Skip to main content

उपाय - २

भाग १

"आम्ही जे काय सांगणार आहोत ते नीट ऐक. काळजी करण्याचं, घाबरण्यासारखं आत्ता काहीही नाही. पण अशी परिस्थिती येऊ शकते. आहे त्या परिस्थितीवर उपाय आहे. पण ... "

शाहरुखने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. अशा परिस्थितीत एखाद्या चित्रपटात देवाची प्रतिमा फोडून आपण अचानक अश्रद्ध झालो आहोत असं दाखवता येतं किंवा घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त करता येतं. असं काही केलं असतं तर या तिघांसमोरच नाही तर दुनियेसमोरच असणारी त्याची मि. कूल ही प्रतिमा भंग पावली असती. त्याने असं काहीही केलं नाही. शाहरुख स्वतः मुस्लिम असला तरीही घरात गणपती, शेषशायी विष्णू, साईबाबा, सत्यसाईबाबा आणि अनिरूद्ध बापूंच्या तसबिरी होत्या. त्या खोलीत काचसामानही बरंच होतं. ते फोडायचं म्हणजे लाख-दीड लाखाचा कचरा झाला असता. त्याने डॉक्टरांना एवढंच विचारलं, "निर्णय घ्यायला किती दिवस आहेत?"

"सर, आत्ता सुरुवातच होते आहे. पण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला कदाचित सहा महिने लागतील, कदाचित आठ. त्यामुळे लवकरात लवकर सुरूवात केलेली बरी. शिवाय त्यामुळे बाकीच्या अवयवांना असणारा धोकाही कमी होईल."

"ठीक आहे. मला पंधरा दिवस द्या. हातात असलेलं प्रोजेक्ट पूर्ण करावं लागेल नाहीतर माझ्या प्रॉडक्शन हाऊसवर केस होईल. आधीच या आयपीएलच्या सट्टेबाजीमुळे कमी कटकटी नाहीत. शूटींगमुळे त्या वाढायला नकोत."

डॉक्टर गेले. मॅडम आत आल्या. शाहरुखचा असा चेहेरा पाहून काही न विचारता त्यांनी त्याच्या डोक्यातून हात फिरवायला सुरूवात केली. त्याचा बांध फुटला. हमसाहमशी रडत तो सांगायला लागला. "मला कॅन्सर झाला आहे. ज्या केसांवर तू भाळलीस, ते केस आता फार दिवस रहाणार नाहीत गं ..." डॉक्टरांनी सांगितलेली सगळी माहिती शाहरुख बायकोला द्यायला लागला. "मला केसांच्या मुळाचा कॅन्सर झालाय असं टेस्टमधून दिसतंय. आत्ता प्राथमिक अवस्थेमधेच आहे. पण आत्ता ट्रीटमेंट केली नाही तर हा सगळीकडे पसरू शकतो. ट्रीटमेंट फार महाग नाही आणि माझ्या तब्येतीवर फार परिणामही होणार नाही. पण ट्रीटमेंट म्हणून काही गोळ्या नियमितपणे घ्याव्या लागतील आणि ..." त्याने आवंढा गिळला. मॅडम हतबुद्धपणे त्याच्याकडे बघतच होत्या.

"सांग ना, गोळ्या आणि काय करावं लागेल? आपण सगळं करू या शाहरुख. मी दर मंगळवारी अनवाणी सिद्धीविनायकालाही जाईन. तुझं सुपरस्टारपद टिकवण्यासाठी मी याची बातमीही बनू देणार नाही. अगदी मेकपशिवाय जाईन मी कोणी ओळखू नये म्हणून! तसाही देवाला साधेपणाच आवडतो असं म्हणतात ना हे लोकं!"

"नाही गं, तसं नाहीये हे. याचा पूर्ण उपचार होऊ शकतो. पण मला त्यासाठी सगळे केस काढून टाकावे लागतील. सगळे, डोक्यावरचे, भुवया, दाढी-मिशी, संपूर्ण अंगावरचे केस काढावे लागतील."

"आता काय करायचं? अरे देवा! तू गेल्याच महिन्यात 'हेड अँड शोल्डर्स'चा ब्रॅड अँबेसेडर झाला आहेस. त्या कमाईचं काय होईल आता? आणि आता कोण तुला नवीन प्रोजेक्ट्स देणार? तुझ्या या केसांशिवाय तुझं सुपरस्टारपद कसं टिकवणार?" ती भोवळ येऊन खाली पडली. शाहरुखला काय करायचं हे समजेना. त्याने तिच्या तोंडावर पाणी मारलं. ती थोडी शुद्धीत आली. तिने पाहिलं तर शाहरुख कोणाशीतरी फोनवर बोलत होता.

