एकाकीपणाचे बळी!

इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानातील अभूतपूर्व प्रगतीमुळे एकविसाव्या शतकातील - इतर व्यवस्थापनेप्रमाणे - कार्यालयीन व्यवस्थापनेत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रत्येक गोष्टीला ऑनलाइनची जोड दिली जात आहे. प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेल्या अत्याधुनिक सोई - सुविधांच्या किंमती कोसळत असल्यामुळे व सामान्यांनासुद्धा परवडतील अशा किंमतीत मिळू लागल्यामुळे ई-मेल, व्हाइस मेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इंटरनेट, मोबाइल फोन, स्मार्ट फोन, सॅटलाइट फोन, टॅब्लेट पीसी, आयपॅड, इत्यादी सुविधा अनेक छोट्या मोठ्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोचत आहेत. या सुविधामुळे कार्यालयांचे स्वरूपच पूर्णपणे बदलत आहे. पेपरलेस्स कार्यालयाची संकल्पना राबवली जात आहे. फाइल्सचे ओझे कमी करण्याचे प्रयत्न चालले आहेत. कदाचित काही दिवसात फाइल्स नामशेषसुद्धा होतील. कार्यालयास येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ, त्यासाठी द्यावे लागणारे श्रम, जागा - इमारत व इतर मूलभूत सुविधा, प्रशासन व्यवस्था या सर्वांना काटछाट देऊन एखादी सर्वस्वी वेगळी व्यवस्था निर्माण करणे शक्य झाले आहे. संगणकातील माहितीच्या आधारे निर्णय घेणे शक्य होणार आहे. निर्णयप्रक्रियेचे सुलभीकरण होत आहे. त्यात पारदर्शिकता आणणे शक्य होत आहे. ई-मेल, एसएमएस व मोबाइलद्वारे माहिती त्वरितपणे दुसऱ्या ठिकाणी पोचविणे सुलभ झालेले आहे.

आतापर्यंतच्या कार्यालयीन व्यवस्थापनेत एकाच ठिकाणी सर्व कर्मचारी वर्ग जमत असल्यामुळे एकमेकांची निदान तोंडओळख तरी होत होती. सुट्टीच्या वेळी गप्पा होत होत्या. एकमेकांची विचारपूस होत होती. मानवी संबंध जिव्हाळ्याचे वाटायचे. यानंतर या सर्व गोष्टी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.

येथून पुढे भासमान कार्यालयाची (virtual office) संकल्पना वास्तवात बदलणार आहे. या व्यवस्थेत सर्व प्रकारच्या कार्याची विभागणी वेगवेगळ्या प्रकल्पाच्या स्वरूपात असणार आहे. प्रकल्पासाठी योग्य कार्यकारी व्यवस्थापक नेमला जाईल. तिला/त्याला त्या प्रकल्पाची पूर्ण माहिती संगणकासारख्या सुविधाद्वारे वेळोवेळी दिली जाईल. प्रकल्पाचे अनेक टप्पे असतील. कामाच्या स्वरूपाप्रमाणे त्या त्या क्षेत्रातील विशेषज्ञांशी ई-मेल, मोबाइलद्वारे संपर्कात राहून कामाविषयीची सर्व माहिती संगणकावर गोळा केलेली असेल. शंकांचे निरसन केले जाईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होईल. फील्डवर्कसाठी कंत्राट दिले जातील. या सर्व गोष्टी सर्व संबंधित व्यक्ती घरबसल्या लॅपटॉप व इतर सुविधा वापरून सहजपणे करू शकतील.

