स्केटिंग-वेटिंग

हे नेहमीचच होतं कन्यारत्नाचं, अगदी तेवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत, काय हवं याची यादी मिस्टर क्लॉजसाठी बनवायची नाही. इकडे दुकाने बंद होत आलेली असायची, शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी न केलेले काही सडे पुरुषही दुकानांतून योग्य (किंवा हाताला येतील तशा) वस्तू घेऊन परतलेले असायचे पण कन्यारत्नाचा निर्णय झालेला नसायचा. शेवटी, उद्यापासून सगळे एल्व्स सुट्टीवर आहेत आणि मिस्टर क्लॉजना लवकरच खेळणी वाटायला निघायचं आहे अशी दटावणी केल्यावर अखेरीस कन्यारत्नाने आपल्या दिव्य हस्ताक्षरात "मला बर्फात गंमत करता येईल अशी एक सरप्राईज वस्तू हवी आहे." असे खरडून तो कागद पाकिटात कोंबला.

एरवी अशी अनेक पर्याय असू शकतील अशी मागणी त्यांना आवडायची कारण मग आपल्याला घ्यायची असलेली गोष्ट त्या निकषांवर कशी बसते हे समजाऊन देता यायचं आणि कन्यारत्नालाही ते स्वीकारण्यावाचून पर्याय असायचा नाही पण पंचवीसच्या सकाळी आपल्या एकुलत्या एका कन्येचा फुरंगुटलेला चेहरा पहावे लागणे त्यांना जमणारे नसल्याने तिच्या मनात नक्की काय आहे हे ओळखणे क्रमप्राप्त होते. टीव्हीवर आईस स्केटिंग सुरू झाले की, ती किती लक्षपूर्वक त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करते हे त्यांना ठाऊक होते शिवाय परवाच खेळाचे साहित्य विकणाऱ्या दुकानातल्या निमुळत्या, सुंदर, पांढर्या रंगाच्या स्केट्सवर तिची नजर खिळली होती हे त्यांनी चाणाक्षपणे ओळखले होते. नंतर खोळंबा नको म्हणून तिच्या अपरोक्ष दुकानदाराकडे तिच्या मापाचे स्केट्स आहेत का याची चौकशीदेखील करून ठेवली होती. "पांढरे नाहीत पण गुलाबी मिळतील" या उत्तराने त्या थोड्या नाराज झाल्या पण हळूहळू पांढर्यापेक्षा गुलाबीच कसे चांगले दिसतात वगैरे चर्चा करून तिच्या मनाची आधीपासून तयारी करता येईल असा व्यवहारी विचार त्यांना सुचला. "बर्फात गंमत करता येईल असे सरप्राईज" हेच असावे अशी त्यांची खात्री पटली आणि मिसेस क्लॉजनी मिस्टर क्लॉजना दुकानात पिटाळले.
(मिस्टर क्लॉजची या मोसमांत होणारी धावपळ जगजाहीर होती पण बिचाऱ्या मिसेस क्लॉजच्या कामांचा गाडा अव्याहतपणे चालू असायचा. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा पाहुणचार, फराळाचे बनवायचे, मिस्टर क्लॉजसाठी पावांची दुरडी बनवून ठेवायची, रेनडियरना उंडे भरवायचे, एल्व्ह्जच्या जेवणावळी.....स्त्रीजन्मा तुझी कहाणी!)

पंचवीसच्या सकाळी कन्यारत्नाचा आनंदाने फुललेला चेहेरा पाहून त्या दोघांना कृतकृत्य वाटले खरे पण खरी लढाई यापुढेच आहे याची मिसेस क्लॉजना कल्पना होती, स्केटिंग शिकवायचे कोणी आणि कसे?

