बुद्धीमत्तेचा र्‍हास होत आहे का?

पूर्व प्राथमिक वा पहिली - दुसरीतील मुलं (व मुलीसुद्धा!) जेव्हा 70 - 80 टक्के गुण मिळवतात तेव्हा पालकांना आपल्या घरात खुद्द आइन्स्टाइन जन्माला आला आहे असेच वाटत असते. परंतु जेव्हा हीच मुलं मोठी होऊन आपले गुण उधळू लागतात तेव्हा मात्र पालकांचे डोळे उघडतात. म्हणूनच यासाठी वस्तुनिष्ठपणे विचार करून आपल्या पाल्याच्या कुवतीचा अंदाज घेणे शहाणपणाचे ठरू शकेल. अनेक वेळा आपला अंदाज चुकत असला तरी सामान्यपणे आजच्या पिढीचा बुद्ध्यांक मागच्या पिढीच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, हे कबूल करावे लागेल. कदाचित आपल्याला खरे वाटणार नाही. परंतु आताची पिढी आपल्यापेक्षा नक्कीच जास्त शहाणी आहे. संगणक, मोबाइल, स्मार्ट फोन, आयपॅड, आयपॉड, टॅब्लेट पीसी, टीव्ही, केबल टीव्ही, स्मार्ट टीव्ही, HD टीव्ही, कार्टून्स, आकर्षक जाहिराती, वेगवान कार्सचे प्रकार, इत्यादीमुळे आजची मुलं जास्त स्मार्ट होत आहेत. त्यांच्या स्मार्टपणाचा अंदाज संगणकाच्या स्क्रीनवरील वैविध्यपूर्ण रचना, मोबाइल्सचे रिंगटोन्स, संगणक - मोबाइल प्रणालीतील गुण - दोष शोधण्याची कुशलता, संभाषण चातुर्य, हजरजबाबीपणा, बहुश्रुतता, धडाडी, आत्मविश्वास, धोका पत्करण्यासाठीचे धैर्य, इत्यादीतून सहजपणे लक्षात येतो. मुलं आपल्यापेक्षा सरस आहेत याचा प्रत्यय वेळोवेळी व अनेक प्रसंगी आपल्याला येत असतो. व्हिडिओ गेम्स खेळत असताना दुसरी -तिसरीतील मुलंसुद्धा आई - वडिलावर सहजपणे मात करू शकतात. मुला-मुलींनाही आपले आई - बाबा बावळट आहेत, असेच वाटत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या वाटण्यात खरोखरच तथ्य आहे. बुद्धीमत्तेच्या मोजमापासाठी बुद्ध्यांक (IQ) हे मापदंड योग्य आहे हे गृहित धरल्यास 1950 नंतर बुद्ध्यांकात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे लक्षात येईल. पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे, असे जणू काही ही बुद्ध्यांकातील वाढ सुचवू इच्छिते.

परंतु असा निष्कर्ष काढण्यात घाई होत नाही ना? बुद्धिमत्ता ही काळाप्रमाणे बदलणारी, लवचिक अशी संकल्पना आहे. मुळात बुद्ध्यांकात वाढ होत आहे, याबद्दल मानसतज्ञात मतभेद आहेत. काही संशोधकांना बुद्धिमत्तेत वाढ झाली नसून कठिण समस्यांची उत्तरं शोधण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे, असे वाटते. इतरांच्या मते बुद्ध्यांक वास्तव परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या चातुऱ्याचे मापन ठरत आहे. या वाढीला मर्यादा आहेत व त्यानंतर वाढ शक्य नाही असेही काही तज्ञांचे मत असल्यामुळे गोँधळात भर पडत आहे.

बुद्धिमत्ता ही मानसिक गुणवत्ता असून त्यामध्ये अनुभवातून शिकण्याची क्षमता, कठिण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वा जुळवून घेण्यासाठी लागणार्‍या सामर्थ्याचे आकलन व अमूर्त संकल्पनांची समज या गोष्टी स्थूलमानाने आढळतात. बुद्धिमत्ता अनेक स्वरूपात व्यक्त होत असते. यात अनेक प्रकार आहेत: analytical, pattern, musical, physical, practical, intra personal, interpersonal. काहींना समस्यांचे विश्लेषण करण्यात प्राविण्यता असते. काही जणांना, विद्युत मंडल बघता क्षणीच वा इंजिनचे बॉनेट उघडल्या क्षणीच त्यातील गुंतागुंत लक्षात येते व त्यासाठी नेमके काय करावे हेही सुचते. लता मंगेशकर, पं जसराज, झाकीर हुसेन, सत्यजित राय, एम एफ हुसेन, इत्यादी कलाकारांच्या बुद्धिमत्तेची जातकुळी वेगळी असते. मॅराडोना, सचिन तेंडूलकर, सायना, आनंद इत्यादी क्रीडापटूंची बुद्धिमत्ता शारीरिक बुद्धिमत्ता या सदरात मोडते. काहींना नाते-संबंध, मैत्री जोडण्याची व ती टिकवून ठेवण्याची कला अवगत असते. इतर काही आपल्या संभाषण चातुर्यातून वा प्रसन्न व्यक्तिमत्वातून कुणालाही आत्मसात करू शकतात व आपला कार्यभाग उरकून घेतात. काही जण व्यवहारकुशल असतात. अशा प्रकारे बुद्धिमत्ता या शब्दात समस्यांचे विश्लेषण करून उत्तरं शोधण्याची कुशलता, शैक्षणिक परीक्षेतल्या यशासाठी लागणारी हुशारी, साहित्य संगीत इत्यादी ललित कलाप्रकारांसाठी लागणारी सर्जनशीलता, आर्थिक, राजकीय व सामाजिक यशासाठी लागणारे व्यावहारिक चातुर्य, व क्रीडाक्षेत्रात नाम कमावण्यासाठी लागणारे कौशल्य अशा विविध गोष्टींचा समावेश करता येईल.

