सायन्स - इट्स अ गर्ल थिंग

आमच्या रोजमर्राच्या जिंदगीत काही फारशा गोष्टी घडत नाहीत. च्यायला सकाळी उठून घाईघाईत कामाला जायचं, मरेस्तोवर काम करायचं, मरेस्तोवर ऐसी वर पडीक रहायचं आणि मरेस्तोवर फेसबुक वाचन करायचं. मग संध्याकाळी परत यायचं, पोराचं आणि बायकोचं रडगाणं ऐकत जेवणापर्यंत वेळ काढायचा आणि मग थोडा टीव्ही वगैरे बघून झोपून जायचं असल्या दिनक्रमात काय विशेष घडणार? त्यामुळे आमची ध्येयं तशी छोटीशीच असतात. म्हणजे संध्याकाळी सहा वाजताच्या मीटिंगला प्रत्यक्षात हजर न रहावं लागता, फोनवरून ती घरूनच घ्यायची. आणि फोन म्यूट करून समोर टीव्ही बघत निवांत बसायचं. करू देत हवी ती बडबड. असं करताना आपल्याला जर काही प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ आली तर आधी टीव्ही म्यूट मग फोन अनम्यूट करायला सफाईनं जमणं हे आमचं ध्येय!

त्यामुळे उच्च ध्येयं बाळगणाऱ्यांबद्दल आम्हाला लय म्हणजे लयच आदर असतो. म्हणजे पाच पाच गुंडांना कुठल्यातरी आडबिल्डिंगीत निःशस्त्र भेटून दरवाजा आतून लॉक करणाऱ्या अमिताभबद्दल वाटायचा तसला आदर वाटतो. त्यांची निव्वळ विचारकर्तृत्वं बघून डोळे विस्फारतात आणि जबडा खाली पडून जमिनीला टेकायला लागतो.

विज्ञानाचा प्रसार हे उदात्त ध्येय आहे. आम्हाला साध्या ट्यूशन्स घ्यायला जमत नाही. ट्यूशन्स जाऊ देत, पोराला गणित शिकवतानाच नाकी नऊ येतात. असं असताना काही लोकं समाज आमूलाग्र बदलण्यासाठी विज्ञान सर्व जगात पसरवण्याची खूणगाठ मनाशी बांधतात हे पाहूनच थक्क व्हायला होतं. डडली मूरच्या कुठच्या तरी एका सिनेमात त्याची ऐशी वर्षाची आजी असते. डॉक्टरांनी व्यायाम सांगितला म्हणून एका तरुण पोराला पैसे देऊन घरी बोलवून ती त्याच्याकडून व्यायाम करवून घेते आणि स्वतः टक लावून बघते. तेवढीच एक्साइटमेंट तिला रगड. तसंच असं ध्येय बाळगणारांची महत्त्वाकांक्षा पाहूनच आम्हाला 'गगन ठेंगणे' होतं. पण काही लोकांचं नुसत्या आकाशाला स्पर्श करून समाधान होत नाही. त्या आकाशापलिकडेही त्यांना दशांगुळं जायचं असतं. त्यामुळे ते स्वतःसाठी आणखीन उच्च ध्येयं ठेवतात. कधीकधी आपल्या आकांक्षाशक्तीचं ओंगळ प्रदर्शन करताहेत की काय असं वाटावं इतपत! म्हणजे आता विज्ञानाचा प्रसार पुरेसं नाही म्हणून की काय ते म्हणतात 'स्त्रियांमध्ये विज्ञानाचा प्रसार' करणं आमचं ध्येय आहे.

