कहाणी राजपुत्राची

कहाणी राजपुत्राची

आटपाट नगर होत. नगराचा राजा होता. राजाला लेक होता. खावे प्यावे खेळावे हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याजकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. नागानं त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं.

घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळी भटकू लागला. कंदमुळं खावून जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घेवू लागला. होता होता कित्येक वर्षे गेले.

असाच भटकत असतांना त्याला एका झर्‍याच्या काठी एक साधू दिसला. इतक्या दिवसांत कुणीतरी भेटले याचा त्याला आनंद झाला. त्याने नमस्कार करून जंगलाच्या बाहेर जाण्याचा मार्ग कोणता या अर्थाचा प्रश्न साधूस विचारला. साधूने राजकुमाराबरोबर झालेला प्रसंग मनातून ओळखला. त्याने उपाय सांगितला. "याच झर्‍याचा उगमाकडे काही अंतरावर गेल्यास दरी लागेल. स्वत: झर्‍यात स्नान करून दरीतून पडणार्‍या झर्‍याचे पाणी प्राशन कर. म्हणजे तुझ्या चिंता संपतील". राजपुत्राने साधूस नमस्कार केला असता साधू तथास्तू म्हणून चालता झाला.

साधूने सांगितल्याप्रमाणे राजपुत्र झर्‍याच्या उगमाकडे गेला. तेथे त्याला एक नवयौवना दिसली. राजकुमाराने स्नान करण्यास झर्‍यात उडी मारली असता तो एका डोहात बुडू लागला. ते पाहून त्या युवतीने त्यास पकडले व त्यास डोहाबाहेर काढले. दोघेही पाण्यात असतांना राजपुत्राने त्याच्यावरील कोसळलेल्या प्रसंगाचे वर्णन केले. युवतीस झर्‍याचा प्रवाह माहित असल्याने तिने त्या राजपुत्रास कोसळणार्‍या झर्‍यापर्यंत पोहोचण्याचे मार्गदर्शन केले. राजपुत्राने जंगलातून मुक्त होण्यासाठी अधीरतेने कोसळणार्‍या झर्‍याचे पाणी प्राशन केले. ते पाणी प्राशन करताच राजकुमार व ती युवती राजधानीतील राजवाड्यात अवतिर्ण झाले. हा चमत्कार कसा झाला हा प्रश्न राजपुत्राने युवतीस विचारला असता तिने त्यास सांगितले की, 'मी मध्यदेशाची राजकन्या आहे. एका तपश्चर्यामग्न साधूस मी लहाणपणी चिडवीले असता त्याने मला शाप देवून जंगलात पाठविले. मी त्याची क्षमा मागितली असता एक राजपुत्र तुझ्याकडे पाणी पिण्याबद्दल विचारेल व ते सत्कृत्य तू करताच शापमुक्त होशील असा उ:शाप दिला. योगायोगाने आज तसे घडले व मी शापमुक्त झाले'.

राजाला ही बातमी समजताच त्याने आपल्या परतलेल्या पुत्रास अत्यानंदाने मिठी मारली. त्याबरोबर आलेल्या राजपुत्रीच्या आईवडीलांना तिची हकीकत कळवीली. पुढे सर्वसंमतीने राजपुत्र व राजकन्येचा विवाह थाटात संपन्न झाला.

ज्याप्रमाणे साधूचा आशीर्वाद राजपुत्र आणि राजकन्येस मिळाला त्याप्रमाणे तुम्हांआम्हास मिळो. ही साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी संपुर्ण.

- पाभे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

छानच आहे गोष्ट. यावर एकादा सिनेमा काढता येईल. त्या दृष्टीने पटकथा लिहिण्यास सुरुवात करायला हरकत नाही.

राजा: बोम्मन इराणी
राणी: नमिता कपूर
राजपुत्रः कोणताही खान, कपूर इ.
राजकन्या: सोनाक्षी सिन्हा.
साधू: नसिरुद्दिन शाह
नागीणः विद्या बालन.

आयटम गाणी: प्रियंका चोपडा, सनी लिओनी, विपाशा बसू, मोनालिसा, राखी सावंत इ.इ.
आर्ट डायरेक्शन वगैरेचे काम असेल तर सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
अधिक फुलवायला हवी होती. बालकथा म्हणून कथाबीज छान आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्याबरोबर आलेल्या राजपुत्रीच्या आईवडीलांना तिची हकीकत कळवीली.