मिसेस क्लॉजचे एक गुपित होते, त्यांना उत्तर ध्रुवावर रहात असूनही स्केटिंग यायचे नाही. इतकेच नव्हे तर त्यांना ह्या प्रकाराची प्रचंड भीती वाटायची. पूर्वी कधीतरी एकदा त्यांनी प्रयत्न करून पाहिला होता पण ते अणकुचीदार स्केट्स चढवल्यावर, ते घालून गुळगुळीत बर्फाच्या लादीवर घसरण्याच्या कल्पनेने त्यांना कापरे भरले होते. पूर्णवेळ बाजूच्या कठड्याला गच्च पकडून-पकडून त्यांच्या हातांना रग भरली होती पण तो आधार सोडून एक फुटभरदेखील जायचे धाडसदेखील त्यांना झाले नाही. सगळ्या जनतेचे मनोरंजन झाल्यावर, एका हितचिंतकाने त्यांचा हात हातात घेऊन त्यांना कठड्यापासून दूर नेले तेंव्हा त्या अक्षरशः गर्भगळीत झाल्या होत्या. शेवटी त्या हितचिंतकासाहित त्यांनी जमिनीवर लोळण घेतली आणि त्याने कसेबसे त्यांना उचलून परत कठड्याशी आणून सोडले. त्या दिवसापासून त्यांना बर्फातून चालतानाही प्रचंड भीती वाटायची. त्यातच त्यांच्या माहितीचे कोणीतरी, बर्फावर घसरून डोक्यावर पडून थेट कोमात गेले आणि नंतर निवर्तले अशी बातमी ऐकल्याने त्या प्रत्येक पाऊल सांभाळून टाकायच्या.

अजूबाजूला बर्फात बागडणारे, स्केटिंग करणारे असंख्य लहानमोठे जीव दिसले आणि त्यांच्या थंडीने गुलाबी पडलेल्या चेहऱ्यावरचा रसरशीत आनंद पाहिला की त्यांना आपल्या या भित्रेपणाची भयंकर लाज वाटायची. आपला हा भित्रेपणा कन्यारत्नापासून त्यांनी लपवून ठेवला होता कारण आपला भित्रेपणा तिच्यामागे ब्रह्मराक्षसासारखा लागू नये असे त्यांना वाटायचे. पण ही भीती अनुवांशिक असू शकण्याचीही भीती होतीच! अर्थात, लहान वयात हाडे जशी लवकर जुळून येतात तसेच लहान वयात सर्व गोष्टींची ही आदिम भीती आपले अस्तित्व ग्रासून टाकत नसावी. त्यांना कन्यारत्नाला घेऊन स्केटिंग रिंकवर जायलाच लागले. गोठलेल्या नदीवर किंवा सरोवरावर स्केटिंग करता येत असले तरी इतक्या सिनेमांतून वगैरे, वरचा पातळ बर्फ तुटून लोक आत बुडून थंडगार पाण्यात बुडलेले पाहिले असल्याने ती अजून वेगळीच भीती होती, त्यापेक्षा हा रिंक प्रकार सुरक्षित वाटला.

कन्यारत्नाच्या पायात नवेकोरे स्केट्स चढवल्यावर ती बालसुलभ उत्सुकतेने, स्केटिंग करायला कधी एकदा सुरूवात करते म्हणून चालू लागली तर मिसेस क्लॉजनी तिला रोखले. तिच्या डोक्यावार हेल्मेट, गुडघ्यावर, कोपऱ्यावर, मनगटावर सुरक्षिततेसाठी आवरणे चढवल्यावर मगच अगदी हळूहळू पावले टाकायची सूचना करत त्या तिला गुळगुळीत बर्फाकडे घेऊन गेल्या. स्वत: तीरावरच तिचा हात पकडून उभारल्यावर "पुढे काय?" असा मोठा प्रश्न उभा राहिला. कन्यारत्नाने भोळेपणाने "आई, तू माझ्याबरोबर येणार नाहीस?" असा प्रश्न विचारल्यावर "नाही गं, माझ्याकडे स्केट्स नाहीत नं, म्हणून." अशी सारवासावर करावी लागली त्यांना. शेवटी "मी तीरावरूनच चालत तुझा हात पकडेन आणि तू हळूहळू पावले टाक." अशी काही तडजोड त्यांच्यात झाली. मिसेस क्लॉजनी आधार देऊनही कन्यारत्न सटकायला लागले म्हटल्यावर तिच्याबरोबर आपणही भुई गाठू या भीतीने त्यांनी तिचा हात सोडला. त्याचवेळी त्यांना बिरबलाने अकबराला दिलेले, हौदभर पाण्यातली माकडीण आणि तिच्या पिल्लाचे उदाहरण आठवून शरम वाटली पण या पिल्लाला मात्र आधार सुटल्याचा उपयोगच झाला. थोडे झोक जाताजाताच तिला आत्मविश्वासाने उभारता आले आणि पहाता-पहाता ती एकेक पाऊल पुढे टाकायला लागली.

