मोल्सवर्थ कोश, मोल्सवर्थ आणि कँडी - भाग २.

संपादकः इतर भागः भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
===
जेम्स थॉमस (जे,टी.) मोल्सवर्थ ह्यांचा जन्म ’व्हायकाउंट’ हा किताब असलेल्या उमराव घराण्यात १७९५ साली झाला. ६ वे व्हायकाउंट मोल्सवर्थ निपुत्रिक वारल्यामुळे त्यांचा किताब आणि मालमत्ता चुलत शाखेकडे गेले आणि जे.टी.चा थोरला भाऊ रिचर्ड हा ७ वा व्हायकाउंट मोल्सवर्थ झाला. ब्रिटिश उमराव घराण्यांमध्ये किताब आणि मालमत्ता primogeniture नियमानुसार पूर्णत: सर्वात थोरल्या मुलाकडे जाते आणि पुढील भावांना आपल्या उपजीविकेसाठी घर सोडावे लागते. अशांपैकी पुष्कळजण नशीब काढण्यासाठी हिंदुस्तान, अमेरिकन वसाहती वा अन्य दूरदूरच्या देशांकडे वळत असत. ह्या पद्धतीला अनुसरून जे.टी. मोल्सवर्थ ह्यांना वयाच्या १६व्या वर्षाच्या पुढेमागे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ’एन्साइन’ ह्या कमिशण्ड अधिकार्‍याच्या सर्वात खालच्या पातळीपासून प्रारंभ करावा लागला. (असे घडून आणण्यासाठी आपल्या कुटुंबाच्ता प्रतिष्ठेचा उपयोग त्यांना निश्चित झाला असणार कारण त्या काळात कंपनीची चांगली नोकरी मिळण्यासाठी वरपर्यंत हात पोहोचणे आवश्यक असे.) कंपनीच्या सर्व अधिकार्‍यांना हिंदुस्तानातील एखाद्या भाषेचे शिक्षण घेणे आवश्यक असे. त्यानुसार १८१४ साली त्यांनी मराठी आणि हिंदुस्तानी भाषांच्या परीक्षा उत्तम प्रकारे दिल्या. हिंदुस्तानात येण्यापूर्वीच त्यांनी ग्रीक आणि लॅटिनचा अभ्यास केलेला होता. मराठी आणि हिंदुस्तानीबरोबरच त्यांनी संस्कृतचीहि ओळख करून घेतली. ९व्या आणि ६व्या नेटिव पायदळात त्यांची मराठी आणि हिंदुस्तानीचा दुभाषा म्हणून काम केले. १८१६ मध्ये त्यांना लेफ्टनंटची बढती मिळाली आणि पायदळाकडून त्यांची सैन्याच्या पुरवठा विभागामध्ये (Commissariat) बदली झाली. ६ व्या नेटिव इन्फन्ट्रीचे जे. टी. मोल्सवर्थ ह्यांना सब-असिस्टंट कमिशनर म्हणून नेमले गेल्याची नोंद १८१६ च्या East-India Register and Directory मध्ये पाहण्यास मिळते.

१८१८ साली त्यांची नेमणूक सोलापुरात असतांना आपल्या कामासाठी भाषान्तराला उपयुक्त अशा शब्दांची जंत्री करण्याचे काम त्यांनी फावल्या वेळात सुरू केले. त्यांच्याहून ९ वर्षांनी लहान असलेले थॉमस कॅंडी त्यांच्यासारखेच सैन्यात दुभाषाच्या कामावर नेमलेले होते आणि त्यांनाहि अशा जंत्रीच्या कामात रुचि असल्याने दोघांनी मिळून सहकार्याने हे काम सुरू केले. ह्या जंत्रीतूनच त्यांना मराठी शब्दकोश निर्माण करण्याची कल्पना सुचली.

