ब्रेड अँड बटर - भाग १- फ्रेंच बगेट

लहानपणी मला भातापेक्षा पोळीच जास्त आवडायची; पोळीच नव्हे तर त्या प्रकारात मोडणारे आणि तव्यावरून थेट पानात पडलेले भाकरी, पराठा, फुलका, नान वगैरे तत्सम पदार्थ आणि त्याबरोबर वाढलेले लोणी, तूप, तेल वगैरे स्निग्ध पदार्थ माझ्यादृष्टीने पंचपक्वान्नापेक्षा जास्त रुचकर असत. वयाबरोबर आणि अनुभवांबरोबर 'पंचपक्वान्नापेक्षा रुचकर' या कल्पनेत इतर अनेक गोष्टींची भर पडली तरी 'ब्रेड आणि बटर' ह्या शीर्षकाखाली येणारे सारे पदार्थ माझ्या खास आवडीचे राहिले आहेत. गरमागरम पुरी असो, मस्तं फुगलेला पीटा ब्रेड असो, लुसलुशीत फोकाचिया असो किंवा खरपूस फ्रेंच ब्रेड असो, माझ्यासाठी ते पूर्णान्न आहे.

सुपरमार्केटमध्ये मिळणारे ब्रेड हे अनेकाविध न उच्चारता येणारे प्रिजर्वेटीव्हज घालून तयार केलेले पुठ्ठे असतात याचा साक्षात्कार खूप पूर्वीच झालेला असल्याने ब्रेड मशीनचे आगमन आमच्या घरी बरेच वर्षांपूर्वीच झाले होते. स्वयंपाकघरासाठी विकत घेतलेल्या इतर अनेक उपकरणांच्या तुलनेत सर्वात अधिक उपयोगी ठरलेले हे ब्रेड मशीन आल्यापासून बाजारचे ब्रेड घरी येणे क्वचितच होत असे. कितीही धावपळीचा दिवस असेल तरी मशीनमध्ये साहित्य मोजून घालायला लागणारी दहा मिनिटे इतका वेळ निश्चितच काढता येत होता. एकदा घरभर पसरलेल्या ताज्या ब्रेडच्या वासाची सवय झाली की त्यानंतर मागे फिरणे अशक्य होते. यात तृटी एकच होती ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोफ जरी यात उत्तम बनत असतील तरी वेगवेगळ्या आकारांचे आणि मुख्य म्हणजे वेगवेगळे पोत असणारे ब्रेड बनविता येत नव्हते म्हणून मग पीठ मशीनमध्ये बनवून ओव्हनमध्ये ब्रेड भाजायचे उपक्रम करून पाहिले आणि त्यात मर्यादित यश मिळाले तरी उत्तम फ्रेंच बगेट, उत्तम फोकाचिया किंवा रस्टिक कंट्री लोफ वगैरे गोष्टी हव्या तश्या बनत नव्हत्या. अर्थात युरोपमध्ये कोपऱ्या कोपऱ्यावर बेकरीजमध्ये हवे तसे उत्तम ब्रेड्स मिळत असल्याने या प्रांतात फार डोके घालावेसे वाटले नव्हते.

मला युरोपातून नॉर्थ अमेरिकेत आल्यावर, माझी सगळी विजेवर चालणारी उपकरणे वेगळ्या व्होल्टेजमुळे सोडून यावी लागली (ज्याचा आत्मक्लेश असह्य होता) आणि एकदम सगळ्या वस्तू विकत घेणेही शक्य नव्हते त्यामुळे अनेक दिवस घरात ब्रेड मशीन नव्हते. बाजारात अगदी मोठ्या बेकऱ्यांत मिळणारे ब्रेडही खास चांगले नसल्याने मग मी गरजेपोटी आणि चविष्ट ब्रेड्सच्या प्रेमापोटी सुरवातीपासून हाताने पीठ हाताने मळून वगैरे ब्रेड बनवायला लागले. एकदा बनवायला लागल्यावर मात्र हे प्रकरण किती आनंददायी आहे याचा अनुभव आला. लहान मुले चिखलात खेळतात तसे मनसोक्त पिठात खेळायचे, मग रसायनशास्त्राचा प्रयोग असल्यासारखी फुगणारया पीठावर नजर ठेवायची, प्लेडोसारखे वेगवेगळे आकार बनवायचे आणि ओव्हनच्या काचेच्या खिडकीतून भाजला जाणारा ब्रेड पाहायचा यासारखे मनोरंजक अजून काही नसेल. शिवाय ब्रेड चांगला जमला की 'मी माझे ब्रेड स्वत:च बनवते अशी टिमकीही इतरांसमोर वाजवता येते. या सगळ्याला फक्त लागतो तो खूप जास्त वेळ, म्हणजे प्रत्यक्ष मळायला किंवा भाजायला लागणारा वेळ तसा जास्त नसतो पण त्यामधे वेगवेगळ्या प्रक्रीयांसाठी लागणारा वेळ आणि फुगण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेतला तर हे प्रकरण फारच वेळखाऊ आहे. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे तापमान, वेगवेगळ्या पिठात असलेले ग्लूटनचे प्रमाण, वेगवेगळ्या यीस्टचे प्रकार, ओव्हनच्या तापामानातली तफावत वगैरे अनेक गोष्टींवर यश अवलंबून असल्याने यशही बरेच बिनभरवशाचे असते. अर्थात ह्या सगळ्या अनिश्चितेमुळेच हा प्रकार मोठा आव्हानात्मक होतो आणि अधिक मनोरंजकही.

