त्यांच्याकडे मोबाईल असता तर?

"मुलींना मोबाईलची गरज काय? आमच्यावेळी आया-बहिणींकडे कुठे होते मोबाइल? त्यांचा जीव गेला का?" असली विधानं करणार्‍या बहुजन समाज पार्टीचे राज्यसभा खासदार राजपाल सिंह सैनी सध्या मोठे चर्चेत आहेत. अहो पण या खासदारांना कोणीतरी सांगा रे, जीव म्हणजे सर्वस्व नाही. बाईची अब्रू हेच तिचं सर्वस्व. एकवेळ जीव गेला तरी चालेल, पण अब्रू गेली नाय पायजेल. लहानपणापासून मी पाहिले ते निळूभाऊंचे मराठी सिनेमे. त्यात निळूभाऊ सरपंच, पाटील असे कोणीतरी असतात. गावात नवीन मास्तर, नर्स म्हणून कोणीतरी 'पाखरू' आलेलं असतं. तिच्या नकारावर निळूभाऊ म्हणणार, "तुझ्या प्रेताशीही संग करायला मला आवडेल." थोडक्यात आम्हां मुलींना लहानपणापासून धडे मिळाले ते असेच, "जीव गेला तरी चालेल पण अब्रू ही वाचवलीच पाहिजे."

आणि असं आम्हाला शिकवू का नये? म्हणजे आपण आपला इतिहासपूर्व इतिहास पाहू. त्यात कोण कोण आहेत? अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा। यांच्याकडे प्रगत तंत्रज्ञान असतं तर? नाही, म्हणजे प्राचीन भारतात तंत्रज्ञान, प्रगती काहीच नव्हतं असं माझं म्हणणंच नाहीये, उगाच मला दगड मारू नका. पण मुद्दा असा की समजा अहल्येच्या घरी ल्यांडलाईन फोन असता आणि गौतमाकडे मोबाईल असता तर?

इंद्र अहल्येकडे मागच्या वेळेप्रमाणेच वेष बदलून आला. अहल्येची शिळा नंतर बनली, त्याआधी ती काही दगड नव्हती. तिला अर्थातच समजलंच की हा काही आपला नवरा नाही, हा तर इंद्र आहे. अहल्या दगड नसल्यामुळे, आणि आता तिच्याकडे फोन असल्यामुळे तिने नवर्‍याला मिस्ड कॉल दिला असता. नवर्‍याचा उलट फोन आला तर तो बिझी नाही, थोडक्यात आज तरी या इंद्राला घालवून देणं इष्ट. उलट फोन आला नाही तर "तुला माझ्यासाठी वेळच नाही, तुला माझी आठवणच येत नाही" असं म्हणता येतं. मग बिशाद आहे गौतमाची तिला शाप देऊन शिळा बनवेल! बायकोकडे दुर्लक्ष केल्यावर हा कोणत्या तोंडाने तिला शाप देणार! त्याला एकच तोंड होतं ना? इंद्र तसाही मामाच होता, त्याचं काही का होईना!

दुसरी तर आपली फेवरिट्टच आहे. सीता. सीताहरण झालंच नसतं तर रामायण कशाला घडलं असतं? (काही लोकं त्याही मागपर्यंत जाऊन दशरथावरच एकपत्नीत्व लादतात. म्हणजे त्यानेच तीन-तीन लग्न केली नसती तर पुढचे झोलच झाले नसते. दुसर्‍या बाजूने एकपती/एकपत्नीत्व अनैसर्गिक आहे म्हणून दुसर्‍या बाजूनेही लोकं कोकलतात. तर त्या फंदात न पडलेलंच बरं. तसंही आजचा विषय आहे, मोबाईल.) एकतर लक्ष्मणरेषा वगैरे काही भानगड करण्याची वेळच आली नसती. समजा, लक्ष्मणाने शक्तीप्रदर्शन म्हणूनही ती लाईन मारली असतीच तरी सीतेकडे फोन पाहिजे होता ब्वॉ! खरंतर राम आणि सीता दोघांकडेही. म्हणजे एकतर रामाकडे झकास 4G वाला फोन असता तर त्याने कांचनमृगाच्या शिकारीचा लाईव्ह व्हीडीओ बनवला असता. तो यूट्यूबवर आला असता तर माझी खात्री आहे, व्हायरलच झाला असता. सॉरी हां, थोडं अवांतरच झालं. हां तर, त्याने व्हीडीओ शूट करताकरताच सीतेला एकतर पाठवून द्यायचा. म्हणजे एकतर सीतेची खात्री पटेल, नवरा जंगला जाऊन झोपा काढत नाहीये, आपल्यासाठीच कष्ट करतोय. आणि दुसरं म्हणजे हरणाने कितीही चांगली मिमिक्री केली तरी सीतेला सरळ दिसणारच ना व्हीडीओत काय चाल्लंय ते!