तदनंतर काही वर्षानी गुजराथेत खेडा येथे काम करीत असतांना त्यांनी शब्दकोशाचा हा प्रस्ताव सरकारपुढे मांडला. प्रस्तावानुसार कोशाला हाताखाली नेमेलेल्या सहायक शास्त्रिवर्गाचे वेतन आणि अन्य खर्च मिळून २,००० रुपये लागले असते आणि असा कोश पूर्णपणे तयार करून तो सरकारला प्रसिद्धीसाठी कायमचा सुपूर्द करण्यासाठी ३,००० रुपयांची मागणी त्यांनी केली होती. व्हान्स केनेडी ह्यांचा कोश नुकताच तयार झालेला असल्याने सरकारला ह्या प्रस्तावात प्रारंभी तरी फार स्वारस्य नव्हते. तरीहि मोल्सवर्थ ह्यांनी आपल्या जबाबदारीवर कोश करावा आणि तो पूर्ण झाल्यास सरकार तो ३००० ला घेईल, पण तो प्रसिद्ध करायचा का नाही हा निर्णय सर्वस्वी सरकारचा असेल अशी सरकारी मंजुरी मिळाली आणि कोशाचे काम सुरू झाले.

एव्हाना मराठीवरील प्रभुत्वाबाबत त्यांची ख्याति पसरू लागली होती. ह्या बाबतचे तत्कालीन पुस्तकात नोंदवलेले पुढील मत पहा:

In the case of Lieut. J. T. Molesworth on the Bombay establishment, whom I never saw, this effort of unaided study was made at sea some years ago, under the most discouraging concomitants imaginable, but with such success, that I have every reason to believe this accomplished young officer has long been one of the best hindoostanee linguists in that presidency, and I have no doubt of his being, by this time, an excellent oriental scholar, who must sooner or later, if spared by Providence, attract the notice and merit the patronage of his superiors, and the enlightened governor of so flourishing a settlement, where talents and integrity, such as Lieut. Molesworth's, cannot long remain without the reward they richly deserve, if I may be allowed to judge of them, from his literary correspondence with me, after his arrival in India. (John Bothwick Gilchrist - Introduction, The Hindee-Roman Orthoepigraphical Ultimatum.)

मराठी कोशाचे हे काम दूर गुजराथेत खेडा येथे राहून करणे अडचणीचे असल्याने मोल्सवर्थनी आपली मुंबईला बदली करावी अशी सरकारला वारंवार विनंती केली. कोश करण्याच्या कल्पनेने त्यांना इतके झपाटलेले होते की मुंबईला कोशाच्या कामासाठी बदली केल्यास ३००० रुपयांवरचा हक्क सोडण्याचीहि तयारी त्यांनी सरकारला कळवली. अखेर मे १८२५ त सरकारी निर्णय होऊन त्यांना कोशाच्या कामासाठी मुंबईस जाण्य़ाची परवानगी मिळाली. जॉर्ज आणि थॉमस कॅंडी ह्या जुळ्या भावांनी पूर्वी शब्दांची जंत्री करण्यासाठी मोल्सवर्थना मदत केली होती. ते दोघेहि मुंबई सरकारखाली लेफ्टनंटच्या हुद्द्यावर काम करीत होते. त्यांनाही मे १८२६ मध्ये मोल्सवर्थच्या मदतीला देण्यात आले आणि अशा रीतीने कोशाचे काम मार्गी लागले. ह्या नेमणुकीचा उल्लेख १८२६ च्या Oriental Herald and Journal of General Literature येथे पाहण्यास मिळतो.

ह्या कामाचा प्रारंभ म्हणून जिल्ह्या-जिल्ह्याच्या कलेक्टरांकडून त्यांच्या-त्यांच्या भागात प्रचलित असलेल्या शब्दांच्या याद्या मिळवल्या. ह्या याद्या स्थानिक शास्त्रीपंडित आणि सर्वसामान्य जनता ह्यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या होत्या. अशा मार्गाने गोळा झलेल्या शब्दांवर कोशात समाविष्ट करण्याच्या हेतूने केलेले संस्करण कोशाच्या १८३१ जूनमध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये वर्णिले आहेत. त्याचा (माझ्या शब्दांत) सारांश असा:

