प्रसारमाध्यमांना सनसनाटीचा हव्यास का असतो?

हल्ली ‘इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यां'च्या बातमीदारीला नावे ठेवली जातात. कोणत्याही घटनेला भडक स्वरूप देऊन सनसनाटी निर्माण करण्याचा सोस मीडियावाल्यांना आहे, असे म्हटले जाते. पण हा दोष केवळ इलेक्ट्रॉनिक्स मीडियातच आहे, हे मला अजिबात मान्य नाही. सर्वच प्रसारमाध्यमांना सनसनाटीचा हव्यास असतो. याचे मूळ मनुष्य स्वभावात आहे. मनुष्य स्वभावालाच सनसनाटीचा हव्यास आहे; म्हणून प्रसारमाध्यमे सनसनाटीचा हव्यास धरतात. इलेक्ट्रॉनिक मीडियाची उपद्रव क्षमता जास्त असल्यामुळे त्यांनी निर्माण केलेली सनसनाटी ठळकपणे नजरेत भरते एवढेच.

अलीकडे प्रसारमाध्यमे फारच बेताल झाली आहेत, असा आरोप होतो. पण, अलीकडे-पलिकडे असा काही प्रकार यात नाही. १८९१ साली म्हणजेच सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ‘पुणे वैभव'नावाच्या एका दैनिकाने पुण्यात ‘चहाच्या पेल्या'तून प्रलयंकारी वादळ उभे केले होते. या वादळाने लो. बाळ गंगाधर टिळक आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या त्याकाळातील पुण्यातल्या बड्या मंडळींना जेरीस आणले होते.

सूर्यकांत पळसकर

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

धाग्यात उल्लेखिलेला लेख वाचला आणि असे जाणवले की त्यात काही चुका (factual errors) आहेत आणि काही गोष्टींचे अति-सोपीकरण केले आहे. कसे ते येथे पाहू.

पुढील लिखाणाला न.र.फाटकलिखित ’रानडे यांचे चरित्र’ आणि न.चिं.केळकरलिखित त्रिखंडात्मक टिळकचरित्र असे आधार आहेत. ह्या पुस्तकांचा उल्लेख ह्यापुढे ’फाटक’ आणि ’केळकर’ असा संक्षिप्त प्रकाराने केला आहे. धाग्यामध्ये उल्लेखिलेल्या लेखातील आवश्यक ती अवतरणे अवतरणचिह्नात असून माझ्या टिप्पणीआधी 'टिप्पणी' असा उल्लेख केला आहे. येथे हेहि नमूद करतो की केळकर आणि फाटक ह्यांच्यामध्ये दिनांकांच्या बाबतीत एका ठिकाणी थोडा मतभेद दिसतो. तेथे फाटकांनी जास्ती तपशील दिलेले असल्याने मी फाटकांची तारीख योग्य मानली आहे. हा मतभेद फार महत्त्वाचा नाही आणि पुढील एकूण लिखाणाला त्याने कसलीच बाधा पोहोचत नाही. फाटक आणि केळकर दोघांनीहि हे प्रकरण विस्तृत चर्चिले आहे. फाटकांचे लिखाण गंभीर आहे, केळकरांचे त्यांच्या शैलीनुसार खुसखुशीत आणि मिष्किल आहे.

’ही हकीगत आहे १८९१ सालातली. जूनचा महिना होता. एके दिवशी टिळक सकाळी बाहेर पडले. सहज म्हणून पंचहौद कमिशनच्या कार्यालयात गेले. तेथील व्यवस्थापकाशी बोलत बसले. पुण्यातील मान्यवर पुढा-यांना चहापानाला बोलवा, अशी सूचना टिळकांनी केली. ती मिशनच्या व्यवस्थापकास पसंत पडली. त्याने लगेच ४०-५० पुढा-यांना आमंत्रणे पाठविली. त्याचा स्वीकार करून काही मंडळी मिशनमध्ये चहापानाला आली. त्यात न्या. रानडे होते. मनमोकळ्या गप्पा गोष्टी झाल्या. मंडळी समाधानाने घरी परतली.’