आता तुम्ही म्हणाल, जंगलात कुठली आल्ये 4G सेवा? पण हा सगळा उत्तर भारतीयांचा डाव आहे. दंडकारण्य आलं महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्र अर्थातच by definition सर्वात महान राष्ट्र आहे, या एकमेव राज्याला भूगोलाबरोबरच इतिहासही आहे तर असं राज्य तंत्रज्ञानात मागे असेल का? त्यातून ज्यांच्या लोकगीतांंमधेही सतत "जी, जी रं जी" 3G, 4G च कशाला 10G ही असणार नाही का? असतं, त्यांच्याकडे पण कदाचित या अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांमुळे समजा तेवढ्यापुरतं नेटवर्क बंद केलं असेल तरीही सीतेला मोबाईलवर रावणाचं शूटींग करता आलं असतं. रावण कुठे नेतोय याची खडानखडा माहिती गूगल म्यापवरून रामाला एसेमेस करून कळवता आली असती. मग त्या वाली-सुग्रीवाच्या भानगडीतच रामाला पडावं लागलं नसतं, निष्कारण वालीवधाची बदनामी आली नसती... असो. तर सीता आहे कुठे हे तिने लगेच जीपीएस कोऑर्डीनेट्सवरून स्वतःच सांगितलं असतं. पूल तेवढा बांधायला लागला असता. शिवाय सीता कुठे आहे हे रामाला बरोब्बर समजतंय म्हटल्यावर रावण स्वतःच आधी हतोत्साह झाला नसता का सीतेच्या बाबतीत?

तिसरी आमची लाडकी द्रौपदी. हिची गोष्ट वेगळी सांगायलाच पाहिजे का? जाऊ दे, सांगते. तिच्यावेळेस एकतर मोबाईल आणि सॅटलाईट टीव्ही वगैरे सगळं होतंच. पण समजा, तिच्याकाळी फेसबुक असतं तर? मुळात ती रजस्वला आहे हेच कौरव आणि इतर सिनीयर लोकांना आधीच समजलं असतं. भीष्म, द्रोण वगैरे लोकांनी तिला दरबारात आणायला आधीच मनाई केली असती. त्यातून ते थोडे पुढारलेले आहेत असं मानलं तरी तिला द्युतामधे तिच्या नवर्‍यांनी पणाला लावलं आहे हे तिला आधी प्रसिद्ध करता आलं असतं. त्यावरच मुळात एवढ्या कॉमेंट्स आल्या असत्या की कौरवांपैकी दुर्योधन, दु:शासन आणि कर्णावर नैतिक दबाव आला असता. वस्त्रहरणाआधीचा तिचा आक्रोश एखाद्या युयुत्सुसारख्या भल्या कौरवालाही लगेच शूट करून शेअर करता आला असता. चार वाजता पत्रकार परिषद घेण्याचीही आवश्यकता भासली नसती. एवढ्या जगाने द्रौपदीचा आक्रोश बघितल्यावर बिशाद होती कौरवांची तिच्या वस्त्रापर्यंत हात नेणं सोडाच, शब्दसुद्धा नेण्याची!

