धागे उभे आडवे..

मनुष्य अनुभवाच्या साठ्यातून वेचून लिहितो म्हणतात. 'म. ला. व्यं. ' (महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पुलं ) च्या लिहिण्यावर इतकं लिहिलं गेलंय की आणखी लिहिणं म्हणजे पांढऱ्यावर (आणखी) काळं करणं.....पण तरीही पुलंचे वाङ्मय वाचलेल्या वाचकास त्यांच्या लिहिण्यात अटळ पुनरावृत्ती आढळते. तसे पुलं म्हणजे त्यांच्याच शब्दांत 'उत्कट, भव्य त्या सगळ्यासमोर झुकणारे' - गुण गाईन आवडी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत या सगळ्या पुस्तकांतून हा गुण दिसून येतो.
हे सारं साहित्य पुन्हा पुन्हा वाचताना त्यांचे एकमेकांत गुंतलेले धागे मिळाले, त्यांची गाथा -

सहजच सांगायचं तर त्यांचे फणसळकर मास्तर (गणगोत) थेट चितळे मास्तरांशी नातं सांगतात. फरक इतका की मास्तर नसलेल्या फणसळकरांना चितळे मास्तरांच्या माध्यमातून पूर्ण मास्तरकीचा दर्जा दिला. बाकी ऐवज तोच - स्वातंत्र्यपूर्व काळातले ध्येयवादी विचार - मुलांचं कल्याण व्हावं ही निरपेक्ष आणि मनोमन इच्छा - शेवटची ओळ पुरी करण्यास देणे हाही एक असाच जोडणारा दुवा.
त्यातून आभारप्रदर्शनाचा प्रसंग बापू काणेच्या आभारप्रदर्शनाची उगाचच आठवण करून देतो.

रामूभय्या दातेंच्या लेखात पुलंनीच त्यांच्या (दातेंच्या) व्यक्तिरेखेवरून 'तुझे आहे' चा काकाजी घेतला आहे का अशी विचारणा झाल्याचे म्हटले आहे. साहित्यिक चमत्कृतीतून त्यांनी हे नाकारले तरी काकाजींवरचा रामूभय्यांचा ठसा पुसताच येत नाही. तो इंदोरचा 'मझा' - दिलदारी, जीवन रसरसून जगण्याची इच्छा - सगळे षोक करून कसलाही 'शोक' न करणारा माणूस - बस बस; अजून काही सांगायची गरज नाही....

ब. मो. पुरंदरे अर्थात हरितात्या - दोघं इतिहास जगणारी माणसं, दोघेही इतिहासाला रुक्ष रुमालात बांधून न ठेवता प्रत्येक क्षणाची महती आपल्या खास शैलीत सांगून अंगावर रोमांच उठवणारे.. पुरंदरेंच्या व्यक्तिचित्रात पुलंच्या आजोबांचे (ऋग्वेदी) संदर्भ घातले की हरितात्या तयार.....

चिंतामणराव कोल्हटकर खुशीत आले की समोरच्याला 'मिस्टर' असं संबोधत हे वाचताना परोपकारी गंपू नजरेआड करता येणार नाही.

*%* .. अर्थात रावसाहेब - रांगडे, कोणाचीही भीडभाड न बाळगणारे व लौकिकार्थानं 'फुकट' गेलेले. त्यांचा रंग बहुदा 'बबडू'त मिसळला आहे. बबडू घरी भेटल्यामुळे त्याची भाषा जरा नियंत्रणाखाली असते; रावसाहेबांचा सगळाच व्यवहार खुल्लमखुल्ला... वरून रांगडे व रोखठोक पण आत कुठेतरी शैशव जपणारे व लहान मुलाच्या उत्सुकतेने जगाकडे बघणारे - बहुदा दोघांचेही शैशव उद्ध्वस्त झाल्यानं.....

