डॉक्टर कापरेकर

"ओ ठाकरे! याला चार मरायच्या गोळ्या द्या"
असं प्रिस्क्रिप्शन खणखणीत आवाजात आपल्या कंपाऊंडरना देणारा डॉक्टर बहुदा कापरेकरांनंतर कोणी होईलसं वाटत नाही. दहिसरमधे तसे अनेक डॉक्टर होते मात्र या डॉक्टरांचे आणि आमचे ऋणानुबंध आजोबांच्या काळापासूनचे. मी अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे जात असेनच. त्यामुळे त्यांना प्रथम कधी पाहिलं वगैरे प्रश्न या इसमाच्या बाबतीत गैरलागू आहेत. जितके माझे आई, वडील, आजी किंवा इतर कुटुंबीय माझ्या आयुष्यात जन्मापासून 'होते' तितकेच आमचे हे डॉक्टरही जन्मापासून 'होते'.

मी लहान असतानाचे डॉक्टर मला आठवताहेत ते साठीला आलेले. उंच, शिडशिडीत, एकेकाळी गोरे असतील असा भास देणारा रापलेला रंग, तजेलदार बोलके डोळे आणि अव्याहत चालू असलेले तोंड. दहिसरच्या एका जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या ब्लॉकमधे त्यांनी आपला दवाखाना टाकला होता. अख्ख्या गावात एक विचित्र डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. तसे ते होतेही विचित्र - विक्षिप्त! "पेशंट्स हे औषधांपेक्षा बोलण्याने बरे होतात" असा त्यांचा समज असावा बहुदा. कारण त्यांच्या दवाखान्यात लोक इलाजापेक्षा बोलायलाच जास्त येत. त्यांच्याकडे गेलो आहे आणि त्यांच्या केबिनमधून फक्त औषधांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन ५ मिनिटात बाहेर आलो आहे असे कधी झालेच नाही.

त्यांच्याकडे औषधाला जायचे म्हणजे चांगला तास दीड तास वेगळा काढून जायचे. असाच एकदा काहीतरी शारीरिक तक्रार घेऊन त्यांच्याकडे सकाळी गेलो होतो. अपेक्षेप्रमाणे बाहेर वेटिंग रूममध्ये दोन तीन अगदी फाटके पेशंट्स बसले होते. असे अती गरीब वर्गात येणारे अनेक पेशंट्स तिथे असत. ते कुठे राहतात, काय करतात वगैरेची कल्पना असणं शक्यच नव्हतं पण ही 'असली' लोकं म्युनिसिपालिटीत का जात नाही कोणास ठाऊक असे त्यावेळी वाटायचे. तर त्यांचे नंबर येऊन ते लगेच निघून गेले. मी आत गेलो. त्याकाळी कितीही आजारी असलो तरी मुलाला एकटं डॉक्टरांकडे पाठवण्यात गैर आहे (त्याला काही कळणार नाही वगैरे वगैरे) असं मला, माझ्या पालकांना किंवा डॉक्टरांना कोणालाही वाटत नव्हतं. आत येताच
"ये! काय रे गॅदरिंग कधी तुमचं?"
"पुढच्या महिन्यात आहे!"हो का! मग तू काय करणार आहेस?"
"एका नाटकात आहे. बाकावरचा तिसरा मुलगा झालोय!"
डॉक्टरांना नाटक कोणतं आहे वगैरे माहीत आहे -नाही वगैरे प्रश्न त्याकाळी पडत नसत. डॉक्टर हे सर्वज्ञानी आहेत असा समज असावा
"बरं! बाकी स्पर्धा नाहीत का?"
"आहेत ना! वक्तृत्त्व स्पर्धा आहे. मात्र विषयच ठरत नाहीये."
मग आमची प्रत्येक विषयावर चर्चा व्हायची. शेवटी डॉक्टरांनी पसंत केलेला विषय मलाही अर्थातच पसंत असे. मग
"जा! संध्याकाळी ये ८ नंतर तुझ्या भाषणासाठी टिपणं देतो"
मी निघून यायचो. परत निघताना जर आठवलं तर काय झालंय ते सांगितलं जाई अन्यथा वेगळ्याच विचारांत घरी परत.
घरी कळलं की मी औषध न आणताच आलो आहे की मग मला वेंधळा ठरवून रात्री वडील माझ्यासोबत यायचे. त्यांचा मुख्य उद्देश असायचा चांगल्या तासभर गप्पा हाणणे. मग बाबांचे आणि डॉक्टरांचे महागाई, राजकारण ते स्थानिक -घरगुती विषयापर्यंत असंख्य विषयांवर चर्चा-गप्पा होत. बरं तिथे फक्त आम्हीच तिघे नसू, अश्या गप्पिष्टांचा अड्डा तिथे जमे. बाळ ठाकर्‍यांपासून ते इंदिरा गांधींपर्यंत अनेकांची तिथे 'अक्कल' निघे. त्याच बरोबर माझ्या भाषणालाही डॉक्टर विसरलेले नसत. डॉक्टरांचे वाचन इतके चतुरस्र असल्याची जाणीव तेव्हा झाली नाही मात्र आता होते. अनेक उत्तमोत्तम व्यासंगी मुद्द्यांनी भरल्यावर भाषण उत्तम असायचेच आणि मग मी जिंकायचोच. आता त्या वक्तृत्त्व स्पर्धांच्या सर्टिफिक्टांकडे पाहिले की त्यामागचे कापरेकर डोळ्यांपुढे उभे राहतात.

