मोल्सवर्थ कोश, मोल्सवर्थ आणि कँडी - भाग १.

संपादकः इतर भागः भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
--
आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोनहि सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते. तुकारामाच्या काळापर्यंत ती संस्कृत शब्दांची आवश्यकतेनुसार उचल करत आध्यात्मिक, धार्मिक आणि नीतिपर श्लोक वा अभंगबद्ध काव्यनिर्मिति करण्याच्या क्षमतेपर्यंत येऊन पोहोचलेली आढळते. तदनंतर मुस्लिम सत्ताधारी वर्गाच्या प्रभावाखाली संस्कृताऐवजी ती अरबी आणि फारसीच्या प्रभावाखाली जातांना दिसते. शिवराज्याच्या उत्थापनाबरोबर फारसी काही प्रमाणात मागे सरून संस्कृतला अधिक महत्त्व मिळाल्याचे जाणवते. त्यानंतर पेशवाईच्या काळात हिंदुस्थानाचे एक सत्ताकेन्द्र महाराष्ट्रात आल्यामुळे पेशवाईच्या पत्रव्यवहारात तिला महत्त्वाचे स्थान मिळाले आणि प्रौढ आणि दर्जेदार गद्य लिखाणातहि तिचे तुरळक अस्तित्व जाणवू लागते. (उदा. बखरी, नाना फडणिसाचे आत्मवृत्त इत्यादि.)

तरीहि पेशवाईच्या अखेरीस असे दिसते की राजकीय वा महसूली प्रकारचा पत्रव्यवहार आणि काही बखर वाङ्मय सोडले तर गद्य लेखनाची काही शिस्त मराठीमध्ये विकसित झाली नव्हती. कोकणातली, देशावरची, विदर्भातली, खानदेशी अशी मराठीची जी अनेक स्थलसापेक्ष बोलण्यातली भाषारूपॆ वापरात होती त्यापैकी प्रमाण मराठी भाषा असे कोणास म्हणावे आणि ती कशी लिहिली जावी ह्याबाबत काहीच विचार झाला नव्ह्ता. ह्याचे कारण म्हणजे लेखनवाचन ह्या गोष्टींमध्ये काही स्वारस्य असलेला पंडितवर्ग जवळजवळ संपूर्णपणे आपले लक्ष संस्कृत भाषा आणि त्या भाषेतील पारंपारिक ज्ञान ह्यावरच केन्द्रित करून होता. मराठी भाषेचा विकास, तिची शब्दसमृद्धि, व्याकरण, प्रमाणलेखन ह्याकडेहि लक्ष द्यावे असे कोणाच पारंपारिक विद्वानास जाणवत नव्हते.

१९व्या शतकाच्या पहिल्या २०-२५ वर्षात इंग्रजी सत्ता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात देशभर पसरली होती. इतका मोठा देश ताब्यात राहायचा तर येथील प्रजेच्या सहकार्याशिवाय आणि कारभारातील सहभागाशिवाय ते अशक्य आहे अशी जाणीव सत्ताधारी वर्गात निर्माण झाली होती. ह्या काळापर्यंत युरोप आणि हिंदुस्तान ह्यांमध्ये भौतिक विषयांच्या ज्ञानामध्ये लक्षणीय असमानता निर्माण झाली होती आणि एतद्देशीय प्रजा परंपारिक विचारात अडकून पडली असून ह्या कर्दमातून तिला बाहेर काढणे हे आपले ईश्वरदत्त कर्तव्य आहे असे काही युरोपीय उदारमतवादी विचारवंतांना वाटू लागले होते. हे कर्तव्य पार पाडण्याचा सरळधोपट मार्ग म्हणजे येथील प्रजेस सरसकट ख्रिस्ती बनवून सोडणे असे मिशनरी विचाराच्या लोकांचे मत होते पण असे केल्यास हिंदुस्थानातील जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊन हा खंडप्राय देश काबूत ठेवणे अवघड होऊन बसेल अशी स्पष्ट जाणीव सत्ताधारी वर्गाला होती आणि म्हणून (जसे गोव्यात होऊ शकले तसे) सत्ता वापरून धर्मबदल घडवून आणणे हे येथे घडले नाही. यद्यपि सत्ताधारी वर्गाचे काही प्रतिनिधि वैयक्तिक पातळीवर ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या बाबतीत सहानुभूति बाळगणारे होते तरीहि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जाणूनबुजून धर्मबदल हे राज्यसत्तेचे काम नाही असे ठरविले होते,

