खजिना (७/८)

~~~मंदार~~~

मला नावामुळे आश्चर्यचकित व्हायला वेळ नव्हता. समोरून एक उंच, गोरी, टक्कल पडलेली व्यक्ती त्याच्या दारातून आमच्या दिशेने येत होती. तिच्या चेहर्‍यावर एका प्रकारचं तेज झळकत होतं. इतकंच नाही त्या व्यक्तीच्या डोक्यामागे संत, देव वगैरेंना दाखवतात तसे आभाचक्रही होते असा मला भास झाला - होत होता. त्यांना बघताच आमच्या बरोबरचे दोघेही शांतपणे विमानात निघून गेले. मी आणि मानकामे त्यांच्याकडे पाहत नुसतेच उभे होतो. ते जवळ आल्यावर दिसलं ते त्यांच्या शर्टच्या खिशावरील एक चिन्ह. ते काय लिहिलंय हे समजायचा प्रयत्न करावाच लागला नाही. मला एक जाणवले होते की मी या किल्ल्यात आल्यापासून मला ब्राह्मी वाचणं सोपं वाटू लागलं होतं. ते चिन्हही होतं ब्राह्मी लिपीतील "९" चं चिन्ह! इतकंच नाही ते निळ्या वर्तुळातील ब्राह्मी ९ चे चिन्ह कसलं आहे, कसली खूण आहे, त्याचीही मला कल्पना होती. पण इतक्यावेळा असल्या गोष्टींना हसण्यावारी नेल्यानंतर यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं.
"अरेच्या! ही तर नवरत्नांसाठीची खूण आहे" मी मनात म्हणालो.
"अगदी बरोबर!", समोरून येणारी व्यक्ती म्हणाली, "तुझ्या मनात म्हण किंवा मेंदूत म्हण जी माहिती समोर आली आहे ती बरोबर आहे. हे चिन्ह नवरत्नांचंच आहे आणि तुम्ही दोघे नवरत्नांपैकी एका रत्नाच्या समोर उभे आहात. मी आहे मानसशास्त्री देवप्रकाश कांबळे."
मला काय बोलायचे समजेना. माझ्या मनातील विचार समोरच्या व्यक्तीला समजले होते हे खरे होते. मी मानकामेंकडे पाहिले. त्यांना काहीच कळेना. ते म्हणाले, "म्हणजे? नवरत्न काय आहे?"
"या मंदारला माहीत आहे असे दिसते, हो ना रे?" कांबळेंनी विचारले
"मला जे माहिती आहे ते सत्य आहे की नाही हे माहीत नाही, पण जर त्यातले काहीही सत्य असले तर आज माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस असेल"
कांबळे फक्त हसले आणि म्हणाले, "चला आत जाऊ, वाटेत तुझ्या सरांना आमच्याबद्दल जितके माहिती आहे तितके सांग"
आम्ही मरुत्सखाकडे जाऊ लागलो. "सांगतो, पण याचं नाव मरुत्सखा म्हणजे हे शिवकर तळपदेचे विमान आहे का?"
