अ‍ॅन्झॅक् - लई झ्याक्

काही महिन्यांपूर्वी एका स्नेह्यांनी बिस्किटे आणून दिली - अ‍ॅन्झॅक् बिस्किटे. अमेरिकेतल्या मऊ-मऊ कुकीज् खाऊन वैतागलेल्या मला ही खुटखुटीत बिस्किटे एकदम आवडली.

इतिहास :
'अ‍ॅन्झॅक' नांवाची पूर्ण उलगड ANZAC = Australian & New Zealand Army Corps अशी आहे. पहिल्या महायुद्धात (२८ जुलै १९१४ - २१ नोवेंबर १९१८) जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरी राष्ट्रांनी त्यांच्या शत्रू-पक्षातील फ्रांस आणि ब्रिटिशांमधील भूव्यापाराची पश्चिमेकडे तर त्यांच्या रशियासोबतच्या भूव्यापाराची पूर्वेकडे कोंडी केली होती. फ्रान्स आणि ब्रिटिशांना रशियापर्यांत पोहोचण्यासाठी एक मार्ग शक्य होता. तो म्हणजे डार्डनेल् (Dardanelles) हा ऑट्टोमान (Ottoman) राजवटीखाली (आत्ताचा तुर्की) असलेला चिंचोळा जलमार्ग. हा 'भूमध्य' आणि 'काळा' या दोन समुद्रांना जोडतो. हा जलमार्ग उपलब्ध व्हावा म्हणून ब्रिटिशांनी ऑट्टोमानांशी केलेली राजकीय/व्यापारी बोलणी फिसकटली. मग तो जल आणि आजुबाजूचा भूभाग (गलीपली - Gallipolli) ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिश-फ्रांस आणि ऑट्टोमान मध्ये लढाई झाली. ती 'गलिपली बॅटल्' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या त्याकाळच्या ब्रिटिश वसाहतींतील सैनिक तैनात केले गेले. आता त्या सैनिकांच्या समस्त बायका, प्रेयस्या, माता, भगिनींना त्यांच्या खाद्य पुरवठ्याची चिंता खाऊ लागली. इतक्या दूरवर अन्न पाठवायचे तर असे काहितरी बनविले पाहिजे की जे नासणार नाही. पौष्टिक बिस्किटे हे त्यातलेच एक अन्न. तर जलवाहतुकीच्या दोन महिन्यांहून अधिकच्या काळात ही बिस्किटे खराब न होता टिकून राहवित, या दृष्टीने त्या महिलांनी आयरिश ओट्सपासून बनविलेल्या बिस्किटांची पाककृती थोडी बदलली. अंड्याचा बलक सांध-घटक (चिकटा / binding agent) म्हणून वापरला जातो पण अंडे वापरलेले पदार्थ इतका काळ टिकवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याला पर्याय शोधणे महत्त्वाचे होते. 'गोल्डन् सिरप्' हा पर्याय लागू पडला. मग ही नवी पाककृती वापरून अ‍ॅन्झॅक् बिस्किटे पाठवली गेली. या लढाईत फ्रांस-ब्रिटिश हरले. त्यात लढलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड मध्ये २५ एप्रिल हा दिवस 'अ‍ॅन्झॅक् स्मृतीदिन' म्हणून साजरा केला जातो.

हा सगळा इतिहास मला अजिबात माहीत नव्हता. ही बिस्किटे इतकी खुटखुटीत कशी ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. तर त्यात 'गोल्डन सिरप्'हा सर्वात कळीचा घटक. हे प्रकरण काय आहे तेही मला माहीत नव्हते. पण प्रयोगाची जबरा हुक्की आली होती त्यामुळे 'हटा सावन की घटा' म्हणत 'गोल्डन् सिरप्' ऐवजी मी मध वापरून पाहिला. छानच चालून गेला. तर करण्यास सोपी आणि चविष्ट अशी ही बिस्किटे कशी पाडायची ते आता पाहू.