आपला इतिहासापूर्वीचा इतिहासच बदलला असता तर आपला इतिहास वेगळा असता. आणि इतिहास वेगळा असता तर आजचे आपण वेगळे नसतो? निदान आतातरी भविष्यातला इतिहास बदलूया म्हणते!

4
Your rating: None Average: 4 (7 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

तिच्याकाळी फेसबुक असतं तर?

तिच्याकाळी फेसबुक असतं तर? मुळात ती रजस्वला आहे हेच कौरव आणि इतर सिनीयर लोकांना आधीच समजलं असतं. भीष्म, द्रोण वगैरे लोकांनी तिला दरबारात आणायला आधीच मनाई केली असती.

अररर!!! अरारारा!!!

असो. चालायचंच.

फेसबुकने आठवण करून दिली; आज चार वर्षं झाली मी काही बरं लिहिल्याला! असो. चालायचंच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडं (काय बरंच) घाईत लिहीलं

थोडं (काय बरंच) घाईत लिहीलं हे खरं आहे. गेले अनेक दिवस अशा प्रकारच्या बातम्या एवढ्या प्रमाणात येत आहेत की कधी एकदा लिहून मोकळी होते असं काहीसं झालं होतं.

कल्पनाविस्तार बोथट झाला आहे यापेक्षा थोडा डीफोकस्ड झालेला आहे असं मला वाटतं. अशास्त्रीय विधानं आणि स्त्रीद्वेष्टेपणा झालाच पण, त्यातच फेसबुकावर मतं मांडण्याची भाऊगर्दी, पत्रकार परिषदांमधे होणारे आरोप-प्रत्यारोप या सगळ्या मसाल्यामुळे मुख्य मुद्दा किंचित बाजूला पडला असं नंतर वाटलं.

काही नवीन सुचेल असं वाटलं तर काही महिन्यांनी हेच पुन्हा एकदा नीट लिहून काढेन.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मजा आली वाचायला. पण, पहिल्या

मजा आली वाचायला.
पण, पहिल्या परिछेदातला उपहास पुढे केलेल्या कल्पनाविस्तारात हरवला आहे किंवा बोथट झाला आहे असं वाटलं.

सहमत.

सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मस्तच. अभिज्ञ.

मस्तच.

अभिज्ञ.

सटवाईने ललाटावर लिहिलेल्या

सटवाईने ललाटावर लिहिलेल्या रेषा (ती नुसती रेषा ओढते आणि बाकी जागा रिकामीच ठेवते अशी मला अगदी लहानपणापासून शंका आहे तो भाग वेगळा!!) कधी पुसता येतात का? त्यामुळे मोबाईल असता त्या सा-यांकडे तरी विधिलिखित टळले नसतेच!! (स्माईल)

उदाहरणार्थ दौपदी रजस्वला आहे हे सीनियर लोकांना माहिती नव्हतं हे कसं काय? तसा निरोप दरबारात कळल्यावरही तिची व्हायची ती विटंबना होतेच की! असं बरंच सांगता येईल.

हं! तुम्हाला मात्र या लेखाऐवजी 'मोबाईल असूनही असं कसं झालं?', किंवा 'तंत्रज्ञान पुरेसं नाही, त्याची जाणही हवी' अशा थाटाचे लेख लिहायला लागले असते हे मात्र नक्की!!

(अवांतरः लेख 'मोबाईलवर' लिहिला आहे का? घाईघाईत लिहिल्यासारखा वाटतो आहे - शाळेत बाईंना/सरांना निबंध सर्वात आधी दाखवण्याच्या सोबत्यांच्या लगबगीची आठवण झाली त्यामुळे!)

मर्फीचा नियम

त्यांच्याकडे मोबाईल असता तर?

अनेक शक्यता आहेत.