मिसेस क्लॉज अविश्वासाने तिच्याकडे पाहतात तोच ती सटकून पडली; मिसेस क्लॉजचा वरचा श्वास वर आणि खालचा खालीच राहिला. तिच्या मदतीला जायचे तरी कसे असा विचार करेपर्यंत त्यांचे तिच्या चेहेऱ्याकडे लक्ष गेले, स्वत:वरच खुदखुदू हसू येणारा तिचा मिश्कील चेहेरा पाहून त्यांना हायसे वाटले. ती थोड्या प्रयत्नांनी पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहिली आणि पुन्हा हळूहळू पावले टाकून लागली. "तुला लागलं नाही ना बाळा?" या त्यांच्या प्रश्नाकडेही तिचे लक्ष नव्हते. सुरसुर आवाज करत तिच्याबाजूने वेगाने घसरत जाणाऱ्या मुलांच्या टोळक्याकडे तिचे लक्ष होते, त्यांना गाठायची महत्वाकांक्षा तिला पुढेपुढे सरकवत राहिली. पुन्हा पडली..., अनेकदा पडली पण हसऱ्या चेहेऱ्याने उठून उभारत पुढे जात राहिली. मिसेस क्लॉज कमालीच्या संतोषाने तिच्याकडे पहात राहिल्या पण जसजसे त्यांच्यातले अंतर वाढत राहिले तसतसे त्यांचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचेनात. बाजूने आपल्या मुलाचा हात पकडून एक आई त्याच्याबरोबर घसरत आनंदाने पुढे गेली... तिच्यासारखे आपणही आपल्या मुलीचा हात पकडून घसरावे अशी अशक्य इच्छा त्यांच्या मनात आली पण त्याचबरोबर गुळगुळीत बर्फाच्या गुदमरून टाकणाऱ्या भीतीने पुन्हा त्यांना व्यापून टाकले. आपल्या वैगुण्याला तिच्यापर्यंत न पोहोचू देण्याच्या मर्यादित यशात संतोष मानत त्या तिथेच थांबल्या. मात्र आपल्यातला हा अपुरेपणा त्यांना फारच सलायला लागला.

एकदा त्यांनी मिस्टर क्लॉजना विचारले, "तुम्हाला नाही का अपुरं वाटत आपल्याला स्केटिंग येत नाही म्हणून? शिकावसं नाही वाटत?" मिस्टर क्लॉज साधेपणाने म्हटले, "नाही ब्वॉ...! कधी नाही शिकलो म्हणून येत नाही, जाऊ कधीतरी आणि करून पाहू..जमलं तर जमलं, हाय काय आन नाय काय.."
मिस्टर क्लॉज हे असे अगदी सरळसोपे मनुष्य. आपल्या कुवतीबद्दल काही अवास्तव अपेक्षा नसलेले पण तरी स्वत:बद्दल मजबूत आत्मविश्वास असलेले. तसेही आपल्या बेंगरूळ शरीरावर गडद लाल रंगाचा अंगरखा आणि डोक्यावर त्याच रंगाची गोंडेदार टोपी चढवून बिनधास्त बाहेर पडणार्या आणि घरांच्या निमुळत्या चिमण्यांमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसात, आत्मविश्वासाची कमतरता थोडीच असते! मिसेस क्लॉजना त्यांच्या सरळसोप्या स्वभावाचं असं कधीकधी कौतुक वाटायचं (एरवी "आमच्या ह्यांना व्यवहार कशाशी खातात हेदेखील माहीत नाही" असं त्यांचं ठाम मत होतं.)

