उत्तरदायित्व

आपण करत असलेल्या कृतीला आपणच कितपत जबाबदार असतो?

तुम्ही करत असलेल्या कृतीवर तुमचेच पूर्णपणे नियंत्रण असून तुमच्या अपेक्षेप्रमाणे ते तुम्ही पूर्ण करणार. हे करत असताना त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारीसुद्धा तुम्हालाच स्वीकारावी लागणार. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र वेगळेच घडत असते. फायद्याची गोष्ट असली की मीच केले म्हणणाऱ्यांची रीघ लागते. तोटा झाल्यास मात्र जबाबदारी दुसऱ्यावर झटकून मोकळे होण्याकडे कल वाढतो. मुळात जबाबदारी वेळ, प्रसंग वा व्यक्तीनुसार बदलत राहते. सामान्य परिस्थितीत उत्तरदायित्वाची आठवण होत नसली तरी अटीतटीच्या प्रसंगात त्याचा कस लागतो. व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग होता की फक्त वरवरून सहानुभूती यातून नैतिक जबाबदारी ठरवता येते. रस्त्यावरच्या अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात पाठविण्याची जबाबदारी तेथे हजर असलेल्या प्रत्येकाची असते. परंतु हे काम दुसरा कोणी तरी करेल म्हणून आपण पुढाकार घेत नाही. व घटनास्थळापासून जास्तीत जास्त लांब पळण्याच्या पावित्र्यात असतो. ही नैतिक जबाबदारी आपल्याला पेलवत नाही अशी मनाची समजूत करून आपण काही तरी निमित्त काढून काढता पाय घेतो. येथे अडकण्यापेक्षा जाता जाता कुठेतरी भीक मागत असलेल्यांच्या कटोरीत 10 रुपयाची नोट भिरकावून सामाजिक जबाबदारीतून मुक्त होण्याचा अत्यंत सुलभ मार्ग निवडतो. अगोदरची नैतिक जबाबदारी टाळल्याची भरपाई अशा प्रकारे करू पाहतो.

नैतिकता ही इतक्या सहजासहजी पचनी पडणारी गोष्ट नाही. एका माणसाला वाचविण्यासाठी 10 जणांचा जीव धोक्यात घालावा का? कदाचित आपले उत्तर त्या एकट्या माणसाला मारून दहा जणांचा जीव वाचवावा हे असल्यास ती एकटी व्यक्ती तुमचा मुलगा वा जवळच्या नात्यातील असल्यास काय करावे? समस्या तीच. परंतु विचाराची दिशा बदललेली. एखादा आवडता चित्रपट नेटवरून डाउनलोड करणे चित्रपटाची पायरेटेड सीडी विकत घेण्यापेक्षा कमी अनैतिक. वा एखाद्याची वैयक्तिक डायरी वाचण्यापेक्षा त्याला आलेले ईमेल वाचणे कमी अनैतिक. अशा प्रकारे नीती - अनीती सापेक्ष ठरत जाते व जबाबदारीची जाणीवसुद्धा!

नेहमीच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या आपल्या सारख्यांना कदाचित सहानुभूती हे गुणवैशिष्ट्यच आपल्याला जागे करून कृती करण्यास भाग पाडत असावी. परंतु ही सहानुभूती नेहमीच उत्स्फूर्ततेतून व भावनाविवशतेतून जन्मास येत असल्यामुळे आपण करत असलेली कृती, परिणामाच्या जबाबदारीचा विचार करण्यास पुरेसा वेळ देत नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपण कोरडे पाषाण, भावनाशून्य जीवन जगत रहावे. परंतु कृतीच्या अंतिम परिणामाची जाणीव ठेवतच कृती करावी, हाच जबाबदार व्यक्तीचा उद्देश असावा व स्वीकारलेल्या जबाबदारीपासून पळवाट काढू नये. जबाबदारीच्या संदर्भात तत्वनिष्ठा व मानसिकता यांना विसरता येत नाही. मानसिकतेची जडण घडण सहानुभूती व भावनेला अनुकूल असली तरी जबाबदारीयुक्त वर्तन, साधन शुचिता, कृतीतील सातत्य, वेळेचे भान इत्यादींनाही फार महत्व आहे. तत्वशून्य कृती बेजबाबदारीपणाला जन्म देते.

उत्तरदायित्वाच्या संदर्भातील निर्णय घेताना कुठल्या थरापर्यंत जबाबदारी उचलावी हा प्रश्न उपस्थित होतो. व हा निर्णय शहाणपणाचा व आव्हानात्मक असू शकतो. काहींना जबाबदारी घेण्याची घाई असते. व घाई गर्दीत केलेल्या कृतीतून काही विपरीत घडल्यास इतर कशावर तरी जबाबदारी ढकलण्याची पाळी येते. कदाचित हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीवर वा इतर कुणावर वा शासनावर दोषारोप करून मोकळे व्हावे लागते. रोगोपचारात उत्तरदायित्वाला भार महत्व असते कारण येथे एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो. उपचार करणारे - व्यक्ती असो वा एखादी टीम असो - जबाबदारी टाळू शकत नाहीत. 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन...' याचा येथे उपयोग होत नाही. आपण उदासीन राहून फलाची अपेक्षा करू लागल्यास वा परिस्थिती आपोआपच सुधारणा आणेल असे wishful thinking करत असल्यास ते बेजबाबदार वर्तन ठरेल. त्याचप्रमाणे कुवतीपेक्षा जास्त जबाबदारी अंगावर घेणेसुद्धा त्रासदायक ठरू शकेल. जे जे काही चुकत आहे त्याला मीच सर्वस्वी जबाबदार आहे ही मानसिकता व त्यातून अपराधीगंड यामुळे आपण कुढत राहतो व मानसिक संतुलन बिघडवून घेतो.