"नाही, मात्र त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे विमान बनवले आहे." कांबळे सांगू लागले, त्यांना मानकामेंनी अडवले, "शिवकरची माहिती मंदारने दिली आहे, मात्र पुढे काही समजायच्या आधी नवरत्न काय भानगड आहे ते कळू दे"
मी सांगू लागलो, "सांगतो. कांबळे सर, काही चुकलं तर सांगा. तर, असं म्हटलं जातं की सम्राट अशोकाने ख्रि.पू.२७०च्या सुमारास एका गुप्त संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेत केवळ ९ व्यक्ती होत्या. त्या संस्थेबद्दल त्या ९ व्यक्ती आणि स्वतः सम्राट अशोक वगळता कोणालाही माहिती नव्हती. विविध ९ महत्त्वाच्या क्षेत्रातील अत्यंत पारंगत अश्या व्यक्तींना एकत्र करून त्याने ही संस्था स्थापली होती. या ९ जणांचं काम असं होतं की त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली उत्तमोत्तम व आधुनिकोत्तम माहिती एकत्र करून ९ ग्रंथांची निर्मिती करायची. त्या तज्ज्ञांचा अभ्यास इतका होता की त्यांनी हे ग्रंथनिर्मितीचे काम अवघ्या १२ वर्षांत संपवले. त्याच बरोबर त्यांना असेही जाणवले की या पुस्तकांतील ज्ञान हे काळापरत्वे बदलले पाहिजे इतकेच नव्हे तर काळाच्या पुढेच राहिले पाहिजे. दुसरे असे की हे ज्ञान सामान्यांच्या किंवा विध्वंसक शक्तींच्या हाती लागलं तर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी या ग्रंथांच्या संरक्षणाची जबाबदारीही पत्करली. जेव्हा जेव्हा अशोकाला कशासाठीही नवीनतम तंत्रज्ञानाची गरज होती तेव्हा तेव्हा तो थेट नवरत्नांना संपर्क करत असे. अशोकाच्या मृत्यूनंतर नवरत्नांनी आपले उत्तराधिकारी निवडण्याचे ठरवले वर हा वारसा नव्या नऊ व्यक्तींकडे आला. ही संस्था असल्याचे कोणालाही माहिती नव्हते. मात्र त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये नवीनतम गोष्टींची माहिती होती. असे म्हटले जाते की नवरत्नांची संस्था अजूनही कार्यरत आहे आणि गरज पडल्यास आधुनिक तंत्रज्ञान पुरवून भारताच्या संरक्षणाला सज्ज आहे. बरोबर ना?"
कांबळे म्हणाले, "जे सांगितलेस ते बरोबर फक्त थोडे अपूर्ण आहे. आपण आधी काही खाऊया, तुम्हालाही भूक लागलेली दिसतेय, मग विस्ताराने सांगतो. तुला अजून बरेच समजायचे आहे."

~~~मानकामे~~~

आम्ही त्या विमानात होतो. समोर जाऊन डावीकडे वळल्यावर पॅसेज होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला ६ अश्या एकूण १२ खोल्या रांगेत दिसत होत्या. त्यांच्यापुढून जात असताना मी पाहिले की त्यातील ९ खोल्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींची नावं होती. मंदारचं लक्षच नव्हतं. सातव्या खोलीवर कांबळेंचं नावही पाहिलं. कांबळे आम्हाला शेवटच्या खोलीत घेऊन गेले. खरंतर, मंदार आपणहून एका खोलीत शिरला होता आणि आम्ही मागून आत गेलो. तेथील वातावरण अगदीच अपरिचित होतं. एका बाजूला बंक-बेड होते. समोर एक फ्रीज होता. कांबळेंनी त्या फ्रीजवरची काही बटणे दाबली आणि आतून तीन पाकिटे बाहेर आली. त्यात वाफाळते पनीर रोल्स होते. आम्ही काहीही न बोलता ते खाऊ लागलो.
"आता हे रोल्स गरम कसे असा प्रश्न तुम्हाला पडला नसेल अशी आशा आहे. नाही असे यंत्र बाजारात नसले, तरी ते कसे बनले असेल याचा अंदाज करणे तितकेही कठीण नाही" कांबळेंनी हसत हसत विचारले. मी आणि मंदार इतके भांबावलेले होतो की अजिबातच हसू येईना. आम्ही ते रोल्स खात असताना काही वेळात कांबळे बोलू लागले.