इतकी मोठी ध्येयं सामान्यांना पत्करण्याजोगी नाहीतच. त्यासाठी मोठ्या संस्था हव्यात. म्हणूनच युरोपियन कमिशन यासाठी पुढे आलं. आणि त्यांनी स्त्रियांमध्ये विज्ञान पापिलवार करण्यासाठी एक व्हिडियो बनवून घेण्याचं घाटलं. आता असा महत्त्वाकांक्षी व्हिडियो बनवायचा तर खर्च येणारच. म्हणून त्यांनी चांगले सव्वा लाख डॉलर्स खर्च केले. व्हिडियो बनवणाऱ्यांना त्यांनी सांगितलं असावं, 'हे बघा, व्हिडियो कसा एकदम झ्याक झाला पायजेलाय. एकदम माडर्न असायला हवा. आपण मोठमोठ्या टीव्हींवर दाखवणार आहोत. आणि हा, तरुणाईला साल्लिड अपील व्हायला हवा बघा'. आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी आपण इतका खर्च करून अत्यंत भारी प्रॉडक्शन टीमच्या हाती सव्वा लाख डॉलर्स सुपूर्त केल्यावर युरोपियन कमिशनचं हृदय निश्चितच भरून आलं असणार. इतक्या उच्च ध्येयाकडे एवढी प्रचंड साठ सेकंदांची उडी मारायची म्हणजे त्यासाठी सव्वा लाख काहीच नाहीत.

प्रॉडक्शन टीमने पैसे स्वीकारले तेव्हा त्यांचंही मन तसंच भरून आलं असणार यात मला शंका नाही. रात्रीचा दिवस करून त्यांनी या गहन प्रश्नाला गवसणी घालण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार केला. त्यांनी तयार केलेला हा व्हिडियो बघून त्यांच्या विचारप्रक्रियेचा अंदाज घेता येतो.

स्त्रिया म्हणजे नक्की कोण? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला असावा. स्त्रीची व्याख्या करणं ब्रह्मदेवाच्या बापालाही जमणार नाही याबाबत त्यांचं एकमत झालं असावं. पण आपल्याला सव्वा लाख डॉलर्स मिळाले आहेत तेव्हा आपण याबाबत काहीतरी प्रयत्न तरी करायला हवा याबाबतही त्यांचं एकमत झालं असणार. म्हणून त्यांनी स्त्रिया आपल्याला कशा दिसतात यावर लक्ष केंद्रित केलं असावं. त्यांच्या ब्रेन स्टॉर्मिंग रूम मधल्या बोर्डवर काय वाक्यं लिहिली असावीत याचा अंदाज करता येतो.

----
स्त्रिया - बॉंड गर्ल - हाय म्हणजे प्रचंड हाय हील्स : येस. हाय हील्स यायलाच हव्यात. किमान सहा इंच उंचीच्या आणि टोकदार असायला हव्या.

स्त्रिया - फॅशन - अगदी बरोबर - वेगवेगळे जॅझी कपडे घातलेल्या मुली असायला हव्यात. आणि फॅशन करून कुठे जातात? त्या कॅटवॉक करतात. (एक टीम मॉडेल्सचा शो बघायला पाठवायची. कॅटवॉक अत्यावश्यक)

स्त्रिया - मेकप - हे तर अगदी मस्टच आहे. फॅशन सिंबॉल्स आणि ऍक्सेसरीज यायलाच हव्यात. लिपस्टिक्स, रंग, ब्रशेस सगळं आलं पाहिजे. काय काय वापरतात हे एखाद्या स्त्रीलाच विचारू.

स्त्रिया - तारुण्य - सगळ्या स्त्रिया तरुण असतात. एखादी किंचित वयस्कर ठेवू लेट थर्टीज वगैरे, पण तीसुद्धा चांगली फिगरवाली आणि भरपूर मेकप. वरच्या पॉइंटशी जुळणारं आहे. उत्तम.

स्त्रिया - बुद्धी - त्यांचा अपमान न करता त्यांची ऍटिट्यूड दाखवायची. म्हणजे 'अय्या, हे सायन्स म्हणजे, कित्ती कित्ती हार्ड ना!' असं दाखवायचं. कदाचित त्यांच्या हातून काहीतरी पडतं आणि त्या 'ऐय्या, पडलं' असं म्हणत उड्या मारतात वगैरे...

स्त्रिया - पुरुष - पुरुषांना विज्ञानातून आकर्षित करता येईल असं सांगायचं. म्हणजे लॅब कोट आणि चष्मा घातलेला कोणीतरी देखणा तरुण शास्त्रज्ञ. (नोट - खरे कोणी असे मिळणार नाहीत, तेव्हा मॉडेलच घेऊयात)

स्त्रिया - सेक्सी - बरोब्बर. हा अर्क आहे. सेक्सी स्त्रिया दाखवून सायन्स इज सेक्सी हा मेसेज अंडरलाइन करायचा! येस्स. हे झालं तर आपलं काम झालंच!