टिप्पणी - लेखकाला इतका 'ऑंखों देखा हाल' कोठून बरे मिळाला असावा? वस्तुस्थिति अशी आहे की जून १८९१त काहीच झाले नाही. टिळक त्या महिन्यात केव्हातरी ’सकाळी बाहेर पडले’हि असतील पण ते ’सहज म्हणून’ पंचहौद मिशनकडे काही गेले नाहीत. कारण प्रत्यक्ष चहापान कित्येक महिने आधीच ४ ऑक्टोबर १८९० ह्या दिवशीच पार पडलेले होते. (फाटक पृ. ३१६.) टिळकांचे एकूण चरित्र जाणणारा कोणीहि असे मानणार नाही की ते सहज शिळोप्याच्या गप्पाटप्पा करायला पंचहौद मिशनच्या ’व्यवस्थापकाकडे’ जात असावेत. हे व्यवस्थापक कोण? तेथील रेवरंड रिविंग्टन की अन्य कोणी?

’हे प्रकरण इतके तापले की, त्याची निमन्यायिक चौकशी करण्याचाही निर्णय झाला. १८९१ च्या ऑक्टोबरमध्ये चौकशी सुरू झाली. ती अनेक दिवस चालली. काही मध्यममार्गी लोकांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, कट्टरपंथीय अडून बसले होते. हो ना करता या ‘बाटग्यां'ना धर्मात घेण्यास कट्टरपंथीय तयार झाले; पण त्यासाठी शंकराचार्यांच्या उपस्थितीत शुद्धिकरण सोहळा झाला पाहिजे, अशी अट त्यांनी घातली.’

टिप्पणी - १८९१च्या ऑक्टोबरमध्ये कसलीच चौकशी सुरू झाली नाही. ती सुरू झाली ती पौष वद्य २, जानेवारी १८९२ ह्या दिवशी. (केळकर भाग १,प्रकरण १३, पृ.२९०) त्यापूर्वीचा घटनाक्रम असा होता की गोपाळराव जोशी (आनंदीबाईंचे पति) ह्यांनी पंचहौद मिशनमध्ये जाऊन रे. रिविंग्टन ह्यांच्यामार्फत पुण्यातील शेपन्नास सुशिक्षित गृहस्थांना व्याख्यानाच्या सभेचे आमंत्रण पाठविण्याची व्यवस्था करवून आणली. ५२ गृहस्थ मिशनमध्ये गेले, त्यांमध्ये टिळक आणि रानडे ह्यांच्याखेरीज पुण्यातील कमीअधिक प्रकरणात समाजसुधारणेला अनुकूल असलेल्या बहुसंख्य सुशिक्षित पुणेकरांचा समावेश होता. व्याख्यान असेतसेच झाले पण त्यानंतर चहा आणि बिस्किटे पाहुण्यांपुढे ठेवण्यात आली. ह्या चहापानामागील ’आन्तर: कोऽपि हेतु:’ रिविंग्टन साहेबांना माहीत होता किंवा नाही हे सांगता येत नाही पण गोपाळरावांना निश्चितच माहीत असला पाहिजे कारण सुधारकांची खिल्ली उडविण्यासाठी त्यांनीच हा घाट बनवून आणला होता. पाहुण्यांपैकी ’काहींनी तो चहा पिऊन फस्त केला, काहींनी घोटभर पिऊन त्याचा मान केला, काहींनी त्याला नुसता हात लावण्याचा देखावा करून तो दूर सारला तर काहींना आपल्यासमोरील ही ब्याद कोणी उचलून घेऊन जाईल तर बरे असेहि वाटत असावे’. (केळकर भाग १, प्रकरण १३, पृ. २८८)

’टिळक, रानडे प्रभृती पंचहौद मिशनमध्ये जाऊन चहापान करून आली, ही गोष्ट पुण्यातल्या कट्टरपंथी ब्राह्मणांना मात्र रुचली नाही. गोपाळराव जोशी नावाच्या एका उपद्रवी कट्टरपंथीयाने पंचहौदमध्ये चहापान घेणा-या नेत्यांची नावे ‘पुणे वैभव'ला कळविली.’

