रुपये (खरे तर पारितोषिक) परत करतानाचे दुःख यात फरक आहे. असो... दोन मोठ्या लेखकांमधल्या व्यवहारात अधिक न पडता मी थांबावे हे बरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखक असला तर तो ‘अरभाट’च असला पाहीजे अशी प्रतिमा वाचकांच्या मनात आपोआप तयार होत असावी. मग लेखकाने थोडासा ‘चिल्लर’पणा दाखवून स्वत:च त्या प्रतिमेवर हातोडा चालवला की मग दुखरी प्रतिक्रिया व्यक्त होते.एकंदर सूर जयवंत दळवींनी ते जयवंत दळवी आहेत म्हणुन असं करायला नको होतं असा असावा.(दुसया कोणी केलं असतं तर झाली एवढी चर्चा, वाद झाला असता काय?)म्हणजे जी.ए.च्या प्रतिमाभंजनाचा प्रयत्न करताना जयवंत दळवींनी वाचकांच्या मनातील त्यांच्याच प्रतिमेवर स्वत:च हातोडा चालवला असं काहीसं ….

दोघेही थोर लेखक होते.मी तो मूळ लेख वाचलेला नाही पण शक्यता अशीही वाटते की लेख लिहिताना दळवींच्या कडून मैत्रीतील स्वातंत्र्य गृहीत धरताना काही इतर संदर्भ अजाणतेपणे निसटून गेले असावेत.त्यामूळे थट्टेचा रोख अकारण विपर्यास होऊन असुयेकडे वळला असावा.

फ़क्त पुरस्कार आणि पुरस्काराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर…

जी.ए. च्या बाबतीत बोलायचे झाले तर जसा पुरस्कारावर फ़क्त तांत्रिक आक्षेप होता तसेच जी.ए. नी पैसे परत करून फ़क्त तांत्रिकता पुर्ण केली असे आहे काय?.झालेल्या प्रकारात जी.ए.ची चुक नव्हतीच परंतू जी झाली ती गोष्ट गैरच होती. प्रकाशकाने पुस्तक अधिकृतरीत्या बाजारात येण्याआधीच आधीच दोनचार प्रती छापून पुस्तकावर पुरस्काराची मोहर उठवणे चुकीचेच ठरते.(असे काहीसे झाले होते हे अंधुक आठवते आहे. )पुरस्कार आज ना उद्या मिळालाच असता, आणि जी.ए.स्वत: त्याबाबत जास्त उत्सूक असतील असेही नाही.मग नसते उपद्व्याप करून अडचणीत आणणाया प्रकाशकाचा निषेध जी.ए.नीं कसा केला हे पण माहीत असणे गरजेचे आहे.जी.ए.नीं तसे काही केले नसेल तर मग दळवींची बाजू निदान ह्या बाबतीत तरी समजवून घेणे काहीसे सोपे जाते. जी.ए.नीं तसे काही केले असेल तर मग दळवी ‘अनाठायी’ ठरू शकतात.

बाकी शेवटी लेखक म्हणून दोघेही ‘अरभाट’च होते...माणुस म्हणून कोणी काही ‘चिल्लर’ पणा केला असेलच तर दुर्लक्ष करणे वाचक म्हणून सोयीचे आहे.आणि तेच केले पाहीजे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>>>एकंदर सूर जयवंत दळवींनी ते जयवंत दळवी आहेत म्हणुन असं करायला नको होतं <<<<

हे थोडं खरं वाटतं. जीएंच्या मृत्यूनंतर अल्पावधीतच काही असं लिखाण प्रसिद्ध झालं ज्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चाच नव्हती तर त्यांच्या तरुणपणीच्या प्रेमप्रकरणावर आधारलेली एक पूर्ण कादंबरीच ! हा सगळा मामलाच फार गर्हणीय असा होता. मात्र आज यावर फारसं बोललं जाणार नाही. याचं कारण हेच की ज्याप्रकारे हे लिखाण केलं गेलं तो प्रकारच सगळा विचारात घ्यायच्या लायकीचा नव्हता. दळवींच्याबाबत असं होऊ शकत नाही. १९६० पासूनचे जुने संबंध असलेल्या व्यक्तीने मृत्यूनंतर अगदी लगेच लिहिल्या गेलेल्या लिखाणाचा विचार गंभीरपणे केला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

@ राजेश घासकडवी ~

धन्यवाद. मी हे जरूर मान्य करतो की 'इथल्या' वाचकांनी दळवी याना हलकटचे लेबल लावले नसेल.....[तितकी प्रगल्भता आणि समंजसपणा इथल्या सदस्यांमध्ये निश्चित आहे].. प्रश्न असतो तो 'वाईड रेन्ज'चा. इथे निदान आपण त्या विषयावर काही प्रमाणात इंटरअ‍ॅक्शन तरी साधू शकतो, पण ज्याना त्या दोन जायन्ट्समधील मैत्रीची अगदी एकेरी पातळी माहीत नाही, आणि जे जी.ए.प्रेमी आहेत त्याना तशा लेखामुळे जयवंत दळवी म्हणजे अ‍ॅन्टोनिओकडून पौंड फ्लेश घेण्यास उत्सुक असलेला शायलॉक वाटणार.

'काजळमाया' दुर्दैवी घटनेचा तुम्ही उल्लेख केला आहे; पण त्याविषयी सविस्तर आणि स्वतंत्रच लिहिले जाणे आवश्यक आहे. या पारितोषिकानेही गैरसमजाचे रान उठविले गेले होतेच १९७३ साली, ज्यामुळे सारा ताप झाला तो जी.ए.कुलकर्णी यानाच.. पाहू या पुढे एखाद्या स्वतंत्र धाग्यात.

