सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ७)

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग १)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग २)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ३)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ४)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ५)
सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग ६)
पहिल्या काही हजार पिढ्यांमध्ये सर्वच गोत्रांमध्ये इ कोलायचं आकारमान वाढलेलं दिसलं. ते का वाढलं? यावर मी अंदाज व्यक्त केला होता की आकार वाढणं ही त्या पर्यावरणात तग धरून रहाण्यासाठी चांगली गोष्ट असावी. पण हा अंदाज सिद्ध करण्यासाठी आकारमान वाढलं इतकंच निरीक्षण पुरेसं नाही. कारण हा बदल होऊन निर्माण झालेले नवीन जीव हे आधीच्या जीवांपेक्षा टिकून रहाण्यासाठी सक्षम आहेत हे सिद्ध करणं सहज शक्य नसतं. उत्क्रांतीचे बदल हजारो वर्षांच्या कालावधीत होतात. त्यातही पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती सारखीच असण्याची शक्यताही कमी असते. त्यामुळे या अतिप्राचीन पूर्वजांशी आत्ताच्या त्यांच्या वंशजांशी स्पर्धा घेऊन ते सिद्ध करणं एरवी शक्य नसतं. पण लेन्स्कीच्या या प्रयोगात तशी सोय होती. बॅक्टेरियांची खासियत म्हणजे ते गोठवून ठेवता येतात. पुन्हा सामान्य तापमानाला आले की जणू काही इतके महिने गेलेच नाहीत अशा थाटात ते पुन्हा जगायला लागतात. त्यामुळे आजच्या पिढीतले बॅक्टेरिया त्यांच्या दोन हजार पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांशेजारी ठेवता येतात. लेन्स्कीच्या प्रयोगात अशा अनेक पिढ्या वेळोवेळी गोठवून ठेवलेल्या असल्याने ही तुलना त्याला करता आली.

उजवीकडच्या आलेखात या तुलनेचा सारांश आहे. क्ष अक्ष नेहमीप्रमाणेच कुठची पिढी हे दर्शवतो. य अक्षावर आहे रिलेटिव्ह फिटनेस - किंवा त्या पर्यावरणातल्या स्पर्धेत टिकून रहाण्याची तुलनात्मक क्षमता. टिकण्याची क्षमता ही अनेक गुणधर्मांवर अवलंबून असते. एखाद्या प्राण्याला किती भराभर पिलं होतात, एका वेळी किती होतात यावरून लोकसंख्या किती वेगाने वाढू शकतं हे ठरतं. खूप पिलं खूप भराभर होणं हे नेहमीच चांगलं असतं असं नाही. त्यातली टिकून किती रहातात, आणि पुढच्या पिढीला जन्म किती घालतात हेही महत्त्वाचं ठरतं. पिलं टिकवून ठेवायची तर अन्न मिळवण्याची क्षमतेचाही विचार करावा लागतो. या सगळ्या वेगवेगळ्या घटकांच्या परिणामांमुळे एखाद्या प्राण्याच्या फिटनेसची ऍब्सोल्यूट किंमत काढणं कठीण असतं. पण एकाच प्रजातीच्या दोन गटांची तुलना करणं मात्र तितकं कठीण नसतं. समांतर उदाहरण द्यायचं झालं यावर्षी गव्हाची किंमत किती असावी? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. कारण ती किंमत निश्चित करण्यात अनेक बाबी अंतर्भूत असतात. मात्र २००४ च्या तुलनेत २०१० साली गहू किती पट महाग होता हे शोधून काढणं खूपच सोपं आहे. कारण यात फक्त तुलनात्मक (relative) फरक किती आहे एवढंच तपासायचं आहे. ती किंमत ठरवण्यात येणारे बाकीचे सर्व घटक दोन्हीमध्ये समान असल्यामुळे ते छेदात आणि अंशात दोन्हीत येतात. उरतो फक्त गव्हाच्या महागाईचा निर्देशांक. या आलेखात दाखवलेले आकडे असेच तुलनात्मक फिटनेसचे आकडे आहेत. म्हणजे समजा पिढी क्रमांक १०० ही पिढी क्रमांक १ च्या तुलनेत किती अधिक कार्यक्षम किंवा 'फिट' होती याची किंमत काढता येते. गोठवलेले पिढी क्र. १ आणि पिढी क्र. १०० चे बॅक्टेरिया एकाच पेट्रिडिशमध्ये वाढवायचे. कुठचे बॅक्टेरिया किती प्रमाणात वाढतात हे तपासून पहायचं (यासाठी ते वेगवेगळे रंग दाखवू शकतील याची सोय आधीच केलेली होती). आणि त्यानुसार १०० व्या पिढीची क्षमता पहिल्या पिढीच्या किती पट आहे तो आकडा नोंदवायचा. असं अनेक पिढ्यांसाठी केलं की पिढीनुरूप आलेख मिळतो.

