दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१३

नमस्कार,

'ऐसी अक्षरे'चे सदस्य आणि वाचकहो,

वेगवेगळ्या विषयांमधल्या आपल्या नानाविध लिखाणावाटे तुम्ही आजवर जी साथ केलीत आणि करत आहात त्याचं आम्हाला मोल वाटतं. गेल्या दिवाळीप्रमाणे ह्या वर्षीदेखील दिवाळी अंक काढावा असा आमचा विचार आहे. तुमच्यासारख्या गुणीजनांच्या उत्तमोत्तम लिखाणाशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. ह्या दिवाळी अंकात तुम्ही लिहावं अशी विनंती प्रस्तुत आवाहनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत.

दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा एक विचार आहे. इथे उल्लेख केलेल्या संकल्पनेवरच तुम्ही लिहायला हवं असं बंधन नाही. अंकाचा काही भाग ज्या संकल्पनेवर आधारित असेल ती ह्या धाग्यात खाली दिलेली आहे. मात्र हा अंक केवळ त्याच विषयाला वाहिलेला असणार नाही. अंकाचा सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग ह्या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. बाकीचा अंक विविध साहित्यानं नटलेला असेल. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं समजू नये. ललित/वैचारिक लेख, कथा, कविता, व्यक्तिचित्रं, फोटो, चुटके, व्यंगचित्रं, चित्रं आणि अन्य संकीर्ण प्रकार ह्या साऱ्यांचं स्वागत आहे. 'ऐसी अक्षरे'वर वेळोवेळी सादर केली गेलेली चित्रं आणि छायाचित्रं (फोटोग्राफ्स) वगैरेंद्वारे विविध प्रकारच्या दृक-श्राव्य कलांना आणि त्यांच्या समीक्षेलाही व्यासपीठ मिळावं असा आमचा प्रयत्न असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. ह्या प्रकारचं काही साहित्य असेल तर तेसुद्धा पाठवा.

आणखी एक नोंदवण्यासारखी गोष्ट - आम्हाला हा अंक म्हणजे कागदी दिवाळी अंकांची डिजिटल आवृत्ती अशा मर्यादित स्वरूपात सादर करायचा नाही. इंटरनेटच्या माध्यमात लिखित शब्दापलीकडे कितीतरी अधिक सामावता येतं. ह्या बलस्थानाचा शक्य तितका वापर करण्याचा मानस आहे. तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन, चलतचित्र, अ‍ॅनिमेशन, संगीत अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं. त्या दृष्टीनं तुम्हाला विनंती आहे की तुमचं योगदान देताना निव्वळ लिखित शब्दांचाच विचार करण्याची गरज नाही. ह्या अनुषंगानं तुमच्या आणखी काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचंही स्वागत आहे.

ललित किंवा अन्य प्रकारच्या लेखनातही काही फोटो, चित्रं, स्केचेस टाकण्याची इच्छा आहे, पण आपण चित्रकार/फोटोग्राफर नाही अशी अडचण असेल तर कृपया संपर्क साधावा. लिखाण पूर्ण झालेलं नसलं तरीही थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर काय प्रकारची स्केचेस/चित्रं टाकता येतील ह्याचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल.

कालमर्यादा - सप्टेंबर अखेरपर्यंत १५ ऑक्टोबरपर्यंत साहित्य द्यावं.
लिखाण कुठे पाठवावं किंवा अधिक वेळ हवा असल्यास - 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोप पाठवावा.
*---*---*

अंकाचा विषय - आपला कलाव्यवहार आणि आपण

भारतीय सिनेमाला शंभर वर्षं झाली म्हणून त्याचा उत्सव सध्या चालू आहे. ह्या शंभर वर्षांत भारतीय माणसाचं एकंदर कलाव्यवहाराशी असलेलं नातं पुष्कळ बदललेलं आहे. सिनेमा ह्या नव्या माध्यमानं त्या बदलाला मोठा हातभार लावला, पण त्यामागे इतर घटकही होते. उदाहरणार्थ, गेल्या शंभर वर्षांत तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळेही हे नातं आमूलाग्र बदललं. समाजात हे बदल वेगवेगळ्या प्रकारे झिरपले. ह्या वर्षीच्या 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात कलाव्यवहारातल्या ह्या बदलांकडे अनेक अंगांनी पाहायचा प्रयत्न करावा असा विचार आहे.

