मन्या सुर्वे

साधारणपणे पंधरा सोळा वर्षांपूर्वी अविनाश धर्माधिकारींच्या तोंडून हे नाव पहिल्यांदा ऐकले होते. जुलिओ रिबेरो यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई (बॉम्बे) पोलीसांनी केलेले पहिले "एन्काउन्टर". मन्या सुर्वेचे. उत्सुकता होती. पण अधिक माहिती मिळाली नव्हती. रमा नाईक, अरुण गवळी, सदा पावले अशी आपल्या भागातील वाटावीत, गावाकडली माणसे वाटावीत अशी नावे असणारी माणसे मुंबई अंडरवल्डमध्ये काय करतायत असा एक भाबडा प्रश्न मनात येऊन जाण्याचे नाव काढीत नसे. हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार, दाऊद इब्राहिम इत्यादि नावे जरा तरी 'एलियन' होती. तरी 'कासकर' त्या एलियनगिरीला छेद देत होतेच. हिंदी सिनेमांमध्ये गुन्हेगारीचे जे काही चित्रण केले गेलेले आहे ते त्या पटकथाकार आणि दिग्दर्शकांच्या अकलेची कीव करण्यापलीकडे काहीही साध्य करत नाही. त्यामुळे असल्या चित्रणातून या अंडरवल्डविषयी काहीही ज्ञान मिळणे केवळ दुरापास्त. त्यातल्या त्यात थोडी समज वाढवणारा एक चित्रपट फार पूर्वी येऊन गेला - सिंहासन. त्यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती दाखवण्याच्या मिषाने स्मगलिंगविषयक एक उपकथानक येऊन जाते. स्मगलिंग हा अंडरवल्डचा एक आस्पेक्ट झाला. 'अर्धी मुंबई' हे युनिक फीचर्स ने प्रसिद्ध केलेले पुस्तक या विषयाची समज थोडी खोल करते. अर्थात हे गुन्हेगारीविषयक पुस्तक नव्हे. पण मुंबई समजत गेली की अंडरवल्ड आपोआप उलगडत जाते. अलीकडेच वाचनात आलेल्या "डोंगरी टू दुबई" या पुस्तकाने माझी बरीचशी उत्सुकता शमवली, आणि अजून बरेच कुतुहल चाळवले. ब्लॅक इकॉनॉमी कशी आपल्या रोजच्या जगण्याला भिडलेली आहे, आपण ब्लॅक इकॉनॉमीचे कळत नकळत कसे भाग आहोत, आणि ब्लॅक इकॉनॉमीचे इंजिन चालवणारे अंडरवल्डमधील मोहरे प्रत्यक्षात आपल्या जगण्याचे कसे सूत्रधार आहेत याच्या बर्‍याच हिंट्स या पुस्तकातून समोर येतात.

हाजी मस्तान, दाऊद, वरदराजन यांच्या आख्यायिकांवर/ दंतकथांवर आधारीत अगणित सिनेमे येऊन गेले. अमिताभचे करियर या आख्यायिकांनी घडवले म्हणा ना. दीवारमधील हमाली करणारा अमिताभ, ब्रॅण्डेड गॉगल्स घालून गगनचुंबी इमारतीकडे ऐटीत पहात 'ही इमारत मी माझ्या आईला भेट देणार आहे, कारण इथे माझ्या आईने डोक्यावर विटा वाहल्या आहेत' असे म्हणणारा अमिताभ, अमर अकबर अँथनी मधील स्मगलर्स, आदि असंख्य भूमीकांमधून दिग्दर्शक त्यांच्या कल्पनांमधील अंडरवल्डचा रोमान्स आपल्याला दाखवत राहिले. त्यांच्या कल्पनेतील मस्तान, दाऊद, वरदा आपल्याला दाखवत राहिले. अगणित सुमार दर्जाच्या चित्रपटांनी याच्या नकला पाडण्यात धन्यता मानली. तरी दयावान/ नायकन सारखे अपवाद वगळता कुणी खर्‍या 'डॉन' मंडळींचे चरित्रपट काढण्याचा प्रकार केला नव्हता. राम गोपाल वर्माच्या 'सत्या'मध्ये देखील कुठे खर्‍या गुन्हेगार मंडळींचा संदर्भ घेतलेला नव्हता. पहिल्यांदा अंडरवल्डचे पद्धतशीर चित्रण करण्याचा प्रयत्न राम गोपाल वर्माने 'कंपनी' मध्ये केला. फार चांगला प्रयत्न. त्या सिनेमातील मोहनलालने ज्यांची भूमीका साकारली होती त्या डी शिवानंदन या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना भेटण्याचा एकदा योग आला होता. त्यावेळी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले होते, की 'कंपनी' सिनेमा हा वास्तवाच्या खूपच जवळ जाणारा आहे. कंपनी हा सिनेमा अनेक कारणांसाठी इतर सर्व गुन्हेगारपटांहून सरस होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे "धंदा" हा अंडरवल्डमधील अत्यंत महत्वाचा आणि (सर्वात महत्वाचा) घटक या सिनेमात व्यवस्थित अधोरेखीत केलेला होता; रस्त्यावरची मारामारी ही "कॉन्सिक्वेन्शियल" आहे, मूळ महत्वाचा आहे "धंदा" - ही बाब इतर गुन्हेगारपटांमध्ये दिसत नाही. अंडरवल्डच्या चित्रणामध्ये 'कंपनी'वरही मात करणारा सिनेमा म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे' होय. ब्लॅक फ्रायडेची दोन बलस्थाने म्हणजे लेखक हुसेन झैदी, आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप. अशी संधी खरेतर अजून दोन चित्रपटांना मिळाली होती, पण दिग्दर्शकामध्ये पुरेसा वकूब नसल्याने दोन्ही सिनेमे सुमार दर्जाचे बनून वाया गेले - शूट आउट अ‍ॅट लोखंडवाला, आणि शूट आउट अ‍ॅट वडाळा.

