भवचक्र, मारीया, मनोव्यापार आणि आर्थिक व्यवहार

<अन्यत्र पूर्वप्रकाशित>

"Mindfulness And Money" हे "Kulanand & Domnic Houlde" या लेखकद्वयीचे पुस्तक परत वाचले. नावावरुन लक्षात आलेच असेल "पैसा" या विषयाची बुद्ध धर्माच्या शिकवणीशी सांगड घालणारे हे पुस्तक आहे. याविषयी एक लेख लिहीला होता पण त्याच्यात अधिक भर घालून हा लेख लिहीते आहे.

बुद्धधर्मात भवचक्र अर्थात संसार/कालचक्र महत्त्वपूर्ण मानले आहे. या कालचक्राच्या भाग...ांची आणि एक लहानसा आर्थिक निर्णय घेताना, मारीया नामक एका काँप्युटर प्रोग्रॅमरच्या मनोकायीक स्थित्यंतराची घातलेली रोचक सांगड या पुस्तकात वाचावयास मिळते. ती मांडण्याचा प्रयत्न करते. पुस्तकाचा पूर्ण गाभा मला कळला आहे असा माझा दावा नाही.तसेच लेखकाकडून देखील काही तृटी राहीलेल्या असू शकतात.

वरती आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका अजस्त्र प्राण्याच्या मुखामध्ये हे चक्र दिसते. हा प्राणी अन्य कोणी नसून प्रत्यक्ष "यम" आहे.यमाने गिळंकृत केलेले हे चक्र ४ भागात (Concentric वर्तुळांमध्ये) विभागले आहे.
पैकी सर्वात बाहेरचे वर्तुळ आर्‍यांनी ६ भागात विभागलेले दिसते. एका भागात देवयोनीतील जीव गायन-वादनादि कलांचा आस्वाद घेण्यात रममाण झालेले दिसत आहेत.
तर त्यालगतच्या भागात राक्षस योनीतील लोक हिंसा व लढाई करण्यात मष्गुल झालेले दिसतात.
एक भाग पशूयोनीतील जीवांच्या क्रीडा दाखवितो ज्यात नाना प्रकारचे पशूपक्षी ऊन खात पहुडले आहेत तर काही भक्ष्याच्या शोधार्थ रानावनात भटकत आहेत. काही शिकार करत आहेत तर काही निद्राधीन झाले आहेत.
सर्वात खालच्या भागात नरकयोनीतील जीव व त्यांच्या यातना पहावयास मिळतात ज्यात यमदूत काहीजणांना उकळत्या तेलामध्ये फेकत आहेत तर काही जणांना तापलेल्या सळईचे डाग देत आहेत.
नंतर येते पिशाच्च्योनीचे जग.यामध्ये अतृप्त वासना राहीलेले जीव भटकताना दिसत आहेत.
व शेवटी मानवांचे जग आहे ज्यात कोणी कामावर जात आहे तर कोणी अभ्यास करत आहे, कोणी विश्रांती घेत आहे तर कोणी खेळ खेळत आहे.

लेखकाने पुढे मारीयाचे उदाहरण देऊन हे मांडले आहे की या साही सृष्टी बाह्य जगतात अस्तित्वात नसून आपण मनोव्यापारांच्या पातळीवर सतत यापैकी कोणती ना कोणती सृष्टी अनुभवत असतो. कधीकधी तर एका दुपारीत या साही जगातून आपण फेरफटका मारून येतो. कसे ते मारीयाच्या उदाहरणातून लेखक स्पष्ट करतो.

