SHIP OF THESEUS

काल SHIP OF THESEUS हा सिनेमा बघण्याचा योग आला. अनेक जणांकडून हा सिनेमा चुकवू नकोस असं सांगण्यात आलं होतं. एकदा जाऊन तिकिटं न मिळणं हा सुखद धक्का देखील बसला होता. कालही सिनेमा हाऊस फुल्ल होता. एका ठिकाणी वाचलं होतं की पहिल्या विकांता चं कलेक्शन अंदाजे २५ - २७ लाख झालं . हा देखील एक सुखद धक्का . कारण याच आठवड्यात निखिल अडवानी चा D-DAY प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला आलेला प्रेक्षक वर्ग हा सिने आणि जाहिरात व्यवसायाशी निगडित असणारा होता आणि काही माझ्या सारखे चुकार लोक .
या सिनेमात तीन कथा आहेत. आलिया नावाच्या अंध फोटोग्राफर मुलीची पहिली कथा आहे. जेंव्हा तिचे डोळे जातात तेंव्हा ती फोटोग्राफी सुरू करते. तिची फोटो काढण्याची पद्धत , ते एडिट करण्याची त-हा विलक्षण आहे . त्यात तिला तिच्या बॉयफ्रेंड ची मदत असते . ऐकू येणारे ध्वनी ,अंतःस्फूर्ती या दोन गोष्टींची ती मदत घेते. घटनांवर संपूर्ण ताबा असावा अशी कुठल्याही कलाकाराची तीव्र इच्छा असते . तशीच ती आलीया ला देखील आहे. डोळ्यांचा अभाव हा एखाद्या फोटोग्राफर ला अडचणीचा ठरला असता तर इथं तोच तिचं बलस्थान ठरतो. तिचं डोळ्याचं ऑपरेशन होतं. तिची दृष्टी परत येते . पण ती पूर्वी सारखे फोटो काढू शकत नाही .

दुसरी कथा मैत्रेय नावाच्या जैन साधूची आहे. हा औषधं बनवतांना मूक प्राण्यांवर केल्या जाणा-या अत्याचाराच्या विरोधात लढत असतो. त्याला सि-होसिस ऑफ लिव्हर हा रोग होतो. प्राण्यांवरच्या अत्याचारातून ही औषधं निर्माण झालेली असल्यामुळे तो औषधं घेत नाही . मरणाला टेकतो. चार्वाक नावाचा मित्र शेवटी त्याला लिव्हर ट्रान्सप्लाण्ट या ऑपरेशन साठी तयार करतो.

तिसरी कथा नवीन नावाच्या स्टोक ब्रोकर ची आहे. हा पैसे मिळवण्यात हुशार आहे. जीवना कडून त्याच्या माफक अपेक्षा आहेत. त्याचे आणि त्याच्या आजी चे यावरून खटके उडतात. याला काव्य शास्त्र विनोद इ . मध्ये अजिबात रस नाही . त्याचं ऑपरेशन होतं . किडनी ट्रान्सप्लाण्ट चं . दरम्यान त्याला कळतं की या अवयवाचा बाजार आहे. अवयव चोरले जातात . शंकर नावाच्या एका गरीब माणसासाठी तो लढतो.

शेवटी या तीनही कथा एकत्र सांधल्या गेल्या आहेत.

थिसियस जहाजाच्या फळ्या / ओंडके जसजसे खराब होत गेले तसतसे एक एक करून बदलले होते. एक वेळ अशी येते की मुलाची एकाही फळी / ओंडका शिल्लक रहात नाही . मग आता खरं थिसियस जहाज कोणतं ? जुनं की नव्या फळ्यांचं ? असा तात्विक प्रश्न (विरोधाभास ) उत्पन्न होतो. या ग्रीक मिथक कथे चा सिनेमा च्या सुरवातीला उल्लेख आहे . या सूत्रात तीन कथा गोवतांना जरा कठीण पडतं . अर्थात असं असंच पाहिजे असं नाही पण सिनेमा बघण्याची एक दिशा उगीचच दिल्या सारखी वाटते.

हा सिनेमा जगण्या बद्दल, कलेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करतो. कल्पित वस्तुस्थिती पूर्ण कह्यात नसेल तर कलाकाराला निर्मिती अशक्य होते असं विधान करतं .अर्थात असं असंच पाहिजे असं नाही पण सिनेमा बघण्याची एक दिशा उगीचच दिल्या सारखी वाटते .

या सिनेमाचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे छायाचित्रण . अतिशय सुरेख छायाचित्रण आहे. अनेक दृश्य मालिका बघत रहाव्या अश्या आहेत. कॅमेरा Hand Held आहे. त्यात संथ लय आहे. त्या अतिशय काव्यात्म आहेत. नेहेमीच्याच गोष्टी अतिशय वेगळ्या कोनांतून दाखवल्यामुळे एक Freshness आला आहे. अती समीप ( Extreme CloseUps) दृश्य आहेत . रंग संगती अनुरूप आहे . वेगळीच मुंबई बघतोय असं वाटत रहातं . डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी - पंकज कुमार

काही उदाहरणादाखल :
१) आलिया उडत्या पाखरांचे फोटो काढतांना .
२) दिसू लागल्यानंतर रस्त्याच्या मध्ये उभं राहून आलिया फोटो काढतानाची दृश्य.
३) मैत्रेय पांढरी शुभ्र धोती घालून सांडपाणी वाहून नेणा-या दोन भल्या मोठ्या पाईप लाईनी मधून चालत असताना.
४) मैत्रेय पवन चक्क्यांच्या मधून चालत जाताना - एक भली मोठी पंख्याची सावली फिरत रहाते.
५) मैत्रेय आजारी असतांना त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे Extreme closeups
६) कोर्टात Centipede चालतानाचा Exteme closeup - बाजूनं जाणारे वेगवेगळे बूट / चपला
७) नवीन मुंबईच्या बकाल वस्तीतून शंकर ला शोधायला जातांना दिसणारे जिने / शिड्या - अरुंद बोळकांडी
८) आलिया हिमालयात गेल्या नंतरची बर्फाच्छादित शिखरं
९) मैत्रेय आणि चार्वाक यांचा रस्त्यावरून चालत असतांना चाललेला संवादाचा शॉट - हा जवळजवळ दीड मिनिट चालतो.

या सिनेमाचं दुसरं बलस्थान म्हणजे संवाद . अतिशय खुसखुशीत आहेत . नर्म विनोदी आहेत . विशेषतः मैत्रेय आणि त्याचा मित्र चार्वाक यांचे संवाद. तत्वज्ञान या विषया वरचे हे संवाद अतिशय क्लिष्ट होऊ शकले असते. पण ते छान नर्मविनोदी आहेत.

तिसरं बलस्थान म्हणजे अभिनय . तीनही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणा-या कलावंतांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. तसे आलिया / मैत्रेय / नवीन यांच्या मित्राची भूमिका करणा-या नटांनी देखील चांगला अभिनय केला आहे. विशेष उल्लेख मैत्रेयाचं काम करणारा नट नीरज काबी .

आलिया / मैत्रेय/नवीन या तीनही व्यक्तिरेखा अतिशय मानवी आहेत . एक कलावंत एक साधू - म्हणजे काही एक वैचारिक पातळी असलेल्या या व्यक्तिरेखा आहेत . नवीन हा यात खरंतर न बसणारा आहे . तो कला साहित्य याचा गंध नसलेला आहे. एका टप्प्यावर या तिघांच्या आयुष्यात कलाटणी देणारे प्रसंग येतात. त्याला ते मानवी पणे सामोरे जातात. जगण्यातलं काही एक त्यांना कळतं . ते आपापल्या कुवती नुसार समजून उमजून घेतात . हे फार हृद्य आहे.

आता काही खटकलेल्या गोष्टी :
१) Continuity च्या चुका - हे टाळता आलं असतं. कारण ती प्राथमिक गोष्ट आहे
२) मैत्रेयाचॆ गोष्ट फार लांबली आहे . तिची लांबी कमी करता आली असती .
३) काही प्रसंग टाळता आले असते .
उदाहरणार्थ :
अ) नवीन आपल्या आजीला लघवी करण्या साठी Bedpan देतो तो प्रसंग - उगीचच (अती) वास्तववादी करण्याचा खटाटोप वाटला .
ब) मैत्रेयाला अनेक वेळा अनेक लोकेशन्स मध्ये चालतांना दाखवलं आहे- हे नेत्रसुखद असलं तरी एकंदर लय बिघडते असं वाटतं .
क) शंकर ला शोधण्या साठी केलेली बकाल वस्तीतली वणवण देखील थोडी कमी दाखवली असती तरी चाललं असतं - कारण पुन्हा एकंदरीत लय बिघडते .