शूट आउट अ‍ॅट वडाळा हा एक सुमार दर्जाचा चित्रपट एका अतिशय उत्तम दर्जाच्या "डोंगरी टू दुबई" या झैदीने लिहिलेल्या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारीत आहे. अनुराग कश्यपने याचे सोने केले असते असे पुस्तक वाचून आणि सिनेमा पाहून वाटते. मला इथे सिनेमाची समीक्षा करायची नाहीये, त्या लायकीचा सिनेमा नाहीच आहे मुळात. मन्या सुर्वे नावाच्या हाँटिंग कॅरॅक्टर वर मनात असंख्य विचार येऊ लागले म्हणून हे लिहावेसे वाटले. १९६९ साली मन्याला अटक झाली. तुरुंगवास झाला. ७२ साली तुरुंगातून तो पळून गेला. दहा वर्षे पोलीसांच्या हातावर तुरी देत मुंबईत आपली दहशत माजवत बँका लुटत, खंडण्या गोळा करत माजात फिरत राहिला आणि शेवटी १९८२ मध्ये पोलीसांच्या गोळ्यांनी संपला. दाऊद त्याच्या आधीही होता. त्याच्यासोबतही होता. त्याच्यानंतरही आहे. अजून किती काळ राहणार आहे कोण जाणे. दाऊद हा कंटेम्पररी इतिहासातील एक महत्वाचा घटक आहे. गुन्हेगारी, अंडरवल्ड, टेररिझम या सगळ्या कक्षा ओलांडून दाऊद पल्याड पोचला आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा तो आधार बनल्याचे दावे केले जात आहेत. अजूनही दाऊदचे भूत महत्वाच्या घोटाळ्यांभोवती फिरत असते. डोंगरी टू दुबई या पुस्तकामध्ये झैदीने या संदर्भातील अर्थकारण, राजकारण, गुन्हेगारी फार सुंदर रीतीने उलगडून दाखवली आहे. मन्या सुर्वे हा या पार्श्वभूमीवर अगदीच किरकोळ आणि नगण्य असा भिडू वाटतो. पण कॅरॅक्टर इंटरेस्टिंग. या माणसाने नेहेमी असा दावा केला, की मला गुन्हेगार व्हायचे नव्हते; मला सिस्टमने गुन्हेगार बनवले. मला माहीत नाही असा दावा किती गुंड करतात. पण या एका दाव्याभोवती कितीतरी सिनेमे बनलेले आहेत. मला चटकन आठवणारा (आणि आवडता) सिनेमा म्हणजे 'गर्दिश'. अनेक आहेत. असंख्य आहेत. बरेचसे असह्य आहेत. पण सगळ्यांचा सोर्स हा एकच - मन्या सुर्वे. त्याचे नाव घेऊन सिनेमा हा आत्ता पहिल्यांदाच निघाला. (बँडिट क्वीन फूलन देवी, पान सिंग तोमर हेही असाच दावा करायचे. पण ते मुंबईबाहेरचे.) पण मन्याचे पुढले "करियर" पाहिले तर त्याचा हा 'मजबूरी' वाला दावा पोकळ वाटतो.