एकदोनदाच अनुभव घेतल्यावर कन्यारत्न थोडेफार स्केटिंग करायला लागले आणि मिसेस क्लॉजना सारखे-सारखे तिला घेऊन जायला लागले. तिच्याबरोबर जाणे म्हणजे त्यांच्यासाठी मोठेच आव्हान असायचे; एकाच वेळी तिच्याबरोबर आनंद घेण्याची तीव्र इच्छा आणि आपली तीव्र भीती यांच्या द्वंद्वात त्या पुरत्या नामोहरम व्हायच्या. ती एका पायावरून दुसऱ्या पायावर भार बदलत, तोल सांभाळत सरकत रहायची, तसे प्रतिक्षिप्त क्रीयेप्रमाणे, बसल्या जागी त्याही या कुल्ल्यावरून त्या कुल्ल्यावर भार बदलत झुलत रहायच्या. तिच्याकडे लक्षपूर्वक पहाताना त्यांना परकायाप्रवेश झाल्यासारखे वाटायचे. ती वेगाने पुढे जाताना वारा आपल्याच तोंडाला झोंबतो आहे, एखाद्या वळणावर आपलाच झोक जातो आहे असे भास त्यांना होत रहायचे.

एके दिवशी तिला पहाताना त्यांना तिच्या तंत्रातल्या चुकी जाणवल्या, इतरांच्या आणि तिच्या हालचालीतला फरक तपासल्यावर, तिने काय केले तर ती वेगाने जाऊ शकेल हे त्यांनी ओळखले. तिला जवळ बोलावून तिला काही सूचना करायची खुमखुमी त्या दाबू शकल्या नाहीत पण तिने त्यांनाच प्रतिप्रश्न केला "तुला तर बिलकूल स्केटिंग येत नाही, मग तू मला कसे काय सांगतेस?" मिसेस क्लॉज निरुत्तर झाल्या पण त्यांची धडपड एका स्केटिंग करणाऱ्या आईला दिसली. हलकेच कन्यारत्नापाशी येऊन त्या आईने तिचा हात हातात घेतला आणि पहातापहाता तिला घेऊन ती सरसर घसरत पुढे गेली. एकमेकींशी बोलणारे त्यांचे हसरे चेहेरे मिसेस क्लॉजना दूरवरून दिसत राहिले आणि नकळत त्यांचे डोळे भरून आले.

कोठून येते ही अगम्य भीती? काय थांबवते आपल्याला हे छोटेछोटे धोके घेण्यापासून? प्रत्यक्ष पराभवापेक्षा पराभवाची भीतीच का पोखरून टाकते आपल्याला? त्यांचे डोके भंडावून गेले, आपल्या सगळ्या प्रश्नांचे उगम आपल्या बालपणातच असतात असा साक्षात्कार त्यांना डेटाइम टीव्ही पहिल्याने पूर्वीच झाला होता म्हणून त्या आपले बालपण आठवायला लागल्या.
मिसेस क्लॉजचे बालपण पार दक्षिणेच्या गरम देशात गेले; त्यांच्या लहानपणी तर घरी फ्रीझही नव्हता त्यामुळे गाड्यावर बर्फाचे गोळे विकायला येणाऱ्या फेरीवाल्याकडे सोडून इतरत्र त्यांनी बर्फदेखील पाहिला नव्हता. पाऊस मात्र तुफान...चहूकडे चिखलाचे निसरडे रस्ते आणि त्यावर सटकणारे प्लॅस्टीकचे बूट. एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाय ठेवताना मागून "सांभाळून गं..पडशील घसरून. काय बाई निसरडे रस्ते!" असे कानावर पडलेले शब्द. घसरणे, सटकून, निसरडा या शब्दांतच मुळात पराभव अभिप्रेत! "घसरून"च्या पुढे "पडला" किंवा "सटकून"च्या पुढे "आपटला" असे नसणारी किती वाक्ये कानावर पडली आपल्या लहानपणी? नाही म्हणायला एका "घसरगुंडी" होती पण त्याचे "घाबरगुंडी" या शब्दाशी असलेले साधर्म्य हा काय निव्वळ योगायोग होता?