--------
साहित्य
--------
सर्वहेतुपूरक पीठ (आपले 'ऑल् पर्पज़ फ्लार' हो Wink ! म्हणजेच मैदा ) : १ कप
पसरट ओट्स् : १ कप
बारीक किसलेले सुके खोबरे : १ कप
साखर (मातकट/पांढरी) : १/२ ते ३/४* कप गोडीनुसार
लोणी : ११० - १२० ग्रॅ.

गोल्डन् सिरप् / मध : २ टेस्पू.
पाणी : १ टीस्पू (नसले तरी चालते).
खायचा सोडा (सोडा बाय् कार्ब्) : १/२ टीस्पू.
मीठ : १/४ टीस्पू (नसले तरी चालते).
....

पाककृती :

मैदा, ओट्स्, साखर, खोबरे एका खोलगट अश्या भांड्यात एकत्र मिसळा.

एका कढईत लोणी वितळवा..........................................................................त्यात मध, पाणी मिसळा.

सोडा घाला........................................................................................................मिश्रण फसफसेल.

ते आधी तयार केलेल्या मिश्रणात ओता. .....................................................................सर्व एकजीव करा.

मिसळलेले आणि मळून काढलेले मिश्रण साधारण सुटे-सुटे कोरडेच असेल. पण गोळे करून थापता येतील इतके ओलसर असेल. फारच चिकट-ओलसर वाटले तर थोडे ओट्स घाला. फारच कोरडे वाटले तर किंचित लोणी वितळवून घाला. वर दिलेल्या प्रमाणाच्या मिश्रणातून साधारण १३ - १५ गोळे भाजायच्या ताटात थापता येतील असे पाहा.

बाजुबाजूला थापलेल्या ऐवजात दोन इंच (दोन अंगठ्यांची रुंदी मावेल इतकी) जागा ठेवा, कारण बिस्किटे भाजली जात असताना बर्‍यापैकी प्रसरण पावतात.

भट्टी १७५°-१८०° से. (३२५°-३५०° फॅ.) ला तापवून त्यात बिस्किटे साधारण तांबूस रंग येईपर्यंत १०-१२ मिनिटे भाजा.

भट्टीतून भांडे बाहेर काढून बिस्किटे हलकेच उचलून एखाद्या लाकडी पृष्ठभागावर ठेवा.

मग न्यूटनदेवाला पाचारण करा नि त्याच्या निवण्याच्या नियमानुसार थंड होऊ द्या. बिस्किटे भट्टीतून काढल्या-काढल्या मऊ असतात. ती थंड झाल्यावर घट्ट आणि खुटखुटीत होतात.


थंड झाली की बिस्किटे हादडायला तय्यार व्हा.

-----

मी एकदा मैदा न वापरता त्याऐवजी १-१.५ कप अधिक ओट्स् वापरूनही ही पाककृती करून पाहिली. तीदेखील छान झाली होती. थोडक्यात, प्रयोगांना भरपूर वाव असलेली ही पाककृती.

आता साखरेऐवजी गूळ, मधाऐवजी काकवी/मेपल् सिरप्/आगावे नेक्टर्, खोबर्‍याऐवजी तीळ, पसरट ओट्स्ऐवजी पोहे, भट्टीऐवजी मायक्रोवेव वगैरे वापरून आपापली प्रायोगिक आवृत्ती काढा आणि अ‍ॅन्झॅक् उत्सव सुरू करा !

------
तळटिपा :

१. 'पाडणे' या क्रियापदाचा नक्की कुठला अर्थ लावायचा ते कृती करणाऱ्याच्या सचोटीवर अवलंबून राहील Smile .
२. १ कप (अमेरिकी माप) = २४० मिलि = १६ टेस्पू.
३. या पेक्षा अधिक वेळ भाजल्यास बिस्किटे कडक होतात. तेंव्हा ते टाळा. अन्यथा बिस्किटाच्या आकारानुसार लगोरीसाठी उतरंड म्हणून, कोस्टर्स् म्हणून, टेबल-खुर्चीच्या आखूड पायाखाली टेकू म्हणून वा गाडी-गाडी करायला ही बिस्किटे उपयोगास येतील ;). याउलट कमी वेळ भट्टीत ठेवल्याने फारच मऊ झाल्यास हिरड्या शिवशिवणार्‍या आजी-आजोबांना वा बाळांना द्या आणि त्यांचा दुवा घ्या :).
* प्रतिसादकांच्या चवानुभवानुसार (;)) प्रमाण एका कपाहून कमी केले आहे.