असो.

आनंद गांधी याने ही गोष्ट लिहिली / दिग्दर्शित केली आणि विचाराला प्रवृत्त करेल अशी कृती निर्माण केली याबद्दल त्याचे अभिनंदन आणि धन्यवाद !

आनंद थत्ते
27/07/2013

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

सर्वप्रथम ऐसीअक्षरेवर स्वागत
समीक्षा आवडली.

मलाही चित्रपट अतिशय आवडला.
तुम्हाला न आवडलेल्या गोष्टींविषयी माझे मतः
१) Continuity च्या चुका - हे टाळता आलं असतं. कारण ती प्राथमिक गोष्ट आहे
>> याचे प्रसंग फारसे लक्षात आले नाहित. पण तसे दोष असल्यास सहमत व्हावे लागेल (व्यनी मधून तसे काही प्रसंग सांगता आले तर अधिक उत्तम)
२) मैत्रेयाचॆ गोष्ट फार लांबली आहे . तिची लांबी कमी करता आली असती .
>> गोष्ट लांबली असे वाटले नाहि पण चित्रपटाला मध्यंतर नको होता असे वाटले.

बाकी बेडपॅनच्या अतिवास्त्ववादी चित्रणाबद्दल सहमत. बाकी दोन प्रसंङ असल्याने लय बिघडल्यासारखी अजिबात वाटली नाही.

बाकी या चित्रपटाविषयी येथील चिंजंनी करून दिलेला परिचय आणि त्यावरील चर्चा इथे वाचता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या चित्रपटाबद्द्ल लिहिलेलं वाचते आहे तस तसं हा चित्रपट बघावा असं वाटतय. पण अशा चित्रपटांबद्द्ल मझ्या मनात थोडी धाकधूक असतेच.
धोबीघाट हा सिनेमा पहिल्या दहा बारा मिनिटांपुढे बघणं अशक्य झालं होतं. हा चित्रपट गोष्टींमुळे रंजक असावा त्यामानानी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोबीघाट हा सिनेमा पहिल्या दहा बारा मिनिटांपुढे बघणं अशक्य झालं होतं.
सहमत आणि सत्यकथन केल्याबद्दल अभिनंदन. अगम्य गोष्टींतून कलाकाराला अपेक्षित असलेले/ नसलेले अर्थ काढणार्‍यांच्या मांदियाळीत आपण अल्पमतात आलेलो आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

चिंज ह्यांनी अगदी अलीकडेच http://aisiakshare.com/node/1936 येथे ह्याच चित्रपटाविषयी लिहिले आहे आणि त्यावर बर्‍याच प्रतिक्रियाहि आल्या आहेत. हा आणि तो धागा एकत्रित वाचावे अशी सूचना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समिक्षा आवडली. एकदम मुद्देसुद लिहीलीय.
चित्रपट पाहीला नाही पण जेवढं वाचलय त्यावरुन काव्यात्मक आहे असं वाटतय, तीन कथांमधे तीन ऋतूंचा वापर वगैरे...
अवांतर: मला धोबीघाट आवडलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमा पाहिलेला नाही. आता कधी एकदा पाहतेयसं झालंय. अवांतराशी सहमत. 'धोबीघाट' इतका दुर्बोध होता काय? मला आवडलेला बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कलात्मक चित्रपट म्हणून शिप ऑफ थेसिअस बद्द्ल बोललं जातय म्हणून धोबीघाटचा उल्लेख रहावला नाही. तो दुर्बोध होता की नाही हे कळायला मी तो पहिला थोडावेळ सोडता पाहिलेला नाही...पण भयंकर कंटाळवाणा वाटला आणि पुढे काय होतं वगैरे उत्सुकताच उरली नाही हा माझ्यासाठी त्यातला मुख्य दोष होता.असो.
शिप ऑफ थेसिअस बद्द्ल उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>१) Continuity च्या चुका - हे टाळता आलं असतं. कारण ती प्राथमिक गोष्ट आहे<<

चुका काय होत्या?

