चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग १

(ही अपूर्ण लेखमाला उपक्रम वर पूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्याच्या पुढचे भाग लिहायची इच्छा असल्याने ऐसी च्या वाचकांसाठी पहिले काही भाग इथे पुन्हा प्रसिद्ध करत आहे. तसंच त्यावेळी लिहिताना माझ्या डोळ्यासमोर जी चित्रं निर्माण झालेली होती त्यात थोडा बदल झाला असल्यामुळे तेही या लेखांत परावर्तित होतील असे बदल काही ठिकाणी करतो आहे.)

कोलटकरांच्या कविता वाचताना, त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना, राहून राहून मला एका फार पूर्वी वाचलेल्या गणिताच्या पुस्तकाची आठवण येते. पुस्तक अगदी छोटेखानी होतं. लेखकाचं नावही आठवत नाही. पण त्यातला एक संदेश मेंदूवर कोरला गेला आहे. लेखकाने गणितं सोडवण्यासाठी आकडेमोड कशी करावी यापेक्षा गणिताला सामोरं कसं जावं याविषयी लिहिलं होतं. त्यासाठी 'गणित व गोंधळ' अशी संकल्पना मांडली होती. सामान्यत: गणित करावं लागतं ते काही खरे प्रश्न सोडवण्यासाठी. उदाहरणार्थ 'राजूने प्रत्येकी 6 रुपये प्रमाणे 6 लाल पेन्सिली विकत घेतल्या तर त्याला किती खर्च आला?' हा प्रश्न झाला. त्यातलं शुद्ध गणित वेगळं काढायचं झालं तर राजू, लाल, व पेन्सिली ही माहिती बाजूला काढावी लागते. हा 'गोंधळ' काढला की मगच 6 X 6 = ? हे 'गणित' शिल्लक राहातं. सामान्य विश्वाशी संबंध तोडला जाऊन तो प्रश्न गणिताच्या विश्वात जाऊन पोचतो. इथपर्यंत पोचलं की पुढची आकडेमोड ही सोपी, यांत्रिक असते. गणिताच्या आधारे प्रश्न सोडवायचे असतील तर आधी त्यातली 'अनावश्यक' माहिती किंवा गोंधळ प्रथम बाजूला काढावा लागतो. शुद्ध गणित एकदा सापडलं की ते सोडवणं तितकंसं कठीण नसतं. खरं कर्तृत्व असतं ते हा गोंधळ नक्की कुठचा व तो बाजूला कसा काढायचा हे ओळखण्यात.

आता तुम्ही म्हणाल की कवितेचा या गणित, गोंधळ वगैरेशी काय संबंध? कोलटकरांच्या कविता तरी अशी कोडी, प्रश्न या स्वरूपात समोर येतात. वाचताना एक चित्र उभं राहातं. पण त्या चित्रामागे काही कूट अर्थ दडलेला आहे असं जाणवतं. चिरीमिरीमध्ये राजूच्या ऐवजी बळवंतबुवा असतात, लाल पेन्सिलींच्या जागी रांडा असतात. आणि बळवंतबुवाची भडवेगिरी म्हणजे काय किंवा एकंदरीतच यातून कवीला काय सांगायचंय हा प्रश्न असतो. हा सोडवायचा कसा? बळवंतबुवाच्या विश्वापासून दूर जाऊन, त्या रूपकांचा पडदा उलगडून संकल्पनांच्या विश्वात कसं जायचं? यासाठी गोंधळ बाजूला करणं भाग पडतं. ही जबाबदारी कोलटकर वाचकावरच टाकतात. आणि ती पार पाडल्याशिवाय त्यांची कविता आपला पिच्छा सोडत नाही. 'हरलो, आता उत्तर सांगा' असं म्हणण्याची, किंवा शेवटच्या पानांवर ते वाचण्याची इथे सोय नाही. पण हा गोंधळ बाजूला केलाच पाहिजे, त्याशिवाय अर्थाचं गणितही सापडत नाही. गणिताचं उत्तर तर सोडाच.