आपल्याला अभिप्रेत असलेला बुद्ध्यांक मात्र फक्त विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचे मापन करणारे निकष असून
बुद्ध्यांक = (मानसिक वय/शारिरीक वय) x 100
या पद्धतीने ते मोजले जाते. मानसिक वयाचा अंदाज घेण्यासाठी काही चाचणींची रचना केली असून त्या गुणानुसार बुद्ध्यांक निर्दिष्ट केले जाते.

न्यूझिलंड येथील जेम्स फ्लिन्न या राज्यशास्त्राचे प्राध्यापक याविषयी संशोधन करत आहेत. बुद्ध्यांक नेमके काय सुचवतात व काय सुचवत नाहीत याविषयी त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या शोधनिबंधात 14 देशातील तरुण पिढींच्या बुद्ध्यांकांची तुलना केली आहे. नेदर्लंड, बेल्जियम, यासारख्या युरोपियन राष्ट्रामध्ये सक्तीची सैनिकभरती असल्यामुळे तरुणांना बौद्धिक चाचणीला सामोरे जावे लागते. यावरून त्या त्या राष्ट्रातील सरासरी बुद्ध्यांकासंबंधीची माहिती फ्लिन्न यांना मिळाली. इतर काही देशातील बुद्ध्यांकाची माहिती मिळवून फ्लिन्न यानी आपला शोधनिबंध सादर केला. बुद्ध्यांकाचे शाब्दिक, संख्यात्मक व दृक् - अवकाशीय (visuo-spatial) अशा तीन प्रकारात विभागणी केली. शाब्दिक बुद्ध्यांक चाचणीत अचूक शब्दांची, वा वाक्यरचनेची, संख्यात्मक बुद्ध्यांक चाचणीत अंकगणित, बीजगणित यांच्यावरून अंक - संख्यांची व दृक् - अवकाशीय बुद्ध्यांक चाचणीत भूमितीय संरचना, आकृतीबंध यांची निवड करावी लागते. फ्लिन्न यांच्या मते दृक् - अवकाशीय प्रकारातील बुद्ध्यांकातच फक्त वाढ झाली असून इतर प्रकारात जास्त फरक जाणवत नाही.

याचे परिणाम काहीही असले तरी आधुनिक मानवाच्या बुद्धीचा प्याला काठोकाठ भरला आहे असे मानण्यास फ्लिन्न तयार नाहीत. आपले आजोबा, पणजोबा मतीमंद होते व आपण मात्र चतुर, चाणाक्ष आहोत असा अर्थ काढता कामा नये. फार फार तर अमूर्त अशा समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी लागणारी बौद्धिक प्रगल्भता व कुशलता आत्मसात केली आहे, असा निष्कर्ष आपण यातून काढू शकतो. अशा समस्यांकडे जास्त गांभीर्याने बघण्याकडे कल वाढत आहे, असाही अर्थ यातून ध्वनित होतो. आपल्या आजोबा - पणजोबांच्या काळातील समस्यांचे स्वरूप सर्वस्वी वेगळ्या होत्या. त्यांची बौद्धिक कुशलता त्या काळानुरूप होती. एके काळी औटकी, पावकी, अडीचकी व इतर पाढे तोंडपाठ करण्यातच हुशारी समजली जायची. कारण तोळा, मास, रत्तल, शेर, मण, पै, अधेली, आणेली, चवली इत्यादी व्यवहारातील मोजमापांसाठी या पाढ्यांचा सर्रास वापर होत असे. सर्व आकडेमोड तोंडी करावे लागत असे. कॅल्क्युलेटर्स, कॅश रिजिस्टर्स, संगणक अशी साधनं त्यांना उपलब्ध नव्हत्या. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारसारख्या अंकगणितीय कौशल्याची त्याकाळी गरज होती. इंग्रजीतील शब्दसंग्रह, वाक्यरचनेवरील प्रभुत्वासाठी तर्खडकरांच्या पुस्तकांना पर्याय नव्हता. आताच्या युगात बदललेल्या साधन -सुविधांमुळे या पद्धती कालबाह्य ठरल्या आहेत. त्यामुळे आताच्या पिढीला एकेकाळची ही कुशलता काय कामाची असे वाटणे साहजिकच आहे.

फ्लिन्न यांच्या मते आजचा समाज बुद्धिमत्तेच्या बाबतीत फारच हळवा होत चालला आहे. जीवनोपयोगी समस्यांकडे पाठ फिरवून अमूर्त - काल्पनिक समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालत आहे. रंजकतेला प्राधान्य दिले जात आहे. टीव्ही, स्मार्ट टीव्ही, संगणक, मोबाइल्स, वेगाने धावणाऱ्या SUVs इत्यादीमुळे दृक् - अवकाशीय कुशलतेत भर पडत आहे. ही वाढ एकाच पिढीत झालेली नसून अनेक पिढ्या उत्क्रांत होत आजच्या अवस्थेपर्यंत पोचली आहे.

आपल्या बुद्धिमत्तेत वाढ होत आहे, याबद्दल तज्ञांच्यामध्ये दुमत नाही. परंतु ही वाढ कशामुळे होत आहे याची कारणं मात्र वेगवेगळी आहेत. सकस आहार, निरोगी शरीर, लहान कुटुंब, शिक्षणाची संधी, तंत्रज्ञानातील सोयी - सुविधा, इत्यादीमुळे बुद्धिमत्तेत वाढ झालेली जाणवते. दृक् - अवकाशीय उपक्रमाबरोबरच आपला समाज दिवसे - न - दिवस जास्त जटिल होत असून त्यातून उद्भवणार्‍या कठिण समस्यांना उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नामुळे बुद्धिमत्तेत वाढ होत आहे. उत्तर शोधताना अमूर्त अशा संकल्पना समजून घ्याव्या लागतात. अनुभवाची शिदोरी असावी लागते. समस्याला उत्तर मिळेपर्यंत फोकस्ड असावे लागते. मगच समस्यांचा ठावठिकाणा कळतो. व उत्तरं सापडत जातात. सुरुवातीला कुठलीही संकल्पना समजून घेण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात व वेळही जास्त लागतो. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद, न्यूटनचे गती-नियम, एंट्रॉपीचा सिद्धांत, क्वांटम डायनॅमिक्स इत्यादी समजून घेण्यासाठी अर्धे अधिक आयुष्य खर्ची घालावे लागत असे. सेट थेअरी, इंटिग्रल कॅल्क्युलस, डिफरन्शिअल इक्वेशन्स, सारखे विषय पदवी परीक्षेसाठी शिकविले जात होते. आता मात्र हेच विषय 10वी - 12वीची मुलं काही महिन्याच्या अभ्यासानंतर आत्मसात करू शकतात. संकल्पना समजून घेण्यासाठी कमीत कमी वेळ लागत आहे. एकेकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा परस्पर सहकारातून समस्येचे विभाजन करून सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास समस्या लवकर सुटतात याची जाणीव होत आहे. त्यामुळे आता कुठलीही समस्या कठिण असे वाटेनासे झाले आहे.