"हो रे. सगळे केस काढावे लागणार. नाहीतर माझं काही खरं नाही. आणि केस काढायचे म्हणजे फक्त शेव्ह करायचं असं नाही, केसांची मुळंच नष्ट करावी लागणार. ट्रीटमेंटला वेळ लागणार नाही पण केसांशिवाय माझं करियर किती टिकणार आहे?"

तिला फक्त शाहरुखचं बोलणंच ऐकू येत होतं. "काळजी कशी करू नको? यातून काय भलं होणार आहे? एवढे पैसे कमावले, सुपरस्टारपद मिळवलं पण त्याचा काही फायदा नाही रे कॅन्सरविरोधात..." "... हो तू फक्त प्रोजेक्टचाच विचार कर, मित्राचा नको करूस!" शाहरुख अगदीच गळाठला. मित्रसुद्धा सोडून गेला तर. "... ठीक आहे, मी वाट पहातोय."

"करण येतोय." एवढंच बोलून तो उठला. बाथरूममधून बाहेर येईस्तोवर घरात अतिप्रचंड मारामारी झाल्यासारखी दिसत होती. बायकोच्या हातात बॉक्सिंग प्रॅक्टीसचे ग्लव्ह्ज होते आणि घरातले सगळे आरसे तिने फोडले होते. बाथरूममधून तो बाहेर येतानाच ती त्वेषाने उठली, "जो आरसा तुझ्या केसांचं काही करू शकत नाही त्या आरशांचा काही उपयोग नाही." असं म्हणत तिने उरलेल्या एका आरशावरही जोरदार ठोसा मारून तो मोडला. "नाही, नाही. देवावर माझा विश्वास नाही. आपण दरवर्षी उपास करतो त्याचं हे फळ दिलं त्याने आपल्याला?"

"अगं असं का करत्येस? आपल्याला आपल्या प्रतिमेचा विचार नको का करायला! आणि जर तूच आरसे फोडलेस तर तू मेकप कसा करणार? माझा मेकप निदान सेटवर होईल, पण तुझ्या मेकपचं काय? थोडातरी विचार कर. असा धीर सोडू नकोस. आपण यातून काहीतरी मार्ग काढू. आणि हे बेल्जियन आरसे आहेत, असे फोडलेस तर नुकसान आपलंच आहे. आरशांचा इन्शुरन्स काढून मग तरी असं काही करायचंस."

तेवढ्यात करण आला. करण-शाहरुख संबंधात पूर्वीसारखीच ऊब पाहून तिचा चेहेरा थोडा फुलला. करणने सरळ विषयालाच हात घातला. "हे बघ, तू जे करतोस ती फॅशन होते. सध्या तू काहीही जाहीर करू नकोस. झालंच तर विग बनवून घे, तो परदेशातूनच बनवून घे. उगाच चर्चा वाढायला नको. शेवटी तो विग भारतातच बनेल, पण इथे कोणाला समजायला नको. आत्ताच मी थोडा विचार करत होतो. तुझा असा अवतार वापरून घेणारा एक सायफाय सिनेमाच बनवतो मी! तेच तेच सिनेमे बनवून मलाही कंटाळा आलाय. एकदा मी तुझ्या टकलाचं ... आय मीन केशविहीनतेचं मार्केटींग केलं की पहा लोकं कसे त्याचीच पूजा करतील ते! मला आत्ता सुचलेली कथा अशी की, तू परग्रहावरून पृथ्वीवर येतोस. दिसताना तू माणसासारखाच दिसतोस. सुरूवातीला केस थोडेथोडे असतील तेव्हा हे शूटींग आपण पूर्ण करून घेऊ. तू इथे आल्यावर पृथ्वीवरचे सगळे प्रश्न झटक्यात सोडवून टाकतोस..."

"म्हणजे माझ्याकडे, त्या एलियनकडे, शेती आणि अन्नवितरणासंबंधात काही वेगळं ज्ञान असतं का?"