हेच ते....आपली भाषा, आपले पालक, आपला समाज, आपले हितचिंतक ...आपल्याला भीती शिकवणारे...आपल्या भल्यासाठी अर्थातच!

"ठमाबाई चालली...आम्ही नायी पहिली" असे प्रोत्साहन देऊन एकदा दोन पायावर चालायला शिकवले की त्यापुढे कायम..
"वेंधळ्यासारखे चालू नकोस...समोर बघ, पडशील"
"झाडावर चढू नका मेल्यांनो, हात मोडून घ्याल."
"अरे कौलं निसरडी झालीयत...परत चढशील तर टांग मोडून घेशील"
"आगीशी खेळू नये...एक दिवस घर पेटवून ठेवाल"
"वडीलधारे असल्याशिवाय पाण्यात उतरायचं नाही"
"नदीच्या पाण्याला ओढ फार असते..."
"रात्रीचं पायाखाली काय आलं म्हणजे?"

असंख्य भीती, आपल्या वंशवेलीवरच्या प्रत्येक फळाला सगळ्या लहानमोठ्या संकटांपासून वाचवण्याची आदिम ओढ. या ओढीपाई, प्रत्येक वाचवण्याच्या प्रयत्नामागे आपण त्यांच्यापासून थोडं धाडस काढून घेतो आहे हे न जाणवता त्यांना सुरक्षित मार्गाने चालत राहायचे दिलेले बाळकडू! मुलींना तर अजूनच भीती...चारित्र्याची, शीलाची....परुषाची.

अगदी बाळ असतानाच,
"सोन्याची सखुबाई, बरं का गं
तू बाहेर जाऊ नको, बरं का गं
तुला पोरे मारतील, तुझी कुंची फाडतील,
तुला नाही बळ, चिमटा काढून पळ..."
इथंपासून, ते मोठं झाल्यावर,
"मुलीच्या जातीने अगदी वडलांपासून, भावापर्यंत सगळ्यांपासून सांभाळून रहावं!" असले शब्द कानावर पडल्यावर काय बिषाद तुमची की तुम्ही अंधार पडायच्या आधी घरी न याल!
म्हणजे पंचमहाभूतांची भीती, ग्रहांची भीती, शीलाची भीती, कुलाची भीती, देवाची भीती, दैत्याची भीती, सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती, न सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती, घरच्यांची भीती, बाहेरच्यांची भीती...बापरे एवढया भयंकर जगात आपण आजपर्यंत वाचलो याच्या मूळाशी ही भीतीच असली पाहिजे!....

इथे मिसेस क्लॉज थोड्या थबकल्या, ही सगळी भीती असतानाही आपण धावायचोच ही भरधाव, खड्डे-बिड्डे न पहाता, पायाखाली न पहाता, अनवाणी! फुटलेल्या गुडघ्यांवर बिरुदांसारख्या चिकटवलेल्या पट्ट्या, वय वर्षे तीन ते दहा ...कायमच असायच्या. भलत्या कुतुहलापायी मधमाश्यांच्या पोळ्यांजवळ नको तेवढे जाऊन मारून घेतलेला डंख, कुत्र्यांच्या शेपटीवर दिलेले पाय, चोरून कैऱ्या तोडताना कोणी आले म्हणून वरच्या फांदीवरून मारलेली उडी हे सारे आठवले त्यांना!

एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तर कहर झाला होता; आजोळी सर्कस पाहून आल्यावर पोरासोरांनी गच्चीत सर्कस करायची टूम निघाली. तीनचार वर्षे वयाने मोठा मामेभाऊ कॉंक्रीटच्या स्लॅबवर आडवा झोपून म्हणाला होता "मी माझे हात असे वर उचलतो, तू त्याच्यावरून ...अशी कोलांटी मार". त्यांनीही मग कोणताही विचार न करता, मारली की कोलांटी...धाड्कन पडल्याचा आवाज, कोपरातून जीवघेणी कळ, फरफर सुजत गेलेला हात, आजोबांचा चिंतीत चेहेरा, "मी काही नाही केलं..." म्हणून विनवण्या करणाऱ्या मामेभावाचा अपराधी बापुडा चेहेरा, पहिला-वहिला एक्सरे, महिनाभर गळ्यात लटकलेला डावा हात....मिसेस क्लॉजचा उजवा हात अभावितपणे डाव्या कोपरावर फिरला. आपण तेंव्हा ती कोलांटी मारलीच किनै...त्यांना पहिल्यांदाच त्या घटनेचा अभिमान वाटला.