>>२) मैत्रेयाचॆ गोष्ट फार लांबली आहे . तिची लांबी कमी करता आली असती .<<

हे सापेक्ष आहे. त्या गोष्टीची प्रकृती पाहता तिची नैसर्गिक लय संथच असावी असं वाटलं. त्यामुळे ती लांबी खटकली नाही. वर ऋषिकेशनं म्हटल्याप्रमाणे मध्यंतरामुळे तसं वाटलं असणंही शक्य आहे. मी आर्काइव्हमध्ये पाहिलेला आणि परदेशी महोत्सवांत दाखवलेला चित्रपट सलग होता. पॉपकॉर्न हादडण्यासाठी त्यात मध्यंतर घुसडलं असावं.

>>अ) नवीन आपल्या आजीला लघवी करण्या साठी Bedpan देतो तो प्रसंग - उगीचच (अती) वास्तववादी करण्याचा खटाटोप वाटला .<<

हा प्रसंग फार रोचक पद्धतीनं घेतला आहे असं मला वाटलं. त्याचं कारण -
प्रसंगाची पार्श्वभूमी - नवीनला 'पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाही' असं आजीनं चारचौघांसोबत म्हणणं.
संवाद – दुखावलेला नवीन आजीकडे तक्रार करतो. आजी-आई-तो ह्या सगळ्यांची इतकी वर्षं साचलेली भडास त्यातून निघते. म्हणजे एक उत्सर्जन समोर दिसतं ते शरीराचं आणि एक मनातलं. मनातल्या उत्सर्जनाचा केंद्रबिंदू 'इतरांसाठी काही करणं आणि स्वत:चीच काळजी घेणं ह्यापैकी काय योग्य?' ह्याभोवती फिरत राहतो.

हे सर्व संवादात चालू असताना नवीनला आजीची अडचण न सांगता कळते आणि तिला तो अडचणीतून सोडवतोही. आजीचं सर्व करताना तो अतिशय सहज असतो. म्हणजे घृणाही दाखवत नाही, आणि आपण इतर कुणासाठी काही तरी महान सेवा वगैरे करतो आहोत असा आवेशही दाखवत नाही. हा सहजपणा त्याच्या व्यक्तिमत्वाची कळ आहे. तो फार काही आयुष्याबद्दल तत्त्वचिंतन वगैरे करत नसेल असा, म्हणजे आधीच्या कथांमधल्या आलिया, चार्वाक, किंवा मैत्रेय ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे. आणि तरीही हे त्याचं नैसर्गिक वागणं अतिशय हृद्य आहे. हा प्रसंग नसता, तर त्याचं नंतरचं वर्तन आणि शेवटी आजीचं त्याला समजावणं ह्यांची संगत पुरेशी लागली नसती. आणि हे खास भारतीय आहे. म्हणजे चार बुकं न शिकलेल्या एखाद्या साध्या माणसापाशी जे शहाणपण असतं त्याचा तो प्रत्यय आहे.

>>ब) मैत्रेयाला अनेक वेळा अनेक लोकेशन्स मध्ये चालतांना दाखवलं आहे- हे नेत्रसुखद असलं तरी एकंदर लय बिघडते असं वाटतं .<<

नेत्रसुखद असणं ही सिनेमाच्या आशयासाठी मूलत: चांगली (किंवा वाईटही) गोष्ट नाही. प्रश्न हा आहे की चित्रचौकटीमधून काही भाव किंवा आशय व्यक्त होतो का?

उनपावसाची तमा न करता चालत राहणारा मैत्रेय आपली मतं आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आणि तरीही तो शांत नाही, तर कशाच्या तरी शोधात आहे. कधी त्याची द्विधा मन:स्थिती दाखवण्यासाठी ह्या चित्रचौकटी उपयोगी पडतात (उदा : पाईपमधून जातानाची चौकट); तर कधी तो निसर्गापुढे आणि तंत्रज्ञानापुढे किती खुजा होतो ते दाखवतात (उदा : पवनचक्क्यांखालून जातानाची चौकट). तर कधी इतरांची चाल त्याच्या तत्त्वभूमिकेला छेदते (मायक्रोस्कोपखालचे आदिजीव आणि ते त्याच्या शरीरातसुद्धा आहेत ही जाणीव). ग्राफिटी, शहरातला बकालपणा अशा घटकांमधून हेच दिसत राहतं की त्याच्या परिसरात असलेल्या आणि पर्यायानं आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या अनेक गोष्टींचा त्यानं पुरेसा विचारच केलेला नाही. (त्याच्या शरीरात असलेले आणि आधुनिक ज्ञानामुळे दिसू लागलेले जंतूसुद्धा त्याच्या त्रुटी त्याला दाखवतात.) हे सगळं तो ज्या वातावरणातून चालत असतो त्याद्वारे सूचित केलेलं आहे. त्यात आधुनिक शहर येतं आणि निसर्गदेखील येतो. त्याची ही तगमग शेवटी एका म्हाताऱ्यानं विचारलेल्या प्रश्नाला त्यानं दिलेल्या उत्तरातून व्यक्त होते. (रहस्यभेद सुरू - प्रश्न : आत्मा आहे की नाही? उत्तर : माहीत नाही. - रहस्यभेद समाप्त) तत्त्वज्ञानात इतकी पायपीट करूनही मैत्रेयाला उत्तर मिळत नाही. उलट एवढ्या पायपिटीनंतर तो जिथे पोहोचतो (त्याचा आजार आणि त्यातून उद्भवणारी परिस्थिती) त्यामुळे त्याच्या पंथातल्या श्रद्धेविषयीच त्याच्या मनात साशंकता निर्माण होते.

