नावात काय... नावाचं काय... इत्यादी

आता माझं नाव 'दुष्टबुद्धी' असं ठेवलेलं असतं, तर मी काय केलं असतं? :-).
आणि 'कविता' ठेवलेलं आहे, तरी मी काय करू शकतेय?
सूत्रसंचालक या जमातीच्या या नावावर आणि महाजन या आडनावावर केलेल्या कोट्यांनी वैताग आला की हे कळूनच चुकतं.

पात्रांची नावं ठेवताना फार व्याप होतो. नवं जन्माला आलेलं मूल असेल, तर त्याला एखादं नाव देणं सोपं असतं तुलनेत; कारण ते मोठं होऊन काय करेल हे माहीत नसतं आणि त्यानं अमुक असावं अशी काही अपेक्षा कल्पिलेली असेल तर ती त्या नावातून जाहीर करून टाकता येते. पण पात्र कोणत्या वयाचं जन्मेल काही माहीत नसतं आणि ते कशा स्वभावाचं आहे, कसं वागणारं आहे याचा धूसर का होईना अंदाज लेखकाला आलेला असतो व लिहितालिहिता ती कल्पना विकसित होत जाते.
काही नावं अगदी सहज सापडतात. जसं 'ब्र' लिहिताना मला प्रफुल्ला आणि सुमित्रा सापडल्या किंवा दयाळ सापडला. प्रफुल्लाचा शॉर्टफॉर्म फुलाताई असा लिहिता-लिहिताच झाला आपोआप, एक प्रसंगच लिहिला गेला त्यानिमित्तानं. शांतामावशी हे नाव माझ्या मामींच्या बहिणीचं. ती फार मायाळू स्वभावाची; आपुलकीनं विचारपूस करणारी. प्रफुल्लाच्या शांतामावशी तिच्या नावावरून घेतल्या गेल्या. असे कधी गुण शोधले जातात हे तेव्हा जाणवलं. काही जातींची वैशिष्ट्यं सांगणारी नावं असतात; जेव्हा एखाद्या जातीचा ठसठशीत संदर्भ घेऊनच एखादं पात्र येतं, तेव्हा त्या जातीतली नावं आठवू लागतात किंवा कधी आठवावी लागतात. उदा. महादेव कोळी समाज किंवा म ठाकूर समाज.

'भिन्न'च्या वेळी एका मार्क्सवादी बापाच्या मुलीचं नाव हवं होतं; ते माझ्या एका शाळेच्या मैत्रिणीचं नाव चोरलं - लेनिना. या नावाची मी पाहिलेली, ऐकलेली ही एकमेव मुलगी, दुसरी माझ्या कादंबरीतली. दोघींमध्ये काडीचंही साम्य नाही; फार-फार वेगळ्या आहेत. 'भिन्न'मधली प्रतीक्षा अगदीच प्रतिकात्मक नावाची वाटली, म्हणून मी जरा हिरमुसले होते; पण दुसरं काही सुचलं नाही. तर रचिता शिर्के या नावावर एक समीक्षक उखडले होते की,"तुम्हांला काय माहीत आहे मराठा समाजाविषयी? मराठा समाजातल्या बायका असं बोलणार वागणार नाहीत. मराठा समाजातल्या बाईला एड्स कसा होईल?"
अत्यंत विनोदी प्रसंग!
प्रमुख पात्रांच्या नावांच्या या गडबडी असतातच, पण लहान-सहान पात्रंही कधी ताप देतात. एका मोलकरणीचं नाव नेमकं माझ्या चुलत-चुलत नणंदेचं निघालं आणि मराठी टीव्ही मालिकेचा एक दे धमाल दुष्टाव्याचा एपिसोड खतरनाक डायलॉगसह सादर झाला.

'भिन्न'मधल्या एका प्रियकराचं नाव काय असावं यावर बराचवेळ अडखळले. आधीच्या पिढीतलं नाव हवं होतं. सुचलेलं काहीच पटेना. मग चक्क इंग्लीश इनिशिअल्स वापरली : जे.डी. हा प्रतीक्षाचा प्रियकर.
दुसरा प्रियकर लेनिनाचा. ती बोलतानाच त्याला 'मोहक' म्हणते, त्यामुळे प्रश्न आपसुक सुटला. मग काहीतरी प्रसन्न असं उगाच नावापुरतं नाव ठेवून दिलं त्याचं.

'कुहू'मधली कुहू आणि मानुषी ही दोन्ही प्रमुख पात्रांची नावं उत्स्फुर्तपणे सुचली. भिंगार सरडा, सण्णू साप, नाजूका फुलपाखरू ही देखील आनंदानं सुचलेली नावं.
भिंगार हा तसा निरर्थक शब्द, पण उगाच त्याला काहीतरी अर्थ असेल असं वाटत राहिलं.

