रंगमुद्रा - माधव वझे. (राजहंस प्रकाशन)

रंगमुद्रा - माधव वझे. (राजहंस प्रकाशन)

कोणताही कलाकार सर्वप्रथम भेटतो त्याच्या कलाविष्कारातून. तो आविष्कार आवडला की त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा आपण प्रयत्न करतो. यथावकाश त्या कलाकाराच्या प्रेमात पडतो. आणि मग एक वेळ अशी येते की त्याच्या वैयक्तिकतेत शिरण्याचा मोह होतो, त्याचं खाजगी आयुष्य कसं आहे ह्याविषयी कुतूहल जागं होतं. ह्या सगळ्याला खतपाणी घालण्याचं काम प्रसारमाध्यमं इमानेइतबारे करत असतात. वृत्तपत्रांचे रकाने, पुरवण्या भरत असतात, दूरदरर्शनचे टीआरपी वाढतात, टाईम-स्लॉट कामी येतात. हल्ली तर फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कमुळे कलाकारांच्या ‘फ्रेण्ड्स-लिस्ट्स’ भरलेल्या असतात. आणि कित्येकदा आपली ‘फ्रेण्डशिप’ रिक्वेस्टदेखील अ‍ॅक्सेप्ट होत नाही.

जातिवंत कलाकार मात्र जाणीवपूर्वक ह्या सार्‍या झगमगाटापासून दूर असतात. त्यांच्या कलेवरील निष्ठेमुळे ते त्यांच्या कलाविष्कारात, तो जास्ती जास्त चांगला कसा होईल ह्यात मग्न असतात.

नाट्य-अभिनय हेच आपले जीवितध्येय मानलेल्या अशा १५ कलावंतांविषयी जाणून घेण्याची संधी मिळते ‘रंगमुद्रा’ ह्या पुस्तकामुळे. माधव वझे ह्यांनी ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकासाठी घेतलेल्या मुलाखती एकत्रितपणे वाचायला मिळतात.
गिरीश कर्नाड, नसिरुद्दिन शहा, बी. व्ही. कारंथ, सत्यदेव दुबे ह्यासारख्यांचा कला-प्रवास कसा झाला? हे समजून घेण्यासाठी ‘रंगमुद्रा’.

कोणाचेही चरित्र/आत्मचरित्र वाचताना त्याच्या सत्यतेविषयी मनात साशंकता निर्माण होऊ शकते, त्या कलाकाराच्या लिखाणात एकांगीपणा जाणवू शकतो. पण निव्वळ त्यांच्या कलेच्या संदर्भातील ह्या मुलाखती वाचताना मनात शंका निर्माण होण्याला फारसा वाव मिळतोच असं नाही. कारण त्यात मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात बोलता झालेला कलाकार आपल्याला भेटतो. प्रश्न-उत्तर अशा फॉर्ममधील हे सगळे लेख असल्याने कलाकाराबरोबर मुलाखतकाराचीदेखील ओळख होते.

शाळकरी वयात पारायणे केलेल्या ‘श्यामची आई’ पुस्तकातील ‘श्याम’ म्हणजे माधव वझे म्हणजे एक बालकलाकार’ एवढीच ओळख आजवर मनात कायम होती. ‘तो’ श्याम जेवढा आवडला होता तितकाच ह्या पुस्तकातून भेटलेला त्यांच्यातील मुलाखतकारसुध्दा आवडला. मुलाखतींचे काम एक प्रोजेक्ट म्हणून करायचे ठरवल्यावर त्यांनी सर्वांत आधी स्वत:ला विचारले, ‘तयार आहेस?’ आणि जेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळाले तेव्हा पुढच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. प्रत्येक कलाकारासाठी ४०-५०-६० प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. प्रश्नावली तयार करण्यासाठी आधी मनात प्रश्न निर्माण होणे आवश्यक! प्रत्येक कलाकाराविषयी, त्याच्या कलाप्रकाराविषयी, त्याच्या कलाविष्काराविषयी पुरेसा अभ्यास असेल तरच हे शक्य. तर असे अभ्यासू वृत्तीचे माधव वझे ह्यात भेटतात.