मन्या म्हणजे मनोहर अर्जुन सुर्वे. हा बीए पास होता. डिस्टिंक्शन मध्ये. हॅडली चेस च्या कादंबर्‍या वाचायचा याला नाद. स्वत: गुन्हे करतानाही तो चेसच्या कादंबर्‍यांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लॅनिंग करायचा. त्याचे शरीर कमावलेले होते. तो सतत हत्यारे - पिस्तूल, सुरा - बाळगून तर असायचाच, पण हँड बॉम आणि अ‍ॅसिडही सोबत बाळगायचा. दहा वर्षे फरारच असल्यामुळे तो ही सावधगिरी कायम बाळगायचा. त्याचे पोलीसांशी साटेलोटे कधीच नव्हते. ६९ साली अटक, आणि ८२ साली एन्काउंटर एवढाच त्याचा पोलीसांशी प्रत्यक्ष सामना. हा अतिशय गरम डोक्याचा होता. कुणी "नाही" म्हटले की झाला याचा शत्रू. अगदी किचनपर्यंत घरोबा असलेल्या कॉलेजपासूनच्या मित्रालाही याने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या होत्या. असल्या वृत्तीचा मन्या हा "मजबुरीने" गुन्हेगार झाला हा दावा पटत नाही. एकंदर मन्या सुर्वे हे एखाद्या सिनेमासाठी अत्यंत आकर्षक असे पात्र ठरते. एक सिनेमा अर्थातच वाया गेलेला आहे.

मन्याचे एन्काउंटर अटळ होते असे एकंदर त्याच्या बाबतीतला घटनाक्रम पाहून वाटते. रिबेरोंसारखे उज्वल प्रतिमा असणारे पोलीस कमिशनर असताना त्याचा पोलीसांनी खातमा केला - कायदा हातात घेणारे काम केले. हे थोडे कोडे वाटते. दाऊदचे असल्या बाबतीतले तरबेज डोके पाहता त्याने पोलीसांना सुपारी दिली असे म्हणावे तर रिबेरोंची प्रतिमा आड येते. आणि हे एन्काउंटर अटळ होते, नाइलाजाने पोलीसांना करावे लागले असे म्हणावे तर मन्यानंतर केल्या गेलेल्या साडेआठशे एन्काऊंटर्स आणि त्यात मेलेल्या तेराशे लोकांचे काय जस्टिफेकेशन राहते? ही सर्व एन्काउंटर्स नाइलाजाने केली गेलीत? न्यायव्यवस्था इर्रिलेव्हंट झाल्याचे आपण चक्क मान्य करत आहोत? की या बहाण्याने पोलीसही अंडरवल्ड या 'सिस्टेमिक बग' चाच भाग बनल्याचे आपल्याला पहावे लागत आहे?

मन्या सुर्वेच्या निमित्ताने हे विचार मनात आले.