बदललेली कलानिर्मिती
पूर्वी व्यवसायाचा संबंध जातीशी असल्यामुळे कलानिर्मिती ही विशिष्ट समाजघटकांपुरती मर्यादित गोष्ट होती. कलाकार लोक हे गावकुसाबाहेरचे मानले जायचे. एखादा ब्राह्मण शाहीर झाला तर ती त्याच्या घरात नाचक्कीची बाब समजली जायची (पण संस्कृतप्रचुर पंतकाव्य करणं अप्रतिष्ठेचं नसे). आता दीक्षितांची माधुरी ही एकाच वेळी धकधक गर्ल आणि रोल मॉडेलही असते. कॉलनीतल्या गणेशोत्सवात सुशिक्षित आईवडिलांच्या प्रोत्साहनानं मुलं लेटेस्ट आयटेम नंबर्स सादर करतात. एकेकाळी ठुमरी ही कोठ्यावरच गायली जात असे. आज पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात तमाशाचे कार्यक्रम होतात, आणि ते पाहायला लोक सहकुटुंब जातात. थोडक्यात, कलांना पूर्वीपेक्षा कमी उपेक्षा आणि अधिक प्रतिष्ठा आता मिळते.

कलाकारांच्या समाजातल्या प्रतिमेत इतर बदलदेखील झाले. एकेकाळी कवी म्हणजे मनस्वी, एकांडा वगैरे असतो अशी रोमॅन्टिक कल्पना होती. आताचे कवी रंगमंचावर आपली कला सादर करतात, टीव्ही आणि फेसबुकवर वावरतात आणि आपल्या कलेचं लीलया मार्केटिंग करतात. हीच बाब सर्व क्षेत्रांतल्या कलाकारांना लागू होते. ट्विटरवर कुणाचे किती फॉलोअर्स हे आज जगजाहीर असतं आणि कलाकाराची लोकप्रियता त्यावरून जोखली जाते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कलानिर्मिती आणखी सोपी झाली. छायाचित्रं किंवा सिनेमा यांसारखी तंत्राधिष्ठित कलामाध्यमं त्यामुळे आता अधिक माणसांच्या आवाक्यात आली आहेत. म्हणजे कलानिर्मितीचं लोकशाहीकरण झालं.

बदललेला कलास्वाद
कलानिर्मितीत बदल झाले तसेच कलेचा आस्वाद घेण्यातही मोठे बदल झाले. बहुजनांनी तमाशाचा आस्वाद घ्यायचा, अन् अभिजनांनी शास्त्रीय संगीत आपलं मानायचं अशांसारखे वर्गसंकेत पूर्वी असत. आता सिनेमा हे एकच माध्यम अभिजन आणि बहुजन दोघांना आवडू शकतं. किंबहुना, एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय लोकांना एकत्र आणणारी सिनेमा ही पहिली कला होती. कोणताही कलाप्रकार किती लोकांपर्यंत पोहोचू शके ह्यावर पूर्वी मर्यादा होत्या. शब्दाधारित कलाप्रकारांना भारतीय भाषाविधतेची मर्यादा पडे, तर नृत्यनाट्यादि प्रयोगक्षम कलाप्रकारांना (परफॉर्मिंग आर्टस) स्थळाकाळाची बंधनं होती, वगैरे. सिनेमाचं तंत्रज्ञानच असं होतं, की देशभर आणि परदेशात एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करणं शक्य झालं. बालगंधर्व कितीही लोकप्रिय झाले, तरी त्यांच्या लोकप्रियतेची तुलना अमिताभ बच्चन किंवा रजनीकांतच्या लोकप्रियतेशी त्यामुळे करता येत नाही. त्यात सिनेमाच्या दृकश्राव्य स्वरूपाला रेडिओ किंवा ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान आदींची जोड लाभल्यामुळे सैगल, नूरजहॉं, रफी, किशोर, लता, आशा अशा पार्श्वगायकांनाही अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. भावगीतं, गझला वगैरे प्रकारही लोकप्रिय झाले. टेलिव्हिजन आणि उपग्रह तंत्रज्ञानामुळे नृत्य किंवा नाटकासारखे कलाप्रकारसुद्धा एकाच वेळी पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचू लागले. थोडक्यात, कलास्वादातले बदल सिनेमापासून सुरू झाले, तरी फक्त सिनेमापुरते मर्यादित राहिले नाहीत; इतर कलाप्रकारदेखील तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आज अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात. हे एक प्रकारे कलास्वादाचंही लोकशाहीकरण होतं. पण त्यामुळेच अभिजातता आणि लोकप्रियता यांच्यातलं पूर्वीपासूनचं द्वंद्व अधिक टोकदारही झालं.

