शांता गोखले: "त्या वर्षी"

शांता गोखले यांची "त्या वर्षी" कादंबरी अलिकडेच वाचली, आणि खूप आवडली. त्यातील पात्रे, त्यांच्या मधली नाती, आणि त्यांच्या दैनंदिन रुटीन मध्ये कादंबरी वाचकाला आपल्या सरळ, मोकळ्या भाषेने लगेच खेचून घेते. कथानकाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन भयानक, हिंसक घटना असल्या तरी तिचा एकूण वेग संथच राहतो. त्यामुळे पात्रांची छान ओळख पटते. एकूण हलकेच विनोदी टच असलेला संथपणा मला फार रुचकर वाटला. वाचून झाल्यावर बरेच दिवस कादंबरी डोक्यात घर करून बसली. त्या निमित्ताने काही स्फुट विचार.

कादंबरीत अशेष, हरिदास व फिरोझ हे चित्रकार, शारदा ही हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका, अनिमा ही शिक्षिका, व जानकी ही पत्रकार अशी मुख्य पात्रे आहेत. मुंबईत राहणार्‍या या कलावंत मित्र मीत्रिणींच्या जीवनातील एक वर्ष - इ. २००४ - हेच शीर्षकातले ’ते’ वर्ष. इराक व अफगाणिस्तानवरच्या हल्ल्यानंतरचा, गुजरातमध्ये झालेल्या भीषण कत्तलेनंतरचा काळ. कथानकाच्या सुरुवातीला, अनिमा बारा वर्षांपूर्वी दंगलीत खून झालेल्या नवर्‍याच्या स्मृतीत लिहीत असलेली रोजनिशी लिहायचे थांबवते. वर्गात अपेक्षित पोर्शनपेक्षा वेगळेच काही शिकवल्याबद्दल तिची शाळेतील नोकरीही जाते. मागचे मागे सोडून नवीन कोरे पान उलटण्याचा ती निर्णय घेते. तिचा थोडा भित्रा, पण संवेदनशील भाऊ आहे अशेष. जानकी कोल्हापूराहून मुंबईला नोकरीसाठी येते, आणि चित्रकलाजगताला कव्हर करताना अशेष, फिरोज आणि हरिदास या चित्रकारांची ओळख होते. प्रकाश जाधव हा असाच शहरात चित्रकार व्ह्यायला आलेला असतो. हरिदास हा यशस्वी, भपकेबाज शैलीचा दिलदार कलाकार, मीडिया डार्लिंग, तर फिरोज अत्यंत वैचारिक, शांत आणि श्रीमंत आहे. शारदा तशी मध्यमवर्गीय आणि बुजरी, पण संगीतसाधनेत नवीन काहीतरी शोधणारी गायिका आहे. अनिमा आणि अशेष यांचे सूरगाव झपाट्याने बदलत चालले आहे, आणि तिथे राहणार्‍या त्यांच्या आईशी त्यांचे नाते जुन्या निराशा, कडवटपणांमुळे बिघडलेले आहेत. अनिमाच्याच नजरेतून, खांद्यावरून, बहुतेक सर्व कथानक आपल्या समोर उभे राहते.

कलावंताने स्वत:च्या कलात्मक भाषेतून या वैश्विक राजकीय घडामोडींना, त्यांच्यातून उद्भवणार्‍या आव्हानांना कसे सामोरे जायचे, हे प्रश्न कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. कलेतील प्रयोगाच्या, किंवा नाविन्याच्या शोधामागे कुठली कारणे असू शकतात, व कुठली रास्त ठरतात; कलात्मक वस्तूचे बाजारातील मूल्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य, व नैतिक महत्त्व या गोष्टी कोणी ठरवायचं; पारंपारिक, शास्त्रोक्त कलापद्धतींमध्ये मूळ शास्त्राला धरून आजच्या समाजाशी, नवीन कल्पनांशी व समस्यांशी नातं लावू पाहणार्‍या प्रयोगांना जागा आहे का, या सर्व प्रश्नांशी हे कलाकार मित्र आपापल्या परीने झगडत असतात.