हा राज्यशकट चालविण्यासाठी सहभाग देण्याइतपत येथील जनतेस तयार करणे आणि आपले ईश्वरदत्त कर्तव्य पार पाडणे हे दोन्ही हेतु साध्य करण्यासाठी येथील जनतेस आधुनिक शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या परिघात आणणे आवश्यक असून त्यासाठी येथील भाषांचे समृद्धीकरण केले पाहिजे हे जाणवल्यामुळे मेकॉलेने आपल्या १८३५ सालच्या प्रसिद्ध ’मिनट'मध्ये असे म्हटले होते:

<[34] In one point I fully agree with the gentlemen to whose general views I am opposed. I feel with them that it is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern, - a class of persons Indian in blood and colour, but English in tastes, in opinions, in morals and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.>
(हा उतारा येथे देण्यामागे मेकॉलेच्या मिनटवर चर्चा उघडावी असा माझा हेतु नाही. ती उलटसुलट चर्चा भरपूर झालेली आहे आणि अजूनहि होत राहील. मला केवळ इतकेच दाखवायचे आहे की एतद्देशीय भाषांचे उन्नतीकरण करून आधुनिक विचारांची वाहनक्षमता त्यांच्यामध्ये आणणे हा एक हेतु राज्यकर्त्यांच्या मनामध्ये होता, ज्याचा उल्लेख ह्या अवतरणात मिळतो.)

वर उल्लेखिलेल्या मराठीतील बदलांचे उत्तम वर्णन हे बाबा पदमनजी ह्यांच्या शब्दात मिळते. मोल्सवर्थच्या १८५७ च्या कोशाची संक्षिप्त आवृत्ति त्यांनी १८६३ साली तयार केली तिच्या प्रस्तावनेमधून हे अवतरण घेतलेले आहे: (’ऐसी अक्षरे’च्या प्रमुख पानावर ज्याचे सूत्र आहे तो ’मोल्सवर्थ कोश’ ती हीच पदमनजीकृत आवृत्ति.)

<आज शेकडो वर्षांपासून एतद्देशीय विद्वानांनी प्राकृत भाषांची उपेक्षा केल्यामुळे त्यात विद्या, ज्ञान, नीति ह्यांचा संग्रह झाला नाही. ह्या आमच्या सुंदर महाराष्ट्र भाषेचीच गोष्ट पाहा. तिला ब्राह्मण लोकांनी विद्यामंदिराच्या बाहेर हाकून दिल्यामुळे ती बिचारी रस्तोरस्ती व गल्लोगल्ली भटकत फिरू लागली. तिच्या सुकुमार बाळांस (शब्दांस) कोणी व्याकरणाचे नियमांनी आवरून धरणारा नसल्यामुळे, ती उनाड होऊन सैरावैरा धावत सुटली; त्यांस कोशकारांच्या शाळेत अर्थरूप सुशिक्षा न मिळाल्यामुळे त्यांस आपला मूळ स्वभाव काय, आपले गणगोत कोणते, कोठले हे समजेनासे झाले. प्राकृत जनांनी त्यास भलभलती नावे दिल्ही, व भलभलत्या कामावर त्यांस योजिले. त्यांच्या आईस विद्येची सेवा करायास कोणी ठेवीना म्हणून तिने नाटककार, तमासगीर, डफ तुतुण्यावर गाणारे यांची चाकरी पत्करली. अशा स्थितीत असता ह्या देशात मुसलमानांचा प्रवेश होऊन त्यांचे प्राबल्य झाल्यावर तर महाराष्ट्र भाषेचे रूप फारच बदलले. तिला तिची माता संस्कृत भाषा हिचे निरे व पुष्टिकारक मधुर दुग्ध मिळेना म्हणून ती यावनी भाषांतील मादक रस प्राशन करू लागली. तिचे माधुर्य व विनय जाऊन तिचे ठाई काठिन्य व उन्माद आला. आणि पुढे असाच क्रम चालता असता तर काय झाले असते नकळे, परंतु शिवाजी राजाचा उदय झाल्यापासून महाराष्ट्र भाषेस ऊर्जित दशा प्राप्त झाली. मुकुंदराज, ज्ञानेश्वरप्रभृति कित्येक सुज्ञ व परोपकारी पुरुषांनी तिला कवितेचे खाजे चारून तिची मूळ प्रकृति अगदीच बिघडू दिल्ही नव्हती. म्हणून पुढे शिवाजीच्या वेळेस व पेशवाईत जे प्रख्यात प्राकृत कवि झाले त्यांनी तिला मोठया वात्सल्याने आपल्या पदरात घेऊन व तिला आपल्या अंकावर बसवून कन्यप्रमाणे तिचे लालनपालन केले, व संस्कृत भाषेचा सुधारस पाजून तिला जगत्या पंथास लाविले,