"शेती वगैरे काय करायचंय आपल्याला? ते सरकारचे प्रश्न आहेत. मला खर्‍या प्रश्नांबद्दल बोलायचं आहे. म्हणजे एकाशी लग्न केल्यानंतर दुसरा आवडणे, असे प्रश्न. आधीच स्त्रियांची अवस्था नाजूक असते त्यात एकाच वेळी दोन हीरोंपैकी एक निवडणं किती त्रासदायक असेल त्यांच्यासाठी! तू त्यांचे सगळेच प्रश्न सोडवतोस. तू असा एवढा हँडसम आहेस आणि तुझ्याकडे अशी टेक्नॉलॉजि आहे असं दाखवू, ज्यामुळे लोकं तुझ्यासारखे दिसायला लागतात. सगळेच सारखे दिसतात म्हटल्यावर मग असा काही प्रश्नच रहाणार नाही ना. शिवाय आत्तापर्यंत प्रियांकाने म्हणे १२ रोल्स करून रेकॉर्ड केला. तुझे त्यापेक्षा जास्त रोल ठेवू या. वीस रोल्स तुझे. संपूर्ण पिक्चरभर तूच दिसला पाहिजेस. आपण तुझी लेझर ट्रीटमेंट पूर्ण झाली की तुला असाच लाँच करू या. मग पहा किती फरक पडतो ते! अरे हे राकेश रोशन वगैरे लोकांना स्वतःला असूनही टक्कल वापरून घेता येत नाही रे. त्यासाठी माझ्यासारखी तीक्ष्ण बुद्धी पाहिजे."

आता सगळ्यांचा चेहेरा फुलला. शाहरुखने आनंदाने डॉ. सानेंना फोन केला. दोन दिवस तो पॅरीसला जाऊन येणार होता. ते झालं की तो नियमितपणे उपचार करून घेणार असल्याचंही त्याने कळवलं.

करणने त्याच्या नव्या स्क्रिप्टवर काम सुरू केलं. एलियनशी डेटींग करण्याच्या कल्पनेमुळे करणच्या मैत्रिणींमधे भांडण सुरू होण्याची शक्यता होती. पण वीस शाहरुख असल्यामुळे उलट नव्या चेहेर्‍यांनाही संधी द्यायला हरकत नाही याबद्दल त्यांचं एकमत झालं. शाहरुखसमोर वेगळाच प्रश्न होता. 'हेड अँड शोल्डर्स'च्या ब्रँड अँबेसेडर असण्याचं काय? कंत्राटात जाहिरातीत सगळं काम न करता त्याला चालणार होतं पण तसं केलं असतं तर शाहरुखच्या पसंतीचा दुसरा हीरो, मॉडेल पुढे आला असं झालं असतं. पुढचं आर्थिक गणित पहाता हे परवडण्यासारखं नव्हतं. शाहरुख थोडा चिंतेतच होता. पहिली लेझर ट्रीटमेंट झाल्यामुळे तो आता टकलू झाला होता. सकाळी व्यायामासाठी पर्सनल ट्रेनर आला. उकाड्यात व्यायाम करताना तसं शाहरुखला बरंच वाटत होतं. बरं झालं पीडा गेली. "सर, हा नवा लुक एकदम मस्त दिसतोय तुम्हाला! मी कालच आमचं फिटनेस मॅगझिन वाचत होतो त्यात एक नवीनच गोष्ट समजली. पुरुषांमधलं टक्कल अति टेस्टोस्टीरॉनमुळे पडतं. आता बघा आमच्या व्यवसायातले लोकं कसे तुमची नक्कल करणार ते! तुम्ही असाच लुक पुढच्या पिक्चरमधे द्या." ट्रेनरला सगळं माहित नव्हतं, सांगायचीही गरज नव्हती. पण शाहरुखला त्यातून हवं होतं ते मिळालं, फॅन फॉलोइंगची टकलाची मागणी. त्याने तातडीने करणला फोन करून हे कळवून टाकलं.