टिप्पणी - गोपाळराव जोशींनी ही बातमी ’पुणे वैभव’पर्यंत पोहोचविली हे खरे आहे पण ते प्रत्यक्ष चहापानानंतर ६ महिन्यांनी (फाटक). जोशी कट्टरपंथीय बिलकुल नव्हते. आपल्या पत्नीला इंग्रजी शिक्षण देऊन नंतर एकटीला वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेस पाठविले होते. ते एक विक्षिप्त गृहस्थ होते. ह्या ना त्या मार्गाने सुधारकांची आणि सनातन्यांची दोघांचीहि खिल्ली उडविणे आणि दोघेहि आपापल्या परीने भोंदू आहेत असे दाखविणे हाच त्यांचा हेतु असे आणि ह्यासाठी अन्य वेळी त्यांनी अन्य चाळेहि केले होते. ’कळीचा नारद’ हे त्यांच्या स्वभावाचे योग्य वर्णन ठरेल.

समाजसुधारणेला रानडे आणि टिळक दोघांचाहि पाठिंबाच होता पण रानडे ह्याबाबतीत पुढे होते आणि टिळक अधिक सावध होते. ते कसे ते येथे लिहीत नाही कारण त्या विषयाचा आवाका बराच मोठा आहे. गोपाळरावांचा हेतु मात्र हे दोघेहि कसे अडचणीत येतात आणि त्यातून कसा मार्ग काढतात हे पाहणे, बाळासाहेब नातूंसारखे सनातन्यांचे अग्रणी एका बाजूस आणि आरोपीच्या पिंजर्‍यात अनपेक्षित रीत्या शिरलेले रानडे-टिळक दुसर्‍या बाजूस ह्यातून जो गोंधळ होईल त्याचीहि मजा पाहणे इतकाच मर्यादित होता.

’आता टिळक अडचणीत आले होते. यावेळी टिळकांना शिवराय आठवले. महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी शिवरायांना राज्याभिषेक करण्यास नकार दिला, तेव्हा शिवरायांनी काशीहून गागाभट्टांना आणले. टिळकांनीही तेच केले. ते काशीला गेले. तेथे त्यांनी प्रायश्चित्त घेतले. प्रायश्चित्त घेतल्याचे प्रशस्तिपत्र सोबत आणले.’

टिप्पणी - घडलेल्या गोष्टींचे हे अति-सोपीकरण आहे आणि ते अभ्यासाच्या अभावातून झालेले आहे की बुद्ध्याच केलेले आहे हे मी ठरवू शकत नाही. मधले-अधले सर्व तपशील टाळून ’आता टिळक अडचणीत आले होते’ येथे लेखक आपणास आणून सोडतो. एव्हढया सर्व लिखाणात शंकराचार्यांची ह्या प्रकरणी काय भूमिका होती, त्यांनी नेमलेले चौकशी कमिशन, वादी-प्रतिवादींचे दावे, नंतरचे कुरुंदवाडला भरलेले अपील कोर्ट आणि त्याचा निर्णय शेवटापर्यंत न आल्याने अखेर सर्वच मामला हवेत विरून जाणे ह्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी कशाचाच उल्लेख ह्या लेखात दिसत नाही. ’आता टिळक अडचणीत आले होते’ हे विधान निराधार आहे असे मला वाटते. ’यावेळी टिळकांना शिवराय आठवले’ ह्या समेच्या वाक्यावर येण्यासाठी प्रस्तावना म्हणून हे वाक्य - आणि एकूणच लेख - लिहिले असावेत अशी मला शंका येते.