@ सन्जोप राव ~

माझ्या प्रतिसादातील मुद्द्यांशी असहमती असूनदेखील अत्यंत प्रांजलपणे तुम्ही त्याला उत्तर देवून "लेट अस अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री" ही नेमस्त भूमिका घेतली, ती मलाही आवडली. जी.ए. प्रेमी आहातच तुम्ही....मीदेखील स्वःताला तसे समजतो. त्यामुळे एखादी व्यक्ती, एखादे स्थान वा एखादी घटना यावरून प्रेमापोटी किती आणि कोणत्या तर्‍हेने वाद घालावेत याची सीमारेषा त्रयस्थाने नव्हे तर त्या दोघानीच ठरविली तर मतभेद असूनही भर वैशाखातदेखील रानात हिरवे रावे दिसायला हरकत नाही.

जी.एं. यांच्या समवेत झालेल्या पत्रव्यवहाराबाबत तुमच्या सूचनेचा मी विचार करतो. एकतर त्यातील बहुतांशी पत्रे ही 'कौटुंबिक' पातळीवरील आहेत. ही गोष्ट नंदाताईंपेक्षा प्रभावतीताईना माहीत होती. जी.एं.ची सख्खी धाकटी बहीण जशी कोल्हापूरात दिली होती तद्वतः माझी धाकटी बहीण धारवाडात. तोही एक पत्रव्यवहाराचा हळवा दुवा होताच. शिवाय दोघींच्याही नशिबी संसारसुख नसल्याने त्यांच्या भाळी जे काही भगभगीत लिहिले होते सटवाईने, ते त्यानी भोगले आणि अस्तंगत झाल्या. त्या योगायोगावरूनही लिखाणातून बरीच देवाणघेवाण होत राहिली....हे मी सर्वश्री पु.ल.देशपांडे आणि प्रि.म.द.हातकणंगलेकरसरांना [ज्यावेळी प्रभावतीताईंची मला 'पत्रे संग्रहासाठी देण्याबाबत विचार करावा' अशी विनंती आली आणि "देणार असाल वा नसाल तर पु.ल. वा हातकणंगलेकर सरांना त्याबाबत कळवावे...' अशी सूचनाही आली त्यावेळी] लेखी कळविले होते.

काही जगावेगळ्या इंग्रजी पुस्तकांची त्याना जी आस होती, त्याबाबत त्यानी मला कळविले होते, आणि शोधण्याची विनंतीही केली होती...त्या पुस्तकांची यादी मी इथे देवू शकतो, जेणेकरून जी.एं.च्या वाचनाविषयी औत्सुक्य असणार्‍यांना त्या माहितीमुळे नक्की आनंद होईल.

@ आळश्यांचा राजा ~ थॅन्क्स सर, मी वयाने जरूर तुम्हाला सीनिअर आहे, पण म्हणून तुमच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकारी व्यक्तीने मला 'पाटीलसाहेब' उद्देश्यून इथे प्रतिसाद द्यावा इतका मोठी मी खचितच नाही. केवळ 'अशोकराव' किंवा थेट अशोक पाटील असे संबोधले गेल्यास मला ते जास्त आपुलकीचे वाटेल.

आनंद झाला की, तुमच्या मनी दोन्ही लेखकांबद्दल खेदजनक असे काहीच आले नव्हते. दोघांचेही मराठी साहित्याचे स्थान लखलखीत असेच आहे. दळवींनी लेखात जी भाषा वापरली ती त्यांच्या फटकळ, वा डायरेक्ट मेथड पद्धतीच्या स्वभावामुळे. दोघांत जवळीक किती होती हे त्यांच्या पत्रव्यवहारातील भाषेवरून उघडच आहे. या निमित्ताने फेब्रुवारी १९८८ च्या 'जी.ए.विशेषांका' संदर्भात इथेच सविस्तर लिहितो, जेणेकरून जयवंत दळवींच्या लेखावरही काहीसा प्रकाश पडेल.