------Ö------
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

छान पाककृती व तितकेच छान वर्णन. ('खुसखुशीत' हा शब्द टाळताना कळ अनावर झालेली आहे!) 'ऐअ' वर पाककृती वगैरे प्रसिद्ध होणे म्हणजे 'सत्यकथे'त वि.आ. बुवांची कथा येण्यासारखे. त्यामुळे अधिक अप्रूप वाटले.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वाह मस्तच दिसतायत बिस्किट!
आणि वर्णनपण झकास _/\_

===
Amazing Amy (◣_◢)

मस्तच दिसताहेत बिस्किटे, करून पहायला हवीत. गोल्डन सिरपऐवजी मध वापरलात हे चांगलंच केलंत, साधारणपणे त्याने प्रमाणात काहीच फरक पडत नाही शिवाय त्यामुळे स्वादही चांगला आला असेल. माझ्या माहितीप्रमाणे मध न खाणारे लोक त्याला पर्याय म्हणून गोल्डन सिरप वापरतात.

वाहवा!
अख्ख्या मैद्याऐवजी मी नाचणी सत्त्व किंवा राजगिर्‍याचे पीठ किंवा शिंगाड्याचे पीठ (मूडनुसार ज्या चवीचे खावेसे वाटेल ते) मैद्यामध्ये मिक्स करतो. जरा अधिक पैष्टिक! सुके खोबरे वापरून बघितलेले नाहि, आता बघेन. (एकदा ओले खवलेले खोबरे बटरवर किंचित परतून मग वापरले होते पण ती बिस्किटे लवकर संपवावी लागतात)

बाकी ओट्सना काही पर्याय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त ! प्रत्येक पायरीचे फोटोपण छान.

बिस्किटांची पाककृति उत्तमच आहे आणि छायाचित्रेहि सुंदर. अ‍ॅन्झॅक, गॅलीपली हे शब्द ऐकून मला वेगळीच आठवण झाली.

ही जागा डार्ड्नेल्स सामुद्रधुनीच्या काठावर ट्रॉय शहराचे उत्खनन चालू आहे त्या जागेच्या बरोबर समोर आहे. मी दोन वर्षापूर्वी ते उत्खनन बघण्यास गेलो असता इस्तनबूलहून निघालेली आमची बस ह्या गावापर्यंत आली आणि तेथून आम्ही फेरीबोटीच्या १० मिनिटांच्या प्रवासानंतर ट्रॉयच्या बाजूस पोहोचलो. आम्ही धरून एकूण ८ प्रवासी बसमध्ये होतो त्यापैकी आम्ही तिघे सोडता बाकीचे पाच ऑस्ट्रलियन होते. ते सर्व तरुणतरुणी त्यांचे पण्जे-खापरपणजे गॅलीपलीच्या लढाईत पडल्यामुळे ते स्थान पाहण्यास आले होते. ऑस्टेलिया-न्यूझीलंड सरकारांनी तेथे मोठे अ‍ॅन्झॅक स्मारक उभारले आहे आणि त्या देशांचे प्रवासी मोठ्या संख्येने तेथे येत असतात. तुर्की भाषेत ह्या गावाला 'गलिबोलू' असे म्हणतात आणि गॅलीपली हा त्याचाच अपभ्रंश आहे. सुंदर हवा आणि जवळच समुद्र ह्यामुळे सामुद्रधुनीचा सर्व किनारा हा एक मोठा vacation spot झाल्यासारखे वाटते आणि तुर्कस्तानच्या वाढत्या समृद्धीची थोडी कल्पना तेथील बंगले आणि रेझॉर्ट्स पाहून येते.

