दिवाळी अंकासाठी आवाहन

नमस्कार,

"ऐसी अक्षरे"चे सदस्य आणि वाचकहो, संपादक या नात्यानं आज तुम्हाला लिहितो आहोत. आपल्या साहित्यशास्त्रकलादि विषयांमधल्या नानाविध लिखाणावाटे तुम्ही आजवर जी साथ केलीत आणि करत आहात त्याचं आम्हाला मोल वाटतं.

गेल्या दिवाळीत सुरू केलेल्या या प्रकल्पाअंतर्गत या वर्षी दिवाळी अंक काढावा असा विचार आहे. तुमच्यासारख्या गुणीजनांच्या उत्तमोत्तम लिखाणाशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. या आपल्या दिवाळी अंकात तुम्ही लिहावं अशी विनंती प्रस्तुत आवाहनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत.

या दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असाही आमचा एक विचार आहे. इथे उल्लेख केलेल्या संकल्पनेवरच तुम्ही लिहायला हवं असं काहीही बंधन नाही. ललित/वैचारिक लेख, कथा, कविता, एखादा सुचलेला चुटका, व्यंगचित्र आणि अन्य संकीर्ण प्रकार या साऱ्यांचं स्वागत आहे. या अंकाचा काही भाग ज्या संकल्पनेवर आधारित आहे ती पुढीलप्रमाणे :

गेल्या काही दशकांत इंटरनेटच्या आगमनामुळे आमूलाग्र बदल घडत आहेत. बातम्या, जगाविषयीचं ज्ञान आणि मनोरंजनासाठी संगीत, चित्रपट आणि लेखन यांचा आस्वाद घेण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती घडते आहे. ज्ञान अथवा करमणूक काहीतरी जड माध्यमात कोरून ठेवून ती माध्यमं विकण्याऐवजी आता या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रवाही (फ्लुइड) झाल्या आहेत. त्यामुळे त्या आस्वादकांपर्यंत कशा पोचवायच्या हा नवीन प्रश्न सर्वांसमोर आहे. उगवतं डिजिटल माध्यम आणि प्रस्थापित अ-डिजिटल माध्यमं यांच्यातलं नातं बदलत चाललेलं आहे. दहा वर्षांनी काय परिस्थिती असेल कोणालाच कल्पना नाही. किंबहुना आत्ताही या माध्यमांमधली दरी, त्यावर बांधले जाणारे पूल यांबाबतीतलं चित्र धूसरच आहे. त्या अनुषंगाने हा एकंदरीत लॅंडस्केप काय आहे याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी या 'परिसरात' वास्तव्य करणारे - पत्रकार, प्रकाशक, संपादक, कलाकार, डिस्ट्रीब्युटर्स इत्यादींच्या दृष्टीक्षेपात काय दिसतं आहे हे सादर करण्याची इच्छा आहे. त्यासाठी अशा काही जणांकडून लेखन मागवून किंवा त्यांच्या मुलाखती सादर करण्याचा विचार आहे. तुमच्यापैकी बहुतेक सर्व डिजिटल मीडियाचे वापरकर्ते म्हणून दृष्टिकोन सादर करू शकता.

या संकल्पनेचे प्रवर्तक आहेत राजेश घासकडवी. तुम्हाला यात रस वाटला तर तुम्ही जरूर त्यांच्याशी संपर्क करू शकता. ते तुम्हाला त्याबाबतीत अधिक माहिती देऊ शकतील.

मात्र हा अंक केवळ याच विषयाला वाहिलेला असणार नाही. अंकाचा सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. बाकीचा अंक लेख, कथा, कविता, चित्रं, व्यक्तिचित्र, फोटो, संगीत अशा विविध प्रकारांनी नटलेला असेल. तेव्हा या विषयाचं बंधन आहे असं समजू नये.

