नकोच शिवबा, जन्म इथे तू पुन्हा कधी घेऊ -

नकोच शिवबा, जन्म कधी तू पुन्हा इथे घेऊ
कर्तव्याची नाही जाणिव, जयघोषातच दंगुन जाऊ

नाही येथे कुणी जिजाऊ- शिकवण्यास बाळा
म्हणती भाऊ तरि ते टपले दाबण्यास रे गळा ,

येथ जाणती बळ एकीचे जरी सर्व लोक
गडबडती स्वबळावर जगण्या कोपऱ्यात नेक -

शिवबा, तुजसाठी जगणारे संपले मर्द मावळे
आता उरले येथे सारे संधीसाधू डोमकावळे ,

पायपोस तो कुणास नाही उरला कुणाचा आता
सत्तेसाठी केवळ सारा आटापिटा पहाणे आता !

जन्मलास जरी आता शिवबा, इथल्या तू भूवरी
सिंहासन तव तुजसाठी नुरले हपापलेले भारी

ऐकू येते डरकाळी शिवबाची नुस्ती सगळीकडे
फलकावर झळकणे ध्येय तुजवाचुन नेत्याचे इकडे

म्हणतो आहे जो तो येथे, मी शिवबाचा अनुयायी
खुर्ची सत्ता पदप्राप्तीस्तव रोज होई लढाई

हद्दपार तू कधीच झाला, त्यांच्यातुन तू खरा
"माझा शिवबा" म्हणून उरला साऱ्यांचा नखरा

तुझ्या जयंत्या होत साजऱ्या वेगवेगळ्या दारा
मनातुनी मी करतो शिवबा, तुजला मी मुजरा !
.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

असं नका ना म्हणू! कवितेत दाखवलेली परिस्थिती सुधारायची असेल तर आजच खरी 'शिवबांची' जरुर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0