>>क) शंकर ला शोधण्या साठी केलेली बकाल वस्तीतली वणवण देखील थोडी कमी दाखवली असती तरी चाललं असतं - कारण पुन्हा एकंदरीत लय बिघडते .
<<

इथेही पुन्हा वरचाच चित्रचौकटीचा मुद्दा लागू होतो. आयुष्याविषयी काही गहन हाती लागायला हवं तर प्रवास आवश्यक – मग तो तुमच्या मनातला असो की बाहेरचा. दृश्यभाषेमध्ये आणि साहित्यामध्येसुद्धा हा प्रवास बाह्य घटकांतून दाखवण्याची पध्दत आहे - अगदी युलिसिस, राम, पांडव अशा सगळ्या कथा काढून पाहा. (पाहा - रोड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा - भाग १, भाग २). इथेही दिग्दर्शक तेच करतो. बकाल झोपडपट्टीतला प्रवास आणि मग इतर प्रगत, पाश्चात्य देशांच्या तुलनेतही कमालीचा प्रगत असणाऱ्या स्वीडनमधला प्रवास ह्या सगळ्या दिव्यांतून पार पडल्यानंतर नवीनला काही तरी गवसणार असतं (रहस्यभेद सुरू - ते त्याला शेवटी आजीजवळ मिळतं - रहस्यभेद समाप्त). हा प्रवासच अंतर्मुख करतो. त्यामुळे तो हृद्यही आहे, आणि त्यामुळे तो कळीचाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संपूर्ण सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मैत्रेय आणि नवीन विषयी (बेडपॅन विषयी) लिहिणार होतो, पण चिजंनी आधीच फार छान लिहिलय. त्यामुळे +१ म्हणून थांबतो. नवीनचा सहजपणा खुपच हृद्य आहे. आणि त्यात आजीच "इतनाही कर सकते हो, बस!" हेची चपखल!

फेसबुकवर एका जाणत्या समिक्षकांनी नवीनची गोष्ट विनोदी असल्यामुळे रसभंग होतो असे लिहिलेय! असो!! मला खूप आवडला, चित्रपटांच्या फ्रेम्स इतक्या सुंदर आहेत की हा चित्रपट बघायला परत एकदा जाईनच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम दिग्दर्शकाच्या मनात शिरून चित्रपट पाहिला आहे असं वाटतय तुम्ही. शिकायला मिळतय नक्कीच या चित्रपटाबद्द्ल उलटसुलट वाचून.
प्रत्येक बारीक बारीक गोष्टीत अर्थ भरलेला (म्हणजे अर्थ माझ्यापर्यंत निदान थोडा पोहोचला असा) चित्रपट म्हणून मला पटकन फक्त 'डॉक्टर स्ट्रेंजलव...' आठवतोय किंवा 'द ब्लॅक अ‍ॅडर'ची सीरीज. प्रत्येकवेळी पहाताना नवा तपशील दिसतो त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट बघितलेला नसल्यामुळे धागा आणि प्रतिसाद वाचन टाळत होते. पण आता वाचलाच आहे तर दुसरी सबब शोधावी लागेल. आमच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचण्यासाठी बहुतेक अजून काही महिने लागतील, तोपर्यंत या चर्चेचे तपशील बहुतेकसे विस्मरणात गेले असतील.

एकंदर या संबंधातली चर्चा वाचून चित्रपट चुकवण्याचा प्रश्नच येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.