बिस्किटाच्या चवीत फारसा फरक पडत नाही परंतु घट्टपणात / खुटखुटीतपणात थोडा फरक पडतो असे वाटते, कारण या दोन्हींच्या प्रवाहीपणात थोडा फरक आहे. माझ्याकडचे गोल्डन सिरप थोडे अधिक दाट होते. त्यामुळे जे पाण्याचे प्रमाण आहे ते त्यानुसार कमी-ज्यास्त करावे लागेल, इतकेच. अर्थात ते सर्वस्वी प्रयोगानेच पडताळून पाहण्याचे आहे. म्हणूनच मी म्हटले आहे, की प्रयोगांना भरपूर वाव असलेली कृती आहे.

अवश्य ! मात्र मी धाग्यात म्हटल्याप्रमाणे तापमानावर नजर ठेवा. ती १०-१२ मिनिटे अतिशय महत्त्वाची आहेत. किंचित तांबुसपणा आला की लगेच बाहेर काढावी.

पौष्टिकपणासाठी सुकामेवाही वापरू शकता. प्रथम मी जिन्नसांत खोबरे पाहिले तेंव्हा मला अगदी हाच प्रश्न पडला होता, की ही बिस्किटे दोन-अडीच महिने कशी टिकणार ? मग नीट वाचल्यावर तो 'डेसिकेटेड् कोकोनट्' असल्याचे समजले. डेसिकेटेड् म्हणजे ज्यातून आर्द्रता काढून टाकली आहे असा. त्यामुळे ओल्या नारळाचा खवटपणा येत नाही. मी साधे सुकविलेले खोबरे किसून वापरले. ही खमंग बिस्किटे दोन अडीच महिने थोडीच फडताळात राहणार ? ती तर आठवड्यातच गट्टम् होतात :). त्यामुळे ती खरोखरीच किती टिकतात याचे उत्तर अजून गुलदस्त्यात आहे :). खोबर्‍यामुळे भट्टीतून असा काही खमंग दरवळ येतो की ज्याचे नांव ते !

ओट्सना पर्याय म्हणून धाग्यात मी पोहे सुचविले आहेत. पण मी अजून तो प्रयोग केलेला नाही. करून पाहा, कळवा.

फोटो बघुन खायची इच्छा झाली. Smile

ती बेकिंग डिश चिकार वापरलेली दिसते. या पाकृची काठिण्यपातळी किती?

पण पाकृ वाचून माझ्यासारख्या शॉर्टकटप्रेमी लोकांनाही हे जमेल असं दिसतंय. प्रयोग 'पाडल्यावर' गुरुदक्षिणा म्हणून धाग्यावर एक फोटो डकवण्यात येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ती बेकिंग डिश चिकार वापरलेली दिसते.
............होय. मालकिणबाईंची कृपा. भट्टी त्यांची. भांडी त्यांची.
यानंतरच्या पाककृती मी भांड्यात पार्चमेंट पेपर पसरून केल्या. त्यामुळे बिस्किटाचा तळ कडक न होता खरपूस व्हायला मदत होते.

या पाकृची काठिण्यपातळी किती?
........... चार जिन्नस मिसळणे, लोणी वितळविणे, मध-सोडा घालणे आणि मळणे यात कठीण काहीच नाही.
कौशल्य लागेल ते गोळे करून थापण्यात. ते कितीसे असणार ? त्याची हमी नसल्यास साचे वापरू शकता.
किंवा घरात/आजुबाजूस लहान मुले असतील तर त्यांना मळायचे, गोळे करायचे काम द्या. ती आनंदाने करतील.

सर्वात महत्त्व तापविण्याच्या काळाला आहे. ही पाककृती ''चला, बिस्किटे भट्टीत टाकली आता थोडी शिराझ घेऊन निवांत बसावे म्हणते'', अश्या स्वरूपाची नाही. ती १०-१२ मिनिटेच काय ती लक्ष देण्याची. नाहितर तळटीप - ३ भोगावी लागेल. Smile

घरात सगळे जिन्नस असल्यास ते जमविण्यापासून बिस्किटे भाजून काढायला जास्तीत ज्यास्त १ तास लागेल.

ती १०-१२ मिनिटेच काय ती लक्ष देण्याची.