फ्रेंच बगेट हा माझा फार आवडीचा ब्रेड. पॅरिसमधे अस्सल फ्रेंच बगेट खाल्ल्यावर जगात इतरत्र त्याच नावाखाली कायकाय प्रकार बगेट म्हणून खपवले जातात याची कल्पना आली होती. कुरकुरीत, किंचित चिवट, खरपूस असा क्रस्ट आणि आतल्या मऊ भागात मोठी असमान छिद्रे ही बगेटची ओळख. बनवायला बराच कठीण ब्रेड, कारण पीठ फारच पातळ असल्याने हाताळायला अवघड, फुगायला लागणारा वेळ अधिक, मध्येमध्ये मळायला लागल्याने सारखी काळजी घेऊन गोंजारत रहायचा उपद्व्याप, भाजताना पहिला काही वेळ ब्रेडला वाफ द्यायची गरज वगैरे अनेक गोष्टी. ही सारी अडथळयाची शर्यत पार केली आणि चव घेतली की मात्र सार्थक झाल्यासारखं वाटतं.

दोनतीन वेळा प्रयत्न करून हवा तसा बगेट बनला नाही म्हणून यावेळेस मी 'अनिस बुब्सा' या परीशियन बेकरची पाककृती वापरून पाहिली. २००८ सालीपासून या बेकरला पॅरिसमधला सर्वोत्तम बगेटचा पुरस्कार मिळाला आहे. फ्रेंच लोकांचे बगेट प्रेम पहाता हा पुरस्कार किती महत्वाचा आहे हे समजतं. कृती तशी सोपी आहे, म्हणजे साहित्य अगदीच कमी आहे.

ब्रेड फ्लॉर (मैदा) ५०० ग्रॅम
पाणी ३७५ ग्रॅम
इंस्टंट यीस्ट १/४ टीस्पून
मीठ १० ग्रॅम

ब्रेड फ्लॉर हे गव्हाचे पीठच असते पण ज्या जातीचा गहू (हार्ड व्हीट) ते बनविण्यासाठी वापरला जातो त्यात ग्लूटनचे प्रमाण अधिक असते. मैदा किंवा ऑल पर्पज फ्लॉरही वापरता येईल. साधारणत: ११.५% किंवा जास्त ग्लुटन असलेले फ्लॉर वापरल्यास उत्तम. सर्व साहित्य तंतोतंत मोजून घ्यावे, त्यासाठी डिजीटल वजनकाटा वापरावा.