परंतु काही संशोधक मात्र बुद्ध्यांकाच्या पलिकडे जावून वास्तव परिस्थितीचा सामना करू शकणार्‍या बुद्धिमत्तेच्या शोधात आहेत. आजकाल बुद्धीबळासारख्या मेंदूला ताण देणार्‍या बौद्धिक खेळप्रकारात कमी वयातील तरुण - तरुणी ग्रँड मास्टर्स होत आहेत. 1950 ते 1971 पर्यंतच्या ग्रँड मास्टर्सच्या वयात फार मोठा बदल झाला नव्हता. 91 नंतरच्या ग्रँड मास्टर्सचे सरासरी वयोमान मात्र भरपूर खाली उतरलेले जाणवते. कदाचित जीवघेण्या स्पर्धेमुळे वा आर्थिक लाभासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा लहान वयापासूनच करत असल्यामुळे अगदी लहान वयातच अनेक जण ग्रँड मास्टर्स झाले आहेत. वैज्ञानिकांच्या बाबतीतसुद्धा हाच अनुभव जमेस आहे. वैज्ञानिकांच्यावरील आर्थिक-सामाजिक, शैज्ञणिक दबावामुळे शोधनिबंधांच्या संख्येतदरवर्षी लाखोनी भर पडत आहे. मात्र वास्तवतेशी सामना करू शकणार्‍या पेटंट्स राइट्सच्या संख्येतफार मोठी वाढ झालेली जाणवत नाही.

वरील सर्व विधाने पटण्याजोगी असली तरी आजची मुलं हुशार आहेत याबद्दल शंका नाही. दृक् - श्राव्य माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांच्या आकलन क्षमतेत वाढ होत आहे. दृक्-अवकाशीय प्रकारात त्यांचे प्रभुत्व जाणवत आहे. त्यामुळे बुद्ध्यांकात वाढ होत आहे हे मात्र नक्की. अमूर्त स्वरूपातील जटिल समस्या हाताळण्याची चलाखी मुलांमध्ये आहे . कठिण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्याची कला या पिढीने आत्मसात केली आहे. काही अपवाद वगळता ही चलाखी किंवा स्मार्टनेस्स आपल्या आजोबा, पणजोबा यांच्याकडे नव्हती, हे मान्य करायला हवे

ही बुद्घिमत्ता अशीच वाढत राहणार आहे का? आजचे शहाणे 2050 साली मठ्ठ समजले जातील का? कदाचित तसे नसावे. यासंबंधीची माहिती घेताना बुद्धिमत्तेतील वाढीचा व औद्योगिकरणाचा संबंध जोडता येईल का याचाही विचार केला जात आहे. संशोधकांनी ऑस्ट्रेलियातील शिक्षकांनाच हा प्रश्न विचारला. कारण शिक्षकच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे जास्त परखडपणे व अचूकपणे विश्लेषण करू शकतात. ऑस्ट्रेलियातील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होत आहे जाणवले नाही. हाच प्रश्न सिंगापूर व कोरिया या देशातील प्राथमिक शिक्षकांना विचारल्यावर अगदी वेगळीच प्रतिक्रिया ऐकावयास मिळाली. त्यांच्या मते विद्यार्थी फार प्रतिभावान आहेत.

यासंबंधातील डेन्मार्क येथील उदाहरणसुद्धा वाचनीय आहे. डेन्मार्क येथे सक्तीचे सैनिक शिक्षण असल्यामुळे 17 वर्षाच्या तरुणांना (व तरुणींनासुद्धा!) बुद्धिमत्तेच्या चाचणीला सामोरे जावे लागते.1957 पासूनच्या चाचण्यांचा अभ्यास केल्यास 1960 - 1970 च्या दशकापर्यंत शाब्दिक, सांख्यिक व दृक् -अवकाशीय चाचणीत समर्पक उत्तरं दिल्यामुळे बुद्ध्यांकात वाढ होत आहे, असे आढळून आले. भूमितीय रचना, संख्यांची मांडणी, संकल्पनेतील नातेसंबंध, इत्यादी प्रकारच्या चाचणीत समर्पक उत्तरं दिली जात होती. परंतु नव्वदीच्या दशकानंतर इतर प्रकारापेक्षा दृक्-अवकाशीय प्रश्नांनाच योग्य उत्तर मिळू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्ध्यांकाचा ग्राफ खाली येऊ लागला. याचाच परिणाम म्हणून 1999 सालानंतर उच्च शिक्षण घेणार्‍यात लक्षणीय प्रमाणात घट होऊ लागली. यावरून बुद्धिमत्तेच्या वाढीला काही मर्यादा असू शकतात, हे प्रकर्षाने जाणवू लागले. डेन्मार्कसारख्या अतीविकसित औद्योगिक राष्ट्रातील बुद्धिमत्तेचा र्‍हास होत आहे हे पहिल्यांदा लक्षात आले. परंतु पूर्वेकडील राष्ट्रे गेली 50 वर्षे विकसित होत आहेत. त्यामुळे त्यांना परिस्थिती शहाणे बनवत आहे.