तसा राजकारण आणि कला, अथवा बाजार आणि कला, यांचा संबंध हा काही नवीन विषय नाही. बाजारीकरण आणि कर्मठपणाविरुद्ध गोखलेंनी मांडलेली संवेदनशील बाजूदेखील तशी नवीन नाही. कादंबरीत या प्रश्नांची मांडणी ज्या प्रयोगांद्वारे झाली आहे, ते प्रयोग मात्र नवे, ताजे आणि विचारप्रवर्तक आहेत. अशेष त्याच्या चित्रांद्वारे काळ्या रंगाची दीर्घ उपासना करतो. त्या काळोखात अडकून बसतो, पण स्वतःच्या भित्र्या, अनिर्णायी स्वभावाचा तिथेच, त्याच काळ्या रंगाने मातही करण्याचा प्रयत्न करतो. शारदा विरह रसाची नवीन मराठी बंदिश तयार करण्याचा प्रयत्न करून परंपरेतूनच नाविन्य कसे तयार करता येईल याचा शोध घेते. फिरोझ महाभारताच्या कथेत एका नवीन कृष्णाच्या शोधात असतो. सगळेच प्रयत्न यशस्वी होऊन समाधानकारक उत्तरे सापडतातच असे नाही. पण यशापयशापेक्षा सर्जनशील प्रयोग, आणि अर्थपूर्ण नाविन्याच्या शोधावरच गोखले जास्त भर देतात. चित्रकलेत आणि संगीतातील या प्रयोगांची अत्यंत सुरस रेखाटणी ही कादंबरीची जमेची बाजू आहे. या दोन्ही कलांचा गोखल्यांचा स्वत:चा खोल अभ्यास उघड आहेच, पण या कलापद्धतींतिल सर्जनशीलतेची क्रिया त्या इतक्या बोलक्या शब्दात उतरवतात की वाचकासमोर जणू अशेषचा काळा रंग झळकू लागतो, आणि शारदाच्या शुद्ध सारंगचे गोड स्वर ऐकू येतात. नवीन प्रयोग यशस्वी झालेत की नाही हे ठरवण्यास निर्मितीक्षमतेचे हे वर्णन वाचकालाच आमंत्रित करते. सर्जनशीलतेलाच एक चालतेबोलते पात्र म्हणून उभे करणे, हीच या कादंबरीची कलात्मक शक्ती आहे, आणि तिचे महत्त्वही.

या आकर्षक आमंत्रणामुळेच, कदाचित, लेखिकेने मूळ प्रश्नांबद्दल मांडलेले ठाम मत मला थोडे खटकले. गोखलेंच्या एकूण राजकीय दृष्टीकोणाशी किंवा कादंबरीतिल मूळ मुद्द्यांशी माझे दुमत नाही. एकीकडे काही धाग्यांतून त्या तरलतेने कलात्मक द्विधा कथानकात गोवतात. पण दुसरीकडे बाजारीकरणाची, सनातनी विचारांची, चळवळींची अगदी एकसूरी टीका करतात. मग उगीचच गुंता होऊन बसतो. हरिदाससारखा प्रतिभावंत आणि नावाजलेला चित्रकार प्रसारमाध्यमांचा कसा वापर करून घेतो हे मस्त, बारीक, काही अंशात साहानुभूतीने गोखले वर्णन करतात. पण प्रकाश जाधव सारखा नवखा, महत्त्वाकांक्षी चित्रकार निरनिराळ्या मोहांच्या तावडीत सापडतो, त्यासाठी मात्र कादंबरीत फक्त मात्र उपरोधच आहे, किंचितही सहानुभूती नाही. राजकीय टीकेत सुद्धा सर्वच काही येते - सनातनी वृत्ती, जागतिकीकरण, अमेरिकन साम्राज्यवाद, पर्यावरण, भ्रष्टाचार, लैंगिक आणि सामाजिक हिंसा, सांप्रदायकवाद.. हे सगळे एकमेकांशी निगडितच आहेत असे मान्य केले तरी, काही विषयांना उगीचच भोज्जा करून सोडून दिल्यासारखे वाटते. मोजक्याच पात्रांच्या व्यक्तीरेखांची सुंदर ओळख त्यांच्या नात्यांतून, गप्पागोष्टीतून, बारीकसारीक लखबींतूनच गोखले पटवून देतात. राजकीय चर्चादेखील उघड उघड न करता, तिचा संदर्भ प्रयोगांतूनच वाचकाला उमगू द्यायला हवी होती, असे वाटत राहिले. कारण हे प्रश्न शेवटी राजकीय स्तरावरचेच बनून राहतात - खोल, नैतिक पातळीवर, कलाकाराचे संपूर्ण भाव आणि विचारविश्व, किंवा कलेची भाषाच पालटून टाकणारे ठरत नाही. त्यांना ठळकपणे कथानकात आणल्याने त्यांचे महत्त्व अधिक पटते, असे होत नाही. म्हणूनच की काय, मला सर्वात जास्त आवडले ते अनिमा चे पात्र. फारसे स्पष्ट न बोलता, जास्त काही ठामपणे न मांडता, सगळ्यांमध्ये मिसळूनही एकटी राहणारी अनिमा कादंबरीच्या विवेकस्थानी आहे. तिच्या नजरेतून आपण तिच्याच मित्रांना, दीर्घकाल ओळखीतून तयार झालेल्या प्रेमळ पण तीक्ष्ण नजरेतून पाहतो, त्यांच्या स्वभावातील क्षमता आणि दोष, आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा बोधही होतो.