- रेंज मिळाली नसती.
- मोक्याच्या वेळेस कॉल ड्रॉप झाला असता.
- ऐन वेळेस प्रीपेड कार्डावरची मिण्टे संपली असती.
- 'डॉक्युमेंटेशन मुख्यालयास पोहोचले नाही' या सबबीखाली, दहशतवादविरोधी कायद्याकडे बोट दाखवत मोबाईलकंपनीने खाते बंद केले असते. ('आखिर हिंदुस्तान है|')

अधिक शक्यता विचाराधीन आहेत.

काहीही!!

- ऐन वेळेस प्रीपेड कार्डावरची मिण्टे संपली असती.

लोकांच्या साडीची लांबी जेव्हा संपत नव्हती तेव्हा मिनिटांची चिंता?

ब्याटरी डाऊन झाली असती.

ब्याटरी डाऊन झाली असती.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मस्त

मस्तच. बाकी काही नाही तरी कोण्या एका महाविदूषिने iStreeAkshare नावाचं स्त्री-मुक्तीवादी अ‍ॅप काढून त्यावरुन इंद्र/रावण/कौरव वगैरे मंडळींविरोधात मोबाईल मंडळ चालवून छळलं असतं.

हे जरा जास्तच उपहासात्मक लिबिर्टी घेतली म्हणायची - इंद्र "मागच्या वेळसारखा वेष बदलून" म्हणजे? आणि "अहल्येला माहित होतं हा इंद्र आहे" म्हणजे? (स्माईल)

हाय टेक पांडवप्रताप

या लेखापासून इन्स्पिरेशन घेऊन :

खांडववनाचे दहन ( हाय टेक वर्जन )

अर्जुन इंद्रप्रस्थास आल्यावर मागाहून बलरामाने आंदण म्हणून नेटबँकिंग द्वारे पुष्कळ संपत्ती पाठवली .

एके दिवशी कृष्ण आणि अर्जुन यमुनेवर पोहायला गेले असताना एक अग्नी नावाचा आय डी असलेला ब्राह्मण 'मी अग्नी आहे .श्वेतकेतू नावाच्या राजाच्या यज्ञात होमामध्ये सतत १२ वर्षे तुपाची धार पडत असल्याने मी कृश झालो आहे .तेव्हा मला खाण्याकरता खांडववन द्यावे ' अशी रीक्वेस्ट दोघानाही पाठवतो .आणि सोबत क्वाड्राजेत इंजिन असलेला विजयरथ , गांडीव धनुष्य ज्याला 'अनलिमिटेड एमो' आहेत याची कुरियर ने ट्रान्स्फर करतो .

तर कृष्णार्जुन अग्नीला बोलावून घेतात आणि अग्नीसह रथातून खांडववनी जातात . याबद्दल गुगल वर लाईव न्युज अपडेट पाहून इंद्र प्रलयमेघाला पाण्याचे टेंकर घेऊन पाठवतो पण कृष्णार्जुन पेट्रोल चा वापर करून अग्नीला अजून भडकवतात त्यामुळे आग विझत नाही . त्यात कृष्णाने खान्डववनाची सीक्युरीटी सिस्टम हँक करून सगळे दरवाज्यांचा पासवर्ड चेंज करतो . त्यामुळे रावणाचा सासरा मयासुर हा त्या भयंकर अग्नीत अडकतो आणि कृष्णार्जुनाला शरण जातो .

त्याच वेळी तक्षक सर्प त्याच्या ९९ पुत्रांसह कुरुक्षेत्रास गेल्याने त्याची बायको १०० पुत्रासह वनात अडकलेली असते . निकराचा प्रयत्न म्हणून ती बेबी कॅरिंग बेल्ट चढवून ग्लायडर द्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करते परंतु अर्जुन तिला रडार वर ट्रेक करून बाण मारून खाली पाडतो . याबद्दल तक्षकाला अपडेट मिळताच तो अर्जुनाच्या वंशातील एकाला तरी विष देऊन संपवायच्या मिशनची आखणी करण्यास सुरवात करतो .