माझी चौथी कादंबरी 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम'. जी आता लिहून पूर्ण झालीय आणि जानेवारीत प्रकाशित होईल.
तिची नायिका पद्मजा. तिच्या आडनावाचे लईच घोळ झाले. मी सुचलेलं एक आडनाव असंच लिहून टाकलं होतं; तिसर्‍या खर्ड्याच्या वेळी ध्यानात आलं की ही ब्राह्मण समाजातली मुलगी आहे आणि आपण आडनाव मराठा-कुणबी समाजातलं लिहिलं आहे. मग आडनाव बदलणं आलं. तिचे वडील मूळचे मिरज-सांगलीकडचे असा उल्लेख तपशीलात होता आणि आजोळही पन्हाळ्याजवळचं. मग तिथल्या परिचितांना फोन केले; तिथल्या ब्राह्मण समाजातील आडनावांची यादीच एकानं दिली. मग त्या यादीतली दोन आडनावं उचलली.
पात्र क्वचित काहीवेळा एखाद्या माणसावरून बेतलेलं असतं. मी साधारणपणे पाच-दहा माणसं एकत्र मिसळून टाकते. ( जसं दयाळ हे पात्र आठ लोकांना मिसळून बनवलेलं होतं. ) कुणाचा स्वभाव, कुणाचं रंगरूप, कुणाच्या लकबी, कुणाची भाषा आणि अनेकांचे अनुभव... त्यामुळे नावाला समांतर पर्यायी नाव शोधण्याचे उद्योग कधीच करत नाही. क्वचित एखादंच पात्र असं असतं की जे एकाच माणसावरून घेतलंय; त्याचाच जीव इतका मोठा असतो की दुसरं कुणी त्यात मिसळण्याची गरजच राहत नाही. तेव्हाही शंकररावांचा सदाशीवराव करण्यात मला रस नसतो. अमुक माणूस वाचकांना ओळखू यावा, त्याची बदनामी व्हावी असे दुष्टबुद्धी हेतू डोक्यात नसतील, तर असं करण्याची गरज काय? ही क्षुल्लक वृत्ती दाखवून माणूस म्हणून आपली घसरण का करून घ्यायची? अर्थात गमतीत कुणा मित्राला चिडवायचं-डिवचायचंच असेल तर खासगीत धमक्या देऊन टाकते मी की,"बघ बुवा... पुढच्या कादंबरीतल्या खलनायकाला तुझं नाव देईन हां मी."
कादंबरीतला काळ साधारण सत्तरेक वर्षांचा. ताप झाला डोक्याला जुनी नावं आठवताना. एकतर कसली विनोदी वाटत राहतात जुनी नावं आणि त्यातली काही आपल्या मामा-काका इत्यादींची निघतात, तर मग त्या पात्रांऐवजी हीच माणसं डोळ्यांसमोर येत राहतात लिहिताना. इतरही नको ते लोक आठवून ताप होतो. एका प्रियकराचं नाव दिग्विजय लिहिलं तर मला दिग्विजय सिंहांची एकेक वक्तव्यं आठवून हसूच यायला लागलं. प्रयत्नपूर्वक त्यांना झटकून टाकावं लागलं. यातला अजून एक प्रियकर दानिश. हे नाव माझ्या फार आवडीचं आहे. मला मुलगा झाला तर हे नाव ठेवीन असं मी ठरवलं होतं. मुलगा काही झाला नाही; मग हे नाव पद्मजाच्या एका प्रियकराला बहाल करून टाकलं.
या कादंबरीत काही नावं खरीखुरीही वापरली आहेत. ही उचापत पहिल्यांच केलीय. उदा. विजयाबाई, वामन केंद्रे, भक्ती बर्वे, रिमा, पणशीकर इत्यादी.
आणि एका आगाऊ पत्रकाराचं नाव आगाशे असं ठेवून त्याच्या नावाचा आचरट लाँगफॉर्म करण्याचा पौगंडावस्थी पोरकटपणाही केलाय.

काळ, जात, स्वभाव, रूप, कार्यक्षेत्र, प्रांत, वय... किती गोष्टींचा विचार होतो नुसती नावं लिहायची म्हटली तर!

