ज्ञातिनग्न

"एखादी गोष्ट रद्द होण्यासाठी आधी तिची रद्दी होणं गरजेचं आहे" असं कुठेसं वाचून एकदमच पटलं. तिशीच्या वयानंतर विचारांचं सिमेंट वाळून घट्ट झालेलं असतं आणि अशा वेळी मनापासून काही पटणं कठीण. त्यामुळे आनंदही झाला.

त्याचं असं आहे ना की काही काही गोष्टी जगाच्या व्यवहारातून कटाप व्हायच्या असतील तर त्यांचं महत्व कमी झालं पाहिजे. त्यांची गरज कमी झाली पाहिजे. त्यांच्यातले तपशील कमी झाले पाहिजेत. पण याकरिता त्या विषयाची चर्चाच मुळातून कटाप केली किंवा त्या शब्दाच्या उच्चाराला प्रतिबंधित करुन टाकलं तर ती गोष्ट दबलेल्या अवस्थेत आणखी फोफावत राहतेच. एखादी गोष्ट रद्द होणं म्हणजे त्याविषयी कोणीही काहीही बोललं तरी त्यात दम न राहाणं.

कुंकू लावावं का? मंगळसूत्र घालावं का? असे खूप चर्चागुऱ्हाळ प्रश्न अशा सदरात येतात. त्यातले सगळेच प्रश्न जीवनमरणाचे किंवा हाय ऑक्टेन अस्मितेचे वगैरे नसतात.

पण याच सदरातला "जात" हा विषय मात्र ढुंगणावरच्या गळवासारखा अवघड आणि नाजुक वाटतो. एरवी आपण पब्लिकली किंवा आताशा आंतरजालावर तोंडातून ब्रा काढायलाही घाबरतो. जादूचे प्रयोग नव्हेत.. "ब्रा' हे अक्षरही काढायला घाबरतो अशा अर्थाने. ब्रा म्हणता दलितहत्या होईल की काय किंवा द म्हणता ब्रह्महत्या होईल की काय असं वातावरण दोन्हीकडून तयार होतं.

आपण स्वतः जात पात मानली नाही की झालं असा एक आदर्शवादी विचार नेहमीच मनात येतो. जातीच्या प्रश्नाला हे २१ अपेक्षित प्रश्नसंचातल्यासारखं मॉडेल उत्तर असलं तरी वास्तवात उपयोगी ठरत नाही. समाजात जाती आहेत. आजरोजीही आहेत. आणि त्यामुळे गंभीर समस्या अस्तित्वात आलेल्या आहेत हे मान्य करुन मग पुढे विचार केला तर सोल्युशन मिळेलच असं नाही पण मूळ समस्येहूनही भयंकर अशा "डिनायल"मधून तरी सुटका होईल.

म्हणजे बघा, काहीजण काही दहशत"वादी" असतात, काही ब्राह्मण्य"वादी" असतात, काही मनु"वादी" असतात, काही दलित"वादी" असतात, काही हिंदुत्व"वादी" असतात, काही समाज"वादी" असतात, काही इस्लाम"वादी" असतात, काही मूलतत्व"वादी" असतात,

..काही निधर्मी"वादी" असतात..

जातीचा उल्लेखच अशा काहींना नको असतो. मुळात म्हणजे "जातपात नसावी" ही एक भविष्यातली काल्पनिक, हवीशी असलेली आदर्श स्थिती न समजता ते थेट आजरोजी जातपात वगैरे काही नसतंच (भूतबीत सब झूट) अशा लॉजिकने जातीवाचक शब्दाचाच विटाळ मानतात. मग त्यावर चर्चा तर पुढचीच गोष्ट झाली. अशामुळे जात या संकल्पनेची रद्दी होत नाही तर ती दबलेल्या अवस्थेत जिवंत राहते.

जातीवर आधारित हत्याकांडं आणि थरथरवणाऱ्या वाईट घटना किती घडत असतील.. पेपरात फार थोड्या येत असतील.. एकदम मास किलिंग झालं तरच मीडियाचं लक्ष जातं तिकडे.

या तीव्र घटनांखेरीज वरवर रुढ आणि म्हणूनच न जाणवणाऱ्या पण खूप खूप मोठ्या परीघामधे अजूनही जातव्यवस्थेची मूळ वीण तशीच टिकून आहे याचा मुख्य पुरावा मिळतो वर्तमानपत्रातल्या मॅट्रिमोनी पुरवण्यांमधे आणि लग्नेच्छुकांच्या वेबसाईट्सवर. लव्ह मॅरेजमधे जातीबाहेर किती लग्नं होतात हा संशोधनाचा विषय आहे. पण जी काही आंतरजातीय लग्नं होतात ती लव्ह मॅरेजमधेच होत असतील असं वाटतं. ठरवून आंतरजातीय लग्न करणारं एखादं जोडपं जाहिरात देऊन बक्षीस लावूनच शोधावं लागेल.