फेब्रुवारी १९८८ मध्ये तो खास ललित अंक प्रकाशित झाला आणि त्याचे अतिथी संपादक होते प्रिं.म.द.हातकणंगलेकरसर. जी.ए. आणि सरांचा जो मैत्रीचा बांध होता तो प्रामुख्याने दोघांचाही कॉलेजमध्ये शिकविण्याचा विषय इंग्रजी होता (दोघांचा पत्रव्यवहारही त्याच भाषेत चाले). वर मीच उल्लेख केलेल्या घरगुती कारणामुळे जी.ए.नी कोल्हापूरचे नाव कायमचे टाकले. पण म्हणून सांगलीशी त्यांचे नाते तुटले नाही. हा संबंध जसा कोठावळेना माहीत होता, तसाच जयवंत दळवींनाही. त्यामुळे ज्यावेळी ललितने खास अंकाची घोषणा केली त्यावेळी अशोक कोठावळे याना नक्की माहीत होते की जी.ए. ना जवळून ओळखणारी लेखक, प्रकाशक, प्रशंसक, समीक्षक मंडळी प्रिं.हातकणंगलेकर यांची विनंती नजरेआड करणार नाहीत. झालेही तसे...त्या अंकात एकूण १३ लेख घेतले, पैकी जयवंत दळवींचा लेख आला तो सर्वात शेवटी...अंकाचे प्रकाशन थांबले होते जवळपास, कारण सरांना दळवींचा लेख हवाच होता. त्या अंकात निमंत्रित सार्‍यांच्याकडून जी.एं.च्या वर भावनेने ओथंबून भरभरून लिहिले जाणार हे दळवी जाणून होते [शांता शेळके, शंकर रामाणी, वसंत आबाजी डहाके, शंकर सारडा, पांडुरंग कुमठा, आप्पा परचुरे, विजय पाडळकर आदी निमंत्रित लेखक होते]. आपल्या फटकळ तसेच स्पष्टवक्तेपणा तसेच वक्रोक्तीपूर्ण लेखनाबद्दल सर्वाना माहीत असलेल्या दळवींनी संपादक सरांना स्पष्ट कळविले होते की 'जसेच्यातसे लेखन प्रसिद्ध करण्याचा शब्द तुम्ही द्यावा, तरच मी लिखाणाला बसतो....[हे पत्र मी पाहिले आहे, आ.रा.]. सरांनी लागलीच होकार दिला, कारण त्याना हे नक्की माहीत होते की, दळवी सहभागाशिवाय त्या अंकाला पूर्णत्व लाभणार नाही. तशात जी.ए. नेहमी सरांशी ज्या ज्या विषयावर समोरासमोर चर्चा करीत त्यामध्ये दळवींनी युसिसतर्फे त्याना दिलेल्या/मिळालेल्या भाषांतराच्या कामाचा उल्लेख करीत...तसेच गप्पामध्ये दळवींच्या पत्रातील स्वभावाविषयीही चर्चा क्रमप्राप्तच. त्यामुळे तो वादग्रस्त म्हणावा असा लेख आला आणि तो प्रसिद्धही झाला. कुठे एकदोन वेळी त्यासंबंधी ललितच्या दोन अंकात चिरगुटाइतक्या चर्चा झाल्या आणि विषय तीन अंकानंतर मरणही पावला.

जी.एं.च्या हयातीतही दळवी यानी त्यांच्या माणसांना टाळण्याच्या स्वभावाबद्दल पत्ररुपाने चिक्कार लिहिले होते [जेएसएस कॉलेज धारवाडमधील त्यांच्या सहकार्‍यांनीही अगदी तसेच लिहिले आहे; ..जी.एं.च्या विद्यार्थ्यांनीही लिहिले आहे, त्याविषयी नंतर कधीतरी लिहीन]...पण त्यामुळे त्यांच्या मैत्रीत कसलाही खंड पडण्याचे कारण नव्हते. आता मृत्युनंतर का लिहावे ? हा खरे तर डीबेटेबल क्वेशन होऊ शकतो, पण त्याना जर थेट आडपडदा न लिहिता लिहायचे असेल आणि संपादकांनाही ते हवे असेल तर मग 'लिहिला एक लेख...त्या साली...झाली चर्चा...संपला विषय....१९८८ ला तो विषय जन्मला आणि १९८८ अजून निम्मे शिल्लक होते, तो पर्यंत मेलाही'. महाराष्ट्राच्या आदराला प्राप्त असलेल्या जवळपास सर्वच लेखकांवर "ठणठणपाळ" चा निर्विश हातोडा ललितच्या प्रत्येक महिन्यात चाले. त्यात जी.ए.कुलकर्णीही अपवाद ठरले नव्हते. "काजळमाया" चे पाच हजार परत केल्यावरही "ठणठणपाळा" ने 'घटका गेली पळे गेली...' सदरात 'सामसूम रेगे' याना त्याबद्दल योग्य त्या भाषेत बोल लावल्यावर खोडकळपणे लिहिले, "....पण आता जाऊ द्या, जीए नी पारितोषिकाची रक्कम अकादमीला परत केली ते चांगले झाले. कुणाच्या तरी उपयोगाला येईल, नाहीतरी जी.ए. नी तरी इतके पैसे घेऊन काय केले असते ? शिग्रेटी फुंकल्या असत्या वा क्लबमध्ये रमीवर उधळले असते....." ~ ही १९७३ ची गोष्ट, मग त्या अंकातील तशा खाजगी म्हटल्या जाणार्‍या उल्लेखांनी जी.एं.नी कधी निषेध केला ? वा संपादकांना कधी त्याविरुद्ध संतापून पत्र लिहिले ? नाही....अशी कॉमेन्ट्स खेळकरपणे घेणे त्याना माहीत होते. ठणठणपाळवर चिडायला ते थोडेच नानासाहेब गोरे वा पु.शि.रेगे वा बाबुराव चित्रे होते ?

ज्या दळवींच्या जीए स्वभाव-लिखाणाबद्दल अनेकानी बोट उचलले आहे, त्याच जी.एं.बद्दल खुद्द प्रिं.हातकणंगलेकर त्याच ललितच्या खास अंकाच्या संपादकीयात काय म्हणतात ?

"....जी.ए. अनेक मार्गाने कुतुहलखोरांना दूर ठेवीत असत. अवमान वाटावा अशी रितीने त्याना प्रतिसाद देत. त्यामुळे ते माणूसघाणे आणि विक्षिप्त आहेत असा त्यांच्याबद्दलचा समज सार्‍या धारवाडात पसरला होता. आपल्या वर्तनाने त्यानी स्नेही मंडळींना कोड्यात टाकले होते. काहीना खोलपणे दुखावले होते....." इ.इ. आता, जर आपल्या शांत धीरगंभीर स्वभावाबद्दल सर्वांच्या परिचयाचे असलेले हातकणंगलेकरसर जर आपल्या मित्राच्या स्वभावाबद्दल [तेही त्याच्या निधनानंतर] असे उघड आणि लिखित स्वरुपात मत मांडतात, तर मग जयवंत दळवीसारख्या फटकळ व्यक्तीकडून लेखन मागितले आणि त्यानी ते तसे दिले तर ते स्वीकृत केले जाणे साहजिकच होते.