"आपण खातोय तोवर थोडी अधिक माहिती सांगतो. हे खरे की, आम्हा नवरत्नांबाबत जनतेला माहिती नाही. मात्र आता तुम्हाला विश्वास ठेवायलाच हवा की ही नवरत्ने खरंच होती व अजूनही आहेत. मूळच्या किंवा पहिल्या नवरत्नांनीच इतके काही लिहून ठेवले आहे की त्यांनी केलेले प्रयोगच करून, त्यांत हल्लीच्या ज्ञानाने आलेले शहाणपण मिसळले तर उत्तमोत्तम प्रॉडक्ट्स तयार होत आहेत. आता हे विमानच घ्या. हे वैमानिक शस्त्रातील त्रिपुरा विमानावर बेतले आहे. बेतलेलं यासाठी की मूळ संहितेत आता अनेक बदल केलेले आहेत. मात्र आता हे विमान कोणत्याही तरंगांमुळेच काय, सद्यस्थितीत इतर मानवांना ज्ञात अशा कोणत्याही साधनांनी शोधता येणार नाही असे बनवले आहे. मात्र याचा मूळ ढाचा हजारो वर्षांपूर्वीच आपल्याला ज्ञात होता. तर सांगायची गोष्ट, इथे मानसशास्त्र, शरीरशास्त्र, जीवशास्त्र आणि जैविक तंत्र, रसायनशास्त्र, संवादशास्त्र - ज्याला तुम्ही कम्युनिकेशन किंवा टेलीकम्युनिकेशन म्हणता त्याच्या हे बरंच पुढे गेलेलं आहे, गुरूत्त्वशास्त्र - हे वैमानिक शास्त्र याचाच छोटा भाग आहे, खगोलशास्त्र आणि समाजशास्त्र या ९ शास्त्रातील जगातील सर्वोत्तम तज्ज्ञ काम करतात."
मी विचारलं "अरे वा मानसशास्त्रात मला प्रचंड रस आहे. मी मानसशास्त्राचा प्रोफेसर आहे."
"हं, मग मी तुमच्या मनात काय चाललंय हे समजतो असं म्हटलं तर तुम्हाला ते खरं वाटेल का?", कांबळे असं म्हणताच मी चमकलो. मला याची जाणीव येताक्षणीच झाली होती म्हणा. काहीही न बोलता मनात म्हणालो "कशाला खोटं बोलता राव!" आणि लगेच कांबळे म्हणाले "खोटं नाही हो, खरंच!"
मी गडबडलो. ते हसून म्हणाले, "घाबरू नका. हे मन म्हणजे केवळ आपला मेंदूच नव्हे तर मेंदूतील विशिष्ट जागा, जिथून "आतला आवाज", "मते" वगैरे तयार होतात. तर हा आवाज येत असताना एक प्रकारचे विद्युत तरंग आदेशाच्या रूपात सोडला जातो. कधी तो विचार बोलून दाखवणे मेंदूला गरजेचे वाटले तर तोंड, स्वरयंत्र वगैरेला आज्ञा जाते. मात्र इतरा वेळीही अश्या सूचना मेंदूबाहेर पडत असतातच. ते तरंग बाहेर पडणे म्हणजेच मनात विचार करणे. आणि त्यांना डिटेक्ट करू शकलात म्हणजे मनातील भावना डीकोड करणे तितकेही अशक्य नाही."
मी विचारलं, "मग इतक्या वर्षात तुम्हाला कोणीच शोधलं नाही?"
"हा हा! असं कसं होईल? प्रत्येकाकडून काही ना काही चुका कधी ना कधी होतच असतात. आता तुम्हीही इथे पोचलाच आहात की! जर इतिहासात डोकावलं तर सर्वात प्रसिद्ध आणि आमच्यासाठी सर्वात घातक घटना आढळते "पोप सिल्वेस्टर - तिसरा" याच्या नावावर. हा इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी, हा पोप भारतात आला होता. ख्रिस्ती धर्म हा त्या काळासाठी अगदी नवा आणि शांततामय कारणांसाठी सुरू झाल्यासारखा होता. अत्यंत उत्साहात बाहेर पडलेल्या प्रचारकांपैकी हा पोप तत्कालीन नवरत्नांच्या संपर्कात आला, त्यांच्याकडून त्याने काही महत्त्वाची तंत्रे शिकून घेतली होती, इतकेच नाही तर ती व्यवस्थित डॉक्युमेंट करून ठेवली. आताच्या "बायनरी विज्ञान" किंवा "डिजीटल विज्ञान" म्हणून प्रसिद्ध असणार्‍या तंत्रज्ञानाचा पाया भारतात तेव्हाच घातला गेला होता. त्याचा उपयोग करून त्याने एक यंत्र बनवले होते जे ख्रिस्ती धर्माविषयीचे प्रश्न समजून त्यांना "हो किंवा नाही" अशी उत्तरे देऊ शकत असे. शिवाय आधुनिक विज्ञानात ज्याला 'अर्निलरी स्पिअर' म्हणतात तो ही त्याने इथूनच शिकला होता. मात्र ती यंत्रे आम्ही जप्त करू शकलो तरी तो दस्तऐवज अजूनही व्हॅटिकन सिटीत बंदिस्त आहे असा आम्हाला संशय आहे. त्यानंतर अनेकांना विविध मार्गांनी आमच्याबद्दल सुगावा लागला होता, काही प्रमाणात माहितीही बाहेर गेली पण अजून तरी आम्ही आमच्याबद्दलची गुप्तता टिकवण्यात यशस्वी झालो आहोत."
