मागे वळून पाहताना.......

संपर्काची फारशी साधने उपलब्ध नसतानाच्या काळातील एका घटनेचे धावते वर्णन.
hindsight.
ते बघा, ते फार दिवसाचे चालताहेत. शेवटी एकदाचे खूप खूप दिवस चालत, तंगडतोड करत ते तिघे चौघे वरती, एका उंच डोंगरावर नुकतेच पोचलेत. डोंगर त्या अतिअघनदाट जंगलानं पूर्णपणे वेढलेला आहे. जंगलात वाट चुकून ह्या टोळक्याला नक्की किती दिवस झाले तेही आठवत नाहिये. जंगल भलतच दाट आहे. मनुष्यासाठी आजवर अस्पर्शित राहिलेलं आहे. दाटी इतकी, की भरदिवसा सुद्धा जमिनीवर सूर्यप्रकाश पडूच नये. त्या वनात एक अतिप्रचंड, आभाळाएवढं पाणी सतत वाहवत असणारी नदी आहे. नदीमध्ये, जंगलात सर्वत्र विविध श्वापदांचा मुक्त संचार आहे, ते हिंस्त्र आहेत, क्रूर आहेत, त्यातले कित्येक चपळ आणि कित्येक बलशालीही आहेत. इतर नैसर्गिक संकटंही त्या निबिड ठिकाणी आहेत. तर अशा ह्या आव्हानांनी, धोक्यांनी खच्चून भरलेल्या ठिकाणी त्यांची कुठलीशी मोहिम फसली म्हणून ते पोचलेत. पण डोंगरमाथा त्यत्ल्या त्यात बरा. त्यासाठी तिथे वर पोचायची त्यांची धडपड. कशीबशी ती सुरु ठेउन ते आले आहेत.
गंमत म्हणजे वर जाउन नक्की रस्ता सापडेलच असं काही कुणी त्यांना सांगितलेलं नाही. तरी कुणीतरी एकजण जातोय, म्हणून दुसरा, आणि दुसरा जातोय म्हणून तिसरा तिथे चाललाय. ते दमलेत, धपापताहेत, निढळाच्या घामानं अंग थबथबलय. एक जण दीर्घश्वास घेउन खाली बसतो आहे.
आता खालच्या दाट धोक्यांमधून थोडीशी उसंत मिळताच त्यांना मागे राहिलेल्यांची काळजी वाटते आहे. ते पाहताहेत. त्यांना आपल्या मागून येणारे एखाद दोन जण दिसताहेत.
.
अंधारत आल्यामुळं आता पुन्हा परत फिरणं शक्य नाही. हरेक जण खालून जंगलातून वर डोंगरावर येत आहे. पुन्हा डोंगरावरून जंगलात जाण्याचा कुठलाच धड मार्ग नाही. ज्यांनी ते प्रयत्न केलेत त्यांनी स्वतःचे हसे करुन घेतलेले आहे.
.
ते खाली असताना काय होत होतं? त्यांना पुढच्या रस्त्याची धड स्पष्टता, visibility सुद्धा नव्हती. गर्द झाडीमधून जो तो आपापल्या पद्धतीने अधिकाधिक सुरक्षित व कमीत कमी त्रासाचा, व जमल्यास लहानात लहान मार्ग शोधत होता.
प्रत्येकास जेमतेम पुढची दोन तीन पावलं जाता येतील इतकाच मार्ग दिसत होता.
कित्येकांना असे दोन्-दोन चार पावलं करत मैलोन मैल गेल्यावर एकाएकी रस्ता संपतोय हे ध्यानात आलं. कुणाच्या पुढ्यात एकदम धो धो वाहणारा धोकादायक धबधबा लागला, तर कुणाला पुरानं खवळलेल्या नदीच सर्वात खोल पात्र सामोरं आलं.
कुणाला हिंस्त्र श्वापदं समोर आली. कुणी स्वतःच दुर्दैवी घटनांत, अपघातांस बळी पडले.
काहिंचे अपघात चु़कांमुळे, दु:साहसामुळे झाले, तर कुणाकुणाचे अपघात इतके अतर्क्य होते की ते घडतील हे क्षणार्धापूर्वी जरी कुणाला सांगितलं असतं, तरी खरं वाटलं नसतं. त्यांच्या चुका नसतानाही त्यांना किंमत मोजावी लागली. पण घडायचे ते घडले. बळी जायचे ते गेले. कशाचा कशालाच काहीच कार्यकारणभाव नाही.