गप्पा डॉक्टरांना आवडत असल्या तरीही एक डॉक्टर म्हणून ते तितकेच निष्णात होते. त्यांनी एखादी टेस्ट करायला सांगितली म्हणजे ती नितांत गरजेची आहे (आणि पॉसिटिव्ह येण्याची खात्रीच) असे समजावे. अन्यथा कोणत्याही टेस्ट, भरमसाठ औषधांचा भडिमार, इंजेक्शनं याला टाळून मोजक्या परंतू परिणामकारक औषधांनी त्यांनी अनेकांना बरे केले आहे. कापरेकरांनी दिलेल्या ३ दिवसांचे औषधही बहुतेकदा वाया जायचे. पहिल्या दिवसाच्या ३ डोसातच बर्‍याचदा ठीक वाटायचे.
डॉक्टरांना परीक्षा असली तरी धंदा करणे मात्र त्यांना जमले नाही. आम्ही लक्षात ठेवून पैसे विचारायचो. तेव्हा ते ५-१० रुपये घ्यायचे. परिचितांपैकी कित्येक 'श्रीमंत' (असणार्‍या / म्हणवणार्‍या) पेशंट्सनी त्यांनी न मागितल्याने पैसे न दिल्याचं स्वतः बघितलं आहे.

थोडा मोठा झालो होतो, कॉलेजात जाऊ लागलो होतो तेव्हाचा प्रसंग आठवतो.
"डॉक्टर, उद्या घरी येऊ का तुमच्या? भाषणासाठी थोडे मुद्दे हवे होते."
"अरे नको, पाड्यावर जातोय"
"पाड्यावर? कुठल्या"
तेव्हा मला कळलं की डॉक्टर गेले कित्येक वर्षे वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर मोफत उपचारांसाठी जात असत.
"मी पण येऊ?"
"तू काय करणार?"
"काही नाही. नुसतं बघायचंय"
"थांब बघतो गाडीत जागा आहे का?"
चार डॉक्टर मिळून गाडी करून हा प्रकल्प राबवायचे. पाचवी जागा रिकामी असल्याने एकदा जायला मिळालं.
ठाणे जिल्ह्यातल्या एका पाड्यापासून २-३ किमी वर गाडी थांबली. पुढे चालत गेल्यावर मग एक ओढा पार करून आम्ही त्या पाड्यात पोचलो.
तिथे रोग्यांना झालेले विविध आजार, जखमा वगैरे बघवत नव्हतं. डॉक्टर मात्र शांतपणे एकेक पेशंट तपासत होते.
आता फारसं लक्षात नाही मात्र तो पाडा, ती तपासणी यापेक्षा त्या आदिवासी बांधवांचे डॉक्टरांकडे कृतज्ञतेने बघणार्‍या डोळ्यांनीच मनात घर केले आहे.