प्राकृत भाषांचा कित्येक दुरभिमानी विद्वान् ब्राह्मण पूर्वी केवढा धि:कार करीत असत हे खाली लिहिलेल्या संस्कृत वचनांवरून दिसून येईल. ती वचने खालच्याच पायरीवर बसायास योग्य आहेत म्हणून त्यांस ह्या पृष्ठाच्या पादतली ठेविली आहेत; परंतु मोरोपंतासारिख्या सुज्ञ कवींची प्राकृत भाषेसंबंधी जी वचने आहेत त्यातून एकदोहोंस एथे सन्मानाची जागा देतो.
अबलांस न कळे संस्कृतवाणी। जैसे आडातील गोड पाणी॥
परी ते दोर पात्रां वाचुनी। अशक्त जनां केंवी निघे॥
तोचि तडागासि येता त्वरे। तात्कालचि तृषा हरे॥
श्रीधर.
संस्कृत सुकृत यद्यपि तथापि अर्थोदका महायास।
न तथा प्राकृत गंगा सहजे अर्थोदका पिया यास॥
मोरोपंत.

असो, ह्या प्रस्तावाच आता अंत केला पाहिजे. प्राकृत कवींनी परोपकार बुद्धीने ज्या मह्हाराष्ट्र भाषेचे आजवर रक्षण केले तिला आता आमच्या बलिष्ठ आणि विद्वान इंग्लिश सरकारचा महदाश्रय मिळाला आहे. आता तिची दशा सरून तिचे सौभाग्य उत्तरोत्तर वर्द्धमान होत चालले आहे. युरोप आणि अमेरिका एथील विद्वान् व परोपकारी पुरुषांनी तिला आपल्या विद्या मंदिरी आमंत्रण केले आहे, व महाराष्ट्र जनातील विद्वानहि तिचे अवलंबन करू लागले आहेत. खरोखर महाराष्ट्र भाषेस सुदिन प्राप्त झाला आहे.>

बाबा पदमनजींच्या काही दशके आधीच्या काळातील शासकीय मराठीचा एक नमुना पहा. पुण्यातील संगमावर सरकारने १८३० साली वेलस्लीचे नाव दिलेला पूल बांधला त्याचे हे निमंत्रण:

<सलाम आ की दरीविला संगमाजवळ नावापूल सरकारातून बांधविला आहे त्याचा रस्ता चालू करण्याचा उच्छाहा पाहाण्याकरिता आलीशान गौरनरसाहेब बहादूर यांची स्वारी त॥ १८ माहे मजकुरी शुक्रवारी प्रात:काली साहा वाजता येणार त्यास आपण पाहावयाची खुषी असल्यास गारपिरावर एजंट कचेरीस ही चिटी बरोबर घेऊन आले पाहिजे हजरतीचे हुकुमावरून लि॥ असे त॥ १७ जून १८३० ज्यादा काय लि॥ प्यार कीजे हे किताबत. इंग्रजी सही. (प्रारंभी कोपर्‍यात) पौ छ जिल्हेज सन इहिदे सलासीन मयातैन व अलफ.> (’शहर पुणे, एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा, खंड २’ ह्या पुस्तकातील कल्याण काळेलिखित ’पुणेरी भाषा’ ह्या लेखातून). शेवटच्या ओळीचा अर्थ - पैवस्ती (पत्र मिळण्याची तारीख) सुहूर सन (अकबराने सुरू केलेले सौर फ़सली वर्ष १ (इहिद) + सलासीन (३०) + मयातैन (२००) व + अलफ (१०००) = १२३१, ह्या वर्षाच्या झुल्-हिज्जा ह्या पाचव्या महिन्याचा दिवस (छ - प्रत्यक्ष दिवस टाकलेला दिसत नाही.)