१) प्रथम एका मोठ्या पसरट भांड्यात पीठ आणि पाणी मिसळून, त्यावर झाकण घालून वीस मिनिटे ठेऊन द्यावे.
२) वीस मिनिटांनी मीठ आणि यीस्ट मिसळून हे पीठ मळावे. पीठ पुरणपोळीच्या कणकेइतके पातळ असल्याने मळण्यासाठी 'स्ट्रेच अँड फोल्ड' पद्धत वापरावी (जालावर या पद्धतीच्या अनेक चित्रफिती सापडतील). पीठ झाकून पुन्हा ठेऊन द्यावे.
३) पुढच्या एका तासात दर वीस मिनिटांनी पीठ दोन मिनिटे 'स्ट्रेच अँड फोल्ड' पद्धतीने मळावे.
४) तिसर्यांदा मळल्यावर पीठ व्यवस्थित झाकून २१ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेऊन द्यावे. (इथे माझा विश्वास कमी पडला. इतके कमी यीस्ट असल्याने आणि गार फ्रीजमध्ये पीठ ठेवल्याने १७ तास जाऊनही पीठ बिलकूल फुगलेले दिसले नाही म्हणून मी उरलेला वेळ भांडे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवले. पण पुढच्या वेळेस पूर्णवेळ फ्रीजमध्ये ठेऊन काय होते ते पहाणार आहे.)
५) पीठ बाहेर काढून त्याचे चार भाग करावेत. थोडे पीठ लावून यातला प्रत्येक भाग साधारण आयताकृती थापावा. मग आयताच्या छोट्या कडेने सुरवात करून त्याची वळकटी करावी. चारी वळकट्या एक तासासाठी झाकून ठेवाव्यात. झाकण्याआधी त्यावर थोडे पीठ शिंपडावे नाहीतर पीठ फुगल्यावर झाकणाला चिकटेल.
६) तासाभरानंतर प्रत्येक वळकटी हाताने दाबत फिरवून लांब करावी व त्याचे बगेट बनवावेत, ते पुन्हा ४५ मिनिटांसाठी झाकून ठेवावेत. ओव्हन २६० डिग्री सेल्सियस किंवा ५०० डिग्री फॅरनहाइटला तापवायला ठेवावा. घरी पिझ्झा स्टोन असल्यास तो मघल्या ट्रेवर ठेवावा.
७) पंचेचाळीस मिनिटांनी ओव्हनच्या खालच्या ट्रेवर एका भांड्यात थोडे बर्फाचे तुकडे टाकावेत व मधल्या ट्रेवर बगेट ठेवावेत. पिझ्झा स्टोन वापरल्यास बगेट त्यावर ठेवावेत आणि नसल्यास बेकिंग शीटवर ठेवावेत.
८) पहिल्या दहा मिनिटांनी बर्फाचे भांडे बाहेर काढावे आणि बगेट अजून १०-१२ मिनिटे खरपूस होईपर्यंत भाजावेत.

९) बगेट थोडावेळ गार होऊ द्यावेत आणि मग कापावेत.

खरडवहयांतून ऐसीवर काही जणांना ब्रेड बनवायचा उत्साह / अनुभव आहे असे लक्षात आले त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने त्यांनीही आपले अनुभव, फोटो वगैरे इतरांशी वाटल्यास आनंद वाटेल. पुढे कोणाला रस असेल तर एकाच वेळेस अनेकांनी एकच कृती वापरून आपले अनुभव वाटण्याचा प्रकल्प करता येईल.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

लेखात असलेल्या चित्रान्तील बागेत तुम्ही बनविलेले असतील तर तुमचे खरोखरच अभिनन्दन !
ब्रेड-मशिनमध्ये रात्री कणकेचा गोळा टाकून सक्काळी सक्काळी पसरणार्‍या खरपूस वासाने जागे होणे म्हणजे काय सुख असते ते मी अनुभवले आहे.
इतालीयात असताना एखाद्या कफेवरून जाताना ब्रियोश आणि कॉफीचा दरवळ असा काही खेचून नेतो की केवळ त्या पावाचीच भूक लागते, जी इतर कशानेच शमत नाही.
तुमची बागेतची चित्रे पाहून त्या धुन्द वासाची आठवण झाली, त्याबद्दल धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक, इतालियात आणि फ्रान्समधे राहिलेल्या लोकांचा फार मनापासून हेवा वाटतो Smile सुट्टीवर तिथे गेलो तरी प्रवास एका जेवणापासून दुसरया जेवणापर्यंत असाच लक्षात रहातो! आणि हो, फोटो मी बनवलेल्या बगेटचेच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा सगळ्यात आवडता ब्रेड म्हणजे बगेत! अनेक वेळा घरी बनवून बघायचा विचार केला पण त्यासाठी लागणारा संयम मजपाशी नसल्याने कोपर्‍यावरच्या बेकरीतून आणणं जास्त सोयीचं होतं Wink शिवाय तिथे जावून बेकरीतून येणारा खमंग, खरपूस वास घेता येतो.

