अवलिया

नमस्ते ,मी चंदू खानविलकर

अबुधाबी साठी जेट एअरवेज ची फ्लाइट पकडण्यासाठी एअरपोर्ट वर उभा असताना एक चाळीशीचा चष्मेधारी मराठी माणूस जवळ येवून उभा होता. त्याने माझ्या पासपोर्ट वरील नाव पाहून लगेच हस्तांदोलना साठी हात पुढे करून स्वत:ची ओळख करून दिली.

तुम्ही Costain साठी जाताय का? तो म्हणाला
होय,पण तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय –मी
हो, आपण कतार ला भेटलोय आधी , तुमच्या कॅम्पमध्ये तो अन्वर होता ना, त्याच्या रूमवर आलो होतो मी एकदा . तो म्हणाला
अच्छा. मग आत्ता कुठे चाललात ?
आत्ता मीही Costain लाच चाललोय , आयलंडला.

सकाळी सात ची फ्लाइट होती।नशिबाने दोघांचे सीट नंबरही जवळजवळ असल्याने पूर्ण फ्लाइटभर गप्पा चालूच राहिल्या ,एव्हाना आमची चांगलीच दोस्ती झाली होती. तीन तासात विमान अबुधाबी एअरपोर्टवर उतरले आणि आम्ही सर्व सोपस्कार पार पाडून आणखी तासभराने आम्ही बाहेर पडलो. Costain चा को-ओर्डिंनेटर आलाच होता. मग एका कोस्टर (मिनिबस)मधून आम्ही सर्वजण शेख जायेद सिटीमधल्या आलीशान व्हिला मध्ये पोहोचलो.एव्हाना बारा वाजत आले होते. आल्याबरोबर आम्ही शॉवर घेवून लगेच लंच घेतला. आणि मस्तपैकी ताणून दिली.

संध्याकाळी चार वाजता जाग आली ती चंदूने उठवल्यामुळे ! चंदूने त्याची बॅग उघडली होती. बॅगमधून काही आयुर्वेदिक औषधांच्या बाटल्या बाहेर काढल्या...सोबत ग्लास आणि फँटा चे कॅन होते जे व्हिलामधून घेतले होते. चंदू मला म्हणाला, आता गम्मत बघ ....त्याने औषधांच्या बाटल्यामधून औषध ग्लासात ओतले आणि त्यात फँटा मिसळून मला दिले... अरेच्चा ........ व्होडका? अरे तीच तर गम्मत आहे.......चंदू म्हणाला. अरे एअरपोर्टवर चेकिंग मध्ये सापडू नये ,म्हणून मी औषधांच्या बाटलीतून व्होडका आणतो........ चल एंजॉय कर आता.......!..........चंदू ही वेगळीच चीज आहे,हे मी एव्हाना ओळखले होते.

दुसर्याट दिवशी सकाळी ऑफिसला जायचे होते. तिथली कामे आवरून दोन तासांनी आम्ही फ्री झालो. चंदू म्हणाला,अरे चल जरा जिवाची दुबई करून येवू...झोपतोस काय शुंभासारखा...........मग घाईघाईने तयार होवून आम्ही बस पकडली आणि दोन वाजता मेन सिटीला पोहोचलो. थोडावेळ कॅरिफोर आणि लुलू हायपरमार्केटमध्ये घालवून मग चंदू म्हणाला, अरे इथे काय वेळ घालवतो आहेस? असली माल इधर नही,कही और मिलता है ,चलो...............

मग त्याने मला मुसाफामधल्या ईस्ट आफ्रिकन स्टोअरमध्ये नेले. अरे बापरे ! एखाद्या मॉलसारखे आलिशान लिकर स्टोअर? देशोदेशीचे अप्रतिम ब्रॅंड तिथे कलात्मक पध्दतीने मांडून ठेवले होते, टकीला,व्होडका,रम ,जिन,स्कॉच ,व्हिस्की,बियर आणि इतर अनेक प्रकार ! मग काही निवडक बाटल्या घेवून आम्ही पेमेंट केले आणि निघालो... आयलंडला जायला अजून आठ-दहा दिवस तरी होते. तेवढ्या वेळेचे नियोजन करून चंदूने बेगमी करून ठेवली होती.