बुद्ध्यांक स्थिर असण्याचे वा र्‍हास होण्याचे अजून एक कारण, उत्तेजनाचा अभाव हाही असू शकेल. ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात तिथल्या शिक्षकांना विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची आवड नाही हेच जणू सुचवायचे होते. विद्यार्थी हुशार वा मठ्ठ ही बुद्धिमत्तेची अवस्था नसून शिकण्यासाठी उत्तेजन मिळत असल्यास अवस्थेत बदल होऊ शकतो. शिकण्याची आवड निर्माण करणे शक्य आहे. अतीविकसित देशात नेमके याचीच कमतरता आहे. संशोधक मात्र या विचाराला आक्षेप घेत आहेत. कदाचित नेहमीप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याना कमी लेखत असावेत. त्याचप्रमाणे कोरियातील शिक्षकांनासुद्धा विद्यार्थी जास्त श्रम घेत नाहीत असेच वाटत होते.

10वी, 12वी किंवा पदवी परीक्षांचे परिणाम काय सुचवतात, हाही बुद्धिमत्तेचा निकष होऊ शकतो. कालमानाप्रमाणे प्रश्नांचे स्वरूप सारखे बदलत असतात. विद्यार्थी बदलतात. त्यामुळे परीक्षांच्या परिणामावरून निष्कर्ष काढणे तितके सोपे नाही. याबाबतीतला अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकाचा ग्राफ स्थिर असून ब्रिटनमध्ये तो वाढत आहे. परंतु जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून परीक्षेतील प्रश्न सोपे केले असतील, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी खरोखरच हुशार आहेत की नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. एके काळी गुणवत्ता यादीतील टक्केवारी 70 - 80 च्या पुढे नसायची. आता मात्र 98-99च्या आसपास असते. परंतु ही टक्केवारीसुद्धा बुद्धिमत्तेच्या वाढीचे मापन होऊ शकत नाही.

खरोखरच आपण बुद्धिमत्तेच्या मर्यादेपर्यंत पोचलो आहोत का? विद्यार्थ्यातील बुद्धिमत्ता वाढवण्यासाठीचे आपले प्रयत्न अपुरे पडत आहेत का? उत्तेजन देण्यात आपण कमी पडत आहोत का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अजून शोधावयाची आहेत. एक मात्र खरे की आर्थिक सुबत्ता व बुद्धिमत्ता यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. रोमन नागरिक सुख संपत्तीत लोळत असताना विचार करण्यासाठी म्हणून ग्रीक नागरिकांची मदत घेत होते (outsourcing!) अशीच परिस्थिती आज अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांच्या बाबतीत घडत आहे. माहिती तंत्रज्ञानासारख्या बौद्धिक कसरतीच्या क्षेत्रात आपल्यासारख्या देशांचा वरचष्मा याच कारणासाठी असू शकेल!

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (6 votes)

प्रतिक्रिया

अत्यंत रोचक लेख!
वाचून अनेक प्रश्न मनात उभे राहिले. पहिला म्हणजे प्रचलित शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध असतो का? नसेल तर औपचारिक शिक्षणासाठी उत्तेजन देऊन बुद्धिमत्ता कशी वाढेल?

दुसरं म्हणजे न शिकण्याचा आणि बंदिस्त अवकाशाचा संबंध असेल का? विकसित देशांमध्ये पाहिलं तर सगळं कसं आखीव रेखीव असतं. अगदी नॅशनल पार्कमध्ये गेलं तरी बसायला बाकडी, जागोजागी कचराकुंड्या, ठराविक अंतरावर मुतार्‍या, बस-ट्रेन्स वेळेवर धावणार, ठरलेल्या फलाटावर येणार. शहरात तर काय, विचारूच नका. स्वतःचं डोकं लावायची गरजच नाही. सगळं कसं ठरल्यासारखं, ठरल्याजागी. याचा बुद्धिमत्तेवर परिणाम होत असावा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरं म्हणजे न शिकण्याचा आणि बंदिस्त अवकाशाचा संबंध असेल का? विकसित देशांमध्ये पाहिलं तर सगळं कसं आखीव रेखीव असतं. अगदी नॅशनल पार्कमध्ये गेलं तरी बसायला बाकडी, जागोजागी कचराकुंड्या, ठराविक अंतरावर मुतार्‍या, बस-ट्रेन्स वेळेवर धावणार, ठरलेल्या फलाटावर येणार. शहरात तर काय, विचारूच नका. स्वतःचं डोकं लावायची गरजच नाही. सगळं कसं ठरल्यासारखं, ठरल्याजागी. याचा बुद्धिमत्तेवर परिणाम होत असावा का?

सकृद्दर्शनी खरे वाटले तरी असे नसावे असे वाटते. नपेक्षा विकसित देशांतून इतके भारी शास्त्रज्ञ वगैरे कसे बाहेर पडतात? इमिग्रंट्स वजा केले तरी "आतले" देखील लै संख्येने आहेत आम्रिकेत अन अन्य युरोपीय देशांत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्म्म्म. सांख्यिकी दृष्टीने आयक्यू कमी होतोय असा निष्कर्ष निघाल्याचे लेखात म्हटले आहे म्हणजे सगळेच एकदम मठ्ठ झाले असा अर्थ नसावा.
असो.
लेखावरून एका मित्राने सांगितलेल्या Idiocracy या चित्रपटाची आठवण झाली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच. पण हा प्रश्न मलाही पडलेला आहे. युरोप-आम्रिकेची शिक्षणपद्धती ही प्राथमिक-माध्यमिक वगैरे स्तरांवर एकदम निवांत असून पदवी-पदव्युत्तर शिक्षणात लै घासून घेतात असे वाचल्याचे आठवतेय. संशोधनात इ. बाजी मारणे त्यामुळेही असेल. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कदाचित सगळं आखीव रेखीव असल्याने अशा mundane गोष्टीत उर्जा खर्च होण्यापेक्षा मेंदूला हव्या त्या ठिकाणी खर्च करण्याइतकी उर्जा शिल्लक राहत असावी काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकसित देशांमध्ये पाहिलं तर सगळं कसं आखीव रेखीव असतं. अगदी नॅशनल पार्कमध्ये गेलं तरी बसायला बाकडी, जागोजागी कचराकुंड्या, ठराविक अंतरावर मुतार्‍या, बस-ट्रेन्स वेळेवर धावणार, ठरलेल्या फलाटावर येणार. शहरात तर काय, विचारूच नका. स्वतःचं डोकं लावायची गरजच नाही.