इकडे खांडववन जाळून तृप्त झालेला अग्नी कृष्णार्जुनाला धन्यवाद देतो. इंद्रप्रस्थास आल्यावर मयासुर कृष्णार्जुनाच्या पराक्रमाबाबत भले मोठे स्टेटस फेबुला पोस्ट आणि सर्व जण त्यास लाईक करतात .

है शाबास!

है शाबास!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा : हा :..मजा आली.. पण

हा : हा :..मजा आली..
पण इतकीशीच का मजा ? अजून भर्पुर मासले देता येतिल पुराणातले.
श्रीकृष्णाला रुक्मिणीला 'मिस कॉल' देऊन आरामात पळवता आले असते...इ.इ.

समजा हं समजा (अवांतरः कोणाला

समजा हं समजा (अवांतरः कोणाला आठवतायत का रामदास पाध्ये?) इतिहासपूर्व इतिहास कशाला अगदी शिवाजी महारांच्या काळात फोन असते तर बाजी प्रभुंना तोफांचे आवाज ऐकु येईपर्यंत लढत रहावे लागले असते का? रामदासांबरोबर (आपले रामदास नव्हेत.. रामदास स्वामी) खलबते करायला शिवथरघळ गाठावी लागली असती का?

गेला बाजार घराघरात फोन असते तर शोले सुद्धा कित्ती कित्ती वेगळा बनला असता नै?

बाकी लेख जमलाय ध मा ल!
फक्त आटोपता का घेतला?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिवाजी महारांच्या

शिवाजी महारांच्या काळात

विनोदी लेखनातला हा मुद्राराक्षसाचा विनोद फारच आवडून गेला.

रा रा ऋषिकेश यांच्या घरावर

रा रा ऋषिकेश यांच्या घरावर ब्रिगेडचा "शांततापूर्ण" मोर्चा काढण्यात येईल.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आहा.. भारी विषय. मनात फार

आहा.. भारी विषय. मनात फार काळ हा विषय रेंगाळत होता. रामायणापर्यंत मागे नव्हतो गेलो पण असंच काहीसं वाटत होतं.. धमाल लिहीलं आहेस.

मी असा विचार करायचो की आताच्या चालू पिढीला (करंट अशा अर्थी !! (डोळा मारत) फार पुराणकालीन कथांबाबत असा प्रश्न पडत नसेलही पण मधल्याच काळातल्या (दोनतीन दशकांपूर्वीच्या) कथाकादंबर्‍या खूपच अप्रस्तुत किंवा कालबाह्य वाटत असाव्यात त्या एका मुख्य कारणाने, ते म्हणजे मोबाईलफोनमुळे या ७०-८० च्या दशकांतल्या बर्‍याच कथांचे मुख्य जर्म्स नष्ट झाले असते. आयुष्य बदलणार्‍या चुकामुकी, ठरलेल्या जागी वाट पाहून निघून गेल्यानंतरचे गैरसमज, अत्यंत लाईफचेंजिंग असं पत्र त्या व्यक्तीला उशीरा किंवा न पोचणं (ते कोणीतरी लपवणं), प्रवासाला निघाल्यावर घरात काहीतरी क्रिटिकल विसरणं किंवा तत्सम काहीतरी..

मला हे जाणवलं ते फास्टर फेणेची एक गोष्ट वीसेक वर्षांनी मुलासाठी पुन्हा वाचताना. सहलीला निघताना घरी मांजर चुकून फ्रीजमधे अडकलं आहे हे सहलीच्या ठिकाणी गेलेल्या लोकांना एका लहान बाळाच्या बोबडण्यावरुन अर्थ लावताना एकदम भयानकरित्या स्पष्ट होतं आणि त्यांचा मांजराला वाचवण्यासाठी इमर्जन्सीत परतीचा प्रवास अशी कथा आहे.

त्यांचा नोकर घरी असतो. कथा त्या त्या काळात जाऊन वाचावी असं म्हटलं तरी तो काळ इतकाही जुना नाही वाटत आणि आजचा संदर्भ कायम मनात असल्याने असं वाटतं की एका फोनवर होऊ शकणार्‍या सोल्युशनपायी किती कष्ट उपसले या सर्वांनी..

