स्मरण

आमच्यासारख्या छांदिष्ट लोकांना एकत्र जमायला एकेक कारणच लागत असतं. मुंबईला दर एप्रिल महिन्यात होणारी 'शुक्ला मेमोरियल डे कॉईन फ़ेअर' ही तमाम भारतातील नाणी-संग्राहकांना एकत्र आणणारी अशीच एक 'इव्हेंट'. कै. सदाशंकर शुक्ला ह्या मुंबईतल्या आद्य नाणेसंग्राहक-संशोधकाच्या स्मरणार्थ दर वर्षी त्यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून हा 'मेळा' भरवला जातो. 'नाणकशास्त्र' ह्या विषयात केवळ नाणीच मोडतात असे नव्हे, तर नोटा, मेडल्स, पदके अशा गोष्टींचाही ह्या विषयाच्या 'स्कोप'मध्ये समावेश होतो. सबब, ह्या गोष्टींचे संग्राहकही 'शुक्ला डे'ला आवर्जून हजेरी लावतात. गेल्या एप्रिलमध्ये मी मुंबईला होतो त्यामुळे माझेही तिथे जाणे झाले. फेअर कुलाब्याला वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये भरवण्यात आलेली होती.

भारतात नाण्यांच्या पद्धतशीर संग्रहाला गेल्या काही वर्षात बरीच चालना मिळाली आहे. लिलावी विक्रीपद्धतीच्या लोकप्रियतेमुळे नाण्यांचे मार्केट बरेचसे 'उजेडात' येउन त्यात थोड्याफार प्रकारचे पारदर्शित्वही येऊ लागले आहे. त्यातच मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशात वाढीस लागलेल्या आर्थिक सुबत्तेची परिणीती नाण्यांसारख्या वस्तूंकडे केवळ 'छंद' म्हणून न पाहता अपारंपरिक अशा प्रकारच्या गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जाण्यात होऊ लागली आहे. 'शुक्ला डे'चे निमित्त साधून नाण्यांचे लिलाव करणाऱ्या काही कंपन्यांनी आपापले लिलावही तिथे जाहीर केले होते. अशाच एका लिलाव व्यवसायाचा प्रणेता गिरीश हा माझा अनेक वर्षांचा मित्र! त्याने 'शुक्ला डे'-निमित्त होणाऱ्या 'कॉईन फ़ेअर'मध्ये स्वतःचा स्टॉल सजवला होता आणि तिथे तो मोठ्या आपुलकीने आल्या-गेल्याची सरबराई करत होता. त्या वेळी होणार असलेल्या लिलावातील मालाची प्रसिद्धी करणे आणि पुढे होणाऱ्या लिलावांसाठी कमिशन्स मिळवणे हा त्याचा प्रमुख हेतू होता. मीही इथे-तिथे फिरून जुने परिचित, मित्र इत्यादी लोकांशी गप्पा-टप्पा करण्यात मग्न होतो. हॉल माणसांनी अगदी दाट भरून गेला होता.

"आप को गिरीश साब बुला राहे है", अचानक एक माणूस मला सांगायला आला. काय काम आहे ते बघायला मी गिरीशच्या स्टॉलकडे गेलो. बाहेरच गिरीश उभा होता. त्याच्या समोर एक उतारवयीन मराठी बाई. मूळचा गोरा, पण आता थोडा काळवंडलेला असा वर्ण. धुवट सुती प्रिंटेड साडी, तसाच सफेद ब्लाउज. मधोमध भांग पडून रबरबँडने मागे बांधलेले आखूड, कळाहीन केस. तोंडावर थोडेसे सुरकुत्यांचे जाळे, थोडेफार आश्चर्य आणि बराचसा उबग ह्यांच्या मिश्रणाने गांजलेला चेहरा. हातात एक-एकच काचेची बांगडी. एक कापडी पिशवी घेऊन उभ्या होत्या. बाईंची आर्थिक स्थिती एकंदरीत फारशी चांगली आहे असे वाटत नव्हते.

