'रंगीत'तीरी

"वाय वाय"? का मोमो? काय खाणार मॅडम तुम्ही?" माझ्या सहका-याने विचारलं.
मोमो मला माहिती आहेत आणि आवडतातही. दिल्लीत आल्यापासून तर ते ब-याचदा खाल्ले आहेत.
पण आज मला नको होते मोमो. काल दुपारी आणि काल संध्याकाळी असे दोन्ही वेळा मोमोच खाल्ले होते मी.
पण 'वाय वाय' म्हणजे काय? मी विचारलं आणि कळलं की वाय वाय म्हणजे एक प्रकारचे नूडल्स.

सिक्कीम राज्यातल्या नामची परिसरातल्या (दक्षिण सिक्कीम जिल्ह्यातल्या) सिक्कीप या गावात होते मी. सोबत स्थानिक पाच सहा सहकारी. सकाळी 'वाक' गावात डोंगर चढून-उतरून कॅलरीज ब-यापैकी खर्च झाल्या होत्या आणि मला चांगली भूक लागली होती. पण इथं 'वाय वाय' आणि मोमो असे दोनच पर्याय दिसत होते.

'वाय वाय' खाउन माझं पोट भरलं पण माझ्या सहका-यांची भूक भागली नव्हती. सूप, मोमो मागवण्याचा त्यांचा बेत ऐकून मी म्हटलं, "तुम्ही सावकाश पोटभर खा. मी तोवर बाहेर भटकते; काही फोटो काढते." त्यांना नेपाळी भाषेत बोलता येत नव्हतं आपापसात माझ्या उपस्थितीत - त्यामुळे त्यांनीही लगेच परवानगी दिली मला.

मी बाहेर आले तर डाव्या बाजूला मस्त नदी होती. मघा जाताना दिसली होती - तिचं नाव आहे 'रंगीत' नदी. तिस्ता नदी - जी सिक्कीमची जीवनदायिनी आहे - तिची ही एक उपनदी. तिस्ता नदीबद्दल स्वतंत्रपणे लिहायला हवं - पण ते आज नाही. नदीच्या पाण्यात किमान पाय तरी भिजवावेत असा माझा बेत होता. पण माझ्या लक्षात आलं की नदीचं पात्र एकदम खोल आहे आणि नदीत उतरायला वाटच नाही. शिवाय नजर पोचेल तिथवर कुणीही नदीच्या पात्रात - त्याच्या जवळपासही - नव्हत; आणि हे आजच नाही तर मागचे तीन दिवस. स्वाभाविक आहे म्हणा. नदी इतकी रोरावत धावते आहे की कुणाची हिंमत नसणार तिच्या जवळ जाण्याची. मीही तो विचार सोडून दिला.

डावीकडे एक पूल दिसला. सिक्कीममध्ये हे पूल वारंवार लक्ष वेधून घेतात. हे पूल नसतील त्या काळात अनेक गावांचा इतरांशी संपर्क तुटत असणार नक्कीच. हे पूल दिसतात जुने-पुराणे; कधी कोसळतील माहिती नाही असं त्यांच्याकडे पाहून वाटतं- पण आहेत ते भक्कम. अगदी भक्कम. सारी वाहतूक पेलणारे आणि लोकांना जोडणारे पूल!

मी त्या पुलाचा फोटो काढायला माझ्या कॅमे-याची जुळणी करत होते तेव्हा त्या दोघांना मी पाहिलं. पुलाच्या अगदी मध्यभागी ते दोघे गप्पा मारत उभे होते. माझ्या हातातला कॅमेरा पाहून आधी ते थोडे बिचकले होते पण आता वळून ते थेट माझ्याकडे पहात होते. मी घाई न करता त्यांचा दिशेने चालत गेले. आता ते अधिकच उत्सुकतेने माझ्याकडं पहात होते. हसावं की नाही असा संभ्रम त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. मी हसले.