गोंधळाचं नीर काढून टाकलं की शुद्ध गणिताचं क्षीर शिल्लक राहातं. तसंच कवितेच्या मांडणीचं, तीमधल्या रूपकांच्या वर्णनाचं पाणी बाजूला काढलं की अर्थाचं दूध हाती लागतं. गारगोटीच्या दगडासारख्या दिसणाऱ्या हिऱ्याला पैलू पाडले की त्याचं खरं सौंदर्य बाहेर येतं. कोलटकरांच्या कविता हे करायचं आव्हान देतात. द्रोण च्या बाबतीत हे लागू होतं. चिरीमिरी च्या बाबतीतही हे लागू आहे. द्रोण मध्ये काहीशी सरळसोट रूपकं होती. गोंधळ बाजूला करणं सोपं होतं. चिरीमिरीमध्ये या गोंधळात अनेक पात्रं येतात. नाचून जातात. फिरत्या रंगमंचाप्रमाणे त्यांची पार्श्वभूमी बदलते. एकाच चेहेऱ्यावरचे मुखवटे बदलतात. आणि मुखवट्यांप्रमाणे, पार्श्वभूमीप्रमाणे, नाटकाची जातकुळीही कधी सामाजिक कधी धार्मिक तर कधी राजकीयअशी बदलते. नाटकात होणारे भावकल्लोळ, पात्रांच्या शब्दांची फेक बदलते. द्रोण मध्ये जाणवलेलं एका महानदीच्या पात्राचं स्वरूप, तिच्या उपनद्या, झरे कालवे यांसकटचं, खूपच एकमितीय वाटायला लागतं. चिरीमिरीमध्ये हेच एखाद्या प्राचीन वटवृक्षाप्रमाणे प्रतीत होतं. एकच मूळ, एकच जीव, पण अनेक फांद्या अनेक पारंब्या... आणि म्हणूनच अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून बघितल्याशिवाय अर्थ पूर्णपणे गवसला आहे म्हणायला कठीण. काही कवितांचा तर अनेक वेळा वाचूनही अर्थ गवसत नाही.

चिरीमिरीच्या कवितांमध्ये बळवंतबुवा व त्याच्या रांडा येतात. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये.

तारेवरनं तिची
बोटं फिरली
लगेच बाई विसरली
देहभान

अशी वीणा वाजवणारी गजरा येते.

खरा देव कुठला सांगा खरी अंबु कुठली
खरं उत्तर दील त्याला देईन काढून चोळी

असं म्हणणारी अंबू येते. काही भूमिका उघड तर काही अतर्क्य. काही वेळा बुवा भडवेगिरी करतो, तर काही वेळा मडमेच्या झग्यात घुसतो आणि मार खातो. कधी बुवा आंघोळ करणाऱ्या बाईच्या मोरीत निर्लज्जासारखा उभा राहातो तर कधी टोमॅटोमध्ये चाराणे, आठाणे घुसवून पळवतो. या सर्वात काय साम्य आहे? काय वेगळेपण आहे? गोंधळ काय आहे? नक्की गणित कसलं मांडलंय? काहींना या कोड्यात बोलण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांची कविता नकोशी वाटते. ती कोडी सुटली नाहीत तर, डोकं दगडावर आपटल्यासारखं वाटतं. मला स्वतःला या प्रश्नांमुळेच कोलटकरांची कविता जिवंत वाटते. साद घालते.

कवितेत येणारा हा गोंधळ 'अनावश्यक' म्हणता येईल का? एकच गणित वेगवेगळ्या गोंधळाच्या आधारे मांडता येतं. एकच कंटेंट वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मांडता येतो. एखाद्या व्यक्तीचं चित्र आधुनिक फोटोग्राफीने घेतल्याप्रमाणे सप्तरंगात दाखवता येतं, किंवा सेपिया टोन्समध्ये घेतलेल्या, किंचित पिवळट झालेल्या फोटोतून दाखवता येतं, किंवा रविवर्म्यासारख्या कुशल चित्रकाराच्या कुंचल्यातून त्याचं तैलचित्र, पोर्ट्रेट होऊ शकतं. प्रत्येक माध्यमाची अदा निराळी. गोंधळाची जातकुळी वेगळी. 6 X 6 हे गणित म्हणजे राजूच्या सहा लाल पेन्सिली असू शकतात. किंवा युवराजने ब्रॉडला खेचलेल्या सहा बॉलमधल्या सहा सिक्सर असू शकतात. गणित बदलत नाही, पण नाट्य बदलतं. कवितेसाठी हे माध्यम, व त्यातून निर्माण होणारं नाट्यही महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीने हा गोंधळ देखील त्यामागच्या रूपकांत दडलेल्या अर्थाइतकाच महत्त्वाचा आहे. अर्थवाहीपणासाठी, त्या रूपकांना आवश्यक शब्दांना कोंदण करून देणारा. संगमरवरातून संगमरवर बाहेर काढण्यासाठी संगमरवरच बाजूला करावा लागतो, तसं काहीसं. कोलटकरांनी चिरीमिरीतल्या कवितांसाठी हे रंगरूप पकडलंय ते अस्सल मराठमोळं. कवितेच्या आत्म्याला मिळालेलं ते शरीर आहे कपाळाला टिळा लावणाऱ्या वारकऱ्याचं. आणि त्या वारकऱ्याशी समन्वय साधलाय रांडांशी. विठ्ठलाच्या भेटीला चाललेल्या रांडा, व त्यांसोबत त्यांची भडवेगिरी करणारा बळवंतबुवा.