’गोळा झालेल्या शब्दांना पुनरावृत्ति, दुसर्‍या शब्दाचे केवळ बिघडलेले रूप, फार विद्वज्जड, फार हीन दर्जाचा, अति-मर्यादित वापराचा अशा चाळण्या लावून सुमारे २५,००० शब्द उरले. त्यांची यादी करण्यात आली. तिघा युरोपियनांपैकी एकाने (मोल्सवर्थ, जॉर्ज, थॉमस कॅंडी) ह्या यादीतील प्रत्येक शब्दाची ५ ते ७ पंडितांबरोबर एका ठिकाणी बसून छाननी केली. ह्या छाननीमध्ये शब्दाची व्याकरणातील जात, व्युत्पत्ति, लिखाणाची पद्धत, स्पष्ट आणि लाक्षणिक अर्थ, वापर - योग्य/बोलणार्‍यांच्या मुखातला, सार्वत्रिक/मर्यादित, अशा बाबी नोंदविण्यात आल्या. आवश्यक तेथे वापराच्या बाबीत ग्रंथांचे आधार शोधण्यात आले. एका मुळाक्षराने प्रारंभ होणारे सर्व शब्द छाननी करून झाले की निर्माण झालेली सर्व सामग्री दुसर्‍या पातळीवर तपासण्यासाठी राखून ठेवली आणि पुढच्या मुळाक्षराला प्रारंभ केला. दुसर्‍या खोलीत तिघांपैकी दुसरा एका पंडिताबरोबर बसून उपलब्ध हस्तलिखित ग्रंथ, पत्रव्यवहार, सरकारात आलेले अर्ज अशांची छाननी करून नवे शब्द शोधण्याच्या कामावर गुंतलेला होता. अशा शब्दाची वरील प्रकाराने छाननी केली जात होती. असे झालेले सर्व काम पुनर्निरीक्षणासाठी तिसर्‍याच्या हाती सोपवले गेले. पंडितांपैकी सर्वात अधिक ज्ञानी पंडित त्याच्याबरोबर बसून त्या दोघांनी पहिल्या दोन गटांच्या कामाचे पुन:परीक्षण केले.'

अशा छाननीमधून सर्व शब्द गेल्यावर एकूण शब्दसंख्या २५,००० वरून ४०,००० इतकी वाढली.

कोशामध्ये कोणते शब्द घ्यायचे ह्याबाबत पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये काही स्पष्ट विधान आढळले नाही. मूळचे अरेबिक आणि फारसी असलेले पण मराठीत सरसकट वापरात असलेले ३,००० शब्द कोशात आहेत हा उल्लेख दिसतो. दुसर्‍या १८५७ च्या आवृत्तीत ह्यावर खालील विधान केलेले सापडते:

...but that the Sanskrit, in its height and depth, and with all its vigour and elegance and majesty, and the common tongue, with its provincialisms and colloquialisms, yea, and the multitudes of its expressive and fondly loved vulgarisms, should and do concur to compose the grand and popular language of Maharashtra. Without sanctioning this pretension of its fullness, a dictionary of the Marathi confessedly constituted of elements of wealth and variety, must certainly contain Sanskrit words learned as well as ordinary, recondite as well as familiar, regarding but the two considerations of present currency and probable serviceableness; whilst of Marathi words it must contain the uncommon and the common, the local and the general, the coarse and the neat, the domicialated import and the genuine home-stock; not daring to discard what Maratha speakers are pleased to employ, or too delicately to discriminate betwixt the corrupt and the pure, or even betwixt the unchaste or the unclean and the altogether comely.

(सारांश: असे म्हणता येईल की संस्कृत - तत्सम - शब्द घेतांना चालू वापर आणि व्यवहारात वापरला जाण्याची शक्यता हे निकष लावले आहेत. देशी शब्दांना लवलेला निकष इतकाच आहे की तो शब्द बोलणार्‍यांच्या मुखात असावा. अन्य कोणताहि निकष - जसे की सामान्य/असामान्य. स्थानिक क्षेत्रात मर्यादित/सर्वत्र आढळणारा, हीन/सभ्य, परक्या भागातून आलेला/मूळचा येथील - लावलेला नाही. जे शब्द मराठी बोलणार्‍यांच्या वापरात आहेत, त्या सर्वांना स्थान दिले आहे.)