माझा रोजचा रस्ता एका बेकरीवरून जातो. रोज सकाळी सकाळी तो खरपूस वास येत असतांना ब्रेड न घेता तसंच पुढे जाणे अतिशय जीवावर येतं. पण वाढत्या वजनाकडे बघून आठवड्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोनच वेळा बेकरीत पाय ठेवायचं बंधन स्वतःवर घालून घेतलंय Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

खरंतर संयम माझ्याकडेही फार नाही पण याच्याकडे खेळ म्हणून जास्त पाहिलं तर मजा येते Smile आणि प्रयोग फसला तरी फार वाईट वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त बनला आहे बागेत. स्वतः एक-दोनदाच ब्रेड बनवण्याचा उपद्व्याप केला होता एके काळी. एकंकदीतच हे वेळखाऊ प्रकरण आपल्याला झेपणार नाही हे लवकरच लक्षात आलं आणि नाद सोडून दिला. सुदैवाने तोपर्यंत नवीन यंत्रसामुग्रीमधे पैसे घालवले नव्हते. दुकानातले बागेत कधी विशेष आवडले नाहीत, पण सध्याचा माझा आवडता ब्रेड आहे तॉर्ता हा सँडवीच ब्रेड.

हे बागेतचे चित्र पाहून परत एकदा ब्रेड बनवून पहावा की काय, असे वाटायला लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सानिया, ब्रेड परत बनवून पहावासा वाटला तर नक्की सांगा. एकमेकांकडून मदत, सूचना, फोटो वगैरे वाटता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र माझ्यकडे ब्रेड बनवण्याची उपकरणे नाहीत. हाताने मळण्यासारखी कणीक हवी. मागे एका मित्राबरोबर फुड प्रोसेसरमधे ब्रेडची कणीक भिजवण्याचा प्रयोग केला होता, पण कणीक नीट भिजली गेली नाहीच, शिवाय यंत्र गरम होऊन, त्यातील यीस्टपण निकामी झाले. मग कडक गोळे खाल्ले चव तरी छान झाली आहे असे स्वतःला समजावत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे फार कष्ट आहेत. पण प्रत्यक्ष पाकृच्या आधीचं वर्णन ऐकून म्या स्वयंपाकद्वेष्ट्या व्यक्तीलाही हे प्रयोग करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. रूची, मी असं काही करायला लागले तर त्याचं पाप तुझ्या माथ्यावर हे विसरू नकोस.

फोटो पाहून तोंडात शब्दश: पाणी सुटलं. इंग्रजांनी भारतावर राज्य करून भारताचं जे नुकसान केलं आहे त्यात कैतरीच पावांची लेगसी सोडली, ही एक भरही टाकली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती, हा धागा सुरु करायचा उद्देश्यच इतरांना हया प्रयोगात ओढण्याचा होता. ़काय म्ह्णतेयस, पुढचा प्रयोग एकत्र करायचा का? मी पुढचा भाग फोकाचिया वर लिहायचा म्ह्णतेय, तो बगेटपेक्षा बनवायला बराच सोपा आणि कमी वेळ्खाऊ वाटला, शिवाय त्याच्या सविस्तर कृतीची चित्रफितही आहे. भाग घ्यायला आवडेल का तुला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात एका ठिकाणी फोकाचिया खाल्ला होता आणि बनवणार्‍यांचा असा दावा होता की तो पाव प्रिझर्व्हेटीव्ह इ. न घालता बनवलेला असे. तो आवडलेलाही होता ...

ठीक, मी स्वतःच्या स्वयंपाकद्वेष्टेपणाची कुर्बानी द्यायला तयार आहे. पाकृ दे, मग एक ग्रुप प्रोजेक्ट सुरूच करू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढचा प्रयोग एकत्र करायचा का? मी पुढचा भाग फोकाचिया वर लिहायचा म्ह्णतेय

मला पण भाग घ्यायला आवडेल. मी च्याबाटाची रेसिपी टाकेन. किंवा फोकचिया हा इतका व्हर्सटाइल पाव आहे की आपण दोघींनी एकाच लेखात त्याच्या वेगवेगळ्या व्हर्जन्स टाकायला हरकत नाही. कुठल्या टाकणार, काय टाकणार हे अर्थातच आधी ठरवून.