"यापुढे ती राजकन्या तिच्या घरी निघून गेली" असा शेवट वाचायला आवडला असता. लहान मुलांमधे लहानपणापासूनच लग्न-बिग्नाच्या कल्पना काय भरवून द्यायच्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत आहे. खरेतर लिव्ह-इन सुरू झाले हे सांगणे जास्त सयुक्तिक ठरेल असे वाट्टे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कल्पना भरवून देणे हा उद्देश नसावा अशा कुठल्याच कथांचा. पण आसपास जे घडतं त्याचा सहज सरळ उल्लेख होणं स्वाभाविक आहे.(एलिस इन वंडरलँड मध्द्ये चिमुरडी काल्पनिक जागात का जाइना, एक मुलगी/बालक म्हणून तिच्या भावनांचं प्रतिबिंब काल्पनिक जगातही खर्‍या मुलीचच असतं. गलिव्हर ट्रॅव्हल्स मध्ये कधी बुटक्या/आखूड लोकांच्या काल्पनिक प्रदेशात तो प्रवासी जातो. पण त्या आखूड लोकांच्याही भावना तुमच्या आमच्यासारख्याच असतात. दुसर्‍याची प्रगती झाली की पहिल्याला ईर्ष्या(की ईर्षा?) होणे, आपल्या गटातल्यांचा फायदा करुन देणे वगैरे. थोडक्यात काय, तर जे आजूबाजूस सर्वसामान्य प्रचलित रीत आहे, ती अशी रिफ्लेक्ट्/प्रतिबिंबित होत राहणारच.)
काहीही झालं की लागलिच आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी मध्ये मध्ये का आणा?
"शोले" पाहताना, एखादा मॅच्युअर्ड गांधीवादी/गांधीप्रेमी/अहिंसावादी " का दाखवावी इतकी हिंसा म्हणतो मी. संवैधानिक आणि अहिंसक मार्गानं गब्बरला थांबवता("संपवता" हा हिंसक शब्द टाळलाय) आलं नसतं का" अशी प्रतिक्रिया देउ लागला तर त्याचे हसेच होइल.
.
प्रत्येक कथेतील प्रत्येकच स्त्रीने स्वतंत्र विचार वगैरेंचा झेंडा घेउनच उभं राहायला पाहिजे का?
का रहायला पाहिजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रत्येक कथेतील प्रत्येकच स्त्रीने स्वतंत्र विचार वगैरेंचा झेंडा घेउनच उभं राहायला पाहिजे का?

आवश्यकता नाही.

पण लहान मुलांना न समजणार्‍या संकल्पना त्यांच्या डोक्यात कशाला भरवायला हव्या? लग्न म्हणजे काय हे राजकुमार-राजकुमारीच्या गोष्टी वाचणार्‍या पोरांना माहित असेल, समजत असेल तर सांगावं. नाही तर ते दोघे मित्र झाले, एकत्र शाळेत, कॉलेजत जायला लागले असंही सांगता येतंच की.

आणि लग्न न केल्यामुळे फक्त स्त्रीच स्वतंत्र रहाते असं थोडीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग भातुकलीचे खेळही लहान पोरांना देउ नयेत का खेळायला?
मुद्दा समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भातुकलीचे खेळ का खेळू नयेत? स्वयंपाक करणे, उपलब्ध वस्तू अन्य लोकांबरोबर वाटून घेणे इत्यादी गोष्टी लहान मुलांना समजतात किंवा समजाव्यात अशी अपेक्षा असते.