कोणत्याही विवाहमंडळात जा, विवाहविषयक पुरवणीतल्या जाहिराती पहा. यामधे आधी लिहीलेली असते जात. मग वय,उंची वगैरे. व्यंग असलं तर सर्वात शेवटी.

"आंतरजातीय चालेल" अशा काही जाहिराती तुम्हाला दिसतील. त्यामुळे समाजपरिवर्तन झालंय असं म्हणण्याची घाई करू नका. त्याच जाहिरातीचा तपशील पुढे नीट वाचा..

- उच्चांतर्जातीय चालेल.

किंवा
-जातीची अट नाही (SC ST क्षमस्व..)

किंवा

ब्राह्मण पोटजातीतील चालेल.

किंवा

कऱ्हाडे / देशस्थ / कोंकणस्थ..

अशा उपअटी हटकून असतात.

बरं आंतरजातीय विवाहाला तयार असणं (अर्थात जातीची अट जाहिरातीत घातलेली नसणं) याचा अर्थ त्या स्थळात काहीतरी उणीव आहे असं मानलं जातं आणि अधिक माहिती पाहिल्यावर रूढ अर्थाची एखादी उणीव दिसते. अधिक वय, काहीसे व्यंग, घटस्फोटित (नाममात्र!!) असणं यापैकी कशाचीतरी भरपाई म्हणा किंवा तडजोड म्हणा, म्हणून जातीची अट शिथील केली जाते, तीही वरीलप्रमाणे स्ट्रिंग्ज अटॅच्ड पद्धतीने...

जोपर्यंत आंतरजातीय विवाह होत नाहीत तोपर्यंत जात या सर्वाच्या केंद्रस्थानी राहणार.. ती टिकून राहणार... आणि ठरवून आंतरजातीय विवाह होण्याची नजीकच्या भविष्यात तरी काही शक्यता दिसत नाही. मग जात कशी नष्ट होणार? तर ती गळून पडल्याने.. ओरबाडून काढल्याने नव्हे..

कोणतीही मुलगी करुन आण आम्ही तिला स्वीकारू.. पण अगदी ***ची नको आणू रे बाबा.. असाही एक जातीयदृष्ट्या सो कॉल्ड "लिबरल" लोकांचा प्रकार आहे. *** च्या जागा वेगवेगळ्या धर्मांच्या आणि जातींच्या नावांनी भरता येतील.

तेव्हा कितीही पुरोगामी म्हटलं तरी प्रत्येकाचं पुरोगामित्व लिमिटेडच..

अशा अळीमिळी गुप चिळी (किंवा तोंड उघडलंत तर तोंडात शिरेल अळी..) विषयावर लिहिण्याच्या धाडसातही आनंद आहे.

टॉक अबाउट एड्स मोहिमेसारखा आनंद..

टॉक अबाऊट जात म्हणजे लगेच आपण जातीयवादी असं नव्हे.

मला लहानपणी कोणत्याही ऐकीव किंवा छापील कथेमधे.... गोष्ट म्हणायचो आम्ही कथेला त्यावेळी.... तर कोणत्याही गोष्टीमधे..बोधकथेमधे वगैरे "एका गावात एक गरीब ब्राह्मण राहात होता" असं वाक्य सुरुवातीलाच दिसायचं. शिवाय घरी कधी उल्लेख होत नसला तरी शाळेत ठसठशीत अक्षरात आणि उच्चारवात जात नोंदवून घेण्याचा काळ आणि स्थळ असल्याने आपण ब्राह्मण आहोत हे तर माहीतच होतं. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. आपण गरीब आहोत आणि गरीबच राहणार असं वाटायचं.. गरीब ब्राह्मण, गरीब ब्राह्मण.. मनात अगदी बसलं होतं. हा गमतीचा भाग झाला.

त्यानंतर काही वर्षांनी मला ब्राह्मण असल्याचा थेट रागच आला होता.. आजीने जेव्हा माझ्या मुंजीचा विषय नेटाने लावून धरला तेव्हा.