प्रत्यक्षात कार्यालयाची इमारत, निर्दिष्ट वेळा, मीटिंग्स, वगैरे काहीही नसतील. कारण यातील प्रत्येक व्यक्तीची जागा व वायफाय जोडलेले लॅपटॉप म्हणजेच कार्यालयीन टेबल आणि व्यक्तीच्या जागेला व्यापणारा अवकाश हेच कार्यालय असेल. संवाद साधण्याच्या आधुनिक संपर्कसुविधा उपलब्ध असल्यामुळे यातील व्यक्ती एकमेकापासूल शेकडो कि.मी. दूर असल्यातरी काहीही बिघडणार नाही. कुठल्याही व्यक्तीची प्रत्यक्ष भेट न घेता समोरासमोर संवाद न करता प्रकल्पांची कार्यवाही केली जाईल. प्रकल्पापुरतेच काही व्यक्तींशी संबंध, काही काळ, येत असल्यामुळे कुणाशीही भावनिक गुंतवणुकीची गरज भासणार नाही. प्रत्येक वेळी नवीन प्रकल्प/काम, नवीन व्यवस्थापन, अशी अवस्था यात आहे. संपर्कात असलेली व्यक्ती पुरुष की स्त्री, वयस्कर की तरुण, अनुभवी की नवीन इत्यादी मुद्दे गौण ठरणार आहेत.

अशाप्रकारची भासमान कार्यालये आताच प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांचे व्यवस्थापन अशाच प्रकारच्या भासमान कार्यालयातून होत आहे. कंपन्यातील कार्यकारी व्यवस्थापकांना सर्व इलेक्ट्रॉनिक्स सुविधा पुरविल्या जात असून त्यांच्या कामाचे स्वरूप भासमान कार्यालयाच्या संकल्पनेनुसार केले जात आहे. फाइल्सची झंझट नाही. मीटिंग्सची गडबड नाही. टार्गेट डेटच्या बंधनाव्यतिरिक्त ऑफिसला येण्या -जाण्याच्या वेळेचे वा रजा - सुट्टी इत्यादींचे बंधन नाही. काही मोजक्या सहकाऱ्याव्यितरिक्त कुणाचाही संबंध नाही. मोबाइल्ससुद्धा सायलेंट मोडवर असल्यामुळे सारे कसे शांत, शांत!

परंतु घी देखा लेकिन बडगा नही देखा याचा अनुभव यातील अनेकांना येत आहे. ई-मेल व मोबाइल फोन या सुविधांमुळे अनेक सक्षम व संवेदनशील अधिकाऱ्यांमध्ये एकाकीपणा वाढल्याचे जाणवत आहे. माणसांचा प्रत्यक्ष संबंध कमी होत असल्यामुळे स्वत:विषयी चीड निर्माण होत आहे. एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला महत्वाच्या बैठकीस बोलावले नसल्याचे लक्षात आल्यास मला का बोलविले नाही?, माझे काही चुकले का?अशा नाना कुशंका त्याच्या मनात घोळत असतात. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही तीच धास्ती असते. दोन्ही व्यक्ती कुढत असतात. शंका मनातल्या मनातच दाबल्या जातात.

या समस्येवर प्रत्यक्ष संवाद हाच एक उपाय होऊ शकतो. दोघेही अस्वस्थ आहेत. काळजीत आहेत. भावनिक अपराधातून स्वत:ला दोष न देता प्रत्यक्ष भेट घेणे हाच समस्या निवारणाचा मार्ग आहे. 'मानवी क्षणा'त दोन व्यक्ती काही काळ मानसिकरित्या समरस होण्यासाठी भौतिक अवकाश वाटून घेणे अभिप्रेत असते. आधुनिक संपर्कसुविधेमध्ये मानवी क्षणाला वाव नसतो. मानवी क्षणाच्या अभावात विनाश करणारी शक्ती दडली आहे, याची हळू हळू जाणीव होत आहे.

मानवी क्षणात व्यक्तींची प्रत्यक्ष उपस्थिती आणि त्यावेळची भावनिक व बौद्धिक एकाग्रता या दोन गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते. केवळ प्रत्यक्ष उपस्थिती किंवा केवळ एकाग्रता असून चालत नाही. तासन् तास विमानातून वा रेल्वेतून प्रवास करत असताना शेजारचा प्रवासी आपल्यासमोर उपस्थित असतो. यातून मानवी क्षणाला काही मदत मिळत नाही. तसेच फोनवरून संवाद साधताना संपूर्ण लक्ष केंद्रित केले जात असते. परंतु यातही मानवी क्षणाचा अभाव जाणवतो.