(लोकांनी भातुकलीचे खेळ म्हणून काय खेळलं होतं याबद्दल मला कुतूहल आहे. मी आणि एक मैत्रीण भातुकलीच्या नावाखाली आतल्या बाल्कनीत, जुनी लुगडी बांधून अंधार करून झोपा काढायचो. खाऊ जमा करायचो आणि सगळी पोरं-पोरी मिळून दुपारचं जेवण कमी करून कुरमुर्‍याचा चिवडा चरत बसायचो. एकदा आम्ही दोघींनी आपापल्या बाहुल्या भुंड्या केल्या होत्या. असं करताना आम्हाला दोघींना फार मज्जा वाटली होती. ते केस कापतानाही थोडे थोडे करत, चिक्कार कचरा करून कापले होते. ब्राह्मण विधवा स्त्रियांना केस वाढवू दिले जायचे नाहीत असं काही तेव्हा आमच्या डोक्यात नव्हतं. पण आमच्या आया, काकू, आजी या विचारांमुळे प्रचंड स्कँडलाईज झाल्या होत्या. विशेषतः हे असं विद्रूपीकरण करताना आम्हाला आनंद झाल्याबद्दल या सगळ्या बायका फार काळजी करत होत्या. आम्हाला कारण विचारल्यावर "आमच्या इच्छेविरोधात तुम्ही आमचे केस एकदम बारीक कापता. मग आम्ही पण तेच केलं" असं बाणेदार उत्तर घाबरत घाबरत दिलं होतं. एकंदर आमच्या असल्या उद्योगांचा पत्ता लागल्यावर आम्हाला पत्त्यांचा कॅट आणून दिला गेला. बहुदा त्यानंतरच संध्याकाळी घरात थांबण्यावर बंदी आणली गेली. सक्तीने खेळायला बाहेर घालवलं जायचं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुत्री असा शब्द अस्तित्वात आहे का? पुत्री = कन्या का? कॉलींग संस्कृत पंडीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो आहे. ही लिंक बघणे.

http://spokensanskrit.de/index.php?tinput=daughter&direction=ES&script=H...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रथम वाचली तेंव्हा वाटले की रूपककथा आहे की काय..
राजपुत्र = संजय दत्त, नागावर पाय = अतिरेक्यांची सोबत, साधू = बाळासाहेब ठाकरे,
नवयौवना = (ओढूनताणून) मुन्नाभाईमुळे मिळालेली प्रसिद्धी, इ, इ..
पण यापेक्षा अधिक संगती लागेना; कल्पनाशक्ती ताणवेना. म्हणून मग एक नुसतीच बालपणीची कथा वाचली, असे म्हणून थांबलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋच्या सूचनेप्रमाणे मीच कथा थोडी फुलवली आहे. पोरांना सांगायची असेल तर आपापल्या जबाबदारीवर सांगणे. मंडळ जबाबदार आणि भरवशाचं नाही.

---

नेहेमीप्रमाणे आटपाट नगर होत. नेहेमीप्रमाणे नगराचा राजा होता. नेहेमीप्रमाणे राजाला लेक होता. खावे-प्यावे-खेळावे-लोळावे हा त्याचा नेहेमीचा खुशालचेंडू उपक्रम होता. बाप राजा आणि हा एकुलता एक असल्यावर याला काय फिकीर असणारे? मुघल राजपुत्रांना निदान मारामारी, राजकारण, बाप-भावांना (इश्श! उगाच वैट विचार नका करू. बाप-भाऊ म्हटलं की लगेच शिव्या दिल्या जातातच असं नै कै!) कैद करणं वगैरे शिकायला लागत असे. पण गोष्ट पुढे ढकलायची म्हणून एके दिवशी त्याच्याकडून आगळीक घडली. सवंगड्यांबरोबर खेळतांना त्याचा पाय नागावर पडला. हे क्रिकेट असतं तर ठीक होतं. बापाचंच राज्य आहे, मग याचीच बॅट, याचाच बॉल, याचेच स्टंप, याचेच संपादक, अंपायर्स. कोणी आऊट दिलं नसतं. पण गोष्ट मॉडर्न काळातली आहे. लोकशाहीचं प्रतीक म्हणून काही नको का? तर ते प्रतीक म्हणजे नाग. आणि नागाने त्याला शाप देवून क्षणात जंगलात पाठवलं.

झक मारून घनदाट जंगलात राजपुत्र रानोमाळ भटकू लागला. पिझ्झाच्या चेन्स आणि वडापावच्या टपर्‍या जंगलात कोण टाकणार? मिळाली ती फक्त पावसाळ्यात ट्रेकर्सने टाकलेली गुटख्याची पाकीटं आणि सिग्रेटची थोटकं. त्यावर पोट कसं भरणार? मग कंदमुळं खाऊन जगू लागला. कोणी माणूस दिसतो का याची चाहूल घ्यायला लागला. एकटं राहून डोक्यावर परिणाम नाही होणार? होता होता कित्येक वर्षं गेली. दिवस कसे जातील, एकतर हा पुरुष आणि त्यातून एकटाच. महिने किंवा वर्षच जायला पाहिजेत.