पंडित नेहरू याना एखाद्याने 'अरभाट' ठरविले तर तो त्याचा हक्कच आहे, आणि पंडितजी जरूर अरभाट कॅटेगरीतीलच होते; पण त्यांचा तसा उल्लेख करताना सरदार पटेल कसे 'चिल्लर' होते, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार्‍याला हे समजले पाहिजे की आपण अशी तुलना करताना सरदारांचा नव्हे तर प्रत्यक्षात पंडितजींचाच अवमान करीत आहे. असे होऊ नये म्हणूनच, मी कट्टर जी.ए. प्रेमी असूनही अनुसरून दळवीना काही प्रमाणात डीफेन्ड केले, हे कृपया तुम्ही सर्वांनी समजून घ्यावे.

@ विसुनाना ~ तुमचा सविस्तर प्रतिसाद वाचला....त्यावर मी माझे मत नंतर मांडतो.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. अशोक पाटील सर, तुमचे वरील प्रतिसाद मोलाचे आहेत. त्यामुळे सामान्य वाचकांना माहित नसलेल्या अनेक बाबी उजेडात येत आहेत. या चर्चेचे हे महत्त्वाचे फलित आहे असे मी मानतो.

@ विसुनाना ~ तुमचा सविस्तर प्रतिसाद वाचला....त्यावर मी माझे मत नंतर मांडतो.

-जरूर. उत्सुकता आहे.

पंडित नेहरू याना एखाद्याने 'अरभाट' ठरविले तर तो त्याचा हक्कच आहे, आणि पंडितजी जरूर अरभाट कॅटेगरीतीलच होते; पण त्यांचा तसा उल्लेख करताना सरदार पटेल कसे 'चिल्लर' होते, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार्‍याला हे समजले पाहिजे की आपण अशी तुलना करताना सरदारांचा नव्हे तर प्रत्यक्षात पंडितजींचाच अवमान करीत आहे.

- दळवी हे चिल्लर होते असे मला मुळीच म्हणायचे नाही. इतर कुणी असा लेख लिहिला असता तर त्याला काय महत्त्व होते?

जीए १९८५ ते १९८७(अखेरपर्यंत) पुण्यात होते. ही जवळजवळ दोन वर्षे जीए आणि दळवी यांच्यात काहीच पत्रव्यवहार झाला नाही. किंबहुना या काळात दळवी कित्येकदा पुण्याला जाऊनही जीएंना भेटले नाहीत. कारण जीएंनी दळवींना आपण पुण्याला आल्याचे कळवले नव्हते. त्यामुळे दळवींचा 'अहंकार' दुखावला होता. ठीक आहे. कदाचित मैत्रीतून आलेल्या अधिकाराच्या भावनेचा तो परिणाम असावा. पण आपले दुखणे विकोपाला गेल्यावर (ल्युकेमिआ असावा* असे आठवते आहे) जीएंनी दळवींची आठवण पुन्हापुन्हा काढली होती आणि अप्पा परचुर्‍यांनी दळवींकडे जीएंना भेटण्याचा आग्रह 'परत-परत' केला होता.
तीस-पस्तीस वर्षांपासूनचा मित्र मृत्यूशय्येवर असताना अणि त्याने आपणहून भेटण्याची इच्छा व्यक्त केली असताना त्याची शेवटची भेट घेण्यासाठीही दळवी का गेले नसावेत? याचेही गूढ उलगडता आले तर बरे होईल. की जीएंच्या 'प्रतिमासाधना'ने दळवींना शेवटच्या क्षणीही चकवले?