त्याचबरोबर त्यांच्या लक्षात आले की सगळी लढाई ती कोलांटी मारण्यापूर्वीची असते. प्रत्यक्ष पडून अंग शेकाटण्यापेक्षा, ते शेकाटून निघू शकण्याची शक्यताच आपल्याला रोखते. मिसेस क्लॉज स्वत:शीच हसल्या, आपण मनाची तयारी 'पडण्या'साठीच केली तर? इतक्या दिवसांनंतर त्यांना जाणवले की आपले हसे करून घेण्याची भीती त्यांना फारशी नव्हती, भीती होती ती साधी स्वत:च्या शारीरिक दुखापतीची. मग त्यावर उपाय म्हणून आपण पडण्याचीच सवय केली पाहिजे असे त्यांना वाटायला लागले. त्यानंतर अनेकदा घरात काम करता करता कोणी पहात नाही असे बघून त्या कधी जमिनीवर लोळण घ्यायच्या तर कधी जिन्यावरून उतरताना मुद्दामून एखाद्या पायरीवरून घसरून पहायच्या. असं ठरवून पडणं फारसं जमायचंच असं नाही पण एकदोनदा चांगलाच मार लागला. मिस्टर क्लॉजनी तर एकदोनदा "इथे काय काळंनिळं झालंय?" असं विचारलंही पण नंतर आपल्या बायकोच्या पडधड्या स्वभावाची आठवण झाल्याने "परत कुठेतरी धडपडलीस वाटतं." असं म्हणून दुर्लक्ष केले. रस्त्यावर थांबून बर्फावरून घसरून पडण्याची कल्पना करूनही त्या आपल्या भीतीला काबूत आणण्याचा प्रयत्न करायला लागल्या. गुळगुळीत बर्फावरून हलकेच पाय फिरवत असताना आपण पुढे झुकून हातांवर तोल सांभाळून पडतो आहोत याचीही त्या कल्पना करण्याने आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया अधिक जलद होतील अशी आशा त्यांना वाटायला लागली. रात्री स्वप्नात त्या अनेकदा मुलीबरोबर बर्फावर उतरत, एकमेकींचे हात पकडून सराईतपणे स्केटिंग करताना मिळणारा निखळ आनंद त्यांना रात्रीच्या स्वप्नात मिळायचा तसा दिवस्वप्नातही!

त्यादिवशी मनाचा हिय्या करून मिसेस क्लॉज सहकुटुंब रिंकवर गेल्या. त्या पायावर स्केट्स चढवत आहेत हे पाहून कन्यारत्नाचा उत्साह ओसांडून वाहात होता. त्या शांत होत्या, मनातले सगळे विचार त्यांनी समोरच्या बर्फासारखे गोठवून टाकले होते. स्वत:च्या दोन पायांवर चालत त्या आत्मविश्वासाने बर्फावर उतरल्या. आपण पहिल्याच क्षणी भुई गाठणार आहोत या अपेक्षेनेच त्या आलेल्या असल्याने पुढे झुकून हात टेकण्यास त्या सज्ज होत्या. पण काय आश्चर्य...त्या चक्क उभ्या राहिल्या आणि बर्फावर दोन पावले चालूनही गेल्या. नंतर चार सेकंदात रप्पकन आपटेपर्यंत त्यांना आकाश ठेंगणे झाले होते. पडल्यावर काही क्षण काही मोडलं-वगैरे नाही याची खात्री करून त्या स्वत:वर मनसोक्त हसल्या आणि धडपड करून, तोल सांभाळत पुन्हा उभ्या राहिल्या कारण त्यांच्याकडे पाहून हसणाऱ्या कन्यारत्नाच्या चेहेर्यावरच्या भावात त्यांना स्वर्ग सापडला होता!

field_vote: 
4.555555
Your rating: None Average: 4.6 (9 votes)

प्रतिक्रिया

सुरूवात वाचून चिक्कार खिदळले.