असाच भटकत असतांना त्याला एका झर्‍याच्या काठी एक साधू दिसला. इतक्या दिवसांत कुणीतरी मनुष्यप्राण्यासम गिर्‍हाईक भेटलं याचा त्याला आनंद झाला. त्याने नमस्कार करून जंगलाच्या बाहेर जाण्याचा मार्ग कोणता या अर्थाचा प्रश्न अर्थातच साधूला विचारला. बाप खपला असेल तर आता हा डैरेक राजा नसता झाला? साधूने राजकुमाराबरोबर झालेला प्रसंग मनातून ओळखला. खरंतर त्याला हे माहित होतं, पण स्वतःचे कूल पॉईंट्स वाढवायला त्याने स्वतःला सगळं माहित असल्याचं ढोंग केलं. कलियुग हो! साधुपण आपल्या तुकोबासारखे पावरबाज नाही राहिले. साधुने थुक्कापट्टी उपाय सांगितला. "याच झर्‍याचा उगमाकडे काही अंतरावर गेल्यास दरी लागेल. स्वत: झर्‍यात स्नान करून दरीतून पडणार्‍या झर्‍याचे पाणी प्राशन कर. म्हणजे तुझ्या चिंता संपतील". राजपुत्राने साधूस नमस्कार केला असता साधू तथास्तु म्हणून चालता झाला. स्वतःच्या भंपकपणाचं बिंग नको फुटायला!

साधूने सांगितल्याप्रमाणे राजपुत्र झर्‍याच्या उगमाकडे गेला. तेथे त्याला एक नवयौवना दिसली. साधुला थोतरीत मारून ती तिथेच बसली होती. राजकुमाराकरवी हिचा काटा काढता आला तर बरा, असा विचार करून साधुने मुद्दामच राजकुमाराला तिकडे पाठवला होता. राजकुमाराने विचार केला, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. मला इथे माणूस दिसत नव्हता, इथे आख्खी मुलगी! तिच्यासमोर जायचं तर निदान आंघोळ केलेली बरी.

स्नान करण्यास झर्‍यात उडी मारली असता तो एका डोहात बुडू लागला. ते पाहून त्या युवतीने त्याला पकडले व त्यास डोहाबाहेर काढले. (आहे की नै आमची गोष्ट मॉडर्न!) दोघेही पाण्यात असतांना राजपुत्राने त्याच्यावरील कोसळलेल्या प्रसंगाचे वर्णन करण्याचा विचारही केला नाही. जंगलात राहून डोक्यावर परिणाम झाला तरी प्रायमेट इन्स्टिंक्ट्स कसे विसरणार? युवतीही बहुदा तिथेच अडकली असावी. तिला झर्‍याच्या प्रवाहाच्या खाचाखोचा माहित होत्या. तिने त्या राजपुत्राला कोसळणार्‍या झर्‍यापर्यंत पोहोचण्याचं मार्गदर्शन केलं. राजपुत्राने जंगलातून मुक्त होण्यासाठी अधीरतेने कोसळणार्‍या झर्‍याचं पाणी प्राशन केलं. ते पाणी प्राशन करताच काहीही झालं नाही. पण नेमके तेवढ्यात तिथे काही हौसे-नवसे ट्रेकर्स आले. त्यांनी या पोट्ट्यांना पाहिलं आणि लगेच मोबाईलवरून ९११ ला फोन केला. त्यांनीच राजकुमार व ती युवती राजधानीतल्या राजवाड्यात पोहोचतील याची सोय केली. हा चमत्कार कसा झाला हा प्रश्न राजपुत्राने युवतीस विचारला असता तिने त्यास सांगितलं की, "मी मध्यदेशाची राजकन्या आहे. एका तपश्चर्यामग्न साधूला मी लहाणपणी चिडवलं असता त्याने मला शाप देऊन जंगलात पाठवलं. मी त्याची क्षमा मागितली असता एक राजपुत्र तुझ्याकडे पाणी पिण्याबद्दल विचारेल व ते सत्कृत्य तू करताच शापमुक्त होशील असा उ:शाप दिला. आज तसं घडलं आणि योगायोगाने आपल्याला या ट्रेकर्सनी वाचवलं".

राजाला ही बातमी समजताच त्याने आपल्या परतलेल्या पुत्रास अत्यानंदाने मिठी मारली. "बरं झालं, दुसर्‍या मुलाचा विचार केला नाही ते!" राणी पुटपुटली. त्याबरोबर आलेल्या राजपुत्रीच्या आईवडलांना तिची हकीकत कळवीली. कितीतरी दिवस ते हिला शोधत होतेच. बरी आयती सापडली. पोरींना मोठं करताना आईबापाला किती टेंशन असतं ... यांना काहीच नाही. ती गेली आपल्या दिशेला! जंगलात बालपण काढलेल्याशी कोण लग्न नाहीतर लिव्हिन करणार? त्याचे प्रायमेट इन्स्टिंक्ट्स आहेत तसे तिचे नाहीत का?