ही सगळी शहरी, सुखवस्तू, मध्यमवर्गीय मंडळी. मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी मिश्रित भाषा बोलणारी. अशी मिश्रित बोली नेमकी कथानकात पकडणे कठिणच. कादंबरी मराठीत असली, आणि त्यात थोडेफार हिंदी-गुजराती मिसळले असले, तरी ही सर्व पात्रे इंग्रजीतच जास्त बोलत असावीत की काय असा विचार मधूनमधून वाचताना आला. गोखल्यांना तरी हा (कॉस्ल्मोपॉलिटन?) idiom बरोबर जमला आहे, मात्र काही शब्दप्रयोग पाहता (आता लगेच उदाहरण आठवत नाही) मूळ इंग्रजी शब्द, अथवा वाक्प्रचार सुचल्यावर मग त्याचा मराठी अनुवाद उतरला आहे की काय, अशी शंका आली खरी. इंग्रजी-मराठी दोन्हीतून सतत लेखन करण्याचा हा परिणाम असावा. (या आधी "प्लेराइट अ‍ॅट द सेंटर" हे इंग्रजीत मराठी नाटहेसृष्टीवरील त्यांचे पुस्तक वाचले होते.)

कादंबरीच्या शेवटी फिरोजने केलेल्या कृष्णाच्या उपासनेची, चित्राची सनातनी झुंडाकडून नासधूस होते. पण पुस्तक बंद केल्यावर अशेषला तासंतास पलंगावर पडून राहिल्यावर आलेल्या स्फुर्तीचा नेमका,आनंदी क्षण, आणि कोर्‍या कॅनवास समोर चित्र काढायला तयार अशेष बराच वेळ माझ्या डोळ्यासमोर राहिला. सर्जनशीलतेला, कलेच्या उपासनेला वाहिलेल्या या सुंदर कादंबरीची हीच सर्वात प्रखर आठवण राहील असे वाटते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

कादंबरी वाचलेली नाही, पण समीक्षेवरून तिच्या बलस्थानांचा आणि कमकुवत साखळ्यांचा अंदाज येतो.

पात्रांची नावं रोचक वाटली. अनिमा व अशेष ही नावं विशेषतः. एनिग्मा आणि ऍशेस या शब्दांशी साधर्म्य आहे, आणि त्यांच्या व्यक्तिरेखाही त्याला मिळत्याजुळत्या वाटल्या.