मुख्य प्रश्न होता तो 'हेड अँड शोल्डर्स'चा. त्यांना थेट बोलावून माहिती द्यावी, चर्चा करावी का परस्पर कधीतरी गॉसिप म्हणून हे बाहेर येईल तेव्हाच समजू द्यावं याबद्दल शाहरुखचा निर्णय होईना. आपण होऊन या आजाराबद्दल सांगितलं तर करारभंग होईल का नाही याची चाचपणी करण्याचा सल्ला करणने दिला. वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे आरोग्य आणि आयुष्य वाचवण्यासाठी केस काढावे लागल्यामुळे अगदी करारभंग झाला तरीही न्यायालयात शाहरुखचीच बाजू तगडी होती. पण मानहानी होण्याची शक्यता वकील लक्षातच घेत नव्हते. त्यांचं एकच टुमणं होतं, "जे काही व्हायचं ते होईलच. तुझ्या केसांचं तुला काही करता येणार नसेल तर निदान नुकसान कसं टाळता येईल हे पहा. त्यासाठी तूच पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोललास तर न्यायालयाला आणि पब्लिकला तुझ्याबद्दल अधिक सहानुभूती वाटेल. कसंही करून तू स्वतःबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण कर." वकीलांपुढे त्याचा इलाज चालेना. तिथेही निरुपायाने त्याने वकीलांसमक्ष कंपनीच्या लोकांना बोलावलं. त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आणि कराराचे पैसे परत करण्याचंही आश्वासन दिलं. कंपनीला या प्रकरणात आर्थिक फायदा दिसत असल्यामुळे त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग पत्करला.

मधल्या काळात त्याच्या डोक्यावर एक मोठा घेरा आणि केसांचे काही पुंजके शिल्लक होते. मिशी, दाढी, हाता-पायांवरही असेच मधूनमधून पुंजके राहिले होते. हे सगळं विचित्र दिसू नये म्हणून रोज मेकप करावा लागत असे किंवा संपूर्ण शेव्ह करण्याचाही मार्ग होता. याच्यात्याच्याकडून गॉसिप मिळवून वर्तमानपत्रांनी त्याची मोठीच टर उडवायला सुरूवात केली होती. जॉन अब्राहम, सलमान वगैरे लोकं बॉडी दाखवण्यासाठी जे मुद्दाम करतात ते त्याला नाईलाजास्तव करावं लागत होतं. अकाली टक्कल पडलेल्या काही मित्रांना तो आधी चिडवत असे, त्यांचं दु:ख आता शाहरुखला समजत होतं. पण एक दिवस त्याच्या दु:खाचा कडेलोट झाला. मुलं घरी आली तीच रडतरडत. "डॅडी, तुम्हाला केस नाहीत म्हणून आम्हाला शाळेत चिडवतात. तुमच्या अंगावर केस नाहीत म्हणजे तुम्ही बाई आहात, तुम्ही माणूसच नाहीत, एलियन आहात", असं आम्हाला शाळेत चिडवतात सगळे. "आम्ही टीचरना सांगितलं तर त्यावरून आणखी त्रास दिला मला डॅडी." मुलांना त्याने कसंतरी समजावलं, पण टकल्या लोकांचे प्रश्न त्याला पहिल्यांदाच दिसत होते. आणि त्याने निर्णय घेतला.