"म्हणजे तुम्हाला काय काय करणे शक्य झाले आहे? आम्ही ऐकले आहे की तुम्हाला अणुऊर्जा आणि अणुबॉम्ब बद्दल खूप आधी माहिती होती" , मंदारने असे विचारल्यावर मी थक्कच झालो. माझे आश्चर्य चेहरा व्यक्त करत होता, पण कान कांबळे काय बोलतात त्याकडे लागले होते. ते म्हणाले, "होय हे खरे आहे. खरंतर पहिल्या नवरत्नांनाच नाही तर सम्राट अशोकाच्या बर्‍याच आधीपासून सिंधू खोर्‍यातील समाजाला याबद्दल तपशीलवार माहिती होती. मोहंजोदरो हरप्पा कसे नष्ट झाले असे तुम्हाला वाटते?"
मंदारने मान डोलवली. तो म्हणाला, "होय, हडप्पाच्या जवळच्या एका साईटवर जे सांगाडे मिळाले आहेत त्यांच्यात रेडियोअ‍ॅक्टिव्ह मटेरियल बरेच आहे आणि ही शहरे काही क्षणात पूर्ण वितळून पुन्हा लगेच गोठवल्यासारखी झाल्याचे सांगितले जाते. जे फक्त अणुबॉम्बनेच शक्य आहे; इतकेच नाही तर महाभारत, उपनिषदे, अनेक श्रुती महास्फोटाची वर्णने करतात ती अणुस्फोटाशी मिळतीजुळती आहेत. या खोर्‍यातील समाजाचा बराच मोठा भाग एका अणुयुद्धात मारला गेला असावा, सरस्वती नदीचे पाणीही म्हणूनच आटले असावे असे म्हणतात"
कांबळे म्हणाले, "तुझी माहिती अगदीच चुकीची नाही. आण्विक ऊर्जेचे तंत्रज्ञान त्या समाजाकडे होते, पण युरेनियमची उपलब्धता त्याप्रमाणात नव्हती. ब्रह्मपुत्र नद आणि सिंधू खोर्‍यातील काही उपनद्यांच्या खोर्‍यात हे युरेनियम मिळण्याचा संभव होता. ते तसे मिळालेही पण त्यामुळे वाढीस लागला तो फक्त द्वेष. त्यामुळे हे तंत्रज्ञान नवरत्नांनी लिहून तर ठेवले पण त्याविषयी आजतागायत रसायनशास्त्री सोडल्यास कोणीही बघितलेले नाही. इतर रत्नांनी देखील! मात्र, तुझी सरस्वती नदीची माहिती तितकीशी बरोबर नाही. आण्विक तंत्रज्ञान शोधण्यात नवरत्नांचा हात नव्हता. मात्र पुढे काही प्रोजेक्टसाठी कोणाच्याही नकळत अणुऊर्जा बनवायचा प्रश्न आला तेव्हा तत्कालीन नवरत्नांनी हे प्रोजेक्ट भूगर्भाखाली करायचे ठरवले. त्यासाठी लागणारे जड पाणी तयार करण्यासाठी या उपनदीचा प्रवाहच खाली वळवला गेला. अर्थात याचा उपयोग अजूनही वाळवंटात जगाला दाखवण्यापुरत्या अणुचाचण्या करताना आपल्याला होतो."
"म्हणजे भारताने ज्या चाचण्या केल्या त्यामागे तुम्ही होतात?"