"शैलेन ये देख, ये बाईजी कुछ लेके आई है अपने ऑक्शन मे डालने के लिये..." गिरीश त्याच्या खास गुजराती ढंगाच्या हिंदीत मला म्हणाला, "जरा देख तो क्या चीज है..." बाईंनी मला रीतसर नमस्कार केला आणि कापडाच्या पिशवीत हात घालून त्या धुंडाळू लागल्या. थोडा वेळ धुंडाळल्यानंतर त्यांनी एक चांदीचे चौकोनी तबक आणि त्याच्याबरोबर एक लहानशी पर्स काढली. पर्स उघडल्यावर त्यांनी तिच्यातून कागदाच्या दोन पुड्या काढल्या. कागद सोडल्यावर त्या पुड्यांतून दोन पदके बाहेर पडली. "ही विकायची होती. सोन्याची आहेत. मला कोणीतरी म्हणालं की अशीच मोडीच्या भावात विकू नकोस. लोक कलेक्ट करतात म्हणे, आणि सोन्यापेक्षा जास्त किंमत येतीय. मला काही विशेष माहिती नव्हती, पण मग चौकशी केल्यावर ह्यांचे नाव समजले" म्हणून त्यांनी गिरीशकडे पाहिले. "माझ्या आजोबांची आहेत ही... म्हणजे सख्ख्या नव्हे, चुलत... त्यांना लोकांनी दिली होती... मोठे शिल्पकार होते ते", बाई खालच्या आवाजात बोलत होत्या.

मी त्या पदकांकडे पाहिले. दोन्ही वेगवेगळी होती. एक वजनाला जरा जड, तर दुसरे कमी. एक सफाईने बनवलेले तर दुसरे जरा यथा-तथाच. एकाचा घाट पाश्चात्य तर दुसऱ्याचा पूर्णपणे देशी. एकावर इंग्रजीतला मजकूर तर दुसऱ्यावर फक्त देवनागरी अक्षरे. जमेची बाजू ही की दुसरे पदक जरी पहिल्याच्या तुलनेने ओबड-धोबड होते, तरी त्याच्यावर तारीख होती - १९२३! पहिल्यावरचा इंग्रजी मजकूर होता - To R K Phadke Sculptor आणि बॉर्डरमध्ये लिहिले होते, From His Admirers. दुसऱ्या पदकावर इंग्रजी नावाचे मराठीकरण होते - 'र. कृ. फडके आर्टिस्ट, १९२३'; आणि ते देणारे होते सोलापुर इथल्या सिद्धेश्वर संस्थेचे पंच. 'सिद्धेश्वर'चे 'सीद्धेश्वर' झाले होते तसेच 'संस्था' हा शब्द कर्नाटकी ढंगाने 'संवस्था' असा कोरला होता. शिल्पकाराचे हे नाव? परिचित होते का मला? नक्कीच ऐकले होते? कुठे बरे ऐकले होते? अशा विचारांत असतानाच मी बाईकडे असलेल्या तिसऱ्या वस्तूवर नजर टाकली. ते चांदीचे तबक! त्यावरही मजकूर कोरला होता - "श्री सांगली टिळक स्मारक संस्थेकडून - शिल्पकार श्री. रघुनाथराव फडके यांसी. २५-८-२९ इ."