अंतू बर्वा हा पुलंचा तुफान लोकप्रिय झालेला स्वयंभू विनोदी प्रकार. याचं मूळ कुठे असेल याची उत्सुकता मलाही होती, आणि गणगोतमधील आप्पा (पुलंचे श्वशुर) वाचल्यावर तेही कोडं सुटलं. त्यातूनच मग 'जावयबापू'ची गाठही उकलली. जावयाच्या भूमिकेतून जे कोकण बघितलंय तसंच नेमकं अंतू बर्व्यात उतरलंय यात शंका नाही.

शेवटला उल्लेख 'दिनेश'चा. पुलंनी त्यांच्या मेव्हण्याच्या लहानशा मुलाचं व्यक्तिचित्र रेखाटण्यामागे त्या मुलास त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर वाढवले हा इतिहास आहे, पण कदाचित आपल्या स्वतःच्या संसारवेलीवर न फुललेल्या फुलास पाहण्याची आसही त्यातून दिसते...

(पूर्वप्रकाशित)

field_vote: 
3.4
Your rating: None Average: 3.4 (5 votes)

प्रतिक्रिया

कोणत्याही लेखकाच्या कलाकृतीतील पात्रे ही पूर्णतः कल्पनेतून आलेली नसतात. ते बर्‍याचदा खर्‍या व्यक्ती आणि त्यावर पेरलेला "कल्पना ब्रॅन्डचा" मसाला, यांचे मिश्रण असते. हे केवळ पुलंच नव्हेत तर, सर्वच लेखकांच्या बाबतीत खरे असावे.

मात्र, पुलंनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या खर्‍या व्यक्तींचे चित्रण "गणगोत" ह्या पुस्तकात केले. त्यामुळे त्यांच्या इतर कलाकृतींतील (व्यक्ती आणि वल्ली वा इतर) पात्रांचे गणगोतमधील पात्रांशी असलेली साम्यस्थळे सहजपणे ओळखता येऊ लागली. अन्य लेखकांबाबतीत असे सहसा घडले नाही.

फारा वर्षांपूर्वी दूरदर्शनवर जयवंत दळवी यांची मुलाखत पाहिली होती (बहुधा "प्रतिभा आणि प्रतिमा" ह्या कार्यक्रमात). मुलाखतकर्त्याने दळवींच्या लेखनात वेडे जास्त कसे येतात असा प्रश्न विचारला. त्यावर दळवींनी - त्यांच्या परिचयाची एक व्यक्ती, बर्‍याच वर्षांनंतर भ्रमिष्टावस्थेत फिरत असलेली कशी आढळली, याचे वर्णन केले आणि म्हटले, "आता ही व्यक्ती माझ्या पुढील कुठल्यातरी नाटकात येणार आणि मग पुन्हा तुम्ही मला विचारणार - पहा दळवींनी पुन्हा एक वेडा चितारला!"

अवांतर - जेम्स बॉन्डच्या धाग्यावर एका प्रतिसादात जॉर्ज मिकेशचा उल्लेख आला आहे. ह्याच मिकेशचे "हौ टू बी अ‍ॅन एलियन" हे पुस्तक वाचताना, काही ठिकाणी, पुलंनी "अपूर्वाई"त ब्रिटिशांच्या स्वभाववैशिष्ठ्याच्या केलेल्या वर्णनाची आठवण येते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रावसाहेब आणि बबडू सोडल्यास बाकी साम्यस्थळे पुस्तक वाचतानाच पक्की होत जातात (रावसाहेब आणि बबडू मात्र तितकेसे पटले नाही).

अर्थात व्यक्ती आणि वल्लीतील पात्रे तुम्हाला खरंच भेटली आहेत काय यावर "भेटली आहेतही आणि नाहितही" असे पु.लंनीच दिलेले उत्तर बरेच काहि सांगुन जाते

"तो" आणि "ते चौकोनी कुटुंब" कोणावरून घेतले असेल याची मात्र अपार उत्सुकता आहे.