मात्र एकंदरीत पात्ररचना संदेशदेऊ कलाकृतीसाठी केल्यासारखी वरवरची वाटली. म्हणजे गायक, चित्रकार, पत्रकार, मग त्यांच्यात यशस्वी, झगडणारा, व्यावसायिकतेच्या गर्तेत खेचला गेलेला वगैरे वगैरे. तसा प्रत्येक कादंबरीत काही ना काही संदेश भिडतो. पण 'मला हे सांगायचं आहे म्हणून तसं बोलू शकणारं पात्र टाकते' अशा पद्धतीने रचलेल्या कादंबऱ्यातली पात्रं फार जिवंत होत नाहीत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे चर्चा जर पात्रांच्या तोंडीच जास्त असेल तर तो आणखीन एक टर्नऑफ माझ्यासाठी. असो, हे सगळे कादंबरी न वाचताचेच तर्क आहेत. पात्रं जिवंत करण्यात यश मिळालं आहे की नाही हे तुम्हीच सांगू शकाल.

समीक्षा मात्र अतिशय आवडली. वाचता वाचता मनात आलेल्या प्रश्नांचं उत्तर पुढच्याच परिच्छेदात मिळालं असं दोनतीन ठिकाणी झालं. त्यावरून एकतर अत्यंत कौशल्याने समीक्षा लिहिली आहे किंवा आपली विचार करण्याची पद्धत सारखी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेला बेनिफिट ऑफ द डाउट द्यायचा झाला तर चित्रकला, पत्रकारी, ही क्षेत्रे त्यांचीच आहेत, आणि त्यांनी अगदी जवळून पाहिलेली, अनुभवलेली आहेत. काही भागांना सुरेख डॉक्युमेंटरी भाव आहे. त्यामुळे पात्रांची चौकट संदेशदेऊ भासली तरी ती कृत्रिम वाटत नाहीत. कुठले ही पात्र मग अनपेक्षित असे काही करत नाही, आणि वाचकाला मधूनच चमकून टाकत नाही एवढे मात्र खरे. पण शशि थरूर ची इंग्रजीत "रायट" म्हणून कर्कश्श संदेशदेऊ कादंबरी आहे, त्याच्याइतकी मात्र ही पात्रे प्रेडिक्टेबल नाहीत! आणि क्रियेटिव प्रोसेस ला गोखले खरोखर मस्त रेखाटतात.
प्रतिसादाबद्दल आभार - हमारे ख्याल मिलते जुलते हैं! Smile कादंबरी वाचनीय नक्कीच आहे, तुम्ही वाचलीत तर प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शांता गोखल्यांची 'रिटा वेलिणकर' आवडली होती म्हणून ही कादंबरी वाचण्याची इच्छा आहे, पण अजून जमलेलं नाही. परीक्षण आणि त्यावरून लक्षात येणारा कादंबरीचा आवाका रोचक वाटतो आहे. फक्त काही प्रश्नही पडत आहेत. 'रिटा वेलिणकर'मध्ये सामाजिक आशय होता; हा आशय प्रसंग, पात्रं, त्यांचं वर्तन आणि त्यांच्या परस्परसंबंधांतून व्यक्त होत होता. मराठी वाङमयातल्या काहीशा कृतक वाटणार्‍या निवेदकानं प्रत्यक्ष भाष्य/वर्णन करण्याच्या पद्धतीऐवजी किंवा ठोकळेबाज मुद्दे मांडत जाणार्‍या चर्चानाट्यांपेक्षा तेव्हा हे सरस आणि प्रगल्भ वाटलं होतं. आता तुमच्या परीक्षणावरून या कादंबरीतदेखील सामाजिक-राजकीय आशय दिसतो आहेच, शिवाय सर्जनशीलतेसारखा कादंबरीत हाताळायला अवघड असा विषय दिसतो आहे. हे शिवधनुष्य पेलताना आशयाशी प्रत्यक्ष संबंधित असं, टिप्पणी करणारं निवेदन किंवा ठोकळेबाज मुद्दे मांडण्यासाठी योजलेल्या पात्रांच्या चर्चा किती आणि आशयातला किती भाग प्रसंग-पात्रांचं वर्तन वगैरेंमधून सहज व्यक्त होतो हे जाणून घ्यायला आवडेल.