ह्या सर्व परिश्रमामधून दोन कोश निर्माण झाले - १८२९ सालचा सात पंडितांचा मराठी-मराठी कोश आणि १८३१ चा मोल्सवर्थ-कॅंडी बंधूंची नावे असलेला मराठी-इंग्रजी कोश. पंडितवर्गाने केलेला कोश मराठी-मराठी कोश सुमारे ७-८,००० शब्दांचा होता. ’यावनी’ राज्यकर्त्यांनी आणलेले ’दर’, ’तयार’, ’रोज’, ’साल’ अशा प्रकारचे शब्द त्यात नाहीत. तसेच दिलेले अर्थ क्लिष्ट आणि पाल्हाळिक पद्धतीने दिले आहेत असे त्याचे मूल्यमापन गो.वा.आपटे-कृत ’मराठी शब्दरत्नाकर’ ह्या १९२० साली प्रकाशित झालेल्या कोशाच्या प्रस्तावनेमध्ये करण्यात आले आहे.

मराठी-इंग्रजी कोशाचे नाव A Dictionary Murat,hee & English असे छापले आहे. देवनागरी शब्दांचे रोमनीकरण करण्याचे सर्वमान्य प्रघात ह्या वेळेपर्यंत पडले नव्हते. ह्या पुस्तकातील रोमनीकरण गिलख्रिस्ट पद्धतीनुसार केलेले आहे असा प्रस्तावनेमध्ये उल्लेख आहे.

तयार झालेला मराठी-इंग्रजी कोश सरकारकडून स्वीकार केला जाण्याबाबत प्रथम काही मतभेद होते पण अखेर सप्टेंबर ७, १८३१ ह्या दिवशी सरकारातून कोशाबाबत समाधान व्यक्त करणारे पत्र पाठविण्यात आले. पुढे लौकरच डिसेंबर ५, १८३२ साली इंग्रजी-मराठी कोश करण्यासाठीहि सरकारची मंजुरी मिळाली.
मराठी-मराठी कोश नंतर विशेष गाजला नाही. ह्याचे कारण असे दिसते की मोल्सवर्थचे वर वर्णिलेले सर्वसमावेशक धोरण पंडित वर्गाने आपल्या कोशात वापरले नाही. मोल्सवर्थच्याच शब्दांत:

...For so backward are the Brahmins in adopting the principles in adopting the principles I have prescribed, that to this moment, they would reject words expressive of ideas and corresponding to terms which though abstract and learned are to us familiar and of which the occurrence will be constant in translations from English; whilst they would receive readily high Sanskrit words for sun and moon, wood, water and stone...

कोशाबरोबरच मोल्सवर्थ बॉंबे नेटिव एज्युकेशन सोसायटीसाठी मराठी क्रमिक पुस्तके करण्याच्या कामातहि गुंतलेले होते. त्यांचे बहुतेक वास्तव्य मुंबई आणि महाबळेश्वर येथे असे. मुंबईत स्कॉटिश मिशनच्या रे.विल्सनबरोबर त्यांचा चांगला परिचय होता कारण मिशनरी कार्यासाठीहि ते आपल्या मराठीच्या ज्ञानाचा उपयोग करीत असत असा उल्लेख मिसेस् विल्सन ह्यांच्या आठवणीच्या पुस्तकात मिळतो.

तब्येतीच्या खराबीच्या कारणासाठी १८३६ च्या प्रारंभी त्यांना इंग्लंडला रजेवर जाण्याची परवानगी मिळाली आणि इंग्रजी-मराठी कोशाचे काम पूर्ण न करताच ते इंग्लंडला परतले. तेथेहि त्यांची तब्येत सुधारली नाही आणि तब्यतीच्या कारणासाठी तेथूनच त्यांनी आपल्या सैन्यातील जागेचा राजीनामा दिला. (Capt. JT Molesworth of 11 NI retired in England 24th April 1837 -The Asiatic journal and monthly register 1837.)

असा राजीनामा देण्यामागे अजून एक कारण म्हणजे ख्रिश्चन धर्म आणि सैन्यातील सेवा हे एकमेकांच्या विरोधी आहेत अशी त्यांची धारणा बनली होती. नोकरी सोडल्यानंतर आपला सैन्यातील हुद्दा न वापरता, तसेच उमराव घरातील जन्मामुळे येणारे ’Honourable' हे पद न स्वीकारता मि. मोल्सवर्थ ह्या साध्या नावाने ओळखले जाणे त्यांनी पसंत केले. तसेच सैन्यातील नोकरीचे पेन्शनहि न घेण्याचे ठरविले. आतापर्यंतचा सर्व काळ आणि ह्यानंतरहि ते अविवाहितच राहिले.