प्रत्येक मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांनी त्या-त्या कलाकाराशी साधलेल्या संपर्काविषयी, त्याच्या प्रतिसादाविषयी थोडक्यात आणि रंजक माहिती दिली आहे. सर्व कलाकारांनी तयारी करून, मनापासून उत्तरे दिली. बोलण्याच्या ओघात नवीन प्रश्न निर्माण झाले त्याचीही सविस्तर उत्तरे दिली. नासिरुद्दिनने एकामागोमाग एक उत्तरे नीट लक्षात ठेवून दिली. विजया मेहतादेखील ते प्रश्न समोर ठेवून बोलल्या त्यामुळे त्यातील काही प्रश्नांवर केलेली प्रश्नचिन्हे, मारलेल्या फुल्या हे मुलाखतकाराला नजरेस आले.

प्रत्येक कलाकाराने स्वत:ला जाणीवपूर्वक कसे घडवत नेले ह्याच्या बरोबरीने अभिनय कलेविषयी (जसं की रंगमच, रंगमंचावरील एकट्याचा आणि सहकलाकारांबरोबर केलेला वावर, संवादफेक, टायमिंग) सविस्तर माहिती मिळते.

ही साधी माणसं नटनटी म्हणून कसे तयार होत गेले? कुणाच्या बाबतीत हे खूप लहान वयात ठरवून झाले तर कुणाच्या बाबतीत नकळत. सुलभा देशपांडे- कामेरकर भगिनी, गिरीश कर्नाड, भास्कर चंदावरकर ह्यांना पोषक वातावरण घरात मिळाले.
नसिरुद्दिनना- शाळेतील शिक्षक आणि वडिलांचा धाक ह्या विरुध्द गोष्टींनी घडवले. नासिरुद्दिन शहा- शाळेच्या वर्गातील शेवटच्या बाकावरील अबोल मुलगा ‘झिरो’ ते ‘हिरो’.
एकदा ध्येयनिश्चिती झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला समृध्द करत नेणे. (सुहास जोशी- वाचनाचा फायदा आपण साकरणार ती व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी होतो हे लक्षात आले. आणि वाचन वाढवत नेले.) (सुलभा देशपांडे - रंगमचावर वावरताना भूमिकेत समरस होणे आणि रंगमंचीय शिस्तीचे भान राखणे )

पूर्वी दूरदर्शनवर ‘मुखवटे आणि चेहरे’ ह्या नावाचा कार्यक्रम होत असे. तो नव्याने सुरू झाला तेव्हा त्याचं खूप अप्रूप वाटायचं. आता ती नवलाई संपली. पण ‘मुखवटा’ चढवण्यासाठी ‘चेहर्‍या’ने घेतलेली मेहनत ह्या पुस्तकात वाचायला मिळते व कलाकाराला त्याच्या कलेच्या माध्यामातून थेट भेटल्याचे समाधानदेखील...

by Chitra Rajendra Joshi on Monday, October 8, 2012

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कुठल्याही निर्मितीक्षम माणसाने आविष्कृत केलेल्या कलाकृतीपर्यन्त तो कसा पोहोचतो, निर्मिती प्रक्रियेत कुठले व्यक्त आणि अव्यक्त घटक भूमिका बजावतात, हा सगळा प्रवास माझ्यासाठी नेहमीच उत्कण्ठावर्धक असतो. कलाकाराचे वैयक्तिक आयुष्य आणि कलायुष्य असे दोन भाग सरमिसळ झालेले असतात. ते कधी सापडेल, कधी सापडणार नाही. एखाद्या मुलाखतीद्वारे हे शोधून पाहणे ही प्रक्रिया कलाकारासाठीसुद्धा एक वेगळाच आयाम, वेगळेच भान देणारी ठरू शकते. मला वाटते अस्सल मुलाखतकाराचे हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे, ज्यामुळे मुलाखत देणार्‍यालाही बरेच काही लाभून जाते.
श्री. माधव वझे हे अशा मुलाखतकारान्त असावे अशी अपेक्षा (मी शाळेत असताना ते एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याञ्चे बोलणे आवडल्याचे आठवते. साधा वेष, मृदू व्यक्तिमत्त्व, सरळ सोपी, मुलान्ना समजेल अशी भाषा, असे ते आठवतात.).
तुमच्या पुस्तक परिचयाने पुस्तक मिळवून वाचणे हे गरजेचे झाले आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
एक प्रश्न - पुस्तकाचे प्रकाशन वर्ष काय आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक,

प्रकाशन वर्षः सप्टेंबर २००८, किंमत ३२५/-, पृष्ठे:४१५.

तुमच्या नेमक्या प्रतिसादाबद्दल आभार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकाच्या प्रकाशन तपशीलाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! अतिशय बोलका परिचय आहे..
पुस्तक वाचायलाच हवे.

ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तक परिचय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक परिचय आवडला.
वाचायला हवे पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0