या आलेखावरून हे स्पष्ट होतं की जसजसे आपण पुढच्या पिढ्यांकडे जातो तसा आपल्याला फिटनेस सर्वसाधारणपणे वाढताना दिसतो. आलेखातल्या बिंदूंमधून एक पायऱ्यापायऱ्यांनी चढत जाणारी रेषा दाखवली आहे. ही या आलेखाची बेस्ट फिट. आपल्या युक्तिवादासाठी या पायऱ्या आहेत की नुसताच चढत जाणारं, पायऱ्यांचा भास असणारं काही फलन आहे हे तूर्तास तितकंसं महत्त्वचं नाही. (त्याविषयी काही चर्चा पुढच्या भागात होईल) महत्त्वाची गोष्ट अशी की पर्यावरण स्थिर असल्यावर दर पिढीत नवीन जन्माला येणारे प्राणी हे आधीच्या पिढीपेक्षा त्या पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेण्यात काकणभर सरस असतात. याचा अर्थ असा नाही, की नवीन पिढीतला प्रत्येक प्राणी हा आधीच्या पिढीतल्या प्रत्येक प्राण्यापेक्षा अधिक सक्षम किंवा फिट असतो. सरसपणाचं विधान विशिष्ट प्राण्याला लागू होत नसून त्या गटाच्या सरासरीला लागू पडतं. त्यातही लगेच एका पिढीत ताबडतोब हा बदल दिसेलच असं नाही. अधिक सक्षम असल्याचे परिणाम अनेक पिढ्यांनंतर दिसून येतात. या आलेखातही दोन हजार पिढ्यांमध्ये सक्षमता सुमारे २५% नी वाढलेली दिसते. म्हणजे दर पिढीला सरासरी फरक ०.०१% इतकाच फक्त.

गेल्या भागात जी निरीक्षणं मांडली होती त्यात केवळ 'पुढच्या पिढ्या बदललेल्या दिसतात' इतपतच निष्कर्ष काढता येत होता. या तुलनांमधून 'पुढच्या पिढ्या अधिक सक्षम झालेल्या दिसतात' हे म्हणता येतं. एकाच चित्राकडे बघण्याचे हे दोन दृष्टिकोन आहेत. आपल्या डोंगर आणि चेंडूंचं उदाहरण परत घेऊ. समजा आपल्याला डोंगर, उतार, गुरुत्वाकर्षण याबाबत काहीही माहिती नाही. आपण या चेंडूंकडे समजा वरून (इंजिनियरिंगच्या भाषेत टॉप व्ह्यू मध्ये) बघितलं तर आपल्याला काय दिसेल? चेंडू केंद्रापासून दूर दूर सरकताना दिसतील. म्हणजे एखादी प्रजाती ज्या ठिकाणी होती, त्यापेक्षा कालांतराने बदललेली दिसेल. पण हा बदल का होतो हे आपल्याला पुरेशा अचूकपणे सांगता येणार नाही. बदलांमागचं कारण केवळ 'इतका बदल झाला' यातून मिळत नाही. त्यासाठी त्याच प्रक्रियेकडे दुसऱ्या कोनातून बघावं लागतं. टॉप व्ह्यू मध्ये केंद्रापासून लांब जाणारे चेंडू साइड व्हयूमधून पाहिलं तर वेगवेगळ्या उतारांवरून जाताना दिसतील. मग आपल्याला असं म्हणता येईल की डोंगरमाथ्यापासून लांब नेणारं बल नसून, वरून खाली नेणारं एक बल कार्यरत आहे. आणि चेंडू किती वेगाने आणि कुठपर्यंत खाली जातात हे त्या उताराच्या आकारावरून ठरतं. डोंगरमाथा = मूळ प्रजाती, अंतर = प्रजातीत झालेला बदल, खाली खेचलं जाण्याची प्रक्रिया = अधिक सक्षम प्राणी पुढच्या पिढ्यांमध्ये अधिक प्रमाणावर जाण्याची प्रक्रिया (नैसर्गिक निवड) ही एकास एक संगती लावली की चित्र स्पष्ट होतं. मग ही दोन निरीक्षणं एकत्र करून आपल्याला म्हणता येतं 'पुढच्या पिढ्यांच्या शरीरांमधले दिसून येणारे बदल हे त्या परिस्थितीत जगायला अधिक सक्षम करणारे असतात'. हे तत्त्व थोडक्यात सांगायचं झालं तर 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट'.