इंग्लडमध्ये त्यांनी काय केले, त्यांची उपजीविका कशी चाले ह्याबाबत काहीच उल्लेख मिळात नाहीत. ख्रिश्चन चळवळींमध्ये आणि विचारांमध्ये त्यांना बरेच स्वारस्य असावे असा तर्क करता येतो कारण अशा चर्चेत त्यांनी भाग घेतल्याचे त्रोटक उल्लेख आढळतात.

इकडे हिंदुस्तानात त्यांच्या कोशाची ख्याति हळूहळू पसरत होती. १८४७ मध्ये थॉमस कॅंडी ह्यांनी इंग्रजी-मराठी कोश पूर्ण करून प्रसिद्ध केला. १८३१ च्या कोशाच्या प्रती संपत आल्या होत्याच. ही संधि साधून सरकारने मोल्सवर्थ ह्यांना त्याची सुधारित दुसरी आवृत्ति काढण्यासाठी बोलवावे असा प्रस्ताव कॅंडी ह्यांनी मांडला. तो सरकारने स्वीकारल्याने सुमारे १५ वर्षांच्या अनुपस्थितीनंतर मोल्सवर्थ पुन: हिंदुस्तानात परतले.

१५ वर्षांनंतर मोल्सवर्थ ह्यांचे मराठीवरील प्रभुत्व जराहि कमी झालेले नव्हते. त्यांना ह्या सुमारात मुंबईत भेटलेले एक अधिकारी डेविड डेविडसन ह्यांनी पुढील आठवण नोंदवली आहे:

Some days after, at the same quarters, I heard a palanquin draw up, and a gentleman speaking to the bearers in the purest Marathee. This was Captain Molesworth, who, associated with George Candy's twin-brother Tom, had twenty years before completed the first part of his Marathee Dictionary, the most perfect work of the kind that ever was produced. He had retired from the service in very feeble health, and, after twenty years, had been induced to return to carry on and publish the second part (the English and Marathee) of his admirable dictionary. (David Davidson - Memoirs of a Long Life, पृ.२७६-२७७).

पहिल्या आवृत्तीपेक्षा ह्या आवृत्तीच्या वेळचा अनुभव वेगळाच होता. पहिल्या वेळेस सर्व अनिश्चित होते. मेहनत घेऊन केलेल्या पुस्तकाचे सरकारकडून कसे स्वागत होईल ह्याबाबत शाश्वती नव्हती. कामाला योग्य वातावरण मिळावे ह्यासाठी झगडायला लागत होते. ह्या खेपेस सरकारकडून आमन्त्रण येऊन आणि सर्व अटी मान्य करून घेतल्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. सर्व काम पुणे आणि महाबळेश्वर येथे करण्यात आले. मोल्सवर्थ ह्यांना ह्या खेपेस आरोग्यानेहि उत्तम साथ दिली. १८५७ साली २०,००० अधिक शब्दांची भर असलेली दुसरी आवृत्ति प्रसिद्ध झाली.

पहिल्या आवृत्तीची किंमत प्रारंभी रु.६५ इतकी ठेवण्यात आली होती पण किंमत अधिक वाटल्याने पुष्कळ इच्छुकांच्याकडून तक्रार आल्याने ती कमी करून प्रारंभी रु.५० आणि शेवटी रु.२० करण्यात आली होती. दुसरी सुधारून वाढविलेली आवृत्ति सुरुवातीपासूनच रु.३६ ला विक्रीस ठेवली गेली आणि १८७० पर्यंत बहुतेक पुस्तके संपून गेल्यामुळे पुस्तक दुर्मिळ झाले. १८५७ मध्ये छापली गेलेली एक प्रत मला आमच्या येथील ग्रंथालयात हाताळायला मिळाली. 'दुर्मिळ'असे तिचे वर्गीकरण असल्याने ती ग्रंथालयाच्या संदर्भ विभागात बसूनच चाळावी लागली.