१०-१२ मिनिटे!! मग काय जोजोकाकूंना जमायचे नाही. Wink

पाकृची शैली भारी आहे! मला काय बिस्किटं आवडायला नाहीत. पण पाहून खावीशी वाटताहेत, यातच फोटूंचं यश सामावलेलं आहे! Wink

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्यासारख्या आळशी लोकांसाठीच देवाने भट्टीला टायमर बसवून दिलेला आहे. Tongue

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि टायमरची बटने दाबायला / फिरवायला कुणाला बसविले आहे ? Tongue
'बर्‍या अर्ध्या'ला ?

बसण्याची पण सक्ती आहे
खाण्याची पण सक्ती आहे.

पाकृ फारच सोपी आणि लवचीक (अमुक नाही? तमुक घाला. तमुक नाही. ढमुक घाला.) वाटल्यामुळे शनिवारच्या आळसटलेल्या दुपारी ती प्रत्यक्षात आणण्यात आली.

ओट्स घरात होते. मध होता. पण मैदा नव्हता. बेकिंग सोडाही नव्हता. कणीक घालावी का, असा तडजोडीचा (उर्फ आरोग्याच्या कार्पेटाखाली आळस ढकलण्याचा) प्रयत्न करून पाहिला. पण बेकिंग सोड्यासाठी खाली उतरणे भाग असल्यामुळे 'खड्ड्यात गेलं आरोग्य, मैदाच घालणार' अशी बाणेदार घोषणा करून मैदाही आणण्यात आला. पांढरे लोणी नसल्यामुळे त्याऐवजी तूप घालावे का, असाही एक विचार मूळ धरत होता. पण अमूल बटर ही 'भारताची चव' शीतकपाटात मिळाल्यामुळे तुपास फाटा मिळाला. उरले खोबरे. सुक्या खोबर्‍याची वाटी डाळीत पहुडलेली मिळाल्यामुळे 'डेसिकेटेड कोकोनट' या कुगृहिणीनिदर्शकआधुनिकपाश्चात्त्य चाळ्याचीही बोळवण झाली आणि मी गप खोबरे किसून घेतले.

उत्साहाच्या भरात जिन्नस जमा करताना (आणि कधी नव्हे ते मापनकपातून मोजूनफिजून घेताना (आम्हांला 'एवढं आलं नि इतकं चिंचेचं बुटूक' घालायची सवय. त्या कपाचा वापर होतोय कधी?)) मोबाईलचा पडदा पुन्हा पुन्हा मिटत होता. त्या गोंधळात खोबरे, मैदा, साखर आणि ओट्स यांच्याबरोबरीनं लोणीही त्यातच ढकलल्याचे माझ्या लक्ष्यात आले, ते मधासाठी कढले तापत टाकल्यावर. मग मध करपू नये म्हणून आकाशवाणीचा डोळा चुकवून दोन चमचे तूप चक्क चोरून घेतले आणि त्यात मध घातला. थोडे पाणी आणि बेकिंग सोडाही घातला. ते प्रकरण चुकून-लोणी-मिश्रित-गोळ्यावर ओतल्यावर साधारण वरच्या फोटोतल्यासारखा एक ढीग मिळाला. मग तो मळून गोळे करायला घेतल्यावर प्रकरण फारच ओले झाल्याचे कळले. मग थोडे ओट्स ढकलले, तर गोळा भारीच कोरडा होऊन बसला. शेवटी मोदक करताना पारी फाटल्यावर बाहेरून ठिगळकाम करण्याचा थूकपट्टी अनुभव कामी आला आणि बिस्किटे वरवर तरी न भेगाळलेली जमली.

मग भट्टी. ती कधी कुणी पूर्वतप्तावस्थेत वापरली होती? म्हणजे त्या भट्टीपात्रासोबत तिची पुस्तिकाही शोधणे आले. (तोवर आकाशवाणीने काही खवचट उद्गार काढले होते. पण सध्या त्यात पडायला नको.) मग ती भट्टी पूर्वतप्त करायची म्हणजे नक्की कुठल्या कळी दाबायच्या त्याचे एक प्रात्यक्षिक करून झाले आणि सगळी सिद्धता झाली. बिस्किटे आत शिरली.