कुणाकुणाला अपघातातून सावरायची संधी मिळाली. कुणाकुणाची एक चूक शेवटची चूक ठरली.
.
उगीच चालतोय, म्हणून चालायचं. जगायचय म्हणून चालायचं आणि चालायचय म्हणून जगायचं अशी अवस्था झालेली आहे.
.
तर कुठं होतो आपण? उंच डोंगराच्या कड्यावर होतो , नै का? तर तिथे पोचलेल्यांतले काही खरच आपल्या कौशल्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलेत. पण असे कौशल्य असणारेही कित्येकजण मागे सांगितलेल्या अपघातात विनाकारण बळीही पडालेत. वरती पोचायचा कौशल्य हा एकमात्र निकष त्यामुळं नसावा. काही जण चक्क अनमानधक्यानं "हा चाल्लाय म्हणून मीही जाणार " इतक्या साध्या गोष्टीवर अंमल करुन पुढवर आलेत. काहीजण माकडचाळे, दु:साहस करत असतानाही अविश्वसनीय पद्धतीने निव्वळ योगायोगाने वेगवेगळ्या संकटातून सुटलेत. नेमके ह्यांनी डोळे झाकून खोल धबधब्यात उडी मारावी नि ती नेमकी अचूक ठिकाणी बसावी असं काहिसं ह्यांच्याबाबत वारंवार झालय. ह्यामागं लॉजिक काय? काहीही नाही.
काहीजण सरावानं तरबेज झालेत संकटांशी लढण्यात. शिवाय जे वाचलेत, त्यातील बहुतांशांचं " इथवर पोचण्यासाठी आपणच अधिक योग्य आहोत" ह्यावर एकमत आहे.
.
इतक्यात ह्या वरच्यांना खालून काही अजून मंडळी येताना दिसताहेत. अरे, अरे....हे काय. त्यापैकी एकजण चक्क त्या भलत्याच रस्त्याला लागताना दिसतोय. वर पोचलेल्या एकाला त्याला वाचवासं वाटतय. तो वरून ओरडून, खाली काही दगड फेकून त्याचं लक्ष वेधतोय. हुश्श त्या खालच्या तरुणानं ह्या वरच्या म्हातार्‍या कडे शेवटी लक्ष दिलेलं दिसतय. हा वरचा त्याला त्या वाटेवर न जाण्यासाठी सुचवायचा प्रयत्न करतोय. पण त्याचा आवाज धड खाली पोचतच नाहिये. त्याच्या इशार्‍यावरून खालच्याला काही अर्थबोधही होत नाहिये. शिवाय लक्ष वेधून घेण्यासाठी ह्यानं जे दगड खाली टाकले होते, त्यामुळं हा वरचा इसम आपला पक्का वैरी असावा अशी खालच्याची खात्री झालिये. आता तर तो पटकन वरच्याचा नजरच्या टप्प्यात येणार नाही अशा जागी झपाट्यानं जायचा प्रयत्न करतोय. म्हणजेच, अधिक दाटीमध्ये, अधिक धोक्याच्या ठिकाणी. वरचा त्याला कळवळून सांगायचा प्रयत्न करतोय, पण ती सद्भावना खाली पोचतच नाहिये. उलट नेमका वैरभाव प्रतित होतोय.
.
वर पोचलेला तिसरा अजून एकाला हातवारे करुन काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. सुदैवाने त्या दोघांत visibility बरी आहे, त्या दोहोंत धुके कमी, स्पष्टता अधिक आहे. खालच्याला निदान वरचा काय सांगत असावा ह्याचा अंदाज आहे. तो वरच्याच्या सल्ल्यानं अलगद अलगद पुढे सरकतो आहे. वरचा त्याला नुसत्या इशार्‍यांनी का असेना, जमेल तित्के सांगू पहात आहे. ही जोडी बरी जमणार बहुतेक.
पण हाय रे दैवा!