आणखीन एक नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्हाला हा अंक म्हणजे कागदी दिवाळी अंकांची डिजिटल आवृत्ती या मर्यादित स्वरूपात सादर करायचा नाही. इंटरनेटच्या माध्यमात लिखित शब्दापलिकडे कितीतरी अधिक सामावता येतं. या बलस्थानाचा शक्य तितका वापर करण्याचा मानस आहे. तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन, चलतचित्र, ऍनिमेशन, अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं. त्या दृष्टीने तुम्हाला विनंती आहे की तुमचं योगदान देताना निव्वळ लिखित शब्दांचाच विचार करू नये. या अनुषंगाने तुमच्या काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचंही स्वागत आहे.

"ऐसी अक्षरे" वर वेळोवेळी सादर केली गेलेली चित्रं आणि छायाचित्रं (फोटोग्राफ्स) यांद्वारे विविध प्रकारच्या दृक-श्राव्य कलांना आणि त्यांचा समीक्षेलाही व्यासपीठ मिळावं असा आमचा प्रयत्न असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. तुम्हाला याही आघाडीवर काही देण्यासारखं असेल तर जरूर कळवा.

धन्यवाद,
संपादन मंडळ, "ऐसीअक्षरे".

पुरवणी सुचना:
ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत लेखन द्यावे. (आवश्यकता असल्यास डेडलाईन थोडी लांबवता येईल. मात्र संपादकांना तशी आगाऊ कल्पना द्यावी.)
ललित किंवा अन्य प्रकारच्या लेखनातही काही फोटो, चित्रं, स्केचेस टाकण्याची इच्छा आहे, पण आपण चित्रकार/फोटोग्राफर नाही अशी अडचण असेल तर कृपया संपर्क करणे. लिखाण पूर्ण झालेलं नसेल, पण काय प्रकारची स्केचेस्/चित्र टाकता येतील याचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल.

धन्यवाद,
संपादन मंडळ, "ऐसीअक्षरे".

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत लेखन

ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत लेखन द्यावे. आवश्यकता असल्यास डेडलाईन थोडी लांबवता येईल. पण संस्थळ चालक, संपादक, अ‍ॅडमिन (अगदी स्वतःला जगन्नियंते समजत असतील तरीही) दिवाळीची तारीख बदलू शकत नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
ललित किंवा अन्य प्रकारच्या लेखनातही काही फोटो, चित्रं, स्केचेस टाकण्याची इच्छा आहे, पण आपण चित्रकार/फोटोग्राफर नाही अशी अडचण असेल तर कृपया संपर्क करणे. लिखाण पूर्ण झालेलं नसेल, पण काय प्रकारची स्केचेस्/चित्र टाकता येतील याचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान!

काहीतरी करू... नक्कीच!

व्यंगचित्रे

ललित/वैचारिक लेख, कथा, कविता, एखादा सुचलेला चुटका, व्यंगचित्र आणि अन्य संकीर्ण प्रकार या साऱ्यांचं स्वागत आहे

माझ्या डोक्यात व्यंगचित्रांकरता काही कल्पना अाहेत, पण अडचण अशी की मला चित्रं काढता येत नाहीत. तेव्हा क्रिएटिव कोलॅबरेशनसाठी कोणी तयार असेल, तर कृपया मला व्यनि करावा.

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

जत्रा ष्टाईलची

कर्तन चित्रे असतील तर माझी चित्र(विचित्र)कला सहर्ष सादर आहे!
सविताभाभीच्या (प्रतिष्ठीत साईटवर आर्टिस्ट निवडायच्या कांपिटिशन मधे एण्ट्री दिलेला) आडकित्ता

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आवाहनाच्या प्रस्तावात तसेच

आवाहनाच्या प्रस्तावात तसेच मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादात योग्य ती संपर्क-माहिती आहे असे दिसते.
मुळ आवाहनात म्हटल्याप्रमाणे

या संकल्पनेचे प्रवर्तक आहेत राजेश घासकडवी. तुम्हाला यात रस वाटला तर तुम्ही जरूर त्यांच्याशी संपर्क करू शकता. ते तुम्हाला त्याबाबतीत अधिक माहिती देऊ शकतील.