उलट, विकसित देशांमधील लोकांना तुम्ही लिहिल्या आहेत त्या सारख्या छोट्या छोट्या गोष्टींवर बुद्धी खर्च करावी लागत नसल्या मुळे जिथे खरच जास्त बुद्धीची गरज आहे तिथे तिचा वापर होत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रिस हेजेसच्या Empire of Illusion: The End of Literacy and the Triumph of Spectacle (2009, Nation Books) या पुस्तकात खालील उतारा
वाचायला मिळतो.

Functional illiteracy in North America is epidemic. There are 7 million illiterate Americans. Another 27 million are unable to read well enough to complete a job application, and 30 million can't read a simple sentence. There are some 50 million who read at a fourth- or fifth-grade level. Nearly a third of the nation's population is illiterate or barely literate -- a figure that is growing by more than 2 million a year. A third of high-school graduates never read another book for the rest of their lives, and neither do 42 percent of college graduates. In 2007, 80 percent of the families in the United States did not buy or read a book. And it is not much better beyond our borders. Canada has an illiterate and semiliterate population estimated at 42 percent of the whole, a proportion that mirrors that of the United States.

चांगलंचुंगलं खायला मिळतं, औषधोपचार आहेत म्हणून आरोग्यात सुधारणा झाली म्हणता म्हणता ओबेसिटी हा प्रश्न बनला तसं या फ्लिन इफेक्ट बद्दल झालंय का ते तपासायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्लिन इफेक्ट आणि वरचा विदा हे परस्परविरोधी आहेत असं तुमचं म्हणणं असल्यासारखं वाटलं. मला तसं वाटत नाही. या दोनमधून साधारण इतकाच अंदाज बांधता येतो की सत्तर ऐशी वर्षांपूर्वी अमेरिकेतली परिस्थिती याहूनही भीषण असावी इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परस्परविरोधी नाही, पण "a figure that is growing by more than 2 million a year" अशा वाक्यांमुळे काही ठिकाणी फ्लिन इफेक्टची मर्यादा गाठली गेली आहे की काय ते तपासायला हवे असे वाटले. ७०-८० वर्षांपूर्वी परिस्थिती आणखी वाईट असणार हे नक्की, पण फ्लिन इफेक्टला मर्यादा असतीलच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला लेख..
काही प्रश्न पडतातः
१. ननिंनी वर विचारलंय त्याचंच एक्सटेन्शन. यंत्रांच्या येण्याने आपल्या अनेक सवयीत बदल झाले आहेत. इतकेच नाही तर स्मरणशक्तीवरही फरक पडला आहे. जसे आह्दी कोणतीही गोष्ट लिहिल्यानंतर, टाईपरायटरने टाईपल्यानं ती बदलणे कठीण होते. त्यामुळे लिहिण्याच्या आधी पूर्ण विचार करून लिहावे लागे. पुढे कंप्युटर आल्यावर आधी लिहुन घ्यावे आणि मग दुरुस्त्या करत बसाव्यात अशी लेखनाची पद्धत झाली. अर्थात लिहितानाच अचुक लिहिणे कमी होत गेले. कॅल्युलेटर आल्यावर पाढे वगैरेचे महत्त्व कमी झाले.
तर या यंत्रांचा बुद्ध्यांकावरही परिणाम झाला असेल का?

२. माणसाची प्रगती ही तंत्रज्ञानाची प्रगती आहे. किंवा माणसाची तंत्रज्ञान शोधण्याची प्रगती आहे असे अनेकदा म्हटले जाते. मात्र बुद्ध्यांकातील प्रगती ही त्या आरोपाला उत्तर म्हणावे का?

३. असे दिसते की वेगवेगळ्या भागातील व्यक्तींचे बुद्धांक वेगळे आहेत, तसे असल्यास काहि भागातील लोकांच्या बुद्धीचा अधिक विकास होऊन उत्क्रांत मानव तयार होणे शक्य आहे का? का एका टप्प्यावर बुद्ध्यांकातील घट अटळ आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरच्या प्रश्न क्र.१ वर मागे मिपावर एक चर्चा सुरू केली होती. तीला (एकदाचे) हुडकले. तिचा दुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जसे आह्दी कोणतीही गोष्ट लिहिल्यानंतर, टाईपरायटरने टाईपल्यानं ती बदलणे कठीण होते. त्यामुळे लिहिण्याच्या आधी पूर्ण विचार करून लिहावे लागे. पुढे कंप्युटर आल्यावर आधी लिहुन घ्यावे आणि मग दुरुस्त्या करत बसाव्यात अशी लेखनाची पद्धत झाली.

असेच म्हणता येईल, असे वाटत नाही. उलट, आता "लिहून झाले आहे ना (एकदाचे), मग आता दुरुस्त्या कशाला करत बसायच्या? वाचणारे (असलेच तर) सांभाळून घेतील हवे तर!" अशी लेखनपद्धती रुळू घातल्याचे दिसून येते.

उदाहरणार्थ, वरील परिच्छेदातच पाहिले असता 'आह्दी' हा शब्द प्रकर्षाने जाणवतो. एकदा प्रतिसाद लिहून झाल्यावर (किमानपक्षी उपप्रतिसाद येण्याअगोदर) हा शब्द दुरुस्त करणे अगदीच कठीण ठरले असते, याबाबत साशंक आहे. परंतु याची गणना 'नवीन लेखनपद्धती'च्या उदाहरणांत होऊ शकावी, असे वाटते.

अर्थात लिहितानाच अचुक लिहिणे कमी होत गेले.

अधोरेखित शब्दाकडे दुर्लक्षच करायचे जरी म्हटले, तरीही वरील विधान ही निष्काळजी लेखनाच्या या नव्याने रुळू घातलेल्या पद्धतीच्या वतीने प्रचंड रदबदली वाटते. 'कालाय तस्मै नमः' म्हणून या 'नव्या पद्धती'कडे दुर्लक्ष करणे एवढेच जरी आजकाल आपल्या हातात उरलेले असले, तरीही ते या पद्धतीचे समर्थन होऊ शकणार नाही, असे मनापासून वाटते. पण असो. "पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना", दुसरे काय?