एकेकाळी दूरवर चाललेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागायचा, किंवा त्या पोहोचतच नसत. आता गूगल आर्ट प्रोजेक्ट, यूट्यूब, नेटफ्लिक्स, किंडल, पायरेटेड सिनेमे/पुस्तकं अशा माध्यमांतून कलाकृती सहज उपलब्ध होतात. मोठ्या पडद्यावर थ्री-डीमध्ये सिनेमा पाहता येतो तसाच तो मोबाईलच्या पडद्यावरदेखील पाहता येतो. कला लोकाभिमुख झाल्या तसे कलाकारदेखील लोकाभिमुख झाले. आजचा सर्वसामान्य रसिक कलाकाराशी संवाद साधू शकतो. इमेल, फेसबुक अशा माध्यमांद्वारे हे होतं; साहित्यसंमेलनांसारख्या निमित्तानं किंवा नवीन पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी लेखक रसिकांशी संवाद साधताना आजकाल दिसतात.

थोडक्यात, गेल्या शंभर वर्षांत सर्वच कलाप्रकारांच्या निर्मितीत आणि आस्वादात मोठा आणि अनेक प्रकारचा फरक पडला.

ही सगळी अंकाच्या विषयाची पार्श्वभूमी झाली. पण अंकात तुम्ही कसे सहभागी होऊ शकता?

व्यक्तिगत प्रवास

 • एक व्यक्तिगत आस्वादक म्हणून तुमचं कोणत्या कलाप्रकाराशी कसं नातं आहे ते तुम्ही सांगू शकता.
 • ह्यात आवडता कलाप्रकारच यायला हवा असं नाही; तुम्ही नावडीबद्दलही सांगू शकता.
 • ह्या विषयावर गांभीर्यानं आणि फार विश्लेषणात्मकच लिहायला हवं असं नाही. लिखाण हलकंफुलकंदेखील असू शकतं. म्हणजे 'बाथरुम सिंगिंगमधून मला मिळणारं समाधान' किंवा '(जळ्ळी मेली) कुटुंबसंस्था उर्फ आमच्या सिनेप्रेमाची चित्तरकथा'सारखा लेखदेखील त्यात बसू शकेल.
 • व्यक्तिगत अनुभवपर ललित लेख तुम्ही लिहू शकता - उदा : अभिजात संगीताकडे मी कसा वळलो, त्यातून मला काय मिळतं (मासल्यादाखल श्रावणची 'न आकळलेलं काही...' ही मालिका पाहा); किंवा अगदी 'मी पल्प फिक्शन का वाचतो?' किंवा 'मला सलमान खान का आवडतो?' ह्यासारखे लेखही त्यात बसतील.