बागेत छानच झालेला आहे. विशेषतः तो लांब लांब करताना त्याची लहानमोठी भोकं तयार होतील या बेताने नाजूकपणे शेप करणं हे कौशल्याचं काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी माझी भरवशाची फोकाचियाची पाकृ. लिहेन ज्याची यूट्यूबवर चित्रफित आहे. बगेटच्या तुलनेत पाकृ. सोपी आहे. (ंंंमाझा प्रवास अवघडाकडून सोप्याकडे होतो असं काही जाणकारांचं म्हणणं आहे Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीसुद्धा...पण जानेवारी आधी नाही. सो प्रयोग क्र. ३-४ मधे असेन बहुधा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच दिवसांनंतर सगळे धागे वाचतेय, आत्ता बगेत बघितला!! मस्तच. मला खरंतर बगेत तेवढा आवडत नाही, पण हा फोटोत मस्त दिसतोय!
फोकाचिया चा एकत्र प्रयोग केला तर मी ही करायला तयार आहे. गेले दीड महिना काहीच करायला वेळ नव्हता. प्रयोग कधी करायचा विचार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकृ आवडली. परवाच रेडिओवर किंचित व्हिस्की घालून केलेल्या पोर्तुगीज स्वीट ब्रेडबद्दल ऐकलं, त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदन, तुमच्या लिंकमधली स्वीट ब्रेडची पाकृ. म्हणजे माझी ब्रियॉशची पाकृ. निघाली, फक्त मी साखर थोडी जास्त म्हणजे ३ मोठे चमचे वापरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बागेत अत्यंत आवडतो. ही पध्दत मात्र थोडी अधिक कष्टाची वाटते. मी जी पध्दत वापरतो ती वेळखाऊ पण कमी कष्टाची आहे. चांगल्या बागेतची तीन लक्षणं असतात -
१. आंबुस चव आणि २. हलकेपणा - पीठ पुष्कळ वेळ आंबवून ह्या दोन्ही गोष्टी साधतात. मग मळण्याचे कष्ट जवळपास नाही घेतले तरी चालतात. तुमच्या कृतीतला फ्रीझमध्ये ठेवण्याचा भाग हेच साधतो. पण ह्याची गरज नाही. मी साधारण ते असं साधतो -
पाककृतीतलं सर्व पाणी, सर्व यीस्ट आणि निम्मं पीठ एकत्र करून काही तास झाकावं. कणकेचा हा सैलसर, चिकट गोळा मळण्याचे कष्ट अजिबात घेऊ नयेत. तापमानानुसार ४ ते ६ तासांत किंवा रात्रभर ठेवल्यानंतर हा गोळा दुप्पट-तिप्पट फुगून येतो (जास्त वेळ राहिला तर परत खाली बसतो, पण त्यानं अजिबात काही बिघडत नाही). त्यानंतर त्यात उरलेलं पीठ घालून भिजवावं आणि पुन्हा दुप्पट होईपर्यंत थांबावं. त्यानंतर बागेतला आकार द्यावा.

तिसरं लक्षण - तांबुस आणि चघळता यावी अशी, म्हणजे थोडी चिवट क्रस्ट - ह्यासाठी भट्टी चांगलीच गरम हवी आणि आत आर्द्रता हवी. तुमच्या कृतीतलं तापमान माझ्या भट्टीला जरा जास्त होईल. मी साधारण २३०-२४० अंश सेल्सिअसवर भट्टी तापवतो. एखाद्या सपाट थाळीत थोडं पाणी घालून मी ती थाळी सुरुवातीची पंधरा मिनिटं आत ठेवतो. त्यामुळे आर्द्रता राहते. काही जण झाडांवर फवारायच्या स्प्रेनं आत दर पाच मिनिटांनी पाण्याचा फवारा मारतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी वापरलेली पाकृ. थोडी जास्त कष्टाची आहे हे खरंच आहे पण तरी मी पाकृ. लिहिताना प्रत्येक मळण्याच्या कृतीबद्दल थोडं लिहायला हवं होतं. प्रत्येक वेळी फक्त २ मिनिटे म्हणजे स्ट्रेच एन्ड फोल्डचे फक्त २० स्ट्रोक्स करायचे आहेत, अर्थात मी खूप वेळ खेळत बसले हेही खरं आहे.
तुम्ही पाणी किती टक्के वापरता? ७० की ८० ़टक्के की अजून काही? पुन्हा बनवाल तेव्हा काही फोटो लावलेत तर आवडेल. मी २४० अंशावर पूर्वीचा बगेट भाजून पाहीला होत पण माझ्या भट्टीत तो छान ़खरपूस भाजला गेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा बनवाल तेव्हा काही फोटो लावलेत तर आवडेल.