आउटलाइन - हायहिल्स घातलेल्या मेकप केलेल्या बायका कॅटवॉकवर चालत येतात. त्या विज्ञानसुंदरींना बघून एक विज्ञानस्टड थक्क होतो. मग त्या काहीतरी सायंटिफिक गोष्टी बघतात, करतात... काहीतरी पाडतात. आणि अधूनमधून लिपस्टिक्स आणि रंग आणि ब्रशेस. आणि सगळ्याला कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींचा फील.

परफेक्ट.
----

एवढी सुंदर रूपरेषा तयार केल्यावर त्यांच्यापैकी एखादा निश्चित म्हणाला असता. चला आपण आता बीयर प्यायला जाऊ. बरंय टीममध्ये कोणी बया नाही, नाहीतर इतक्या उशीरा कसं जायचं वगैरे कटकट केली असती. एखादा मात्र मनातच मात्र आपली 'सॅनिटरी नॅपकिन्स म्हणजे विज्ञानच' ही कल्पना बोर्डावर गेली नाही म्हणून खट्टू झाला असणार. किंवा कदाचित ती कल्पना पुढच्या सव्वा लाखाची म्हणून झाकली मूठच राहिली असेल. कोण जाणे.

अशी उच्च ध्येयं गाठण्यासाठी उडी मारायची कल्पनाही आम्हाला प्रचंड दडपून टाकणारी वाटते. बेडकाने चांद्रयानाच्या जागी उभं राहून चंद्राकडे झेप घेतली तर त्याची उडी पुरेशी उंच गेली नाही याबद्दल टीका करणारे खूप असतात. आम्हाला त्या बेडूकहृदयात सामावलेल्या भव्य दिव्य स्वप्नाचं कौतुक अधिक वाटतं.

तेव्हा तमाम बेडकांना आवाहन - फुगवा आपली छाती आणि मारा उडी. याच धर्तीवर मराठीत जर अशी फिल्म काढायची झाली तर त्यात काय काय घालाल? तुम्हालाच एखादा ऑडियो व्हिडियो काहीतरी करता येईल का? काही दर्जेदार ब्रेनस्टॉर्मिंग तरी? ज्यांच्या कल्पना आवडतील त्यांना सव्वा डॉलरच्या बजेटमध्ये नक्की वाटा मिळेल.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

तेव्हा तमाम बेडकांना आवाहन - फुगवा आपली छाती आणि मारा उडी. याच धर्तीवर मराठीत जर अशी फिल्म काढायची झाली तर त्यात काय काय घालाल? तुम्हालाच एखादा ऑडियो व्हिडियो काहीतरी करता येईल का? काही दर्जेदार ब्रेनस्टॉर्मिंग तरी? ज्यांच्या कल्पना आवडतील त्यांना सव्वा डॉलरच्या बजेटमध्ये नक्की वाटा मिळेल.

(ही वाक्यं आधी लिहायला विसरलो. म्हणून कोणी वाचायचं राहिलं असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा उद्धृत करतो आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान प्रसार वगैरे जाऊ दे... फिल्म आवडली आपल्याला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिल्म आवडलीच. अगदी अशाच प्रकारचा नव्हे, पण रिलेटेड शो होता "ब्यूटी अँड द गीक " म्हणून, एक्सएनवर त्याचा एकच एपिसोड पाहिला, अगायाया लैच हुच्च आयडिञा आहे Smile अर्थात गीक्स आणि ब्यूटीज या दोघांची सर्वांगीण उन्नती करण्याचा तो उदात्त प्रयत्न प्रचंड भावला हेवेसांनल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा हा! हा लेख म्हणजे शुद्ध यडपटपणा आहे.

बॉण्डगर्ल, फॅशन, बुद्धी वगैरे सगळेच मुद्दे योग्य, पण तो पिंक रंग विसरलास. आणि पाणी का मिथेनच्या रेणूची (किंवा अशाच एखाद्या साध्या रेणूची) रचना बघून एखादं मांजराचं पिल्लू बघून करावा तसा "aww this is so cute" चेहेरा, तो नको का? बायकांच्या चेहेर्‍यावर एकतर हा किंवा "मी किती सुंदर आणि जग किती बावळट" यापलिकडे काही भावच नसतात.