सामाजिक प्रवास
शंभर वर्षं म्हटली, तर त्यात साधारण तीन-चार पिढ्या समाविष्ट होतात. त्या अनुषंगानं तुम्ही अशा गोष्टींविषयी सांगू शकता -

 • तुमच्या आजी-आजोबांची पिढी कोणता कलास्वाद आणि कसा घेत असे? त्यांच्या आयुष्यात कलेचं काय स्थान होतं?
 • आता एकविसाव्या शतकात वाढणारी तुमची मुलं कलेकडे कसं बघतात?
 • ह्या दोहोंच्या मध्ये असणाऱ्या तुमचं कलांशी नातं कसं घडत गेलं?
 • तुम्हाला वाढवताना तुमच्या पालकांनी आणि शिक्षकांनी काय कलासंस्कार तुमच्यावर केले? त्यामागचे आर्थिक, सामाजिक घटक कोणते होते?
 • वर उल्लेख केलेल्या आणि अशा इतर बदलांचा तुमच्यावर आणि तुमच्या परिसरावर काय चांगलावाईट परिणाम झाला?
 • तुमच्या परिसराचा तुमच्या कलाजाणिवांवर कितपत परिणाम झाला?
 • त्यातलं काय तुम्ही स्वीकारलं? काय नाकारलं?
 • तुम्ही आपल्या मुलांवर किंवा तुमच्या परिघातल्या इतरांवर काय कलासंस्कार करता?
 • त्यातलं ते काय स्वीकारतात? आणि काय नाकारतात?

अशा काही गोष्टींचा तुमच्यापुरता आढावा तुम्ही घेऊ शकता, आणि अर्थात त्यातून काही व्यापक सामाजिक मुद्देसुद्धा मांडू शकता. वरचं विवेचन तुम्हाला पटायला हवंच असंही नाही. तुमची त्यापेक्षा काही वेगळी भूमिका असली, तर तीदेखील तुम्ही विशद करू शकता.

धन्यवाद,
संपादन मंडळ, 'ऐसी अक्षरे'.

अद्ययावत - लिखाण कुठे पाठवावं ही माहिती आता दिली आहे.

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

अंतिम तारिख बदलली

ज्यांनी आतापर्यंत साहित्य पाठवले आहे त्यांचे अनेक आभार.

मात्र, दिवाळी अंकासाठी काही सदस्यांना अजूनही साहित्य पाठवायचे आहे, त्यामुळे अंतिम तारिख बदलत आहोत.
आता साहित्य १५ ऑक्टोबर २०१३ पर्यंत पाठवता येईल याची नोंद घ्यावी.

त्याहुन अधिक वेळ आवश्यक असल्यास 'ऐसी अक्षरे' ला व्यक्तिगत निरोप पाठवल्यास अधिक वेळ देता येईल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाबार्स.

हाबार्स.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दिवाळी आलीसुद्धा ?

बरीच आधी घोषणा केली आहे....भरपूर प्रतिसाद मिळो अशी सदिच्छा आणि संपादकांना शुभेच्छा ! विषय आवडला.

लघु नितंब उप्स सॉरी निबंध चांगला लिहिलाय .

"दिवाळी अंकासाठी आवाहन २०१३" या गुंतागुंतीच्या Shock कठीण विषयावर " हळक्षज्ञ " यांनी
लघु कादंब्री येवढा थोरला लघु नितंब Love उप्स निबंध Glasses अतोनात परिश्रम घेऊन लिहिला
आहे . त्याचे जितके कमी कौतुक करावे (जीभ दाखवत) तितके जास्तच (डोळा मारत) होईल . अन्दाजे एक वर्षापासून Sad(
त्यांनी या निबंधाच्या कामाला वाहून घेतले होते असे ठोकिंग न्यूज मध्ये सांगितले . (दात काढत)

एक शंका

> तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन … अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं.

माझ्या अज्ञानाची मला शरम वाटते, पण अभिवाचन म्हणजे काय? अभिनयासह प्रकट वाचन असं तर नाही ना?

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

वाचिक अभिनय

अभिवाचनामध्ये प्रकट वाचन तर अपेक्षित आहेच शिवाय 'वाचिक अभिनय' अभिप्रेत असतो.
गेल्या दिवाळी अंकात मी नंदनच्या ब्लॉगवरील एका लेखाचे अभिवाचन करण्याचा प्रयत्न केला होता. तो इथे ऐकता येईल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!