मानवी क्षण सफल होण्यासाठी दिवसातील थोडा वेळ खास यांच्यासाठीच राखून ठेवण्याची गरज आहे. टेबलावरील कागद पत्रे बाजूला सारून संगणक, लॅपटॉप, मोबाइल स्विच ऑफ करून कुठेही न हरवता, समोरच्या व्यक्तीशी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून, संवाद साधणे गरजेचे आहे. असे केल्यामुळे समोरची व्यक्ती भारावून जाते व योग्य प्रतिसाद देऊ लागते. प्रत्यक्ष संवादामुळे सर्जनशील, सकारात्मक परिणाम दिसू लागतात.

एड्वर्ड हालोवेल या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाचा या विषयावर हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू या द्वैमासिकात एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याच्या मते, दैनंदिन व्यवहारातून मानवी क्षण लोप पावत असल्यामुळे फार मोठ्या धोक्याला आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे. हालोवेलचे अनेक रुग्ण मोठमोठ्या कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी होते. बाहेरच्या जगाच्या दृष्टीने त्या सर्व यशाच्या शिखरावरील व्यक्तीच वाटतात. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात मानवी संबंधांच्या उणिवा प्रकर्षाने जाणवतात. हे सर्व एकाकीपणाचे बळी आहेत. त्यांची मनस्थिती गोंधळलेली आहे. कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरत आहेत. या मानसशास्त्रज्ञाच्या उपचारपद्धतीत मानवी क्षणांवर जास्त भर दिल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळतो हे लक्षात येऊ लागले.

या मानसशास्त्रज्ञांच्या अनेक रुग्णामध्ये प्रत्यक्ष मानवी संपर्क तुटल्यामुळे एका प्रकारची अव्यक्त भीती दडलेली होती. कार्यालयाच्या बदलत्या स्वरूपामुळे मानवी क्षणांना वाव मिळत नव्हता. सहोद्योगींचा इलेक्ट्रॉनिक्स संवाद माध्यमाच्या साधनांचा अती वापरामुळे व सर्वस्वी त्यांच्यावर विसंबून असल्यामुळे ही परिस्थती उद्भवत आहे असे हालोवेल यांना वाटते. या रुग्णांना त्यांचे अस्तित्व एका निर्जन बेटावरील अस्तित्वासारखे वाटत असावे. विश्वास गमावलेला आहे. कार्यालयासाठीचा वेळ जीव घेणारा वाटत आहे. मानवी क्षणांच्या अभावामुऴे परस्परावर अविश्वास, अनादर व असंतोष निर्माण होत आहेत. ही साखळी एकदा सुरु झाल्या सांसर्गिक रोगाप्रमाणे सर्वकडे पसरायला वेळ लागत नाही.

परंतु या इलेक्ट्रॉनिक्स सुविधा अजिबात नको असे म्हणण्यातही तथ्य नाही. या अत्याधुनिक सुविधामुळे कामाला गती मिळत आहे. निर्णयप्रक्रियाले कमीत कमी वेळ लागत आहे. ती सोपी होत आहे. जगातील कानाकोपऱ्यात असलेल्याशी संपर्क साधून माहिती मिळवता येते. सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते. जे जे काही उत्क्रृष्ट आहे त्याचा आपल्या कामात उपयोग करता येतो. रूटिन कामासाठी जास्त वेळ खर्च होत नाही. घरबसल्या अनेक गोष्टी करता येतात.

मात्र या सुविधांना उपयोगात आणत असताना मानवी क्षणांना आपण मुकत आहोत हे लक्षात घेतले जात नाही. हालोवेलच्या मते, अनेक मानसिक रुग्ण केवळ मानवी जिव्हाळ्याच्या अभावामुळेच रुग्णावस्थेत पोचलेले असतात. हे नेमके कशामुळे होत आहे, याचेही विश्लेषण हालोवेल यानी केले आहे.

मानवी क्षणांचा अभाव हा भावनिक स्वास्थ्य बिघडवू शकतो, याचे प्रत्यंतर बालसंगोपनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नेहमी येत असते. बालसंगोपनात केवळ आहार व कपडेलत्ते पुरेसे नसून वेळोवेळी उराशी कवटाळणे, कडेवर घेणे, लाड करणे, खेळविणे, त्यांच्याशी जास्तीत जास्त जवळीक साधणे, यावर भर दिला जातो. हे न झाल्यास त्या बालकाचा मेंदू व मज्जासंस्था यांचा नीटसा विकास होत नाही, असे तज्ञांचे मत आहे.