"नाही. ती हल्लीच्या शास्त्रज्ञांचीच मेहनत आहे. आमच्याकडे अत्यंत गुप्तपणे रिपोर्ट्स येत ते आम्ही केवळ व्हेरिफाय करत असू जेणे करून होणार्‍या चाचणीत भारतीयांना अपाय पोचणार नाही. मात्र उद्या वेळ पडल्यास या बॉम्बपेक्षा कितीतरी अधिक प्रभावी आणि तरीही कमीत कमी जीवितहानी करणार्‍या मार्गांचा शोध आम्ही आधीच घेऊन ठेवला आहे. तुमच्या आधुनिक सॅटेलाईटला फसवणे तर अधिकच सोपे आहे. आता बघ, ही जागा सुद्धा सॅटेलाईट वापरून आहे तशी दिसत नाही"
हो हे खरं होतं. आम्ही इथे येण्यापूर्वी गूगल मॅप्स वरून किल्ल्यात काय आहे बघायचा प्रयत्न केला होता, पण इथे संपूर्ण भागात फक्त झुडपे माजलेली दाखवली होती.

मला आता चक्कर यायची बाकी होती. हे काय चालले होते? मी स्पप्नात तर नव्हतो ना? ही नवरत्ने काय, सिंधू खोर्‍यांतील प्रगत विज्ञान काय मला एरवी कोणी सांगितले असते तर मी त्यांना वेड्यात काढले असते. पण ते आता शक्य नव्हते. आमचे खाऊन संपले होते. इतक्यात कांबळे म्हणाले," तो समोरच्या स्क्रीनवर माणूस दिसतोय तो तुमचा परिचित आहे?"

~~~मंदार~~~

मानकामेंनी समोरच्या स्क्रीनवर पाहिलं आणि ते मोठ्याने ओरडलेच, "साळवी!"
समोरच्या स्क्रीनवर साळवी दिसत होते, त्याच्या बरोबर आणखी दोन व्यक्ती उभ्या होत्या आणि त्यांच्यामागे 'ती' चमकती काठी घेतलेले दोन 'सैनिक'. साळवींच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्ती अंधारात नीटशा दिसत नव्हत्या.
कांबळे म्हणाले, "ओह! साळवी! ते अजून जिवंत आहेत? मला वाटलं की ते झाडीतल्या बाणांनी मेले. त्या बाणाच्या टोकावरच्या सेन्सर्सने आम्हाला त्यांचे रक्त आणि मांस डिटेक्ट झाल्याचे कळवले होते."
"नाही. ते बाण केवळ घासून गेले होते." मानकामे बोलले.
"तुमच्या मित्राला म्हणावं, आता इथे शांतपणे ये, उगाच हंगामा नको", कांबळे म्हणाले
त्यातील गर्भित धमकी न समजण्याइतके आम्ही लहान नव्हतो. मानकामे पुढे झाले आणि कांबळेंनी खूण केलेल्या यंत्राकडे बघून बोलू लागले, "साळवी! ऐकू येतंय?"
"मानकामे! कुठे आहात तुम्ही?"
"मी आहे, किल्ल्यातच आहे. मी जिथे आहे त्याबद्दल तुम्हाला सांगायचं तर बराच वेळ जाईल. तुम्ही सांगा तुम्ही कुठे होतात?"
"सांगतो. तुम्ही सखुच्या मागे गेल्यावर मी ती आली त्यावाटेने गेलो. तेथून काही वेळ चालल्यावर एक कमान लागली आणि त्यापुढे तिबेटी लोकांची पुण्यचक्रे असतात तशी होती. मी आपल्या अनुभवावरून त्याच्या पुढे गेलो नाही. दगड टाकून पाहिला तर कमानीच्या खाली दलदल होतीच. मी वाट पाहत थांबलो. मात्र मला इथे ज्या व्यक्ती भेटल्या आहेत त्यांना भेटलात तर..."
"आणि तिथेच आमच्या लोकांनी त्यांना पकडलं" कांबळे घाईघाईने मध्येच बोलले.
माझं तिथे लक्षच नव्हतं. तिबेटी पुण्यचक्र बघून, मला बराच वेळ सतावणारी शंका बोलून दाखवली. "हे तिबेटी, बौद्ध लिपीचं काय प्रकरण आहे?"