पंढरपूरला जाऊन
विठोबाला कळवा
तो बळवंतबुवा भडवा
येतोय म्हणून

..

मुंबईहून कालच
निघाला तांडा
एकशेसात रांडा
संगती आहेत

पहिल्या चार कवितांत आपल्याला बळवंतबुवाची व त्याच्या प्रवासाची ओळख होते. त्यानंतर वारीच्या वाटेतले काही प्रसंग येतात. हळुहळू कवितांच्या वृक्षाला फांद्या व डहाळ्या फुटतात. बऱ्याच वेळा आधीच्या कवितेतून पुढची कविता फुलते. पहिल्या 'रूपावरचा अभंग' व 'निरोप' मधून पुढची 'नगेली', तीमधल्या उल्लेखातून 'ठेसन' येते. वारीच्या रस्त्यातल्या कविता येतात. मग विठ्ठलाला 'फुगडी' घाल म्हणणाऱ्या अंबूने त्या कवितेत उल्लेख केलेला 'फोटो' 'विटेवरची फुगडी' नंतर येतो. 'फोटो' कवितेत ती विठ्ठलाला म्हणते मी घोंगडी खरेदी करून आणि मृत्यूची विहीर बघून येते - लगेचच 'घोंगडी' आणि 'मौत का कुआ' या कविता लागोपाठ नंतर येतात. पहिल्या वीस कवितांना या अर्थाने एक प्रकारची सूत्रबद्धता आहे. ती वाढ नैसर्गिक (organic) आहे. आदल्या रूपकांचा केवळ आधार घेऊन या कविता स्वतंत्रपणे आपल्या ताकदीने उभ्या राहातात. पंढरीच्या वारीच्या शेवटच्या कविता सरळसरळ देवाला किंवा त्याच्या देवत्वाला आव्हान करणाऱ्या आहेत. ज्या देवाला चोखामेळ्याची लेकरं येणार म्हणून कापरं भरतं त्याला इरसाल शिव्या म्हणा किंवा 'हरवलेल्या' देवाला तुझी जात काय ते तर सांग? म्हणणं काय...

कोण रे तू कुणाचा देव
काय तुझं नाव सांग तरी
...

तुला खायला देतो दूधभात
पण आधी तुझी जात काय ते तरी सांग

वारीच्या सर्वार्थाने पवित्र प्रवासाला रस्त्यात पडलेलं 'चातुर्वर्ण्याच्या गाढवाचं मढं' कसं विटाळून टाकतं या आशयाच्या.

यानंतर अचानक हे सूत्र तुटतं. आणि झाडाच्या एकाच फांदीला नवनवीन डहाळ्या फुटत जाण्याऐवजी एकदम भलभलतीकडे वेड्यावाकड्या फांद्या फुटायला लागतात. ही वारी, तो विठ्ठल, त्याची रखुमाई निघून जातात. बळवंतबुवा राहातो. पण मग कधी गोरे सोजीर येतात, कधी गीताईचे आपल्या चक्रम अठरापगड नवऱ्याविषयीचे अभंग येतात. रंगमंच फिरतात. मुखवटे बदलतात. नाटकात अचानक रणदुंदुभी बंद होऊन भजन सुरू होतं. वेश्या व त्यांना भेटलेले शेट येतात. काही वेळा बळवंतबुवाला देवरूस बनवून कवी अंधश्रद्धा व श्रद्धांविषयी बोलतो.

तोंडाला येईल तो म्हणायचा मंत्र
डोक्याला येईल ते सांगायचा तंत्र

असा हरामी डॅंबीस आहे बुवा भोंदू
पण पंचमीला अहो आला की तो धोंडू

शेवटच्या काही कवितांमध्ये कोलटकर मृत्यूविषयी बोलतात.

योगासने तीर्थयात्रा किंवा इतर व्यायाम
काही नको द्या यमाला चिरीमिरी हरिनाम

(इथेच कवितासंग्रहाच्या नावाचा उगम आहे)

वारीच्या, विठ्ठलाच्या कविता वाचताना तयार झालेली नीटस रूपकांची मांडणी विस्कळीत झाल्यासारखी वाटते. मग प्रश्न उपस्थित होतो की या सगळ्या विविधरंगी गोंधळामागची गणितं काय आहेत? व्हॉट इज द मेथड बिहाइंड द मॅडनेस?