1974 मध्ये कॅलिफोर्निया येथील 4725 नागरिकांच्या एका सर्वेक्षणात त्यांची जीवनपद्धती व आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यात आली. या अभ्यासानुसार सामाजिकदृष्ट्या एकाकी जीवन जगत असलेल्या नागरिकामध्ये मृत्युचे प्रमाण इतरांपेक्षा तीन पट जास्त होते. 1997 मध्ये घेतलेल्या सीऍटलमधील सर्वेक्षणात तेथील रहिवाशांमध्ये एकाकी जीवन जगणाऱ्यापेक्षा इतरांच्या औषधोपचारावरील खर्च फार कमी होता. सामाजिक संबंधामुळे रोगप्रतिकारक शक्तीत लक्षणीय प्रमाणात वाढ होऊ शकते, असे एका अभ्यासांती कळले. तसेच पहिल्या सौम्य हृदयाघातानंतरच्या आयुष्यातील वाढीसाठी मानवी सलोखा जास्त गुणकारक ठरतो. मॅकआर्थर फौंडेशनतर्फे घेतलेल्या आयुर्मर्यादेतील वाढविषयक अभ्यासानुसार, व्यक्तीच्या सुखी जीवनासाठी दोन निकषांना प्राधान्य दिले पाहिजे. एक, मित्र व नातेवाइकांच्या भेटीगीठी व दुसरे, प्रत्येकांचा सामाजिक व कौटुंबिक मेळाव्यातील सहभाग. एका पाहणीनुसार, रोज चार - पाच तास इंटरनेटवर सर्फिंग करणाऱ्या व्यक्तीमध्ये मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची लक्षणं आढळली होती. इलेक्ट्रॉनिक्सचे विश्व कितीही थरारक व उपयोगी वाटत असले तरी ते मानवी संबंधांना पर्याय होऊ शकत नाही.

मानवी क्षण आपल्या आयुष्यातून लोप पावले तर वाईटात वाईट काय होऊ शकते? तज्ञाच्या मते अशी व्यक्ती संभ्रमावस्थेत जाण्याची शक्यता आहे. सामान्यपणे अशा व्यक्ती चिंताग्रस्त असतात. प्रत्यक्ष संवादात घडत असलेले शारीरिक हावभाव, देहबोली, ध्वनीतील चढउतार, यांचा अभाव इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून केलेल्या संवादात मोठ्या प्रमाणात जाणवतो. स्मायलीज देहबोलीची जागा घेऊ शकत नाहीत. संवेदनाशील व्यक्तींना या गोष्टी तीव्रतेना जाणवतात. एकाकीपणातून उद्भवलेल्या काळजीमुळे व्यक्तीला वास्तवतेचे भान रहात नाही. एकमेकाबद्दलच्या गैरसमजुतीत वाढ होऊ लागते. सहनशीलतेवर ताण पडू लागतो. आपल्या ऑफीसबद्दल, आपल्या सहकाऱ्याबद्दल, स्वतच्या क्षमतेबद्दल, स्वतच्या हेतूबद्दल नको त्या कुशंका घेतल्यामुळे मनस्वास्थ्य बिघडते.

मानवी क्षणाच्या अभावामुळे लोक फार विचित्रपणे वागतात. त्यांच्यातील हिंसक प्रवृत्ती उफाळून येते. कुठलाही मुलाहिजा न ठेवता एखाद्या तीक्ष्ण हत्यारासारखे की-बोर्ड, मोबाइल, इत्यादींचा वापर केला जातो. निरुपद्रवी दिसणारी व्यक्ती आक्रमक बनते.