आता, अशी 'जनहितार्थाय' असणार्‍या व्यक्तीचं कौटुंबिक आयुष्य जितकं सुस्थिर असेल तितकंच होतं. घरी कधीतरी येणार्‍या पैशात डॉक्टरांच्या पत्नीने कसाबसा संसार केला. तशातच आम्हाला 'पंख फुटले'. आम्रिकेतून पुन्हा येईपर्यंत डॉक्टर पुण्याला गेल्याचं कळलं. आमच्यासाठी मोठा तोटा होता. आजतागायत आम्हाला 'एका फटक्यात बरं करेल' असा डॉक्टर मिळालेला नाही. मात्र डॉक्टर दवाखाना बंद करून गेले मात्र कुठे गेले कुठे राहताहेत काहीच पत्ता नव्हता.

दोन एक महिन्यांपूर्वी ठाकरे (कंपाउंडर) भेटले. तेही बरेच 'पिकले' होते. त्यांनी कापरेकरांचा पत्ता शोधला होता. ते आजारी आहेत असंही म्हणाले. दोनेक आठवड्यांपूर्वी मी, माझे वडील, आई, आत्या असा लवाजमा त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या घरात शिरलो आणि थबकलो. घराला घरपण सोडा, जत्रा पांगल्यानंतरचं पोरकेपण आलं होतं. आणि त्याहून धक्का म्हणजे सतत हसतमुख असणार्‍या डॉक्टरांचा सापळा झाला होता, वाचा हरवली होती, बोटे वाकडी झाली होती, भोवतालची समज नाहिशी झाली होती. त्यांच्या पत्नी सांगत होत्या
"पुण्यात आल्यापासून हवा त्यांना मानवलीच नाहीये. तिथलं घर विकून आलो त्यामुळे पुन्हा तिथे परतायला यांचा नकार. बरं इथे कुठे फिरायचं तर वाहन हवं आम्हाला ते येत नाही, रिक्षा परवडत नाही, बस मध्ये गर्दीमुळे चढता येत नाही. डॉक्टरांकडे जायचं तर शेजार्‍यांच्या मागे लागावं लागतं. बरं शेजारही फारसा चांगला नाही. मुलगी येते कधितरी.." वगैरे वगैरे
फारसे ऐकवले नाही. थोडे पैसे द्यावेत असे वाटले, दिले आणि त्यांनीही काही न बोलता घेतले. डोळ्यात पाणी तरारले होते. तिथे थांबवेना. मी येतो म्हणून तडक बाहेर पडलो. अश्या व्यासंगी, हुशार माणसावर ही पाळी आलेली बघवतही नव्हती. खालीच देऊळ दिसलं. नकळत "त्यांना सोडव रे बाबा यातून" अशी विनंती केली गेली

परवाच कळलं की कापरेकर गेले. हे होणार माहीत असूनही गलबललं.. आत खोलवर
खरंतर कोण कुठचे, शिक्षणाने व्यवसायाने डॉक्टर, उत्तम निष्णात व्यासंगी डॉक्टर. मनात असतं तर मान मरातब पैसा सारं काही मिळवू शकले असते. लोकांची सेवा करत राहिले. मात्र शेवटी त्यांच्याकडे पाहायलाही कोणी नव्हतं याची सर्वाधिक खंत वाटते.

गेले काही दिवस असंच काहीसं सतत डोक्यात घुमतं आहे.. राहवलं नाही म्हणून लिहून काढलं.. असो...

field_vote: 
3.857145
Your rating: None Average: 3.9 (14 votes)

प्रतिक्रिया

अतिशय प्रभावी व्यक्तीचित्रण.