ह्या जोडीचं ते तसं बरं चाललं होतं, पण अचानक त्या वर येणार्‍या तरुणाच्या अंगावर सिंहांचा कळप आलेला आहे. पाहता पाह्ता त्यांनी त्याचा पार फडशा पाडलेला आहे. सध्या वर असणारा त्या मार्गानी वर आला, तेव्हा तो जरी सुरक्षित मार्ग असला तरी तो आता धोकादायक बनलाय. खेळाचे नियमच जणू बदललेत. हा त्याला (विनाकारण?) बळी पडलाय.
.
तो तिकडे चौथा, वरती पोचायची वाट उत्साहाने शोध्णारा....प्रचंड उत्साहाने, हिमतीने तो पुढपर्यंत पोचला पण नेमका चढण चढताना शेवटचा खडक निवडताना हुकला, नि निसरड्या कातळावर घसरत जाउन थेट खालीच खोल खोल खोल कुठंतरी तो पडू लागलाय. त्याला बिचार्‍याला सांगणारंही कुणीच नव्हतं.
.
एक एक करत बरेच जण असे धोक्यांना बळी पडलेत. जे सध्या वर पोचलेत त्यांच्या बॅचमध्ये असे बरेच होते. मागून येणार्‍यांमध्ये तुलनेने कमी असले, तरी होतेच. वर पोचण्याचा निश्चित असा "सर्वात सोप्या रस्त्याचा हमखास मार्ग" कुणालाच ठाउक नाही. जे वर पोचलेत त्यांनाही तो ठाउक नाही.
.
पण हो वर पोचल्यावर खालील वाटा पूर्वीपेक्षा बर्‍याच स्पष्ट, अधिक दूरवरच्या अंतरावरच्या दिसत असल्याने, त्यांना "तेव्हा हे करायला हवं होतं" किंव "तेव्हा ते करायला नको होतं. त्याच्याऐवजी हा रस्ता निवडायला हवा होता." हे जाणवतय. हे खाली असताना थेट लख्खपणे कळणे कधीच शक्य नाही. तुम्ही वर पोचलत की मगच तुम्हास birds eye view मिळ्णार. कुठले रस्ते सोपे दिसत असले तरी अंतिमतः dead end ला लागतात, कुठे सुरुवातीला काटेरी रस्ता असला तरी इतर धोके कमी, नि वर पोचायची हमी अधिक आहे, हे त्यांना वर पोचल्यावरच जाणवतय.
शिवाय आता ती माहिती खालच्यांच्या कामाची असली तरी तितकीशी सुसंगत नाही. खेळाचे नियम बदल्लेत. पूर्वीच्या साध्या वाटांवर नवीन संकटं निर्माण झालीत. कुठल्या जुन्या लघुपथावरील (shortcut वरील) संकटे आता दूर झालेली आहेत. कुठे नवीन दलदली तयार झाल्यात. तर कुठे पूर्वी नदी रस्ता अडवायची, तो भाग पार करण्यासठी झाडाचे मोठाले ओंडके मोक्याच्या जागी येउन पडलेत. त्यावरून चालत सहज येता यावे.
.
खाली असताना सारं काही अंदाज, तर्क आणि बरचसं gut filling/ intuitions वरच चाललेलं होतं. त्यांच्या ह्या प्रवासात ह्यात चढण्याच्या, तगण्याच्या, धावण्याच्या नि पोहण्याच्या कौशल्याची मदत झाली हे निर्विवाद. पण त्याशिवायही कित्येक अकल्पित गोष्टी कुणाच्या समोर आल्यात, तर कुणाकुणाच्या आलेल्या नाहित हे ही सत्य आहे. त्या गोष्टींनी पार खेळाचे निकाल पालटवून टाकलेत.
वरती आल्यावर प्रत्येकजण आपापल्या मार्गाचं, प्रयत्नाचं पुनरावलोकन करु लागलेला आहे. उंच डोंगराच्या अगदि शेवटच्या कड्यावर हिरव्या दाटीने वेढलेल्या भूभागात त्यांना खोल खोल खाली पाहताना आता बर्‍याच गोष्टी स्पष्ट दिसताहेत. नक्की कुणाचा कुठला मार्ग बरोबर ह्याचा आता, सगळं संपल्यावर त्यांना अंदाज येतोय.