१८५७ च्या कोशाची किंमत अधिक होती, तसेच त्याच्या विस्तारामुळे आणि आकारामुळे पुष्कळ प्रसंगी तो जवळ बाळगणे अवघड होते अशा कारणांनी १८६३ साली बाबा पदमनजी ह्यांनी ह्या कोशाचा संक्षिप्त कोश तयार केला. मुळातील ६०,००० च्या जागी ह्या संक्षेपात ३०,००० शब्द आहेत. त्याची किंमतही ग्राहकांना परवडेल अधिक इतकी - उत्तम कागदाच्या प्रतीस रु.६ आणि साध्या कागदाच्या प्रतीस रु.५ अशी - ठेवण्यात आली. संक्षेपाचे नाव ’A Compendium of Molesworth's Marathi and English Dictionary असे देण्यात आले.

अलीकडच्या काळात १९७५ मध्ये ना.गो.कालेलकरलिखित प्रस्तावना आणि शरद गोगटेलिखित मोल्सवर्थ आणि सहकार्‍यांच्यावर चरित्रविषयक टिपण ह्यांसह १८५७ च्या आवृतीवरून कोशाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे आणि तदनंतर त्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण अनेक वेळा करण्यात आले आहे.

१८६० च्या सुमारास ’मोरेश्वरशास्त्री’ (त्यांच्या संपर्कातील पंडितांचा शब्द) पुन: इंग्लंडला परतले. त्यांचे तेथील उर्वरित आयुष्य कसे गेले ह्याबाबत काहीच माहिती उपलब्ध झाली नाही. जुलै १३, १८७१ ह्या दिवशी क्लिफ्टन येथे त्यांचे निधन झाले.

लेख संपविण्यापूर्वी मोल्सवर्थ ह्यांचे व्यक्तिमत्त्व, ख्रिश्चन धर्मावरची श्रद्धा इत्यादींबद्दल खालील मते पहा:

Another remarkable man was Mr. Molesworth. He had attained the rank of Major; but, coming to believe that military service was inconsistent with his duty as a Christian, he had quitted the army, dropped his pay and military rank, and become plain Mr. Molesworth. He was tall, stately, aristocratic in bearing and appearance; a keen observer; well acquainted with the best prose writers in English — at least those of a former generation ; with much power of thought, and full of animation in his talk; above all, an earnest Christian man. He had watched the ’Plymouth ' movement with much hope; but when the brethren began to quarrel and split, his inmost soul was wounded. 'Don't go near them,' he said to me when I was going home; 'they are all biting and devouring one another.' I never knew a man who studied the Scriptures more deeply, or could throw more light on the meaning of difficult passages. Government had summoned him from England to revise and enlarge the Marathi Dictionary; and most laboriously and successfully did he perform the work. (In Western India, by Rev. J. Murray Mitchell पृ. २६२)
At first the writers of Christian books were naturally the missionaries but I may mention the names of two laymen — Messrs. Molesworth and T. Candy — as yielding valuable aid in this important work. Nearly all my spare time in Poona was given to the composition of Christian books. (Rev. J. Murray Mitchell - In Western India पृ. ३७३)

(पुढच्या तिसर्‍या आणि शेवटच्या भागात थॉमस आणि जॉर्ज कॅंडी ह्यांच्यावर चरित्रविषयक लेखन.)

field_vote: 
4.833335
Your rating: None Average: 4.8 (6 votes)

प्रतिक्रिया

सुंदर लेख. पुन्हा एकदा निवांत वाचणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह!! आवडेश Smile

या मोरेश्वरशास्त्र्यांचा फटू किंवा पोर्ट्रेट मिळेल काय हो कोल्हटकर सर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छानच आहे लेख. इतक्या वर्षानंतरही मोल्सवर्थच्या शब्दकोशाचे महत्व कमी झालेले नाही! त्यांनी चाळणी करुन बाजूला ठेवलेले पण शब्दकोशात समाविष्ट न केलेले शब्द बघायला मिळाले तर मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे वाचले की "इंग्रज नसता तर आल्या असत्या काय तारा" च्या चालीवर 'तारा' ऐवजी कित्येक गोष्टींची भर घालता यावी. स्वतःची ठाम लिपीही (कधी देवनागरी तर कधी पाली)नसणार्‍या मराठीचा इतका चिकाटिने अभ्यास करून शब्दकोश बनवणार्‍या तिघा ब्रिटिशांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

आपल्याकडे इंग्रजीचा सोस वाढत असताना ब्रिटिशांनी मात्र स्थानिक भाषांचा इतक्या चिकाटिने अभ्यास करावा, ती येणार्‍याचे कौतुक करावे हे सारेच लक्षात घेण्यासारखे आहे. असो.