आता मी लहान मुलांसाठी एक कादंबरी लिहितेय... फॅन्टसी आहे.
तिच्यातली बहुतांश नावं काल्पनिक आहेत. काहीही अर्थ नसलेले मजेशीर उच्चाराचे शब्द निर्माण करताना मजा वाटतेय.
केवळ पात्रांचीच नव्हे, तर प्रदेशाची काल्पनिक नावं आणि वाद्यांची, रंगछटांची, वासांची नावं देखील या कादंबरीत येताहेत...
कल्पनाशक्तीला मोकळं रान असं फक्त फॅन्टसीतच मिळू शकतं. मजा येतेय...
कादंबरीचं नाव आहे : कोलको!

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

आवडलं! Smile

लेखिकेच्या डोक्यात काय चालू असेल याचं नेहेमीच कुतूहल वाटत आलंय. प्रथम पात्रं सुचतात का प्रसंग का नावं का स्थळं का कथावास्तू असे अनेक प्रश्न पडतात. काहींचा उलगडा झाला. धन्यवाद!

त्यानं अमुक असावं अशी काही अपेक्षा कल्पिलेली असेल तर ती त्या नावातून जाहीर करून टाकता येते

असं केलेलं मात्र कृत्रिम बॉलिवुडी वाटतं. म्हणजे खलनायकाचं नाव दुर्जनसिंह वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रकटन आवडले!
चिकटलेल्या आणि चिकटवलेल्या नावांचा त्रास फार असतो याच्याशी शतशः सहमत.
भिंगार या नावाला तसा काही अर्थ नसला तरी नगरच्या जवळच्या एका गावाचं नाव आहे ते.
चकण्या लोकांना नगर-भिंगार म्हणत असू न कळत्या वयात. त्यामुळे भिंगार सरडा वाचून दोन्ही डोळे स्वतंत्रपणे फिरवणारा एक बाळू शॅमेलिअन डोळ्यासमोर येऊन गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक आठवण आली. आजचा सुधारक या मासिकाचा 'ब्राह्मणी कावा' Wink उघडकीस आणण्यासाठी आमचे मित्र आपले ऐसी अक्षरेवरील लेखक प्रभाकर नानावटी व टी बी खिलारे यांनी ब्राह्मण- ब्राह्मणेतर असा निकष लावण्यासाठी लेखकांच्या आडनांवांवरुन शिक्का मोर्तब केले. तुमची जात कुठली असे प्रत्येकाला विचारण्याची सोय नव्हती ना? मग काय करणार? पण कधी कधी अनेक आडनांवे फसगत करतात. ती सर्व समाजात ( इथे जात या अर्थाने) असतात. एकदा भालचंद्र मुणगेकरांनी मी तसला मुणगेकर नाही. जय भीम आहे. असे सांगितले होते. स़काळचे संपादक एक मुणगेकर होते ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जातीपाती विचारल्याशिवाय राहवत नाही लोकांना. आपण मानणारे नसलो तरी समोरचे मानणारे असल्यावर काय करणार? व्यवसायामुळे असलेली आडनावं अनेक समाजांमध्ये दिसतात. महाजन हे आडनाव 'सरदारजींमध्येही असतं' असं आडनावावरून जात शोधणार्‍याला गोंधळवून टाकणारं उत्तर मी अनेकदा देते. :-). ( आमच्या गावात - नांदेडमध्ये गुरुद्वारा बोर्डावर एक लड्डुसिंग महाजन होते.) कुणाला काय मानायचं ते मानू द्यावं, आपण जात कोणती हे स्वतः सांगू नये, इतकाच नियम मी माझ्यापुरता बनवून ठेवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

मला भारतात कधीही हा प्रॉब्लेम आला नाही. कदाचित विध्यार्थीदशेत असल्याने असेल. पण इथे अमेरिकेत आल्यानंतर, सुरुवातीला ओळखी होताना, सवयीने मी माझे फक्त नाव सांगितले कि मला लगेच आडनाव विचारले जायचे. विचित्र वाटायचे तेव्हा.

ते जाऊदे, कविताताई, तुमच्या ब्र या कादंबरीच्या नावावरून घडलेला एक विनोदी किस्सा इथे देते. माझे एक मित्र भारतात यायला निघाले होते. त्यांच्याजवळ मी दोन-तीन पुस्तके आणायला सांगितली. त्यात ब्र एक होते. नंतर माझ्या लक्षात आले कि ते पुस्तक इथे कुणाकडे तरी आहे तेव्हा मी त्याला, “Please cancel Bra. Get me Bhinn.” म्हणून ई-मेल पाठवला. त्यावर त्याचा रिप्लाय आला, “Are you sure? Because guys would always like to cancel bra.. “ Biggrin

अर्थात, तू माझ्याशी असला विनोद केलासच कशाला, म्हणून नंतर मी त्याच्याबरोबर भांडले आणि त्या विनोदाचा फज्जा उडवला हे वेगळं! My bad!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0