"फोटो काढू तुमचा?" मी हिंदीत विचारलं. एकाने लगेच हसून परवानगी दिली आणि सज्जही झाला तो. दुसरा मात्र लगेच संशयाने म्हणाला, "नेपाळी नाही येत तुम्हाला बोलता?" त्यावर मी नकारार्थी मान हलवली. दुसरा विचारात पडला. पण पहिल्याला आता ही संधी गमवायची नव्हती. त्याने आपल्या मित्राला गप्प बसवलं.

फोटो काढला, तो दाखवला. दोघेही एकदम खूष झाले.
"एकटयाच आहात तुम्ही?" एकाने विचारलं.
"नाही, एकटी नाही. माझ्यासोबतचे लोक जेवताहेत. माझं झालं जेवण म्हणून फोटो काढायला आले मी." मी स्पष्टीकरण दिलं.
"हॉटेलात का जेवताय? तुमचं घर नाही इथं" आणखी एक प्रश्न.
"नाही, माझं घर नाही इथं" मी सांगितलं.
"मग कुठ आहे घर?" पुन्हा प्रश्न.
"दिल्लीत" - माझं उत्तर.
"हं.. म्हणून तुम्हाला नेपाळी येत नाही" समंजस प्रतिक्रिया.

"इथं कुणाकडं आलात?" पुन्हा प्रश्न.
मी ज्या कार्यालयात आले होते, ते हाताने दाखवलं.
"हं .. माहिती आहे मला ते ऑफिस. तिथल्या साहेबांकडे आला होतात का कामाला?" आणखी विचारणा.
"हो" माझं उत्तर.
"आता कुठं जाणार?"
"नामचीला" मी सांगितलं.
"ती जीप दिसतेय ती तुमची की त्यामागची पांढरी गाडी?" मुलांच निरीक्षण चांगलं होतं एकंदरित. मी सांगितली कोणती गाडी ती.

मग जरा मीही प्रश्न विचारायचं ठरवल.
दोन्ही पोरं लहानखुरी दिसत असली तरी पाचवीत शिकत होती. शाळा; नेपाळी भाषा; शाळेत मिळणारं जेवण; तिथले शिक्षक; होस्टेल आणि होस्टेलमध्ये राहणारी मुलं... याबाबत त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या माझ्या.

"आता इथं काय करताय तुम्ही?" मी विचारलं.
"पाणी पाहतोय नदीचं" त्यांच एकमुखी उत्तर.

मग नदीचं नाव 'रंगीत' आहे, तिच्या वरच्या बाजूला एक धरण आहे; दिवसा पाणी वाढतं आणि रात्री मात्र कमी होतं (कारण पाउस रात्री जास्त पडतो आणि दिवसा कमी) अशी बरीच माहिती त्यांनी पुरवली. पोहायला येत त्यांना पण या नदीत पावसाळ्यात कुणीच पोहत नाही हेही सांगितलं.

"मासे आहेत का नदीत?" माझा आपला उगाचच एक प्रश्न.
"आत्ता नसतात मासे. फुलांचा जसा सीझन असतो ना, तसा माशांचाही असतो सीझन - पाउस संपल्यावर येतात ते ..."त्याचं समजूतदार स्पष्टीकरण.

"तुमची गाडी निघाली बघा. पळा लवकर, नाहीतर तुम्हाला सोडून जातील ते लोक ..." माझी गाडीकडे पाठ असल्याने मला ती दिसत नव्हती पण या दोघांच लक्ष होत. गाडी काही मला सोडून जाणार नव्हती. त्या मुलांना माझी काळजी वाटावी याची मला गंमत वाटली.
"इकडून पुलावरूनच जाईल ना गाडी? घेतील ते मला इथं..." मी.
"नामची इकडे कुठे? ते त्या रस्त्याने आहे ..." असं म्हणत त्या दोघांनी मला जवळजवळ ढकललचं म्हणा ना!

