खजिना (४/८)

~~~ साळवी~~~

झालेल्या घटनेनंतर आम्ही सगळेच सुन्न झालो होतो. मी आणि मानकामे बाहेर येऊन बसलो, तर मंदार तिथे दलदलीशेजारीच बसून राहिला. आम्हा दोघांनाही काय बोलायचे सुचेना. आम्ही परत आलो. मी तीन दगडांच्या शेकोटीसाठी काटक्या गोळा केल्या आणि चूल बनवली अन् पेटवली. मानकामे नुसताच कसल्यातरी विचारात बसून होता. मी पाणी तापल्यावर सोबत आणलेले मॅगी त्यात घातले. ते शिजल्यावर मानकामेच्या पुढे केले. त्याने एक शब्दही न बोलता हातात घेतले आणि खाऊ लागला. मी मंदारला बोलवायला गेलो.

मंदार मगाशी बसला होता तिथेच बसला होता. त्या समोरच्या दलदलीकडे निष्प्राण डोळ्याने बघत होता. त्याला कसं आणि काय समजवायचं? त्याने किती स्वप्न बघितली असतील! अजून त्याचे लग्नही व्हायचे होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते हे स्पष्टच होते. मी त्याच्या जवळ गेलो, खांद्यावर हात ठेवला. त्याने चेहरा वळवला. आता डोळ्यातून पाणी येत नव्हतं मात्र अत्यंत दु:खद छाया चेहर्‍यावर होती. मला काहीतरी बोलणे क्रमप्राप्त होते
"चल" मी म्हणालो
तो काहीच बोलला नाही, मीच पुन्हा म्हणालो "चल रे, बाहेर मोकळ्यावर ये. आता इथे बसून काय होणार आहे? "
तो काही न बोलता उठला, परत फिरताना त्याने पुन्हा दलदलीकडे पाहिले. त्याला हुंदका आवरला नाही. तो माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागला. मलाही रडू येते की काय असे वाटू लागले होते. त्याला थोपटून कसे बसे बाहेर आणले. तो तिथे एका दगडावर बसला.

तोपर्यंत मानकामेचे मॅगी खाऊन झाले होते. त्याने अजून मॅगी बनवले होते ते त्याने माझ्या आणि मंदारपुढे केले. आम्ही मुकाट्याने ते खाऊ लागलो. खाल्ल्यानंतर बहुदा मंदारला हुशारी वाटली असावी. तो लगेचच उठला आणि पुन्हा तिथे पडलेली गुंडाळी उचलून तटबंदीवर कोरलेल्या विटेच्या दिशेने गेला. त्याला ही घटना शक्य तितक्या लवकर विसरायची होती हे स्पष्ट होतं. मी मानकामेकडे पाहिले. त्याने गप्प राहण्याची खूण केली आणि तो मंदारच्या दिशेने जाऊ लागला
"मानकामे, तो बघतोय तोवर आपण दुसरा मार्ग मिळतोय का ते बघूया, ही समोरची झाडी कापूया का? "
"नको, ते काय लिहिलेय ते कळेपर्यंत इतरत्र कुठेही जाणे धोक्याचे वाटते आहे. "
"आता झाडी कापण्यात कसला धोका? "
"बघ बाबा, उगाच कशाला घाई करायची? "
मी काहीच बोललो नाही पण झाडीच्या दिशेने वळलो. मी झाडी कापणार इतक्यात पायाखाली काहीतरी चमकल्यासारखे वाटले. निरखून बघितले तर मघाशी मिळालेल्या पट्टीवरच्या अक्षरांसारखीच पट्टी इथेही जमिनीत रुतलेली होती.
"अरे मानकामे, मंदार!! "
"काय" मानकामेचा आवाज आला
"तशीच एक पट्टी इथेही जमिनीतून बाहेर आलीये. "
"मला अर्थ लागतोय, एक मिनिट थांबा. " मंदारचा आवाज आला!

~~~मंदार~~~

मला आता पट्टीवरच्या खुणा कळल्या होत्या 'अलअल' असं काहीतरी लिहिलं होतं. मला काहीच अर्थ लागेना. मी विचार करत असताना समोर पाहिले तर 'ती' कमान दिसली. तिथेच माझी फातिमा.. छे, मनावर ताबा ठेवला पाहिजे, फातिमाला विसरणं अशक्य आहे पण आता स्वतःला कशाततरी गुंतवून घ्यायला हवं.. हा! तर ही पट्टी.