तसेही, टाइपरायटरच्या जमान्यातसुद्धा (बोले तो, 'आजीआजोबांच्या काळात') बारीकसारीक चुका दुरुस्त करण्यासाठी तो एका विशिष्ट प्रकारचा चकतीच्या आकाराचा खोडरबर, झालेच तर 'करेक्शन फ्लुइड' वगैरे सुविधा उपलब्ध होत्याच, असे आठवते. शिवाय, छापील मजकुराच्या बाबतीतसुद्धा त्या जमान्यात मुद्रणपश्चात शुद्धीपत्रे वगैरे काढण्यास लोकांस फारशी लाज वगैरे वाटत नसे, असेही लक्षात आहे. (शेवटी माणूस आहे, चुका या व्हायच्याच. परंतु झालेल्या चुका या कितीही क्षुल्लक असल्या, तरी त्या लक्षात येता त्यांची शक्य तितक्या त्वरित दुरुस्ती करण्याकडे कल असे. मला वाटते, एक म्हणजे 'taking pride in one's work', आणि दुसरे, आपल्या चुकांपायी वाचकास तोशीस काय म्हणून पडू द्यावी, किंवा 'whatever is worth doing at all, is worth doing well', अशा काही प्रेरणा त्यामागे असाव्यात.) पण तेही एक असो. सांडून गेलेल्या दुधाबद्दल नि काळाच्या उदरी गडप झालेल्या गोष्टींबद्दल हळहळ करून काहीही साध्य होण्यासारखे नसते म्हणतात.

३. असे दिसते की वेगवेगळ्या भागातील व्यक्तींचे बुद्धांक वेगळे आहेत, तसे असल्यास काहि भागातील लोकांच्या बुद्धीचा अधिक विकास होऊन उत्क्रांत मानव तयार होणे शक्य आहे का? का एका टप्प्यावर बुद्ध्यांकातील घट अटळ आहे?

यातील दोन शब्दांचे अर्थ समजले नाहीत. (न समजलेले दोन्ही शब्द अधोरेखित केले आहेत.)

- 'बुद्धांक' म्हणजे नेमके काय? 'बुद्धाची मांडी' असा काही चमत्कारिक अर्थबोध यातून होतो. पण मग वेगवेगळ्या भागांतील व्यक्तींना बुद्धाच्या मांड्या कशा असू शकतील? की 'वेगवेगळ्या भागांतील व्यक्तींच्या लेखी बुद्धाचा कितवा नंबर (अंक) आहे' असे काही म्हणावयाचे आहे?

- 'बुद्ध्यांक' असा काही शब्द ऐकलेला नाही. थोडे डोके खाजवले असता, या शब्दाशी खूप ध्वनिसाधर्म्य असणारा 'बुद्ध्यंक' असा काही शब्द लक्षात येतो. ('बुद्धि' + 'अंक' = 'बुद्ध्यंक' असा काहीसा त्याचा संधिविग्रह असावा.) कदाचित हा शब्द त्या ठिकाणी अपेक्षित असावा काय?


तळटीपा:

तसेही, 'शुद्धलेखन हा केवळ बामणी कावा आहे, अन्यथा (खरे तर) त्याचे ((अन्य) कोणास) काही महत्त्व (असण्याचे कारण) नाही', असाही काही लोकप्रवाद तूर्तास (अगदी काही विद्वज्जनांतसुद्धा) प्रचलित आहेच. वस्तुतः, यात फारसे तथ्य असण्याबाबत साशंक आहे. कारण, एक तर अनेक ब्राह्मणांचेही शुद्धलेखन भीषण (atrociousकरिता चटकन सुचला तसा निकटतम मराठी पर्याय) असल्याचे व्यक्तिशः अनुभवलेले आहे. दुसरे म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते राम गणेश गडकर्‍यांपर्यंत अनेक अब्राह्मणांच्या लेखनातून यदाकदाचित चुकूनही कधी शुद्धलेखनाची चूक आढळली नाही, तर त्याचे श्रेय हे केवळ एखाद्या आगाऊ कंपॉझिटर/प्रूफरीडर/संपादकास जाते, हे पटावयास/पचावयास अंमळ जड जाते. पण लक्षात कोण घेतो?

, या संकल्पना आधुनिक मराठीतून मांडणे अंमळ कठिणच असावे बहुधा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पामराच्या कमी बुध्यंकाला अधोरेखीत करणारे टंकनदोष दाखवण्यासाठी इतके टंकनश्रम केल्याबद्दल मंडळ आभारी आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखन नि प्रतिसाद आवडले.

ज्ञानसंपादनाच्या बाबत विचार करताना अजून एक गोष्ट मला जाणवते : Awareness आणि skills यामधला फरक. एखादी व्यक्ती निरनिराळ्या विषयांमधलं वैविध्यपूर्ण ज्ञान संपादन करून आपला Awareness वाढवू शकेल. पण याचा अर्थ त्या व्यक्तीची skills वाढली किंवा तिने किमान काही skills आत्मसात केली असं होत नाही.

या दोन्ही प्रवृत्तींचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोनही भिन्न आहे असं वाटतं. आपल्या आजूबाजूचं जग, त्याचे निरनिराळे संदर्भ, त्या निरनिराळ्या संदर्भातलं आपलं स्थान आणि त्या संदर्भाशी असेले नातेसंबंध याबद्दलचा आपला Awareness कळत नकळत वाढत असतो. काही जणांचा कल गोष्टींच्या स्वरूपाचं आकलन करून घेण्याकडे असतो. skills आत्मसात करण्यामागे, ती अधिकाधिक वृद्धिंगत करत ठेवण्यामागे या जगातलं आपलं स्थान टिकवून धरणं, बळकट बनवणं, या प्रेरणा असल्याचं जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फ्लिन इफेक्टविषयी नुकतंच वाचन केलं होतं. त्यातले निष्कर्ष आठवतात त्यातून बुद्ध्यांकात वाढ होतानाच दिसते आहे - अगदी १९२० सालापासून, सर्व जगभर. असं असताना बुद्धिमत्तेचा ऱ्हास होतो आहे का? असं नकारात्मक शीर्षक का आहे ते कळलं नाही. लेखाचा स्वरही काहीसा निराशात्मक आहे. इतका की काही वाचकांचा 'बुद्ध्यांक कमी होतो आहे' असा समज झालेला दिसतो.