बाकी केवळ क्ल्पनेतल्या व्यक्तींची इतकी व्यक्तीचित्रे उभे करणारे अन्य लेखक पटकन नजरेसमोर येत नसल्याने इतरांशी तुलना करणे कठिण होऊन बसते. केवळ विनोदातच नाही तर व्यक्तीचित्रणातही पु.लंनी जी 'हाय स्टँडर्ड्स' निर्माण केली आहेत की त्यानंतर इतरांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणाला 'चित्रण' न म्हणता निबंध म्हणावेसे वाटु लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आणि त्यामागची कल्पना आवडली. काही व्यक्तिचित्रांमागची प्रेरणा मधू गानूंनी एका लेखात सांगितली आहे -

त्यांच्या आवडीचा मुख्य विषय 'पार्ले' आणि तिथली कसल्या ना कसल्या वेडानं झपाटलेली माणसं. दादासाहेब पारधी, बाबुराव परांजपे, त्यांचे आजोबा 'ऋग्वेदी', फणसळकर मास्तर अशी अनेक. माझंही बरीच वर्षे वास्तव्य पार्ल्यालाच होतं. त्यामुळे संदर्भही जुळत. 'मास्तर नसलेले फणसळकर मास्तर' ही व्यक्तिरेखा लिहून त्यांनी फणसळकर मास्तरांनाच नव्हे तर पर्यायानं पार्ले गावालाच चिरंजीव केलं आहे. कधी या गप्पात 'व्यक्ति आणि वल्ली' मधल्या मूळ व्यक्तीची जिज्ञासा पुरी होत असे. एकदा त्यांनी 'हरितात्या' या व्यक्तिरेखेची जन्मकथा सांगितली. भाईंच्या पार्ल्याच्या घरी 'बारोट' नावाचे एक गुजराथी गृहस्थ गणपतीच्या दिवसांत आरत्या म्हणायला येत असत. 'हरितात्या' या व्यक्तिरेखेचे बाह्य वर्णन या 'बारोट' गृहस्थावर बेतलेलं- मांजरपाटाची पैरण, पंचा आणि डोक्याला मळकट टोपी. नाकाची पूर्व धरून दक्षिणोत्तर टोपी घालायचे. हरितात्या कुठल्या गोष्टीत तल्लीन झाले की, त्यांचा एक डोळा कमालीचा तिरळा व्हायचा. या बाह्यांगाचं अंतरंग मात्र 'चांदोरकर' या इतिहास संशोधकाचं इतिहासप्रेम हे होतं. या दोन्हीच्या मिश्रणातून 'हरितात्या' हे लोभस रसायन तयार झालं होतं. 'चितळे मास्तर' हीसुद्वा दोन शिक्षकांच्या स्वभाववैशिष्टयांतून झालेली ह्र्द्य व्यक्तिरेखा.