'सर्व्हायव्ह ऑफ द फिटेस्ट' या वाक्यात एवढा सगळा अर्थ अभिप्रेत आहे. दुर्दैवाने थोडक्यात सांगण्याच्या सोयीसाठी या सर्व अर्थाचा गुंतवळा मागे रहातो. त्यामुळे अनेक गैरसमज असतात. 'सक्षम टिकून रहातात' यातून 'केवळ सक्षमांनीच टिकून रहावं, आणि दुर्बळांनी नष्ट व्हावं ही निसर्गाची इच्छा आहे' असा काहीसा अर्थ काढला जातो. मग 'निसर्गाची इच्छा' म्हणजे आपल्यापेक्षा कोणातरी वरच्या शक्तीची इच्छा अशा थाटात ते मांडले जातात. दुर्दैवाने त्या वाक्याचा अर्थ इतका गहन मुळीच नाही. किंबहुना सक्षमतेची व्याख्याच 'टिकून रहाण्याची क्षमता' अशी आहे. त्यामुळे खरा अर्थ 'टिकून रहाण्याची क्षमता असलेले अधिक टिकतात' इतका साधा आहे. मग या वाक्यात विशेष आहे तरी काय? असं काय आहे की ज्यायोगे या तत्त्वामुळे सजीवांमध्ये बदल घडताना दिसतात? याचं उत्तर एका शब्दात देता येतं - पुनरुत्पादन.

हे कसं होतं हे तपासून बघण्यासाठी आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊ. समजा एका प्रजातीचे काही प्राणी विशिष्ट बेटावर रहात आहेत. या बेटावर त्या जातीच्या २०००० प्राण्यांना जगता येईल इतका अन्नाचा कायमचा पुरवठा आहे. त्यांमधल्या १०००० प्राण्यांमध्ये कुठचातरी क्ष गुणधर्म आहे तर इतर १०००० प्राण्यांमध्ये य गुणधर्म आहे. हे दोन गुणधर्म काय आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. असंही गृहित धरू की त्या प्राण्यांना टिकून रहाण्यासाठी (पुढची पिढी निर्माण करण्यासाठी) क्ष गुणधर्माचा य गुणधर्मापेक्षा अगदी किंचित फायदा होतो. समजा तो अगदी नगण्य आहे - ०.०१%. लेन्स्कीच्या प्रयोगात दिसलेल्या फायद्याप्रमाणेच. याचा अर्थ आत्ता क्ष आणि य मधलं विभाजन समसमान असलं, तरी पुढच्या पिढीत क्ष असलेले १०००१ असतील, तर य असलेले ९९९९ असतील. त्याच्या पुढच्या पिढीत क्ष आणि य चं विभाजन १०००२: ९९९८ असेल. हीच प्रक्रिया सुरू राहिली तर सुमारे सात हजार पिढ्यांत य गुणधर्म असलेले नामशेष होतील.