त्याचे लेझरतज्ञ आणि इतर डॉक्टर्स यांच्या सोबत त्याने एक मोठी पत्रकार परिषदेची घोषणा केली. आज तो उघडपणे आपल्या टकलाचा स्वीकार करणार होता. त्यानेच जर टक्कल स्वीकारलं नाही तर मुलांनाही नेहेमी टकल्याची मुलं म्हणून हिणवलं जाईल. लहान वयात एखाद्या गोष्टीचं भय निर्माण झालं तर त्या भयाचा पुढे मोठा गंड निर्माण होऊ शकतो. मुलालाच अजून तीस-पस्तीस वर्षांनी टक्कल पडायला लागेल तेव्हा त्या भीतीची केवढा गंड निर्माण होऊ शकतो या विचाराने तो आणखीनच भेदरला. "मी माझ्या मुलांसाठी आज जाहीरपणे या नव्या रूपाचा स्वीकार करतो आहे. मलाही लहानपणी अनेक गोष्टींचं भय वाटत असे. त्याचा गंड निर्माण होऊ नये म्हणून मला माझ्या तरूण वयात फार मेहेनत घ्यावी लागली. संजूबाबाच्या तरूण वयात त्याला लहानपणच्या भीतीचा असाच त्रास झाला. आता तो तुरूंगात आहे. असा काही त्रास माझ्या मुलांना होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे. माझ्या टकलाचा त्यांच्यावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून मी आज जाहिररित्या माझ्या टकलाचा स्वीकार करत आहे." असं म्हणतानाच त्याने त्याच्या डोक्यावरचा टोप काढला. त्याचं विचित्र प्रकारे केस उडलेलं टक्कल दिसल्यावर सगळ्या कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट झाला. अनेकांनी फ्लॅश बंद न ठेवल्यामुळे संपूर्ण सभागृहाचे डोळे थोडा वेळ दिपले. शाहरुखनेही हसतहसत "आतापासून मी खोलीत फ्लॅश फोटोग्राफी बंद करण्याचं आवाहन करेन", असं म्हटल्यावर हशा आणि टाळ्यांचा जल्लोष झाला. पत्रकारांच्या आग्रहाखातर, पोटर्‍या फार फुगलेल्या नसतानाही त्याने पायावरचेही केस काढल्याचं दाखवलं. पुरुषांच्या अशा प्रकारच्या अंगप्रदर्शनची सवय नसणारे पत्रकारही थोडा वेळ दचकले. पण शाहरुखनेच त्या सगळ्यांना मोठ्या मनाने "रोगासमोर इलाज नसतो. हे असं करून माझ्या आयुष्याची प्रत घसरत नाही. माझा एक अवयव काढला तरी मी मीच रहातो." असं सांगितलं. शाहरुखच्या विनंतीवरून डॉ. सानेंनीही छोटंसं निवेदन दिलं, "मला इथे बोलू दिल्याबद्दल मी शाहरुख सरांचे आभार मानतो. हा तुमचाच आवडता सुपरस्टार आहे. त्याला तुम्ही कोणी वेगळा समजू नका. त्याच्या केसांची मुळं फक्त नष्ट केली जात आहेत; पण त्यामुळे त्याचं अभिनय आणि नृत्यकौशल्य कमी होत नाही. एखाद्याचा अपेंडीक्स काढला तर तो माणूस बदलला असं आपण म्हणत नाही. ही प्रक्रियाही तशीच आहे. बिनमहत्त्वाचे भाग काढल्यामुळे माणसात बदल होत नाही. अजून काही महिन्यांनी केस समूळ नष्ट करण्याची ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा त्याचा कर्करोग पूर्ण बरा व्हायला सुरूवात झाली आहे असं म्हणता येईल."

या सगळ्या प्रकारानंतरही 'हेड अँड शोल्डर्स'चा खटला सुरूच होता. त्यांचा खप वाढला होता. या कराराआधी शाहरुखचा करार प्रतिस्पर्धी कंपनीबरोबर झाला होता. त्यांचा शँपू वापरून शाहरुखला कर्करोग झाला अशा अर्थाची जाहिरात तुफान जोरात होती. खटल्यातून त्यांना अधिक प्रसिद्धी मिळतच होती. शाहरुखही आता हार मानण्यातला नव्हता. दुर्दैवाने हा खटला एका स्त्री न्यायाधीशाच्या अखत्यारित आल्यामुळे टक्कल आणि टकल्याबद्दल फार भावनिक आवाहनं करणं त्याच्या वकीलांना जमत नव्हतं. त्यांनी एक नवीनच कल्पना शाहरुखला दिली. शाहरुखने, दोन वकील मित्रांच्या साथीने एक नवीनच संस्था सुरू केली, BALD - Baldies Against Lethal Descrimination. या संस्थेतर्फे सर्व वयाच्या टक्कलग्रस्त पुरुषांना टकलाची निगा राखणे, टकल्यांचं मनोबल वाढवणे, शक्यतोवर त्यांना कृत्रिम मार्गाने केस वाढवणे, वापरणे यापासून परावृत्त करणे, त्यांच्या मुलांना 'टकल्यांची मुलं' म्हणून हिणवलं गेल्यास तयार ठेवणे, टकल्या पुरुषांसाठी वधू-पार्टनर सूचक मंडळ चालवणे, केस असले तरीही टक्कल करू पहाणार्‍यांना मोफत टक्कल करून देणे, अधिकाधिक लोकांना टक्कल करण्यास प्रवृत्त करणे आणि वर्षातूने एकदा Bald Pride Parade काढणे अशी ध्येय ठरवली गेली. शेवटी 'हेड अँड शोल्डर्स' कंपनीने खटला मागे घेतला. एवढंच नाही तर आता त्यांची टकलांची निगा राखण्याची वेगळी उत्पादनं बाजारात आली आणि शाहरुख हाच त्यांच्या bald range उत्पादनांचा ब्रँड अँबेसेडर झाला.