रघुनाथराव फडके! शिल्पकार रघुनाथराव फडके! क्षणार्धात माझ्या लक्षात आले - अरे, हे तर पु.लं.चे 'दत्तक आजोबा'! 'गुण गाईन आवडी'मध्ये पु.लं.नी ह्यांच्यावर किती सुंदर लेख लिहिलाय. आणि ह्या शिल्पकार फडक्यांचे चिरस्मरणीय शिल्प तर आपण जाता-येता बघत असतो - चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा पुतळा! चौपाटीवर जिथे लोकमान्यांचे दहन झाले त्याच ठिकाणी उभारलेला. त्यांच्या ह्या वस्तू? मी आजूबाजूला बघितले. सर्वत्र गर्दीचा आणि कोलाहलाचा आवाज भरून राहिला होता. हजारो लोक इथे-तिथे आपापल्या संग्रहात जमा काय होईल ते बघत फिरत होते. त्या गर्दीत फडक्यांचे कर्तृत्त्व जाणणारा एकही मनुष्य नव्हता! गिरीशने मला विचारले, "क्या है क्या इस में?" माझ्या चेहऱ्यावरचे बदलते भाव त्याच्यातल्या चतुर व्यापाऱ्याने बहुधा टिपले होते! मी त्याला म्हटले, "ये बहुत बडे आर्टीस्ट की चीजे है". माझे बोलणे ऐकून त्या बाई म्हणाल्या, "हो - खूप प्रसिद्ध शिल्पकार होते ते". 'गुण गाइन आवडी'चा संदर्भ मी त्यांना पुरवला. पण बाईंना त्यांच्या चुलत आजोबांवर पु.लं.नी लेख लिहिला आहे ह्याची गंधवार्ताही नव्हती! सर्वांच्या दृष्टीने रघुनाथराव फडके हे पूर्णपणे भूतकाळात जमा झाले होते. त्यांची सन्मानचिन्हे मात्र काळाला वाकुल्या दाखवल्यासारखी आमच्यापुढे पडली होती.

त्या पदकांकडे बघताना माझ्या मनात पु.लं.च्या त्या लेखातल्या अनेक गोष्टी उभ्या राहिल्या. मध्य प्रदेशात धार इथे व्रतस्थ अवस्थेत राहणाऱ्या फडक्यांचे ऋषितुल्य एकाकीपण, त्यांच्यातली कलासक्तता आणि जीवननिष्ठा अशा गोष्टींची त्या लेखात पु.लं.नी उजळणी केली आहे. करमरकर, म्हात्रे अशा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जे.जे. कलाविद्यालयात शिकून 'बॉम्बे स्कूल' ह्या नावाने पुढे प्रसिद्ध झालेल्या कला-वर्तुळातल्या दिग्गज नावांपैकी रघुनाथ कृष्ण फडके हे एक नाव. पारंपारिक कलेचा वारसा आपल्या बोटांत घेऊन त्यावर पाश्चात्य कला-शिक्षणाची अनुरूप मदार ह्या कलाकारांनी मुंबईत चढवली. विसाव्या शतकातील भारतीय कलेच्या इतिहासातले हे एक उल्लेखनीय पर्व. करमरकरांच्या 'मंदिर-पथ-गामिनी' ह्या शिल्पासारख्या कलाकृती हे ह्या पर्वातील कलेचे हुंकार. टिळकांचा चौपाटीवरील पुतळा ही ह्याच काळात शिकून तयार झालेल्या आणि स्वतःच्या कलेतून एक प्रकारच्या राष्ट्रीय अभिव्यक्तीचा आविष्कार साधू पाहणाऱ्या रघुनाथराव फडक्यांची मुंबईतल्या सार्वजनिक शिल्पांतील एक अतिशय महत्त्वाची अशी अजरामर कलाकृती.

त्या वस्तूंवर कोरलेल्या तारखा त्यांच्या घडणीचा आणि फडक्यांना त्या दिल्या गेल्या तेव्हाचा काल दाखवत होत्या. दोन्ही तारखा विसाव्या शतकाच्या 'विशी'तल्या. लोकमान्यांचे निधन झाले १ ऑगस्ट १९२० रोजी. त्यानंतर काही वर्षातच त्यांच्या दहनभूमीवर त्यांची समाधी आणि फडके-कृत पुतळा उभा राहिला असणार. १९२९ साली त्यांना मिळालेले चांदीचे तबक सांगलीच्या 'टिळक स्मारक संस्थे'कडून आलेले होते. लोकमान्य हा ह्या वस्तू, फडके आणि त्यांच्या कलेची कदर करणारे त्यांचे चाहते ह्यांच्यातला महत्त्वाचा दुवा होता, हे त्या तबकावरून स्पष्ट होत होते. "टिळक मला पावले" हे अतीव भावापोटी फडक्यांनी काढलेले उद्गार पु.ल. आवर्जून नमूद करतात, हे ह्या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे.