"सर! अल अल हीच अक्षरे रिपीट होतायत"
"अल म्हणजे? मला नाही माहीत. ए साळवी, अल म्हणजे काय? "
"अल? तुमच्या सारख्या स्कॉलरांना माहीत नाही, तर मला काय माहीत असेल? "
साळवींच्या बोलण्याने वातावरणातला ताण पुन्हा कमी होऊ लागला होता. माझे पूर्ण लक्ष त्या पट्टीकडे गेले. पुन्हा भिंग घेऊन मी बघू लागलो.
तोवर साळवी तिथे बेचैन होऊ लागले होते. "अरे काय? इथे किती ऊन आहे"
"हे बघ साळवी उगाच घाई करू नकोस. तू जिथे पट्टी आहे म्हणतोयस त्याच्या पुढे एकही झाड नाहीये का? तिथे बस की! " मानकामेंनी साळवींना शांत करायचा प्रयत्न केला
" अरेच्या! मी तर हे नोटिसच नाही केलं खरंच या रेषेच्या अलीकडे एकही झाड नाही. मात्र ते असो. मी एखाद दोन झुडपं तोडून आडोसा तयार करतो"
साळवी आणि मानकामे बोलत होते इतक्यात माझं लक्ष 'ल' वर असणार्‍या टिंबाकडे गेलं.
"सर! अल नाही अलम्! "
मानकामे माझ्याकडे वळले. तोवर साळवींनी आपली कुर्‍हाड बाहेर काढली होती.
"अलम् म्हणजे, सर? "
मानकामेंनी क्षणभर विचार केला "अलम् म्हणजे 'नको'"
"नको? इथे असं नको नको का लिहिलं असेल? सर अजून काही अर्थ? "
"तसा अलम् नुसता कमी येतो. पण संधीत बरेचदा ऐकला असशील. इत्यलम्. म्हणजे इथे थांबतो.. अरे थांबतो! किंवा 'थांबा! '" मानकामे ओरडले. माझं लक्ष लगेच साळवींकडे गेले
"साळवी तिथे लिहिलंय 'थांबा! '"
साळवींनी तोवर कुर्‍हाडीचा पहिला घाव घातला होता. आणि कुर्‍हाड आतच अडकली. आणि कुठुनसा एक बाण सप्पकन आला आणि साळवींच्या खांद्याला चाटून गेला.
"आह!!! "
साळवी त्या आवेगातही कुर्‍हाड खेचूनच मागे सरकले आणि झाडांकडे अत्यंत सजग पवित्रा घेऊन उभे राहिले. लष्करी शिस्त त्यांच्या अंगी भिनली होती. अगदी प्रतिक्षिप्त क्रियाही 'नेमकी' होती. आम्हीही धावत तिथे पोचलो. बराच वेळ आम्ही झाडींमध्ये टक लावून बघत होतो. बराच वेळ झाला, तरी काही दिसेना. म्हणून मग शेवटी सैलावलो आणि तटबंदीकडे परतलो.
"कोण होता साला! मला तर पहिल्यापासून वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. इथे इतकी झाडं पण एक पक्षी दिसत नाहीये. च्यामारी गावकरी म्हणतात तसे खरेच भूत नसेल ना इथे? " साळवी म्हणाले.
मानकामे लगेच सरसावले "हे बघ भूत वगैरेंबद्दल कोणतेही पुरावे नाहीत. सध्यातरी जे चाललंय ते मानवी आवाक्यातलंच आहे. तेव्हा थांब, शांत हो! तुला माहितीये का, त्या पट्टीवर काय लिहिलं आहे? "थांबा थांबा" अशी सूचना! याचा अर्थ इथे लिहिलेले संदेश वाचल्याशिवाय, आपल्याला काहीही करता येणार नाही"
साळवी शांत झाले. चेहर्‍यावरची सजगता मात्र तितकीशी कमी झाली नव्हती. मानकामे साळवींचा खांदा बघू लागले. बाण अगदीच चाटून गेल्याने फक्त खरचटले होते.