मारीयाची कहाणी पाहू. मारीया जिममधून नुकतीच घरी परतली आहे. आज वर्कआऊट चांगले झाल्याने ती स्वतःवरच बरीच खूष आहे. मारीया काँप्युटर प्रोग्रॅमर आहे. ८ तास बैठे काम करून करून आखडलेल्या स्नायूंना पूर्ववत करण्यासाठी मारीया नेहमी जिममध्ये जाते. तिचा तो आवडता छंद आहे. खरं तर तिचा बॉयफ्रेंड आज कामानिमित्त दुसर्‍या गावी गेल्याने मारीया एकटी आहे आज ती फक्त पिझ्झा-बीअर चापून झोपू शकते. अरे हे काय मारीयाला आठवले की तिने आजच एक नवीन सँडल्सचा जोड घेतला आहे. ती पिशवीतून तो जोड बाहेर काढून निरखू लागते. पण ती खूष का दिसत नाही? या महीन्यातला तिचा तीसरा जोड आणि एकूण संग्रहातला ३२ वा. बाप रे! तिला स्वतःलाच शंका येते की तिला खरेदीची OCD आहे की काय? दर वेळेला हे असेच होते नवीन जोड ती विकत घेते खरी पण घरी आल्यानंतर त्या जोडाचे आकर्षण, नावीन्य ओसरून गेलेले असते. कधी तिला टाच फार ऊंच वाटते तर कधी रंग अनाकर्षक वाटू लागतो. गंमत म्हणजे या तृटी दुकानात तिच्या लक्षात येत नाहीत. आजही तेच घडलं आहे. साधारण अशाच फॅशनचा जोड तिच्याकडे आहे असे तिचे दुसरे मन सांगू लागले आहे. हेच $९५ तिने जर एखाद्या गरजू व्यक्तीला दिले असते तर? तिचे मन तिला खात आहे. रोज तर कोपर्‍यावर अनवाणी भिकारी तिला दिसतो.गुन्हेगारी भावनेने घेरलेली मारीया उठून कपडे वॉशींग मशीनमध्ये टाकते व परत कॉप्युटर उघडून मेल्स पाहू लागते.
कमी पगाराची ही नोकरी तिने केवळ फ्लेक्झिबल तासांकरता स्वीकारली आहे. पण सध्या कंपनीत कामाचा ताण इतका आहे की तिला दिवसाचे ८ तासही कमी पडत आहेत वर पगार कमी तो कमीच व पगारी रजाही कमी आहेत. कालच तिने तिच्या टीम लीडर सहकार्‍याला टोनीला पगारवाढीसंदर्भात विनंतीवजा मेल पाठवली. मारीयाच्या हाताची बोटी, मनगटही आजकाल दुखते. नक्की कार्पेल टनेलची लक्षणे. अरे हे काय ... टोनीने मेलला उत्तर तर पाठविले आहे पण पगारवाढ तर सोडाच त्याने तिला कामात चूका टाळण्याबद्दल ताकीद दिली आहे. नालायक आहे टोनी. लायकी नसताना लीडर झाला आहे. कंपनीदेखील बकवास आहे. काम करणार्‍या लोकांची शोषण करणारी ही कंपनी खरं तर तोट्यात गेली तर बरं होईल. आता मारीयाचा रागाचा पारा वाढू लागला आहे. ती या पिळवणूकीविरुद्ध कंपनीला कोर्टात खेचणार आहे, नाही नको त्यापेक्षा असे शोषण होणार्‍या पीडीतांची वेबसाईटच ती सुरु करेल. मग कंपनीची लक्तरे काढून पैसे मिळवेल. छे छे काहीतरी केलेच पाहीजे. मारीया रागाच्या तीरमीरीत घराबाहे पडते व नेहमीच्या बागेच्या दिशेने निघते.
पण थंडगार वार्‍याने तिचा संताप हळूहळू निवळत चालला आहे. हिरवी झाडे, पक्षी, बागेत खेळणारी लहान मुले तिला प्रसन्न करु लागली आहेत. कदाचित मगासचा राग अनाठायी होता. घरी गेल्यावर मैत्रिणीला फोन करण्याचे मारीया ठरवते. या मैत्रिणीची साईट आहे. मारीया स्वतः काढलेली चित्रे या साईटवर प्रदर्शित करु शकेल. तिच्या चित्रकल्च्या छंदातून वरकमाईही होईल व समाधानही मिळेल. वा काय सुरेख बेत आहे. मारीया आशावादी मनस्थितीत परत घराकडे वळते.

वरील उदाहरणात मारीयाचा प्रवास साही लोकातून कसाकसा होत गेला ते आता पाहू. ८ तास काम करून मेंदू आणि शरीर बधीर झालेली मारीया थकून गेलेली होती. तिला इतकी मरगळ आलेली होती की पिझ्झा खाणे व झोपणे यापलीकडे विचारही ती करू शकत नव्हती. ही तिची मनस्थिती "पशूलोकाचे" प्रतिनिधीत्व करते. पशूंना आहार, मैथुन, निद्रा यपलीकडे गरजा नसतात. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणे व नंतर खाऊन पीऊन निवांत झोपणे यापलिकडचा विचार मारीयाला शिवत नव्हता.
आपला पशूलोकात वावर असण्याची चिन्हे -
(१)दिवस दिवस कामाचा रगाडा उपसण्यात जीवनातील आनंदास मुकणे
(२) सुट्टीच्या दिवशी बधीरपणे बाजारहाट करून उरलेला काळ खाणे व झोपणे यात घालविणे
(३) घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे राबणे

पिशच्चलोक - ३१ सँडल्स असतानाही दुपारी मारीयाने अजून एक जोड खरेदी केला व नंतर पस्तावली ही तिची मानसिक अवस्था पिशच्च्लोकाचे प्रतीकच आहे.
"वखवख" हा पिशाच्चांचा स्थायीभाव असतो. थुलथुलीत पोटाची व बारीक मानेची, भकास डोळ्यांची पिशच्चे जे काही खातात पीतात त्याचे राखेत अथवा घाणीत रुपांतर होते. कधीही तृप्ती न मिळणारे हे जीव समाधानाच्या शोधात भटकत राहतात.
आपला पिशाच्च्लोकात वावर असण्याची चिन्हे -
(१)गरज नसताना केवळ सेल लागला आहे म्हणून किंवा साथवायच्या हेतूने वस्तू जमवित बसणे
(२)उधळपट्टीवर संयम ठेवायचा तर आहे पण काही केल्या जमत नाही.
(३)कोणत्याही प्लॅनींगशिवाय अचानक आपण मोठे खर्च काढतो, हुक्की आली खर्च केला असे वारंवार होते.
(४)बचत करण्याचा रोज निश्चय तर करतो पण तो पूर्ण कधीच होत नाही.