आणखी एक पत्र पहा:
(श.१७५८ माघ वद्य ११. इ. १८३७ मार्च ३.)
<राजश्री सखो लक्ष्मण कारकून शहर पुणे विनंति वि॥ माधवराव बाळकृष्ण गद्रे व॥ पेठ बुधवार यांणी अर्जी दिल्ही त्यातील हासील की पेठ म॥री आमवे ख॥ घर आहे ते आम्ही खरेदी देणार त्यास हुकुम झाला पाहिजे म्हणून त्याजवरून तुम्हांस चौकसीविसी लिहिता तुम्ही त्याचा जाब प॥ तो पाहून हल्ली तुम्हांस लिहिले असे तरी सिरस्ते प्र॥ कुलकर्णी यांजकडून खरेदीखत लिहून देऊन नंतर पेठचे बुकास बार करून अर्जदार याचे हवाली कर्णे त॥ ३ मार्च सन इ. १८३७ हे विनंती.
रुजु बापुजी गणेश शास्त्री कमावीसदार शहर पुणे> (’पेशवाईच्या सावलीत’ सं. ना.गो. चापेकर पृ. ७९.)

अशा ह्या नाठाळ गुराप्रमाणे मोकाट सुटलेल्या मराठी भाषेस आधुनिक रूप देऊन नव्या विचारांसाठीची वाहनक्षमता तिच्यामध्ये आणण्याचे प्रयत्न १९ व्या शतकाच्या प्रारंभापासून आणि इंग्रज शासकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. त्यामध्ये मराठी भाषेसाठी व्याकरण लिहिणे, मराठी भाषेमध्ये पाठ्यपुस्तके लिहिणे असे उपक्रम सुरू झाले.
अशा पूर्वी निर्माण झालेल्या कोशांचा एक आढावा विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी घेतला होता आणि त्याच्या आधारे आपटेकृत ’मराठी शब्दरत्नाकरा’च्या प्रस्तावनेमध्ये कोशसदृश प्रयत्नांची खालील यादी पाहण्यास मिळते.
१. महानुभाव ग्रंथकारांनी रचलेला मध्यकालीन मराठी शब्दांचा कोश. २. हेमाद्रि पंडिताने श. ११६० मध्ये केलेला काही संस्कृत शब्दांचा मराठी अर्थ देणारा कोश. ३. श. १२३९ पर्यंतच्या काळात महाराष्ट्रात यादवांच्या राजवटीत झालेले एक शुद्ध मराठी व संस्कृत मराठी असे दोन कोश. ४. श. १२३९ नंतरच्या तीनशे वर्षात मुसलमानी अंमल दक्षिणेत जारीने चालू असता अनेक यावनी शब्द मराठी भाषेत प्रविष्ट झाले होते व त्यात विशेषत: जमाखर्चविषयक शब्दांचाच भरणा होता (राजवाडे). ५. शिवराज्याभिषेकानंतरचा राज्यव्यवहारकोश. ६. निजामाच्या दरबारात असलेले पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे ह्यांनी युरोपियन लष्करी शब्दांची परिभाषा लिहून ठेवली होती ती.