पुढचे दहा दिवस मस्त मजेत गेले. आम्ही दोन दिवस दुबईची सैर करून आलो. अबुधाबी-दुबई अंतर दोनशे किमी. बसने 25 दिरम तिकीट लागते. पण या आनंदाला गालबोट लावणारी एक घटना दहाव्या दिवशी घडली. आमच्या व्हिला च्या मागच्या बाजूला काही बलूची लोकांची वस्ती होती. तिथली उनाड पोरे एकट्या दुकट्या परदेशी माणसाला धमकावणे/लुटणे असे प्रकार करायची.प्रसंगी अंडी फेकून मारणे/ मारहाण करण्यापर्यन्त मजल जायची. त्या दिवशी आम्ही दोघे संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलो होतो. तेवढ्यात दहाबारा वर्षांचे सात-आठजण आले आणि मला धमक्या देवू लागले. एकाने अंडे फेकूनही मारले. बाकीचे पैशाची मागणी करू लागले. चंदूने तेवढ्यात प्रसंगावधान राखून एकेकाला लाथा-बुक्क्यांनी तुडवायला सुरुवात कली. दोघे-तिघे आडवे होताच बाकीच्यानी घाबरून पळ काढला. मी चंदूचे आभार मानले...................!

तर असा हा चंदू , त्या रात्री चंदूने मला आपली स्टोरी सांगितली. चंदू सर्वप्रथम कुवेतला गेला 1998 ला . तिकडे जावून स्वारी जरा सेटल होतेय ,तोच एका मिसरी (इजिप्शियन) मांत्रिकाच्या नादाला लागली. चंदूचे लग्न तेव्हा व्हायचे होते, म्हणून तुला चांगली मुलगी मिळवून देतो असे सांगून अली नावाच्या या मांत्रिकने कुवेतमध्ये चंदूकडून भरपूर पैसा उकळला . पण चंदूचा त्याच्यावर गाढ विश्वास होता. त्याची आणि चंदूची चांगली दोस्तीच जमली म्हणाना ! मग अलीने चंदूला नमाज आणि त्यांचा पवित्र ग्रंथ याचे महत्त्व मनावर बिंबवले. चंदूला एक लॉकेट/ताईत आणि पवित्र ग्रंथ त्याने दिला. त्याच्या खोलीत हे सर्व सामान सदैव असे. कुवेतमध्ये सुद्धा दररोज सकाळ-संध्याकाळ धूप/लोबान लावून त्याचे पठन सुरू असे!

चंदूला हळूहळू (त्याच्या भाषेत) दिव्य अनुभव यायला सुरुवात झाली. सर्वप्रथम एका अमावास्येच्या रात्री जेव्हा अलीने चंदूच्या हृदयावर हात ठेवून पवित्र मंत्र म्हटला ,त्यावेळी चंदूच्या सर्वांगातून थंड लहरी प्रक्षेपित झाल्या. त्यानंतर त्याला एका दिव्य पुरुषाचे दर्शन झाले. दिव्य शक्तीने तुला माझ्याशी जोडले आहे ,आत्ता पासून तुला माझे संरक्षण व मदत मिळेल ,असे त्या जिन ने चंदूला संगितले! त्यानंतर चंदू सतत त्या शक्तीच्या संपर्कात असल्याप्रमाणे वागू लागला. त्याला दिव्य स्वप्ने पडू लागली. हळूहळू तो कुवेत मधील जॉब, मुंबईतले कुटुंबिय आणि सभोवतालच्या जगापासून विभक्त होत गेला . सतत अली आणि जिन यांच्या विचारातच राहू लागला. साहजिकच त्याचा परिणाम कामावर होवू लागला, कामावरून त्याचे चित्त उडाले.