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

१. 'डोंगरी टू दुबई' पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
२. 'कंपनी'बाबतचे विवेचन अतिशय रास्त. 'सत्या' हा सत्या या माणसाविषयी आहे आणि 'कंपनी' एका धंदेवाईक कंपूविषयी. ('गर्दिश'मध्ये सामान्य माणसाने गुन्हेगारीत रुतत चालल्याची आणि त्यातून निसटण्याची त्याची धडपड, घुसमट त्यावेळच्या व्यावसायिक चित्रपटाच्या कक्षेत राहूनही फार उत्तम दाखविली आहे.) कुठल्या तरी मजबुरीतून म्हणा, आकर्षणातून म्हणा, मानसिकतेतून म्हणा, या गुन्हेगारीची सुरूवात होते. पण टिकतात तेच ज्यांना धंदा आणि गुन्हेगारीतील सीमा कळली. ज्यांना कळत नाही ते 'सत्या'मधील 'चंदर'प्रमाणे भाईगिरीच्या आकर्षणातून जन्मले आणि मेले. दाऊद अजून टिकून आहे. मात्र दाऊदचे मुंबई बाँबस्फोटातले गुंतणे ज्या पद्धतीने 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये दाखविले आहे, त्यात धंद्यापेक्षाही सूडभावनेचे बीज (लाकडी पेटीतून बांगड्या येणे) अधिक वाटते. खरे-खोटे दाऊद जाणे.
३. या बहाण्याने पोलीसही अंडरवल्ड या 'सिस्टेमिक बग' चाच भाग बनल्याचे आपल्याला पहावे लागत आहे?
सूडकथेच्या निमित्ताने पोलिसांची मानसिकता / बाजू दाखविणारा 'अब तक छप्पन' हा या बाबतीत उल्लेखनीय ठरावा. जरी ही शेवटी सूडकथा असली, तरी एकूण एन्काउंटरमागचे बारकावे आणि 'सिस्टिम'बद्दलचे साधु आगाशेच्या तोंडी असलेले शेरे, यातून बरेच काही समजते. या तंत्राचा गुन्हेगारांसाठीचा वापर, एका एन्काउंटर पोलिसाने केलेला वैयक्तिक सूडासाठीचा वापर आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने हितसंबंधात गुंतलेल्या व्यक्तीस संपविण्यासाठीचा एन्काउंटर पोलिसाचा केलेला वापर , अश्या अनेक पातळ्यांवर त्याच व्यवस्थेचे भाग सामोरे येतात.
४. पोलिसांची या बाबतीलल्या भुमिकेची एक बाजू 'अर्धसत्य' मधूनही दाखविली गेली आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लिखाण. वास्तव हे कल्पनेपेक्षा रंजक आणि उत्तेजित करणारे असते, पण हिंदी चित्रपटनिर्मात्यांच्या हाती ते गेले की संपलेच. त्यामुळे अंडरवर्ल्डवर हिंदी चित्रपटनिर्माते वास्तववादी काही बनवतील अशी अपेक्षा न ठेवलेलीच बरी. बेकारीतून, वैफल्यातून तरुण गुन्हेगारीकडे कसे वळतात याचे उत्तम चित्रण केलेले माझ्या माहितीतले एक जुने उदाहरण म्हणजे 'मेरे अपने'. बाकी सगळे 'दयावान'च.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लेख आवडला.
काही दिवसांपुर्वीच 'शुटआऊट अॅट लोखंडवाला' पाहिलेला. टिपीकल संजय गुप्ताचा चित्रपट Sad
'ब्लॅक फ्रायडे' फार लांबलचक (३तास) आणि डॉक्युमेँट्री वाटलेला. माहितीपुर्ण असेल पण अंडरवर्डबद्दल काहीच माहीती नसल्याने मलातरी बोअर झाला.
त्यामानाने फिल्मी फिल्म असेल पण मला 'वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई' आवडलेला.
'वास्तव' कसा आहे?
लेखात आणि प्रतिसादात आलेले बाकीचे चित्रपट अजुन पहायचे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लिखाण. दाऊद, डॅडी, मन्या सुर्वे, माया डोळस ह्या महाभागांमुळे गँग मधे जाणे किंवा गँग बनवणे मुंबईत फारच ग्लॅमरस झाले होते असे ऐकून आहे, कंपनी आवडलाच, अजय देवगणचा अभिनय विशेष करून. "अर्धी मुंबई" पुस्तक उत्तम आहे. "डोंगरी टू दुबई" मात्र वाचायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन्या सुर्वेच्या निमित्ताने केलेले प्रकट चिंतन आवडले. एक प्रश्न विचारतो, आता अंडरवर्ल्ड नावाचे वेगळे, काळेबेरे असे काही विश्व उरले आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायव्यवस्था इर्रिलेव्हंट झाल्याचे आपण चक्क मान्य करत आहोत? की या बहाण्याने पोलीसही अंडरवल्ड या 'सिस्टेमिक बग' चाच भाग बनल्याचे आपल्याला पहावे लागत आहे?

शेवटचा प्रश्न मार्मिक आहे आणि मर्मभेदीसुद्धा
छान प्रकटन / प्रकट चिंतन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वेगवेगळ्या गॅन्गपटांची आणि त्यामागच्या वास्तवाची तुलना रोचक आहे. यश चोप्रांचा दीवार (१९७५) किंवा त्या धाटणीचे धंदेवाईक मसालेदार चित्रपट, आणि सत्या (१९९८) आणि त्यानंतरच्या लाटेत आलेल्या अनेक चित्रपटांत जो मोठा फरक आहे त्याचं कारण असं असू शकेल असं मला वाटतं - आधीच्या काळातले ह्या विषयावर आलेले सिनेमे हे त्या जगाशी ज्यांचे हितसंबंध होते अशांनीच बनवले होते. ते सिस्टिमच्या आत होते त्यामुळे त्यांच्या चित्रपटांतलं चित्रण काहीसं अवास्तव (किंवा लार्जर दॅन लाईफ) करणं त्यांना भाग होत असेल का? पण रामगोपाल वर्मा किंवा अनुराग कश्यप प्रभृतींनी ह्या विश्वाच्या बाहेर राहून त्याकडे पाहिलं त्यामुळे ते अधिक वस्तुनिष्ठतेनं आणि अधिक वास्तवदर्शी चित्रण करू शकले असावेत.