असो. आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत-

*आठवणीप्रमाणे - इचलकरंजीच्या एका चित्रप्रदर्शनात 'जी.ए. कुलकर्णी' असे लिहिलेले एक चित्र (रक्तात बुडालेला हाताचा ठसा इ.)पुलंना दिसले आणि ते चित्र जीएंनी काढलेले असावे असे पुलंना वाटल्याने त्याचा मोठाच गहजब झाला होता. परंतु ते चित्र जीएंच्या एका चाहत्या तरूण चित्रकाराने त्यांच्या कॅन्सरग्रस्त (ल्युकेमिया?) मृत्यूने व्यथित होऊन काढले होते असे उजेडात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक वाचनीय प्रतिसाद.
अवांतर: या प्रतिसादातील मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न पुन्हा कोणी तरी करावाच. त्यानिमित्ताने अशोक पाटील पुन्हा लिहितील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अति-अवांतरः
स्वगतः हम्म्म, असेही होते कधीकधी! वरच्या प्रतिसादात काहीतरी अति-अवांतर असे फिकट राखाडी अक्षरांत होते. ते श्री. श्रावण मोडकांनी संपादित केलेले दिसतेय. असे का बरे? कदाचित त्यांना ते इंद्रधनुषी सप्तरंगात लिहायचे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रावांचा लेखही आवडला व अशोक पाटील यांची प्रतिक्रिया तेवढीच आवडली. दळवींचा मूळ लेख वाचला नसल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही. दळवी व जीए या दोन्ही थोर लेखकांपैकी मी जीएंचा जास्त फॅन आहे. त्यामुळेच की काय, या सर्व प्रकारात मला जीएंविषयी जास्त सहानुभूति वाटते.
सर्वात स्तुत्य गोष्ट ही की,मतभेद असले तरी सर्व सदस्यांनी जी उच्च पातळी राखली आहे, ते या संस्थळाचे वैशिष्ठ्य म्हणता येईल.
मागे एकदा, खळेअण्णा खाजगीत माझ्या वडिलांना म्हणाले होते ते आठवले. लता-आशा यांच्या खाजगी आयुष्याबद्दल विषय निघाला तेंव्हा ते म्हणाले," ही कलाकार मंडळी इतकी थोर आहेत की आपण फक्त त्यांची कलाच बघावी आणि आनंद घ्यावा. त्यांच्या खाजगी आयुष्यांत डोकावण्याचा आपल्याला काही अधिकारच नाही."
साहित्यिकांच्या बाबतीतही हाच न्याय असावा, असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखनकलेत ही दोन्ही माणसं अरभाट होती. इतर ठिकाणी चिल्लरपणा केला असेल तर तो मुद्दामहून जाऊन पाहायची इच्छा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळे प्रतिसाद वाचताना 'कुसुमगुंजा' संग्रहातील 'एक मित्र - एक कथा' या जीएंच्या कथेची सहजच आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निंदाव्यंजक लिहिणे अप्रस्तुत आहे (कारण त्या व्यक्तिला स्वतःला प्रतिवादाची संधी नसते) हे आम्ही दत्तो वामन पोतदारांबद्दल आलेल्या एका पोरकट लेखाबाबत मिपावर झालेल्या चर्चेत आधीच म्हटले आहे. स्थळ नि व्यक्ती दोन्ही बदलूनही 'आमचे' मत बदललेले नाही एवढेच नोंदवतो. त्यावेळचे काही प्रतिवाद/तर्क नि इथली मांडलेली मते यात गंमतीशीर विरोधाभास -मला तरी- दिसतो आहे. जाऊ द्या, आपल्याला काय करायचे आहे. ज्याचे त्याने पहावे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हा प्रतिसाद विसुनाना यांच्या मताविषयी [एकत्रित....]

[सर्वप्रथम चित्रकार ओके यांच्याबाबत. त्या नावाचे स्पेलिंग Oke असे असल्याने तशाच उच्चाराने [ओके] ते ओळखले जात. पु.ल.देशपांडे यांच्या 'गणगोत' या व्यक्तिचित्रण पुस्तकातील सारी चित्रे व्ही.एन.ओके यानी रेखाटली होती. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पु.लं.नी प्रस्तावनेत म्हटले होते, "ह्या पुस्तकातली सुरेख चित्रे काढणारे आणि पुस्तकाला सुंदर वेष्टण देणारे माझे चित्रकार मित्र श्री. ओके यांचा मी अत्यंत आभारी आहे...." त्यामुळे आडनावाच्या उच्चारात दुमत असणार नाही.]

जी.ए. आणि जयवंत दळवी हे दोघेही किती विलक्षण ताकदीचे लेखक होते ही अभ्यासकांसाठीच नव्हे तर सर्व स्तरावरील वाचकांना नेहमी चर्चेसाठी हवीहवीशी वाटणारी बाब आहे. अर्थात हेही तितकेच सत्य की मर्ढेकरानंतर ज्यांच्या साहित्यावर {आणि साहित्येतर बाबीवरही} भरभरून लिहिले बोलले चर्चीले गेले, जाते, ते भाग्य जी.ए.कुलकर्णी याना लाभले. दळवी हे तसे पाहिले तर 'लोकप्रिय लेखक' गटातील होते आणि "दिवाळी" अंकाच्या भाऊगर्दीतील एक 'प्रॉमिनंट' नाव असल्याने दळवी, व.पु.काळे, अच्युत बर्वे, शं.ना.नवरे, मधु मंगेश कर्णिक, शंकर पाटील, वि.आ.बुवा अशी हमखास यशस्वी मंडळी त्या सीझनमध्ये वाचकांच्या नजरेसमोर राहून त्यांची फराळासोबत हवी असणारी वाङ्मयीन भूक भागविण्यास तत्पर असत. त्या दृष्टीने काहीसे ते 'ओव्हर एक्स्पोझ' झाले होते व साहजिकच जूलिअन, मर्ढेकर, जी.ए. या नावाना गूढतेचे जे वलय लाभले ते दळवीना लाभले नसल्याने आजच्या घडीला (२०१२) तुम्हाआम्हाला 'जी.ए.कुलकर्णी' नावाच्या गारुडावर जितके लिहायला बोलायला भावते, तितके अन्य कोणत्याच दिवंगत मराठी लेखकाबद्दल वाटत नाही. पु.ल. एक अपवाद आहेत, पण त्यांच्यावर 'घरचे प्रेम' असते, त्यांच्याविषयी रहस्यमय, गूढ आकर्षण असे काही नाही....ते भाग्य फक्त मर्ढेकर आणि जी.ए. यानाच.