आयला, टक्कल करायचं? मला जबरदस्त धसका होता त्या प्रकाराचा. टक्कल केलेल्या मुंज्या पोरांना इतर अवली पोरं बोटांनी खारीक मारायची ते पाहून कसंतरी व्हायचं. मी प्राण गेला तरी मुंज करणार नाही असं जाहीर केलं. माझ्या वर्गातल्या ब्राह्मण नसलेल्या पोरांचा, टू बी स्पेसिफिक, निलेश औंधकरचा मला जबरदस्त हेवा वाटायचा. याच्यामागे हे मुंजीचं लचांड नाही.. माझ्यामागेच का ही पीडा..?

माझी मुंज होऊ नये यासाठी आजीशी मी प्राणपणाने झगडा केला.. ती कधीच गेली, तरी आजतागायत मी मुंज होऊ दिली नाही. ती न होऊ देण्यामागे टकलाची भीती होती.. ब्राह्मण्याच्या रुढ समजुतींना शष्प स्थान नव्हतं त्यामधे.

जात आपसूक गळून पडण्याच्या प्रक्रियेची ही सुरुवात होती.

"मेल्या.. मांसमच्छर खातोस ब्राह्मण असून?", संस्कृतच्या सरांनी शहारत शहारत एक दिवस मला प्रश्न केला. त्यांना कुठून कळलं होतं कोण जाणे.

माझे बाबा लहानपणापासूनच मासे, मटण, शेवंडं, कोळंबी वगैरे ताजेताजे घरी आणायचे. काही कळायच्या आतच त्याची चव जिभेवर मुक्कामी आली होती. सरांच्या त्या प्रश्नाने मला एकदम खूप विचित्र वाटलं. एवढा टेस्टी पापलेट.. सुरमईची ती खमंग तुकडी.. ती खायची नाही? ते काही नाही.. मी खाणारच...

ढिल्या नाडीच्या पायजम्याच्या खिशात आणखी दोन कैऱ्या कोंबल्यावर घसरेल तशी माझी जात आणखी खाली गळली..

पण हे झालं ते अशामुळे की मुळात माझ्या अंगात घरातल्या लोकांकडून जात घट्ट चढवली गेलीच नव्हती. जी काही ढिल्या सैलसर गाठीची जात होती ती बाहेरच्या समाजातून अपरिहार्यपणे आलेली होती. म्हणून ती सहज गळली. सर्वांच्या बाबतीत हे शक्य असेल का? मला माहीत नाही.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात आल्यावर जातपात रोजच्या लाईफमधून खूपच लांब गेली. इथे लोकलमधे लिटरली घामात घाम मिसळत लोकांच्या समुद्रात डुंबावं लागत असल्यावर कोण जातीपातीचा विचार करणार?

या लोकलच्या खेचाखेचीत माझा जातरुपी पायजमा कधी पूर्ण सुटून गेला ते कळलंही नाही.. अगदी तुटून फाटून पडून गेला..
कोणत्या स्टेशनवर तेही माहीत नाही..

जन्मतः एक जात घेऊन आलेला मी ज्ञातिनग्न झालो. हो नग्नच. झाकण्यासाठी अन्य कोणत्याही इझमची नवी झूल न पांघरता..

नंतर खूप वर्षांनी माझ्या दिवंगत आजोबांची कोर्टातून सुटलेली शेतजमीन शोधण्यासाठी मी स्वतः मालक गावकुसात फिरत होतो.. गावगाड्यात नवीन असलेला.. अहो अमुक गट क्रमांकाची जमीन या गावाबाहेर कुठे आहे..तुम्हाला माहीत आहे का? असं विचारणारा..

तापत्या उन्हात कोळपून दिवस संपला, हैराण झालो. संध्याकाळ झाली. तरी काही पत्ता लागेना. शेवटी एका गावकऱ्याने विचारलं.. "बामणाची जमीन म्हणताय का?"

क्षणभर कळलंच नाही.. पण नग्नतेची जाणीव निरंतर सोबत असल्याने खळकन हसून म्हटलं.. "होय.. बामणाची जमीन.."

"हत्तेच्या.. चला दावतो मग..", ते म्हणाले.

सर्व्हे नंबरने दिवसभर न सापडलेली जमीन जातीने एका मिनिटात सापडली.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

गविराज
नेहमीप्रमाणे...