ज्याप्रमाणे साधूचा आशीर्वाद राजपुत्र आणि राजकन्येस मिळाला त्याप्रमाणे तुम्हा-आम्हास मिळो. ही साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी संपूर्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL झकास!
ही कथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

< दिवस कसे जातील, एकतर हा पुरुष आणि त्यातून एकटाच.> ROFL
< महिने किंवा वर्षच जायला पाहिजेत. साधुला थोतरीत मारून ती तिथेच बसली होती.> ROFL
मूळ कथेपेक्षा हि कथा अफलातून जमली आहे . हॅटस्‌ ऑफ टू यू अदिती . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमतीशीर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अदिती यांची कथा खरोखरच फुललेली आहे. मजा आली. कहाणीला आधुनिक स्पर्श लाभला!

@मन >>>> कल्पना भरवून देणे हा उद्देश नसावा अशा कुठल्याच कथांचा. पण आसपास जे घडतं त्याचा सहज सरळ उल्लेख होणं स्वाभाविक आहे.

मन यांच्याशी एकदम सहमत.

एक विचार आला मनात. आपल्याला लहाणपणी पाठ्यपुस्तकात धडे, कविता असायचे. (आणि अजुनही शिक्षणपद्धती बदललेली नाही.) त्यात सुरूवातीला लेखकाचे नाव, त्या लेखकाची ग्रंथसंपदा, काव्यसंपदा आदींचा उल्लेख असायचा अन त्याच्या दुसर्‍या परिच्छेदात त्या धड्याचा सारांश असायचा. जसे- प्रस्तूत पाठात लेखकाची गरीबांबद्दलची/मुक्याप्राण्यांची, झाडांची, व्यसनाधिन लोकांची कळकळ जाणवते. प्रस्तूत अभंगात कविने परमेश्वराबद्दलची आस्था व्यक्त केली आहे. अमुक तमूक.

तर माझा विचार असा की, लेखक कवीचे मन तो धडा (अर्थात तो एखाद्या कादंबरीतून उचललेले काही परिच्छेद, प्रकरण असते.) लिहीतांना वर सांगितलेल्या सारांशाप्रमाणे असेलच असे नसते.

थोडक्यात सारांश म्हणजे आताची प्रसारमाध्यमे जसे एखाद्या नेत्याचे वक्तव्य टिव्हीवर एखादे वाक्यच घेवून 'ब्रेकींग न्यूज' सादर करते तशा प्रकारचे असते. (धरणात **णार काय? बडे बडे शहरोंमे...) हे माझे मत.

प्रस्तूत कथेत आस्मादिक लेखकाच्या मनात येथे आलेल्या प्रतिक्रियांपेक्षा निश्चीतच काही निराळे होते हे नक्की.

त्याचप्रमाणे प्रस्तूत कथा पुर्ण लिहीण्याआधी केवळ रंजक कथा कहाणीसारखी लिहीणे हे अपेक्षीत होते. पारंपरिक कहाणी फार दिर्घ नसते. या कहाणीचा वेग (फ्लो) काहीसा वेगवान असतो. आणखी एक ती फुलवलेली नसते. वाक्यरचना जेवढ्यास तेवढी, काहीशी गेय असते. हे सर्व मुद्दे लक्षा घेता तो पारंपरिक कहाणीचा बाज राखण्याचा प्रयत्न मी केला आहे. येथे एक सांगावेसे वाटते की मी जर कहाणी हा कथाप्रकार या कथेसाठी निवडला नसता तर ही कथा काहींनी (ऋषिकेश) मागणी केल्याप्रमाणे फुलवता आली असती.

माझ्या प्रस्तूत कहाणीवर एवढी चर्चा आपण केली हे पाहून अन एवढ्या प्रतिक्रिया (कार्यबाहूल्यामुळे मला तुमच्या इतर लेखांवर प्रतिक्रिया देता येत नसूनसुद्धा) आल्यात हे पाहून आनंद वाटला. (माझ्या लेखांवर एवढ्या प्रतिक्रियांची मला सवय नाही! Smile ) सर्व वाचकांचे प्रतिसादकांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

ROFL मस्त जमलेत पंचेस!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0