बळवंत्या देतो फेकून टोमॅटो
खिशात घालतो अर्थ त्याचा

कवीने टोमॅटोमध्ये लपवून ठेवलेले पैसे काढून घेऊन टोमॅटो फेकून देण्याचा उल्लेख चिरीमिरीतल्या 'टोमॅटो' या कवितेत केलेला आहे. अर्थवरचा श्लेष लक्षात घेतला तर कोलटकरांनाही हाच गोंधळ काढून टाकण्याचा मुद्दा मांडायचा आहे. चिरीमिरीतल्या सर्व कवितांचं रसग्रहण करणं शक्य नाही, मला त्यातल्या काही अनेक वेळा वाचूनही कळल्या नाहीत. पण काही ज्या गवसल्या असं वाटतं त्यांच्या आधारे हे गणित सोडवण्याचा हा प्रयत्न.

क्रमशः

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त लेख. कोल्हटकरांच्या कवितांबद्दल सर्वार्थाने उत्सुकता निर्माण करणारा. शिवाय लेखनशैली विशेष आवडली- त्या गणिती अ‍ॅप्रोचमुळे. बाकी कवितेचा अर्थ, तोदेखील अशा कवितेचा अर्थ लावणे म्हणजे एकदम बेयेशियन लर्निंगचा प्रकार आहे, कुठले प्रायर्स निवडावेत याबद्दलच्या मार्गदर्शनाची अपेक्षा येणार्‍या भागांतून पूर्ण होईल असं वाटतं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा! धन्यवाद. Smile
मी 'भिजकी वही' मागे चाळली होती. पण तेव्हा 'का-ही-ही कळलं नाही' असं वाटून जी बिचकले ती बिचकलेच. मग 'काय डेंजर वारा सुटलाय' या जयंत पवारांच्या नाटकाच्या निमित्तानं ती कोलटकरांची कविता पुन्हा भेटली. मग ही लेखमालिका गावली. कवितेला कुठल्या कुठल्या प्रकारे भिडता येतं / भिडावं लागतं, त्याचा आवाका ध्यानी येऊन एकदम टोपी पडल्यासारखं वाटलं. आज आत्ता अमुक एक साहित्यप्रकार आपल्याला झेपला नाही म्हणून काय, उद्या निराळा कळेल, रोचक वाटेल, असा दिलासा मिळून, आता अशा कवितेला बिचकायला होत नाही, हा या लेखमालिकेचा झालेला फायदा.
ही लेखमालिका तर इथे पुरी कराच. पण 'द्रोण' मालिकाही... मज्जा येतेय! येऊ द्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

थँक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुनर्वाचनाच्या नावानं...
मस्त! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुर्जी तुमचा लेख वाचून आता आपल्याला खरच कविता समजून घ्यायचा प्रयत्न सुरु करायला हवा असे वाटायला लागले आहे.
धन्यु. Smile

बाकी आधीच्या लेखमालेतील लेख देखील इथेच दिल्यास खूप बरे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

या ना त्या रुपात संत लोकांच्या लिखाणात वेश्या येतात. कधी नावं ठेवायला तर कधी स्व्तःला नावं ठेऊन घ्यायला.कोलट्कर जेव्हा हे रांडांचं नेपथ्य निवडतात तेव्हाच ते प्रचंड आवडून जातं. कारण ज्या सर्जनाच्या क्रियेला , त्या क्रियेतील सक्रिय भागीदाराला आपण शिवीच्या पातळीवर आणून ठेवला आहे त्या बिंदुपासून सुरु होणारी ही वारी देव धर्म अध्यात्म उलट्सुलट तपासत पुढे पुढे जाते.
लेख आवडला. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रिकेटचा उल्लेख वगळता लेख आवडला

- सोशल अनार्की आणि काहिसा तिरकसपणा हे साठोत्तरी पिढीचे बीट जनरेशनच्या साहित्यामधून आलेले प्रभाव आहेत -त्याला देशीय रंग देण्यात साठोत्तरी पिढी यशस्वी ठरली(गद्य आणि कविता दोन्हींत )
- विलियम कार्लोस विलियम्सच्या रेड व्हीलबॅरो या कवितेत चित्रांचा गोंधळ आहे. हा (इमेजिस्ट)गोंधळ आणि उपरोल्लिखित कवितांमधले शब्दांच्या स्तराखाली दडलेले अर्थ यात काहीसा सारखेपणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवात आवडली. पुढील लेखांची वाट पाहतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0