त्यानंतर कोशरचनेचे पहिले पाऊल उचलले ते प्रख्यात रे. विल्यम कॅरी ह्यांनी. त्यांनी मराठीचे पहिले व्याकरण १८०५ मध्ये आणि पहिला मराठी इंग्रजी कोश सेरामपूर प्रेसमध्ये १८१० मध्ये सेरामपूर प्रेसमध्ये छापला. सुमारे १०,००० शब्दांच्या ह्या कोशात मराठी शब्द मोडी लिपीत लिहिले होते. हा कोश मुख्यत्वे करून महाराष्ट्रात कार्य करणार्‍या मिशनरींच्या उपयोगासाठी लिहिला होता. ह्यापुढील कोश म्हणजे १८२४ मधील इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी असा ले.क.व्हान्स केनेडी ह्यांनी केलेला कोश. हा कोश म्हणजे संस्कृत अमरकोशातील शब्द उचलून त्यांचे अर्थ देणारा सुमारे ८,००० शब्दांचा कोश. ह्यापुढील प्रयत्न मोल्सवर्थ आणि कॅंडी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळशास्त्री घागवे, गंगाधरशास्त्री फडके, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ला, परशुरामपंततात्या गोडबोले, - नंतर ह्यांनीच ’नवनीत’ हे जुन्या मराठी काव्यातील वेच्यांचे पुस्तक आणि ’वृत्तदर्पण’ हे वृत्तरचनेविषयीचे सुबोध पुस्तक अशी प्रख्यात पुस्तके निर्माण केली. १९-२०व्या शतकातील कित्येक दशके ही पुस्तके शालेय मराठी पाठयक्रमाचा भाग असत आणि त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. - रामचन्द्रशास्त्री जान्हवेकर आणि जगन्नाथशास्त्री क्रमवंत ह्या सात पंडितांनी १८२९ साली केलेला मराठी-मराठी कोश. हा जास्ती ’पंडिती असल्याने ह्याचीहि उपयुक्तता मर्यादितच राहिली.

तदनंतर येतो १८३१ साली मोल्सवर्थ ह्यांनी थॉमस आणि जॉर्ज कॅंडी ह्या जुळ्या भावांच्या मदतीने तयार केलेला सुमारे ४०,००० शब्दांचा कोश. ह्या कोशाची, त्याच्या आवृत्त्यांची आणि त्याचे निर्माते मोल्सवर्थ आणि कॅंडी बंधु ह्यांच्याबाबत माहिती पुढील भागांमधून.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

अत्यंत रोचक माहिती. पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिती अतिशय रोचक आहे. मोल्सवर्थबद्दल बरीच माहिती नवी आहे मला तरी. राजसत्तेतील बदल आणि भाषाबदल यांच्या परस्परसंबंधाबद्दल एकदम सहमत. ते महानुभाव काळातील कोश कुठे मिळतील का हो नेटवर वगैरे?

एक जाताजाता अवांतरः

ह्याचे कारण म्हणजे लेखनवाचन ह्या गोष्टींमध्ये काही स्वारस्य असलेला पंडितवर्ग जवळजवळ संपूर्णपणे आपले लक्ष संस्कृत भाषा आणि त्या भाषेतील पारंपारिक ज्ञान ह्यावरच केन्द्रित करून होता. मराठी भाषेचा विकास, तिची शब्दसमृद्धि, व्याकरण, प्रमाणलेखन ह्याकडेहि लक्ष द्यावे असे कोणाच पारंपारिक विद्वानास जाणवत नव्हते.

सर्वच संस्कृतोद्भव भाषांची हीच परिस्थिती होती. तुलनेने कन्नड आणि तमिऴ या भाषांची व्याकरणे मात्र हजार दीड हजार वर्षांपूर्वीच लिहिली गेली. (कन्नड-कविराजमार्गम, इ.स. ९००-१००० तर तमिऴ-तोलकाप्पियम, इ.स.१०० ते ६००) त्यांतील साहित्यही जुनेच आहे. याचे कारण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक नकाशात आपले स्थान ठळक करण्यासाठी त्या ठिकाणच्या राजसत्तेला देशभाषेचा आधार घ्यावासा वाटला. त्याच ठिकाणच्या लोकांना असे वाटण्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा संस्कृतोद्भव नव्हती, अतिशय वेगळी होती. त्यामुळे आपले विशेष अस्तित्व दाखवण्यासाठी संस्कृत साच्यातले, परंतु स्वभाषेतले वाङ्मय रचणे सुरू झाले.तुलनेने उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातसुद्धा संस्कृत, प्राकृत किंवा अपभ्रंश यापेक्षा वेगळ्या भाषेत आपले सांस्कृतिक संचित व्यक्त करावे अशी गरज पारंपरिक पंडितांना बर्‍याच उशिरापर्यंत वाटली नाही कारण इंडोआर्यन बोलीभाषा आधी संस्कृत, मग प्राकृत आणि अपभ्रंश यांपेक्षा वेगळ्या होण्यासच बराच काळ गेला. त्यामुळे साहित्य रचायला लायक अशा भाषा फक्त संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश याच किंवा बर्‍याच वेळेस फक्त संस्कृत-असतात असे अ‍ॅटिट्यूड तयार झाले होते ते मोडणे अशक्यप्राय होते. (तरी यात मराठी जरा विशेष म्हटली पाहिजे. कारण महानुभाव काळात गद्य वाङ्मय रचले गेले, भीष्माचार्यांनी तर मराठीचे व्याकरणदेखील रचले होते इ.स.१३००-१४०० च्या सुमारास.)