होय. आम्हालाही समजू देत तुमची रेसिपी चालते का नाही ते! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आतापर्यंत पाकृ 'बघुन' तो पदार्थ करावेसे वाटायचे.. आत मात्र एकीकडे धडकी भरली (इतकी तयारी आणि इतक्या कठीण स्टेप्स बघुन), दुसरीकडे कौतूक वाटलेच.. तिसरीकडे असुया Wink आणि चौथीकडे तो जीवघेणा फोटो बघून 'त्या' गंधाची जीवघेणी आटह्वण झाली!

छ्या! हे असं करणं बरं न्हवं Wink

बाकी त्यानिमित्ताने इथे ग्रुप प्रोजेक्ट सुरु होत असतील तर ब्रेडच्या नाही पण इतर प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये सहभागी होऊ शकेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile ऋषिकेश, पाकृ. वाचायला वाटते तेवढी बनवायला अवघ्ड नाही. एरवी स्वयंपाकात फारसा रस नसणारा एक मित्र ब्रेडमात्र हौसेने बनवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रेंच समजणारयांसाठी ही चित्रफीत. माझा बगेट बरा दिसतोय असं वाटत असताना हे पाहिलं आणि गैरसमज दूर झाले. आता विमानाचं तिकीट काढून ताबडतोब पॅरिसला निघावं आणि ही बेकरी गाठावी असं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तुम्ही पाणी किती टक्के वापरता? ७० की ८० ़टक्के की अजून काही? पुन्हा बनवाल तेव्हा काही फोटो लावलेत तर आवडेल. मी २४० अंशावर पूर्वीचा बगेट भाजून पाहीला होत पण माझ्या भट्टीत तो छान ़खरपूस भाजला गेला नाही.<<

भट्टीला आपलं एक व्यक्तिमत्व असतं असं म्हणतात. माझी फार तापट आहे. Smile

पाण्याचं प्रमाण - पिठातल्या ग्लुटेननुसार पाणी कमीजास्त लागू शकतं. त्यामुळे माझा नियम असा आहे - पहिला स्पंज हा इतका चिकट असला पाहिजे की तो मळणं अशक्य व्हावं. नंतर उरलेलं पीठ घातल्यानंतरसुध्दा गोळा चिकट असायला हवा, पण थोडं तेल किंवा पीठ लावलेल्या पोळपाटावर त्याला हवा तसा आकार देता येईल इतपतच. ह्या नियमानुसार पाणी-पीठ यांचं प्रमाण मी कमीजास्त करतो.

गोळा चिकट असायला का हवा? ह्याचं उत्तर माझ्या पहिल्या प्रतिसादात आहे. चांगला बागेत भरपूर आर्द्रतेत बनतो. चिकट पिठामुळे भट्टीत आर्द्रता राहायला मदत होते.

>>फ्रेंच समजणारयांसाठी ही चित्रफीत. <<

व्यावसायिक बेकरीतल्या भट्ट्या फार चांगल्या असतात आणि त्यांच्या हातखंडा पाककृतींवर त्यांचे हात छान बसलेले असतात. मी माझ्या घराजवळच्या मुसलमानाच्या बेकरीत काय चालतं ह्याचं निरीक्षण करतो तेव्हासुध्दा मला न्यूनगंड येतो!

>>पुन्हा बनवाल तेव्हा काही फोटो लावलेत तर आवडेल.<<

मला फोटोंची समीक्षा फक्त करता येते. Wink

>>होय. आम्हालाही समजू देत तुमची रेसिपी चालते का नाही ते! <<

काही लोकांना काही गोष्टी न समजलेल्याच चांगल्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> मला युरोपातून नॉर्थ अमेरिकेत आल्यावर, माझी सगळी विजेवर चालणारी उपकरणे वेगळ्या व्होल्टेजमुळे सोडून यावी लागली >> कन्व्हर्टर नाही मिळत का? मला वाटतं की मिळतो Sad