नव्वदीनंतर बुद्ध्यांक 'घटतोय' असं म्हटलं आहे आणि १९५० पासून वाढत आलेला आहे असंही म्हटलं आहे. या वाढ व घटीचं प्रमाण किती आहे यावर काही टिप्पणी करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुद्ध्यांक वाढतो आहे याचा अर्थ बुद्धीमापन चाचण्या काळानुरूप बदलल्या नाहीत हेच खरं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बुद्ध्क्यांक नकी कसा मोजतात?
.
(बुद्धू)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>आताची पिढी आपल्यापेक्षा नक्कीच जास्त शहाणी आहे. संगणक, मोबाइल, स्मार्ट फोन, आयपॅड, आयपॉड, टॅब्लेट पीसी, टीव्ही, केबल टीव्ही, स्मार्ट टीव्ही, HD टीव्ही, कार्टून्स, आकर्षक जाहिराती, वेगवान कार्सचे प्रकार, इत्यादीमुळे आजची मुलं जास्त स्मार्ट होत आहेत. त्यांच्या स्मार्टपणाचा अंदाज संगणकाच्या स्क्रीनवरील वैविध्यपूर्ण रचना, मोबाइल्सचे रिंगटोन्स, संगणक - मोबाइल प्रणालीतील गुण - दोष शोधण्याची कुशलता
[...]
व्हिडिओ गेम्स खेळत असताना दुसरी -तिसरीतील मुलंसुद्धा आई - वडिलावर सहजपणे मात करू शकतात.<<

ही सगळी उदाहरणं तंत्राधिष्ठित आहेत. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या पालकांना मोटार चालवता येत नसे, पण त्यांच्या मुलांना मोटार चालवता येई. म्हणजे बुद्ध्यांक वाढला असं म्हणता येईल का?

>>आजचा समाज बुद्धिमत्तेच्या बाबतीत फारच हळवा होत चालला आहे. जीवनोपयोगी समस्यांकडे पाठ फिरवून अमूर्त - काल्पनिक समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालत आहे.<<

बुद्धिमत्तेच्या बाबतीत हळवा म्हणजे काय? हळवेपणाचा पुढच्या वाक्याशी संबंध काय तेही समजलं नाही.

>>दृक् - श्राव्य माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांच्या आकलन क्षमतेत वाढ होत आहे.<<

कशाविषयीच्या आकलनक्षमतेत वाढ? माझा अनुभव याच्या विपरीत आहे. दृक-श्राव्य माध्यमांद्वारे मुलं जे पाहतात त्यात फार मोठं सपाटीकरण जाणवतं. त्यामुळे किंचित गुंतागुंतीच्या प्रतिमा दाखवल्या तर अनेक बारकावे लक्षातच येत नाहीत असं दिसतं.

>>अमूर्त स्वरूपातील जटिल समस्या हाताळण्याची चलाखी मुलांमध्ये आहे <<

म्हणजे नक्की काय? सैद्धांतिक गणितासारख्या क्लिष्ट विषयात मुलं अधिक रस घेत आहेत आणि त्यात अधिक सक्षम होत आहेत असं काही म्हणायचं आहे का?

>>हाच प्रश्न सिंगापूर व कोरिया या देशातील प्राथमिक शिक्षकांना विचारल्यावर अगदी वेगळीच प्रतिक्रिया ऐकावयास मिळाली. त्यांच्या मते विद्यार्थी फार प्रतिभावान आहेत. <<

म्हणजे नक्की काय? माझ्या मते न्यूटन किंवा आईनस्टाईन किंवा दा विन्ची प्रतिभावान होते. प्राथमिक शाळेतल्या मुलांमध्ये कसली प्रतिभा जाणवली?

>>परंतु नव्वदीच्या दशकानंतर इतर प्रकारापेक्षा दृक्-अवकाशीय प्रश्नांनाच योग्य उत्तर मिळू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्ध्यांकाचा ग्राफ खाली येऊ लागला.<<

[...]

>>यावरून बुद्धिमत्तेच्या वाढीला काही मर्यादा असू शकतात, हे प्रकर्षाने जाणवू लागले.<<

व्हिडिओ गेम्स फार खेळून असं होत असेल का? त्यातून बुद्धिमत्तेच्या वाढीच्या मर्यादा दिसतात हा निष्कर्ष कशावरून बरोबर आहे?

>>एक मात्र खरे की आर्थिक सुबत्ता व बुद्धिमत्ता यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते.<<

असं नक्की म्हणता येईल का? युरोपीय रनेसान्सच्या काळात तिथे एकाच वेळी व्यापारउदीमातून सुबत्ता वाढली आणि कलानिर्मिती आणि तंत्रज्ञानसुद्धा वाढीला लागलं असं म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूंच्या आक्षेपांशी सहमत. शेवटच्या आक्षेपाच्या पुष्ट्यर्थ म्हणून, भारतातील गुप्तकाळ, इस्लामचा सुवर्णकाळ, अशी अनेक उदाहरणे देता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपण उपस्थित केलेल्या शंकांचे समाधानकारक (व मुद्देसूद!) उत्तर देणे माझ्यासारख्यांकडून शक्य होत नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

माझा हा लेख काही वर्षापूर्वी वाचलेल्या सायंटिफिक अमेरिकनमधील एका लेखावर आधारित आहे. गेल्या काही वर्षात या विषयीच्या माहितीत भरपूर प्रमाणात भर पडली आहे, हे गूगल केल्यास नक्कीच जाणवेल. या संबंधातील काही दुवे - 1, 2 3 - मला श्रवणीय/वाचनीय वाटले.