बरोब्बर १२ मिनिटांनी बाहेर काढून पाहते तो काय? पात्रातून उचलताही येईनात इतकी मऊ. दहा मिनिटे थांबले. (ही माझ्या दृष्टीने पदार्थ निवण्यासाठी वाट पाहण्याची परमावधी आहे.) तरीही मऊच. मग अभिमान गुंडाळून जाणकारांकडे पृच्छा केली. त्यावर 'दहा मिनिटं? खिक! तासभर कळ काढा.' असे आकाशवाणीला शोभेसे उत्तर मिळाले. तरीही त्यावर माझा विश्वास बसला नाही. फोटोतला रंग आणि माझ्या बिस्किटांचा रंग यांत कमालीचा वर्णभेद होता. धीर करून पुढचे घाणे प्रत्येकी १५ मिनिटांचे लावले आणि घरभर दरवळणारा सुगंध अनुभवत, घरातल्या इतर लोकांच्या संशयी मुद्रांकडे दुर्लक्ष्य करत दीड तास कळ काढली.

हे फलित.

ANZAC
अमुकरावांची झ्यॅक बिस्किटे

खुटखुटीत, कुरकुरीत आणि चविष्ट. गोडी मात्र अंमळ अधिक वाटली. ती कमी करायचा प्रयोग पुढच्या खेपेस करून पाहण्यात येईल.

अवांतर टिपा :
१. आमची बिस्किटे काही एकसारखी गोऽऽल नाहीत. शिवाय फोटोत बिस्किटांमध्ये आमचे फेमस इस्टमनकलरप्रेम दिसत आहे. तरी त्यावर जाऊ नये. चव उत्तम आली आहे. दुष्काळी महाराष्ट्रात इतपत भेगाळलेली बिस्किटे दिसली नाहीत तर पाकृकर्त्यास लाज वाटली पाहिजे.
२. लाकडी पृष्ठभागावर बिस्किटे ठेवण्यामागचे काय प्रयोजन असा प्रश्न पडून तणतणत मी "काय एकेक चाळे सांगतील! आता लाकडी पृष्ठभाग कुठून आणू? मरो, राहूदेत थाळीतच." अशी आदळआपट करत असतानाच मला माझा लाडका कापणीपाट मिळाला आणि मागाहून बिस्किटे त्यावरून उचलताना तुपाचे हेऽऽ एवढाले डाग दिसले. तेव्हा प्रयोजन कळले. तरी धागाकर्त्याची तणतणत माफी.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सध्या फक्त पोच. बाकी हसाहशी सवडीने.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उर्फ सुगरणीला सल्ला देण्याची काय टाप नाय आपली.

खुटखुटीत, कुरकुरीत आणि चविष्ट.
......ह्यातच भरून पावलो. Smile

. लाकडी पाटाचं प्रयोजन हे बिस्किटं हळूहळू थंड करण्यासाठी असतं. खरं तर जाळी असेल तर बरं पण बरेचदा लोकांकडे नसते म्हणून लाकूड. बिस्किटाचा तळाचा भाग इतर भागापेक्षा चटकन थंड झाला तर त्याचा पोत वेगळा नि बरेचदा कडक होतो नि बिस्किट एकसंध वाटत नाही. पण पाट अत्यावश्यक आहे असं नाही. तूप आयतंच शोषलं गेलं हे छानच झालं. लाकडाचा इथे होणारा आणखी एक उपयोग कळला. Smile

. भाजायला पार्चमेन्ट पेपर वापरत असाल तर बिस्किटं थाळीतून बाहेर काढायला सोपं जातं.

. २५ एप्रिलला अ‍ॅन्झॅक दिवस असतो. त्या दिवसापर्यंत अधिकाधिक लोकांनी प्रयोग करून पाहून आपापले अनुभव सांगितले तर मजा येईल.