विसुनाना लिहितात "जी.ए. आणि दळवी दोघेही महान लेखक आहेत....". वैयक्तिक आवड म्हणून हे मत स्वीकारावे लागेलच. पण खुद्द जी.ए. ना 'तुम्ही लेखक म्हणून महान आहात...' असे म्हटले की ते अंगावर पाल पडावी तशी ती स्तुती झटकून टाकत. मी तसे एकदा एका पत्रात लिहिले होते, त्याला दिलेल्या उत्तरात त्यानी लिहिले, "तुमचे माझ्या लिखाणाचे मत मी वाचले, पण स्वीकारत नाही. यासाठी की तुम्ही तुमचे वाचन वाढवावे. ज्यावेळी तुम्ही डोस्टोव्हस्कीची 'ब्रदर्स कारामाझोव्ह' वाचाल आणि त्यानंतरही जर तुम्हाला जी.ए. चांगले लेखक आहेत असे वाटले, तरच यावर चर्चा करू." इतके नम्र ते स्वत:च्या 'लेखक' स्थानाविषयी होते. पत्ररूपाने केव्हातरी ते साहित्याविषयी जरूर चर्चा करीत, पण प्रत्यक्ष समोर बसून मक्याचा चिवडा खात असताना साहित्याला तिथे अजिबात थारा नसायचा. [मक्याचा चिवडा कसा करायचा असतो, प्रभावती कशी करते, याहीविषयी त्यानी मला पत्राद्वारे छान माहिती दिली होती.....परवा सन्जोप रावांच्या 'अरभाट आणि चिल्लर' लेखात पोह्याचा उल्लेख आला होता, त्यावेळी मला जी.ए.समवेत कडेमणी कम्पाऊंडमध्ये बसून आम्ही दोघे मक्याचा चिवडा खात 'आल्फ्रेड हिचकॉक' वर बोलत बसल्याचे झटदिशी आठवले होते....म्हणजे बोलत ते होते, ऐकत मी होतो.]

जयवंत दळवींच्या मूळ लेखाबाबत तुम्ही क्रमवार जी मते व्यक्त केली आहेत, त्याला अनुसरून मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे. ती जशीच्यातशी तुम्ही स्वीकारावीत असा माझा बिलकुल आग्रह नाही. शेवटी एखाद्या वाचकाने एखाद्या लेखाविषयी काय मत व्यक्त करावे हा त्याचा मूलभूत म्हणावा असा हक्क आहेच. फक्त चर्चेच्या अनुषंगाने त्या मतांविषयीची व्याप्ती वाढवितो.

१. दळवींचा मूळ लेखाला तर त्याचे शीर्षक "जीए - एक विचित्र/विक्षिप्त माणूस" असे शोभून दिसले असते.
~ विसुनाना....एक गोष्ट लक्षात घेणे फार गरजेचे आहे ते म्हणजे जयवंत दळवी {आणि त्यांचा मानसपुत्र ठणठणपाळ} याना जी.ए.कुलकर्णी यांच्या मैत्रीविषयी आनंद अभिमान वाटत असे. दोघांच्या वयात केवळ दोन वर्षाचे अंतर होते, शिवाय 'साहित्य' या क्षेत्राने दोघांत जवळीकही निर्माण झाली होती. दळवींचा मूळचाच खट्याळ स्वभाव हा जी.ए.यानाच नव्हे तर अगदी श्री.पु. सारख्या गंभीर प्रवृत्तीच्या व्यक्तीलाही बोचरे काढल्याशिवाय राहात नसे. बरे, त्या दोघांच्या पत्रव्यवहारातील 'दंगा' पाहाता त्रयस्थाची अशी नक्की समजूत होईल की जीए आणि दळवी अगदी इयत्त चौथीच्या वर्गापासून एकत्र आहेत आणि एकमेकाच्या लुंग्या कडदोरेही एकसंब्यातील भिमू वाण्याच्या दुकानातील आहेत. १५ जून १९६३ च्या दळवीना लिहिलेल्या एका पत्रात जी.ए. म्हणतात, ".....असल्या निवळ शब्दांनी आखूड होऊन बसणारी साजूक व्यक्ती तुम्ही नाही. तुम्हीदेखील तितक्याच स्पष्टपणे You can go to hell म्हणून सांगू शकाल अशी मला खात्री आहे. अशा व्यक्तीशी व्यवहार करताना संकोच अडगळीचा वाटतो." ~~ १९८८ च्या लेखातील भाषेविषयी चर्चा करताना त्याच्या अगोदर २५ वर्षे मागे आपण गेलो तर त्यावेळेपासून दोघेही एकमेकांच्या खोड्या काढीत असत....तेही विनासंकोच. त्यामुळे त्या 'विलक्षण' नात्यापोटी दळवीनी जे शीर्षक लेखाला प्रस्तुत केले त्याऐवजी अन्य तिथे शोभले नसतेच. मुद्दा हा आहे की (जो श्री.रमताराम यानीही वर छेडला आहे) एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वभावाविषयी टीका बोचरी वाटावी अशा धाटणीने करावी का ? हा प्रश्न जसा अन्यांना पडला होता तसा त्या साली जी.ए.गेल्याच्या दु:खात असणार्‍यांनाही पडला असणारच...मीही त्यातील एक होतो. पण त्यावर ललितच्या पुढील दोन अंकात [पुसटशी म्हणावी अशी] पत्ररुपाने चर्चा झालीही होती. प्रमुख पत्र होते पणजीस्थित डॉ.प्रल्हाद वडेर यांचे, पण ते होते अत्यंत मोघम भाषेत..."काही" लेखांवर संपादन करणे जरूरीचे होते, पण ते झाले नाही....अशा निरुपद्रवी स्वरुपाचे. त्यातही दळवी यांच्यावर थेट वार नव्हताच.