---

उत्तरार्धः

शो बिझनेसमधे करियर सुरू केलेला शाहरुख आता यू.एन्.च्या मेल-पॅटर्न-बॉल्डनेसचा अँबेसेडर आहे. बेचाळीस देशांत त्याची संस्था, BALD, यू.एन्.च्या मदतीने अन्य टकल्या पुरुषांना टकलाचा अभिमान बाळगण्यास मदत करते आहे. त्याच्या या कृतीमुळे अनेक पुरुषांनी आपण होऊन टक्कल करून घेतलेलं आहे. BALD च्या एका अहवालानुसार प्रगत आणि प्रगतीशील देशांमधे लहान मुलांना 'टकल्याची मुलं' असं चिडवण्याचं प्रमाण ३५ टक्क्यांवरून साडेसात टक्के एवढं कमी झालेलं आहे. दुसर्‍या एका सर्व्हेनुसार, भारतातल्या बावीस ते पंचवीस या वयाच्या टकल्या पुरुषांच्या लग्नाचं प्रमाण साडेपाच टक्क्यांनी वाढलेलं आहे. अशा प्रकारचे सामाजिक बदल घडवून आणण्याबद्दल त्याचा विचार आता नोबेलच्या शांतता पारितोषिकासाठीही या वर्षी झाला. या निमित्ताने त्याची मुलाखत घेतली असता "आमचं काम आफ्रिकेतले देश आणि चीन-जपानमधे पसरवणं हेच माझं ध्येय आहे. नोबेल पुरस्कार कमी महत्वाचा आहे असं नाही. पण मला ज्या प्रकारच्या त्रासातून जावं लागलं तसा कोणालाही होऊ नये, सर्व स्त्री-पुरुषांना पुरुषाच्या टकलाचं महत्त्व कळणं हेच सगळ्याच महत्त्वाचं आहे", असं ध्येयवादी उत्तर त्याने दिलं.

(समाप्त)

Node read time
10 minutes
10 minutes

राजन बापट Tue, 21/05/2013 - 08:08

या लेखाचे शीर्षक असायला हवे होते :
"टकाटक शारुखच्या टकलाची रुखरुख"

उसंत सखू Tue, 21/05/2013 - 09:04

"शेती वगैरे काय करायचंय आपल्याला? ते सरकारचे प्रश्न आहेत. मला खर्‍या प्रश्नांबद्दल बोलायचं आहे. म्हणजे एकाशी लग्न केल्यानंतर दुसरा आवडणे, असे प्रश्न. आधीच स्त्रियांची अवस्था नाजूक असते त्यात एकाच वेळी दोन हीरोंपैकी एक निवडणं किती त्रासदायक असेल त्यांच्यासाठी! =)) =))

स्मिता. Tue, 21/05/2013 - 14:21

मस्तच! एकंदर सगळ्या प्रकरणाची चांगलीच उडवली आहे. मजा आली.

विसुनाना Tue, 21/05/2013 - 14:42

कथा आवडली. छान!

(पण कॅन्सरच्या रुग्णांना केमो-थेरपीमुळे डोक्यावरचे केस गमवावे लागतात या भीषण सत्याची जाणीव मनात जागी आहे.)

राजेश घासकडवी Wed, 22/05/2013 - 17:12

मला खर्‍या प्रश्नांबद्दल बोलायचं आहे. म्हणजे एकाशी लग्न केल्यानंतर दुसरा आवडणे, असे प्रश्न.

इतरही अशा खऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे मी लक्ष वेधू इच्छितो
- कुठचा डीओ वापरला की स्त्रिया हातातलं सगळं टाकून तुमच्यावर झडप घालतात
- क्रिकेटमधल्या गैरप्रकारांना आळा कसा थांबवता येईल, जेणेकरून तक्रार करण्यातून होणारं मनोरंजन अव्याहतपणे चालू राहील
- फेसबुकाचा थिल्लरपणा कमी कसा करता येईल
इतरांनीही भर घालावी...

संजूबाबाच्या तरूण वयात त्याला लहानपणच्या भीतीचा असाच त्रास झाला. आता तो तुरूंगात आहे. असा काही त्रास माझ्या मुलांना होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे.

या बाबतीत खरं तर अनुपम खेरचा सल्ला घेणं फायद्याचं ठरलं असतं.