लेन्स्कीच्या प्रयोगात नैसर्गिक निवडीचं तत्व सिद्ध होताना दिसलेलं आहे. विशिष्ट पर्यावरणात, जिथे अन्नाची उपलब्धता ही चक्रीय असते (भरपूर उपलब्धतेतून प्रथम प्रचंड लोकसंख्यावाढ आणि मग चणचणीतून लोकसंख्येचं स्थिरावणं) तिथे त्या परिस्थिती टिकून रहाण्यासाठी आवश्यक असलेले गुणधर्म निवडले जातात. शरीराच्या आकारमानातून टिकाव धरण्याची क्षमता नक्की कशी वाढते हे मला स्वतःला माहित नाही - कदाचित अन्न साठवून ठेवणं, आणि त्यामुळे उशीरापर्यंत तग धरणं त्यातून होत असेल. पण गुणधर्मांमधले बदल, आणि त्याबरोबरच येणारी टिकावक्षमतेत झालेली वाढ ही हातात हात घालून जाताना दिसलेली आहे. नुसत्या बदल होण्याच्या निरीक्षणातूनच 'देवाने निर्मिती केली' या कल्पनेला धक्का पोचतो. पण ते बदल होण्याची कारणपरंपरा मांडता आली की 'देव चराचराची यंत्रणा चालवतो' या कल्पनेलाही तडा जातो. गुरुत्वाकर्षणाने एखादी वस्तू खाली यावी यात आपल्याला चमत्कृतीपूर्ण काहीच वाटत नाही. तितक्याच निश्चितपणे, आणि नियमितपणे नैसर्गिक निवडीतून प्राण्यांमधले गुणधर्म बदलतात, आणि अनेक पिढ्यांनंतर ते बदलून वेगळीच प्रजाती तयार होते. पुनरुत्पादन आणि नैसर्गिक निवड या दोन गोष्टींतून अस्तित्वात असलेल्या गुणधर्मांमध्ये निवड होते आणि हे बदल वस्तू घरंगळत उतारावरून खाली जावी तितक्याच नैसर्गिक रीतीने होतात. त्यासाठी कुठच्याच बाह्य शक्तीची आवश्यकता नाही.

या प्रयोगांतून हे सगळं इतकं स्पष्ट होतं म्हणूनच श्लाफ्लीने लेन्स्कीशी भांडण उकरून काढलं. जेव्हा मूळ विदा असिद्ध करता येत नाही तेव्हा हा प्रयोग करणाराच्या प्रयत्नांत कोलदांडा घालण्याचा प्रयत्न केला. त्याला कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात गाडून टाकायचं, किंवा शक्य झाल्यास 'हॅं, हे कसले वैज्ञानिक, यांनी तर विदासुद्धा द्यायला नकार दिला!' असं म्हणता यावं यासाठी वकिली चाल खेळली. पण त्याला कारणीभूत असलेली भीती उघड आहे - इंटेलिजंट डिझायनर थिअरी या विद्याच्या वादळात कस्पटासारखी उडून जाते. आणि ती भीती दिसते यातूनही लेन्स्कीचे प्रयोग किती सामर्थ्यशाली आहेत याचा अंदाज येतो.

आकारमान वाढीची आणि त्याचबरोबर सक्षमतेच्या वाढीची निरीक्षणं अवाक करणारी असली तरी लेन्स्कीच्या प्रयोगात याहूनही धक्कादायक - आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या. त्यामुळे इंटेलिजंट डिझायनर थिअरीचा पाय असलेली 'इर्रिड्यूसिबल कॉंप्लेक्सिटी'ची कल्पनाच निरर्थक ठरते. त्याविषयी पुढच्या भागांत.