मात्र निवड चूक की बरोबर, हे निवड केली तेव्हा समजणे सर्वथा अशक्य आहे हे ही काहिंना जाणवते आहे.

........लेखन अपूर्ण; फुरसतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

चांगले लेखन..
फक्त काहिसे पुनरुक्त विशेषतः 'नक्की कुणाचा कुठला मार्ग बरोबर ह्याचा आता, सगळं संपल्यावर त्यांना अंदाज येतो' हाच विचार दोन तीनदा वेगवेगळ्या वाक्य रचनेतून येऊन जातो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडले.

तत्त्वांचं निरूपण उत्तम केलेलं आहे.

शेवटचं "मात्र निवड चूक की बरोबर, हे निवड केली तेव्हा समजणे सर्वथा अशक्य आहे हे ही काहिंना जाणवते आहे." हे छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+२.

लेख चांगलाच आहे यात शंका नाही. पण त्यातही निवडीबद्दल जजमेंटल होणे टाळलेय त्याबद्दल मनोबांचे विशेष अभिनंदन. और भी ऐसेच आंदो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय जे वाचलेत, त्यातील बहुतांशांचं " इथवर पोचण्यासाठी आपणच अधिक योग्य आहोत" ह्यावर एकमत आहे.

सर्व्हायवरशिप बायसचं छान वर्णन. अनेक ठिकाणी हे लागू होतं. विशेषतः स्टॉक मार्केटमध्ये वगैरे गुंतवणुक करणारांच्यात कोणाचे निर्णय यशस्वी झाले यावरून कोणाला किती गुंतवणुकीची अक्कल आहे हे ठरतं. पण शून्य अक्कल असलेल्या लाखो लोकांनी वेगवेगळे निर्णय कॉइन टॉस करून घेतले तरी लागोपाठ पंधरा वेळा निर्णय बरोब्बर येण्याची शक्यता असलेले काही लोक निघतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांना धाग्याची दखल घेतल्याबद्द्ल धन्यवाद.
धागा कसा सुचला,? फार दिवसानी एक जुनी उपक्रमावरील चर्चा वाचताना थत्ते ह्यांचा http://mr.upakram.org/node/2565#comment-40269 हा प्रतिसाद दृष्टीस पडला, नि विचाराची लिंक लागत गेली. त्या अर्थाने, तो प्रतिसाद ह्या धाग्याचा ट्रिगर्/कारण ठरला.
@रा घा :- "सर्व्हायवरशिप बायस" ही संज्ञा नव्यानं ठाउक झाली. आभार.
बादवे ते पंधरा वेळा टॉस करण्याचं उदाहरण्...कुठं वचलं होतं बुवा ते?
हां , "बाबागिरीच्या साबणाचा पहिला गिर्‍हाईक"...राइट्ट. त्यात उदाहरण होतं ते.
.
@ऋषिकेश :- पुनरुक्ती टाळण्याचे प्रयत्न करेन.(मूळ विचार अधिक स्पष्टपणे मांडला जावा म्हणून सविस्तर लिहिण्याच्या नादात पुनरुक्ती झाली असावी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars