मनू ......माझा लेक .

"तुम्ही घर सोडून गेल्यानंतर सुद्धा बरेच दिवस तो तुमच्या दारासमोर येउन बसे आणि बंद दाराच्या कुलूपाकडे एकटक बघत बसे. थोड्यावेळाने मान खाली घालून निघून जाई . मला दिसला तर मी पोळी घालत असे " शैला फोनवर सांगत होती . मी सुन्न ऐकत होते.

"दिसला तर पोळी घालते !" ऐकून जीवाचं पाणी झालं .आमच्याकडे त्याच्यासाठी म्हणून पहिली ऊन ऊन पोळी असे. आणि त्याही आधी त्याची वाट बघणे , तो आल्याची चाहूल लागता प्रेमाने दार उघडून , त्याचाशी बोलत बोलत त्याला आत घेणे असे .

मनुची आई धसमुसळी , आक्रस्ताळी शोर्ट टेम्पर्ड होती. आपलं तेच करून घेणारी . तिला दिवस गेल्याचा अंदाज आमच्या बायकी नजरांना आला . व्हरांड्यातल्या कोळशाच्या खोक्यात मग मी आणि सासूबाइंनी मऊ कपड्याचे तुकडे मांडायला सुरुवात केली . एका पहाटे बयाबाईंचे आवाज आलेच . " मी माझं सगळं निस्तरलंय ,मी दमले आहे , प्रचंड भूक लागलीये , दुध लौकर द्या , काहीतरी खायला द्या " मग तिची तैनात सुरु झाली . खोक्यात तीन गुंडे एकमेकांची आणि आई असताना आईची उब शोधत एकमेकांच्या कुशीत शिरू लागले .इतरेजनांना तिथे फिरकण्यास मज्जाव होता , आम्ही एक्सेप्शन होतो .

मग पिल्लांचे डोळे उघडण्याची प्रतीक्षा सुरु झाली . बाईसाहेब त्यांना पाच कि सात घरं फिरवून आणणार ठावूक होतं . पण शेवटी इथेच येणार हा विश्वास सुद्धा . तिच्या परवानगीने आम्ही पिलांना काही मिनिटं जमिनीवर ठेवू लागलो. बंद डोळ्याची ती पिल्लं फेंगड्या पायांनी चार पावलं टाकत , मग पुन्हा त्यांना आईच्या कुशीत सोडून द्यायचो . काही दिवस बयाबाई त्यांना घेऊन परागंदा झाली . पण गेली तशी परतही आली . एकेकाला लळतलोंबत तोंडात धरून पुन्हा आमच्या पुढ्यात टाकलं . आता खरी धमाल सुरु झाली. हे जिवंत गुंडे आणि खेळातले चिंध्यांचे गुंडे एकत्र बागडू लागले , पोरासोरांची चंगळ झाली .या तीन दुणे सहा डोळ्यातले भाव टिपता टिपता आम्हाला वेळ पुरेनासा होऊ लागला. या तीन गोळ्यातला एक आमचा 'मनोहर' आमचा मनू , गुणी बाळ.

मनोहर आमचाच होऊन गेला,त्याला आणि आम्हालाही कळले नाही .साधारण कल्याणीच्या आसपासचाच त्याचा जन्म. दोघं जोडीने मोठी होत होती.

आम्ही गच्चीत फिरायला जाता मनू अक्षरशः इंग्रजी आठचा आकडा काढत पायापायात चाले आम्हाला चालणे अवघड करून टाके. आम्ही चालायचं नाही , फक्त त्याचं कौतुक करत रहायचं .मौज होती.

वय वाढू लागलं आणि मनू हेन्डसम दिसू लागला , पण रांगडेपणा वाढला तसाच समंजसपणाही तेवढाच वाढत गेला.

सकाळी माझी पहिली पोळी व्हायला आणि साहेबांची स्वारी अवतरायला . पण आवाज नाही , हाका नाही , फक्त येउन बसणार .आपणच जावून बघायचं आणि हा आला कि दार उघडून याला आत घ्यायचं " बस तिथे , झालीये पोळी , थांब देते " हा शेल्फजवळ बैठक मांडून बसणार. उबदार पोळीतला पहिला चतकोर याला नैवेद्याला . मग बशीत कोमट दुध. मग हा थोडा वेळ थांबून दारापाशी जाणार " एक मिनिट मनू , दार देतो हां उघडून " मिशी नीट पुसत चेहऱ्यावर समाधानाचे भाव घेऊन स्वारी जिन्याकडे रवाना होई , पायरीशी थबकून एकदा वळून पाही " जा , नीट जा" अशी निरोपानिरोपी होऊन साहेब जात .तो बसलेला असताना माझी एकीकडे सकाळची कामं आणि याच्याशी गप्पा चालत.

त्याच्याबद्दल बोललेलं त्याला बरोब्बर कळे. मग वाक्यात मुद्दाम मधेच मनू हा शब्द टाकायचा , कि तिकडे कानांची हालचाल झालीच समजा.

माझ्या मुली आणि शेजारची मुलं सुद्धा त्याचाशी टेडीबेअर सारखे खेळत. त्याला उचलतसाचलत , पण मनूने कधीही त्यांना बोचकारले नाही , कधी कोणावर फिस्काराला नाही .

कधी त्या वेडूला मांडीत बसायचाच मूड येई . मी एक पाय दुमडून विळीवर भाजी चिरत असले कि तो आपल्या पंजाने माझा उभा पाय आडवा करून घेई आणि मांडीच्या खळग्यात आबाद जाउन मस्त बसे , मग माझी भाजी चिरायची नवीच कसरत सुरु होई, मी आणि सासूबाई एकमेकींकडे बघत बारीक हसत राहायचो. मी त्याला गुदगुल्या केल्यासारखे करत उगाचच म्हणे " मनू , उठा आता , माझी भाजी झाली चिरून ..किंवा चला आता निघा " कि तो डोळे घट्ट मिटून घेत " मी तर बाबा गाढ झोपलोय" असा आविर्भाव आणे आणि आणखीनच गुरमटवून घेई. त्याच्या बुब्बुळांची आतल्या आत हालचाल होत राही आणि कान सुद्धा मजेदार हलत. कधीकधी तर ते बोचकं उचलून खाली ठेवावं लागे , मग तो सारं शरीर सैल करून टाके . एक एक क्षण जिवंत होऊन जाई.मनू आमच्यावर हक्क गाजवत होता , पण ते हक्क गाजवणं सुद्धा लाघवी होतं

मनुला ताप असला कि मात्र तो तास तास सुद्धा मांडीतून उठत नसे आणि त्याची झोपमोड होऊ नये म्हणून मग पायाला मुंग्या येउन झिणझीणू लागल्या तरी ते सोसत बसावं लागे. मनू मोठा होत होता तसा देखणा दिसू लागला होता , त्याच्यावर पोरी न भाळत्या तरच नवल वाटले असते . पोरी आल्या म्हणजे मारामाऱ्या आल्या , मग कधीतरी मार खाउन आला कि चक्क अर्निका दिली जाई . कधी इतर बोक्यांसोबतच्या फाईट मध्ये जिंकला तर पोरगी पटायची .मग रात्री हा चिकना हिरो एखाद्या तरुणी सोबत बिल्डींगच्या आसपास दिसे, किंवा रात्रभर त्याचे दमदार आवाज येत राहत . अशा वेळी आम्ही कोणी समोर दिसलो तरी तो ओळख दाखवत नसे . पोरगं तरुण होताना बघणाऱ्या पालकांना होतो तसा आनंद तेव्हा आम्हाला होत होता .पुन्हा सकाळी संत मनोबा होऊन दर्शन द्यायला हजर.

आम्ही घर सोडून दुसरीकडे जायचे ठरले , या मुलाचे काय हा यक्षप्रश्न होता . आता मनू म्हातारा होऊ लागला होता, मारामार्यांमध्ये आता जिंकण्याची खेप कमी आणि लागवून येण्याचे प्रसंग वाढले होते, दृष्टी कमी झाली होती , दात कमकुवत झाले होते , शक्ती सुद्धा कमी होत होती . रोजचे दुध , ताजी पोळी , अधूनमधून अंडे , हाडं काढलेले चिकन वगैरे त्याला चालत होतं. नव्या घरी जाणे आमच्या सर्वांचा दृष्टीने अत्यंत सोयीचे होते पण मनूचा भुंगा डोक्यातून जात नव्हता . माझं चाललं होतं त्यालाही सोबत नेउयाचं पालुपद.

राजन म्हणाला "या वयात त्या नव्या वातावरणात तो नाही टिकू शकणार , कॉलोनीतले इतर कुत्रे मांजरे त्याला सामावून घेतील याची खात्री नाही देता येत . आपण दिवसभर बाहेर असतो . त्यापेक्षा इथे निदान चार घरी त्याच्या ओळखी तरी आहेत , निभावून नेईल कसेतरी . आपण जाताना सांगून जाऊ शेजारच्या लोकांना ".

" अरे त्यांना,लोकांना सांगू आपण पण मनूला कोणत्या शब्दात सांगायचे , कि सकाळी इथे येऊ नको , याच्या त्याच्या घरी जा माधुकर्यासारखा". हा वाद बिनबुडाचा होता कळत होतं पण वळत नव्हतं . खूप काथ्याकुट झाला . मनूला न नेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले . मन घळघळत होते , एक कोपर्यात आक्रंद माजले होते . सगळे सामान लोड झाले .रिकाम्या घराच्या दाराला कुलूप घालताना मात्र पायातलं त्राणच गेलं. उद्या मनू येईल आणि या कुलूपाकडे बघत बसेल . वाट बघेल , दार उघडलं जाणार नाही , पोरगं उपाशी पोटी परत जाइल . त्याची भुकेची , विश्रांतीची , प्रेमाची वेळ कोण ओळखेल ?

ट्रकमध्ये ड्रायव्हर शेजारी आम्ही दोघं बसलो , गल्लीच्या टोकापर्यंत नजर टाकली . सुदैवाने कि दुर्दैवाने मनू नव्हता. राजनला म्हंटलं , बसेल रे इथे मांडीवर माझ्या , चल नं नेउया . पण मनूची वाट न बघताच ट्रक हलला होता .

शैलाचा फोन आला . ती सांगत होती . ते तसेच होणार होते हे ठावूक होते तरीही स्वतःची शरम वाटत राहिली . लगेचच्या रविवारी जुन्या घरी गेलो . मनू कुठेच दिसला नाही . शेजारच्या त्याच्या असण्याच्या संभाव्य दोनचार इमारतीत तीनतीन मजले हुडकून आलो . डोळे चालूच होते . बघणारे म्हणत असतील "काहीतरी फार महत्वाचं हरवलंय बाईचं बहुतेक , त्या शिवाय कोणी एवढे हमसुन रडणार नाही ! "

जेव्हा त्याला आमची नितांत गरज होती तेव्हाच त्याला सोडून आम्ही निर्दयपणे गेलो होतो . आमचं काय हरवलं होतं ते फक्त आम्हाला ठावूक होतं. एवढं गुणी बाळ , मांजराच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध , दुसऱ्याला समजून घेणारं आमचं पोरगं .

त्यानंतर तीन माऊ झाल्या , आता घरात मांजर आणायचे नाही हे ठरले आहे . पण मनूला तरी आम्ही कुठे आणले होते , तोच आला होता . तसेच कोणी आले तर मात्र ..!!

नाही नाही म्हणताना डोळे जिन्याकडे लागलेले असतात , कधीतरी दोन मऊ पावलं उमटतील तिथे. जिन्याच्या पायऱ्या सुद्धा मनूच्या हळुवार पंज्यांची वाट बघत असतील..आमच्या एवढीच.आजही .

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

मनू आणि लेख दोन्ही आवडले.

आम्ही गच्चीत फिरायला जाता मनू अक्षरशः इंग्रजी आठचा आकडा काढत पायापायात चाले आम्हाला चालणे अवघड करून टाके.