या व्हीडीओला उत्तर म्हणून तेरा डॉलर खर्च करून बनवलेला हा व्हीडीओही बघा:
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=rtZCq83v92s

या धर्तीवर 'गर्व से कहो'चा व्हीडीओ बनवायचा असेल तर दगडी चेहेर्‍याच्या, राठ माणसाला अक्कडबाज मिशा डकवून पांढरा डगला, पांढरं धोतर, कमरेला भगवी ओढणी, डोक्यावर भगवं मुंडासं किंवा फेटा असा जामानिमा करावा. हातात तुतारी द्यावी. हा माणूस बघून याला सिग्रेटही धड पेटवता येणार नाही असं वाटेल, पण तुतारीतून 'सर्वसाधारण मराठी' म्हटल्यावर जो आवाज येतो तो पार्श्वसंगीत वाजवावं. मग दोन-चार घोडेस्वार, छोटी त्रिकोणी दाढी आणि जिरेटोपवाला शिवाजीचं सोंग काढलेला, हातातली तलवार उपसून वगैरे असं काहीतरी करावं. जणूकाही तलवार नसेल तर हिंदू धर्म बुडेल आणि हिंदू धर्म बुडला की सगळी मानवताच खल्लास होईल आणि ते खल्लास न होण्यासाठी खास मराठी मनुष्यच पाहिजे. मग हा आला बाबाजी एका बाजूने घोडा उडवत, तलवार घेऊन की तुपकट चेहेर्‍याच्या नऊवारी, पैठणीतल्या स्त्रिया त्याला ओवाळायला. झालंच तर कसंतरी करून व्हिडीओत वडापावही घुसवावा. वडापावशिवाय मराठी तरूणांचं भलं कसं काय झालं असतं? 'सायन्स: इट्स अ गर्ल थिंग'च्या जागी 'गर्व से कहो ... ' हे हिंदी वाक्य किंवा 'जय भवानी, जय शिवाजी' चालेल. 'जय भवानी, जय शिवाजी'मधे एक प्रकारचा ताल आहे त्यामुळे ते टाळलेलं बरं.

-- (व्हीडीओशिवाय विज्ञानाला बळी पडलेली बेडकी) अदिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सायन्स किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात हिर्वळ वाढवणे समाजहिताच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे, त्यामुळे अशा उपक्रमांना आमचा भक्कम पाठिंबा आहे Wink

(परमलुख्खा) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिर्वळ वाढावी याच्याशी सहमत. त्यामुळे खडे मारायला मला आहे त्यापेक्षा जास्त कंपनी मिळेल हा माझा व्यक्तिगत फायदा. पण गवत नेहेमी दुसर्‍या बाजूलाच हिरवे असते असं म्हणतात. त्यामुळे हिर्वळ पिवळी पडली वगैरे तक्रारी मागाहून होऊ शकतात.

अवांतरः लुख्खा या शब्दाचा अर्थ मी भलताच (सोज्ज्वळ) समजत होते. या शिक्षणाबद्दलही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिर्वळ वाढावी याच्याशी सहमत
पण उदार्मत्वादी साय्टीवर वेगवेगळ्या हिर्वळी फुलवाव्यात
ही थोडी अफ्घाणातली हिर्वळ पहा
ही स्वस्तात वाढ्ल्ये
'अफ्घाणाकडे चला' हेसुधा एक उदात्त ध्येय आहे

http://www.youtube.com/watch?v=B_zhaji9eos

पुरुष म्हणजे नक्की कोण?
हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला असावा.
पुरुषाची व्याख्या करणं ब्रह्मदेवाच्या बाय्डीलाही जमणार नाही याबाबत त्यांचं एकमत झालं असावं.
पण आपल्याला झीरो डॉलर्स मिळाले आहेत
तेव्हा आपण याबाबत काहीतरी प्रयत्न तरी करायला हवा याबाबतही त्यांचं एकमत झालं असणार.
म्हणून त्यांनी पुरुष आपल्याला कसे दिसतात यावर लक्ष केंद्रित केलं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.