माणूस गेल्यावर त्यावर टीका नको हा विचार इथे {ऐसी....वर} मान्य होणार असेल, तर मग जर खुद्द जयवंत दळवी १९९४ ला स्वर्गवासी झाले होते, तर त्यानी लिहिलेल्या एखाद्या लेखाबद्दल आज त्याना पटलावर घेऊन जाब विचारणे हेही औचित्याला धरून होणार नाही. जोपर्यंत 'अंतर्नाद' ची त्या लेखाच्या पुनर्मुद्रणामागील [ऑगस्ट २०११] नेमकी भूमिका काय होती याबद्दल संपादक मंडळाला ओळखणारी एखादी अधिकारी व्यक्ती इथे सांगत नाही, तोपर्यंत पहिला औचित्यभंग त्यांच्याकडूनच झाला आहे असे समजले जाईल.

२. स्टारडस्ट, मायापुरी किंवा फिल्मफेअर मासिकात गॉसिप करावे तसा हा लेख वाटतो.
~ वेल...एक तर ते लिखाण "गॉसिप" लेबल लावण्यासारखे नाही. कारण एका व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन {म्हटले तर काही़जणांना ते ग्राफिक लेव्हलचे वाटेलही} आहे त्यात, शिवाय ते लिखाण संपादक मंडळासमोर आले त्यावेळी तिथे असणार्‍या दिग्गजांना जर त्यात काही वावगे वाटले नसेल....[खुद्द संपादकही त्या मताचे होतेच ना] तर मग त्या लिखाणातील सत्यता ही प्रसंगी आज दाहक वाटली तरी ती गॉसिपसदृष्य नसल्याने जसेच्यातसे स्वीकारण्यात आले होते, हे स्पष्टच आहे.

३. या लेखातील प्रत्येक परिच्छेदात जीएंचे मोठेपण सांगणारा एखादा मुद्दा मांडायचा आणि मग तो स्वतःच खोडायचा असे दळवींनी केले आहे. दळवींना जीएंच्या प्रत्येक बाबतीत काहीना काही खोड दिसतेच आहे. त्यांनी एकाही गोष्टीचे निर्भेळ कौतुक केलेले नाही.
~ असे कुठे झाले आहे विसुनाना ? प्रत्यक्ष व्यक्ती आणि एक लेखक या दोन वेगवेगळ्या भूमिकेतूनच दळवींनी जी.ए.चितारले आहेत. बाकी त्यांच्या लिखाणात जिला आपण खोड म्हणतो ती येणे क्रमप्राप्तच होते.

४. .... एका प्रसिद्ध लेखकाच्या मॄत्यूनंतर त्याच्या आठवणी सांगणारा - "होता बरा, पण लै बाराबोडयाचा होता" अशा पद्धतीचा हा लेख निदान दळवींनी तरी लिहायला नको होता. लोक वाईट तेवढेच लक्षात ठेवतात.
~ निदान मला तरी त्या लेखातील ते सो-कॉल्ड वाईट लक्षात ठेवण्याच्या योग्यतेचे होते असे वाटत नाही. हे कदाचित वैयक्तिक मत होऊ शकेल, पण समजा त्यानी अगदी आरती ओवाळावी अशा धर्तीचा लेख लिहिला असता तर दळवीं-जी.ए. मैत्रीला अगदी जवळून ओळखणार्‍या त्यांच्या साहित्यिक मित्रांनाही तो लेख दळवींनी हातचे राखून लिहिला आहे की काय असे वाटले असते. बरे, असे लेख समोर आल्याने तुमची आमची जी.ए.भक्ती प्रेम आदर आजही तसूभरही कमी झालेले नसल्याने लेखातील अनाठायी वाटणार्‍या माहितीची आपण कशाला तमा बाळगू ? शिवाय ज्यानी जी.ए. नव्याने वाचायचे आहे, ती मंडळी दळवींचा अमुकतमुक एक लेख होता, म्हणून जीए वाचायला नको म्हणत असतील तर मग ते त्यांचे दुर्दैव.

५. 'जीएंचे सुटलेले पोट' यावर दळवींनी तीन वाक्ये लिहिली आहेत. पोट पुढे काढून, पोट डुलवित असे लिहीण्याचे प्रयोजन आणि औचित्य काय?
~ मूळ प्रसंग असा आहे "....आम्ही चहाफराळ घेतला आणि जीएंच्या प्रख्यात क्लबवर गेलो. मोठमोठ्या खोल्यांचा जुनाट क्लब. पत्ते खेळणारे जुनाट लोक. जीए त्या दिवशी खेळले नाहीत. इकडेतिकडे जाऊन ते काहीतरी धावपळ करीत होते. ते माझ्यासाठी बीअरची व्यवस्था करीत होते. पण मी ती नको म्हनताच आम्ही फिरायला बाहेर पडलो. गप्पा मार्त फिरलो. त्या संध्याकाळी आम्ही खूप गप्पा मारल्या. त्या काळात जीएंचे पोट काहीसे सुटलेले होते आणि ते पुढे काढून रिटायर्ड माणसासारखे ते चालत होते....मग आम्ही जोडबस घेऊन हुबळीला आलो. तिथे हॉटेलमध्ये मांसाहारी जेवण जेवलो....मग पुन्हा गप्पा...." इ.इ.