मी हात हलवून त्यांचा निरोप घेतला.
सगळ काही हेतू ठेवून करा; 'अनोळखी लोकांशी मैत्री करू नका'; स्वत:चं खाजगीपण जपा ... अशा सूचनांचा भडीमार शहरात सतत होत असतो. माणसांवर विश्वास न ठेवण्याचं शिक्षण आपल्याला वारंवार दिलं जातं - त्याला कारणंही आहेत परिस्थितीने दिलेली आपल्याला.

अशा वातावरणात ओळख नसताना कोणीतरी माझ्याशी अर्धा तास गप्पा मारल्या, माझ्यावर विश्वास ठेवला, माझी काळजी केली, विचारपूस केली, मला समजून घेतलं - याचं मला अप्रूप आहे.

रंगीत नदीच्या खळाळत्या पाण्याबरोबर, तिथल्या नजर पोचेल तिथवर असणा-या हिरव्या डोंगररांगांबरोबर मला लक्षात राहिला आहे तो रंगीततीरी त्या दोन मुलांबरोबर सहज घडून आलेला एक निरागस संवादही.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अनुभवकथन-शैलीतले साधेपण आवडले. शेवटच्या वाक्यामुळे लेखन उगीचंच नाट्यमय (नेपथ्याच्या वर्णनामुळे तसेच विशेषणसंपन्नतेमुळे) वाटले.

*'राम्रो' म्हणजे नेपाळीत चांगला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधे साधे परंतु असे मनस्वी प्रसंगच अधिक लक्षात रहातात हे खरं.. पण ते शब्दांमध्ये इतके छान रेखाटता फारच कमी जणांना जमतं.. नेहमीप्रमाणे हे आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रसंग आणि वर्णन दोन्ही आवडलं. पोरंही गोड आहेत.

(काहीसा असाच प्रसंग माझ्याही बाबतीत घडला. एका समुद्रकिनारी सायकल चालवून दम खायला बेंचेसवर बसलो होतो. त्या दिवशी 'लेमोनेड डे' होता. जागोजागी थोडी मोठी मुलं आणि टीनेजर्स लेमोनेड विकत होते. आमच्या बेंचपाशी दोन पोरी आल्या. त्यांनी लेमोनेड हवंय का विचारलं. त्यात तीन फ्लेवर्स होते त्याचीही साद्यंत माहिती दिली. वर लेमोनेडबरोबर एक कुकी फुकट असंही मधाचं बोट लावलं. त्या मुलींनी मला अक्षरशः गुंडाळलं होतं, खरंतर त्यांच्याकडून असं गुंडाळून घ्यायला मलाही आवडलं. त्यांनी अगदी हातात लेमोनेड आणून दिलं, तेव्हा त्यांचा फोटो काढला.

आनंदाने फोटोची पोझ देऊन त्या पुन्हा पुढचं गिर्‍हाईक शोधायला पसार झाल्या. लेमोनेड मस्तच होतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास लिहिलं आहे! वाय वाय मलाही खूप आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

झकास लिहिलंय।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

मस्तय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहेमीप्रमाणे हेही लिखाण आवडलं. वाय वाय नूडल्समुळे भुटानची आठवण ताजी झाली. बंगाल-भुटान सीमेवर भुटानच्या हद्दीत आणि बाहेरही वाय वायवर टूरिस्टांची धाड पडते. दहा-पंधरा रुपये पाकीट असेल. भुटानहून येणारा प्रत्येक माणूस किमान पंधरावीस पाकिटं तरी आणतोच. उरलंसुरलं भुटानी चलन संपवून टाकायलाही ते बरं पडतं. इथे नातेवाईक आणि मित्रमंडळीला आठवण म्हणून द्यायलाही बरं.
भुटानमध्येही अशीच निरागसता आहे. दूर डोंगरदर्‍यांत निरागसताही प्रदूषणमुक्त राहात असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0