..आजच्या तारखेस, याच देशात, याच जन्मी माझ्याच डोळ्यांनी पुन्हा एकदा कुणीतरी डॉक्टरला चांगलं स्वतःहून म्हटलेलं वाचून.
खरंच.
थोडा तिरसट प्रतिसाद वाटेल. पण या निमित्ताने बरेच विचार मनात दाटून आलेत. सध्या जागा राखून ठेवली असे म्हणून थांबतो. थोडी ओपीडी बाकी आहे अजून..

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आजच्या तारखेस, याच देशात, याच जन्मी माझ्याच डोळ्यांनी पुन्हा एकदा कुणीतरी डॉक्टरला चांगलं स्वतःहून म्हटलेलं वाचून.
खरंच.

अहो ते आजकी तारीखमें गये जमानेके डॉक्टराबद्दल बोलत आहेत.आजच्या डॉक्टरबद्दल चांगलं बोलत असतील तर गोष्ट वेगळी.

लेखाबद्दंल माझं मत-कुठल्याही व्यावसायिकाची,कलाकाराची आणि त्याच्या कुटुंबियांची अवस्था व्यवहारज्ञानाअभावी अशी होऊ नये.

जागा राखून ठेवलेल्या प्रतिसादास प्रतिसाद देऊन माझी राखीव जागा वापरायचा रस्ता बंद केलास ना Sad

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

छान लेख. मनातली तगमग लिखाणात जाणवते आहे. आमच्या डॉक्टरांचा मुंबईतल्या रेल्वे बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. अशा सद्कर्मी लोकांचा अंत बहुदा असाच दुर्दैवी झालेला पाहिला आहे. फार वाईट वाटतं.

अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरं
सदा लोकहिते युक्ता: रत्नदीपा: इवोत्तमा:

हा श्लोक आठवला. हे रत्नदीप आयुष्यभर देत राहतील निरपेक्ष भावनेने पण शेवट कुठेतरी धुळीत, अडगळीतच. Sad

अत्यंत प्रभावी व्यक्तीचित्रण

शेवटच्या दिवसातली डाँक्टरांची स्थिती मन हेलावून गेली
वैद्यकीय क्षेत्राचे झपाट्याने व्यवसायिकीकरण होत असताना अशा धन्वतरीची खऱ्‍या अर्थाने गरज भासते

.

व्यक्तिचित्रण भावस्पर्शी झाले आहे. पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर चितळे नावाचे डेंटिस्टही भारी विक्षिप्त आहेत. द. रा. कापरेकर हे गणितीही नावसाधर्म्यामुळे आठवून गेले.

हेचम्हणतो. उत्तम लिखाण.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आवडावे, भारावून जावे असे व्यक्तिचित्रण. शेवट भकास करतो.

"व्यक्ती आणि वल्ली"तील प्रसिद्ध व्यक्तिचित्रांना हे लेखन शैलीद्वारा सलाम करते. (उदा : पहिल्या दोन वाक्यांत उत्सवमूर्तीचे एक "खणखणीत" वाक्य.) पण लेखक लिहीत जातो, तसे लेखन यांत्रिक साच्यातून मुक्त होऊ बघते. शेवटचा परिच्छेद अगदी स्वतंत्र मांडणीचा आहे.

हे परंपरा+नाविन्य चोखळणारे लेखन मराठी संकेतस्थळावर वाचून विशेष आनंद वाटला.

अत्यंत सुरेख व्यक्तिचित्रण. अर्थात ऋषिकेश यांच्यासारख्या उत्तम लेखकाकडून हे अपेक्षितच होते. चांगली माणसे व्यवहारवादी नसल्याचा अनुभव बर्‍याच ठिकाणी येतो त्याची परिणती बहुतेक अशीच दुर्दैवी होते.

------------------------
घणघणतो घंटानाद

चांगला लेख.

अश्या व्यक्तींची अशी दुर्दैवी अखेर होणे हे खेदजनक.

चांगला लेख.

अश्या व्यक्तींची अशी दुर्दैवी अखेर होणे हे खेदजनक.

चांगला लेख.