अतिशय सहजपणानं झालेली ही प्रक्रिया कुठलाही अभिनिवेश न बाळगता कथन केलीत.
सारेच हे करतील तो सुदिन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज सुंदर लिखाण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

ज्ञातिनग्न शब्द आवडला.
आता गावाकड बामनांच्या जमीनी र्‍हायल्या नाय.पण बामनांच्या जमीनी कसणारे लोक कूळ म्हणून लागले व मालक झाले. शेवटी कसेल त्याची जमीन.
जुन्नर तालूक्यात ओतूर जवळ ब्राह्मणवाडा म्हणून गाव आहे. त्याला कुणी बामनवाडा किंवा बाम्हनवाडा म्हणले नाही. आळेफाट्याजवळ एसटी नियंत्रक चला ब्राहमणवाडा कोण आहे बसा पटापट. अशिक्षित म्हातारी देखील कंडक्टरला एक ब्राह्मनवाडा दे अस तिकिट मागायची.
असो गेले ते दिन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वैयक्तिक ज्ञातीनग्न होतो आपण हे खरं. पण एरवी 'जात नाही ती जात', हेही खरंच. ज्ञातीनग्न होण्याची प्रक्रिया इतकीच मर्यादित नसणार. हात आखडता घेतला गेला असावा या लेखनात. त्यातील अनुभव बारकाव्यांसकट आणखी आले पाहिजेत. ज्ञातीभानाविषयी येतात, ज्ञातीनग्न होण्याविषयीही आले पाहिजेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जातीनग्न अजूनतरी होता आलेले नाही. म्हणजे जाती लक्षात घेत नाही मात्र नावावरून अनेकदा धर्म लक्षात येतो आणि आचरण वरवर सारखे वाटले तरी त्यानुसार छोट्या छोट्या गोष्टीत वेगळे होते असे स्वतःबद्दलचे दुर्दैवी निरिक्षण कधीतरी अस्वस्थ करतेच!

असो.

लेख आवडला हे वे सांनं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण जी काही आंतरजातीय लग्नं होतात ती लव्ह मॅरेजमधेच होत असतील असं वाटतं.

असे काही नाही.

प्रमाण कमी असेल, कदाचित खूपच कमी असेल. पण उदाहरणे पाहिलेली आहेत. (आणि 'ब्रॉडमाइंडेडनेस' वगैरे कोठलेही आव न आणता घडलेली पाहिलेली आहेत.)

ठरवून आंतरजातीय लग्न करणारं एखादं जोडपं जाहिरात देऊन बक्षीस लावूनच शोधावं लागेल.

यात बक्षीसपात्र असे काही आहे असे वाटत नाही.

"आंतरजातीय चालेल" अशा काही जाहिराती तुम्हाला दिसतील. त्यामुळे समाजपरिवर्तन झालंय असं म्हणण्याची घाई करू नका.

यात समाजपरिवर्तनाचा संबंध आला कोठे?

अहो, आपल्याच काय, परंतु जगातल्या बहुतांश समाजांत आज हजारो वर्षे नि कित्येक पिढ्यांपासून आंतरलैंगिक विवाहाची प्रथा रूढ आहे. झाला आहे जगात आंतरलैंगिक सलोखा? झाली आहे आंतरलैंगिक तेढ तसूभरही कमी? झाला आहे (कोठल्याही) एका लिंगाचा (कोठल्याही) दुसर्‍या लिंगावरील वर्चस्ववाद कमी? "आंतरजातीय चालेल" ही त्यामानाने अलीकडची गोष्ट आहे.

मुळात विवाहाचा आणि परस्परसलोख्याचा संबंध काय? विवाहसंस्थेचे ते उद्दिष्टच नव्हे - किंबहुना, असलेच, तर ते याच्या नेमके उलट आहे, असे आमचे नम्र प्रतिपादन आहे.. (कढी शिळी आहे; ऊत हा यायचाच. असो.)

बाकी, "आंतरजातीय चालेल" हे मुळी ज्ञातिनग्नतेचे द्योतकच नव्हे. जेव्हा असे काही लिहिणे मुळात सुचणार नाही, तेव्हा ती ज्ञातिनग्नता होऊ शकेल कदाचित. पण "आंतरजातीय चालेल"? ज्ञातिभेदांच्या अस्तित्वाच्या जाणिवेची ही उलट उघड कबुली नाही काय? वर परत "आम्ही कित्ती कित्ती ब्रॉडमैंडेड - आमच्या तीनतीन पिढ्यांत किनै, इंटरकाष्ट म्यारिजिस झालीयत"च्या भविष्य- किंवा वर्तमान- कालीन फुशारक्यांची शक्यता उघडी ठेवून? ('हो हो - आमच्याही तीनच पिढ्यांत काय, पण आमच्या घराण्याच्या अवघ्या ज्ञात इतिहासात आंतरलैंगिक विवाह होत आलेले आहेत - कीत्ती कीत्ती आम्ही ब्रॉडमाइंडेड! नि आमच्या काही पुरुष-पूर्वजांचे तर दोनदोनदा आंतरलैंगिक विवाह झाले होते - ते तर डब्बल ब्रॉडमैंडेड!' म्हणजे, लग्न कोणीही कोणाशीही करावे. तो ज्याचातिचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याची वाच्यता/चर्चा आणि/किंवा त्यावरून फुशारक्या कशाला?)