मला बहुधा माझं म्हणणं नीट मांडता येत नाहीये..

बरोबर

>एका फोनवर होऊ शकणार्‍या सोल्युशनपायी किती कष्ट उपसले या सर्वांनी..

अगदी अगदी...

अवांतर - अजुन एक गोष्ट आठवते, ती म्हणजे जर कोणाला यायला उशीर झाला तर एक पाणी प्यायचं भांडं (फुलपात्र??) दरवाज्याजवळ पालथं करुन ठेवायचं असा एक प्रकार असायचा.
ती व्यक्ती घरी आली की मग देवासमोर दिवा लावून, गुळाचा खडा नैवेद्य ठेवला जायचा.

नंतर फोन आले व मग उशीर होईल वगैरे संदेश देणे सोपे झाले. वाट बघणे, हूरहूर व ही भांडं पालथ ठेवणे प्रथाही संपली...

नंदनचा प्रतिसाद मस्तच!

हॅ हॅ हॅ. मस्त. आनंद साधले

हॅ हॅ हॅ. मस्त.

आनंद साधले यांचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात असं म्हटलं होतं की रामाचे वनवासात जाणं, सीतेचं अपहरण हे (राम-सीतेने जॉईण्टली बनवलेल्या) एका ग्रॅण्ड प्लॅनचा भाग होते. त्यामुळे मोबाईल असता तरी सीतेने आपले अपहरण होऊ दिलं असतंच. (जीभ दाखवत)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

नितिनजी

तुम्हाला 'भ्रूसुंडी रामायणाबद्दल' सांगायचं आहे का ? कारण तो, आनंद साधले यांचा आवडता विषय होता त्या काळी!

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

कॉन्स्पिरसी थिअरी?

बाब्बौ, इथेही कॉन्स्पिरसी थिअरी? (डोळा मारत)

झकास

बाई,

रंगत असताना लेख आवरता का घेतलात? वाचायला मजा येत होती!

नैतिक दबाव... देवा....

नैतिक दबाव... देवा.... माझ्याकडे वळून पाहिलं मागच्या बाईनी, मी एकदम मोठ्यानी हसले बहुतेक..

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्यांच्याकडे मोबाईल असता

त्यांच्याकडे मोबाईल असता तर?....पुराणातल्या स्त्रीयांची प्रतिमा उलटीपालटी झाली असती की!

मजेदार लेखन!!

-अनामिक

आयफोन

सीतेकडे आयफोन असता
- तर रामाला 'फाईंड माय आयफोन' अ‍ॅप वापरून तिचा ठावठिकाणा शोधता आला असता.
- तर अर्थात आयओएस-६ वर अ‍ॅपलचे दिव्य मॅप्स अ‍ॅप असल्याने कदाचित तो श्रीलंकेऐवजी सौदी अरेबियात पोचला असता
.
.
.
.
.
.
.
.
- तर आज मध्यपूर्वेतल्या तेलाच्या खाणींवर भगवा जरीपटका डौलाने विहरताना दिसला असता.

बघा तेव्हा मोबाईल फोन असते तर आभूमध्यसिंधूसिंधू पसरलेल्या भारतराष्ट्राला आज पेट्रोलच्या किंमतीची फिकीर करावी लागली नसती!

लेख तर भारीच्चे पण ही

लेख तर भारीच्चे पण ही परतिक्रिया येक लंबर हाय!!!!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हहपुवा!

हहपुवा!

-------------------------------------------

करू का, करू?

तक्रार करू का तुम्ची? आं?
बज्रंग दला कडे तक्रार करू?
खुस्शाल आमच्या भावनांना ठेच पोहोचव्ताहात? (भले आम्हाला मराठी नीट बोलता येत नसो. पण सोन्स्क्रूती आम्हिच राखनार!)

सोन्स्क्रूतीरक्षक (आडकित्ता)
आमचे घोषवाक्य :*तळे राखील तो पाणी चाखील*

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-