जपमाळकथा (एक प्रस्ताव)

नमस्कार. 'ऐसी अक्षरे' वर एक chain-story अथवा 'जपमाळकथा' सुरू करण्याचा माझा मानस अाहे. तपशील खालीलप्रमाणे:

(१) 'ऐअ'च्या सदस्यांपैकी सहा लेखक ही कथा लिहितील; सोयीसाठी त्यांना अापण क्ष-१ ते क्ष-६ अशी नावं देऊ. क्ष-१ कथेची सुरुवात करेल, त्यानंतर क्ष-२ कथेचा पुढचा भाग लिहील, त्यानंतर क्ष-३ लिहील, असं होत होत क्ष-६ नंतर क्ष-१ पुन्हा लिहील. (कथेचा शेवट कसा होईल यासाठी मुद्दा (५) पाहा.)

(२) सहापैकी एक लेखक मी स्वत: असेन. याखेरीज या प्रकल्पासाठी पाच स्वयंसेवकांची अावश्यकता अाहे, तेव्हा अापल्याला लेखक म्हणून भाग घ्यायचा असेल तर कृपया शनिवार, दिनांक १ डिसेंबर रोजी रात्री ११:५९ पर्यंत मला व्यनि करावा. (ऐअचे सदस्य जगभर विखुरलेले असल्यामुळे याकरता Greenwich Mean Time अर्थात ग्रिमवेळ प्रमाण मानली जाईल.) पाचापेक्षा अधिक नावे अाल्यास चिठ्ठ्या टाकून निवड करावी लागेल; कमी अाल्यास येतील तितक्यांवर भागवून घेतलं जाईल. अापल्याला स्वयंसेवक होण्याची इच्छा असेल तर कृपया खालचा मजकूर काळजीपूर्वक वाचावा.

(३) जपमाळकथेमध्ये लेखकांनी एकमेकांशी संपर्क करण्याला मज्जाव अाहे, इतकंच नव्हे तर लेखकांची अोळख गुप्त राहावी अशी अपेक्षा अाहे. म्हणजे उदाहरणार्थ, कथा लिहिली जात असेपर्यंत क्ष-३ ही व्यक्ती कोण अाहे हे 'ऐअ' व्यवस्थापन व मी यांखेरीज कोणालाही (म्हणजे इतर 'क्ष'ना देखील) ठाऊक नसेल. प्रत्येक लेखकाला कथेचा पुढचा भाग लिहिण्यासाठी तीन दिवस वेळ दिला जाईल, व प्रत्येकाने अंदाजे शंभर ते तीनशे शब्द लिहावेत अशी मर्यादा अाहे. (उदाहरणार्थ, 'कोसला'च्या माझ्या प्रतीत एका पानावर सरासरी अडीचपावणेतीनशे शब्द अाहेत. तेव्हा प्रत्येक 'क्ष' ने अर्धं ते एक पान लिहावं असा ढोबळ हिशेब अाहे.)

(४) जातं दोनदा फिरल्यानंतर (म्हणजेच प्रत्येक लेखकाने दोनदा लिखाण केल्यानंतर) कथा संपावी असा अंदाज अाहे, पण हा निर्णय या क्षणी अधांतरी ठेवलेला अाहे. जसजशी कथा वाढत जाईल तेव्हा तिचा अंदाज घेऊन ती कोणत्या लेखकाने संपवायची याचा निर्णय मी योग्य वेळेला घेईन.

(५) जपमाळकथेमध्ये प्रत्येक लेखकाच्या कल्पनाशक्तीला वाव असतो, पण ही कल्पनाशक्ती त्याने मोकाट सोडू नये अशी अपेक्षा अाहे. प्रत्येक लेखकाने अापला भाग लिहिताना इतरांना ही कथा पुढे न्यायची अाहे याचं भान ठेवावं, अाणि निरर्थक मजकूर लिहिणं, कथानकाला वाटेल तशा कलाटण्या देणं, काहीच्या काही पात्रांची भरताड करणं असले प्रकार टाळावेत. इतरांचा विचार करावा. सृजनशीलता जरूर वापरावी, पण चमकूपणा अथवा विध्वंसकपणा करू नये. (हा नियम मोडणाऱ्याचं लेखकत्व बरखास्त करण्याचा हक्क व्यवस्थापन राखून ठेवीत अाहे. अर्थात हा हक्क अपवादात्मक परिस्थितीतच वापरला जाईल.)

(६) कथा लिहिली जात असताना तो नेहमीसारखाच एक धागा असल्यामुळे इतर सदस्यांना तिच्यावर प्रतिक्रिया देता येतील. कथा संपल्यानंतर सर्व लेखकांची नावं जाहीर करण्यात येतील.