(त्याच धर्तीवर: प्रस्तुत लेख म्हणजे वस्तुतः एका प्रकारे ज्ञातिनग्न नसण्याचीच अप्रत्यक्ष कबुली नाही काय? अन्यथा, ज्ञातिनग्नास असला लेख लिहिण्याची गरज ती का पडावी, नि मुळात असा विषय तरी कसा सुचावा?)

याउलट, "अमक्यातमक्या जाती/पोटजातीचा/ची/चेच पाहिजे" ही अट निदान प्रामाणिक तरी आहे. (नि कदाचित उपयुक्तही असावी. कदाचित, A known devil is better than an unknown saint अशाही अर्थी. म्हणजे, असे समजा, की मी अविवाहित आहे, नि मला लग्न करायचे आहे. आता मला मद्रासी ख्रिश्चन / उत्तरप्रदेशी मुसलमान / मिझो / ९६ कुळी मराठा / मारवाडी / दक्षिण आफ्रिकी झुलू यांच्याविरुद्ध मनुष्य म्हणून काहीही भावना नाहीत. परंतु यांच्यापैकी कोणत्याही समाजातील व्यक्तीशी माझा विवाह झाल्यास भाषा/रोजची जेवणपद्धती/रोजची जीवनपद्धती यांची एक तर अडचण येईल, किवा अगदी अडचण जरी नाही आली, तरी रोजरोज त्या फरकांशी जमवून घेण्याची माझी इच्छा नाही, असे समजा मला वाटले. (वाटले, तर पु.लं.च्या धर्तीवर "कारण शेवटी आम्ही भटेंच, त्याला काय करणार?" असे कोणी खुशाल म्हणावे. वांदा नाही. म्हणणार्‍यांच्या ज्ञातिनग्नतेविषयी कोणताही प्रश्न आम्ही इतःपर उपस्थित करणार नाही. असो.) अशा फरकांशी जुळवून घेण्यात काही गैर आहे, असा दावा नाही. ज्याची/जिची इच्छा आहे, त्याने/तिने खुशाल जुळवून घ्यावे. पण म्हणून मीही जुळवून घ्यावे की नाही, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. समजा तशी इच्छा आणि/किंवा गरज मला वाटत नाही. तर मग त्याप्रमाणे माझे पॅरामीटर्स मी स्पष्टपणे मांडलेले बरे नव्हेत काय? की येतील तेथून येतील तितके अर्ज मी स्वीकारावेत, आणि मग एकेकीला टोलवत बसावे? प्रतिपक्षाच्या वेळेच्या अपव्ययाचे एक वेळ सोडा, पण मला काय दुसरे उद्योग नाहीत काय? मी मला (माझ्या निकषांनी) अनुरूप अशी जोडीदारीण शोधतोय, माझी गरज भागवतोय; तेथे 'सामाजिक न्याय' / 'सर्वांना समान संधी' वगैरे माझे उद्दिष्टच नाहीये. तर मग मी सरकारी टेंडरांची कार्यपद्धती मुळात का स्वीकारावी?) उलटपक्षी, जोडीदारणीच्या जात/धर्म/खाण्यापिण्याच्या पद्धती/जीवनपद्धती/(कदाचित लिंगसुद्धा) यांच्याशी जर मला खरोखरच काही घेणेदेणे नसेल, तर मग मला असे काही विधान करण्याचीही गरज नाही. 'जोडीदार पाहिजे' एवढीच जाहिरात दिलेली पुरेशी व्हावी, येतील ते अर्ज येऊ द्यावेत नि आलेल्या अर्जांपैकी सुयोग्य निवडीचा काय तो विचार करावा. फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्ह, लास्ट-इन-फर्स्ट-आउट, मेरिट लिष्ट, अडम-तडम-तडतडबाजा किंवा उचित वाटेल अशा अन्य कोणत्याही पद्धतीने. 'आंतरजातीय चालेल' हे मुद्दाम लिहिण्याची गरजच काय? म्हणजे, मी खरोखरच ज्ञातिनग्न असेन तर?