युरोपातदेखील लॅटिनोद्भव भाषांत साहित्य रचणे वगैरे जर्मानिक भाषांच्या तुलनेने फार उशिरा सुरू झाले. दांतेचे डी व्हल्गारी इलोक्वेन्शिया हा त्याला अपवाद ठरावा.

(या माहितीचा श्रेयअव्हेर: श्री. शेल्डन पोलॉक)

१: अर्थात या प्रमाणीकरणाचा कितपत आणि कसा उपयोग झाला ते एक शेल्डन पोलॉकच जाणे. ब्रिटिश काळात प्रिंटिंग आणि जातीपातींच्या भिंती सोडून बहुसंख्यांना दिलेल्या शिक्षणामुळे ते प्रमाणीकरण आधीच्या तुलनेत जरा जास्ती दृढ झाले असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखमालेचा विषय फार आवडला. सुरुवातही सुरेख झाली आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लेखमालेचा विषय, मांडणी, घनता, प्रवाहीपणा सारेच आवडले.
ही एक अत्यंत संग्राह्य लेखमाला होईल असे वाटते - खात्रीच आहे. आभार आणि पुढील भागांची वाट पाहत आहेच.

@बॅटमॅन, सहमत आहेच. मात्र याचे अजून एक कारण असेही आहे की 'त्या' प्रदेशावर 'परकीय' भाषांचे/शक्तींचे आक्रमणही त्यामनाने कमी झाले. त्या भाषेला फुलायला एकसंध असा बराच कालावधी मिळालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>>> लेखमालेचा विषय, मांडणी, घनता, प्रवाहीपणा सारेच आवडले.
>>>> ही एक अत्यंत संग्राह्य लेखमाला होईल असे वाटते - खात्रीच आहे. आभार आणि पुढील भागांची वाट पाहत आहेच.

अतिशय सहमत. केवळ एकदा ओझरती नजर टाकून वाचण्यासारखा हा लेख नाही. तब्बेतीत वाचला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मात्र याचे अजून एक कारण असेही आहे की 'त्या' प्रदेशावर 'परकीय' भाषांचे/शक्तींचे आक्रमणही त्यामनाने कमी झाले. त्या भाषेला फुलायला एकसंध असा बराच कालावधी मिळालेला आहे.

हे कोरिलेशन की कॉजेशन? मला तरी कोरिलेशन वाटते. मुळात जो डेटा उपलब्ध आहे तो जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. नेमक्या संस्कृतोद्भव भाषा या भौगोलिकदृष्ट्या बाह्य प्रभावांना जास्त ससेप्टिबल असल्यामुळे असे झालेय. युरोपातदेखील तीच स्थिती. त्यामुळे निर्णय करणे कठीण आहे. हे जरा अवांतर होतंय, पण मग तेलुगुची केस तुमच्या आणि माझ्या यांपैकी कुठल्याच साच्यात बसत नाहीये.असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरंय तेलुगु आणि एकुणच तेलंग प्रान्तच नव्हे तर एकूणच निजाम स्टेट (किंवा दक्षिणेतील मुसलमान राज्ये) यावर वेगळाच विचार करावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहज ऐसीचे आर्काईव्ह्ज चाळताना लेख सापडला आणि चारही भाग वाचून काढले म्हणून उत्खनन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.