अशा महत्त्वाच्या कालखंडाची आणि ऐतिहासिक दुव्याची साक्ष असलेल्या त्या वस्तू आज वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वातानुकुलीत हॉलमध्ये त्यांच्या वर्तमानकालीन मालकिणीची गरिबी दूर करण्यापुरती लिलावाची बोली लावून घ्यायला आल्या होत्या! मला त्या लेखांतली आणखी एक गोष्ट आठवली - फडक्यांना विडी ओढायचा नाद होता पण ते बोलायला लागले की विडी शिलगावायला पेटवलेली काडी पेटत्या अवस्थेतच हातात कशी धरून ठेवत आणि मग संभाषणातल्या एखाद्या मुद्द्याबरोबरच हाताला झटका देऊन ती कशी विझवत, त्या लकबीचे वर्णन पु.ल. करतात. एका गिऱ्हाईकाने म्हणे फडक्यांना प्रश्न केला होता, "काय हो, तुम्ही शिल्पे करता ती मातीची तर असतात. मग त्यात एवढे काय असते की त्यांची आम्ही इतकी किंमत द्यावी?" फडक्यांनी त्यांना सांगितले की तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे, वास्तव आहे - पण शिल्पासाठी आम्ही जी माती वापरतो, त्यात आम्ही आणखी एक माती मिसळतो ती फार महाग असते. त्या मातीमुळे शिल्पांची किंमत वाढते. "कुठली माती ती इतकी महाग असणारी?", गिऱ्हाईकाचा उर्मटपणा तयारच होता. "आयुष्याची!" फडके उत्तरले! पु.लं.नी म्हटले आहे, "हे शब्द उच्चारताना हातातल्या पेटत्या काडीला फडक्यांनी कसा झटका दिला असेल ते माझ्या नजरेपुढे उभे राहिले".

आयुष्याची माती मिसळून ज्यांनी कलेची आराधना आयुष्यभर केली, त्यांच्या जीवनातली गौरवक्षण असणाऱ्या त्या वस्तू! आज अशा रीतीने विकायला आल्या होत्या - मोडीच्या भावातच जायच्या पण त्या गरीब बाईंना कोणीतरी ह्या लिलावाची आशा लावली होती म्हणून त्या बोरिवलीपासून कफ परेडपर्यंत उन्हाच्या वेळी ती दौलत कापडाच्या पिशवीत टाकून आल्या होत्या. वाटेत त्यांना चर्नी रोड स्टेशनापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या फडक्यांच्या हातून घडलेल्या अजरामर कलाकृतीने साद घातली असेल का? त्यांचे लक्ष तिथे गेले असेल का? त्यांच्या पिशवीतल्या वस्तूंनी गौरवलेला तो कलाकार आणि त्यांच्या कलाकर्तृत्त्वाचा परमोच्च बिंदू गणला जाईल, असा तो पुतळा! त्यांच्या पिशवीत असलेल्या त्या वस्तू आणि तो पुतळा ह्यांच्यामधला इतिहासाचा दुवा त्यांच्या लक्षात सुद्धा आला नसेल. फडक्यांची आणि त्यांच्या कलेची ना लोकांना आठवण राहिली होती, ना त्यांच्या वंशजांना. "कालाय तस्मै नमः" म्हणतात ते ह्याहून वेगळे काय असावे?