या ठिकाणी एका संध्याकाळचे वर्णन आहे, दोन मित्रांच्या भटकंतीचे. आणि त्या निमित्ताने लेखक मित्र दुसर्‍या मित्राचेही त्यानिमित्ताने वर्णन करीत आहे. जी.एं.ची चाल रिटायर्ड माणसासारखी होती...पोट काहीसे सुटलेले होते.....अशा धर्तीचे वर्णन ही साहित्यिक कळा आहे, अन् त्यात काय वावगे वा विचित्र आहे ? आज आपण त्यांच्या काहीशा सुटलेल्या पोटाबद्दल दळवीनी लिहायला नको होते असे म्हटले, तर उद्या एखाद्याने इथे ऐसी अक्षरेवर 'ब्राह्मण असूनही जी.ए. मांसाहार करीत असत हे दळवीनी लिहायला नको होते...' असे मत मांडले तर तेही स्वीकारावे का ? कोण कसा आहे, काय आहे ? याहीपेक्षा आपण त्याला ज्या कॅनव्हासवरून त्याचे रंग जोखतो ते महत्वाचे, अन्य गोष्टी दुय्यमच. रंगाच्या उदाहरणावरून आठवले..... जगप्रसिद्ध चित्रकार रेम्ब्रा हा एका चक्कीवाल्याचा मुलगा होता. त्याच्यावर प्रेम करणार्‍यांपैकी कुणी त्याचा तसा उल्लेख केला तर त्यात रेम्ब्राच्या महतेला कसलीही न्यूनता येत नाही.

६. दळवींनी जीएंच्या काहीशा गूढ आणि वलयांकित व्यक्तीमत्त्वाची 'भांडेफोड' करण्यासाठी हा लेख लिहीला असावा की काय?- अशी शंका येते.
~ नाही, विसुनाना.....ही शक्यता मनीही आणू नये असे मी तरी म्हणेन. दळवीसारखा वाचकांची आणि जी.ए.प्रेमींची नस ओळखणारा माणूस, आपल्या लिखाणामुळे त्यांच्यातील जी.ए.प्रतिमा भंग पावेल असे मनात मांडे कधीच खाणार नाही. त्याची त्याना गरजही नव्हती. जी.ए. काही दळवीच्या साहित्यिक वाटचालीतील शत्रू नव्हते अ‍ॅण्ड व्हाईसव्हर्सा. "कॉलिंग अ स्पेड अ स्पेड" अशा भूमिकेतून लिहिलेला तो एक लेख इतकेच त्याचे महत्व.

शेवटी-
काजळमाया एपिसोडवरून काहीनी जी.एं.च्यावर निशाणेबाजी केली होती असे तुम्ही म्हटले आहे....विशेषतः मिशावाले नेमबाज....त्याविषयी खूप लिहावे लागेल, ते केव्हातरी स्वतंत्र लेखात घेऊ या....इथे ते अस्थानी होईल.

जीए 'अप्रामाणिक' होते असे कोणी समजू लागले तर ते मात्र दुर्दैवी ठरेल ~ रीलॅक्स, असे कुणीच कधीच समजणार नाहीत, तितकी जी.ए.कुलकर्णी नावाची जादू आजही आपल्या रोमारोमात भिनलेली आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. अशोक पाटील सर, सविस्तर उत्तराबद्दल आभारी आहे. मला दळवींचा लेख वाचून जे वाटले ते मी लिहिले. असो.
या चर्चेमुळे बरीच माहिती मिळाली आणि मतेही कळू शकली.

होते काय, की दळवींचा हा लेख वाचून (माझ्यासारख्या) जीए चाहत्याचा दळवींबाबत एकांगी समज होऊ शकतो आणि 'जीए' न वाचलेल्या-न जाणणार्‍या माणसाचा जीएंबद्दल. त्या लेखात झालेल्या उल्लेखांच्या इतर बाजू योग्य माहितीसह स्पष्ट व्हायला हव्या होत्या. (उदा. आता 'ओके' या नावाचेच पहा ना!)
या दोन मित्रांची जीएंच्या आयुष्याच्या शेवटी (जवळजवळ दोन वर्षे पत्राने अथवा प्रत्यक्ष) भेट न होण्याच्या माझ्या शंकेबद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः ही मतमतांतरे वाचुन कितीही रोखायचे म्हटले तरी 'आहे मनोहर तरी' नंतर उठलेल्या धुरळ्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
मात्र ते पुस्तक सुनीताबाईंनी पुलं असतानाच नव्हे तर त्यांच्या (त्यांनी केलेल्या) प्रशंसेसहीत आणले होते हा भेद महत्त्वाचा वाटतो.

नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला. चर्चा फारच आवडली. रावसाहेब व श्री. पाटील यांना विशेष धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाला काही कारण नाही. या वेळी झालेली अभ्यासू चर्चा (विशेषतः श्री. पाटील यांचा त्यातला सहभाग) आणि सदस्यांनी दाखवलेला संयम याचे स्मरण झाले आणि हा लेख पुन्हा वर यावा म्हणून हा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लेख, अभ्यासू प्रतिक्रिया, जी. ए. आणि दळवींबद्दलचा आदर, या सर्व गोष्टींमुळे, पुन्हा हे वाचायला फार आनंद वाटला.
जुन्या प्रतिसादात राहून गेलेली एक बाब नोंदवतो. ओकेंचा आणि माझ्या वडिलांचा परिचय असल्यामुळे, त्यांच्या अंधेरीतल्या घरी अनेकदा गेलो आहे. त्यांचे नांव 'ओके' असेच होते हे नक्की. त्यांची ती पेन्सिलने केलेली रेखाचित्रे अद्वितीय होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0