क्रॉस कंट्री स्कींईंग करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाही मला त्याची भीती वाटली. तिथे तर पडलं तरी खाली बर्‍यापैकी भुसभुशीत बर्फच होतं. पण तरीही फार वेळ केलं नाही. आता पुन्हा ते शिकावंसं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदरच आहे गोष्ट. पार्श्वभूमीपण, शीर्षकपण नि आशयपण. मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गोष्ट आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचताना गुंतून जायला होतं.

या ओढीपाई, प्रत्येक वाचवण्याच्या प्रयत्नामागे आपण त्यांच्यापासून थोडं धाडस काढून घेतो आहे हे न जाणवता त्यांना सुरक्षित मार्गाने चालत राहायचे दिलेले बाळकडू!

अत्यंत वाचनीय लेखात असं वाक्य येतं तेव्हा खुसखुशीत भज्यात तळून दिला की न आवडणारा पालकही खाता येतो हे लक्षात येतं. हा उपदेशाचा डोस न होता प्रामाणिकपणे गवसलेलं सत्य म्हणून जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्टीने गुङ्गवून टाकले ! फारच छान लेखन.
स्केटिंग-वेटिंग शीर्षकातली सूचकता आणि इतर अनेक शब्दरचना आवडल्या - पावांची दुरडी, रेनडियरना उंडे, घसरणे/सटकून/निसरडा या शब्दांतच मुळात पराभव अभिप्रेत, "घसरगुंडी"चे "घाबरगुंडी"शी असलेले साधर्म्य, बायकोच्या (धडपड्याऐवजी) पडधड्या स्वभावाची आठवण, इ. इ.

घासकडवीञ्च्या मताशी सहमत (पण बालक असल्यापासून मला पालक अतिशय आवडतो, म्हणून मी पालकाऐवजी 'शेपू' असे वाचले ;)).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण बालक असल्यापासून मला पालक अतिशय आवडतो

हे खासच!

पण आम्हाला पण बालक असल्यापासून पालक (आणि शेपू सुद्धा )आवडतो. मग आम्ही "गरमागरम भाकरीमध्ये घालून दिलेले एरंडेल तेल" असा उपमा बदल केला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

वाचकाला आपापल्या भितीच्या वाटेने पुन्हा फेरी मारायला लावणारा.

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहा! निव्वळ थोर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'इंग्लिश-विंग्लिश'पेक्षाही जास्त आवडला आहे लेख; मिसेस क्लॉजच्या प्रयत्नांचे कौतुक आणि अभिनंदन!
भीतीचे विश्लेषण, लहानपणापासून 'संगोपन' केल्या गेलेल्या भीतीला घराबाहेर काढण्याचा भाग आणि नंतरची तयारी वगैरे खासच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवात केली आणि वाचतच राहिले शेवटपर्यंत. वाचून अंतर्मुखही झाले की आपल्या अनेक अनाठायी भीतींपायी आपण किती वेगवेगळ्या आनंदांना मुकतो. घासकडवींनी हायलाईट केलेलं वाक्य अगदी भिडलं!
आता माझ्या भीतीवर पुनर्विचार नक्की करेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

लिखाण आवडलं. खुसखुशीत नर्मविनोदी शैली. त्या लिखाणामागचा संदेशही ध्यानात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कथनात मजा आणलिय. इम्पर्सन्ल असलं तरी व्यक्तिगत पातळीवर अडकवुन ठेवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या भागात पण अशाच एक मिसेस क्लॉज राहतात. त्यांना वाचायला दिला पाहिजे. कदाचित त्यांचीही स्केटींगची भिती कमी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला. छानच लिहीलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0