मी गिरीशला एका बाजूला घेतले. बाईंच्या नजरेत अधीरता आणि अनिश्चितता उमटत होती. "सच बोलू तो ये अपने काम वाली चीज नही है", गिरीश मला म्हणाला, "मगर ये बाई अब कहां जायेगी? यहां से सीधे किसी ज्युलर के पास जा के ये सब बेच देगी". मी त्याला एवढेच म्हणालो की, मुंबईच्या कलाक्षेत्रावर आणि भूमीवर आपल्या कर्तृत्त्वाची अमीट मोहर उमटवणाऱ्या एका कलाकाराची ही सन्मानचिन्हे आहेत, आपल्याकडे अशी चालत आलेली आहेत. तेव्हा तू तुझ्यातर्फे होईल तितका न्याय त्यांना दे. "ठीक है", तो म्हणाला, "मै अगले ऑक्शन मे लगा दूंगा और इन बाईजी से कमिशन भी नही लूंगा". तो पडला व्यापारी, तो तरी दुसरे आणखी काय करणार होता? मी बाईंकडे जाऊन त्यांना हा निर्णय सांगितला. विवंचनेतून दूर झाल्याचा आनंद त्यांच्या निस्तेज डोळ्यांमध्ये क्षणभर चमकला. मग त्यांनी घाई-घाईने त्यांचा ऐवज त्यांच्या त्या कापडी पिशवीत भरला आणि त्या तिथून निघून गेल्या.

डिसेंबर महिन्यात पुण्याला झालेल्या लिलावात शिल्पकार रघुनाथराव फडके ह्यांची गौरवचिन्हे विकली गेली. कोणी घेतली हे मला माहित नाही, आणि ज्यांनी बोली लावून ती घेतली त्यांना फडक्यांविषयी काही माहिती होती का, हेही! तिन्ही गोष्टींचे मिळून जेमतेम लाखभर रुपये आले असतील-नसतील - लिलावात बोलींचे 'एस्टीमेट' दिलेले असते, त्याच्या आसपासच बोली गेली. फडक्यांच्या वस्तू म्हणून कोणी जास्त बोली लावल्याचे दिसले नाही. कोण लावणार - फडक्यांची कोणाला आठवण असेल तर ना?

पण इतके मात्र निश्चितच जाणवले की जगातल्या कुठल्याही प्रगत देशात फडके झाले असते तर त्यांची ही चिन्हे तिथल्या कला-संग्रहालयाने नक्कीच विकत घेतली असती. स्थानिक स्मारके, देशी कला आणि कलाकारांच्या इतिहासात अशा गोष्टींचे ऐतिहासिक महत्त्व फार! ती पदके 'शहरातील श्रेष्ठ कलाकृती'संबंधी असणाऱ्या प्रदर्शन-वीथिकेत गौरवाने ठेवली गेली असती. फडक्यांचे नाव तिथे अजरामर झाले असते आणि इतिहास आणि वास्तव ह्यांच्यातील दुवा म्हणून त्या पदकांची भलावणी झाली असती! पण त्यासाठी वस्तूंची आणि इतिहासाची पारख आणि जपणूक करणारा समाज लागतो. 'जशी रावणाची दुसरी लंका' व्हायला घातलेल्या मुंबईत कोणाला ही जाण? फडक्यांच्या वस्तूंच्या नशिबी हे भाग्य नव्हते, हेच खरे!

(टीप: वरील लेखात वर्णन केलेल्या वस्तूंचे फोटो इथे पाहायला मिळतील -
http://www.oswalauctions.com/PrintedAuctionDetails.aspx?Code=MwA5AA%3d%3...
सदर संकेत स्थळावर जा आणि लॉट नंबर्स ३९.२८३, ३९.२८४ आणि ३९.२८५ बघा.)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरीच प्रगती करायची बाकी आहे तर! लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेष्ट, सणसणीत लेख. ही दुरवस्था डोळ्यांत भरण्यासारखी आहे हे बाकी खरंय Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खेदजनक अनुभव. एकंदर आपल्याकडे लोकांना आपल्या वारशाविषयी जी अनास्था असते ती पाहता आश्चर्य मात्र वाटलं नाही. जालावर शोधता हे सापडलं. ह्या अनुभवाचाच एक वेगळा आविष्कार म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही दिलेल्या लिंकबद्दल धन्यवाद - एक सांगायचे म्हणजे मीही फडक्यांसंबंधी नेटवर कुठे माहिती मिळते ते चाचपून बघितले. फक्त एका वेबसाईटवर थोडी माहिती मिळाली, आणि ती वेबसाईट 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका कलाकाराची स्मृती निदान चांगल्या व्यक्तीकडे सुरक्षितपणे गेली हे बरे झाले.