अवांतर प्रश्नः सर्जनशीलतेला मराठी कादंबरीत आशयस्थान देणार्‍या (आणि ढोबळपणा टाळणार्‍या) इतर कादंबर्‍या कोणत्या असा एक प्रश्न या अनुषंगानं पडला. पटकन मला फक्त पु.शि.रेग्यांची सावित्री आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अनेक कादंबर्‍यांचं होतं तसं, कथानकातली सटल्टी बर्‍यापैकी नीट पेलली असली तरी शेवटी-शेवटी ती निसटते. इथेही तसेच आहे. उदा. सूरगावातला "डॉ. भास्कर" पात्राभवतीचे कथानक, आणि हुसेन-स्टाइल अहिंदू चित्रकारावर हल्ला हे प्रसंग.

सर्जनशीलतेला, किंवा संशोधनाच्या आनंदाला आशयस्थान देणारी श्याम मनोहरांची "उत्सुकतेने मी झोपलो"?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रिटा वेलिणकर' आवडल्याचं समजल्यावर मैत्रिणीने 'त्या वर्षी' लगेचच रेकमेंड केली. लगेचच 'त्या वर्षी'ही वाचली. ललित लेखनाची समीक्षा हा प्रकार मला जमण्यातला नसल्यामुळे एवढ्या आखीवरेखीव प्रकारे कादंबरीबद्दल लिखाण सोडाच, विचार करणंही मला शक्य नाही. पण समीक्षा वाचताना "हो, मला असंच काही वाटत होतं" असं अनेक ठिकाणी झालं.
कलापद्धतींतिल सर्जनशीलतेची क्रिया त्या इतक्या बोलक्या शब्दात उतरवतात की वाचकासमोर जणू अशेषचा काळा रंग झळकू लागतो, आणि शारदाच्या शुद्ध सारंगचे गोड स्वर ऐकू येतात या तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे. चित्रकलेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तो भाग मुद्दामच अधिक वेळा वाचला गेला.

काही महिन्यांपूर्वी ही कादंबरी वाचली होती; आता पुन्हा एकदा उघडावी असं तुमची समीक्षा वाचून वाटत आहे.

१. 'शारदा संगीत' हे प्रकाश संतांचं पुस्तक आणि कादंबरीतलं शारदा हे पात्र संगीताभ्यासक आहे असं आत्ताच लिहीताना लक्षात आलं. हा निव्वळ योगायोग असावा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

योगायोगच असावा. नाहीतरी शारदा = सरस्वती = संगीत = साधना ही शब्दसाखळी अमर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर पुस्तकाचे तितकेच छान परिक्षण. हे पुस्तक मला आवडले , इतके की संग्राह्य वाटल्याने ते विकत घेतले आहे.

पहिल्यांदा मी हे पुस्तक वाचले तेव्हा गोंधळलो, अडखळलो. लेख्नाचा बाज, लेखनाचं 'टेक्शर' बरंच वेगळं आहे. (निदान माझ्यासाठी तरी) अजिबात सरावाचं नाही - नव्हतं. कित्येकदा एखादं वाक्य पुस्तक मिटून त्या प्रसंगाशी समांतर प्रसंगावर विचार करायला भाग पाडायचं. हे पुस्तक विविध प्रकारच्या अनेक टोकदार, नक्षीदार, रंगीत, रंगहीन प्रसंगी बटबटीत वाक्यांची नेमक्या प्रमाणातली उत्तम भेळ आहे.

पुस्तक- कथा डॉक्युमेंटरी पेक्षा एखाद्या अमुर्त चित्राकडे झुकते असे मला वाटते. पिकासो वगैरेंची चित्रे कशी सगळ्या 'मिती' एकाच पटलावर मांडतात तसंच काहिसं.. वेधक.. वेचक.. वगैरे!

सुरवातीला फार काहि कळत नाहि.. नुसतंच वेगळ आणि उठावदाअय काहितरी वाचतोय असं वाटतं. दुसर्‍या-तिसर्‍या वाचनात पुस्तक अधिक भेटत जातं असा माझा अनुभव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!