ह्या बाबतीत 'गॉडफादर'चा (सिनेमा) प्रभाव ह्या नव्या पिढीवर फार आहे, आणि त्यातून ते बाहेर येतील, तर ह्या अधोविश्वाबद्दल अधिक बरे चित्रपट काढू शकतील असंदेखील मला वाटतं. तेंडुलकरांनी ह्या विश्वाकडे कसं बघितलं असतं असाही प्रश्न ह्या निमित्तानं डोक्यात आला. कदाचित मन्या सुर्वेसारख्या माणसाकडे तेंडुलकर वेगळ्या पद्धतीनं पाहू शकले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाप रे!!! काय भयंकर जग असेल ते.
सध्या दाऊद ला अनेक आजारांनी घेरलं आहे व तो बिछान्याला खिळून आहे वगैरे अफवा ऐकल्या की फार बरे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी हे चित्रपट पाहिलेच नाहीयेत हे जाणवलं. सिंहासन पाहिलाय आणि 'सरकार'-तेवढाच काय तो अंडरवर्ल्ड संबंधीत म्हणता यावा असा आठवतोय पटकन.

"डोंगरी टू दुबई" मिळवून वाचेन जमेल तेव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्यामध्ये (मला वाटले होते) की अरूण गवळीचा (निवडणुकीत) उपयोग करून घेणारी आणि नंतर त्याच्यावर उठलेली शिवसेना दाखवली होती. त्यातील राजकारण्याअचे नावही सूचक वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डोंगरी टू दुबई पुस्तक अगदी १९५० पासून साधारण २००० साला पर्यंतची मुंबई अंडरवर्ल्डची माहिती देतं. अनेक घटना, अनेक डॉन यांच्या बद्दल पहिल्यांदाच वाचलं. विशेषतः दाउद आणि पठाण गँग यांच्यातल्या टोळी युद्धाबद्दल. पण ते लिहिताना झैदीं जरा वहावत गेले आहेत अस वाटतं. लेखनाची शैली ब्लॅक फ्रायडेच्या तुलनेत डावी. उगाच दाउदचे वडील, हाजी मस्तान, करींम लाला यांना ग्लोरिफाय केलय.
या विषयावरचे मला आवडलेले चित्रपट :- सत्या, कंपनी, वास्तव, मकबूल. ब्लॅक फ्रायडे, अब तक छप्पन. बाँबे बॉयझ पण चांगला आहे अस ऐकलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला आवडलेला अजून १ चित्रपटः परिंदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मकबुल अप्रतिम होता. पण त्याचा मुंबई अंडरवर्डशी काही संबंध होता का?
टोळीयुद्धाबद्दल बोलायचे असेल तर मग ओँकारा, गँग्ज ऑफ वासेपुर वगैरेपण विचारात घेऊ शकतो.
किँवा अग्निपथ, शोर इन द सिटी, इस रात की सुबह नही, एक चालीस की लास्ट लोकल??? हे चित्रपट लै भारी होते म्हणायच नाहीय, पण 'मुंबई अंडरवर्ड म्हणल्यास यांचा विचार करु शकतो का' विचारायचय.
मला वाटतं हे चित्रपट कोणत्याही ठिकाणचे असू शकतात. खास मुंबई+अंडरवर्ड असं रिअलीटीच मिश्रण नव्हतं त्यात... चुभुद्याघ्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओँकारा, गँग्ज ऑफ वासेपुर हे तर नक्कीच भारी चित्रपट आहेत. पण लगेच जी नावं समोर आली ती लिहिली. शोर इन द सिटी, इस रात की सुबह नही या शिवाय शिवा, उत्तर प्रदेशात घडणारा सेहेर हे पण चित्रपट छान आहेत. अर्शद वारसी 'सर्किट' छाप कामं सोडून इतरही कामं चांगली करतो हे कळतं.
'मकबूल'चा मुंबई अंडरवर्ल्डमधल्या खर्‍या घटनांशी संबंध (कदाचित) नसला तरी एक गोष्ट म्हणून मला खूप आवडला.

संजय दत्त चा 'सडक' आणि उदय चोप्राचा (हो !), हिमाचल प्रदेशातल्या ड्र्ग्सच्या व्यापारावर आधारित 'चरस' हे पण चांगले आहेत अस ऐकलय. पण अजून हे दोन बघायला मिळालेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मन्या सुर्वेच्या निमित्ताने केलेले प्रकट चिंतन आवडले.

असं विसूनानांप्रमाणेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"डोंगरी टू दुबई" वाचलं नसतं, पण आता यादीत टाकलं आहे.

या निमित्ताने अशा प्रकारच्या चित्रपटांबद्दल झालेली चर्चाही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.