तुम्हाला माणसाची ओळख होती आणि कलेची कदर होती, तुमच्या मित्राला अस्सल व्यापारी असूनही त्या पदकांचे महत्त्व कळले, (त्यांचा लिलाव झाला हे वाईट झाले तरी)म्हणून निदान त्यांची रास्त किंमत तरी मालकिणीच्या पदरात पडली.

दुसरा कुणी असता तर ती पदके आणि तबके खरी नाहीतच म्हणून बाईंना गंडवले असते.

रविंद्रनाथांचे चोरीला गेलेले नोबेल आणि भानू अथैय्यांनी अकादमीला परत केलेला ऑस्कर आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+1

असेच म्हणते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

अनुभव वाचून वाईट वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावना जाणू शकतो.
मला स्व्तःला एखाद्या कलाकाराची कलाकृती नष्ट झाल्यावर्,क्षतिग्रस्त झाल्यावर किंवा त्याची मुस्कटदाबी होउ लागल्यावर मला फारच वाईट वाटते. पण त्याच थोर व्यक्तीच्या वापरातील खुर्ची, त्याने वापरलेला गॅस किंवा त्याला मिळालेल्या बाहुल्या/पुरस्कार गायब झाल्या तर मात्र तितके वाईट वाटत नाही.
"टागोरांना पुरस्कार मिळाला" म्हणजे काय? तर त्यावर्षी आख्ख्या जगाने त्यांचे नाव आदराने घेतले नि ते रेकॉर्ड बुक मध्ये नों,दले गेले. ते त्यांच्या कामाचे जगाने दिलेले recognition आहे. ते असणे महत्वाचे असेलही पण अशा स्थूल्,जड्,भौतिक गोष्टींचा नक्की मोह का ठेवावा हे आजवर समजेलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भौतिक गोष्टींचा मोह सोडा, आपल्याकडे सरसकट कुठल्याही रेकॉर्ड कीपिंगची वानवा आहे. आज पदक हरवले, उद्या पदक मिळाल्याची नोंद हरवेल, परवा पदक मिळाले ही केवळ दंतकथा बनून राहील. थोडेसे ताणतोय याची जाणीव आहे, पण अनास्थेला इथूनच सुरुवात होते. "स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति|" हे विधान चपखल वाटते मला या संदर्भात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तळपदेंनी विमान उडवलं होतं म्हणतात १८९५ च्या दरम्यान, राइअट बंधूंच्याही आधी.
आख्खं विमान गायब झालं, त्याचे रेकॉर्ड , त्याचं इतर डॉक्युमेंटेशन गायब झालं म्हणतात. खरं खोटं तो विमानेश्वर जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होय, त्या घटनेशी संबंधित माहिती केसरी आर्काईव्ह्जमध्ये मिळाली तर बघेन कधी जरूर. या घटनेची वरिजिनल जुनी नोंद तरी नक्की कुठेय ते एकदा पाहिले पाहिजे साला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चला त्या पदकामुळे फडक्यांच्या घराण्यात एका व्यक्तीला तरी थेट व किमान लिलावातून येईल तितका धनलाभ कोणत्याही फसवणूकी शिवाय झाला हे उत्तम!
बाकी सारे कालाय तस्मै नमः!