आता तो जिन त्याला सांगत होता की इथे काही लोक तुझे शत्रू आहेत ,त्यांनी कट करून तुला कामावरून काढून टाकायचे ठरवले आहे. यासाठी तू तुझ्या कामाच्या ठिकाणावरील एक वस्तु आणून अलीला दे. मग कामावरील मंडळी तुझ्या बाजूने वश होतील! त्यानुसार चंदूने त्यांच्या वर्कशॉप मधील एक हातोडी चोरली आणि ती आपल्या रूमवर ठेवली. अलीने रूमवर येवून त्या हातोडीला काही धागे बांधून लोबान दाखवला आणि मंत्र म्हटले. आणि आता तुझे काम झाले आहे,असे सांगितले.

इकडे चंदूचे हे सर्व उद्योग सहकारी कर्मचार्यांेच्या नजरेतून सुटले नव्हते ,चंदूच्या नाना भानगडीनी ते वैतागले होते. त्यांनी सुपरवायझर कडे तक्रार करून चंदूचे कामावर अजिबात लक्ष नाही, अशी तक्रार केली. त्यावरून सुपरवायझरने चंदूला चांगलेच झापले आणि आठ दिवसात स्वत:ला सुधार आणि कामावर लक्ष दे ,नाहीतर तुला कामावरून काढून टाकीन आणि भारतात परत पाठविन अशी सक्त ताकीद दिली.

झाले, आता चंदू पिसाळला ! सर्वप्रथम अलीशी हुज्जत घातली आणि मग त्याला प्रचंड शिव्या देतच रूमवर आला. रागाच्या भरात ग्रंथ आणि हातोडी , धूप/लोबान सगळे उचलून कचर्यािच्या डब्यात टाकले. हे सगळे बाजूच्या रूमवर राहणारे बाकीचे कर्मचारी पहात होते. एकाने कुणीतरी कुवेतच्या पोलीसला बोलावून आणले आणि चंदूने पवित्र ग्रंथाचा अपमान केला आहे,त्याची झडती घ्या ,अशी तक्रार केली. मग पोलिसाने रूमची आणि कचरापेटीची तपासणी केली ,तर खरोखरच ग्रंथ आणि हातोडी सापडली. झाले ! मग चंदूची रवानगी पोलिस स्टेशन वर ! पण त्याची जबानी घेताना उलटसुलट वक्तव्ये आणि बोलण्यातील विसंगती पाहता ही सायकिक केस आहे,हे स्पष्ट झाले. मग पुढे काही जास्त कारवाई न होता चंदूला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि त्याची रवानगी पुन्हा भारतात करण्यात आली!

भारतात आल्यावर चंदूला मनोविकार तज्ज्ञाकडे नेण्यात आले, त्याला बरेच दिवसात हॉस्पिटलमध्ये राहावे लागले .अनेक गोळ्या आणि injections यांचा मारा करण्यात आला. दोन-अडीच महिन्यात तो नॉर्मल वर आला. मग घरच्यांनी त्याचे लग्न करून देण्याचे ठरवले. एक बेळगावची मुलगी पाहून एका शुभ मुहूर्तावर चंदू विवाहबद्ध झाला. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. सहा महिन्यातच चंदूचा घटस्फोट झाला. आणि मग पुन्हा चंदू सौदी अरेबियाला पुन्हा दोन वर्षांसाठी निघून गेला.

आज चंदू ब्राजिलमध्ये आहे ! अधूनमधून फोन करतो . पण चंदूचा फोन आल्यावर माझी ती संध्याकाळ अस्वस्थ जाते. मनात कुठेतरी नक्की वेडा कोण? त्याला वेडा ठरवणारे हे जग की जगाला फाट्यावर मारून आपल्याच ध्ंदित आयुष्य जगणार चंदू ? असा प्रश्न पडतो !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

(सत्य घटना/ अनुभवांवर आधारित ,पात्रांची नावे व इतर नावे बदलली आहेत )
मंदार कात्रे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जबरदस्त अनुभव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0