निव्वळ व्यक्तिरेखांचे स्वभावविशेषच नव्हे तर काही हुकमी विनोद आणि काही सुभाषितं/उद्धरणं/कोटेशन्स क्वचित दोन वेगवेगळ्या पुस्तकांत वा लेखांत आढळतात. उदा. वूडहाऊसचे 'आय थॉट शी वॉज इम्मॉर्टल' किंवा 'आय डोन्ट हेट इन प्लुरल्स'; संत सोहिरोबांचा गोव्यातला सामान्य जनतेवरचा प्रभाव; दुकानातले बोर्ड ज्या भाषेत आहेत तीच त्या गावाची भाषा (हे रावसाहेबांचं मत म्हणून व्यक्तिचित्रात येतं आणि सीमावादाच्या संदर्भात लिहिलेल्या लेखात पुलंचं स्वतःचं मत म्हणूनही येतं) इ. अर्थात सुनील यांनी प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे हे स्वाभाविकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(हे रावसाहेबांचं मत म्हणून व्यक्तिचित्रात येतं आणि सीमावादाच्या संदर्भात लिहिलेल्या लेखात पुलंचं स्वतःचं मत म्हणूनही येतं)
Nice observation!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखक हा देखील शेवटी एक माणूसच असतो. तो जे सभोवताली पहातो, जे वाचतो, त्याला जे अनुभव येतात सारांश त्याच्या मेंदूमध्ये जे स्टिम्युलाय जातात त्यांची रिअ‍ॅक्शन त्याच्या लेखनात उतरणं सहाजिक असतं...
दुसरं म्हणजे मला नाही वाटत कोणताही व्यक्तिचित्रकार हा आपण लिहिलेल्या व्यक्तिचित्रातली मूळ खरी व्यक्ति कोण हे वाचकांनी ओळखावं अशी अपेक्षा बाळगतो. किंबहुना वाचकांनी असा काही खेळ खेळावा असंही त्याला अभिप्रेत नसतं. आणि स्पष्टच सांगायचं तर अतिप्रसिद्ध व्यक्तींची (गुण गाईन आवडी च्या स्टाईलवर) व्यक्तिचित्र लिहिण्यात फारसं आव्हानही नसतं. म्हणूनच माझ्या मते पुलंच्या गुण गाईन आवडी किंवा गणगोत पेक्षा व्यक्ती आणि वल्ली जास्त सरस ठरतं!
खरं कौशल्य असतं ते आपल्याला मिळालेल्या जनरल स्टिम्युलायमधून एका अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिचं असं चित्रण वाचकांसमोर उभं करावं की वाचकांना मात्र ती खरी व्यक्ती असल्याचा भास व्हावा!! तिथे आपल्या लेखनकलेला आणि नेमक्या शब्दयोजनेमधून वाचकांच्या नजरेपुढे एक प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेलं व्यक्तिमत्व उभं करायचं आव्हान असतं. जसं पेन्सिल किंवा ब्रश वापरून एखादा चित्रकार लोकांच्या बहिर्चक्षूंपुढे एक चित्र उभं करतो तसंच फक्त शब्द वापरून वाचकांच्या अंतर्चक्षूंपुढे त्या व्यक्तीचं चित्र उभं करायचा प्रयत्न व्यक्तीचित्रकार करत असतो. आणि कधीकधी जेंव्हा हा प्रयत्न सफळ होतो तेंव्हा व्यक्तिचित्रकाराला एक अनोखं समाधान मिळतं. वाचकांच्या टाळ्या वगैरे गोष्टी आनंददायक असल्या तरी दुय्यम असतात/ असाव्यात.
आणखी एक गोष्ट म्हणजे व्यक्तिचित्र म्हणजे केवळ व्यक्तीचं वर्णन नसतं. व्यक्तिचित्रात त्याबरोबरच एक कथानक असतं, एखादं थीम असतं. ते कथानकही फुलवत न्यायचं असतं, त्याचा योग्य ठिकाणी (आणि शक्यतो वाचकांना अनपेक्षित अशा ठिकाणी) क्लायमॅक्स करायचा असतो. म्हणून मला वाटतं की व्यक्तिचित्र हे वर्णन आणि कथा यांचा संगम असतं. ही दोन्ही अंग योग्य समतोल देऊन सांभाळावी लागतात अन्यथा व्यक्तिचित्राचाही चित्राप्रमाणे समतोल बिघडतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं कौशल्य असतं ते आपल्याला मिळालेल्या जनरल स्टिम्युलायमधून एका अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिचं असं चित्रण वाचकांसमोर उभं करावं की वाचकांना मात्र ती खरी व्यक्ती असल्याचा भास व्हावा!! तिथे आपल्या लेखनकलेला आणि नेमक्या शब्दयोजनेमधून वाचकांच्या नजरेपुढे एक प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेलं व्यक्तिमत्व उभं करायचं आव्हान असतं. जसं पेन्सिल किंवा ब्रश वापरून एखादा चित्रकार लोकांच्या बहिर्चक्षूंपुढे एक चित्र उभं करतो तसंच फक्त शब्द वापरून वाचकांच्या अंतर्चक्षूंपुढे त्या व्यक्तीचं चित्र उभं करायचा प्रयत्न व्यक्तीचित्रकार करत असतो. आणि कधीकधी जेंव्हा हा प्रयत्न सफळ होतो तेंव्हा व्यक्तिचित्रकाराला एक अनोखं समाधान मिळतं. वाचकांच्या टाळ्या वगैरे गोष्टी आनंददायक असल्या तरी दुय्यम असतात/ असाव्यात.

उदा. मॉफ्टिस यांचा शेरलॉक..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0