आणि हो, ऐसी अक्षरेवर स्वागत!
असेच येत रहा लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर लेख आहे. अशा प्रकारचे दुर्दैवी अनुभव अनेक मोठ्या मोठ्या लोकांना आले आहेत. ऑलिम्पिक्स मधली मेडल्स विकावी लागली आहेत. तिथे जवळ जवळ ८५-९० वर्षांपूर्वी जो शिल्पकार प्रसिद्ध होता त्याला कोण लक्षात ठेवणार...हे खरेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला लेख आहे. वाचायचा राहून गेला होता. धन्यवाद शैलेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिल्पकार फडके ह्यांनी टिळकांचा एक 'बस्ट'हि केला होता असे त्यांनी आपल्या टिळकविषयक 'आठवणीं'मध्ये लिहिले आहे. (आठवणीकार बापट - खंड २) हा बस्ट कोठे असावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात उल्लेखिलेल्या संस्थळावर जाऊन पदकांना लिलावात काय मिळाले हे शोधले आणि - अपेक्षेप्रमाणेच - असे लक्षात आले की पदकांना धातु म्हणून मिळायची तितकीच किंमत मिळाली आहे. प्रसिद्ध शिल्पकाराचे, जुने म्हणून त्याचे जे 'मूल्य' आहे ते मात्र शून्य किमतीचे ठरले आहे.

कसे ते पहा:
पदक १२.०१ ग्रॅम सोने किंमत रु.३८,०००
पदक ६.९३ ग्रॅम चांदी सोन्याचे पाणी दिलेली किंमत रु.३,५००
ट्रॉफी ५१० ग्रॅम चांदी किंमत रु.३६,०००

सोने-चांदीच्या चालू बाजारभावाइतक्याच ह्या किंमती आहेत.

परवाच नेटफ्लिक्सवर My Best Enemy नावाचा चित्रपट पाहिला. विएन्नामध्ये राहणार्‍या एका कलादालनाच्या ज्यू मालकाकडे मिकेलअँजेलोच्या मोझेसच्या प्रसिद्ध पुतळ्याचे - हा सान पिएत्रो इन विंकोली St Peter in Chains नावाच्या रोममधील चर्चमध्ये आहे आणि मी स्वतः तो पाहिलेला आहे - मिकेलअँजेलोने स्वतः काढलेले स्केच आहे. ते त्या कुटुंबाकडून ते काढून घेण्याचा नाझी किती प्रयत्न करतात आणि अखेरीस ते सुरक्षितपणे स्वित्झरलंडला कसे पोहोचते अशी वेधक कथा चित्रपटात आहे. एका कागदाच्या तुकडयाचे मिकेलअँजेलोच्या नावामुळे लाखो डॉलर्स इतके मूल्य होते!

We know the price of everything but the value of nothing!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोझेस चा पुतळा?
मोझेसच्या पुतळयचे, पर्यायाने मोझेसचे चित्र??
कुठे फेडेल मायकेल ही पापं?
.
ख्रिस्ताची चित्रे नि मूर्ती उपलब्ध आहेत असे समर्थन कृपया देउ नये. ते ऑल्रेडी बरेच रुळले आहे.
ज्यू , हे ह्या आणि इतर काही बाबतीत मुस्लिमांइतकेच कट्टर आहेत.
त्यांच्या प्रेषिताचा पुतळा??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा सध्याचा भाव झाला. विकले गेले तेव्हा सोन्या-चांदीचा भाव कमी असावा ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जिथे शिवाजी महाराजांची समाधीदेखिल (ज्योतीराव फुल्यांनी उजेडात आणेपर्यंत) विस्मृतीत जाते तिथे रघुनाथ फडके कोण? इतिहास आणि ऐतिहासिक व्यक्ती आणि साधनांबाबतीतील उदासीनता हा भारतीय समाजाचा स्थायिभावच आहे.

निवडणूकीच्या राजकारणामुळे काही ठराविक व्यक्ती चलनी नाणे बनल्या आहेत इतकेच. बाकी सगळा आनंदी आनंद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0