टिळक अडचणीत बिलकुल आलेले नव्हते आणि त्यांना पुण्यात प्रायश्चित्त न मिळाल्याने ते काशीस जाऊन प्रायश्चित्त करून आले हेहि खरे नाही. पुण्यातील ब्राह्मणांना त्यांनी शंकराचार्यांपुढे अपील करून आह्वान दिले होते. कमिशनच्या निर्णयानंतरहि त्यांच्या घरातील दोन कार्ये, मुलाची मुंज आणि मुलीचे लग्न, १८९२ आणि १८९३,प्रायश्चित्त न घेताच आधीपासून उपलब्ध ठेवलेल्या एका ब्राह्मणाच्याकरवी त्यांनी घडवून आणली होती. नंतर ते एकदा काशीस काही अन्य कारणाने गेले असता त्यांनी एक ’नाम के वास्ते’ - माझे शब्द - किरकोळ प्रायश्चित्तहि घेऊन टाकले. एकाच वेळी सुधारणेला अनुकूल तरीहि घाईने सुधारणा करण्यास विरोध अशी त्यांची जी पद्धत होती - केळकरांच्या शब्दात ’नागमोडी चाल’ - तिचाच हा भाग होता. ह्या प्रायश्चित्ताचे केळकरांनी केलेले वर्णन असे आहे: ’टिळकांच्या मताप्रमाणें प्रायश्चित्त घेणें हें तुरुंगवासाच्या शिक्षेप्रमाणें मानलें तरी, तो तुरुंग एकाच ठिकाणीं नाहीं, असेल तेथें तो बंदिस्त नाहीं व बंदिस्त असेल तेथेंहि त्याचे अधिकारी ठरलेले नाहीत. कोठेंतरी तुरुंगात बसून आल्याचा दाखला असला म्हणजे झालें. म्हणून त्यांनी काशीयात्रेची संधि साधून व सर्व प्रायश्चित्त घेऊन आपखुषीनें घेतलेल्या शिक्षेचा दाखला खिशांत बाळगून ठेवला होता.’ (हाहि एक वेगळाच विस्तृत विषय आहे, जो टिळकांच्या सुधारणेच्या गतीशी संबंधित आहे. येथे त्यावर लिहीत नाही. जुन्या कर्मठ पद्धतीच्या प्रायश्चित्तांना किती महत्त्व द्यायचे ह्याबाबतचे टिळकांचे मत सदाशिव विनायक बापट संपादित ’लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका,’ भाग २, पृ. ६५ ते ६८, रामचंद्र पांडुरंग ठकार, टिळकांचे उपाध्याय, ह्यांच्या आठवणीत पहा. )

’प्रशस्तिपत्राचा हवाला देऊन टिळकांनी भिक्षुकांची समजून काढली. मात्र, हे सहजासहजी घडले असे नव्हे. त्यासाठी टिळकांना ब-याच नाकदु-या काढाव्या लागल्या.’

टिप्पणी - हेहि खरे नाही. पुण्यातील ग्रामण्यपक्षाच्या भिक्षुकवृंदाला आणि सनातन्यांना टिळकांनी शेवटापर्यंत भीक घातली नाही. नातूप्रभृति सनातनी पक्षाला अपेक्षित असलेल्या प्रायश्चित्ताला टिळकांनी अखेरपर्यंत अक्षता लावल्या. पंचहौदनंतर ७-८ वर्षांनी टिळकांच्या घरच्या वसंतोत्सवाला नातूंना निमंत्रण होते. त्याचा स्वीकार करण्यापूर्वी नातूंनी टिळकांच्याकडून पुढील खुलासा मागविला होता. ह्या खुलासा मागण्यावरून दिसते की टिळकांनी जे काही केले किंवा केले नाही त्याबाबत नातू समाधानी नव्हते.

"१. मिशनहौस मध्ये चहा पिणें व आपणां उभयतांवर जीं संकटें आलीकडे आलीं त्या कामांत आपणा स्वत:स भोजनाचा वगैरे संसर्ग जाहाला या दोन्ही दोषांस सक्षौर शास्त्रोक्त प्रायश्चित्त पाहिजे असे आपण मानता काय?

२ मानीत असल्यास आपण त्याबद्दल येथे प्रायश्चित्त न घेता तीर्थाचें ठिकाणीं जाऊन जें प्रायश्चित्त घेतलें त्यांत या दोन्ही दोषांबद्दल प्रायश्चित्त आपण केलें काय?" (केळकर भाग १, पृ.३३२)