(७) कथेचं नाव हे काही प्रमाणात माझ्यावर अाणि काही प्रमाणात ब्रिटिश पाउंडाच्या विनिमयदरावर अवलंबून असेल. ते ठरवण्याची पद्धत अशी: सोमवार दि. ३ डिसेंबर रोजी ग्रिमवेळेनुसार रात्री दहा वाजता न्यूयॉर्क टाईम्सप्रमाणे समजा पाउंडाचा दर ८९ रुपये ४६ पैसे इतका असेल, तर माझ्या 'काजळमाया'च्या प्रतीतील ४६ व्या पानावरचा कुठलाही शब्द किंवा शब्दसमूह वापरून मी कथेचं नाव ठरवेन. हा विनिमयदर या क्षणी मला माहित नसल्यामुळे यात काहीशी अनिश्चिती अाहे. कथेचा विषय काय असेल, ती कौटुंबिक असणार की पौराणिक की सामाजिक की विनोदी, यातलं काहीही अाधी ठरवण्यात येणार नाही. ती जसजशी लिहिली जाईल तशा या गोष्टी अापोअापच स्पष्ट होत जातील.

वर म्हटल्याप्रमाणे, अापल्याला स्वयंसेवक होण्याची इच्छा असेल तर मला व्यनि करावा ही विनंती. या कथेत काय होतं याबद्दल अापल्याइतकीच मलाही उत्सुकता अाहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्त प्रस्ताव. विशेषत: ७वा मुद्दा आवडला.

प्रकल्पाला शुभेच्छा!
राधिका

राधिका

भारी कल्पना !
शुभेच्छा .

रोचक कल्पना.
कथालेखन हा काही आपला प्रांत नव्हे, तेव्हा 'उपक्रमास' शुभेच्छा. आणि हो, क्र. ७ भारीच आवडला.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

वाह! खूप रोचक प्रस्ताव आहे.
शुभेच्छा!

===
Amazing Amy (◣_◢)

उपक्रम उत्तमच आहे. लेखकाचे गणितीपण हे मुद्दा क्र. ७ वरून स्पष्ट होते Smile

(स्यूडोशेरलॉक)बॅटमॅन.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

या कथेत काय होतं याबद्दल अापल्याइतकीच मलाही उत्सुकता अाहे.

या कथेचं काय होतं याबद्दल मला उत्सुकता आहे. Wink

मुद्दा क्रमांक ७ विशेष आवडला.

.

ब्रिटिश पौंडाचा विनिमयदर 'फिक्स' करणे शक्य आहे काय?

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

वेल आर्बिट्रेजचा पर्याय कसा वाटतो???

.

(स्वगत: उत्तर देण्यापूर्वी, 'आर्बिट्रेज' म्हणजे नेमके काय, हे हळूच वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करणे आले. आणि, डोक्यावरून गेल्यास, उत्तराचा प्रयत्न सोडून देणे आले.)

(प्रकट:) 'आर्बिट्रेज' म्हणजे नेमके काय, याबद्दल काडीचीही कल्पना नसल्याकारणाने, तूर्तास पास. (हो, उगाच खोटे कशाला बोला?)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

माझे अज्ञान नॉट्विथ्स्टँडिंग, आर्बिट्रेज नाही असे मानूनच तर फायनान्शिअल सिक्युरिटीज ची किंमत ठरवली जाते, बरोबर ना?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

आर्बिट्रेज हे फॉरेक्स मधील रिस्क कमी करण्यासाठी केल जात. आर्बिट्रेज थोडक्यात सांगायच झाल तर रिस्कलेस गेन. समजा डॉलरचा भारतात दर ४५ असेल आणि लंडन मध्ये ४८ असेल तर त्याच कुठे विक्री खरेदी करायच याचा अंदाज बांधून फायदा मीळवला जातो. मी अंदाज यासाठी अस म्हटल कारण वरवर जरी सोप असल तर यात स्पॉट, फ्यूचर्स, ऑप्शन असे बरेच प्रकार असतात. परत त्यात डिव्हीडंड , ईन्टरेस्ट याचाही विचार केला जातो.

माझे अज्ञान नॉट्विथ्स्टँडिंग, आर्बिट्रेज नाही असे मानूनच तर फायनान्शिअल सिक्युरिटीज ची किंमत ठरवली जाते, बरोबर ना?

ईथे फॉरेक्स हा शब्द योग्य राहिल. फॉरेक्स ची किंमत त्या त्या देशातल्या सर्वोच्च बँका ठरवतात. आपल्याकडे आरबीआय. आर्बिट्रेज हे प्रामूख्याने गुंतवणूकदाराचा उपाय असतो. नुकसान कमीत कमी होन्यासाठी

.