तसेच मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे

"ऐसी अक्षरे" या आयडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे त्यांना आपलं लेखन व्यनीवाटे पाठवता येईल.

तेव्हा जयदीप व अन्य सदस्यांना विनंती आहे की वरील दोन आयडीज ना व्यनी पाठवून शंका निरसन करावे.

विचारलेल्या प्रश्नांपैकी 'अंतीम तारीख' वगैरेसारखी अनेकांना उपयुक्त माहिती इथे जाहिरपणे देण्यात येईल असे वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हात टेकले

अवो र्‍हूशिकेश भौ,
त्ये लोकं इनोद करून र्‍हाय्लेत ना!
कस्साले बी शिरेस पर्तीसाद देता राव तुमी..

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

?

डेडलाईन काय अाहे?

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

डेडलाईन

काल.

भिऊ नका

काल हा दिवाळी अंकाचीच नव्हे तर अापल्या सर्वांच्याच अायुष्याची डेडलाईन ठरवीत असतो, हे मला चांगलं माहित अाहे. शेवटी 'ऐअ' च काय, तर संपूर्ण तारकामंडळच कालौघात नष्ट होणार अाहे. पण म्हणून उद्या येणाऱ्या कालपुरुषाला जर अाज भ्यायलो, तर दिवाळी अंक निघणार कसा?

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

किंचित शंकासमाधान

ज्या "ऐसी अक्षरे" या आयडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे त्यांना आपलं लेखन व्यनीवाटे पाठवता येईल.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वाक्य खरेच गंडले आहे काय?

ज्या ... आयडीने प्रस्ताव मांडलेला आहे, त्यांना लेखन पाठवता येईल.

हे वाक्य खरेच तितकेसे गंडले आहे काय? मुरलेले लेखक-वाचक सुचवत आहेत की "ऐसी अक्षरे" आयडीनी लेखन पाठवावे लागेल असा संदिग्ध अर्थ वाक्यात आहे.

"ज्याचीया स्मरणे पतित तरितो, तो शंभु सोडू नको." या वाक्यात न-सोडणारा/री कोण आहे आणि न-सोडायचा तो कोण हे संदिग्ध आहे काय?

संदिग्ध

मुरलेले लेखक-वाचक

मुळ वाक्याचं माहीत नाही, पण हे लेखक-वाचक मुरलेले की नाही हे मात्र आता संदिग्ध झाले आहे. (डोळा मारत)

किंचित उपशंका

धन्यवाद मनोबा!
ऐसीअक्षरे आयडिने लिखाण सब्मिट करण्यासाठी त्या आय्डीचा पासवर्ड काय? कृपया व्यनीने कळवावे. इथे चारचौघात नको. उगा लोक दुरौपयोग कर्तील.
(पासवर्डची चातकासारखी वाट पहाणारा) आडकित्ता.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मलाही

मलाही लेखन द्यायचे आहे. तुम्हाला पासवर्ड मिळाला की, मलाही द्या.

००००

००००

हा अ‍ॅडमिन पासवर्ड आहे.

ऐसी

ऐसीअक्षरे आयडीचा हवाय हो. अॅडमिनचा घेऊन काय करू? मला लेखन द्यायचे आहे. (स्माईल)

!

००००

हा अ‍ॅडमिन पासवर्ड आहे.

आयला खरंच की! (डोळा मारत)

का?

ज्या "ऐसी अक्षरे" या आयडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे त्यांना आपलं लेखन व्यनीवाटे पाठवता येइल
समजा "अबक " ह्या व्यक्तीला दिवाळी अंकासाठी लेखन पाठवायचय. त्यांनी का पाठवू नये?
"ऐसीअक्षरे" ह्या आयडीनीच लेखन का पाठवावं?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सदर अंकासाठी लेखन कसे पाठवावे

सदर अंकासाठी लेखन कसे पाठवावे याची माहिती द्यावी.