नरकलोक - मारीया भिकार्‍याचा विचार करीत जेव्हा स्वतःला दूषणे देते, स्वताडन करते, गुन्हेगार वाटून घेते तेव्हा तिचे मनोव्यापार हे नरकलोकाचे प्रतिनिधीत्व करतात. तिला खूप यातना होत असतात पण ती काहीच करू शकत नाही.
आपला नरकलोकात वावर असण्याची चिन्हे-
(१) मानसिक छळ होणार्‍या प्रकल्पावर आपण काम करत असतो.
(२)कामापासून सुटका मिळावी अशी तीव्र इच्छा आपल्याला सतत होते
(३)केवळ दारीद्र्याच्या काल्पनिक भीतीपोटी आपण काम करत राहतो.
(४)छळवादी बॉस/सहकार्‍यांना रोज तोंड द्यावे लागते, कामावर असमाधान असते.

असुरलोक - जेव्हा मारीयामध्ये सूडबुद्धीचा प्रदुर्भाव झाला व सूडभावनेने तिचे मन पोखरुन निघाले तेव्हाची मारीयाची मनस्थिती असुरलोकाचे प्रतिनिधीत्व करते.
राक्षस हे देवांचे स्पर्धी. अमृतातील वाटेकरी पण जिथे देवे हे प्रयत्नांनी अमृत मिळवू पाहतात तिथे राक्षस नुसतेच इर्ष्येने व हिंसक वृत्तीने विरोध करतात्.स्पर्धा, मत्सर, सूड, हिंसा आदि नकारात्मक भावनांनी पछाडलेले जीव फक्त देवांचे अमृत हिसकवू इच्छितात.
आपण राक्षसलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
(१)नोकरीचे ठीकाणी अन्य सहकार्‍यांचे पाय खेचत बढती मिळवण्याचे प्रयत्न आपण करतो
(२)आपल्याला इतरांची प्रगती बघवत नाही
(३)भीतीचा बडगा दाखवत व्यवस्थापन करण्याकडे आपला कल असतो
(४)आपल्याला प्रतिष्ठेचा बडेजाव करणार्‍या वस्तू वापरायला आवडते.

देवलोक - फिरता फिरता मारीया परत शांत झाली , तिला पक्ष्यांचा, मुलांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला, ती निसर्गाचा आस्वाद घेऊ शकली. ही तिची क्षणभंगुर पण आनंदी मनस्थिती देवलोकाचे प्रतिनिधीत्व करते.
देवयोनीतील लोक हे पॅसिव्ह गायनवादनादि कलांचा उपभोग घेण्यात मग्न असतात. पण ही स्थिती फार काळ टिकू शकत नाही.
आपण देवलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
(१)केवळ आकर्षक वाटली म्हणून सौंदर्यासक्त होऊन आपण एखादी वस्तू विकत घेतो
(२)आपले काम(व्यवसाय)आपल्याला निरंतर आनंद देते
(३)काम करून आपल्याला एक प्रकारची तृप्ती, आनंद मिळतो

मनुष्यलोक-मनुष्यलोकाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सुख-दु:ख यांचे संतुलन असते. या मिश्र भावना आपल्याला अनुभवण्यास मिळतात. विवेक आणि निर्णयाचे स्वातंत्र्य आपल्याला असते. मारीया जेव्हा मैत्रिणीच्या साईटवर स्वतःची चित्रे टाकण्याचा "निर्णय" घेते तेव्हा ती मनुष्यलोकात भ्रमण करत असते.
आपण आपल्या आर्थिक व्यवहारासंबंधी मनुष्यलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
(१)आपली आर्थिक स्थिती आनंद व दु:ख अशा मिश्र भावनांना जन्म देते
(२) ना आपण सुखाने भ्रमित होतो ना दु:खाने बावरून जातो
(३)काम आणि फावला वेळ दोहोंचा समन्वयाने उपभोग आपल्याला घेता येतो
(४)आपले सहकार्‍यांशी मित्रत्वाचे संबंध असतात. आपल्या व्यवसायातून आपली क्षितीजे विस्तारतात
(५)आपल्या पैशाचा विनियोग आप्त, स्नेही, समाज सार्‍यांसाठी केला जातो

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)