आर्बिट्रेजची व्याख्या माहिती आहे. पण प्रश्न असा, की प्रत्यक्ष व्यवहारात आर्बिट्रेज संधी असली की धडाधड सगळे त्याचा फायदा उठवतात आणि त्यामुळे तशी स्थिती फार कमी वेळासाठी असते , त्यामुळे जणू ना के बराबर असेच त्याला ट्रीट केले जाते. तर हे कितपत बरोबर? की अल्गोरिदमिक ट्रेडिंगमध्ये त्याचा फायदा उठवतात?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सध्यातरी कुंपणावरूनच गोष्ट वाचण्याचा विचार आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जपमाळ हातात धरुन गोष्ट वाचण्यास सिद्ध आहे.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

मस्त कल्पना आहे.
(मला कथा लिहिण्याचा सराव नाही, आणि हुन्नर आहे की नाही, ते ठाऊक नाही. भरवशाचा असतो, तर माझ्या नावाची चिठ्ठी टाकली असती. नियमांबाबत मी भरवशाचा नाही, हे वेगळे सांगणे नलगे.)

पण पुढील भाग लिहीण्याकरिता पुढच्या लेखकास मागील लेखकाने लिहीलेला भाग वाचायला मिळेल काय ?

एका कथेचा धागा एकच असेल आणि एका वेळेला सहा कथालेखकांपैकी ज्याची टर्न असेल त्या एका सदस्यालाच तो संपादित करता येईल. लेखकांची आपसांत चर्चा होऊ नये, थोडक्यात मॅचफिक्सिंग वगैरे टाळण्यासाठी सहा लेखकांना क्ष-१ ते क्ष-६ असे आयडी तात्पुरते वापरता येतील आणि ज्याची टर्न असेल त्या क्ष लाच धाग्याचा मुख्य मजकूर संपादित करता येईल. जेणेकरून धाग्यातच गोष्टीचा भाग पुढचा भाग लिहीता येईल.

धाग्यावर प्रतिक्रिया मात्र सगळ्यांनाच देता येतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक गोष्ट नक्की की 'काजळमाया'मधल्या नव्व्याणवव्या पानाच्या पुढच्या पानांतले शब्द किंवा शब्दसमूह यावरुन कथेचं नाव ठरणार नाही Smile

कुठल्याही अनिश्चिततेत काही निश्चितता असते ती अशी!!

कल्पना रोचक आहे. कथा वाचण्यास उत्सुक आहे.

याहुवरील विनिमय दर वापरल्यास (चार डेसिमल्सपर्यंत विममयदर असल्याने) असा प्रश्न उद्भवू नये. अर्थातच 'काजळमाया'च्या एकूण पृष्ठसंख्या समजा शेवटच्या तीन आकड्यांपेक्षा मोठी असल्यास काय करायचे यासाठीही काही नियम ठरवावा लागेल.

लोक सहभाग नसल्याने फेल जातात असा अनुभव आहे.

(शुभेच्छुक अनुभवी) आडकित्ता.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

काय झालं पुढे? कथेचा पहिला भाग कधी येतोय?

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मुद्दा क्रमांक ७ मधे नमूद केलेला विनिमयदर एका पाउंडाला ८७ रुपये ९४ पैसे इतका निघाला, आणि त्याप्रमाणे 'काजळमाया' च्या ९४ व्या पानावर पाहताच तिथे 'वंश' या कथेची सुरुवात झालेली आढळली. विचारांती जपमाळकथेचं नाव 'वांझोटी?' असं मुक्रर करण्यात आलेलं आहे. (खुलासा: प्रश्नचिन्ह हा त्या नावाचाच भाग आहे.) त्याच्या अलिकडच्या, म्हणजे ९३ व्या पानावर 'दूत' ही एक अगदी वेगळ्याच विषयावरची कथा संपते, तेव्हा हा दर जर एक पैशाने कमी असता तर कथेचं नाव काहीच्याकाही पालटून गेलं असतं. एकूणच आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारपेठा हा किती दोलायमान प्रकार आहे आणि सामान्यांच्या जीवनावर त्याचे कसे दूरगामी परिणाम होतात याचा पुन्हा एकदा अनुभव आला.


मोठ्या प्रतिमेसाठी या प्रतिमेवर क्लिक करा.

एकूण नऊ स्वयंसेवकांनी नावं दिली होती, त्या सर्वांचे मनापासून आभार! त्यांतले पाचजण निवडले गेले आहेत, आणि क्ष-१ ने पेन्सिलने डोकं खाजवायला सुरुवात केली आहे. कथेचा पहिला भाग लवकरच अपेक्षित आहे.

लेखकांच्या नावाबद्दल गुप्तता पाळणं हा या प्रयोगाच्या spirit चा भाग आहे, आणि यासाठी सर्वच सदस्यांनी सहकार्य करावं ही विनंती.

पुरवणी:
तांत्रिक सोयीसाठी क्ष-१ ते क्ष-६ यांचं सामुदायिक नाव 'षड्रिपू' असं असेल. (पण क्ष-१ अत्यंत कामातुर अाहे किंवा क्ष-६ मत्सरी अाहे असा त्याचा अर्थ नव्हे.)

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

मग षड्रिपु कैसे?
ही तर पंच महा भूते?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हा खेळ परत चालू करा की.

+१ मला आवडेल सहभाग घ्यायला.

*********
आलं का आलं आलं?

प्रोफेश्वर, काय म्हणता?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.