मुंबईसारख्या मोठ्या शहरात आल्यावर जातपात रोजच्या लाईफमधून खूपच लांब गेली. इथे लोकलमधे लिटरली घामात घाम मिसळत लोकांच्या समुद्रात डुंबावं लागत असल्यावर कोण जातीपातीचा विचार करणार?

मुंबईच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात रोजच्या व्यवहारांत जातीपातीचा विचार करण्यास वेळ नसतो, हे कदाचित खरे असेलही, परंतु त्यापलीकडे, वैयक्तिक जीवनात मुंबईकर ज्ञातिनग्न असतात, असा जर यातून काही निष्कर्ष निघत असेल, तर ती एक निव्वळ लोणकढी अशी थाप आहे, असे प्रतिपादन अतिशय नम्रपणे करू इच्छितो. असो.

आणि ठरवून आंतरजातीय विवाह होण्याची नजीकच्या भविष्यात तरी काही शक्यता दिसत नाही.

मुळात, ठरवून (म्हणजे, 'करेन, तर आंतरजातीयच करेन' असे ठरवून. पर्यायाने, 'प्राण गेला, तरी स्वजातीय जोडीदार निवडणार नाही' अशा बाण्याने?) असा आंतरजातीय विवाह कोणी का करावा, हे लक्षात येत नाही. लेको, लग्न करता, ते जोडीदार पाहिजे, म्हणून, की 'समाजात ज्ञातिनग्नता यावी' या आपल्या 'उदात्त' उद्दिष्टाचे वाहन म्हणून? (त्या परिस्थितीत, आरे मिल्क कॉलनीत असंख्य म्हशी - आणि रेडेसुद्धा - उपलब्ध आहेत, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. आंतरजातीयच काय, आंतरप्रजातिही होऊन जाईल अनायासे.) एखादी व्यक्ती जोडीदार म्हणून योग्य वाटली, आणि ती भिन्न जातीची आहे; ठीक आहे. स्वजातीय आहे, तरीही ठीक आहे. तेथे जातीचा प्रश्न येऊ नये. परंतु ठरवून (काही केल्या) परजातीय(च), या निकषामागील तर्क काही केल्या लक्षात येत नाही. ('समाजात ज्ञातिनग्नता कशीही करून आणणे' हेच जर अशा काही प्रकारामागील उद्दिष्ट असेल, तर असा निकष त्या उद्दिष्टास मुळातच हरवतो, असे सुचवण्याचा प्रमाद पत्करू इच्छितो.)

तूर्तास इत्यलम्|
===
(या प्रतिसादातील मुद्दे हे पुनःपुन्हा उगाळलेले, शिळ्या कढीला ऊत छापाचे आहेत, असे कोणास वाटू शकेल. आणि तसे ते आहेतही.

पण लेखाचा विषयच जेथे 'शिळ्या कढीला ऊत' छापाचा आहे, तेथे प्रतिसादांकडून तरी याहून वेगळी अशी अपेक्षा कोणी का बरे करावी?

असो. गविंकडून याहून बर्‍या (विषयावरच्या) लेखाची अपेक्षा होती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रदीर्घ आणि वेगळी बाजू दाखवणार्‍या उत्तराबद्दल धन्यवाद.

लेखाच्या विषयावरुन आणि कदाचित अस्पष्ट राहिलेल्या मांडणीवरुन तुम्ही म्हणताय तसं इंटर्प्रीटेशन होऊ शकतं.

मी इथे माझा प्रवास फक्त कथन केला आहे. आणि असं सर्वांच्या बाबतीत होईलच का हे मला माहीत नाही हे ही स्पष्ट म्हटलं आहे.

यात आंतरजातीय विवाहाबद्दल टिप्पणी जरुर आहे..(म्हणजे तसे झाले विवाह तर जात ही कल्पना मागे पडायला मदत होईल हे कदाचित खरं असेल, पण तसं व्हावं अशी माझी इच्छा आहे हे तर्कदृष्ट्या वाटत असलं तरी तसं नाही..)

लेखनात जसे विचार आले तसे लिहीले आहेत. लिखाणामधे "जातीयता निर्मूलनाचे उपाय सुचवण्याचा उद्देश" किंवा आंतरजातीय विवाहांचा प्रचार किंवा लोकांनी "आंतरजातीय पाहिजे" अशा विदाउट स्ट्रिंग्ज जाहिराती दिल्या पाहिजेत म्हणजेच समाजपरिवर्तन झालं असं होईल यापैकी काहीही उद्देश नाही. समाजपरिवर्तन व्हावं अशी माझी इच्छा किंवा उद्देश नाही. जातीयवाद नष्ट व्हावा अशी इच्छा किंवा उद्देश किंवा मिशन नाही. माझ्याबाबत आपोआप घडत गेलेली एक प्रोसेस लिहीली आहे फक्त, मागे बघून.