नशीबवान आहात तुम्ही! आमच्याकडे कोणालाही, कधीही एवढा भाव मिळाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad घरच्या नंद्या बोक्याची आठवण झाली Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडेही एक मनू होती (तिला कलिंगड आवडायचे. माझ्या पाहण्यातले कलिंगड खाणारे हे एकमेव मांजर!), तिची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थान्कु मित्र Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या! पहिले वाक्य जितका चटका लाऊन जाते त्याची तीव्रता कमी करायचे काम, खरंतर प्रयत्न, उर्वरीत गोष्ट करते.. तरी पहिले वाक्य सारखे समोर येतच रहाते.
छान लेखन.. आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रत्ययकारी लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोंडस लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आठवण आहे.

पहिल्या काही ओळींपर्यंत कुत्रा असं गृहीत धरलं होतं (मनु नाव असूनही).. नंतर घाईत असल्याने वरवर वाचलं आणि कुत्र्याला तुम्ही सोडून गेलात इतकाच ढोबळ अर्थ लावला. अशा वेळी त्याला घेऊन न जाण्याचं मधेच वाचलेलं समर्थन / कारणं ही केवळ तुमच्या सोयीने मांडलेली पण चुकीची वाटली, पण नंतर पुन्हा ओळ न ओळ वाचली तेव्हा मांजर आहे हे कळलं तेव्हा सर्वच उलट झालं.

त्याला सोडून जाण्याचा तुमचा निर्णय आणि त्यामागची तुमची कारणं अत्यंत योग्य होती. मांजर नव्या जागी आलं नसतं. नेलं असतंत तरी परत आलं असतं आणि त्या येण्याच्या प्रवासात त्याला इजा होऊ शकली असती. मांजरांना व्यक्तींशी अ‍ॅटॅचमेंट असली तरी ती जागेपेक्षा जास्त अजिबात नसते.

सतत किमान एक किंवा कमाल सात आठ मांजरेही घरात बाळगलेली असल्याने खात्रीने सांगू शकतो.

अर्थातच आपण गेल्यावर मागे राहिलेल्या मांजराविषयी वाईट वाटणं हा भाग अगदी साहजिक आहे, आणि तो उत्तमरित्या व्यक्त झाला आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या काही ओळींपर्यंत कुत्रा असं गृहीत धरलं होतं (मनु नाव असूनही)..

मी ही प्रथम कुत्राच समजलो होतो.
आणि

कधी त्या वेडूला मांडीत बसायचाच मूड येई . मी एक पाय दुमडून विळीवर भाजी चिरत असले कि तो आपल्या पंजाने माझा उभा पाय आडवा करून घेई आणि मांडीच्या खळग्यात आबाद जाउन मस्त बसे

कुत्र्याचे इतके लाड बघुन चक्रावुनही गेलो होतो.
मनुचे एकुण व्यक्तिमत्वच पण कुत्र्याच्या स्वभावाशी जवळीक साधणारे वाटतेय.
अजुन एक, मांजरांबद्दल बोलताना आपण 'ते' हे सर्वनाम वापरतो आणि कुत्र्याबद्दल बोलताना 'तो'.
इथे पहील्या ओळीत 'तो' असे म्हटल्याने कदाचित माझा असा समज झाला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेलं असतंत तरी परत आलं असतं आणि त्या येण्याच्या प्रवासात त्याला इजा होऊ शकली असती. मांजरांना व्यक्तींशी अ‍ॅटॅचमेंट असली तरी ती जागेपेक्षा जास्त अजिबात नसते.

नव्या जागेत एक वर्ष राहूनही मांजर परत जाऊ शकते का हो? आम्ही आमच्या पिलूला कोणीतरी पळवून नेलं असंच समजून चालतोय म्हणून विचारतोय. तसं असेल तर जुन्या जागी जाऊन पाहायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शोधून पहा तिथे, अगदीच चुकीची जागा ठरणार नाही ती... तिथे पोचला असेल तर अर्थात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनूची गोष्ट आवडली.
सर्व पाळीव प्राण्याच्या कथेप्रमाणेच असलेला वियोगी शेवट चटका लावून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप सुरेख गोष्ट/अनुभव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0