लेख वाचनीय, संग्राह्य आहे.. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वतःची ठाम लिपीही (कधी देवनागरी तर कधी पाली)नसणार्‍या मराठीचा...

पाली?
मला वाटलं मोडी वापरात होती. Smile आणि कधी ही तर कधी ती लिपी हे अंदाजपंचे नसून ठराविक ठिकाणी ठराविक लिपी असे ऐकले आहे. असो.

हा ही लेख मस्तच! भरपूर नवीन माहिती मिळते आहे. या तिघा ब्रिटिशांचे फार कौतुक वाटते आहे आणि त्यांच्याबद्दलची आदरभावना वाढीस लागते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाली नव्हे मोडी! Smile
आभार!

कधी ही तर कधी ती लिपी हे अंदाजपंचे नसून ठराविक ठिकाणी ठराविक लिपी असे ऐकले आहे.

याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल. तुम्हाला किंवा इतर कुणाला माहित असेल तर कृपया द्यावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मोडी जलदगतीने लिहिता येत असल्याने बहुतांशी पत्रव्यवहार मोडीत होत असे, परंतु मोडीत र्‍हस्व-दीर्घ वेगळे नसल्याने पद्य साहित्य देवनागरीतच लिहिले जात असे. गद्य साहित्याबद्दल कल्पना नाही.
आणखी माहिती जाणकार सांगतीलच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लिपी याचा अर्थ सांगली-मिरजेत एक लिपी तर पुण्यात दुसरी असा नसून शासकीय पत्रव्यवहार वगैरेंसाठी मोडी तर "साहित्य" आणि शिलालेख वगैरेंसाठी देवनागरी असा आहे. त्याची कारणे वर आलेलीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बराच प्रयत्न करूनहि मला ह्या दोघांचे फोटो अथवा चित्र मिळू कले नाही. एका ठिकाणी कँडी ह्यांचा फोटो अमुक जागी आहे असा त्रोटक उल्लेख सापडला अणि ते पुस्तकहि जालावर प्रयत्नाने मिळाले. पण ही केवळ हूलच ठरली, तेथे फोटो नाही.

भारतात फोटो घेण्याचे तंत्रज्ञान १८५७ च्या पुढेमागे आले. त्यानंतर पुढील २० वर्षांत हे दोघेहि स्वर्गवासी झाले होते. इतक्या कमी अवधीत त्यांचा फोटो निघालाच नसावा. तसेच त्या काळात त्यांचे पाहून चित्र काढावे इतके महत्त्वाचे ते आहेत असे कोणालाच सुचले नसावे, कारण तसा विचार केला तर दोघेही सरकारातील मध्यम दर्जाचेच अधिकारी होते म्हणून चित्रहि नाही.

मोल्सवर्थ अविवाहित होते. वर दिलेले त्रोटक उल्लेख सोडले तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती मिळाली नाही. बरेच शोधल्यावर कँडी ह्य्यांच्याबद्दल काही तुरळक नवी माहिती मिळाली ती पुढील भागात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सरजी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीची खाण म्हणजे असे लिखाण.
निवांतपणे, सविस्तर वाचण्यासाठी प्रिंट आउट* काढून घेतल्यात, .
.
ह्याला नेमक्या मराठीत कसं लिहावं बुनाही. ("छापील प्रती" म्हणावं तर बोली भाषा वाटत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लेख.
यांच्याबद्दल जी काही माहीती आहे, ती वापरुन, विकी वर (शक्यतो इंग्रजीत) एक पान काढले तर जगभरातील इतर अभ्यासकांकडुन त्यात भर पडु शकेल. कदाचीत त्यात फोटो किँवा चित्रही मिळु शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0