’ह्यावेळी टिळकांना शिवराय आठवले’ ह्या वाक्याचा अर्थ काय लावावा? शिवस्मारक रायगडावर व्हावे अशासाठीची १८९५ मध्ये ’केसरी’ने उचलून धरलेली मागणी, तदनंतरचा शिवजयंती उत्सव हे सर्व टिळकांचेच कर्तृत्व होते. ब्रिटिश अधिकार्‍यांनाहि शिवसमाधीची दुर्दशा डाचत असे. सर्वसामान्य व्यक्तींनी वृत्तपत्रांमधून लिखाण करून आणि आणा-दोन आणे अशा वर्गण्या गोळा करून १८८५ पासून ह्या कामाची मागणी सुरू केली होती. शिवाजीचे वंशज म्हणवून घेणार्‍या सातारा आणि कोल्हापूरच्या राजघराण्यांनी आणि मराठेशाहीच्या अवशेषांवर संस्थाने उपभोगणार्‍या श्रीमंत संस्थानिकांनी मात्र ह्या कामी करंगळीहि उचलली नव्हती. ह्याचा साद्यंत इतिहास उपलब्ध आहे आणि केळकर भाग १, पृ. ४२५ पासून पुढे येथे तो वाचता येतो. अशा रीतीने शिवस्मारकाला चालना टिळकांनीच दिली. अशा स्थितीत ’ह्यावेळी टिळकांना शिवराय आठवले’ हा गर्भित उपहास कशासाठी?

अखेर एक ’भाषिक’ दुरुस्ती. ’चहाच्या पेल्यातील वादळ’ ही म्हण पंचहौद प्रकरणातून निर्माण झालेली नाही. इंग्रजीमधील storm in a teacup ह्याचे ते भाषान्तर आहे आणि tempest in a teapot ह्या त्याहूनहि जुन्या इंग्रजी शब्दप्रयोगाचे ते रूपान्तर आहे. 'A storm in a teacup' अशा नावाचा सिनेमाहि १९१३ साली तयार झाला होता.

(ह्या लिखाणात जुन्या पुस्तकांतील उतारे उतरवितांना त्या पुस्तकांप्रमाणे जुने शुद्धलेखन वापरले आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(घटनाक्रम आणि प्रतिसादालाही)

आताच्या काळात हे समजणं कठीण आहे, पण टिळकांच्या 'गुन्हा' काय तर ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या ऑफिसात जाऊन चहा आणि बिस्किटे खाणे, हा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@ अदिती..
होय टिळकांचा गुन्हा हाच आहे! आज आपल्याला याची गंमत वाटते. पण त्याकाळच्या पुण्यातील कट्टरपंथीयांना ख्रिस्ती मिशन-यांच्या कार्यालयात जाऊन चहा घेणे हे घोर पातक वाटत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच विषय उपक्रमावर चर्चिला गेला होता.
http://mr.upakram.org/node/3399 ही त्याची लिंक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पळसकर साहेब,

तुम्ही दिलेला लेख वाचला. एका अज्ञात व ऐकीव बातमीचे मुळापासूनचे ज्ञान झाले. Smile
प्रसारमाध्यमाच्या शक्तीने लोकमान्यांसारख्या जहालवादी पुरुषालाही नमते घ्यायला लावले तर.
खरोखर ताकद अफाट आहे या प्रसारमाध्यमांची

मनापासून धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सागर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ अरविंद कोल्हटकर :
रायगडावरील शिवस्मारकाविषयी माझ्या लेखात एक अक्षरही नाही. असे असताना शिवस्मारकाचा येथे उल्लेख करण्याचे कारण काय? हा अनाकलनीय प्रश्न मी कोल्हटकरांवर सोपवून देतो. ‘टिळकांना शिवराय आठवले' हे माझे वाक्य कोल्हटकरांना का खुपावे, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. टिळकांना शिवरायांचा ‘आठव' होताच! आठव नसता, तर रायगडावरील शिवस्मारकासाठी टिळकांनी पुढाकार का घेतला असता? बरे, शिवस्मारकासाठी टिळकांनी घेतलेल्या पुढाकाराची माहिती स्वत: कोल्हटकरच पुढे देतात. आणि वर माझ्या वाक्याला 'उपहासगर्भ' ठरवितात! सगळीच मौज म्हणायची!!

असो. या वादापासून मी स्वत:ला दूरच ठेवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वच प्रसारमाध्यमांना सनसनाटीचा हव्यास असतो. याचे मूळ मनुष्य स्वभावात आहे. मनुष्य स्वभावालाच सनसनाटीचा हव्यास आहे; म्हणून प्रसारमाध्यमे सनसनाटीचा हव्यास धरतात.

अगदी सहमत आहे. बहुसंख्यांना सनसनाटीपणा आवडतो. काही लोक असे मानणारे आहेत कि सनसनाटीपणामुळे विश्वासार्हता कमी होते पण ते फार थोडे. गॉसिपिंग लोकांना फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/