या धाग्यावर प्रतिसाद देणे कसे राहून गेले काय माहिती. सादरीकरण निव्वळ थोर आहे. अमुकचे काटेकोरपण, कालपण आजपण उद्यापण, तुमच्यासाठी कायपण. _/\_

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

@ मेघना
तुमचे लेखन म्हणजे मेजवानी च वाटते मला , तुमचं काही ही वाचलं तर ते लक्षात राहतं . आणि शैली अशी की , अगदी खळखळून हसु येते. असे हसु मला मिरासदारांच्या कथा वाचतांना येते.
खरं तर कौतुकासाठी शब्द च नाहीयेत माझ्या जवळ.
लिहीत रहा.
अनेक शुभेच्छा !!

पाककृती वाचून एक प्रश्न पडला. मी बिस्किटं किंवा सदृश पदार्थ जेव्हा करतो (सदृश = आंबवून न फुगवता सोडा घालून फुगवण्याचा बेकरी पदार्थ) तेव्हा सोडा नेहमी कोरड्या मिश्रणात मिसळतो. उदा. इथे 'मैदा, ओट्स्, साखर, खोबरे' ह्यातच मी सोडा घातला असता आणि कोरडं मिश्रण चांगलं मिसळून तो सगळीकडे नीट सोडला असता. सोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दाखवल्यानुसार तो द्रव मिश्रणाशी संपर्क येताच फसफसू लागतो. त्यामुळे कोरडं मिश्रण आणि प्रीहीटेड अव्हन तयार असेपर्यंत मी द्रव मिश्रणाचा कोरड्या मिश्रणाशी संपर्क येऊ देत नाही. शिवाय, जर अव्हनमध्ये सगळी बिस्किटं एकाच घाण्यात मावणार नसतील, तर जेवढी मावतील तेवढंच कोरडं+द्रव मिश्रण एका वेळी झटपट एकत्र करेन, थापेन आणि अव्हनमध्ये ढकलेन. थोडक्यात, सोड्याचा द्रवाशी संपर्क येताच शक्य तितक्या लवकर पदार्थ अव्हनमध्ये ढकलणं हे माझ्यासाठी एक न-तडजोडीचं तत्त्व आहे. तर, इथे प्रश्न असा, की असं करण्यापेक्षा द्रव मिश्रणात सोडा घालायला सांगण्यामागे काही वेगळा विचार आहे का? त्यानं बिस्किटाच्या चवीत किंवा पोतात काही फरक पडतो का?

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आभार. आता बिस्किटं भाजा बघू. Wink

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हाच प्रश्न ही बिस्किटे भाजताना मलाही पडला होता. भट्टीत घलण्याआधीच सगळी सोड्याची फसफस निघून गेली तर बिस्किटे फुलणार कशी असे वाटले होते पण अमुकरावांच्या पाककौशल्यावर विश्वास असल्याने त्यांच्या कृतीप्रमाणे सोडा मिसळला. बिस्किटे चांगली खुसखुशीत झाली. त्यांच्या फोटोत दाखविल्याइतकी फुलली नाहीत पण तरी त्यांचा पोत चांगला वाटला, सोडा बिस्किटाच्या कोरडया मिश्रणातच मिसळायचा असेल तर कदाचित त्याचे प्रमाण जरा कमी करावे लागेल असे वाटले.
ही सोडा फसफसण्यावची पद्धत मी पूर्वी फक्त हनीकोम्ब बनविताना वापरलीय पण ते प्रकरण पुन्हा भट्टीत घालायचे नसल्याने वेगळे असते बिस्किटे बनविताना प्रथमच अशी पध्दत वापरली.

:ड
काय शैली, काय प्रतिभा धन्य आहे बाई तुझी! एक नियमित पाककृतींच सदर सुरु कर पाहू ऐसीवर.

धागाकर्त्याची तणतणत माफी

तुमच्याकडे माफीपण तणतणतच मागतात वाटतं.

२५ एप्रिलला अ‍ॅन्झॅक दिवस असतो. त्या दिवसापर्यंत अधिकाधिक लोकांनी प्रयोग करून पाहून आपापले अनुभव सांगितले तर मजा येईल.

वीकान्ताला कन्यकेला हाताशी धरून हा प्रयोग करण्यात आला आणि कळविण्यास आनंद होतो की तो सफलही झाला. खरंतर सगळं काम तिनेच केलं पण नवीन पाकृ. असल्याने मी फक्त देखरेख केली आणि खोबरं किसून दिलं.