मी पुन्हा तटबंदीवरच्या अक्षरांकडे वळलो.
आता नेमका चार्ट मिळाला होता त्यामुळे अक्षरांची उकल करायला वेळ लागला नाही.
"'प्रणुदति २' असं लिहिलंय" मी सांगितलं
"म्हणजे? " साळवी आणि मी मानकामेंकडे बघू लागलो
"प्रणुदती म्हणजे दाबा, दाब द्या" मानकामे म्हणाले
"ओह! म्हणजे या तटबंदीच्या विटेवर दोनदा दाबायचे आहे. " साळवी
मला मात्र आता सगळ्याच गोष्टींवर संशय येत होता. मी म्हणालो "अहो पण काय माहीत की दाबल्यावर काही चांगलंच होणारे? "
मानकामे म्हणाले "हे बघ आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे? वस्तीचे मुख्य द्वार वर्षभराने उघडेल. बाकी झाडीतून जायचे तर तिथून आलेल्या बाणातून साळवी नुकताच बचावला आहे. तिथे काय आहे तेही माहीत नाही. समोरच्या कमानीखालून गेल्यावर पलीकडे दलदल आहे. मग आपल्यापुढे काय पर्याय राहतो? "
मी काहीच बोललो नाही. गप्पच राहिलो. तसंही या लिहिलेल्या सूचना अगदीच काही खोट्या वाटत नव्हत्या. "थांबा" ही सूचना उपायकारकच होती. तेव्हा मी मधे न येण्याचे ठरवले.
साळवी एखाद्या सैनिकासारखे पुढे झाले. आणि त्यांनी ती वीट एकदा दाबली
वीट आत सरकली आणि एका खटक्याचा आवाज झाला.
मग साळवींनी वीट अधिक आतमध्ये अधिक जोर देऊन दाबली तर ती आत जाऊ लागली आणि बाजूच्या झुडुपात काहीतरी खसखस पिकली! काहीतरी सर-सर सरकल्याचा आवाज येऊ लागला.

~~~मानकामे~~~

हे असे काही असेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. मंदारच्या विनंतीनुसार आम्ही "थांबा" पट्टीच्या अलीकडे असल्याने वाचलो असे म्हणता यावे. साळवीने वीट दोनदा आत सरकवल्यावर येणारे आवाज ऐकून आम्ही घाबरलो. साळवीने तर कुर्‍हाड हाताशीच ठेवली होती. मीही कमरेला लावलेला जंबिया पकडला. मंदार नि:शस्त्रच होता!

समोरच्या झाडीला वाकवत एक दोरीसारखे काहीतरी वर येऊ लागले आणि जवळ येताच तो दोरखंड असल्याचे दिसले. मग अगदी आमच्या समोरच्या जमिनीतून - "थांबा" लिहिलेल्या रेषेच्या पलीकडून- दोन दोरखंड बाहेर आले. आमच्या मनात भिती, उत्सुकता यांपैकी कशाचाही अंमल चढायच्या आत, समोरच्या दलदलीत काहीतरी हालल्यासारखे वाटले. आम्ही बघतच राहिलो. मंदार तिथे जाण्याच्या पवित्र्यात होता पण साळवींनी मंदारला धरले. आणि बघता बघता त्या वर आलेल्या दोरखंडांना बांधलेला एक पूल त्या दलदलीतून वर आला!

आमच्यासाठी पुढिल रस्ता मोकळा झाला होता मात्र त्या पुलावर ५-७ सांगाडे होते. आणि त्याच सांगाड्यांच्या शेजारी होते फातिमाचे निश्चेष्ट प्रेत!

(क्रमशः)
इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

भारीय हा भाग पण! मस्त चालुय खजिन्याचा शोध.
पुभाप्र.
काय राव फातिमाला खरंच मारलंत की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकेक भाग वाचावे कि सगळे आले कि एक्दम वाचुन टाकाव असा विचार करतोय...
लवकर टाका हो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचत आहे. पुढचे भाग लवकर यावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्कंठा वाढेश!! आंदो जल्दीच्च!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुढे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऊत्सुकता वाढलीय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

प्रत्येक भाग पहिल्यापेक्षा अधिक उत्सुकता निर्माण करणारा आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0