तसंच, "ज्ञातिनग्नता" हा "एक नवा पंथ" आहे आणि मी त्याचा पायोनियर असून अधिकाधिक लोकांनी काय वाट्टेल त्या उपायांनी (आंतरजातीय विवाह ऑर अदरवाईज) ज्ञातिनग्न व्हावं आणि हा ज्ञातिनग्न पंथ असाच वाढत रहावा असं कुठेही माझ्या लेखनातून वाटत असेल तर माझं म्हणणं मांडण्यात मी पार गंडलो आहे असं मान्य करतो. तसं असलं तर मीही एक ज्ञातिनग्नता(जात)वादी ठरेन.

तुमचं ओव्हरऑल म्हणणं पटतं आहे .. फक्त जातीबाबत कोणत्याही अँगलने तोंड उघडणे म्हणजे जातीयतेला अधोरेखित करणे असं असेल तर कोणत्याच नाजुक विषयावर काहीच मत व्यक्त न करणं योग्य ठरेल. पण अशाने तो विषय रद्दी होत नसून नुसताच दाबला जातो हेही मी याच लेखात म्हटलं आहे. विषय बोललाच नाही तर तो मागे पडत नाही. विषयाची रद्दी कधी होते, तर त्याविषयी बोललं तरी त्याला महत्व राहात नाही..

माझं म्हणणं अधिक स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला फक्त. यात मला तुमच्या म्हणण्याचा विरोध किंवा एकेक मुद्दा घेऊन खंडन करायचं नाहीये, कारण तुमच्या बाजूने तुमचं बरोबर आहे. आणि तुम्ही म्हटलेल्या मुद्द्यांचं खंडन करणं म्हणजे मी कोणत्यातरी एका (न-१)व्या "बाजू" ला डिफेंड करतोय, अतएव मी त्या बाजूचा (कल्ट, जात, पंथ, मतप्रवाह यांचा) फॉलोअर आहे असाही नवा आरोप माझ्यावर होऊ शकतो.. Wink

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त जातीबाबत कोणत्याही अँगलने तोंड उघडणे म्हणजे जातीयतेला अधोरेखित करणे असं असेल तर कोणत्याच नाजुक विषयावर काहीच मत व्यक्त न करणं योग्य ठरेल.

गविशी पूर्णतः सहमत.
लेखाच्या सुरुवातीपासूनच तो लेखकाचा प्रवास आणि त्याची वैयक्तिक मते आहेत हे जाणवत होते. कुठेही कसलाही 'उपदेश' न जाणवता एक प्रोसेस जाववली आणि तीही विथ 'गवि' टच असलेली (किंचीत कमी होता, पण किंचीतच)

- (ज्ञातिनग्न होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रांजळ लेखन आवडलं.

नग्न हा शब्द स्वतःच्या विचारांचं वर्णन करण्यासाठी आला असला तरी त्या शब्दाने अपेक्षा उगीचच वाढल्या आहेत. म्हणजे 'सगळ्यांनीच ज्ञातिनग्न व्हावं' हा संदेश आहे की काय अशी शंका येणं... म्हणजे रद्दी झाल्याशिवाय रद्द होणार नाही, आणि तोपर्यंत ती कारपेटखाली ढकलूही नये असा विचार असताना 'रद्द व्हावी' हा संदेश नाही, सद्यस्थितीचं व त्या परिस्थितीतल्या स्वतःचं चित्रण आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं.

पण खूप खूप मोठ्या परीघामधे अजूनही जातव्यवस्थेची मूळ वीण तशीच टिकून आहे

हे खरं असलं तरी एकंदरीत रद्दी होऊन रद्द होण्याची अत्यंत हळू पण अविरत पुढे जाणारी प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी ही वीण म्हणजे सुंभ जाऊन नुसताच शिल्लक राहिलेला पीळ आहे. दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकेत गुलामगिरी होती. त्या साखळ्या कायद्याने तुटून गेल्या तरी शेवटच्या कड्या गळून पडायला खूप काळ जावा लागला. अजूनही ती प्रक्रिया संपलेली नाही. भारतातली जातिव्यवस्था अधिक जुनी आणि अधिक बळकट असली तरी 'अशाश्वताच्या तलवारीवर शाश्वताचीही तुटेल ढाल' प्रमाणे ती मोडून पडते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडले.