अश्या व्यक्तींची अशी दुर्दैवी अखेर होणे हे खेदजनक.

डॉ.कापरेकर यांच्यासारख्या सेवाभावी वृत्तीने जगणार्‍या डॉक्टरांची आजच्या व्यवहारी जगात अगदी बोटावर मोजण्याइतपत संख्या राहिली असेल. एखाद्या साधू आणि संताने केलेल्या कार्यापेक्षा वैद्यकिय क्षेत्रात राहून त्या वृत्तीने कार्य केलेल्या कापरेकर यांच्यासारख्या व्यक्तीचे कार्य मोठे मानले जावे कारण त्यानी वैद्यकिय शस्त्रापेक्षाही शब्दांनी कित्येक रुग्णांना दिलासा दिला आहे असे लेखक ऋषिकेश यांचे त्या संदर्भातील अनुभव सांगतो.

पण जीवनाच्या शेवटी त्याना आलेले दैन्य वाचकाच्या डोळ्याचा कडा पाणावून जातात. व्यवहारी जगाला अशा सहृदयी वैद्याचे काय झाले असेल याची फिकीर नसेल तर मग धर्मकर्मकांड करायचेच असेल तर "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे" हे सांभाळूनच मग निर्लेपमनाने समाजसेवा करावी असे म्हणेन. जगाला काय ? राबतोय आणि देतोय फुकटचे तर घ्यायला काय बिघडते ? अशीच सर्वसाधारण सामाजिक वृत्ती असते. डॉ.कापरे़करांच्या कुटुंबियांनाही हा पडत्या काळातील उपेक्षेचा अनुभव आलेला आहे. पण तरीही ऋषिकेश कुटुंबियांसारखे काही मोजकेही लोक असतील/आहेत की ज्यानी डॉ.कापरेकरांचे सेवामूल्य ओळखले आहे.

चांगला स्मृतीलेख.

अशोक पाटील

क्लासिक..!

ह्या वरुन पुण्यातील डौ. घैसासान्ची आठवण झालि.ते पण असेच होते... खुप गप्पा मारायचे पेशन्ट बरोबर. मी फारसा नहि गेलो त्यान्च्याकडे पण माझ्या सासरेबुवान्चे ते फेवरिट होते.त्यान्चा खुन झाला.

काही व्यक्तिमत्वे डोक्यात राहतात कारण लहानपणापासून त्यांच्याशी आपला सहवास होतो. कापरेकरांचे व्यक्तिचित्र आवडले.

लेख आवडला. ज्या डॉक्टरांकडे आपण लहानपणापासून जात असतो, ज्यांनी आपली अनेक लहान-मोठी दुखणी बरी केलेली असतात आणि ज्यांच्याशिवाय आपल्याला गुण येत नाही अश्या डॉक्टरांकरता आपल्या आयुष्यात एक खास जागा असते.

डॉ. कापरेकरांसारख्या सेवाभावी व्यक्तीचा असा शेवट दु:खद आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

लेख वाचून काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचलं नाही. डॉ. कापरेकरांना भेटायचा कधी योग आला नसला तरी त्यांच्याबद्दल ऐकून होतो. त्यांचा मुलगाही आमच्या बॅचला होता. त्यांचे अखेरचे दिवस इतक्या हलाखीत गेले हे वाचून कळवळायला झालं.

अतिशय सुरेख, भावस्पर्शी व्यक्तिचित्रण.

थोडे पैसे द्यावेत असे वाटले, दिले आणि त्यांनीही काही न बोलता घेतले. डोळ्यात पाणी तरारले होते

वाचताना वृद्ध डॉक्टर डोळ्यापुढे उभे राहिले.

बरं लिहितोस रे...
हे मुद्दाम असं इतकंच लिहिलं. कारण... तू सारखा लिहित नाहीस. Wink

कापरेकरांबद्दल वाचल्यानंतर लेख आवडला असे म्हणवत नाही.. वृद्धापकाळ फार दुर्दैवी वाट्याला आला म्हणायचा.