लेख व फोटो मस्तच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोकाचियाचा नवीन धागा सोमवारी संध्याकाळी सात (जी.एम.टी.) सुरू करायचा विचार आहे. पंचवीस तारखेला ख्रिसमसच्या जेवणासाठी फोकाचिया बनविण्यात सर्वांना रस असेल आणि वेळ असेल तर बनवता येईल, नसल्यास २९ तारखेला शनिवारी बनविता येईल.
फोकाचियासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे:
फास्ट अ‍ॅक्शन यीस्ट २ (७ ग्रॅमची) पाकिटे
ब्रेड फ्लॉर / मैदा
बेकिंग शीट्स
ऑलिव्ह तेल
खडेमीठ / सीसॉल्ट
खालीलपैकी हव्या असतील किंवा आवडतील त्याप्रमाणे:
ऑलिव्ह, रोजमेरी, सनड्राइड टोमॅटो, तांबूस परतलेला कांदा वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकीचे ब्रेड्स जमलेत असे नाहि पण बर्‍यापैकी समाधानकारक प्रयोग करून झालेत. मात्र ही भलीमोठी कृती बघुनच दडपायला होत असल्याने इतके दिवस टाळले होते पण आता वेळ मिळताच करायचे ठरवले आहे

काहि प्रश्न आताच पडलेत
-- मी मायक्रोवेव्ह न वापरतो. कृती म्हटल्याप्रमाणे भट्टीचा दुमजली इमला माझ्याकडे नाही Wink मग काय करावे? आर्द्रता कशी राखावी?
-- ३७५ ग्रॅम = ३७५ मिली पाणी हे प्रमाण योग्य ठरावे. बरोबर ना?
-- कृतीत तेलाचा, बटरचा इ. वापर अजिबात दिसला नाहि. हे बरोबर आहे ना? का टंकायचे राहिले आहे? नुसते पाणी वापरून पिठ अतिशय चिकट होणार नाहि का? (स्ट्रेच अ‍ॅन्ड फोल्ड कसे करणार मग?)

समांतरः सब-वे मध्ये जे लांब ब्रेड असतात ते काय असतात? ते कसे बनवायचे ते शिकवाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>-- मी मायक्रोवेव्ह न वापरतो. कृती म्हटल्याप्रमाणे भट्टीचा दुमजली इमला माझ्याकडे नाही मग काय करावे? आर्द्रता कशी राखावी?<<

मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन आहे का? असेल, तर आर्द्रता राखण्यासाठी कष्ट घेण्याची गरज नाही. साधे ओव्हन खूप तापतात आणि त्यात ब्रेड पटकन जळायची भीती असते म्हणून ही काळजी घ्यायला लागते. आर्द्रता राखण्याचे इतर उपाय म्हणजे एखाद्या वाटीत पाणी ठेवणं किंवा अधूनमधून ओव्हन उघडून त्यात पाण्याचा फवारा मारणं.

>>-- ३७५ ग्रॅम = ३७५ मिली पाणी हे प्रमाण योग्य ठरावे. बरोबर ना?<<

हे गणित बरोबर आहे, पण पीठ चिकट होणं महत्त्वाचं. कोणत्या प्रकारच्या गव्हाचं पीठ आहे त्यावर ते किती पाणी शोषेल हे ठरतं, आणि त्यात थोडं इकडेतिकडे होऊ शकतं. जर एवढं पाणी वापरून पीठ सहज मळता येत असेल किंवा कोरडं होत असेल तर थोडं आणखी घालता येईल.

>>-- कृतीत तेलाचा, बटरचा इ. वापर अजिबात दिसला नाहि. हे बरोबर आहे ना? का टंकायचे राहिले आहे? नुसते पाणी वापरून पिठ अतिशय चिकट होणार नाहि का? (स्ट्रेच अ‍ॅन्ड फोल्ड कसे करणार मग?)<<

बागेतमध्ये स्निग्ध पदार्थ वापरत नाहीत हे खरं आहे. चिकट असेल तर कणीक मळणं सुरुवातीला थोडं जड जाईल. जसजसं पाणी पिठात शोषलं जाईल, तसं ते अधिक सोपं होईल. अगदी अडचणीचं वाटलं तर सरळ एखादा लाकडी चमचा वापरून कणीक ताणत रहा. हळूहळू कणकेचा पोत बदलेल तेव्हा हात घाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अनेक आभार.

मायक्रोवेव्ह कन्वेक्शन आहे. तिथे अधिकची वाटी ठेवायला जागा नाही, पण गरज वाटल्यास मधे मधे स्प्रे मारता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!