या मानसिकतेवर एक उपाय म्हणजे प्रत्येक टप्प्यावर जबाबदारीचे विश्लेषण करत राहणे. अपराधीपणाची टोचणी वाटत असल्यास या सर्व प्रक्रियेमध्ये कोण कोण होते, घटना कसे घडत गेल्या, प्रत्येकाचा सहभाग किती, इत्यादीवरून जबाबदारीचे संपूर्ण चित्र उभे करता येऊ शकते. अशा प्रकारची विश्लेषण प्रक्रिया गुंतागुतीची असली तरी विश्लेषणाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येत नाही. स्वत: आपणच केल्यास आपल्यावरील जबाबदारीचा अंदाज, कुठल्या घटकामुळे काय काय घडत गेले, इत्यादीची योग्य माहिती मिळू शकेल. त्यावरून यशापयशाला आपण कितपत जबाबदार आहोत हे नक्कीच लक्षात येऊ शकेल.

एखाद्याला जबाबदारीतून मुक्त करतानासुद्धा विचारपूर्वकपणे निर्णय घेण्याची गरज आहे. 'तिचा स्वभावच तसा आहे' वा 'तो पहिल्यापासूनच असा होता' ही कारणं एखाद्याला जबाबदारीतून मुक्त करू शकतीलही. परंतु 'तिने स्वभाव बदलण्यासाठी काही प्रयत्न केले का?' वा 'तो प्रगल्भ होण्यासाठी काही उपाय केले का?' या प्रश्नांना उत्तर शोधून जबाबदारी निश्चित करावी लागेल. काही तरी लंगडे समर्थन देत जबाबदारीतून मुक्त होण्याची धडपड करणे जबाबदार व्यक्ती म्हणून शोभणारी नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

नेहमीप्रमाणेच विचार करायला लावणारा.
इंजिनिअरिंगला Principle Of Ethics And Cyber Laws नावाचा विषय होता.
त्यात अशाच अद्भुत, विचित्र, धर्मसंकटात टाकणार्‍या केस स्टाडिज होत्या.
काही वेळा नियम पालनार्‍या सर्वांचे रक्षण व्हावे, कीम्वा त्यांचा फायदा व्हावा म्हणून रक्षाकाने नियम तोडून गुन्हेगारास शासन करावे का? अशा अर्थाचे प्रश्न असत. त्याला "हो" असे म्हणालात, तर नक्की कुठल्या पातळीपर्यंत तोडावेत हा लागलिअच पुढचा प्रश्न.
आता त्यातली प्रबहवी उदाहरणं आठवत नाहित डिटेलवार, पण एक साधं उदाहरण :-
एका गुन्हेगाराचा पोलिस पाठलाग करताहेत. गुनेह्गार सुसाट वेगाने गाडी चालवत सिग्नल तोडून पळाला, आणी त्याच्या मागोमागच्या पोलिसांच्या ड्रायव्हरला मात्र क्षणभर(आपण स्वतः पोलिस असल्याने)"सिग्नल तोडावा की तोडू नये" असा संभ्रम पडला!.
हे खूपच साधं उदाहरण. ह्यापेक्षा वेगळी उदाहरणे म्हणजे वैद्यकिय क्षेत्रातले पेच. अवयव दान, अवयव रोपण, मृताकडून घायचे म्हटले तरी नैतिक पेच येतो, आणि जीविताकडून विकत घ्यावे म्हटले तरी कायद्याची आडकाठी. स्थिती विचित्र होते.
शिवाय गर्भपात , अधिक मूल्य आईच्या जीवाचे की अर्भाकाच्या जीवाचे असे नेहमीच चर्चेत असणारे प्रश्नही आहेतच.
थोडक्यात, अशा प्रश्नांना "धर्मसंकट" म्हणता यावे. काहीही उत्तर दिले तरी नवी समस्या उभी राहनारच.
हे प्रश्न सुटू शकणारच नाहित असे वाटू लागते.
आपल्यापुरती आपण स्वतःची सोडवणूक्ल करुन घेउ शकतो.
र्पश्न तिथेच राहिल, आपण त्यापासून दूर निघून जाउ; असा विचार सामनय कीम्वा व्यवहारी माणूस करतो/करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

<< आपण करत असलेल्या कृतीला आपणच कितपत जबाबदार असतो? >>

आपण जबाबदार असतो दर वेळी असं नाही, पण आपणही जबाबदार असतो हे स्वीकारायला हवं.
आपणच असतो हे एक टोक झालं तर आपण नसतोच हे दुसरं टोक.
प्रत्यक्षात आपण नेहमीच या दोन टोकांच्या मध्ये कुठंतरी असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0