अत्यंत सरळसाध्या शब्दांत प्रभावी व्यक्तिचित्रण. त्यांचा अघळपघळ स्वभाव, लकाकणारे डोळे, आणि धंद्यापेक्षा माणसांना महत्त्व देण्याची वृत्ती डोळ्यासमोर उभी राहिली. या वृत्तीमुळेच त्यांना हलाखी आली हे दुर्दैव.

घराला घरपण सोडा, जत्रा पांगल्यानंतरचं पोरकेपण आलं होतं.

अशा वाक्यांनी लेख अतिशय वाचनीय झाला आहे.

डॉक्टरांचा शेवट दुर्दैवी वाटला पण आजच्या काळात हे चालतंच. पण डॉक्टरांची मुलं तेव्हा काय करत होती? त्याना मुलगा होता आणि तो शिकत होता, हे नंदनच्या प्रतिसादावरून कळलंच.

सहज आणि ओघवत्या लिखाणामुळे व्यक्तिचित्रण प्रभावी झाले.

@पैसा: मला त्यांच्या मुलाच्या सद्यस्थितीबद्दल माहित नाही. आईने त्याच्याबद्दल विचारले तेव्हा श्रीमती कापरेकरांनी विषय बदलला. पुन्हा खोदून विचारले नाही.

असो. लेख लिहायला सुरवात करताना बरेच प्रसंग डोक्यात होते, त्यांनी माझी दहावीची वाचवलेली परिक्षा किंवा माझ्या आजीच्या मृतूपूर्वी दिलेला घरीच ठेवायचा अचुक सल्ला वगैरे पण लिहितेवळी सगळं गळत गेलं.

सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्दल अनेक आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अस्वस्थ करणारं आहे.

ऋ, डॉक्टर आवडले पण वर सातीने म्हटल्याप्रमाणे चांगली माणसे व्यवहारवादी नसल्यामुळे त्यांचा होणारा दुर्दैवी अंत जास्तच अस्वस्थ करतो,
स्वाती

फारच छान व्यक्तिचित्रण रेखाटलय.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अप्रतिम लेखन. आवडलं.

त्यांची शेवटची अवस्था अस्वस्थ करणारी आहे. अशावेळेस लोकं विसरुन जातात. Sad

वाईट आठवण, पण उत्तम पद्धतीने मांडलेली.

बिपिन कार्यकर्ते

लेख फारच आवडला.

लेख आवडला. त्या निमित्ताने आमचे जुनेजाणते फॅमिली डॉक्टर कै. रवींद्र धुमाळे यांची आठवण झाली. त्यांची कोणी फसवणूक केली नाही, पण ते अकाली अचानक हार्ट अ‍ॅटॅकने वारले. ते गेल्याचं कळल्यावर असंच काहीसं मनात आलं होतं.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

लेख आवडला

व्यक्तीचित्रण आवडले.
आमचे लहानपणीचे नेने डॉक्टर आठवले. त्यांनी दवाखाना मुलाकडे सोपवला आणि आम्ही आजारी पडणं बंद केलं.

===
Amazing Amy (◣_◢)

हृदयस्पर्शी लिहिलत. हल्लिच्या जमान्यात सामाजिक बांधिलकी कटाक्षाने जपणारे डॉक्टर विरळेच. गिरगावातील मुळगावकर डॉक्टरांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीत. आधी सुखटणकर, मग त्यांचे जावई डॉ. प्रताप मुळगांवकर आणि त्यांचा मुलगा शशांक मुळगावकर यांनी पिढ्यान पिढ्या गिरगावतल्या (विशेषतः सदाशिवलेन भाजीगल्लीच्या आसपासच्या) सर्व वर्गातील रुग्णांची अहो-रात्र (अगदी अपरात्री सुद्धा तत्परतेने येऊन) सेवा केलेय/ करत आहेत.
लेख आवडलाच!

- प्रशांत उपासनी

भावस्पर्शी!

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

छान लिहिलंय...

र च्या क ने: बोरिवली जवळचे दहिसर का?