मानवी क्षण मात्र अशा प्रसंगी नियंत्रकाचे काम करतात. काही कंपन्या भासमान कार्यालयाच्या संदर्भात जाणीवपूर्वक प्रयत्न करून मानवी क्षण वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. मीटिंग्स, कॉन्फरन्सेस इत्यादीत नियमितपणे भाग घेण्यास उत्तेजन देतात. 'हाय टेक' चे रूपांतर 'हाय टच' मध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे. यात संबंधित व्यक्तीचाही भरपूर फायदा होतो. जाणीवपूर्वक व्यूहरचना करत मानवी क्षण आणत राहिल्यास नि:सत्व व नीरस वाटू लागलेल्या कार्यालयीन कामकाजात जिवंतपणा आणणे शक्य आहे.

तंत्रज्ञानातील अभूतपूर्व प्रगतीमुळे विविध दरवाजे खुले झालेले आहेत. भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. कार्यालयातील टेबलापासून व 10 ते 5 या वेळेच्या विळख्यातून समाजाची सुटका होत आहे. आता माघार घेणे शक्य नाही. परंतु मानवी क्षणाशिवाय पुढचे पाऊल ठेवणे धोक्याचे आहे. मानवी क्षणांचा विचार न करता पुढे जात राहिल्यास फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. स्वत:वरील विश्वास द्विगुणित करण्यासाठी, उत्साह टिकविण्यासाठी, व माणूस म्हणून जगण्यासाठी मानवी क्षणांची उपयुक्तता वादातीत आहे, हे मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही.

संदर्भ

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मानवाची तंत्रज्ञानातील उत्तुंग प्रगती सहन न होणारे काही अभागी जीव असे (नसलेले) प्रश्न नेहमीच उपस्थित करत असतात.
आज प्रगत देशांमध्ये घरातली दोन माणसे समोरासमोर बसलेली असली तरी आपापल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवर किंवा iPadवर काहीतरी बघण्यात मग्न असतात. त्यांना मानवी क्षणांची एवढीच गरज असती तर असे झाले नसते. उलट तंत्रज्ञानाने माणसाच्या मर्यादित अवकाशाला एक खिडकी उघडून दिली आहे ज्यातून अनंत 'माहिती'चा महासागर त्याच्यासाठी खुला झाला आहे. त्यामुळे असा काही प्रश्न आहे यावरच मुळात माझा विश्वास नाही. शिवाय या प्रश्नाच्या समर्थनार्थ काहीही विदा दिलेला नाही, मग असा प्रश्न आहे यावर विश्वास तरी कसा ठेवायचा?
आणि समजा असा काही प्रश्न भविष्यात निर्माण झालाच तर तो सोडवण्यासाठी आणखी प्रगत तंत्रज्ञान येईल असा मला ठाम विश्वास वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3042390/

विदा प्रत्येकवेळेस उपयोगी असेलच असे नाही, तंत्रज्ञानाचे फायदे असले तर तोटे असणारच नाहीत हे गृहितक कशाला? तोटे आहेत ते मान्य करावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> शिवाय या प्रश्नाच्या समर्थनार्थ काहीही विदा दिलेला नाही. <<

वरील लेखाच्या शेवटी संदर्भवर क्लिक केल्यास कदाचित विदा मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेख पाहूनच मी ते म्हटले. त्यात काही केसेसबद्द्ल किश्श्यांवजा माहिती आहे पण सांख्यिकी विदा नाही. 'सरासरी' किती लोकांना असा प्रश्न येतो वगैरे असा काही 'शास्त्रीय' अभ्यास झालेला दिसत नाही. हे फक्त त्या मानसोपचारतज्ज्ञाचे अनुभव दिसताहेत. जोपर्यंत असा अभ्यास होत नाही तोवर या प्रश्नाला अस्तित्व आहे असे म्हणण्याचे धाडस मी तरी करणार नाही.
कामाच्या ताणतणावाबद्दल तंत्रज्ञानाच्या अतिवापराला जबाबदार धरणे ही त्याच्या विवेकबुद्धीतली मोठीच गफलत म्हणायची.
आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे असा प्रश्न भविष्यात समजा झालाच तर oxytocin, vasopressin, dopamine आणि serotonin या लेखात सांगितलेल्या हार्मोन्सची इंजेक्शने घेऊन तो सोडवता येईलच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुटुंब

मित्रमंडळी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0