अनेकांनी फ्लॅश बंद न ठेवल्यामुळे संपूर्ण सभागृहाचे डोळे थोडा वेळ दिपले.

ओव्हरएक्स्पोजरमुळे त्याच्या डोक्याभोवती एक सुंदर वलय तयार होऊन तो एखाद्या तसबीरीतल्या देव, साधू, महंताप्रमाणे दिसायला लागला असणार.

बॅटमॅन Wed, 22/05/2013 - 19:39

In reply to by राजेश घासकडवी

ते अ‍ॅक्स कंपनीवर कुणीतरी केस घातली होती म्हणे, झैरातीगत होत का नै म्हणून. त्याची आठवण झाली. बाकी दोन्ही लेख उत्तमच. शाहरुखची उडवलेली आवडते तस्मात बहुत एंजॉयवले आहे ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 22/05/2013 - 19:53

In reply to by बॅटमॅन

(कालच्या तुझ्या फेसबुकावरची कॉमेंटा-कॉमेंटी आठवत) ती केस घालणारा तूच नाहीस ना?

शाहरुखची उडवलेली आवडते तस्मात बहुत एंजॉयवले आहे

गोष्टीची सुरुवात वगळता शाहरुखची फार रेवडी उडवलेली नाही अशी माझी स्वतःचीच तक्रार आहे. ;-) तसाही रोख त्याच्याकडे नव्हताच, असं म्हणून स्वतःची समजूत घालून घेते आहे.

बॅटमॅन Wed, 22/05/2013 - 20:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्रर्रर्र, तू तर गॉन केस निघालीस ;)

बाकी रोख तिकडे नसेल असे जाणवले, पण आवडण्याचे एक प्रमुख कारण सांगावेसे वाटले इतकेच ;)

मन Wed, 22/05/2013 - 17:19

खर्‍या नावांचा उल्लेख खटकला. तरीही आवडलं.

राजेश घासकडवी Wed, 22/05/2013 - 17:50

In reply to by मन

या लेखांवर अनेकांनी 'खऱ्या व्यक्तींची नावं' वापरण्याबद्दल काहीसा नकारात्मक स्वर काढलेला आहे. यात गैर काय आहे हे कळत नाही. विनोदी लेखनासाठी खऱ्या व्यक्तिमत्वांचं विडंबन करणं हा प्रस्थापित प्रकार आहे. आपण अनेक राजकीय व्यंगचित्रं पहातो, त्यात त्या त्या प्रसिद्ध व्यक्तीचं व्यंगचित्रण करण्याबद्दल काहीच तक्रार करत नाही. रजनीकांत जोक हजारोंनी आहेत. त्यात काही खटकण्यासारखं दिसतं का?

समजा जर नाव बदलून शाहरुख ऐवजी सारूक केलं असतं तर कितपत फरक पडला असता?

आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अॅंजेलिना जोलीने जे काही केलं त्याचं चित्रण विनोदी स्वरूपात आहे. शाहरुख हा निमित्तमात्र आहे.

साती Wed, 22/05/2013 - 20:12

आवडली गोष्ट!
बरेच पंचेस आवडल्याने कुठली मेंशन पर्टिक्युलरली करत नाही.

............सा… Thu, 23/05/2013 - 21:57

=)) विनोदी आहे.
____________________

काही टक्कलवाले सेक्सी दिसतात एवढेच नोंदवते :)
जर मूळ फीचर्स रेखीव असतील तर अगदी काही टक्कलवाल्या स्त्रियाही सुंदर दिसतात. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/05/2013 - 23:10

विसुनाना, हा फोटो ब्लॉग पाहिला आहेत का?
The Battle We Didn't Choose

सारीका, होय काही टकले लोकही फार आकर्षक दिसतात. 'हाऊस ऑफ कार्ड्स'मधलं पीटर रूसो नावाचं पात्र. प्रत्यक्षात कोणी टक्कल केलेल्या स्त्रिया पाहिलेल्या नाहीत, पण केस अगदी नखाएवढे ठेवलेल्या पाहिलेल्या आहेत. त्या ही सुंदर होत्या.

रुची Thu, 23/05/2013 - 23:58

In reply to by ............सा…

अदितीची प्रतिक्रिया नीट वाचली नव्हती, तिने दिलेल्या फोटो ब्लॉगशी पर्सिस खंबाटाचा काय संबंध हे समजले नव्हते. नंतर समजले म्हणून प्रकाटाआ.