पिढीतील वाढत्या अंतरामुळे शीर्षक व लेख कदाचित नकारात्मक वाटण्याची शक्यता आहे. बुद्धिमत्तेचा र्‍हास होत आहे का? ऐवजी आपण स्मार्ट होत आहोत का ? हे शीर्षक कदाचित सकारात्मक वाटले असते. परंतु जित्याची खोड ....... सुटत नाही, हेही तितकेच खरे.

याच संदर्भात आजच एक कविता फॉर्वर्डमधून मेल बॉक्समध्ये आली होती. ऐसी अक्षरेच्या वाचकांसाठी (व वाचून विसरून जाण्यासाठी!) ही कविता येथे देण्याचा मोह आवरत नाही.

विसरलो

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो I
समजत नाही,मी घडलो की बिघडलो? II
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो I
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो II

भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो I
धन जमा करताना समाधान विसरलो II
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो I
परिक्षार्थी शिक्षणात, हाताचे कौशल्य विसरलो II

टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो I
जाहिरातीच्या मार्‍यामुळे चांगलं निवडणं विसरलो II
गाडी आल्यापासून चालणं विसरलो I
मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो II

कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो I
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो II

संकरीत खाण्यामुळे पदार्थांची चव विसरलो I
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीची ढेकर विसरलो II
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो I
परफ्युमच्या वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो II

चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो I
जगाच्या भूगोलात गावाचा इतिहास विसरलो II

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो I
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो II
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो I
स्वतःमध्ये मग्न राहून दुसर्‍याचा विचार विसरलो II

सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो I
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो II

Transition stage मधून आपण जात असल्यामुळे असल्या कविता कवींना सुचत असतील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता छान आहे. ढकलपत्रातील असल्याने नेमकी कोणाची हा शोध न घेणेच इष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बुद्ध्यांक वाढतो आहे याचा अर्थ बुद्धीमापन चाचण्या काळानुरूप बदलल्या नाहीत हेच खरं....

न्यू यॉर्कर मधील माल्कम ग्लॅडवेलच्या एका लेखानूसार बुद्धीमापन चाचण्या कालपरत्वे बदलल्या जातात. लेखातील खालील उतारा पहा.

When an I.Q. test is created, he reminds us, it is calibrated or “normed” so that the test-takers in the fiftieth percentile—those exactly at the median—are assigned a score of 100. But since I.Q.s are always rising, the only way to keep that hundred-point benchmark is periodically to make the tests more difficult—to “renorm” them. The original WISC was normed in the late nineteen-forties. It was then renormed in the early nineteen-seventies, as the WISC-R; renormed a third time in the late eighties, as the WISC III; and renormed again a few years ago, as the WISC IV—with each version just a little harder than its predecessor. The notion that anyone “has” an I.Q. of a certain number, then, is meaningless unless you know which WISC he took, and when he took it, since there’s a substantial difference between getting a 130 on the WISC IV and getting a 130 on the much easier WISC.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवसापूर्वी सायंटिफिक अमेरिकनमधे एक लेख वाचला होता, त्यामधे आजकालच्या तरुणांना प्रौढ(जबाबदारी घेण्यास समर्थ) होण्यास पूर्वीच्या तरुणांपेक्षा जास्त वेळ लागतो ह्या नित्य तक्रारीवर विश्लेषण होतं, लेखानुसार पूर्वीच्या बहुतांश तरुणांना संधीच्या अभावी/परिस्थितीमुळे तरुण वयात/लवकरच जबाबदारी घ्यावी लागत असे, पण आज उपलब्ध असणार्‍या शिक्षणाच्या अनेक संधी किंवा व्यवसाय/पेशाच्या संधीमुळे रुढार्थाने जबाबदारी घेण्यासाठी वेळ मिळतो आहे, त्याचा अर्थ ते उशीरा प्रौढ(जबाबदारी घेण्यास समर्थ) होत आहेत असा काढणे गैर आहे. ह्या लेखाशी मी काही अंशी सहमत आहे, त्याच धर्तीवर बुद्धिमत्तेचा र्‍हास होत आहे की त्याचे मोजमाप बदलण्याची गरज आहे हे ठरवणे गरजेचे आहे.

अफाट माहितीच्या सहज-सोप्या उपलब्धतेमुळे नक्की मुलांच्या बुद्धिमत्तेचा र्‍हास झाला आहे किंवा माहितीच्या उपलब्धतेमुळे मुलांकडून असणार्‍या अपेक्षा वाढल्या व त्या पूर्ण न झाल्याने र्‍हासाचे लेबल लावले जात आहे किंवा हे दोन्हीही होत आहे हे तपासले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखानाबद्दल आभार!
न्यूझिलंड येथील जेम्स फ्लिन्न या राज्यशास्त्राचे प्राध्यापक याविषयी संशोधन करत आहेत. बुद्ध्यांक नेमके काय सुचवतात व काय सुचवत नाहीत याविषयी त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
जेम्स फ्लिन्न याचं बुद्ध्यांकाच्या संदर्भातील टेड टॉक,
Why our IQ levels are higher than our grandparents?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही.
उलट माझ्यासारख्या बर्‍याच माणसांना वाढत्या बुद्धीमत्तेचा (दुसर्‍यांच्या) त्रास होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिक्षणात बदल झाल्याने फरक हा पडणारच. भविष्यात काही लोक अत्यंत हुशार आणि अधिकांश मठ्ठ राहण्याच्या संभावना नाकारता येत नाही. पहिले सर्व डोक्यात लक्षात ठेवावे लागायचे. उदा: आमची पिठी. मी आज ही गुणा-भाग, जोड डोक्यातच करून घेतो. पण आज मुलांना केलकुलेटर शिवाय छोटा जोड ही करता येत नाही. सर्व काही कम्पुटरला माहित असल्या मुळे डोक्यात ज्ञान साठविणे कमी होत जाईल. परिणाम भविष्यात दिसेलच. अमेरिकेत हेच झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0