(क्रमशः)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखमालिका सुंदर सुरु आहे. हा भाग अधिकच आवडला. डाँगरमाथ्याच्या त्यात उदाहरणाचा अर्थ अधिक व्यवस्थित समजला.
इतर मालिकांप्रमाणे हीसुद्धा वाचनखूण करुन ठेवत आहे.
( अवांतर :- ऊर्जा , प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग संदर्भातील लेखमाला पूर्ण व्हायची आहे असे वाटते. त्याबद्दल अधिकही लिहिता येइल की.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नवीन आलेले दोन्ही भाग वाचले. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

उत्तम.

वाचते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचत आहे.

अवांतर -
'महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती'. ( परिस्थितील बदल काळाच्या दृष्टीने अत्यंत मंदगतीने होत असेल तर सर्वात जास्त उत्क्रांत झालेले जीव आणखी वेगाने उत्क्रांत होतात.) पण जर परिस्थितीत अचानक मोठे बदल झाले तर सर्वात जास्त उत्क्रांत जीव सर्वात लवकर नष्ट होतात.

हे खरे आहे का?
याबाबत या प्रयोगात काही प्रयोग झाले आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बदल म्हणजे काय, किंवा लहान बदल आणि मोठे बदल यांच्यातला फरक कसा करायचा हा कठीण प्रश्न आहे. महापुरात झाडं जातात, आणि लव्हाळी वाचतात हे खरं असलं तरी दुष्काळात झाडं टिकतात, तर लव्हाळी मरतात. कुठच्याही विशिष्ट काळी प्रत्येक प्रजातीने पर्यावरणातला एक कोपरा किंवा एक खास जागा (niche) व्यापलेली असते. आणि हे कोपरे स्वतंत्र असले तरी अनेक बाबतीत सामायिक असतात. उदाहरणार्थ, सिंह हा हरणं खाऊन जगणारा प्राणी आहे, तर हरीण हा गवत खाऊन जगणारा प्राणी आहे. एका अर्थाने सिंह हा हरणं व गवत या दोन्हींवर अवलंबून असतो. असं असलं तरी दोघेही हवा आणि पाण्यावर अवलंबून असतात. याउलट झाडं जमिनीवरच्या पाण्याच्या साठ्यावर अवलंबून नसतात. जर दुष्काळ पडला तर झाडं टिकाव धरू शकतात, तर हरणं आणि सिंह ताबडतोब मरतील. त्यामुळे एका विशिष्ट बदलाचा परिणाम कुठच्या प्रजातीवर किती होतो हे ती प्रजाती किती उत्क्रांत आहे यापेक्षा झालेल्या बदलावर किती प्रमाणात अवलंबून आहे यावर जास्त ठरतं.

हे म्हटलं तरीही उत्क्रांत होण्याच्या दराबाबत तुमचा एक मुद्दा बरोबर आहे. कोण टिकून रहातं, किंवा कोण लवकर बदलू शकतं यामागे व्हेरिएबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची असते. तसंच त्यांचा पर्यावरणाचा खळगा किती खोल आहे, आसपास इतर खळगे आहेत का यावरही ठरतं. आपल्या चेंडूच्या उदाहरणाचा विचार करायचा झाला तर चेंडू जिथे स्थिरावतो तो खड्डा हा एक पोटेन्शियल मिनिमम असतो. पर्यावरणातले बदल म्हणजे या डोंगराच्या आकारातच होणारे बदल. भरपूर खोल खड्ड्यात जर थोडेसेच चेंडू असतील तर ते कदाचित गाडले जातील. खूप चेंडू (व्हेरिएबिलिटी) असतील तर खड्डा बदलताना काही पलिकडच्या, नवीन तयार होणाऱ्या खड्ड्यात पोचू शकतील.