"मी जातपात मानत नाही , माझं जातिव्यवस्थेबद्दल प्रबोधन झालेलं आहे, गावाकडून शहराकडे येतायेता मी जातिनग्न झालो" हा मेसेज इथे मिळाला, परंतु वैयक्तिक पातळीवर या बाबत तार्किक वर्तन करणार्‍या व्यक्तीचे सामाजिक प्रश्न, जातींचं राजकारण करणारी राजकीय व्यवस्था आणि प्रशासन, जातीवाचक अस्मितांना चुचकारणार्‍या संस्था आणि घटक यांच्याबाबतचे विचार काय आहेत ?

जातिविषयक लिखाण वाचताना त्यात आरक्षणाचा मुद्दा असणं मला अपेक्षित होतं. तो सापडला नाही. या संदर्भातला हा मुद्दा सर्वात अधिक बिकट आहे. जातिनिहाय आरक्षणे असावीत का ? असल्यास शिक्षण आणि नोकरी दोहोंमधे असावीत का ? नसल्यास का ? आणि मग सामाजिक न्यायाचे काय ? आरक्षण नको असे म्हण्टल्यास मागासवर्गीयांच्या उन्नयनाचा दुसरा मार्ग काय ?

या आणि अशा जटिल प्रश्नांचा विचार जातीयतेच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. तो असता तर लेख अधिक आवडला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेख आवडला. सविस्तर नंतर लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जातीपातीच्या गप्पा मारण्याने कूल पॉईंट्स कमी होतात, हे असं अगदी याच शब्दात नाही पण लहानपणापासून समजत आल्यामुळे तुमच्यासारखा प्रवास झाला नाही.

आडनावावरून जात समजते म्हणून आडनावं न लावणारे काही लोक भेटले. नंतर प्रश्न पडला, आडनावावरून जातच काय, भाषा, धर्म, देश इत्यादी गोष्टी समजू शकतात. (स्लाव वंशीय लोकांमधे काही आडनावावरून व्यक्तीचं लिंगही समजतं.) मग किती ओळखी आपण टाकायच्या? त्यापेक्षा आहे ती गोष्ट स्वीकारून त्यातली उच्चनीचता एवढा त्याज्य समजला जाणारा प्रकार आपण आपल्यापुरता का होईना, काढून टाकला तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग किती ओळखी आपण टाकायच्या?

सहमत आहे. माझं आधीचं नाव मला आवडत नव्हतं म्हणून मी ते बदललं पण नव्या नावालाही "म्हणजे कुठले, म्हणजे कोण?" हा प्रश्न अजूनही कधी कधी ऐकावा लागतो.
फक्त स्वतःचं नाव सांगितलेलं चालत नाही, लोकांना आडनाव ऐकायचंच असतं.
अगदी शाळू सोबती असोत, पुण्यात शिकायला आल्यावर भेटलेले पूज्य गुरुवर्य असोत की आधुनिक बँकेतल्या मॉड कारकूनबाई असोत, अनेक अप्रिय अनुभव आलेले आहेत.
नावं बदलून, धर्म बदलून, कातडीचा रंग बदलून नष्ट होणारा हा रोग नाही.
हा मानवी नागर संस्कृतीने दिलेल्या अनेक रोगांपैकी सगळ्यात दुर्धर असा रोग आहे. त्याला इलाज काय ते माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला नाही. 'ज्ञातिनग्न' हा शब्दही बटबटीत वाटला. मी माझी जात पूर्णपणे विसरलो आहे असे कोणी १०० टक्के प्रामाणिकपणे सांगू शकेल का ? ती आत्मप्रतारणा ठरेल. समजा, समोरच्याची जात कळली तरी त्याला जराही महत्व न देता त्याच्याशी नॉर्मल व्यवहार करता येतो. जाती माहित असताना सुद्धा जातिभेद न मानणं हे खरे सुदृढ मनाचे लक्षण आहे.

अवांतरः गुजराथी पेपर कधी वाचला आहे का ? त्यांत तर चक्क हिंदु मरण, जैन मरण, असल्या कॅटेगरीज करुन मरणाच्या बातम्या दिलेल्या असतात. ते वाचल्यावर मात्र मन खिन्न होतं. वाटतं, अरेरे, मेल्यानंतरही जात सुटू नये ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0