Biscuits

पहिल्या घाण्यासाठी मैदा वापरला आणि पुढच्या घाण्यासाठी स्पेल्टचे पीठ वापरले, दोन्हींची चव छान आली फक्त साखरेचे प्रमाण मला थोडे जास्त वाटले, पुढच्या वेळी ते थोडे कमी करून पाहीन. या बिस्किटांतला सर्वात महत्वाचा घटक आहे खोबरे, त्याने फारच खुसखुशीतपणा आला.
लोणी थोडे कमी वाटले आणि बिस्किटे नीट मिळून येईनात म्हणून त्याचे प्रमाण थोडे वाढवून पाहिले आणि मग बिस्किटे थापली पण मग पाकृतले हे वाक्य दिसले,

१ कप (अमेरिकी माप) = १४० मिलि = १६ टेस्पू

माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकन एक कप म्हणजे २४० मिली असे माप असते. हा टायपो आहे की खरेच इतका छोटा कप वापरला? मी माझा नेहमीचा २४० मिलीचा कप वापरला आणि लोणी १३० ग्रॅम घातले.

कुणाची मागावी लागते नि का मागावी लागते त्यावर तणतण की तुणतुणं ते अवलंबून. Wink

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होय, साखर मलाही खूप वाटली. आता साखरेच्या जागी एक चतुर्थांश गूळ घालून करून पाहणार आहे.
आणि त्याहून मोहक वाटणारा प्रयोग असा - साखर अजिबात वगळून त्याजागी किंचित जिरे वा कलौंजी घालायची नि मधाची चुटपुटती गोडी तेवढी राहू द्यायची. तर ते बिस्कीट कसलं सेक्साट लागेल आणि चहाबरोबर काय बहार आणेल त्या विचारानेच मजा आली. थोड्या ओट्सवर करून पाहीन आणि सांगीन काय होतं.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कलौंजी म्हणजे काय?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

कांद्याचं बी.

*********
आलं का आलं आलं?

धन्यवाद!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सवडीने उत्तर देतो.

माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकन एक कप म्हणजे २४० मिली असे माप असते. हा टायपो आहे की खरेच इतका छोटा कप वापरला?
...... टंकनदोष/ नजरचूक. कारण १ अमेरिकी टेस्पू = १५ मिलि. म्हणून १ कप (अमेरिकी माप) = १६ टेस्पू = २४० मिलि.
चूक नजरेस आणून दिल्याबद्दल आभार. मूळ धाग्यात त्यानुसार बदल केला आहे.

मला कै मेघनासारखा चान चान वृतान्त लिहिता यायाचा नै त्यामुळे फकस्त फोटोरुपी दक्षिणा वाह्तोय. अतिशय सोपी, खुटखुटीत आणि फारसं काही चुकायची भिती नसलेली बिस्किटे करायला नी खायला बेहद्द मजा आली. "ही बिस्किटे कित्ती कित्ती टिकतात" हा त्याचा युएस्पी असला तरी एका दिवसांतच ती अर्धी संपल्याने (ते सुद्धा यात बटर बरंच ए... खूप नको एका दिवशी खायला... या वाक्याचा जप झाल्याने ती टिकली) तो टेस्ट करायचा अवधी मिळणार नाही Wink

मी दोन प्रकारे केली एका लहान भागात साखरे ऐवजी गूळाची पावडर घातली. ती बिस्किटे तर कहर खमंग लागली. साख्रेसाठी कृतीत दिलीये त्याच्या अर्धी साखर (अर्धा कप) वापरली. माझ्या चवीला ती अगदीच अचूक वाटली. मुलीला किंचित गोड चालली असती म्हणून तिला एकदा वरून मध चोपडून तर एकदा पिढीसाखर लाऊन दिली! Smile

तर आमची गुरूदक्षिणा:

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान दिसताहेत. एकूणात अनेकांचे प्रतिसाद पाहता साखरेचे प्रमाण अर्धा केलेलेच बरे असे दिसते आहे. म्हणून मूळ धाग्यात तसा बदल करतो आहे. सर्वांचे आभार.