कोण किती उत्क्रांत आहे हे मोजणं तसं कठीण आहे. झाडाच्या उदाहरणावरून तुम्हालाही उत्क्रांतीची पातळी म्हणण्याऐवजी रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटीविषयी म्हणणं मांडायचं असावं. याबद्दल अर्थातच संशोधन झालं असावं, पण खूपच तांत्रिक असल्यामुळे मला त्याबद्दल माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्लेक्झिबिलिटी हाच मुद्दा होता. शक्यतो अन्नसाखळीच्या सर्वात वरच्या कडीवरचे जीव हे जास्तीत जास्त उत्क्रांत झालेले असतात आणि त्यामुळे पर्यावरणातील मोठ्या बदलाने ते नष्ट होण्याची जास्त शक्यता असते.(उदा. डायनोसॉर इ.)हा हायपोथिसिस आपण वर्णन केलेल्या प्रयोगात सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला काय? ईकोलाय जीवाणूंची एक अतिप्रगत पिढी आणि एक त्यामानाने अप्रगत पिढी घेऊन त्यांच्या पर्यावरणात बदल करून असे करून बघता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अचानक" झालेल्या बदलास जो जास्त प्रतिकूल असेल त्याचा जास्त विनाश होईल. उत्क्रांतीच्या कोणत्या पायरीवर तो आहे यापेक्षा उत्क्रांतीने झालेले बदल जास्त अनुकूल का प्रतिकूल यावर हे ठरेल असे वाटते.

डायनासोर यांचा विनाश पर्यावरणाच्या अचानक बदलाने (अन्नाची कमतरता?) झाला का एखाद्या नैसर्गिक आपत्तीने (http://news.nationalgeographic.com/news/2003/03/0307_030307_impactcrater...) झाला याबाबत अजूनही शंका आहेत(?).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ईकोलाय जीवाणूंची एक अतिप्रगत पिढी आणि एक त्यामानाने अप्रगत पिढी घेऊन त्यांच्या पर्यावरणात बदल करून असे करून बघता आले असते.

फ्लेक्झिबिलिटी हा शब्द दोन अर्थाने येतो आहे. एक म्हणजे विशिष्ट प्राण्याच्या अंगात असलेल्या क्षमता. म्हणजे उदाहरणार्थ फळं, मांस, गवत, धान्य इत्यादी सर्व गोष्टी पचवण्याची क्षमता. वाघ, गाय वगैरे प्राणी याबाबतीत स्पेशलाइझ करतात तर माणूस दोन्ही डगरींवर पाय ठेवून असतो. दुसरा अर्थ एखाद्या लोकसंख्येत असलेलं व्हेरिएशन. हे जितकं अधिक तितकं बदलत्या परिस्थितीबरोबर प्रजाती बदलण्याचा प्रवास करणं सोपं जातं.

कधीकधी पहिल्या प्रकारची फ्लेक्झिबिलिटी वाढणं हाच 'प्रगती'चा भाग असतो. पुढच्या भागांत जे वर्णन येईल त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखांक आवडला. सापेक्ष क्षमता (रेलेटिव्ह फिटनेस) संकल्पना चांगली समजावून सांगितली आहे. या प्रयोगात सापेक्ष क्षमता थेट मोजता येते (पूर्वीच्या पिढीतील थिजवलेले जीवाणू वापरता येतात), हे विशेष. बहुतेक जीवजंतूंच्या अभ्यासात सापेक्ष क्षमतेबाबत कयास करावे लागतात. थेट मोजमाप शक्य नसते कारण आदल्या पिढीतील जीव-व्यक्ती (इन्डिव्हिजुअल ऑर्गनिझम) हे खूप-खूप पुढची पिढी उद्भवण्याच्या आधीच मृत्यू पावलेले असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग आवडला.

उत्क्रांतीच्या बाबतीत फेसबूकावर नुकतेच पाहिलेलं हे कार्टून.

संपादकः width, height देताना देवनागरी अंक टाळा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखांक आवडला.
यावरून एक विचार आला, माणसाच्या दर पिढीला काहि लशी आवर्जून देण्यात येत आहेत. जर कित्येक पिढ्या त्याच लशी देण्यात आल्या तर काहि पिढ्यांनंतर जीव घडताना असे 'गृहित' धरले जाईल का की ही उपयोगी अ‍ॅन्टीबॉडी तर बाहेरून मिळणारच आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0