"प्रकरण कसलं आलंय त्यात, आमच्या या विमानांचे गुप्त अड्डे तिबेटमध्येच होते - आहेत. चिनी सरकारला तिबेट हवे असायचे सर्वात प्रमुख कारण हे आहे. परंतु अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने गोबीच्या वाळवंटात दूरगामी ठिकाणी असणारे आमचे तळ त्यांना मिळणं सध्यातरी अशक्य आहे. इतरत्र मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून मानवी वस्तीच्या, ल्हासा सारख्या शहरांच्या जवळचे सगळे तळ आम्ही बंद केले आहेत. हिमालयात दूरगामी असणार्‍या मॉनेस्ट्रीज उगाच बांधलेल्या नाहीत, इतकेच नव्हे तर ही पुण्ययंत्रे इथे जरी पासकोड तयार करायला वापरत असलो तरी इतरत्र त्यांच्या फिरण्यातून आमच्या तळघरांना ऊर्जा मिळत असते. गेल्या आठवड्यात आपल्या सीमेवर काही UFO बघितल्याची बातमी तू ऐकली असशीलच. ती आम्ही एक हवाई तळ रिकामा करत होतो. तिथे काही जुनी विमाने होती. चारेकशे वर्षांपूर्वीची. पण हल्लीच्या विमानांपेक्षा प्रगत. पण त्यावेळी सध्याचे तंत्रज्ञान नसल्याने, ती काहींना दिसली."
"मंदार! ते तुला असेच गुंतवून ठेवतील. त्यांना तू हवा आहेस!" अचानक साळवी ओरडले.
मला काही कळेना "काय?"
"साळवींना घेऊन या!" कांबळेंनी त्या 'सैनिकांना' आज्ञा केली.
"मंदार सावधान, नीट बघ माझ्याबरोबर कोण आहे." तोवर ते सैनिक साळवींना ढकलू लागले होते. ते पुढे येताच त्यांच्या काठ्यांच्या प्रकाशात ते दुसरे दोन चेहरे दिसले आणि आता ओरडायची पाळी माझी होती, "आई-बाबा! तुम्ही?"

(क्रमशः)
इतर भागांचे दुवे: - - - - - - -
श्रेयअव्हेरः सदर कथेतील पात्रे, स्थळे ही पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष व्यक्ती अथवा स्थळांशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

कसली भारी आयडीआची कल्पनाय! सत्य आणि मिथक यांच एवढं बेमालुम मिश्रण केलय की नक्की वेगवेगळ करता येत नाहीय. da vinci code प्रमाणे. मस्तच! पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही हा भाग वाचतांना विंची कोडचीच आठवण होत होती. सत्य आणि कल्पनेचं मिश्रण अगदी मस्तच! आता शेवटाचा भाग वाचून रहस्य सुटायची उत्सुकता वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

सगळ्याच प्रतिसादकांचे आभार.
@स्मिता, अस्मिता: मात्र तुम्हा दोघींचे प्रतिसाद वाचुन मला विशेष आनंद झाला आहे. हे कथाबीज डोक्यात येऊन वर्ष झाले असेल. मात्र ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी डा-विंची नंतर नसले तरी डॅन ब्राऊन वाचतानाच "हे आपल्याकडे का नाही?" अशा बंडखोर विचारांतूनच आलेले होते ;).
मात्र कोणत्यातरी वाचकाला डा-विंचीची थोडी आठवण झाली हे बघुनच खुश झालो आहे Smile

अनेक आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता उत्कंठा बरीच वाढली आहे,
आई ,बाबांची एन्ट्री एकदम अनपेक्षित...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्च्या
एकदम अनपेक्षित वळण

लवकर टाका पुढचा भाग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

"आमचे पूर्वज किती हुशार होते" याचं वर्णन इथे वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं. फिक्शनमधे चालायचंच. मागच्या भागात रहस्यभेद व्हायला सुरूवात होत्ये असं वाटलं होतं, पण हे काहीतरी नवीनच सुरू केलं आहेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

का ओ बिच्चारे आमचे पूर्वज, फिक्शनमध्ये तरी भारी असू द्या की हो त्यांना, काय हे, शिव शिव शिव.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प.वि.वर्तकांपेक्षा जास्त रंजक लिहीण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतो आहेच.
सार्‍या भागांवर मिळून एकत्रच प्रतिसाद देइन म्हणतो शेवटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars